2 ऑक्टोबर 2019 रोजी गांधींजींच्या 150व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखाली 'जय जगत 2020 - जागतिक शांती मार्च' या पदयात्रेला दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीस्थळापासून- राजघाटपासून- सुरुवात झाली. तीन महिने भारतात तर उरलेले नऊ महिने विदेशात, अशी वर्षभर चालणारी ही 14 हजार किलोमीटरची पदयात्रा 10 देशांतून प्रवास करणार होती. या यात्रेदरम्यान जगभर अहिंसा, शिक्षण व सामाजिक न्यायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण व कार्यक्रम होणार होते.पदयात्रेचा मूळचा मार्ग हा राजघाट ते वाघा-बॉर्डर; तिथून पाकिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, नंतर बाल्कन राष्ट्रे, मग इटली आणि शेवटी स्वित्झर्लंड असा होता. या पदयात्रेची सांगता 2 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय असलेल्या जिनिव्हा येथे होणार होती.
मराठीतील प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील या पदयात्रेत सहभागी झाले होते, त्या अनुभवावरील लेख समकालीन प्रकाशनाकडून लवकरच येणाऱ्या 'क्षितिजापारच्या संस्कृती' या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. तो संपूर्ण लेख क्रमशः आठ भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा भाग 3.
- संपादक
सकाळी उठून, आन्हिके आवरून आणि नाश्ता करून आम्ही चालायला सुरुवात केली. स्वैंपाकी गटाने ओटची खीर बनवली होते. स्थानिक ब्रेड. तो आपल्याकडच्या पावाच्या लादीसारखाच, पण सपाट आणि गोल गुंडाळ्यासारखा होता. हेडमास्तरांच्या बायकोने सकाळी खरे तर घरी बोलावले होते. तसे जायला उत्सुक होतो, पण काही कारणाने तो कार्यक्रम रद्द झाला. एकच शौचालय. तापमान पाच अंशाखाली. आंघोळीचा प्रश्नच नव्हता. सगळे तयार व्हायला साडेनऊ वाजले.
चालायला सुरुवात करण्यापूर्वी पदयात्रेचे गीत म्हटले गेले. ‘जय जगत, जय जगत, जय जगत पुकारे जा.’ पदयात्रेचे काही सफेद झेंडे काठ्यांना लावलेले होते. ते कोणी कोणी हातात घेतले. जिलने गांधीजींचे चित्र असलेले प्लेकार्ड माझ्या गळ्यात घातले. असेच कस्तुरबांचेही चित्र होते. ते दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात. तो पुठ्ठा हलका होता पण चालताना पायात येत होता. माझा पहिला दिवस. जिलने बरोबर ओळखले. नवीन पांथिकाला दीक्षा घ्यावीच लागते.
सोबत स्थानिक संस्थेचा डेव्हिड हा तरुण मुलगा होता. त्याने सूचना दिल्या. आजचे अंतर 24 किलोमीटर होते. मात्र डोंगरातून 18 किलोमीटर खाली उतरल्यावर चार किलोमीटरचा एक तुकडा लागणार होता. तो धोकादायक होता. कारण तिथे एका बाजूला अझरबैजानची सीमा लागत होती. डोंगरावरच्या अझेरी सैनिकांच्या टप्प्यात तो भाग येत होता आणि पूर्वी त्यांच्याकडून हायवेवर गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे तो टप्पा अत्यंत झपाट्याने आणि सगळे बरोबर राहून पार करायचा होता. ज्यांना झपाझपा चालणे शक्य नव्हते त्यांनी सोबतच्या बसमधून जायचे होते.
चालत निघालो. गावातून हमरस्त्याला लागेपर्यंतचे दोन किलोमीटर अंतर सगळा जत्था बरोबर होता पण नंतर चालणाऱ्यांमध्ये अंतर पडत गेले. बहुतेक पदयात्रांमध्ये असेच होते. अगदी दोघादोघांच्या ओळी करून कटाक्षाने एका रांगेत चालले तरच सगळे सोबत राहतात. शहरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तसे करावे लागते, पण उघड्या डोंगराळ रस्त्यावर ती शिस्त राहात नाही. काही लोक नेहमीच पुढे चालतात. काही मध्यात तर काही नेहमीच (आणि मुद्दाम) मागे रेंगाळणारे असतात. इथेही तसेच झाले. हायवेला लागल्यावर प्रत्येक जण आपापल्या गटात, एकेकटा किंवा कोणाबरोबर बोलत चालायला लागला.
