अरारात पर्वताच्या पायथ्याशी...

'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचा भाग 4

दिव्य अरारात पर्वत

2 ऑक्टोबर 2019 रोजी  गांधींजींच्या 150व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखाली  'जय जगत 2020 - जागतिक शांती मार्च' या पदयात्रेला दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीस्थळापासून- राजघाटपासून- सुरुवात झाली. तीन महिने भारतात तर उरलेले नऊ महिने विदेशात, अशी वर्षभर चालणारी ही 14 हजार किलोमीटरची पदयात्रा 10 देशांतून प्रवास करणार होती. या यात्रेदरम्यान जगभर अहिंसा, शिक्षण व सामाजिक न्यायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण व कार्यक्रम होणार होते.पदयात्रेचा मूळचा मार्ग हा राजघाट ते वाघा-बॉर्डर; तिथून पाकिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, नंतर बाल्कन राष्ट्रे, मग इटली आणि शेवटी स्वित्झर्लंड असा होता. या पदयात्रेची सांगता 2 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय असलेल्या जिनिव्हा येथे होणार होती.

मराठीतील प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील या पदयात्रेत सहभागी झाले होते, त्या अनुभवावरील लेख समकालीन प्रकाशनाकडून लवकरच येणाऱ्या 'क्षितिजापारच्या संस्कृती' या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. तो संपूर्ण लेख क्रमशः आठ भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा भाग 4. 
- संपादक

रात्रीची जेवणे झाली तेव्हा मला सांगण्यात आले की उद्यापासून दोन दिवस तुझी ड्युटी रसोई-टीममध्ये. ती कधी ना कधी येणार हे माहीतच होते, पण इतक्या लगेच येईल अशी अपेक्षा नव्हती. पण कदाचित नवीन आलेल्या पदयात्रीची चाचणी घेण्याची ती पद्धत असेल. शिवाय बाकीचे लोक भारतापासून ही कर्तव्ये बजावत असल्याने त्यांची पाळी अनेकदा येऊन गेलेली होती.  त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय दुसरा दिवस आठ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन. त्या दिवशी स्वयंपाक करायला मिळणे म्हणजे एक प्रकारचा सन्मानच होता. माझ्या टीममध्ये रिया नावाची एक केरळी मुलगी होती आणि बेन हा ऑस्ट्रेलियन. 
    
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात दाखल झालो. ओटस्‌चे पॉरिज हाच मुख्य पदार्थ होता. सोबत उकडलेली अंडी आणि ब्रेड (पदयात्रा गांधीमार्गाची असली तरी अंडी खाल्ली जात होती. केवळ विदेशी पदयात्रींसाठी म्हणूनच नाही तर देशींसाठीसुद्धा). सकाळचा नाश्ता बनवणे कठीण नव्हते. उस्तवार होती ती भांडी घासायची आणि सगळे सामान आवरून, पोत्यात भरून दुसऱ्या गावात न्यायची. पदयात्री आपापल्या ताटल्या आणि पेले धुवत होते पण मोठी भांडी घासायला लागायची. त्यात रिया अर्धा तास उशिरा आल्याने बेनचा मूड बिघडला आणि नंतर दिवसभर त्यांची झकाझकी होत राहिली. रियाला वेबसाइट आणि माध्यमसंपर्काचे पुष्कळ काम जिलने दिलेले होते. तिला ते काम सांभाळून ही जबाबदारी पार पाडायची होती. बेन म्हणजे इंग्रजीत ज्याला ‘स्मार्ट ॲलेक’ म्हणतात तसा होता. तो जरा जास्तच बोलत होता आणि सारखा दुसऱ्याला शहाणपणा शिकवत होता. त्याला एकदा चांगले सुनवावे असा मोह मला झाला, पण तो टाळला. विनोबांचा उपदेश आहे - कटुकवर्जनम्‌. आणि हे माहीत होते की हे सगळे तेवढ्यापुरते असते. ते फार मनाला लावून घ्यायचे नाही. 
    
