कोरकू समाज आणि संस्कृती

मेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 23

फोटो सौजन्य : depositphotos.com

कोल-मुंडारी जनसमूहांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात कोरकूंचे स्थान अनन्यसाधारण असे आहे आणि आपण त्या स्थानाचा सन्मान केला पाहिजे. कोरकू हे आदिम निवासी असल्यामुळे त्यांच्या भाषेतून आणि संस्कृतीतून जगाविषयीचे जे आकलन (वर्ल्ड व्ह्यू) निर्माण झालेले आहे ते फार मोलाचे आहे.

मेळघाटमधल्या या प्रक्रियांविषयी लिहायचे म्हटले की कोरकूंच्या सामाजिक रचनेचा आणि त्यांच्या संस्कृतीचा संदर्भ येणे अटळच आहे. हे केवळ सांस्कृतिक कुतूहलापोटीच आवश्यक आहे असे नाही तर हा जो विकास घडतो आहे त्याचे समाजशास्त्र समजून घेण्याच्या दृष्टीनेही आवश्यक आहे.

कोरकू हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा आदिवासी समाज आहे हे आपण पाहिलेच... केवळ लोकसंख्येच्या दृष्टीनेच नाही तर मानवशास्त्रीयदृष्ट्याही. कोरकूंचे वैशिष्ट्य असे आहे की, मध्य-पूर्व भारतामध्ये ‘मुंडा’ किंवा ‘कोल’ नावाने ओळखला जाणारा जो आदिवासी समाज आहे त्याचे ते महाराष्ट्रातले प्रतिनिधी आहेत. 

ही गोष्ट समजून घेण्यासाठी भारतातील आदिवासींचा किंबहुना भारतीय लोकांचाच इतिहास थोडक्यात समजून घेतला पाहिजे. याचे तपशीलवार विवेचन ‘कातकरी - विकास की विस्थापन’ या ग्रंथाच्या ‘आदिवासी कोण?’ या प्रकरणात आम्ही केलेले आहे. (बोकील, 2006) 

या विषयात अधिक रुची असणाऱ्या वाचकांनी ते जरूर वाचावे. अलीकडच्या काळात जनुकशास्त्र म्हणजे ‘जेनेटिक्स’मध्ये जे नवीन संशोधन झालेले आहे त्यामुळेही या विषयावर आणखी प्रकाश पडलेला आहे. हा इतिहास सारांशाने पुढीलप्रमाणे सांगता येईल...

पृथ्वीवर आज जो मानव राहतो त्याला शास्त्रीय भाषेत ‘होमो सेपियन्स’ म्हणतात हे सर्वांना माहीत असेल. आपण सर्व जी माणसे आज पृथ्वीवर राहत आहोत - मग आपले देश कोणतेही असोत - ती सर्व या एकाच प्रजातीची आहोत. ही जी आपली प्रजाती आहे ती सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी अस्तित्त्वात आली असे मानले जाते. 

या प्रजातीपूर्वीही पृथ्वीवर माणसांच्या प्रजाती होत्या पण होमो सेपियन्सपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.  बुद्धिमत्तेमुळे आणि भोवतालच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या आपल्या कौशल्यामुळे होमो सेपियन्स टिकून राहिले.  होमो सेपियन्स हे मुळात आफ्रिका खंडाच्या उत्तर-पूर्व भागात राहत होते. आजपासून साधारणतः सत्तर हजार वर्षांपूर्वी ते तिथून बाहेर पडले आणि सर्व जगभर पसरले. 

त्यांच्यापैकीच काही माणसे ही साधारण पासष्ट हजार वर्षांपूर्वी भारतात आली. त्यातला एक मोठा गट हा मध्य व दक्षिण भारतामध्ये पसरला. उष्ण कटिबंधातील भारत देश हा वस्ती करण्यासाठी सुयोग्य पर्यावरण असलेला प्रदेश असल्याने त्यांची लोकसंख्या इथे वाढली. 

