या वर्षीची फ्रेंच खुली स्पर्धा टेनिसप्रेमींच्या दृष्टीने संस्मरणीय अशीच झाली. तिच्यात पुरुषांच्या एकेरीचे जेतेपद कार्लोस अल्काराझने तर महिला एकेरीचे कोको गॉफने मिळवले. दीर्घकाळानंतर या दोन्ही गटात अंतिम फेरीत क्रमवारीतील पहिल्या दोन क्रमाांकचे खेळाडू दाखल झाले होते आणि दोन्हीमध्ये दुसरे मानांकन असलेले खेळाडू अजिंक्य ठरले.
विशेषतः स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना तर विसरू म्हटले तरी विसरता येणार नाही एवढा रंगला होता. केवळ तो जवळपास साडेपाच तास (अगदी अचूक सांगायचे तर पाच तास एकोणतीस मिनिटे) चालला म्हणून नव्हे, तर त्यात जागतिक क्रमवारीत आणि स्पर्धेच्या सीडिंगमध्ये पहिला असलेला इटलीचा यानिक सिनर आणि दुसऱ्या क्रमांकावरील कार्लोस अल्काराझ यांनी खेळातील जे कौशल्य, चापल्य आणि खेळाडूंसाठी आवश्यक असलेल्या जिद्दीचे, झुंजार वृत्तीचे आणि चिवटपणाचे जे प्रात्यक्षिक दाखवले, त्यामुळे! दोघांनाही सहजी हार मानायची नव्हती त्यामुळे त्यांनी जणू आपले सर्वस्व पणाला लावले होते.
टेनिसप्रेमींप्रमाणेच माजी अव्वल खेळाडूंनाही त्यांचे किती कौतुक करू असे झाले होते, ते त्यामुळेच. काहीही झाले, तरी प्रयत्न करणे सोडायचे नाही, या त्यांच्या वृत्तीचे सर्वांनाच कौतुक वाटले. विजय मर्चेंट म्हणायचे की 'ऑल इज नॉट ओव्हर टिल इट इज ओव्हर' (म्हणजे सारे काही संपलेले नसते, जोवर ते खरोखरच संपत नाही). त्याची आठवण झाली. कारण सामना हातातून निसटत आहे, अशी वेळ आल्यानंतरही अल्काराझने प्रयत्न चालूच ठेवले, आणि त्याचे फळ त्याला मिळाले.
व्यावसायिक टेनिसटूंच्या क्रमवारीत यानिक सिनर गेला काही काळ प्रथम क्रमांकावर आहे आणि अल्काराझ दुसऱ्या क्रमांकावर. अल्काराझ हा गतसालचा विजेता आणि रोलाँ गॅराँ येथे एकूण 14 विजेतेपदे मिळवणाऱ्या किंग नदालच्याच देशाचा. या दोघांमध्ये म्हणजे त्यांच्या खेळात खूपच साम्य आहे, त्यामुळे विजेतेपद राखण्यासाठी अल्काराझ शर्तीचे प्रयत्न करणार हे स्पष्टच होते. त्याला दुसरे नामांकन असल्याने तसा तो अंडरडॉगच होता आणि म्हणूनच त्याला प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा होता. अनेकांची तर तोच विजेता ठरेल अशी खातरी होती. म्हणूनच सुरुवातीचे दोन सेट अल्काराझने गमावले तरीही त्यांनी त्याला उत्तेजन देणे थांबवले नाही. आणि त्यानेही त्यांचा विश्वास फोल ठरवला नाही.
सामन्याच्या पहिल्या सेटपासूनच हा सामना दीर्घकाळ चालणार याचा अंदाज आला होता. कारण सिनरची सर्व्हिस असलेला हा पहिला गेमच बारा मिनिटे चालला होता. त्यामुळे रोलाँ गॅरो येथे प्रेक्षागार गच्च भरून टाकणाऱ्या आणि दूरचित्रवाणीवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांनादेखील, आपल्याला अटीतटीची झुंज पाहायला मिळणार, असे वाटत होते. पण काही काळानंतर त्यांचा हा अंदाज फोल ठरणार की काय, असे वाटू लागले होते. कारण पहिला सेट एका तासापेक्षा जास्त काळ चालला आणि दुसराही जवळपास तेवढाच वेळ सुरू होता. पण तरीही त्या दोन्ही सेटमध्ये सिनरने विजय मिळवणार होता. अल्काराझ सिनरप्रमाणेच चांगला खेळत होता, तरी त्याच्याकडून वारंवार चुका होत होत्या. त्याचे कित्येक फटके नेटमध्ये जात होते आणि सिनरला त्यामुळे हुरुप येत होता. सिनरने पहिला सेट 6-4 असा जिंकला, तरी त्याने आघाडी घेतल्यावरही अल्काराझ चिवट प्रतिकार करत होता. फटके चुकताहेत म्हणून त्याने जिद्द सोडली नव्हती, दोघांनीही एकमेकांची सर्व्हिस भेदून गेम जिंकले. त्यामुळे सामना बरोबरीत आला, पण त्यानंतर सिनरने अल्काराझाची सर्व्हिस पुन्हा एकदा भेदून भेदून आघाडी मिळवली. नंतर अल्काराझकडून झालेल्या चुकांचा पुरेपूर फायदा उठवला. अल्काराझ आता जोरदार प्रतिकार करणार असे वाटत होते. पण तेवढ्यात सिनरने पहिला सेट जिंकलाही. 6-4.
