पायविहीरमधील विकासाची प्रक्रिया : उत्तरार्ध

मेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 12

पायविहीरचे प्रशिक्षण केंद्र | फोटो सौजन्य - मिलिंद बोकील

पायविहीर गाव हे जे वनसंवर्धनाचे काम करत होते त्यामुळे त्याची प्रसिद्धी चहूकडे झाली. भारतात दरवर्षी ‘इंडिया बायोडायव्हर्सिटी ॲवॉर्ड’ नावाने एक पुरस्कार दिला जातो. ज्या संस्था वा व्यक्ती निसर्गरक्षणाचे महनीय काम करतात त्यांना हा पुरस्कार मिळतो. पायविहीर गावाची शिफारस या पुरस्काराकरता झाली आणि  2013-14मधला हा पुरस्कार गावाला मिळाला.

पायविहीर गावाने हे जे प्रयत्न 2011पासून सुरू केले त्यांचा परिणाम पुढच्या दोन वर्षांमध्ये दिसायला लागला. निसर्ग ही अशी शक्ती आहे की, तिचे नुकसान करणे आपण थांबवले आणि त्याऐवजी संवर्धन सुरू केले की ती ताबडतोब प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. पायविहीरच्या रानातही असेच झाले. टेकड्यांमध्ये जे पाणी अडवले गेले त्यामुळे गावाच्या शिवारात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. तिथल्या विहिरींमध्ये पाणी जास्त काळ थांबू लागले. चराईबंदी केल्यामुळे आणि चांगले बी सर्वदूर पसरवल्यामुळे दाट गवत तरारून आले. नवीन रोपे रुजली आणि जुन्या झाडांनाही चांगला फुटवा फुटला. जे रान अगदी उजाड आणि बरड दिसत होते ते एकदम भरदार आणि ताजेतवाने दिसू लागले. 

हा बदल फक्त जंगलापुरता मर्यादित नव्हता. जलसंधारणाची आणि वनीकरणाची ही जी कामे चालत होती त्यांमध्ये गावातले स्त्री-पुरुष श्रम करत होते आणि त्याची योग्य मजुरी त्यांना मिळत होती. यातले बहुतेक काम हे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली म्हणजे ‘नरेगा’खाली चालत असल्याने सरासरी 180 रुपयांपासून ते 238 रुपयांपर्यंत असा रोज लोकांना मिळत होता. हा रोजगार गावातच मिळाल्यामुळे या काळात कोणीही गाव सोडून गेले नाही. 

या वर्षांमधली पायविहीर शिवारातली एकूण गुंतवणूक ही अंदाजे सात कोटी रुपये एवढी असेल. त्यामध्ये साधारण 70 टक्के इतका हिस्सा हा मजुरीचा होता. गावामध्ये पाच व्यक्ती दिव्यांग होत्या. एरवी त्यांना काम मिळण्याची पंचाईत असायची... मात्र वनसंवर्धनाच्या या कामात विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांनाही त्यात सातत्याने सामावून घेतले गेले.

वनोपजाच्या दृष्टीने पाहिले तर सीताफळाचे आणि तेंदू पानांचे उत्पन्न हे आधीच्या कोणत्याही वर्षापेक्षा अर्थातच वाढलेले होते. पायविहीर गावाने जेव्हा आपला सगळाच कारभार सुसंघटित रितीने करायला घेतला तेव्हा सीताफळ संकलनाची आणि विक्रीचीही व्यवस्था बसवली. खोज संस्थेचा एक तरुण कार्यकर्ता सहदेव दहिकर याने ही प्रक्रिया एका टिपणामध्ये वर्णन केली आहे. त्याच्याच शब्दांत ती खाली देत आहे. 

‘पायविहीर गावाच्या वनक्षेत्रामध्ये सुमारे 15 हेक्टरवर सीताफळाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. सन  2012मध्ये ग्रामसभेत ठरलं की, या वर्षी सीताफळापासून ग्रामसभेला उत्पन्न मिळवू या. साधारण ऑगस्ट ते ऑक्टोबर या सीताफळ हंगामामध्ये पूर्वी वनखाते व्यापाऱ्यांना बोलावून या झाडांच्या लिलावातून 1500 रुपये इतकं उत्पन्न दरवर्षी मिळवायचं. 