आजपासून सुमारे 45,000 ते 20,000 वर्षांपूर्वीच्या काळातल्या त्यांच्या वस्तीच्या खुणा भारतामध्ये अनेक ठिकाणी मिळालेल्या आहेत.  पुरातत्त्वशास्त्राच्या भाषेत या काळाला ‘मध्य-पुराश्मयुग’ असे म्हणतात. मध्य-दक्षिण भारतातले जे आदिवासी आहेत ते या सर्वांत आधीच्या लोकांमधले आहेत असे मानले जाते. 

एवढेच नाही तर भारतातील जनसमूहाचा जो बुंधा किंवा खोड आहे तो या लोकांनी तयार झालेला आहे असे समजले जाते. या नंतर जे-जे लोक भारतात आले त्यांचे आरोपण या मूळच्या खोडावर झाले आणि त्यांच्या वांशिक जुळणी-मिसळणीतून आणि भारतभर घडलेल्या स्थलांतरांतून आजचा भारतीय समाज आणि त्यातल्या विविध संस्कृती निर्माण झाल्या. 

ज्यांना हा रोमांचक इतिहास अधिक समजून घ्यायचा आहे त्यांनी टोनी जोसेफ या पत्रकाराचे अलीकडेच प्रसिद्ध झालेले ‘द अर्ली इंडियन्स’ (जोसेफ, 2018) हे पुस्तक वाचावे... या पुस्तकाचा एक निष्कर्ष असाही आहे की, भारतातल्या सर्वच लोकांमध्ये आपल्या या आदिम पूर्वजांचा जनुकीय अंश कमीअधिक प्रमाणात आहे; भारतीय स्त्रियांमध्ये तर तो पुरुषांपेक्षा जास्त आहे. 

हे ज्ञान परिपूर्ण वा अंतिम आहे किंवा भारतातील मानवी वसाहतीबद्दल संपूर्ण सत्य सापडले आहे असे नाही... (त्यात अनेक तर्क आणि अंदाज आहेत...) पण सध्याच्या काळात मानवविज्ञानाची आणि जीवशास्त्राची जी प्रगती आहे तिला धरून ते आहे. त्या अर्थाने ते अद्ययावत आहे. 

हे जे मध्य-दक्षिण भारतातले आदिम लोक होते त्यांचे भाषेच्या आधारावर दोन मुख्य वर्ग भाषाशास्त्रज्ञांनी केलेले आहेत. एक म्हणजे ‘कोल/मुंडारी’ समूह आणि दुसरा म्हणजे ‘द्रविड’ समूह. कोल/मुंडारी समूहामध्ये मध्य भारतातील मुंडा, संथाळ, हो, सावरा, कोल, ओरांव, कोरवा, कोरकू अशा जमाती येतात तर द्रविड समूहामध्ये गोंड, खोंड, कोलाम, चेंचू, इरुला अशा जमाती येतात. 

तमीळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड या प्रमाणभाषा या आदिम द्रविड भाषिक परंपरेतूनच निर्माण झाल्या. भाषाशास्त्रज्ञांनी त्यांच्या भाषेचा अभ्यास करून जरी असे वर्ग केलेले असले तरी वर उल्लेख केलेल्या इतिहासाप्रमाणे ‘लोक’ म्हणून ते वेगळे नव्हते. या भाषांमध्येही पुष्कळ साम्य आहे. 

भारतीय भाषांचे ब्रिटिश काळातील प्रमुख अभ्यासक आणि ‘द लिंग्विस्टीक सर्व्हे ऑफ इंडिया’चे जनक जॉर्ज ग्रिअर्सन यांनी नमूद केले आहे की, मुंडा हे जे भाषिक उपकूळ आहे ते प्राचीन काळच्या द्रविड-मुंडारी कुळापैकीच असावे (रसेल व हिरालाल, 1997: 570). म्हणजे मुळात कदाचित एक भाषाकूळ असावे आणि नंतर त्याचे विलगीकरण झाले असावे. 