आमच्यावर स्वयंपाकाची जबाबदारी असल्याने त्या दिवशी चालणे झाले नाही. आराबेगच्या गाडीतून आम्ही पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. त्या शहराचे नाव होते अरारात. हे आर्मेनियामधले एक महत्त्वाचे शहर. या शहरासमोरच माउंट अरारात हा दिव्य पर्वत होता. त्याची दोन शिखरे आहेत मोठा अरारात जो सुमारे 17,000 फुट उंचीचा आहे आणि लहान अरारात जो साधारण 13,000 फुट उंचीचा आहे. या दोन्ही पर्वतांच्या पायथ्याचा विस्तार 1100 चौ.कि.मी इतका व्यापक आहे आणि हे दोन्ही ज्वालामुखी आहेत. आता हिवाळा असल्याने त्याच्या संपूर्ण अंगावर बर्फ होते. एरवी त्याचा माथा कायम हिमाच्छादित असतो. आर्मेनियन लोकांसाठी  माउंट अरारातचे महत्त्व कैलास पर्वतासारखे आहे. जलप्रलय झाल्यावर निघालेली नोहाची नौका या पर्वतावर विश्रामासाठी थांबली होती असा बायबलमध्ये उल्लेख आहे. सध्या राजकीयदृष्ट्या हा पर्वत तुर्कस्तानच्या हद्दीत येतो, पण खरे तर तो इराण, तुर्कस्तान, आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या सीमांच्या टोकावर वसलेला आहे. आर्मेनिया हा अगदी सुरुवातीच्या काळात (इ.स. 301मध्ये) ख्रिश्चन झाल्यामुळे हा पर्वत आपलाच आहे असे ते समजतात. त्यांच्या राजचिन्हावर तर त्याची प्रतिमा आहेच पण लोकांच्या अंत:करणातही तो कायम विराजमान असतो. त्यावर कोणीही चढून जाऊ शकत नाही अशी त्यांची श्रद्धा होती, पण अलीकडच्या काळात विदेशी गिर्यारोहकांनी त्यावर चढाई केलेली आहे. 
    
आमच्या मधल्या वेळात आम्ही शहरात जाऊन स्वयंपाकाच्या जिन्नसांची खरेदी केली. या गावाचा तोंडवळा कोणत्याही लहान युरोपिअन गावासारखाच होता. सगळ्या गोष्टी एकत्र मिळण्यासाठी सुपर मार्केटमध्ये जावे लागले. ही सुपर मार्केट तर सगळ्या जगभर अगदी सारखी झालेली आहेत. तरुण, हसऱ्या मुली काउंटरवर भराभरा कामे उरकत होत्या. आम्ही विदेशी लोक दिसल्यावर त्यांनी चौकशी केली. आम्ही पदयात्रेबद्दल सांगितल्यावर त्यांच्यापैकी एकीने रियाला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनाची’ भेट म्हणून एक मोठा केक भेट दिला. एकता परिषदेची शोभा त्यादिवशी चालत नव्हती. ती आमच्यासोबत आली होती. तिचे आर्मेनियनांबद्दलचे मत त्या दिवशीही खोटे ठरले.
    
अरारातमधली शाळा चांगली मोठी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे वर्ग मुलामुलींनी भरून गेले. पदयात्रा सुरू करण्याअगोदर शाळेसमोरच्या मैदानात मुलांसोबत कार्यक्रम झाला. जिलने पदयात्रेची माहिती सांगितली. ‘जय जगत’ गीतही झाले. मुले उत्सुकतेने बघत होती. त्यांना कळत किती होते कुणास ठाऊक. पण निरनिराळ्या देशांतील लोक पाहून त्यांना आश्चर्य तर वाटले असणारच. आपल्या शाळेत असे काही लोक आले होते ही गोष्टही कदाचित लक्षात राहिली असेल. त्यांच्या अभ्यासक्रमात महात्मा गांधींचा परिचय होता. सगळ्या जगाला माहीत असणारा भारतीय माणूस खरं तर महात्मा गांधीच आहेत.
    
