2 ऑक्टोबर 2019 रोजी गांधींजींच्या 150व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखाली 'जय जगत 2020 - जागतिक शांती मार्च' या पदयात्रेला दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीस्थळापासून- राजघाटपासून- सुरुवात झाली. तीन महिने भारतात तर उरलेले नऊ महिने विदेशात, अशी वर्षभर चालणारी ही 14 हजार किलोमीटरची पदयात्रा 10 देशांतून प्रवास करणार होती. या यात्रेदरम्यान जगभर अहिंसा, शिक्षण व सामाजिक न्यायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण व कार्यक्रम होणार होते.पदयात्रेचा मूळचा मार्ग हा राजघाट ते वाघा-बॉर्डर; तिथून पाकिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, नंतर बाल्कन राष्ट्रे, मग इटली आणि शेवटी स्वित्झर्लंड असा होता. या पदयात्रेची सांगता 2 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय असलेल्या जिनिव्हा येथे होणार होती.
मराठीतील प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील या पदयात्रेत सहभागी झाले होते, त्या अनुभवावरील लेख समकालीन प्रकाशनाकडून लवकरच येणाऱ्या 'क्षितिजापारच्या संस्कृती' या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. तो संपूर्ण लेख क्रमशः आठ भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा भाग 2.
- संपादक
येरेवानचा तोंडवळा कोणत्याही रशियन शहरासारखा आहे. रुंद रस्ते, तसेच मोठमोठे फुटपाथ, निष्पर्ण झाडे, उतरत्या छपराच्या आणि एकसारख्या दिसणाऱ्या इमारती, चौकाचौकात मोकळी सोडलेली जागा, तिथे केलेले लहान लहान बगिचे आणि मुख्य म्हणजे ठिकठिकाणी दिसणारे लेखकांचे आणि कवींचे पुतळे. ही शेवटची गोष्ट म्हणजे खास रशियन खासियत. आर्मेनिया 1921 पासून 1991 पर्यंत सोव्हिएट रशियाचा भाग होता. त्यामुळे गेल्या शंभर वर्षातले सगळे स्थापत्य हे रशियन वळणाचे आहे.
येरेवानला राहण्याची सोय एका मोठ्या दोन मजली घरात केलेली होती. तळमजल्यावर एक शोरूम आणि मालकीणीचे घर होते. पहिल्या मजल्यावरच्या दोन-तीन खोल्या आणि व्हरांडा तर दुसऱ्या मजल्यावरच्या तीन-चार खोल्या, मोठा हॉल आणि कडेचे किचन हे आम्हाला राहायला दिले होते. मागे मोठे अंगण होते. त्यात कपडे वाळत घालायची सोय होती. ही बाकीची व्यवस्था ठीक होती, पण टॉयलेट्स दोनच होती. सुरुवातीला एकच गट होता तेव्हा तितकीशी अडचण झाली नाही, पण सगळे लोक एकत्र झाले तेव्हा दाटीवाटी व्हायला लागली.
हा जो दुसरा गट येरेवानमध्ये दाखल झाला त्याला ताबडतोब पदयात्रेला नेले गेले नाही कारण इतक्या लोकांची व्यवस्था खेडेगावांमध्ये होणे कठीण होते. त्यामुळे आधीचा गट येरेवानमध्ये पोहोचल्यावर मग यांनी त्यांच्यात सामील व्हायचे असे ठरले. अपवाद फक्त आम्हा तीन माणसांचा केला. व्हिंसेट नावाचा एक स्वीस प्रवासी, लॉरेना नावाची एक अर्जेंटिनामधली मुलगी आणि मी. या पदयात्रेला मदत करणारी जी स्थानिक संस्था होती तिचा मायकेल नावाचा व्हॉलंटियर दुसऱ्या दिवशी आम्हाला आधीच्या गटाकडे घेऊन निघाला. ते त्यावेळी येरेवानपासून सुमारे सव्वाशे किलोमीटर दक्षिणेकडे होते. म्हणजे आम्हाला तेवढे अंतर तरी चालायला मिळणार होते. आर्मेनियाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे एक मुख्य हायवे जातो. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही दिशांना कॉकेशस पर्वताच्या रांगा आहेत. मात्र मधला भाग सखल आहे. येरेवान आणि इतर मोठी शहरे या मधल्या भागातच वसलेली आहेत. या रस्त्यावर खाजगी व्हॅन्स चालतात. तशा एका व्हॅनने आम्ही ते लिंजार म्हणून जे गाव होते तिकडे गेलो.