निरनिराळ्या पर्यावरणात राहत असल्याने या आदिम जमातींमध्ये काळाच्या ओघात जे परिवर्तन झाले त्याचाच एक आविष्कार वेगवगळ्या भाषा निर्माण होण्यात झाला. भाषांची कुळे हीच वांशिक कुळे आहेत किंवा वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक वांशिकदृष्ट्या वेगवेगळे आहेत असे मानणे योग्य नाही... कारण लोकांमध्ये भाषेची देवाणघेवाण ही सतत चालू असते आणि जुन्या भाषांच्या जागेवर नवीन किंवा संकरित भाषा कायमच प्रस्थापित होत असतात.  त्या-त्या समूहाने आपली मूळची बोली टिकवली असेल तर त्यांच्या इतिहासाविषयी काही अंदाज आपल्याला बांधता येतो. 

मेळघाटमधले जे कोरकू आहेत त्यांच्या भाषेमध्ये हिंदी, मराठी तसेच गोंडी शब्दांची सरमिसळ झालेली असली तरी त्यांनी आपली मूळची भाषा टिकवलेली आहे. ते भव्य आणि विस्तृत अशा कोल-मुंडारी जनसमूहांपैकी आणि पर्यायाने भारतातल्या आदिम वसाहतवीरांमधले आहेत हे या भाषेवरून आणि त्यांच्या बाकीच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांवरून सहज लक्षात येते. 

महाराष्ट्रात कोरकू हीच कोल-मुंडारी जनसमूहांपैकी प्रमुख जनजाती आहे. पूर्वेला गोंड, कोलाम, आंध हे द्रविड भाषासमूहांपैकी आहेत तर उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी समूह हे भिल्ली भाषांच्या प्रभावाखालचे आहेत. (...मात्र भिल्ली भाषेतही द्रविड अंश आहेच. किंबहुना श्री. विश्वनाथ खैरे यांनी आपल्या ‘अडगुलं मडगुलं’ या पुस्तकात दाखवून दिल्याप्रमाणे मराठीतही तमीळ अंश मोठ्या प्रमाणावर आहे. (खैरे, 2001)) 

कोल-मुंडारी जनसमूहांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रात कोरकूंचे स्थान अनन्यसाधारण असे आहे आणि आपण त्या स्थानाचा सन्मान केला पाहिजे. कोरकू हे आदिम निवासी असल्यामुळे त्यांच्या भाषेतून आणि संस्कृतीतून जगाविषयीचे जे आकलन (वर्ल्ड व्ह्यू) निर्माण झालेले आहे ते फार मोलाचे आहे.

मेळघाटातील कोरकू भाषेचा उत्तम अभ्यास अचलपूरच्या डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांनी केलेला आहे आणि त्यामधून ‘कोरकू बोली - वर्णनात्मक आणि समाजभाषावैज्ञानिक अभ्यास’ हे पुस्तक (बऱ्हाटे, 2012) सिद्ध केलेले आहे. हा अभ्यास मुख्यतः भाषाविज्ञानाच्या अंगाने केलेला असला तरी त्याच्या परिशिष्टांमध्ये कोरकू लोककथा, लोकगीते, म्हणी, उखाणे आणि वाक्य व शब्दसंग्रह हेही दिलेले आहेत. ज्यांना कोरकू भाषा समजून घ्यायची असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे उत्कृष्ट संदर्भग्रंथ आहे. 