अरारातमधून पदयात्रा पुढे गेली आणि आम्ही अर्ताशार्त नावाच्या पुढच्या मुक्कामाला गेलो. ही शाळा तर अरारातच्या शाळेपेक्षाही मोठी होती. आम्ही आधी मुख्याध्यापिकांना भेटलो. त्यांचे नाव नायरा होते आणि त्या इंग्रजीच्या शिक्षिका होत्या. त्यांनी आम्हाला सगळी शाळा फिरून दाखवली. तिला आर्मेनियाचे राष्ट्रकवी कोमी शात यांचे नाव दिलेले होते. आपल्याकडे रविंद्रनाथ टागोरांचे जे स्थान ते आर्मेनियामध्ये कोमी शात यांचे आहे. त्यांचाही जन्म गांधींसारखाच 1869 मध्ये झाला आणि ते संगीतकार असल्याने त्यांनी अनेक गीतांचीही निर्मिती केली. मुख्य म्हणजे तुर्कस्तानने आर्मेनियन लोकांचा जो वंशसंहार 1915 साली केला त्यावर त्यांनी अनेक गीते लिहिली. नंतर मात्र त्या वंशसंहाराच्या धक्क्याने ते भ्रमिष्ट झाले व त्यातच त्यांचा अंत झाला.
    
ही शाळा असली तरी सगळ्या सोयीसुविधा एखाद्या कॉलेजसारख्या होत्या. नायराबाई म्हणाल्या की पूर्वी हे ज्युनियर कॉलेजच होते, पण आता सरकारने त्याचे माध्यमिक विद्यालय केले. कारण विद्यार्थीसंख्या कमी झाली. आर्मेनियामध्येही लोकांचा ओढा लहान गावांकडून मोठ्या शहरांकडे आहे. या शाळेत विविध उपक्रम चालत होते आणि त्यातला एक म्हणजे चिनी भाषेचे शिक्षण. यासाठी चीन सरकारच्या एका कार्यक्रमातून मदत मिळाली होती. ही गोष्ट चीनच्या वाढत्या प्रभावाची निदर्शक तर होतीच शिवाय दुनियेचा होरा कसा बदलतो आहे हेही दर्शवणारी होती. आर्मेनियामधले अनेक लोक रोजगारासाठी चीनमध्ये जातात.  शाळेत आर्मेनियन आणि रशियन भाषा शिकवल्या जात होत्या; पण इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश किंवा जर्मन या भाषांऐवजी त्यांना चीनी भाषा शिकणे फायद्याचे दिसत होते.    
    
त्या दिवशी आमचा येरेवानमध्ये थांबलेला जो दुसरा गट होता तो एका दिवसासाठी चालायला येणार होता. त्यामुळे आम्हाला चटकन दुपारचे जेवण बनवून त्यांच्यासाठी घेऊन जायचे होते. तसे ते घेऊन आम्ही त्यांना वाटेत जाऊन भेटलो. हे ठिकाण खोर विराप या ख्रिश्चन मठाच्या रस्त्यावर होते. ती बहुधा यात्रेकरूंच्या विश्रामाचीच जागा होती. खोर विराप हा डोंगरावरचा एक प्राचीन मठ आहे, पण मुळात तो एक तुरुंग होता. आर्मेनियामध्ये ख्रिश्चन धर्मगुरू हे इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकामध्येच आलेले होते आणि त्यांनी लोकांना ख्रिस्ताच्या धर्माचा उपदेश करायला सुरुवात केली होती. मात्र स्थानिक राजांचा त्याला विरोध होता (रोमन साम्राज्यात जसे झाले त्याचप्रमाणे आणि त्या काळात हा प्रदेशही पूर्वेकडच्या रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता). फादर ग्रेगरी नावाचा एक धर्मप्रचारक इथे आला होता. राजाने त्याला खोर विरापमध्ये जमिनीखालच्या एका अंधारकोठडीमध्ये डांबून ठेवले. किती वर्षे? तब्बल तेरा वर्षे. मात्र ख्रिस्तावरच्या अढळ श्रद्धेने ग्रेगरीने तो छळ सहन केला. शेवटी राजालाच साक्षात्कार झाला. त्याने ग्रेगरीला तर बाहेर काढलेच पण ख्रिश्चन धर्माचा राजधर्म म्हणून स्वीकार केला. ही गोष्ट घडली इ.स. 301 मध्ये. ग्रेगरीला नंतर ‘ग्रेगरी द इल्युमिनेटर’ असे नाव मिळाले. त्याने खोर विरापमध्ये एक चर्च तर बांधलेच शिवाय नंतर तो त्या सगळ्या प्रांताचा ‘आर्चबिशप’ म्हणजे मुख्य धर्मगुरू झाला. 