गाव लहानसे होते आणि रस्त्यापासून साधारण दोन किलोमीटर आतमध्ये होते. हा सगळा कॉकेशसचा डोंगराळ प्रदेश होता आणि हिवाळा संपत आला असला तरी भोवतालचे डोंगर अद्यापही बर्फाच्छादित होते. राहण्याची सोय तिथल्या शाळेत केली होती. ही शाळेची इमारत चांगली भव्य आणि दोन मजली होती. त्यातले तळमजल्यावरचे तीन मोठे वर्ग आणि स्वयंपाकघर हे पदयात्रींकरता मोकळे करून दिले होते. आम्ही पोचलो तेव्हा एक वाजला होता आणि तो दिवस शुक्रवारचा होता. मुलांना सकाळची शाळा करून बहुधा सोडून देण्यात आले होते.
पदयात्री अजून पोहोचायचे होते पण पुढे आलेली स्वयंपाकाची टीम जेवण तयार करत होती. पदयात्रेमध्ये काही वेळा स्थानिक पाहुणचार मिळत होता तरी मुख्य व्यवस्था आपला आपण स्वयंपाक करण्याची होती. सोबत एक मिनी-बस होती. तिच्यामधून पदयात्रींचे सगळे सामान यायचे तशीच गॅस-स्टोव्ह आणि भांडी, ताटं, पेले अशा गोष्टीही यायच्या. तीन जणांचा एक गट करून दोन दोन दिवसांच्या स्वयंपाकाची जबाबदारी त्यांना दिलेली असायची. त्यात सकाळचा नाश्ता आणि दोन जेवणे तर करायची असायचीच शिवाय मुक्काम हलला की मोठी भांडी घासून-पुसून, सगळे आवरून व पॅकींग करून पुढच्या मुक्कामाला जायची जिम्मेदारी असायची.
आम्ही पोहोचलो तेव्हा जेवण तयार झाले होते आणि स्थानिक संस्थेच्या दुसऱ्या एका लहान गाडीतून ते पदयात्रींपर्यंत पोहोचवायचे होते. त्यांचा आराबेग नावाचा दुसरा एक स्वयंसेवक यासाठी कायम बरोबर होता. त्यावेळी पदयात्री लिंजारपासून साधारण पाच-सहा किलोमीटर दूर होते. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ते रस्त्याच्या कडेला एका विश्रामथांब्यातच बसलेले होते. आपल्याकडे घाटात जसे पाण्याचे ठिकाण पाहून थांबे केलेले असतात तसेच ते ठिकाण होते. मागच्या डोंगरातून येणारे पाणी एक लहानशी टाकीमधून नळाने पुरवलेले होते आणि त्याभोवती थारोळे बांधलेले होते. झाडे होती पण बहुतेक निष्पर्ण झालेली. मात्र प्रवाशांना बसता यावे म्हणून मागच्या बाजूचे टेकाड पायऱ्यांनी बांधून काढलेले. तिथे एखादे भैरोबाचे किंवा मारुतीचे देऊळ नव्हते एवढाच फरक. जेवण म्हणजे भात, राजमा उसळ, कोबी-बटाटा रस्सा भाजी, ब्रेड आणि शेवटी सफरचंदे. तांदूळ, राजमा आणि भाज्या ह्या लोकांनी वाटेत विकत घेतल्या होत्या. सफरचंदे आधीच्या गावातल्या लोकांनी भेट दिलेली.