कोरकूंच्या संदर्भात मानवशास्त्रीय अभ्यासही झालेले आहेत. त्यातला सखोल अभ्यास म्हणजे स्टीफन फक्स यांनी लिहिलेले ‘द कोरकूज ऑफ द विंध्या हिल्स’ हे पुस्तक (फक्स, 1988). मध्य भारतातील जनजातींची माहिती ब्रिटिश काळामध्ये आर.व्ही. रसेल आणि हिरालाल यांनी विविध ब्रिटिश अंमलदारांचा आणि अभ्यासकांचा हवाला देऊन संकलित केलेली आहे... ज्यामध्ये कोरकू समाजाविषयीचेही वर्णन आहे. (रसेल व हिरा लाल, 1997 : 550-570) 

नंतरच्या अभ्यासकांनी बव्हंशी माहिती याच पुस्तकातून घेतलेली आहे. वरोरा येथील प्राध्यापक दाम्पत्य डॉ. श.गो. देवगावकर व डॉ.शैलजा देवगावकर यांनीही कोरकू समाजावरचे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. (देवगावकर व देवगावकर, 1990)

द्रविड आणि मुंडारी या जनसमूहांची पूर्वीची एकतानता चटकन समजून घेण्याचा एक निर्देशांक म्हणजे त्यांची स्वतःबद्दलची संकल्पना. कोरकूचा शब्दशः अर्थ ‘माणसे’ किंवा मानव असा होतो. या भाषेमध्ये कोरू म्हणजे एक माणूस तर कोरकू म्हणजे अनेक माणसे. असेच गोंड समाजामध्ये आहे. 

मेंढा-लेखामधले किंवा त्यांच्या भोवतालातले गोंड हे स्वतःला ‘कोया’ म्हणवतात. कोया म्हणजेही माणसेच. तुम्ही कोण आहात असा प्रश्न या आदिवासींना जेव्हा बाहेरचे लोक विचारतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही माणसे आहोत. त्यांच्या मते गोंड हे नाव बाहेरच्यांनी दिलेले आहे; ते त्यांचे नाव नाही. त्यांचे नाव कोया किंवा कोयतूर असे आहे. 

आपल्याला जर कोणी विचारले की, तुम्ही कोण आहात तर आपण काय उत्तर देतो? आपण आपले आडनाव सांगतो, अमुक गावाचे आहोत असे सांगतो, जात सांगतो किंवा अमुक राज्याचे रहिवासी आहोत असे सांगतो... पण आम्ही माणूस आहोत असे कधी सांगतो का? निरनिराळे भेदभाव आणि कृत्रिम ओळख निर्माण होण्यापूर्वी माणसांची स्वतःबद्दलची समज आपण माणसे आहोत अशीच होती. 

कोरकूंचा आदिम देव आहे तो म्हणजे महादेव. भारतातला मूळ आणि खऱ्या अर्थाने बृहत्भारतीय अस्तित्व असणारा देव म्हणजे महादेवच. हाच गोंडांमधला ‘बडा देव’ किंवा ‘पेरसा पेन’ आहे असे म्हणता येईल. तो कैलासावर राहतो, तोच रुद्र आहे आणि त्रिमूर्तींपैकी एक आहे हे त्याचे रूपांतर (उन्नयन) नंतरच्या भारतीय परंपरेने केले... मात्र तेव्हाही तो पिंडीच्या किंवा लिंगाच्या रूपाने राहिला ही गोष्ट त्याचे आदिमत्व दर्शवणारीच आहे. 

महादेवासोबतच कोरकू ज्याला मानतात तो म्हणजे रावण. दक्षिणी आदिवासी ज्या दंडकारण्यात राहत होते त्याचा रावण हा राजा. गोंडांमध्येही रावणाबद्दलची समज अशीच आहे. (रामायण ही लोककथा असल्याने भारतात आणि भारताबाहेर त्याची वेगवेगळी कथानके प्रचलित आहेत. आपल्याकडचे जे लोकप्रिय रामायण आहे त्यात रावण हा श्रीलंकेचा राजा दाखवला आहे... मात्र श्रीलंकेत रावणाचे राज्य असल्याचे कोणतेही पुरातत्त्वीय अवशेष मिळालेले नाहीत. अशोकवन किंवा सीताकुंड अशा ज्या जागा दाखवल्या जातात त्या आधुनिक पर्यटनाच्या दृष्टीने तयार केलेल्या आहेत हे स्पष्ट कळते.) 

