संपन्न सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर...

'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचा भाग 7

येरेवानमधील वंशसंहार स्मारकात श्रद्धांजली वाहणारे 'जय जगत 2020' चे पदयात्री.

2 ऑक्टोबर 2019 रोजी गांधींजींच्या 150व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखाली  'जय जगत 2020 - जागतिक शांती मार्च' या पदयात्रेला दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीस्थळापासून- राजघाटपासून- सुरुवात झाली. तीन महिने भारतात तर उरलेले नऊ महिने विदेशात, अशी वर्षभर चालणारी ही 14 हजार किलोमीटरची पदयात्रा 10 देशांतून प्रवास करणार होती. या यात्रेदरम्यान जगभर अहिंसा, शिक्षण व सामाजिक न्यायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण व कार्यक्रम होणार होते.पदयात्रेचा मूळचा मार्ग हा राजघाट ते वाघा-बॉर्डर; तिथून पाकिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, नंतर बाल्कन राष्ट्रे, मग इटली आणि शेवटी स्वित्झर्लंड असा होता. या पदयात्रेची सांगता 2 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय असलेल्या जिनिव्हा येथे होणार होती.

मराठीतील प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील या पदयात्रेत सहभागी झाले होते, त्या अनुभवावरील लेख समकालीन प्रकाशनाकडून लवकरच येणाऱ्या 'क्षितिजापारच्या संस्कृती' या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. तो संपूर्ण लेख क्रमशः आठ भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा भाग 7. 
- संपादक

अकरा मार्चच्या संध्याकाळी आम्ही येरेवानला पोहोचलो. पुरातत्त्व संग्रहालय बघायला गेल्याने त्या दिवसाचे चालणे 29 किलोमीटर झाले. पदयात्रेच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे येरेवानमध्ये तीन-चार दिवस मुक्काम होता. त्या काळात निरनिराळे उपक्रम होते. एक म्हणजे पदयात्रेच्या निमित्ताने प्रशिक्षण शिबिरे होती. तिथल्या काही स्वयंसेवी संस्थांना भेटी द्यायच्या होत्या. राजगोपाल यांची पत्रकार परिषद होती. आर्मेनियाच्या मुख्य चर्चचे जे स्थान होते (रोममधल्या व्हॅटिकनसारखे) त्याला भेट द्यायची होती. शिवाय पदयात्रींना कपडे धुण्यासारख्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्यासाठीही मोकळा वेळ ठेवलेला होता.
    
ज्या संस्थेला पहिल्यांदा भेट दिली तिचे नाव होते ‘आर्टिकल 3’. ही एक मानवी हक्कांवर काम करणारी संस्था होती. आर्मेनियाच्या राज्यघटनेमध्ये तिसरे कलम हे मानवी हक्कांशी संबंधित होते आणि त्याची प्रस्तावनाच मुळी ‘आर्मेनियन प्रजासत्ताकामध्ये मनुष्यत्त्व हे सर्वश्रेष्ठ मूल्य मानले जाईल’ या वाक्याने सुरू होत होती. आर्मेनिया 1991 साली रशियन संघराज्यापासून स्वतंत्र झाल्यावर ही राज्यघटना लिहीली गेली आणि तिच्यामध्ये बहुविधता, समता व समानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली होती. आधी म्हटल्याप्रमाणे तेव्हापासून आर्मेनियामध्ये स्वयंसेवी संस्था वाढायला लागल्या आणि त्यांनी नंतरच्या घडामोडींमध्ये फार महत्त्वाची कामगिरी बजावली. 
    
या तीनचार दिवसांत जो मोकळा वेळ मिळाला त्यात मी दोन महत्त्वाची ठिकाणे पाहून घेतली. एक म्हणजे त्यांचे राष्ट्रीय इतिहास संग्रहालय आणि दुसरे म्हणजे वंशसंहार संग्रहालय (जेनोसाइड म्युझियम). येरेवान तसे देखणे शहर आहे आणि शहरात तर तुम्ही हिंडू शकताच पण मुद्दाम बघितली पाहिजेत अशी ठिकाणे म्हणजे ही दोन.
    
इतिहास संग्रहालय शहराच्या मध्यभागी जो ‘पार्लमेंट स्क्वेअर’ होता त्याच्याच कडेला होते. हे मुळात 1921 मध्ये स्थापन केले गेले आणि नंतर त्याचा विस्तार केला गेला. आता त्याचे तीन भव्य मजले आहेत. तळमजल्यावरच्या स्वागतिकेने सांगितले की तुम्ही सगळ्यात वरच्या मजल्यावरून सुरुवात करा आणि मग एकेक करत खाली या. 
    
