चाळीस पदयात्रींचे आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे

'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचा भाग 5

अँजेला कॉफी बनवताना.

2 ऑक्टोबर 2019 रोजी गांधींजींच्या 150व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखाली  'जय जगत 2020 - जागतिक शांती मार्च' या पदयात्रेला दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीस्थळापासून- राजघाटपासून- सुरुवात झाली. तीन महिने भारतात तर उरलेले नऊ महिने विदेशात, अशी वर्षभर चालणारी ही 14 हजार किलोमीटरची पदयात्रा 10 देशांतून प्रवास करणार होती. या यात्रेदरम्यान जगभर अहिंसा, शिक्षण व सामाजिक न्यायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण व कार्यक्रम होणार होते.पदयात्रेचा मूळचा मार्ग हा राजघाट ते वाघा-बॉर्डर; तिथून पाकिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, नंतर बाल्कन राष्ट्रे, मग इटली आणि शेवटी स्वित्झर्लंड असा होता. या पदयात्रेची सांगता 2 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय असलेल्या जिनिव्हा येथे होणार होती.

मराठीतील प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील या पदयात्रेत सहभागी झाले होते, त्या अनुभवावरील लेख समकालीन प्रकाशनाकडून लवकरच येणाऱ्या 'क्षितिजापारच्या संस्कृती' या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. तो संपूर्ण लेख क्रमशः आठ भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा भाग 5. 
- संपादक

अर्ताशार्तमधून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता निघालो. आता माझी स्वयंपाकाची ड्युटी संपली होती, त्यामुळे मी पदयात्रींबरोबर चालू लागलो. मात्र सकाळी शाळा भरली तेव्हा नायराबाईंनी सगळ्या विद्यार्थ्यांना मधल्या पटांगणामध्ये एकत्र केले. सगळ्या यत्तांची मुले-मुली होती. आमच्यापैकी काहींनी पदयात्रेची माहिती सांगितली.

या शाळेत नृत्य हा सुद्धा एक विषय होता. मग सात-आठ मुलींनी पारंपरिक नृत्य करून दाखवले. पाहुण्यांनाही त्या नृत्यात सामील व्हायची गळ घातली गेली. योगायोगाने त्या दिवशी भारतात होळी होती. मग होळीच्या सणाबद्दल आणि धूळवडीबद्दलही सांगितले. गंमत म्हणजे त्या मुलांना बॉलिवूडमधल्या गाण्यांची माहिती होती. लाउडस्पीकर चालू होताच. होळीच्या गाण्यांची काय कमतरता? शांती आणि अहिंसेचा संदेश त्यांच्या किती लक्षात राहील कुणास ठावूक पण परदेशी पाहुण्यांसोबत आपण होळीची गाणी म्हटली हे त्यांच्या नक्की लक्षात राहील.

सुरुवातीला बराच वेळ रस्ता अर्ताशार्त शहरातूनच गेला. अरारात पर्वत कायम नजरेसमोर होता. सकाळच्या वेळेस त्याचा भव्य चंदेरी विस्तार उन्हात चमकत होता. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते दृश्य अत्यंत मनोरम्य दिसत होते. त्या बर्फाच्छादित पर्वताचे सान्निध्य इतक्या जवळ असल्याने सगळ्या हवेला विलक्षण थंडावा होता. असे वातावरण असते तेव्हा चालायला फार मजा येते. अशा पदयात्रांमध्ये चालण्याचा वेग तसा संथ असतो. सपाट रस्त्याने तासाला साधारण चार ते पाच किलोमीटर. एरवी आपण एकटे चालायला जातो तेव्हा भरभर चालतो पण समुदायात चालताना थोडेसे निवांत चालावे लागते; विशेषत: जेव्हा बरेच अंतर कापायचे असते तेव्हा. शिवाय सोबत कोणी तरी बोलत असते. रस्त्याकडेची दृश्ये दिसत असतात. थोडीफार रहदारीही असते. कधी कधी असेही होते की तुम्ही आपल्याच तंद्रीत काही काळ एकटेच चालता. शरीराला मार्ग आखून दिला की मेंदू विचारासाठी मोकळा होतो.
    