पोहोचल्यावर सगळ्या पदयात्रींशी परिचय झाला. हे सगळे लोक तीन महिने भारतात एकत्र चाललेले होते त्यामुळे त्यांचे संघटन चांगले घट्ट होते. मी भारतात चाललो नव्हतो त्यामुळे सगळ्यांशी नव्याने ओळखी करून घ्याव्या लागल्या. पदयात्रींमध्ये तीन तऱ्हेचे लोक होते. सगळ्यात पायाभूत संच म्हणजे एकता परिषदेचे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधले गावपातळीवरचे कार्यकर्ते. त्यात स्त्रिया होत्या, आदिवासी होते, स्थानिक संघटक होते तसेच राजगोपाल यांचे जुने सहकारीही होते. राजगोपाल यांचा दृष्टिकोन असा की ही जी भारतातली खेडूत माणसे आहेत ती मूलत: शांतीचा आणि अहिंसेचा संदेश घेऊन निघालेली आहेत; निव्वळ गांधीवादी कार्यकर्ते नव्हेत. त्यांच्या बरोबर जे इतर चालणारे आहेत ते त्यांना सहायभूत आहेत. त्यामुळे या लोकांना त्यांनी पदयात्रेचे अग्रदूत बनवले होते. त्यातली काही जुनी मंडळी माझ्या परिचयाची होती. दुसरा संच होता तो म्हणजे पदयात्रेसाठी एक वर्ष वचनबद्ध होऊन सामील होणारे लोक. यामध्ये मुख्यत: तरुण-तरुणी होते ज्यांना सोशल मिडिया, प्रसिद्धी, वेब-साइट चालवणे, छायाचित्रण, जनसंपर्क, दळणवळण इत्यादी जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या. तिसरा संच होता तो म्हणजे पदयात्रेत सामील झालेले विदेशी लोक. ही आंतरराष्ट्रीय पदयात्रा असल्याने असे काही लोक असणे आवश्यक होतेच. त्यात फ्रान्समधले चार-पाच जण, स्वित्झर्लंडमधले दोन, एक स्पॅनिश डॉक्टर, एक ऑस्ट्रेलियन आणि एक जपानी बौद्ध भिक्षु यांचा समावेश होता. शिवाय माझ्यासोबत आलेली अर्जेंटिनाची मुलगी. ही सगळी विदेशी मंडळीही एक वर्षाची ‘कमिटमेंट’ स्वीकारून आलेली आणि भारतात तीन-चार महिने चाललेली होती.
पहिल्या दोन संचांच्या खर्चाची जबाबदारी जय-जगत पदयात्रेने स्वीकारलेली होती तर विदेशी मंडळींनी आपला जाण्या-येण्याचा खर्च आणि राहण्या-जेवणापोटी रोजचे 20 युरो अशी वर्गणी देणे अपेक्षित होते. मी तसे पाहिले तर यातल्या कोणत्याच संचात बसत नव्हतो. मी माझ्या हवाई-प्रवासाचे तिकीट काढले आणि तिथल्या राहण्या-जेवण्याच्या खर्चाची रक्कम दिली. मात्र माझ्याकडून त्यांनी वर्गणीची अपेक्षा ठेवली नव्हती. अशा जागतिक पदयात्रेसाठी निधी गोळा करणे हा एक फारच मोठा उद्योग असतो. ती खटपट एका बाजूने चालूच होती आणि तिला फार यश आलेले नव्हते. तेव्हा आपणच आपला स्वयंपाक करणे अशा तऱ्हेचे काटकसरीचे उपाय अंमलात आणणे जरुरीचे होते.
