साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा

साने गुरुजींच्या 75 व्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्र सेवा दलाचा कार्यक्रम

11 जून 2025 ला साने गुरुजींच्या 75 व्या स्मृतिदिन होता त्यानिमित्त 10 जूनला पुण्यात राष्ट्र सेवा दलाचा ‘साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ’ पार पडला. या समारंभात जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर प्रमुख अतिथी होते. त्यांच्या हस्ते सहा ज्येष्ठ पुरोगामी कर्तृत्ववान विचारवंतांना साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, गांधी आंबेडकर विचारांचे जागतिक कीर्तीचे भाष्यकार डॉ. रावसाहेब कसबे, इस्लाम व सूफी तत्त्वज्ञानाचे देशातील महत्वाचे अभ्यासक, विचारवंत प्रा. डॉ. अलीम वकील, विषमता निर्मूलन चळवळीचे नेते सुरेश शिपूरकर, ‘ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी चळवळी’चे नेते शब्बीर अन्सारी या पाच जणांना हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय मच्छिमारांच्या राष्ट्रीय नेत्या पूर्णिमा मेहेर यांना त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार दिला जाईल. 

सामाजिक जीवनात प्रेरणा, वारसा याची सतत उजळणी करत रहावी लागते. ती उजळणी व्हावी या हेतूने राष्ट्रसेवा दलाने या सहा मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार दिले. त्यांचा अल्पपरिचय - 

डॉ. कुमार सप्तर्षी
1960 नंतरच्या नवजागरण काळात डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजवादी नेते होते. 'युक्रांद'च्या माध्यमातून त्यांनी तरुणांना सत्याग्रही क्रांतीची प्रेरणा दिली. पुण्यात शंकराचार्यांशी वाद घालून सनातन व्यवस्थेला हादरा दिला. गांधी विचारांचा प्रसार आणि समाजवादी विचारव्यूह घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले.

डॉ. रावसाहेब कसबे
सनातनी विचारसरणीला आव्हान देत डॉ. कसबे यांनी ‘मार्क्स आणि आंबेडकर’ या ग्रंथातून दलित एकजुटीचा आवाज बुलंद केला. सावरकरांच्या विचारांचे खंडन आणि आंबेडकर-गांधी विचारांचा समकालीन अभ्यास सादर करून त्यांनी जातीअंताच्या विचारव्यूहात महत्त्वाचं योगदान दिलं.

शब्बीर अहमद अन्सारी
शब्बीर अन्सारी यांनी  मुस्लीम समाजातील मागास जातींसाठी ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष केला. त्यांनी धर्म नव्हे तर वर्ग या आधारावर हक्क पटवून देण्यासाठी संघर्ष केला आणि मंडल आयोगाच्या आरक्षणाचा लाभ मुस्लिमांना मिळवून दिला. ते  मुस्लीम समाजातील हाडाचे समाजवादी नेते आहेत.

डॉ. अलीम वकील
राष्ट्र सेवा दलाचे सैनिक असलेले डॉ. अलीम वकील हे मराठीतून इस्लामी तत्त्वज्ञान, सूफी तत्त्वज्ञान आधुनिक परिभाषेत मांडणारे देशातील अग्रणी विचारवंत, लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि प्रगल्भ विचारवंत असून, त्यांनी लिहिलेल्या १६ पुस्तकांनी वैचारिक जागरणाला दिशा दिली आहे. ‘महात्मा आणि बोधिसत्व’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले. ते बाराव्या मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. गीता आणि कुराण या धर्मग्रंथांवर आधारित ‘कर्मयोग परिचय’ हे त्यांचे पुस्तक सध्या चर्चेत आहे. डॉ. वकील हे देशभर पुरोगामी वैचारिक जागृतीसाठी ओळखले जातात.

सुरेश शिपूरकर
सुरेश शिपूरकर हे कोल्हापूरातील चळवळींचं विद्यापीठ मानले जातात. त्यांचं भारती मुद्रणालय अनेक सामाजिक चळवळींचं कार्यालं बनलं. ते महाराष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते असून अंधश्रद्धा निर्मूलन, भटके-विमुक्त, देवदासी, वंचित समाजासाठी सतत कार्यरत आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत.

पूर्णिमा मेहेर
पूर्णिमा मेहेर या राष्ट्र सेवा दलाच्या पालघरमधील निरलस कार्यकर्त्या असून त्या ऑल इंडिया फिशरमेन काँग्रेस या संस्थेच्या नेत्या आहेत. मच्छीमार समाज, विशेषतः महिलांच्या हक्कांसाठी त्या देशभर लढतात. विस्थापनविरोधी लढ्यांमध्ये त्यांनी नेतृत्व केलं असून, समाजकार्य क्षेत्रात त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारही मिळाला आहे.

पुरस्कार सोहळ्यानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. फायरब्रँड पत्रकार निखिल वागळे यांनी कार्यक्रमात पुरस्काराने गौरविलेल्या मान्यवरांची ‘ग्रेट भेट’ घडवून आणली, त्यांना बोलतं केलं. ‘ग्रेट भेट’ दरम्यान सर्व मान्यवरांनी त्यांचा प्रवास आणि त्यांची आजची उद्दिष्टे याबद्दल सांगितलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, समाजवादी नेते कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य, विश्वस्त अतुल देशमुख, सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे हेदेखील यावेळी उपस्थित होते.  