दुसऱ्या सेटमध्ये काही काळ याचीच पुनरावृत्ती होत होती. पण अल्काराझचा खेळ हळूहळू सुधारत होता. त्याच्याकडून होणाऱ्या चुका कमी होत होत्या. त्यामुळे खेळाडूंना प्रयत्न करूनही दुसऱ्याची सर्व्हिस भेदण्यात यश येत नव्हते. अल्काराझचे परतीचे फटके चांगले बसत होते. तो आणि सिनर एकमेकांना कोर्टच्या दोन्ही बाजूंना फटके पेरून वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पण अल्काराझच्या फटक्यांत अचूकता नव्हती आणि त्याने मारलेला चेंडू बऱ्याचदा नेटमध्येच जात होता. उलट सिनर मात्र अचूक फटके लगावत होता आणि ते परतवताना होणाऱ्या अल्काराझच्या चुकांचा फायदा घेत होता. तरीही हा सेट टायब्रेकरवर गेला. सिनरने तो 7-3 असा जिंकून दोन विरुद्ध शून्य सेट, म्हणजे 6-4 आणि 7-6 अशी आघाडी मिळवली. संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सेट न गमावणारा सिनर अंतिम सामन्यातही ती अजिंक्य चाल कायम राखणार का, असे वाटू लागले. अल्काराझच्या विजयाबाबत शंका वाटू लागली, तर दोन सेटने मागे असलेल्या, अल्काराझच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली.
आता आपल्याला सूर गवसत असल्याची चुणूक अल्काराझने दुसऱ्या सेटमध्येच दाखवली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा हुरूप कायम राहिला. काहीही झाले तरी हा सामना अल्काराझच जिंकणार, असा विश्वास त्यांना होता.
अल्काराझनेही तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला सिनरची सर्व्हिस भेदून घेतलेली आघाडी कायम राखली आणि तिसरा सेट त्यामानाने लवकर म्हणजे 50 मिनिटांतच संपवून 6-4 असा तो जिंकला. सामन्यातील सर्वात कमी वेळ चाललेला हा सेट. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास चांगला वाढला आणि नंतरच्या चौथ्या सेटमध्येही त्याने लय कायम राखण्याचा प्रयत्न सोडला नाही. पण आता अल्काराझ चांगला खेळ करत होता. त्याचे परतीचे फटके आता खूपसे बरोबर जात होते आणि अनेकदा ते सिनरला परतवता येत नव्हते. तरीही तोंडी आलेला घास अल्काराझने सहजी हिरावून घेऊ नये म्हणून सिनरने आपली सारी अत्रे वापरली आणि 5-3 अशी आघाडी घेतली. नवव्या गेममध्ये त्याने 40-0 आघाडी घेतली होती, त्यामुळे आता सामना तोच जिंकणार असे वाटू लागले. परंतु अल्काराझचा बेत काही वेगळाच असावा. कारण त्याने त्याला साजेल अशा प्रकरे खेळ उंचावला आणि तो गेम तर जिंकलाच पण नंतर सामना सेट टायब्रेकरवर नेला. पण अल्काराझने जिद्द सोडली नाही. परिणामी अल्काराझने टायब्रेकर 7-3 असा जिंकून सामना प्रत्येकी 2-2 सेट अशा बरोबरीत आणला.