चालता चालता आम्ही येरेवानला जाणाऱ्या हायवेवर आलो. आमचा पुढचा पडाव मासीस नावाच्या शहरात होता. ते तिथून साधारण 17-18 किलोमीटर होते (मासीस हेसुद्धा अरारातचेच दुसरे नाव आहे).  कालच्या सारखाच येरेवानमधला गट आम्हाला येऊन मिळणार होता आणि मासीसमध्ये दोन्ही गट एकत्र मुक्काम करून मग येरेवानकडे कूच करणार होते. हा गट येरेवानमधून बसने येणार होता. त्यांची वाट बघत आम्ही हायवेच्या कडेला थांबलो. आधीचे पाच-सहा किलोमीटर चालणे झाले होते. त्यामुळे साहजिकच तो विश्रांतीथांबा ठरला. 
    
सुरुवातीला थोडाच वेळ थांबायचे आहे म्हणून सगळे जण नुसतेच उभे राहिलो. एका बाजूने वाहता रस्ता होता तर दुसऱ्या बाजूने शेती होती. जमीन नांगरलेली होती, कडेने तुरळक झाडे. एक पाइपलाइन गेलेली. दूरवर कोणी तरी ट्रॅक्टर चालवत असलेला. मात्र बराच वेळ झाला तरी दुसरा गट येईना. फोनवर संपर्क केला तेव्हा असे लक्षात आले की त्यांना तिथून फार लांबवर उतरण्यात आले होतेआणि या ठिकाणी येईपर्यंत त्यांना वेळ लागणार होता. ते कळल्यावर सगळे जण आळसावले. कोणी रस्त्याच्या कडेला दगडांवर बसले. कोणी झाडांखाली. कोणी शेतातच अंग पसरले. दुपारचे बारा वाजून गेले होते. सगळीकडे टक्क पिवळेशार उन्ह पडलेले. 
    
काही वेळाने ट्रॅक्टर चालवणारा तो शेतकरी आमच्याजवळ आला. आर्मेनियन भाषेतला एक शब्द आता सगळे शिकले होते. बारव डेझ. म्हणजे गुड डे. तो म्हणून झाला, पण पुढे काय? तो आम्हाला काही तरी विचारत होता, पण आम्हाला ते सांगता येईना. मग त्याला डेव्हिडकडे नेले. डेव्हिडने त्याला सगळे सांगितले की अशी अशी पदयात्रा आहे. हे लोक भारतातून आलेत. काही इतर देशांतून. हे इथून येरेवानला जाणार आहेत आणि नंतर पार जिनिव्हापर्यंत पायी चालणार आहेत. दुसरे काही लोक येत आहेत. त्यांची वाट बघत थांबलेत. 
    
ते ऐकल्यावर तो शेतकरी काही क्षण विचारात पडला. मग म्हणाला, तसं आहे तर मग इथे रस्त्याकडेला उन्हात कशाला थांबता? पलीकडे माझे फार्म हाउस आहे. तिथे चला. तिथे सावली आहे. टॉयलेट आहे. पाणी प्या. माझ्या घरी विश्रांती घ्या. 
    
त्याच्या आमंत्रणाला नाही म्हणण्याचे काही कारणच नव्हते. देहधर्माची सोय झाली तर हवीच होती. आम्ही त्याच्यासोबत निघालो. घर शेतापलीकडेच होते. वाटेत त्याने आपले नाव सांगितले - लुवा वरदानयान. त्याची तिथे साधारण दोन एकर जमीन होती. त्यात तो बार्ली पेरणार होता. या शेताच्या कडेने पीच आणि सफरचंदाची झाडे होती. मात्र तो खरं तर ‘डेअरी फार्मर’ होता. शेतातल्या या वस्तीमध्येच त्याचा गोठा होता आणि त्यात सुमारे वीस गाई होत्या. त्याला तीन मुलगे होते. मोठा येरेवानमध्ये होता. मधला अर्ताशार्तमध्ये तर धाकटा मॉस्कोमध्ये शिकत होता. यांचे घर अर्ताशार्तमध्ये होते आणि शेतात हे फार्महाउस. 
    