रावण हा महादेवाचा मोठा भक्त. विंध्य आणि सातपुडा पर्वतांतल्या आतल्या भागात मानवी वस्ती नाही म्हणून तिथे मानवी वसाहत निर्माण करण्याची विनंती रावणाने महादेवाला केली. महादेवाने लाल मातीच्या एका वारुळातील मातीपासून ‘मुळाई’ आणि ‘मुळा’ असे स्त्री-पुरुष निर्माण केले आणि संतती निर्माण करा आणि तिथे राहा अशी आज्ञा त्यांना केली. त्यांना संतती झाली... पण ते सगळे एकमेकांचे भाऊबहीण असल्याने खऱ्या अर्थाने वंशवृद्धी होईना... म्हणून ते पुन्हा महादेवाकडे गेले. महादेवाने एका भयंकर सिंहाचे रूप धारण केले आणि या क्षेत्रात येऊन गर्जना केली. 

ती गर्जना ऐकून सगळे गर्भगळित झाले आणि घाबरून इकडेतिकडे जाऊन लपले. कोणी नदीतल्या मातीत, कोणी गवतात, कोणी मोहाच्या झाडामागे, कोणी काकडीच्या वेलामागे तर कोणी इतर कुठे. नंतर महादेवाने मूळ रूप धारण करून सगळ्यांना जवळ बोलावले आणि सांगितले की, ते जिथे लपले होते ते त्यांचे गोत्र (देवक). त्यांनी स्वतःच्या गोत्रामध्ये संबंध न करता गोत्राबाहेरील व्यक्तीशी लग्न करायचे. अशा रितीने 36 गोत्रांची निर्मिती झाली आणि त्यांच्यामधून कोरकू जमात निर्माण झाली. कोरकू जमातीच्या सर्व अभ्यासकांनी उत्पत्तीची ही कथा आपापल्या ग्रंथांमध्ये नमूद केलेली आहे. 

या लपण्याच्या ठिकाणांवरून जी देवकांची वा गोत्रांची नावे पडली त्यांवरूनच सध्याच्या काळातील कोरकूंनी आपली आडनावे घेतलेली आहेत. उदाहरणार्थ, कासदा म्हणजे नदीतली माती, त्यावरून कास्देकर, जांभळाच्या झाडावरून जामुनकर, बेठे म्हणजे बिब्बा किंवा भिलाव्याच्या झाडावरून भिलावेकर, पाण्यात लपले त्यांचे गोत्र मवासी आणि त्यातून मावसकर, चथुर म्हणजे मधमाशी आणि त्यावरून चथुरकर, साकोम म्हणजे झाडाची पाने आणि त्यावरून सावलकर किंवा झामरकर इत्यादी. 
कोरकूंमध्ये रावणाचे सांस्कृतिक महत्त्व आहे... मात्र प्रत्यक्षात पूजा केली जाते ती रावणाचा मुलगा मेघनाद याची. रावणाचा भाऊ कुंभकर्ण हाही कोरकूंना पूजनीय आहे. कोरकू किंवा गोंड या आदिवासींमध्ये रावण या राजाला जे महत्त्व आहे ते भारतीय संस्कृतीसंदर्भात नीट समजून घेतले पाहिजे. 

या जरी पुराणकथा किंवा मिथककथा असल्या तरी भारताच्या वसाहतीकरणाशी त्या घट्टपणे जोडलेल्या आहेत. राम आणि रावण यांच्यामधल्या युद्धाची कथा ही काही जण संस्कृतिसंघर्षाचे प्रतीक मानतील तर काही जण संस्कृतिसमन्वयाचे... पण राम हा देवांचा प्रतिनिधी आणि रावण हा राक्षसांचा अशी परिभाषा वापरण्यापूर्वी आपण शंभर वेळा विचार केला पाहिजे. 