पण अशा पद्धतीचा लिलाव लोकांना मान्य नव्हता... कारण त्यांना स्पष्ट दिसत होतं की, त्यांच्या सीताफळांची किंमत त्याहून कितीतरी अधिक आहे. मग त्यांनी काही व्यापार्‍यांना गाठलं, त्यांनीही वर्षासाठी साडेचार हजारांच्यावर पैसे देण्यास नकार दिला. 

मग लोकांनी पुन्हा ग्रामसभा बोलवली आणि बर्‍याच रात्रीपर्यंत बातचीत करून ठरवलं की, गावातील काही लोक सीताफळांची तोडणी व पॅकिंग करतील आणि काही जवळच्या बाजारात म्हणजे अचलपूर व अमरावतीला जाऊन ती विकतील. 

‘आपल्याला अशा व्यापारातला काही अनुभव नाही त्यामुळे या फंदात पडू नये.’ असा सल्ला देत काहींनी याला विरोध केला... परंतु 1500 रुपयांचीच रिस्क आहे आणि फायदा झाला नाही तर फार काही नुकसानपण होणार नाही, अनुभव तर येईल आणि फायदा झाला तर गावातल्या लोकांनाच उत्पन्न मिळेल अशा विचारातून सगळ्यांचा निर्णय झाला.

‘मग सीताफळं तोडण्यात आली... परंतु अशा कामाचा खरंच अनुभव नसल्यानं फारशी काळजी न घेताच सीताफळं भरण्यात आली. धास्तीनं पण मोठ्या अपेक्षेनं बाजारात गेल्यावर 40 क्रेट सीताफळांना फक्त 9,500 रुपये मिळाले. इकडे गावात बाजारात आपल्या सीताफळांना किती भाव मिळतो याची धाकधूक लागून राहिलेल्यांची मात्र फार निराशा झाली.

फळं विकत घेणार्‍या व्यापार्‍यांनी सांगितले की, तुमची सीताफळं मुळातच नैसर्गिक आणि बाजारात येणार्‍या इतर सीताफळांच्या तुलनेत चांगली आहेत. ही जर व्यवस्थित पॅक करून आणलीत तर काळी पडून खराब होणार नाहीत आणि दरही चांगला मिळेल. मग पुढच्या तोडणीवेळी सीताफळाची तोडणी आणि पॅकिंग अधिक काळजीपूर्वक केल्यानंतर 28 क्रेटलाच चोवीस हजार उत्पन्न मिळालं. 

यामुळे सगळ्यांचाच हुरूप वाढला आणि आत्मविश्‍वास आला की, आपण या व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळवू शकतो. पहिल्याच वर्षी चुका करत, सुधारत 41 हजार रुपये उत्पन्न आलं. दुसर्‍या वर्षी शेजारच्या गावाचं जंगलही लिलावानं घेऊन पायविहीरच्या युवकांच्या गटानं दोन लाख 75 हजार रुपयांचं उत्पन्न मिळवलं तर 2014मध्ये फक्त गावच्या जंगलातून सव्वा लाख उत्पन्न मिळवलं.

‘अनुभवातून शिकणं; बाजारपेठेची, दरांची व वाहतुकीची माहिती घेऊन नियोजन करणं; मालाच्या गुणवत्तेची समज बनवणं; सर्वानुमते निर्णय घेणं आणि विचारपूर्वक धोका पत्करणं अशा प्रवासातून आज पायविहीरच्या सीताफळांची त्यांच्या दर्जाबद्दल बाजारात विशेष ओळख आणि मागणी निर्माण झाली आहे. 

सन 2015च्या हंगामासाठी ग्रामसभेनं चार तरुणांच्या गटाला गावाच्या खर्चानं मुंबईला बाजार अभ्यासासाठी पाठवलं होतं. तिथला बाजार, दर, व्यापार्‍यांशी संपर्क, रेल्वे आणि स्वतःच्या वाहनांनी माल पाठवायला किती खर्च येईल याचा अभ्यास करून त्या हंगामात मुंबईला सीताफळं पाठवण्याचं नियोजन केलं होतं. 

त्या दृष्टीनं गुढीपाडव्याच्या दिवशी गावकर्‍यांनी झाडांच्या प्रत्यक्ष संख्यामोजणीला सुरुवात केली आणि नियोजन केलं. नैसर्गिकरीत्या जंगलात वाढलेल्या या सीताफळांची मागणी हंगाम दर हंगाम वाढत आहे. आता यांचे ‘मेळघाट नॅचरल्स’ या नावानं ब्रँडिंग केलेलं आहे. 