रस्ता कॉकेशसच्या घाटमाथ्यावरचा होता. मात्र आता उतरत जाणारा. लांब दूरवर दुसरे डोंगर आणि त्यांच्यामधल्या दऱ्या दिसत होत्या. फार उंच नव्हत्या पण लांबवर पसरलेल्या. दुभाजक नसले तरी हायवे असल्याने रस्ता चांगला रुंद होता. आपल्या तुलनेत रहदारी बेताची होती. मोटारगाड्या आणि ट्रक. मधून मधून लष्करी वाहने. बहुतेक ड्रायव्हर आम्हाला बघून दोनदा सलामीदर्शक हॉर्न वाजवत. काही जण हातानेच ‘कुठे’ असा प्रश्नही विचारत. प्रवासाला निघालेली कुटुंबे असतील तर ती थांबत. चौकशी करत. पदयात्रींपैकी कोणी तरी त्यांना माहितीपत्रक देई. उत्साही असतील तर सेल्फी काढून मग पुढे जात. असा पायी चालणारा जत्था आणि तोसुद्धा परदेशी लोकांचा; कोणालाही उत्सुकता तर वाटणारच.
धाकटा आणि कमी उंचीचा मानला जात असला तरी त्या पंधरा-वीस किलोमीटरच्या वाटचालीत तो कॉकेशस पर्वत मात्र मी मन:पूत पाहिला. तुम्ही पायीच चालता तेव्हा कोणताही भूभाग तुम्हाला सर्वांगाने अनुभवता येतो. तुमच्या पायाला जमिनीचा स्पर्श होतो, तुमचे डोळे प्रत्येक गोष्ट सावकाश टीपत जातात, तुमची फुफ्फुसे तिथली हवा अंगभर भरून घेतात, तुम्हाला हवेचा वेगळा वास जाणवतो आणि आपण वेगळ्या भूभागात आहोत या जाणिवेने तुमची सगळी इंद्रिये कशी सजग असतात.
कॉकेशस पर्वतरांगांविषयी आपल्याला एक वेगळेच कुतूहल असते. लोकमान्य टिळकांनी ‘आर्क्टिक होम इन वेदाज’ लिहिले आहे म्हणूनच नाही तर आपले कोणते तरी पूर्वज या भागातून आले असे आपण ऐकलेले असते म्हणूनही. आर्मेनिया हा लहानसा असला तरी पुरातन संस्कृतीचा प्रदेश आहे. येरेवानला गेल्यानंतर मी तिथली पुरातत्त्व आणि इतिहास संग्रहालये पाहिली तेव्हा या गोष्टीची साक्ष पटली. त्यामुळे ह्या प्रदेशातून हिंडताना हुरहुरल्यासारखे होत होते.
कॉकेशस हा पर्वत म्हणून फार आकर्षक नाही. तो काही हिमालयासारखा उत्तुंग नाही की सह्याद्रिसारखा रौद्रभीषण नाही किंवा निलगिरीसारखी घनदाट हिरवाई त्यामध्ये नाही. मुळात समुद्रतळाच्या अवसादाने बनलेला आहे म्हणून असेल किंवा हवामानात तीव्र चढउतार असल्याने असेल, सगळे घाटमाथे उजाड होते. डोंगरउतारावर झुडपे होती आणि ठिकठिकाणी वाळक्या गवताचे पुंजके. मात्र आधीचे काही महिने कडक हिवाळा सोसून ते सगळे निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते. उदास, निष्पर्ण झाडे. मातीच्या भुऱ्या रंगात मिसळून गेलेली. अर्थात हे हिवाळ्यामुळे होते. वसंत ऋतू येताच ह्या सगळ्या दृश्यावर वेगळेच चैतन्य आले असते. नंतर उन्हाळ्यात तर सगळे दृश्य अप्रतिम मनोहारी झाले असते. पण आता मात्र सगळ्या दृश्यावर शुष्क, कोरडा भाव होता. हे पर्यावरण दाट लोकसंख्येसाठी उपयुक्त नव्हते. कदाचित तसे झाल्यानेच माणसे ह्या प्रदेशातून पूर्वेकडे सरकली असतील.