देव आणि असूर अशा संकल्पनाही आपण वापरतो... पण झारखंडच्या छोटा नागपूर पठारावर ‘असूर’ नावाची अनुसूचित जमात आहे. हे लोक लोखंडाचे ओतकाम करण्यात फार पारंगत होते आणि सध्या या व्यापक भूभागात असलेल्या आदिवासींचे ते पूर्वज मानले जातात... (सिंग, 1998 : 138-139) त्यांना आपण राक्षस म्हणणार का? 

पूर्वीच्या काळात जेते लोक आपला धर्म, आपली भाषा आणि संस्कृती हे जितांवर लादत असत... पण स्वतंत्र भारतामध्ये तसे करण्याची गरज नाही. सध्या ‘अयोध्ये’चा धर्म संपूर्ण देशावर लादण्याची जी राजकीय व धार्मिक प्रक्रिया चालू आहे ती गोंड-कोरकूंसारख्या आदिवासींवर किती अन्यायकारक असू शकते याची कल्पना वाचकांना येईल. 

प्रत्येक व्यक्तीला आणि समूहाला आपापल्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. त्याचबरोबर धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे हे लक्षात ठेवून तो आपण घरातच ठेवला पाहिजे आणि आपला राजकीय व सामाजिक व्यवहार हा धर्मनिरपेक्षच राखला पाहिजे. 

कोरकूंचा नेहमीचा पूजण्याचा जो देव आहे त्याला ‘मुठवा’ असे म्हणतात. प्रत्येक गावात त्याचे ठिकाण असते. एखाद्या झाडाच्या बुंध्याला नदीतून किंवा ओढ्यातून आणलेल्या लहान गोट्यांचा ढीग करून मुठवा देवाचे स्थान निश्चित केले जाते व त्या झाडावर झेंडा लावला जातो. मुठवा ही अशा रितीने ग्रामदेवता असते आणि गावात करण्याचे कोणतेही काम किंवा समारंभ हा मुठवा देवाची पूजा करून सुरू केले जाते. 

कोरकू भाषेत ‘गोमोज’ म्हणजे देव. सूर्य हा ‘दिया गोमोज’ तर चंद्र म्हणजे ‘रात गोमोज’. या शिवाय धरतीमाता, वाघदेव, नागदेव, डोंगरदेव हेसुद्धा कोरकूंचे देव आहेत. सर्वच आदिवासींप्रमाणे कोरकूंमध्येही सबंध वर्षभर शेतीचे आणि ऋतूंचे जे चक्र चालत असते त्याला धरून या देवतांची पूजा केली जाते.  ‘भूमका’ हा कोरकूंमधला पारंपरिक पुजारी. गावातील सर्व पूजा, सण, समारंभ यांमध्ये तो पुरोहिताची भूमिका निभावतो. 

कोरकूंमधल्या वार्षिक उत्सवाची सुरुवात ‘भवई’ने होते. हा समारंभ वैशाख अमावस्येला, पेरणी करण्याच्या अगोदर केला जातो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सगळ्यात महत्त्वाचा विधी... कारण त्यानंतर शेतीचा हंगाम सुरू होत असतो. या दिवशी जंगलात असणाऱ्या खेडा देवाची पूजा केली जाते. गावातले पुरुष गावाच्या सीमेवर जातात आणि कोंबड्याचा नैवेद्य खेडा देवाला दाखवतात. शेतीचा हंगाम चांगला जावो अशी प्रार्थना केली जाते. 

यानंतर जो सण येतो तो म्हणजे ‘रांडभवाई’. तो ज्येष्ठ अमावस्येला केला जातो. या वेळेपर्यंत पाऊस सुरू झालेला असतो. याही दिवशी खेडा देवाची पूजा केली जाते. बेडूक हा पावसाचा प्रतिनिधी. त्याची पूजा या दिवशी केली जाते. 