‘सन 2017मध्ये पायविहीरच्या युवक गटानं शेजारच्या उपातखेडा, खातिजापूर, कुंभीवाघोली या गावांबरोबर मिळून एकूण पाच लाख रुपयांची दहा टन सीताफळं विकली. या अनुभवातून हुरूप येऊन आता मेळघाटातील चारोळी, मोहा आणि सेंद्रिय ज्वारी, गहू यांचं मार्केटिंग करण्याचं ठरवलं आहे.’

पायविहीर गाव हे जे वनसंवर्धनाचे काम करत होते त्यामुळे त्याची प्रसिद्धी चहूकडे झाली. भारतात दरवर्षी ‘इंडिया बायोडायव्हर्सिटी ॲवॉर्ड’ नावाने एक पुरस्कार दिला जातो. ज्या संस्था वा व्यक्ती निसर्गरक्षणाचे महनीय काम करतात त्यांना हा पुरस्कार मिळतो. पायविहीर गावाची शिफारस या पुरस्काराकरता झाली आणि 2013-14मधला हा पुरस्कार गावाला मिळाला. तो दिनांक 22 मे 2014 रोजी पोर्ट ब्लेअर, अंदमान येथे झालेल्या एका विशेष समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. पायविहीर ग्रामसभेतर्फे श्रीराम दहीकर आणि रामलाल काळे यांनी तो स्वीकारला.

पायविहीर गावाची ही प्रगती पाहण्यासाठी तिथे निरनिराळे अभ्यासक, कार्यकर्ते, पाहुणे... एवढेच नाही तर जवळच्या गावांतील गावकरी यायला लागले. त्यांना बसण्याकरता किंवा बैठकी घेण्याकरता गावात जागा नव्हती. गावातले हे काम पथदर्शक होते आणि त्याचा परिचय मेळघाटमधील इतर गावांना करून देणे आवश्यक होते. 

या प्रक्रियांवर चर्चा चालू असताना ग्रामसभेने ही अडचण सांगून एका प्रशिक्षणकेंद्राची कल्पना मांडली. या बैठकीला त्या वेळी श्री. प्रवीण परदेशी हजर होते. ते त्या वेळेस मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव होते... शिवाय जिल्ह्याचे पालकसचिवही होते. त्यांच्या सोबत या बैठकीला अमरावती जिल्ह्याचे त्या वेळचे जिल्हाधिकारी श्री. किरण गिते हेही उपस्थित होते. ग्रामसभेची ही मागणी जिल्हा स्तरावरच्या निधीतून मंजूर करता येईल का अशी विचारणा श्री.परदेशी यांनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसभेला तसा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.     

प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा ठरवून त्याप्रमाणे विकासाची कामे करण्याचे नियोजन हे प्रत्येक जिल्ह्यातील ‘जिल्हा नियोजन परिषद’ (डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग काउन्सिल - डीपीसी) करत असते. पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे आणि त्याचे रीतसर प्रशिक्षण नव्या पिढीला देणे हेही सध्याच्या विकास कार्यक्रमातील एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जो निधी त्यांच्याकडे होता त्यातून त्यांनी पायविहीर गावामध्ये एक निसर्ग निर्वचन व प्रशिक्षण केंद्र बांधण्याची तयारी दर्शवली. याला इंग्रजीत इंटरप्रिटेशन सेंटर असे म्हणतात.  

यासाठी ग्रामसभेने आपल्या क्षेत्रातील योग्य अशी जागा द्यायची होती. पायविहीर ग्रामसभेने तशी द्यायची तयारी दर्शवली आणि पायविहीरच्या वनक्षेत्राला लागूनच या केंद्राची उभारणी झाली. या केंद्रासाठी जिल्हा नियोजन परिषदेने एक कोटी 16 लाख रुपये इतका निधी मंजूर केला आणि त्यातून एक भव्य आणि सर्व सोयींनी सुसज्ज असे प्रशिक्षण केंद्र पायविहीरमध्ये उभे राहिले. जिल्हाधिकारी श्री. गिते यांनी वैयक्तिक लक्ष घालून हे काम पूर्णत्वास जाईल असे पाहिले. 

या केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थींच्या निवासाची सोय, सभागृह, वर्गखोल्या, जेवणघर, अभ्यागत निवास अशा विविध सुविधा आहेत. एखाद्या मोठ्या शहरातदेखील असणार नाही अशा प्रकारचे हे प्रशिक्षण केंद्र पायविहीरच्या वनक्षेत्रात अत्यंत दिमाखाने उभे आहे. या केंद्राला अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी भेट दिलेली आहे.

पायविहीरचा वन संवर्धनाचा प्रवास अशा उत्साहवर्धक रितीने चाललेला असला तरी त्यामध्ये काही अडचणी आल्या नाहीत किंवा अपयश आले नाही असे नाही. गावकऱ्यांचे जळाऊ लाकडावरचे अवलंबन कमी व्हावे म्हणून आदिवासी विकास विभागातर्फे 2014-15मध्ये सामुदायिक बायोगॅस संयंत्राची योजना गावामध्ये राबवण्यात आली. 

हे संयंत्र एका सोयीच्या ठिकाणी उभारण्यात आले... मात्र त्यामध्ये काहीतरी तांत्रिक उणीव राहिल्यामुळे ते यशस्वी झाले नाही. गावकऱ्यांची सामूहिक रूपाने जैविक कचरा आणि शेण गोळा करण्याची तयारी होती... परंतु संयंत्राच्या उभारणीतच तांत्रिक दोष राहिल्याने त्याचा लाभ गावकऱ्यांना मिळू शकला नाही.  

वनसंवर्धनाच्या कामात सगळ्यात मोठी आपत्ती आली ती 2019 मधील एप्रिल महिन्यात. त्या वर्षी उन्हाळा फार कडक होता. अगोदरच्या वर्षात म्हणजे 2018मध्ये पाऊसमान कमी होते... त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच सगळे पर्यावरण तापायला लागले होते. चराईबंदी आणि संरक्षण असल्याने गवत उत्तमपैकी तरारून आले होते... मात्र जमिनीत ओलावा नसल्याने ते सगळे वाळून कोरडे पडलेले होते. 

असे असताना 13 एप्रिल या दिवशी प्रचंड मोठी वावटळ सुटली. पायविहीरच्या वनक्षेत्राच्या कडेला अचानक वणवा पेटला. तो कसा पेटला हे कळले नाही... परंतु अतिशय वेगाने वावटळ असल्याने आणि गरम हवेचे भोवरे तयार झाल्याने बघता-बघता वणवा पायविहीरच्या शिवारात पसरला. गावातल्या काही जणांनी तो पाहिला आणि सगळ्या गावात हाकाटी दिली. ते ऐकताच गावातले  सर्व जण - स्त्रिया, पुरुष, मुले, तरुण, म्हातारे हातात जे काही साधन मिळेल ते घेऊन जंगलाकडे धावत सुटले... मात्र वणव्याचा जोर इतका होता की, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. उलट अनेक जणांना त्या आगीची धग लागली. श्री.बळीराम तोटे यांना तर नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करून सलाईन लावावे लागले.

पायविहीरच्या वनक्षेत्रात ‘जाळ रेषा’ (फायर लाईन) आखली गेली होती... परंतु नेमकी त्याच वेळेला वावटळ आल्याने जाळ रेषेच्यावरून आगीच्या ज्वाळा लपापत पुढे गेल्या. वनक्षेत्रातील सुमारे सव्वाशे हेक्टर क्षेत्र वणव्यामध्ये भाजून निघाले. रात्री बारा वाजेपर्यंत वणव्याचे थैमान चालू होते. नवीन उगवून आलेली झाडे तर जळालीच... शिवाय ठिबक सिंचनाची सगळी व्यवस्थाही जळून गेली. 

पायविहीरच्या ग्रामस्थांना हा फार मोठा हादरा होता. मुळात उजाड असलेले जंगल त्यांनी मोठ्या कष्टाने जोपासले होते. दोन ते तीन वर्षांमध्ये बांबूची रोपे चांगली लागली होती. आवळा, सीताफळ, तेंदू यांची जी लागवड केली होती तीही उत्तम रितीने रुजली होती. अशात हा वणवा लागला आणि सगळे श्रम वाया गेले. काही काळ गावकरी सुन्न अवस्थेत राहिले... पण हताश होऊन चालणार नव्हते. 