मिशेल नॉदेत हा फ्रेंच सहयात्री या टप्प्यात माझ्याबरोबर होता. मध्यम उंची, पिंगट दाढी, निळे डोळे, हसतमुख, गोरापान, उत्साही चेहेरा. वय पासष्टच्या आसपास. तो भारतातही पहिल्या दिवसापासून पदयात्रेत होता. जिलने मला सांगितले होते की तो फार वैशिष्ट्यपूर्ण माणूस आहे. त्याची प्रचिती त्याच्या सोबत चालताना आली. महात्मा गांधींचे प्रसिद्ध इटालियन अनुयायी, लॅन्झा डेल व्हास्तो, (जे नंतर विनोबांच्या भूदानयात्रेतही सामील झाले होते) यांनी फ्रान्समध्ये ‘कम्युनिटी ऑफ द आर्क’ नावाचा आश्रम काढून एक वेगळ्या प्रकारचे समूहजीवन सुरू केले होते. मिशेल त्या कम्युनिटीसोबत अनेक वर्षे होता. त्याला स्वत:ची तीन मुले असूनही त्याने बांगलादेशमधील ‘चकमा’ निर्वासितांपैकी एका मुलाला दत्तक घेऊन मोठे केले. आता त्या मुलाचे लग्न होऊन त्याला एक मुलगा आहे. पण मिशेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 2007 साली, एक यात्रेकरू म्हणून त्याने पॅरिस ते जेरुसलेम हे 5,500 किलोमीटरचे अंतर पायी पार केले. आणि तेसुद्धा जवळ एकही पैसा न बाळगता किंवा क्रेडिट कार्ड न घेता. त्या प्रवासाच्या आठवणी तो मला सांगत गेला. काही काही वेळा उपाशी झोपलो म्हणाला पण बाकी सर्व वेळा लोकांनीच माझी काळजी घेतली. जेवूखाऊ तर घातलेच पण रात्री घरात झोपायचीही व्यवस्था केली. तुर्कस्थानातल्या घडामोडींमुळे मार्ग बदलावा लागला पण शेवटी त्याने यात्रा पुरी केलीच. ते सगळे ऐकून मी थक्क होऊन गेलो. आम्ही पाच-पंचवीस किलोमीटर चालतो तर आम्हाला त्याचे कौतुक पण हा तर जवळपास एक-चतुर्थांश जग पायी ओलांडून गेला. आणि मुख्य म्हणजे खिशात पैसे न घेता! विनोबा आज असते तर त्यांनी त्याला प्रेमाने हृदयाशी घट्ट धरले असते.
आम्ही बोलत होतो आणि रस्ता मागे पडत होता. हा सगळा उतार असल्याने चालण्याचे सायास होत नव्हते. वाटेत डोंगरातली गावे दिसत होती. आपल्याकडे कळसूबाई परिसरातल्या डोंगरात दिसतात तशी. दगडी बांधकामे पण बर्फ ओघळून जावे म्हणून पत्र्याची उतरती छपरे. बहुतेक घरांतून चिमण्यांची धुराडी वर निघालेली. अनेक घरांवरती सोलर पॅनेल बसवलेली. घरांभोवती गवताच्या पेंड्या रचून ठेवलेल्या. शेते उघडी होती आणि सफरचंदाची झाडेही निष्पर्ण उभी असलेली. वस्त्या विरळ होत्या आणि गावांमधूनही फारशी जागा नव्हती.