यानंतरचा सण म्हणजे ‘जिरोती’. तो श्रावण शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या घरी जातात आणि नंतरचा सण जो येतो तोबैलपोळा... तोपर्यंत म्हणजे पंधरा दिवस त्या माहेरी राहतात. 

पोळ्यानंतरचा मोठा सण म्हणजे दसरा. तो अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. कोरकूंमध्ये नवरात्राची परंपरा नाही... पण हल्ली भोवतालच्या ग्रामीण समाजाच्या प्रभावाने दुर्गादेवी बसवतात. दसऱ्यानंतर शेतीच्या कामांची गडबड असते. ती संपल्यावर मग फेब्रुवारी महिन्यात मातापूजन होते. 

त्यानंतर येते ती होळी.  इतर अनेक आदिवासी समूहांप्रमाणे होळी हाच खरेतर कोरकूंचा मुख्य सण. रोजगारासाठी गाव सोडून गेलेला प्रत्येक जण होळीला परत येणारच. होळीच्या दिवशी मेघनादाची पूजा होते आणि मुख्यतः नवस फेडले जातात. होळीच्या निमित्ताने होणारा नाचगाण्यांचा आणि मेजवानीचा जल्लोश पुढचे आठपंधरा दिवस चालू राहतो. 

होळी किंवा शिमगा हा सगळ्या भारतीयांचाच आदिम सण आहे. तो झाला की शेतीच्या सणांचे चक्र पुरे होते. कोरकूंमध्ये सामूहिक नृत्याच्या परंपरा आहेतच. केवळ पुरुषांचा जो नाच असतो त्याला ‘सुसून’ म्हणतात तर स्त्री-पुरुष मिळून जो नाच करतात त्याला ‘सुसूनगाडुली’ असे म्हणतात.  
बहुतेक सर्व आदिवासींप्रमाणे कोरकूंमध्येही मुलीकडच्यांना ‘देज’ म्हणजे ‘वधूमूल्य’ देऊन लग्न करण्याची पद्धत आहे. त्याला ‘गोनोम’ असे म्हणतात. तरुण मुलेमुली आपापले लग्न जमवू शकतात किंवा तसे जर जमले नाही तर घरचे लोक आपापल्या संबंधातूनही जोडी जुळवतात. 

अनेक वर्षे गोनोमची रक्कम रु. 800 ते 1200 अशी कायम होती. हल्ली ती वाढलेली आहे. गोनोमबरोबर साधारण दोन मण धान्य आणि एक बैल देण्याची पद्धत आहे. आदिम समाजामध्ये ही एक प्रकारे वधूच्या श्रममूल्याची भरपाई असते. मुलीच्या वडिलांच्या घरातून एक उत्पादक व्यक्ती कमी होते. त्याची भरपाई या वधूमूल्याने केली जाते. 

जो तरुण मुलगा गोनोम देऊ शकत नसे त्याला ‘लमजान्या’ म्हणून मुलीच्या घरी चाकरी करावी लागे. आता ही पद्धत कमी झाली आहे. कोरकू लग्नातली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे मुलाकडचे लोक वरात घेऊन येत नाहीत तर मुलीकडचे लोक वरात नेऊन मुलीला मुलाकडे सोडून येतात. 

आपल्या देशात हल्ली लग्नसमारंभ खर्चीक होऊ लागलेले आहेत आणि कोरकू समाजही त्याला अपवाद नाही. आता गोनोमची रक्कम तर वाढली आहेच... शिवाय चांदीचे आणि सोन्याचे दागिनेही घातले जातात. काडीमोडाला (घटस्फोटाला) आणि विधवाविवाहाला कोरकू समाजात आडकाठी नव्हती... मात्र काडीमोड ही गावपंचायतीच्या संमतीनेच होत असे. 