या आपत्तीतून योग्य तो धडा घेऊन पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी होती. सुदैवाने ‘असोसिएशन फॉर इंडियाज्‌ डेव्हलपमेंट’ नावाची अमेरिकेतील भारतीयांनी स्थापन केलेली एक संस्था पुढे आली. तिने ठिबक सिंचन योजना पुन्हा बसवून द्यायची तयारी दर्शवली. वनीकरणासही साहाय्य दिले... त्यामुळे 2019 सालच्या पावसाळ्यात नव्याने वनीकरण करण्यात आले. ठिबक सिंचन व्यवस्थाही पुन्हा लावली गेली.

वणव्याच्या या आपत्तीतून जे मुख्य धडे मिळाले... ते म्हणजे अशी आपत्ती कधीही येऊ शकते हे लक्षात घेऊन तिला तोंड देण्यासाठी सदैव तयार राहायचे. जाळ रेषा आखली होती... परंतु ती संपूर्णपणे स्वच्छ नव्हती. अनेक ठिकाणी तिच्यावर गवत लोळले होते. जाळ रेषा नुसती आखून चालत नाही तर ती घराच्या अंगणासारखी स्वच्छ ठेवावी लागते. 

दुसरे म्हणजे या भागातले पर्यावरण लक्षात घेता तिची रुंदी वाढवणे आवश्यक होते म्हणजे कितीही जोराची वावटळ आली तरी तिच्यापासून रक्षण झाले असते. ग्रामसभेने आग विझवण्याचे ‘ब्लोअर’ यंत्र आणले होते... परंतु त्या दिवशी ते नेमके दुरुस्तीसाठी गावाबाहेर गेलेले होते. आपत्ती निवारण कार्यातला हाही महत्त्वाचा धडा होता की, आपल्याकडची जी यंत्रसामग्री असते ती कायम सुसज्ज असावी लागते. 

पुढची गोष्ट म्हणजे वनीकरणाचे विभाग हे 30 हेक्टरचे केलेले होते. ते त्यापेक्षा लहान आकाराचे करायला हवे होते म्हणजे वणवा जरी लागला तरी वनामध्ये हिंडता येऊन तो विझवणे सोपे गेले असते. आणखी एक गोष्ट म्हणजे वणवा विझवण्याची एक शास्त्रीय पद्धत असते. निवळ लोक गोळा झाले आणि आरडाओरडा करत निघाले म्हणून वणवा विझत नसतो. जे लोक तो वणवा विझवायला जाणार आहेत त्यांना त्याचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक असते... शिवाय त्यांच्याकडे योग्य ती उपकरणे, हत्यारे आणि स्वसंरक्षणाची साधने असावी लागतात. 

...शिवाय जंगलशास्त्रातील माहीतगार माणसे असे सांगतात की, वणवा फार क्वचित वेळा आपोआप लागतो. बहुतेक वेळा कोणाचा तरी हलगर्जीपणाच कारणीभूत होतो. वणवा हा निसर्गाचा प्रकोप नाही... ती मानवी गलथानपणाची खूण असते. पायविहीरच्या ग्रामस्थांनी नंतर चौकशी केल्यावर उघडकीस आले की, शेजारच्या गावातील काही लोकांनी वन क्षेत्राबाहेर आगटी केली होती आणि ती पूर्णपणे विझवली नव्हती. नेमकी त्याच वेळी वावटळ येणे हे दुर्दैवी होते... परंतु दक्षता आणि सावधानता ही संपूर्णपणे घ्यावीच लागते. 

जंगलाचे संवर्धन करायचे म्हणजे नुसती झाडी वाढवायचे असे नाही तर त्या सृष्टीवर कोणकोणती संकटे येतील याचा अंदाज घेऊन त्या प्रकारे उपाययोजना करणेही गरजेचे असते. पायविहीरच्या ग्रामस्थांनी तसे उपाय करणे आता सुरू केले आहे. त्यातली पहिली पायरी म्हणजे गवत कापायचे यंत्र त्यांनी ताबडतोबीने आणले आणि वनीकरणाचे प्लॉट्स लहान करून जाळ रेषेची नव्याने आखणी केली. 

- मिलिंद बोकील

(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत  मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)


'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Tags: मिलिंद बोकील मेळघाट मेळघाट : शोध स्वराज्याचा भाग -12 सामुहिक वन हक्क पायविहीर Series Milind Bokil Melghat Part 12 Payvihir Load More Tags

Add Comment