ती तसे का म्हणाली हे तिसऱ्या मजल्यावर गेल्यावर लक्षात आले. त्यातले पहिले दालन होते तेच मुळी पुराश्मकाळातले. तिथे त्या काळातली दगडाची हत्यारे मांडून ठेवली होती. पुराश्मकाळ म्हणजे किती मागे? आर्मेनियामध्ये जाबर्ड नावाच्या ठिकाणी जी हत्यारे सापडली त्यातली काही सुमारे पाच लाख ते एक लाख वर्षे इतक्या जुन्या काळातली होती. म्हणजे कदाचित होमो सेपियन्सच्याही अगोदरची. आणि ती अतिशय रेखीव आणि उत्कृष्ट होती. नंतरच्या काळातली म्हणजे ज्याला मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग म्हणतात (6,000 वर्षांपूर्वीपर्यंत) अशी हत्यारेही तिथे मांडलेली होती. ती कोणत्या ठिकाणी मिळाली तेही नमूद केलेले होते. त्यावरून लक्षात येत होते की आर्मेनियामधल्या मानवाच्या पाऊलखुणा या खरोखरच फार प्राचीन होत्या.  
    
त्यानंतरची जी तीन दालने होती त्याबद्दल मला सर्वांत जास्त कुतूहल होते. कारण ती होती ताम्रयुगाची, म्हणजे साधारण 8,000 वर्षांपूर्वीपासूनची. हा जो काळ आहे त्यातच खऱ्या अर्थाने मानवी संस्कृतीची पायाभरणी झाली. ह्या काळातली दगडाची हत्यारे तर होतीच शिवाय अत्यंत सुबक अशी विविध प्रकारची मातीची भांडी होती. मुख्य म्हणजे त्यातली अनेक ही मूळच्या अखंड स्वरूपात होती. एरवी अर्धवट तुकड्यांच्या रूपातच खापरे मिळतात. त्यातली एक वैशिष्ट्यूपर्ण वस्तू म्हणजे साधारण 4,200 वर्षांपूर्वीचे एक चांदीचे, कलाकुसरीचे पात्र. ते बहुधा देवतांना हविर्भाग देण्यासाठी असावे अशी तिथे नोंद होती. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेव्हापासून या लोकांना चांदीचा शोध लागला होता आणि तशा वस्तू घडवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. तांब्यापासून घडवलेल्या लहानमोठ्या वस्तू तर अनेक होत्या. 
    
याच्या नंतरच्या काळातली म्हणजे ज्याला लोहयुग म्हणतात त्या काळातली एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू म्हणजे दगडी लिंग. हे हुबेहुब लिंगाच्या आकारातले (आपल्याकडच्या पिंडीसारखे नाही) आणि सुमारे 3,200 वर्षांपूर्वीचे होते. हे ल्हाशेन या ठिकाणी मिळाले. अशा प्रकारची लिंगपूजा त्या काळात अस्तित्त्वात असावी. याच प्रकारे मातृदेवतांच्या अगदी लहान आकारातल्या मूर्तीही तिथे होत्या. या काळातल्या निरनिराळ्या ठिकाणच्या संस्कृती एकमेकांशी जोडलेल्या कशा होत्या आणि त्यांचा सामायिक ऐवज कोणता होता हे समजण्यासाठी अशा मूर्तींचा फार उपयोग होतो. 
    
कॉकेशस पर्वतातल्या या संस्कृतीबद्दल आपल्याला कुतूहल असते कारण कुठे तरी आपण ऐकलेले असते की आपले काही पूर्वज या भागातून आले. ते कुतूहल शमेल (किंवा आणखी वाढेल) अशाही काही वस्तू तिथे होत्या. ल्हाशेन या ठिकाणीच सुमारे 3,500 वर्षांपूर्वीच्या लाकडी गाड्या आणि रथ मिळालेले होते. या गाड्या वा रथांची चाके ही अखंड लाकडाची होती (आज जशी आरे पाडलेली असतात तशी नाही). मानवी दळणवळणाच्या इतिहासाच्या अभ्यासकांसाठी आर्मेनियात सापडलेला हा एक ठोस पुरावा मानला जातो. अशा गाड्या आणि रथांच्या तांब्याच्या लहान प्रतिकृतीही तिथे सापडलेल्या होत्या.