भोवतालच्या वातावरणाचा रेटा जबरदस्त असल्यामुळे कोरकू समाजही झपाट्याने ग्रामीण आणि निमशहरी होतो आहे. पूर्वीचा निसर्गपूजेचा आणि निसर्गातील निरनिराळ्या घटकांशी जोडून घेण्याचा जो दृष्टीकोन होता तो आता हरवत चाललेला आहे. शिक्षणाचा प्रभाव तर आहेच... शिवाय बहुतांश कोरकू युवक हे रोजगाराच्या शोधात शहरांकडे जात असल्याने भोवतालची जी संस्कृती आहे ती स्वीकारण्याकडे त्यांचा कल होणे स्वाभाविक आहे. 

...शिवाय ‘तुम्ही तुमचे आदिवासीपण सोडा आणि आमच्यासारखे व्हा!’ असेच भोवतालच्या समाजाचे आणि राजकीय व्यवस्थेचे सांगणे असल्याने त्यांच्यासमोर दुसरा पर्यायही नाही. आपले ‘कोरकू’पण कशात आहे आणि त्यातले आपण काय ठेवले पाहिजे आणि काय राखले पाहिजे यावर जो विचार व्हायला पाहिजे तो कोरकू गावांमध्ये होताना दिसत नाही. 

...मात्र सामूहिक वनहक्कांच्या निमित्ताने जागृतीची ही जी प्रक्रिया सुरू झाली आहे तिच्यामधूनच काही विचारमंथन झाले तर होईल. कोरकू समाजाच्या बरोबर जे गवळी आणि बलई समाज मेळघाटात राहतात ते भारतीय ग्रामीण समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांचे जगणे आणि चालीरिती या ग्रामीण समाजाप्रमाणेच आहेत.  

- मिलिंद बोकील

(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)

संदर्भ : 

1. बोकील, मिलिंद. 2006. कातकरी: विकास की विस्थापन? मौज प्रकाशन, मुंबई.
2. रसेल, आर. व्ही.; हिरा लाल. 1997. द ट्राइब्ज ॲन्ड कास्ट्स ऑफ द सेंट्ल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया (खंड 3) (पुनर्मुद्रित). लो प्राइस पब्लिकेशन्स, नवी दिल्ली. 
3. खैरे, विश्वनाथ. 2001. अडगुलं मडगुलं. संमत प्रकाशन, पुणे.
4. बऱ्हाटे, काशिनाथ. 2012. कोरकू बोली: वर्णनात्मक आणि समाजभाषावैज्ञानिक अभ्यास. देवयानी प्रकाशन, मुंबई.
5. फक्स, स्टीफन. 1988. द कोरकूज ऑफ द विन्ध्या हिल्स. इंटर इंडिया पब्लिकेशन, नवी दिल्ली. 
6. देवगावकर, एस. जी. व एस. एस. देवगावकर. 1990. द कोरकू ट्रायबल्स. कन्सेप्ट पब्लिशिंग कंपनी, नवी दिल्ली.
7. सिंग, के. एस. 1998. इंडियाज कम्युनिटीज: खंड 4. अ‍ॅन्थ्रॉपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, नवी दिल्ली. 
8. जोसेफ, टोनी. 2018. द अर्ली इंडियन्स - द स्टोरी ऑफ अवर ॲन्सेस्टर्स ॲन्ड व्हेअर वी केम फ्रॉम. जगरनॉट बुक्स, नवी दिल्ली. 


'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

Tags: लेखमाला मेळघाट मिलिंद बोकील मेळघाट : शोध स्वराज्याचा भाग 23 कोरकू जमात कोरकू समाज आदिवासी Melghat Milind Bokil part 23 Korku Tribe Series Load More Tags

Comments:

Amol kumare

अतिशय सुंदर लेख आणि महत्वाची माहिती

Urmila dange

Most important details

Add Comment