पुढे मग तो धोकादायक टप्पा आलाच. सगळे पदयात्री एकत्र झालो आणि झपाझप चालू लागलो. अझरबैजान हे राष्ट्र आर्मेनियाच्या पूर्वेला जरी असले तरी फाळणी होताना त्याचा एक हिस्सा हा पश्चिमेलाही राहिलेला आहे. ही दोन्ही राष्ट्रे पूर्वीच्या रशियन संघराज्यामध्ये एकत्र असली तरी स्वतंत्र झाल्यावर त्यांच्यामधून विस्तवही जात नाही. येरेवानला जाणारा हा जो रस्ता होता तो पश्चिमेकडच्या अझेरी सैन्याच्या टप्प्यामध्ये येत होता. तिथे आल्यावर डेव्हिडने डोंगरावरची ती अझेरी ठाणी दाखवली. हायवेच्या कडेने खंदक खणलेले होते. आर्मेनियाची लष्करी ठाणी तिथून लांब होती पण ही जी दुसरी बचावफळी होती ती रस्त्याच्या कडेने होती. आता तिथे सैनिक नव्हते पण खंदकाच्या कडेने बंकर बांधलेले होते. डेव्हिडचे म्हणणे असे होते की अझेरी सैनिक दुर्बिणीतून ह्या रस्त्यावर नजर ठेवून असतात आणि असा मोठा गट जाताना दिसला तर त्यांचा संशय बळावू शकतो. त्याचे हे बोलणे अतिशयोक्त आहे हे सर्वांना कळत होते पण तो स्थानिक संयोजक असल्याने त्याच्या बोलण्याचा मान ठेवून सगळ्यांनी तो टप्पा वेगाने पार केला.
ते अंतर कापून आम्ही येराख नावाच्या गावात आलो. तिथला मेयर आमच्या स्वागतला हजर होता आणि त्याने गावातर्फे पदयात्रींसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. ती हायवेला लागून असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये होती. जेवण साधेच होते. आर्मेनियात खाल्ली जाणारी ‘लवांश’ नावाची रोटी, सॅलड आणि चीज. आपल्याकडच्या रुमाली रोटीसारखी ही मैद्यापासून बनलेली लवांश असते मात्र ती बनवताना दीड-दोन मीटर लांब पट्टयासारखी बनवतात. तिचे तुकडे तोडून खायचे. वाटेत चालत असताना एकता परिषदेची शोभा माझ्यासोबत काही वेळ चालत होती. ती म्हणत होती की वाटेत दिसणारे हे आर्मेनियन लोक नुसते हात हलवतात; प्रत्यक्षात काहीच आतिथ्य दाखवत नाहीत. भारतात कसे, पदयात्रेला ठिकठिकाणच्या गावातले लोक सामोरे येऊन हारतुरे घालत असत आणि चहा घ्या, दही घ्या, ताक प्या, रोटी खा असा आग्रह करत असत. इथे तसे काहीच नाही. येराख गावात लोक समोर आले नाहीत, पण शोभाचे बोलणे मात्र त्यांनी अबोलपणे खोटे ठरवले.
मग उरलेला तीनचार किलोमीटरचा टप्पा पार करून आम्ही अर्माश नावाच्या गावात आलो. आता रात्रीचा मुक्काम तिथे होता. गावातल्या हायस्कूलमध्येच व्यवस्था केलेली होती. हेडमास्तर आणि इतर शिक्षकांनी स्वागत केले. हे गाव तसे मोठे असल्याने शाळा चांगली भव्य होती. गावात शिरतानाच एक नवलाईची गोष्ट बघितली. ती म्हणजे वीजेच्या प्रत्येक खांबावर व्हाइट स्टॉर्क म्हणजे शुभ्र सारस पक्ष्यांनी घरटी बांधलेली होती. असे समजले की आर्मेनियामध्ये ही संवर्धनाची परंपराच आहे. वीजेचे खांब लाकडी किंवा काँक्रिटचे असतात आणि त्यांच्या माथ्यावर उलट्या शंकूसारखे लोखंडी सांगाडे मुद्दाम बांधलेले असतात. हे सारस पक्षी ढीगभर पेंढा गोळा करून त्यात जमा करतात आणि आपले घरटे करून मग पिल्लांना जन्म देतात. बहुतेक प्रत्येक खांबावर लांब मानेची सारस मादी आणि पिल्ले दिसत होती. ते दृश्य एकाच वेळी अतिशय सुंदर आणि हृद्य असे होते. नंतर माहिती घेतली तेव्हा कळले की आर्मेनियाच्या मधल्या सखल भागात ज्या खाजण जमिनी होत्या ते ह्या पक्ष्यांचे पारंपरिक वसतिस्थान होते. मात्र ह्या जमिनी कमीकमी होऊ लागल्या तसतसे हे पक्षी गावांमध्ये येऊ लागले.
- मिलिंद बोकील
(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)
वाचा 'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचे इतर भाग-
1. जय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल
2. बर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा
Tags:Load More Tags
Add Comment