सर्वांनाच आता निर्णायक पाचव्या सेटमध्ये काय होणार याबाबत उत्सुकता वाटू लागली. या सेटमध्येही सिनरने 5-3 अशी आघाडी मिळवली होती आणि ग्रँड स्लॅम मालिकेच्या अंतिम सामन्यात कधीही पराभूत न झालेला अल्काराझ यावेळी पराभवाच्या उंबरठ्यावर होता. पण या वेळीही त्याने तिसऱ्या सेटप्रमाणेच चिकाटी न सोडता खेळ केला आणि तीन मॅच पपीइंटस वाचवून नववा गेम जिंकला. आणि नंतर सर्व्हिस गेम राखत सामना 6-6 अशा बरोबरीत आणला. हा निर्णयक सेट असल्यामुळे टाय ब्रेकर 7 ऐवजी 10 गुणांचा होता. म्हणजे जो पहिल्यांदा 10 गुण मिळवेल तो विजयी होणार होता. यावेळी मात्र अल्काराझने जोरदार खेळ करून सिनरला डोके वर काढूच दिले नाही आणि बघता बघता 7-0 अशी आघाडी घेतली आणि अखेर टायब्रेकर 10-2 असा जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद स्वतः कडेच राखले. नदालचा वारसदार म्हणून त्याने कामगिरी केली आणि अंतिम सामना 4-6, 6-7(7-4), 6-4, 7-6 (7-3) आणि 7-6 (10-2) असा जिंकला. या स्पर्धेत सर्वात जास्त चाललेला हा सामना ठरला. आणि व्यावसायिकांना प्रवेश मिळाल्यानंतरच्या ग्रां प्री स्पर्धांतील सामन्यात तो दुसऱ्या क्रमांकाचा ठरला. याआधीच्या सर्वाधिक काळ चाललेल्या सामन्यात 1982मध्ये मॅटस विलँडरने गुलेर्मो विलासला 5 तास 42 मिनिटांच्या लढतीत पराभूत केले होते, पण तो सामना फ्रेंच खुल्या स्पर्धेतील नव्हता.
ग्रँड स्लॅम मालिकेतील कोणत्याही टेनिस स्पर्धेत, कार्लोस अल्काराझ जेव्हा जेव्हा अंतिम सामन्यात पोहोचला आहे, तेव्हा तेव्हा, त्याने अंतिम सामना जिंकलेलाच आहे. या मालिकेच्या स्पर्धांतील त्याचा हा पाचवा विजय. फ्रेंच ओपन स्पर्धेत आणि विम्बल्डनला प्रत्येकी दोन विजेतेपदे आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेत एक विजेतेपद त्याने मिळवलेले आहे.
सिनर आणि अल्काराझ हे इतर टेनिस खेळाडूंच्या तुलनेत सरस असले, तरी ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेत आजवर ते अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले नव्हते. त्यामुळे हा सामना त्या दोघांच्याही दृष्टीने महत्त्वाचा होता. अल्काराझ आणि सिनर तसे समवयस्क आहेत. अल्काराझ 22 तर सिनर 23 वर्षांचा आहे. याचा अर्थ असाही आहे की, आता त्यांच्यात फेडरर, नदाल आणि जोकोविच यांच्याप्रमाणेच वारंवार लढती होणार. टेनिस रसिकांच्या दृष्टीने ही पर्वणीच ठरणार आहे. पराभवानंतरही सिनरला एक समाधान आहे. त्याचे क्रमवारीतील अव्वल स्थान टिकले आहे, कारण या उपविजेतेपदानंतर त्याला 500 गुण बहाल करण्यात आले आहेत. पण विजेत्या अल्काराझला मात्र तो गतसालचा विजेता असल्याने एकही गुण देण्यात आलेला नाही!
नोवाक जोकोविच मात्र त्याचे ग्रँड स्लॅम मालिकेत 25 वे जेतेपद मिळविण्याचे स्वप्न साकार करू शकला नाही. त्याने उपान्त्यपूर्व सामन्यात झ्वेरेव या तिसरे नामांकन असलेल्या खेळाडूला हरवून उपान्त्त्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण तेथे त्याची गाठ सिनरशी पडली. पण तो पहिले नामांकन असलेल्यासिनरला हरवू शकला नाही. सिनरने आधीच्या पाच फेऱ्यांप्रमाणे या सामन्यातही सेट गमावला नाही. पहिल्यापासूनच त्याने सामन्यावर ताबा मिळवला होता आणि तो त्याने अखेरपर्यंत सोडला नाही. प्रत्येक गेमबरोबर जोकोविच खचतो आहे, असे दिसत होते. तोही निराश दिसत होता. बहुधा तेव्हांच पराभव अटळ आहे, याची जाणीव त्याला झाली होती. सिनर त्याच्यापेक्षा जवळपास 12 वर्षांनी लहान आहे, याचाही परिणाम सामन्यात दिसत होता. जोकोविचच्या फटक्यांना तो अचूक उत्तर देत होता आणि त्यामुळे जोकोविचचा आत्मविश्वास कमीकमी होत होता. शेवटी तिसऱ्या मानांकित झ्वेरेवने त्याला 6-4; 7-5; 7-6- (7-3) असे पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता, त्याआधी अल्काराझने मुसेट्टीला हरवले होते. याने उपान्त्य सामन्यात मुसेट्टीवर 4-6, 7-6; 6-0 आणि 2-0 अशी आघाडी मिळवली असतानाच मुसेट्टीने दुखापतीमुळे सामना सोडला आणि अल्काराझ या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता.