फादर ग्रेगरीला ज्या अंधारकोठडीत ठेवले होते ती जमिनीखालची भुयारासारखी जागा खोर विरापमध्ये आजही आहे आणि आपल्याला आतमध्ये उतरून बघता येते. मात्र तो जिना अत्यंत चिंचोळा आणि उभ्या उताराचा होता. आतमध्ये पूर्ण अंधार. दोनतीन जण उभे राहू शकतील एवढीच जागा. पहिल्या पायरीवर पाऊल टाकताक्षणीच घुसमटायला होत होते. आमच्यापैकी काही जण उतरले, पण माझी हिंमत झाली नाही. ते भूयार पाहूनच अंगावर काटा आला. जिथे आपण एक क्षणभरही उभे राहू शकत नाही अशा ठिकाणी तो माणूस तेरा वर्षे कसा तगून राहिला असेल? सुटकेची कोणतीही शक्यता नसताना? केवढी चिवट श्रद्धा आणि केवढी अपार जिजीविषा असेल? तो मनात हेच म्हणाला असेल की प्रभू माझी परीक्षा बघतो आहे आणि एक ना एक दिवस तो मला बाहेर काढेलच. मात्र तेरा वर्षे अशा श्रद्धेने राहायचे ही काही सोपी गोष्ट नाही. आणि तेसुद्धा अंधारकोठडीत. बाहेरच्या आकाशाचे दर्शनही न होता! श्रद्धा ही खरोखरच अफाट गोष्ट आहे. 
    
खोर विरापच्या टेकडीवरून मागचा अरारात पर्वत स्पष्टपणे दिसत होता आणि सभोवतालचा आसमंतही. टेकडीच्या पायथ्याशी दफनभूमी होती. शेकडो थडगी रांगेने उभारलेली. दुसऱ्या बाजूला मात्र द्राक्षांच्या बागा होत्या. हा सगळा सखल प्रदेश असल्याने इथे पूर्वापार द्राक्षे लावली जात होती. येरेवानला गेल्यावर तिथल्या ऐतिहासिक संग्रहालयात मी पाहिले त्याप्रमाणे हा प्राचीन आर्मेनियन संस्कृतीचा समृद्ध प्रदेश होता. त्यावेळी आम्हाला कळले नाही पण अर्ताशार्तमध्ये खूप मोठे पुरातत्त्वीय उत्खनन झाले होते आणि पूर्वीच्या काळातल्या अनेक मौल्यवान वस्तू त्यात सापडलेल्या होत्या. त्यात सहा-सात फुट उंचीचे आणि तीन-चार फुट घेराचे वाइन साठवण्याचे मातीचे महाकाय कुंभही होते. द्राक्ष संस्कृती अर्थातच फार प्राचीन होती.

- मिलिंद बोकील
(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत  मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)

वाचा 'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचे इतर भाग-
1. 
जय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल 
2. 
बर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा 
3. अझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा 

Tags:Load More Tags

Add Comment