डॉ. काकोडकरांनी अणुऊर्जा क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण बनवण्याचा ध्यास घेतला. थोरियमवर आधारित ऊर्जानिर्मितीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रकल्पाचे नेतृत्व त्यांनी केले. ते अणुऊर्जा मंडळाचे आणि भाभा संशोधन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी राहिले. त्यांना व्यक्तिगत आयुष्यात राष्ट्रसेवादलाची वैचारिक पार्श्वभूमी लाभली होती. “समाजातील तळागाळातील व्यक्तींच्या गरजांची पूर्तता करणे, हा खरा आर्थिक विकास असून, तो साध्य करता आला पाहिजे. प्रगतीसाठी कोणत्या मार्गाने पुढे गेले पाहिजे, याबाबत संभ्रम दिसून येतो. त्यामुळे केवळ विचारधारा म्हणजे विकास नव्हे. प्रत्येकांचे वेगवेगळे विचार असू शकतात आणि हेच प्रगल्भ समाजाचे लक्षण आहे”, असे मत काकोडकर यांनी नोंदवले. “भारताने स्वातंत्र्यानंतर मोठी प्रगती केली असली, तरी महात्मा गांधी यांना अपेक्षित समाजरचनेच्या मार्गावर देशाने वाटचाल केलेली नाही. आपण समाजाच्या जडणघडणीत भरकटलो आहोत”, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. “राज्यघटना हाच एकमेव धर्म समजून भारतीयांसाठी पोषक वातावरण निर्माण केल्यास देशाची झपाट्याने प्रगती होईल,” असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

“व्यक्तीच्या संवेदना जागृत असल्याशिवाय तो समाजवादी होत नाही. त्यामुळे मी समाजवादी चळवळीतून वयाच्या ८० व्या वर्षी निवृत्त व्हायचे ठरविले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे मी लढायचे ठरविले आहे”, असे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी यावेळी सांगितले. ग्रेट भेट सुरू असताना रावसाहेब कसबे आणि कुमार सप्तर्षी यांच्यात जुगलबंदी रंगली. मुद्दा धर्म चिकित्सेचा होता. “समाजवादी लोक धर्मचिकित्सा करत नाहीत”, असे कसबे म्हणाले. त्यावर “मी शंकराचार्यांच्या बरोबर पुण्यात वाद खेळलो आहे आणि त्यात त्यांना हरवलं आहे”, असे सप्तर्षी म्हणाले. त्यावर “धर्मावर टीका करणे म्हणजे धर्मचिकित्सा नव्हे. माणूस आणि त्याच्या सभोवतालची परिस्थिती समजावून घेणे म्हणजे धर्मचिकित्सा”, असे कसबे म्हणाले. 

डॉ. अलीम वकील यांनी यावेळी मुस्लीम समाजाची झालेली ससेहोलपट मांडली. सर्व राजकीय पक्षांनी मुस्लिमांना वाऱ्यावर सोडून दिले. त्यांच्यासाठी काहीही केले नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. ‘सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली, तर कोट्यवधी रुपये देऊन आमदारांची खरेदी करून सरकार पाडले जाते. त्यावर मुख्यमंत्री स्वतःची पाठ थोपटून घेतात, तेव्हा बधीरता दिसते. समाजात ध्येयवादी विचारांची पोकळी जाणवते. सर्वसामान्य, गरिबांचे जीवनमान आणखी ढासळत चालले असून, नीतीमत्तेचा चुराडा झाला आहे,’ अशा शब्दांत डॉ. बाबा आढाव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

भाई वैद्य म्हणत, “नाहीरे वर्ग जेथे वसती करतो तेथेच त्यांना संघटित करण्यासाठी सेवा दल सैनिकांना जावे लागेल. जीवन-मरणाच्या लढ्यासाठी त्यांना सज्ज करावे लागेल. सेवा दलाचा प्राण केवळ शाखापद्धतीमध्ये नसून तेजस्वी समाजवादी विचारांत आहे. आजच्या काळात आदिवासी जाणीव गट, बेकारांचे लढाऊ गट, महिला बचत गट व झोपडपट्टीवासीयांचे क्रांतिकारी गट हे सेवादल शाखांचे नवे स्वरूप होऊ शकेल.” या सूत्राला धरून सर्व बहुजन समाजाला व विशेषतः दीनदलितांना समाजवादी संघर्षासाठी उद्युक्त करण्यासाठी नवीन कृति कार्यक्रमांची आखणी करून राष्ट्र सेवा दल काम करेल, असा निर्धारही या वेळी पुन्हा उद्धृत झाला.

- राजा कांदळकर
rajak2008@gmail.com 
(लेखक राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.)

Tags: रजा कांदळकर निखिल वागळे अनिल काकोडकर कुमार सप्तर्षी शब्बीर अन्सारी पूर्णिमा मेहेर सुरेश शिपूरकर अलीम वकील अभिजीत वैद्य भाई वैद्य साने गुरुजी रावसाहेब कसबे साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार sane guruji sane guruji jivan gaurav rashtra seva dal anil kakodkar kumar saptarshi nikhil wagle ravsaheb kasbe alim wakil abhijit vaidya bhai vaidya suresh shipurkar Load More Tags

Add Comment

संबंधित लेख