महिलांच्या एकेरीतही, आदल्या दिवशी, असाच काहीसा प्रकार झाला होता. सुरुवातीला अरिना सबालेंकाने दोन गेम घेतले आणि तिसरा गेम घेताना नेटजवळ चांगला खेळ करून तसेच ड्रॉप शॉटसचा वापर करून, तिने कोको गॉफला एकही गुण मिळू दिला नाही आणि 4-1 अशी आघाडी घेतली. पण गॉफने नंतर फोरहँडचे चांगले फटके मारून सहाव्या गेममध्ये 0-40 अशा पिछाडीवरून तो गेम घेतला आणि नंतरही आठव्या गेमला तिने सामना 4-4 अशा बरोबरीत आणला. ती आपले सर्व्हिस गेम घेत राहिली. आणि सामन्यात 6-6अशी बरोबरी झाली. त्यामुळे टाय ब्रेकरचा अवलंब करावा लागला. त्यात गॉफने 4-1 अशी आघाडी घेतली. पण नंतर मात्र जोरदार फटके मारून सबालेंकाने आघाडी घेऊन पहिला सेट टाय ब्रेकरवर 7-6 (7-5) असा जिंकला. त्यानंतर या सेटमध्ये अनेक तणावपूर्ण क्षण आले होतेपण अखेर अरिनाच सरस ठरली. पहिला सेट सबलेंकाने घेतला तरी त्यामुळे गॉफ खचली नव्हती. उलट तिने आक्रमक खेळ करून सबालेंकावरच दबाव आणला. प्रेक्षकांचाही तिला जोरदार पाठिंबा होता आणि सबालेंका त्यामुळे निराश होत गेली. तिच्या चेहऱ्यावरचे भावही तेच सांगत होते. चुकांबद्दल ती स्वतःलाच दोष देत होती.
दुसऱ्या सेटमध्ये गॉफचे फटके अचूक होते आणि ते परतवताना सबालेंकाला प्रयास करावे लागत होते. त्यानंतर दोघींच्याकडून चुका होत होत्या, तरी गॉफने आघाडी कायम राखली आणि तो सेट 6-4 असा घेतला. निर्णायक तिसऱ्या सेटमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली आणि गॉफने तो 6-4 असाच घेऊन अजिंक्यपद मिळवले. या दोघीही प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होत्या त्यामुळे स्पर्धेला नवीन विजेती मिळणार हे ठरलेलेच होते आणि तो मान गॉफला मिळाला. 2015 मध्ये सेरेना विल्यम्सने येथे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतरची गॉफ ही पहिली अमेरिकन विजेती ठरली. सबालेंकाने आपल्या पराभवाबाबत स्वतःलाच दोष दिला आणि माझ्या चुकांमुळेच कोको विजयी झाली असे ती म्हणाली, तरी तिने कोकोचे अभिनंदन केले. हा सामना दोन तास 38 मिनिटे चालला होता.
अन्य गटांतील विजेते :
पुरुष दुहेरी : झेबालिस आणि ग्रॅनोलर्स विजयी विरुद्ध सॉल्सबरी आणि स्कुप्स्की : 6-0 ; 6-7 (6-7); 7-5.
महिला दुहेरी : पाओलिनी आणि एरानी वि. वि. क्रूनिक अणि दानिलिना 6-2 ; 2-6; 6-1
मिश्र दुहेरी : एरानी आणि व्हावास्सन वि. वि. टाउनसेंड आणि किंग 6-4, 6-2.
मुले : नील्स मॅकडोनाल्ड वि. वि. मॅक्स शॉनहाउस 6-0 ; 6-7 (5-7); 7-5.
आता पुढे विम्बल्डन. तेथे गेल्या वर्षी अजिंक्यपद मिळवणारा अल्काराझ आपले विजेतेपद टिकवतो का, याचीच उत्सुकता सर्व टेनिस शौकिनांना नक्कीच असेल.
- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.)
Tags: साधना डिजिटल फ्रेंच ओपन फ्रेंच ओपन 2025 अल्काराझ जोकोविच सिनर रोलाँ गॅराँ क्ले कोर्ट लाल मातीचे कोर्ट Load More Tags
Add Comment