आम्ही त्या वस्तीवर पोहोचलो. सगळ्या बाजूंनी दगडाची भिंत होती. आतमध्ये मोठे आवार होते. लोखंडी फाटक. त्याने बायकोला फोन करून सांगितले होते की काय कुणास ठाऊक पण तिने हसतमुखाने स्वागत केले.लुवाने सांगितले की तिचे नाव अँजेला आहे. आत शिरताक्षणीच एक लहानसे दुमजली घर होते. खाली दोन-तीन खोल्या. वरच्या बाजूला अर्धवट झाकलेली गच्ची. तिथे जायला समोरून लोखंडी जिना. जनावरांची शेड आवाराच्या दुसऱ्या बाजूला होती.
    
लुवा आम्हाला गच्चीत घेऊन गेला. तिथे एक मोठे टेबल ठेवलेले होते. सभोवार खुर्च्या आणि बाके होती. टेबलावर पाण्याच्या बाटल्या होत्या. घरी बनवलेल्या फळांच्या रसाच्या बरण्या होत्या. दोन डिशमध्ये चीज ठेवलेले. ब्रेड होता. घरी बनवलेला जॅम आणि मुरांबा. लुवा म्हणाला, आरामशीर बसा. तुम्हाला काय लागेल ते घ्या. 
    
सगळे जण पाणी प्यायले. मग काहीशा संकोचाने इतर पदार्थांची चव पाहिली. तोवर अँजेलाने तिच्या घरातून नुकत्याच तयार केलेल्या चीजच्या डिशेस आणायला सुरुवात केली. त्यांच्याकडे जे दूध निघत होते त्याचे ते मुख्यत: चीज करत होते (त्यांच्या गोमाता निश्चितच आनंदी असणार). तळमजल्यावर स्वयंपाकघराच्या बाजूला तो सगळा सरंजाम मांडलेला होता. ती चीज आणत होती आणि प्रत्येकाचे वर्णन करत होती. हे खारवलेले, हे कोवळ्या दुधाचे, हे घट्ट, हे स्पंजासारखे! घरगुती पद्धतीने बनवलेल्या चीजचेसुद्धा इतके प्रकार असतात हे पहिल्यांदाच कळले. 
    
एवढ्यात आमचा दुसरा गटही रस्त्यानं येताना दिसला. मग त्यांनाही लुवाने आत बोलावले. आता आम्ही चाळीसहून जास्त माणसे झालो. ज्यांचं खाणं झालं होतं ते गच्चीतून खाली उतरले. नवीन आलेल्या पाहुण्यांचेही तसेच स्वागत सुरू झाले. आता तर माणसे वाढल्याने अँजेला तिच्या घरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या टेबलावर आणून ठेवू लागली. मधल्या काळात त्या नवरा-बायकोमध्ये काय नेत्रपल्लवी झाली होती कुणास ठाऊक. लुवा कोणालाही न कळता आपली गाडी काढून गावात गेला आणि तिथून हातात मावणार नाही इतक्या लवांश घेऊन आला.
    
आता गच्चीवर रितसर बुफे पद्धतीचे जेवणच सुरू झाले. अँजेलाने जणू काही तिचे सर्व कोठीघर आमच्यासाठी लुटून द्यायचे ठरवले होते. एका मागोमाग एक चीजच्या बशा तर येत होत्याच शिवाय चटण्या, मुरांबे, पाकात घातलेली सफरचंदे आणि पीच, खारवलेली ढोबळी मिरची, क्रॅनबेरीचा ज्यूस असल्या गोष्टीही येत होत्या. माणसे वाढली तशी तिने लेट्युस, सॅलड, ब्रोकोली असल्या हिरव्या भाज्याही टेबलावर आणून ठेवल्या. इतके पाहूणे दुपारी जेवायच्या वेळेला आलेले पाहून तिला काय करू आणि काय नको असे झाले होते. हे कमी होते म्हणून की काय एका बाजूने तिने कॉफीचे भांडे उकळायला ठेवले. काही वेळातच कॉफीचा दळदार, मोहक वास सगळीकडे पसरायला लागला. लुवाने खास आर्मेनियन आतिथ्य म्हणून आतल्या खोलीत व्होडकाची बाटली उघडली होती आणि आमच्यापैकी प्रत्येकाने त्याचा आदर केलाच पाहिजे असा त्याचा आग्रह होता.
    