आपल्याकडे त्या काळात हडप्पा संस्कृतीचा शेवटचा टप्पा होता असे मानले जाते. आता त्या काळात ही माणसे तिकडून इकडे आली का हे निश्चित सांगता येणार नाही. कारण या काळापर्यंत या सगळ्या मोठ्या पट्‌ट्यात (मेसापोटेमियापासून हडप्पापर्यंत) निरनिराळ्या संस्कृती उदयास आलेल्या होत्या. माणसांची स्थलांतरे होत असतात, पण खरी गोष्ट अशी आहे की संस्कृतींमध्ये देवाण-घेवाण होत असते. माणसे व्यापाराच्या वा इतर निमित्तांनी एकमेकांकडे जातात. त्यांच्यामुळे ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचे आणि विविध वस्तुंचे आदान-प्रदान होते. त्यासाठी समूहांची स्थलांतरेच व्हायला हवी असे नाही. शिवाय काही माणसांनी स्थलांतर जरी केले तरी मूळ ठिकाणची वसाहत ही चालूच असते.
    
आर्मेनियामधली तशी वसाहत चालू राहिली होती हे पुढच्या दालनांवरून कळत होते. पुढची दालने ही आधी उल्लेखलेल्या उरार्त्रु संस्कृतीची होती जी इ.स.पूर्व 900 ते 600 या काळात भरभराटीला आली होती. या काळातल्या तर असंख्य वस्तू तिथे होत्या. अगिॅष्टी राजाचा अस्सल शीलालेख तर होताच शिवाय सोन्या-चांदीचे अलंकार, उपकरणे, वेगवेगळ्या उपयोगाची मातीची आणि तांब्याची भांडी, मूर्ती, भित्तीचित्रे, वाइनचे कुंभ, देवतांच्या मूर्ती एवढेच नाही तर वस्त्रप्रावरणेही होती. शस्त्रांमध्ये धनुष्य आणि बाण होते. माझ्याकडे आपल्याकडचे आदिवासी वापरत असलेले कळकाचे धनुष्य आणि बाण आहेत. इथले बाण तसेच होते (लोखंडी वा तांब्याची टोके असलेले). धनुष्ये मात्र वेगळी होती. ती वेत किंवा कळकाची नसून शोभिवंत आणि लाकडाची होती. कदाचित ती फक्त समारंभात धारण करण्याची असावीत.
    
आर्मेनिया हा डोंगरांच्या खोऱ्यातील लहान आणि सर्व बाजूंनी बंदिस्त असा देश असल्याने संस्कृतीचे सातत्य जसे तिथे दृष्टीस पडत होते तसेच त्याच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे इतर संस्कृतींचा प्रभाव व परिणाम कसा होत होता तेही समजत होते. आधीच्या काळात ग्रीक, रोमन, बायझंटाइन या संस्कृतींचा प्रभाव होता तर नंतर दक्षिण-पूर्वेकडच्या पर्शियन, पश्चिमेकडच्या ऑटोमान-तुर्क आणि उत्तरेकडच्या रशियन साम्राज्याचा प्रभाव पडला. या नंतरच्या इतिहासाने खरं तर आर्मेनियावर फार खोलवर परिणाम केला.
    
राष्ट्रीय इतिहास संग्रहालयातील खालच्या मजल्यांवर त्या अलीकडच्या इतिहासाची दालने होती, पण तो झगझगीतपणे बघायला मिळाला तो तिथल्या ‘जेनोसाइड’ म्हणजे वंशसंहार संग्रहालयात. आर्मेनियाने इ.स.301 मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला हे अगोदर पाहिलेच. त्या घटनेनंतर आर्मेनियाचा इतिहास हा भोवतालच्या राज्यांपेक्षा निराळा होत राहिला. या नंतरच्या पाचशे वर्षांत या भागात ख्रिश्चन धर्माची वाढ झाली पण आठव्या शतकानंतर इस्लामचा दबाव वाढू लागला. पर्शियन साम्राज्याचे इस्लामीकरण झाल्यावर तो आणखी वाढला आणि 1453 मध्ये इस्तंबूलचा पाडाव झाल्यानंतर तर आर्मेनियाच्या तिन्ही बाजूंनी इस्लामी राष्ट्रांचा विळखा पडला. 

आर्मेनिया फार लवकर ख्रिश्चन झाल्यामुळे शिक्षण, विद्या, कला, संस्कृती, उद्योग यांना चालना मिळाली होती आणि भोवतालच्या इस्लामी नागरिकांच्या तुलनेत आर्मेनियन हे अधिक शिकलेले, सुसंस्कृत, संपन्न आणि कायदा व व्यापारउदीम जाणणारे  होते. मात्र अरब, पर्शियन, तुर्की आणि रशियन साम्राज्यांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेत आर्मेनियाची ससेहोलपट होई आणि देशाचे लचके तोडले जात.