ते दृश्य विश्वास न बसण्यासारखे होते. दुपार भरात होती. गार हवेवर पिवळेशार ऊन पडले होते. मागच्या निळ्या आकाशात माउंट अरारात निस्तब्धपणे पहुडला होता आणि ज्यांच्याशी आमची अर्ध्या तासापूर्वी ओळखही नव्हती असे एक आर्मेनियन शेतकरी जोडपे आपले सर्वस्व आमच्यासाठी मोकळे करत होते. आमच्यापैकी प्रत्येक जण सद्‌गदित होऊन गेला होता. भारतीय लोक तर फारच. ‘अतिथी देवो भव’ ही फक्त आमचीच परंपरा आहे असा आम्हाला फार अहंकार! त्या अहंकाराचे पाणी पाणी झाले होते. केवळ एका अतिथीचेच नाही तर चाळीस अतिथींचे आदरातिथ्य त्या गृहिणीने अत्यंत आनंदाने आणि मन:पूर्वक केले होते. आणि आम्ही खरोखरच अतिथी होतो; पाहुणे नाही. जणू तिची सत्त्वपरीक्षा पाहण्यासाठी म्हणूनच परिस्थितीने आमची नेमणूक केली होती.
    
त्यांच्या घरातून पाय निघत नव्हता, पण आम्ही पदयात्री होतो. पुढे जावे तर लागणार होते. सगळे जण त्यांच्या अंगणात गोल करून उभे राहिलो. सगळ्यांनी मिळून ‘जय जगत’चे गीत म्हटले. त्यांचे आभार कसे आणि किती मानू असेच प्रत्येकाला झाले होते. प्रत्येकजण त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होता. त्यांना मिठी मारत होता. त्यांना देण्यासारखे आमच्याजवळ काही नव्हते. राजगोपाल म्हणाले की आम्ही तुम्हाला भारतात येण्याचे निमंत्रण देऊ शकतो. तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्या आतिथ्याचा स्वीकार करा. ते प्रत्यक्षात कसे होणार होते ते कोणीच सांगू शकले नसते, पण त्या क्षणी तसे म्हणणे हेच उचित होते. आम्ही हेच म्हणू शकत होतो की तुम्ही दिलेल्या ह्या अन्नाने आमचे जे पोषण झाले आहे, त्या बळावर आम्ही पुढची वाटचाल करू. हा जो संदेश आम्हाला द्यायचाय - शांतीचा आणि अहिंसेचा - जो जणू तुम्हीच आमच्यामार्फत देत आहात असे आम्ही समजू.  
    
रस्त्यानं चालत निघालो. तो सगळा प्रवास हायवेच्या कडेनेच होता. मासीसला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. त्या दिवशी पंचवीसहून जास्त किलोमीटर चालणे झाले. 

- मिलिंद बोकील
(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत  मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)

हा लेख इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी क्लिक करा- Atithi Devo Bhav: Armenian Farmer Couple Hosts Forty Guests!

वाचा 'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचे इतर भाग-
1. 
जय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल 
2. बर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा 
3. अझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा 
4. अरारात पर्वताच्या पायथ्याशी...

Tags:Load More Tags

Comments:

प्रा. भागवत शिंदे

लेखमाला छान आहे. खूप आवडतेय.उत्तरोत्तर प्रत्येक लेखातून वाचनाची रंगत वाढतेय. आजचा लेख तर खूपच छान आहे. लुवा आणि अँजेला या शेतकरी जोडप्याचं आदरातिथ्य तर दुर्मिळच! असा मनाचा मोठेपणा असणारी माणसं खरोखरच आज अत्यंत दुर्मीळ होत चालली आहेत. त्यामुळे त्यांचं आदरातिथ्य मनाला खूप सुखावून जातं. मिलिंद सर, आपल्या या सार्‍या लेखमालेचे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल. धन्यवाद.

Aasavari Ghotikar

खूप सुरेख लेखमाला

Add Comment