देशांतर्गत स्वस्थता नसल्याने या काळात आर्मेनियन लोकांचे सर्वदूर मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. ऑटोमन खलिफांच्या काळात इस्तंबूलमध्ये तर फार मोठी आर्मेनियन वस्ती होतीच पण तुर्कस्तानच्या विविध भागांमध्ये आर्मेनियन वसाहती होत्या. मात्र भोवतालच्या या इस्लामी जगाला स्वत:चा धर्म आणि अस्मिता चिवटपणे जपणारे आर्मेनियन लोक कायम सलत असत आणि म्हणून त्यांची कायम छळवणूक होत असे.

या आर्मेनियन लोकांचं करायचं काय असा प्रश्न त्यावेळच्या तुर्की राजवटींसमोर होता (1908 साली खलिफांची राजवट संपून ‘तरुण तुर्क’ गादीवर आले होते). पहिल्या महायुद्धाची धुमश्चक्री चालू असताना त्यांनी असे ठरवले की हा प्रश्न निकालात काढायचा असेल तर आर्मेनियन लोकांचाच नायनाट केला पाहिजे आणि म्हणून अत्यंत क्रूर, पद्धतशीर रितीने त्यांनी 1914 ते 1923 या काळात हा वंशसंहार केला. यामध्ये सुमारे पंधरा लाख आर्मेनियन लोकांची हत्या झाली असे मानले जाते.
    
या वंशसंहाराची अत्यंत हृदयद्रावक स्मृती ह्या संग्रहालयामध्ये जपलेली होती. तिथे फोटो आणि फलक तर होतेच शिवाय चित्रफिती आणि ध्वनिफितीही होत्या. आधुनिक काळातला हा पहिला वंशसंहार मानला जातो. त्यानंतर हिटलरच्या काळात ज्यूंचा आणि 1975-79 या काळात पोल-पॉट राजवटीत कंबोडियामध्ये असा जनसंहार झाला (नॉम पेन्हमध्येही असाच म्युझियम आहे).

या संग्रहालयाला लागून एक स्मारकही उभारलेले होते. सर्व बाजूंनी गोलाकारात उंच मनोरे आणि मध्यभागी सतत पेटत राहिलेली ज्योत असे त्याचे स्वरूप होते. येरेवान शहराच्या कडेला एका टेकडीवर हे स्मारक होते. शहराच्या कोणत्याही भागातून दिसू शकेल असे. या वंशसंहाराचा एक परिणाम असा झाला की आर्मेनियन लोक सर्व जगभर पांगले. आजमितीस 30 लाख लोक आर्मेनियात राहतात तर सुमारे 80 लाख बाकी जगभर. असे क्वचितच कोणत्याही संस्कृतीबद्दल झाले असेल. 
    
तुर्की साम्राज्यापासून वाचण्याचा एक मार्ग म्हणूनच आर्मेनियाने सोव्हिएट रशियातील सामिलीकरणाला विरोध केला नसावा. तसा त्यांना दुसरा पर्याय नव्हताच म्हणा. रशिया आणि तुर्कस्तान यांच्यातल्या युद्धानंतर 1878 साली जो करार झाला होता त्यात ह्या दोन्ही राष्ट्रांनी आपल्याला हवी तशी आर्मेनियाची फाळणी करून घेतली होती.

रशिया कम्युनिस्ट असला तरी ख्रिश्चन आहे ही गोष्ट आर्मेनियनांना सुसह्य वाटली असावी. पण तेवढा एक धागा सोडला तर बाकी साम्य काहीच नव्हते. त्यामुळे सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यावर आर्मेनियाने स्वतंत्र होणे हे साहजिकच होते. मात्र जुन्या वैराचा वारसा काही संपलेला नाही. पश्चिमेला तुर्कस्तान आणि पूर्वेला अझरबैजान ह्या दोन्ही सीमा अशांतच आहेत.     

-मिलिंद बोकील
(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत  मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)

वाचा 'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचे इतर भाग-
1. 
जय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल 
2. बर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा 
3. अझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा 
4. अरारात पर्वताच्या पायथ्याशी...
5. चाळीस पदयात्रींचे आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे

6. प्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडणारे येरेवान शहर

Tags:Load More Tags

Comments:

जवाहर नागोरी

सर्व लेख खूप छान आहेत. खूप आवडले. खूप दिवसांनी फेस बुक पहातोय.

Vasanti Damle

भारतातही कोलकात्यात व मुंबईत आर्मेनियन लोकं होती व सध्या कोलकात्यात आहेत. मुंबईत फाऊंटन जवळ आर्मेनियन चर्च आहे. बंद आहे. मी बर्याच वर्षांपूर्वी मुद्दाम ते बघायला गेले होते.

Add Comment

संबंधित लेख