जेवण आणि थोडासा विश्राम झाल्यावर पदयात्रा पुढे निघाली. आता मीही त्यांना सामील झालो. रस्ता डोंगरातला असला तरी चढणीचा नव्हता. पिवळेधमक ऊन पडलेले होते. मात्र भोवतालच्या डोंगरमाथ्यांवर अद्यापही बर्फ असल्याने हवा थंडगार होती. अंगात गरम कपडे असणे आवश्यकच होते. ही मंडळी सकाळी लवकर निघालेली होती आणि त्यांचे पंधरा-सोळा किलोमीटर चालणे झालेले होते. त्यातला काही भाग चढाचा लागलेला होता. खरं तर सुरुवातीच्या काही दिवसांत त्यांचा मार्ग केवळ चढणीचाच होता आणि वाटेत थंडगार, बोचऱ्या वाऱ्यांचा सामना करायला लागला होता. कॉकेशस पर्वतरांगांचे दोन भाग पडतात. उत्तरेला जॉर्जियात कॅस्पियन समुद्र आणि काळा समुद्र यांच्यामध्ये ज्या रांगा आहेत त्याला मोठा कॉकेशस म्हणतात आणि तिथल्या सर्वोच्च शिखराची उंची 18,500 फूट आहे. आर्मेनियामध्ये आहे तो लहान कॉकेशस. आम्ही जिथे चालत होतो तो भाग समुद्रसपाटीपासून साधारण चार ते पाच हजार फुटांवरचा असावा मात्र तो हिमालयाच्याही उत्तरेकडचा असल्याने हवा बोचरी आणि थंड होती.
शाळेत येऊन सगळ्यांनी पथाऱ्या पसरल्या. तोवर चार वाजले होते. ही मंडळी भरपूर चालून आल्याने त्यांनी अंग पसरणे साहजिकच होते. विदेशातल्या पदयात्रेसाठी एक गोष्ट अत्यावश्यक होती ती म्हणजे स्लिपींग बॅग. शाळेचे वर्ग मिळाले तरी ते निव्वळ रिकामे होते. तिथे ना पलंग, ना बंकर, ना गाद्या. त्यामुळे प्रत्येकाने स्लिपींग बॅग आणणे अनिवार्य होते. शिवाय खाली घालायला एक चटई (योगासने मॅट). बाहेरचे तापमान शून्याच्याही खाली जात असल्याने ही काळजी आवश्यकच होती. पदयात्रा भारतात होती तेव्हा हा प्रश्न आला नव्हता. कारण आपल्याकडे खेडेगावात जाजम, सतरंज्या, घोंगड्या आणि रजया पुष्कळ मिळतात आणि बहुतेकवेळा मोकळ्या हवेत झोपता येते.
राहण्यासाठी शाळांची सुविधा मिळाली याचे कारण आर्मेनियाच्या सरकारने केलेले हार्दिक सहकार्य. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान (जन्म- 1975) हे गांधीविचाराने भारलेले तर होतेच शिवाय राजगोपाल यांचे चाहतेही होते. आर्मेनियामध्ये 2018 मध्ये जी अहिंसक क्रांती झाली त्यानंतर ते पंतप्रधान झाले (तिला ‘व्हेल्व्हेट रिव्होल्यूशन’ - मखमली क्रांती असे म्हणतात). ही क्रांती होण्यापूर्वी लोकजागृती करण्याकरता पशिनयान यांनी सबंध देशभर पदयात्रा काढल्या होत्या. आर्मेनियातील ही क्रांती प्रामुख्याने स्वयंसेवी संस्थांनी घडवली होती आणि त्यामध्ये पत्रकार, विद्यार्थी आणि युवकांचा पुढाकार होता. ज्या संस्था-संघटना यात अग्रणी होत्या त्यांच्याशी राजगोपाल यांचा आधीपासून परिचय होता आणि त्यांच्यासाठी काही प्रशिक्षणवर्गही त्यांनी घेतलेले होते. या सगळ्यांचे सहकार्य मिळणार असल्यानेच पदयात्रेचा मार्ग आर्मेनियातून निश्चित करण्यात आला. आर्सन खरतयान आणि दावित पेट्रोश्यान हे पंतप्रधानांच्या अगदी जवळचे सहकारी हेच या पदयात्रेचे स्थानिक संयोजक होते (आर्मेनियामधली बहुतेक आडनावे ही ‘यान’ ह्या संबोधनाने संपतात). त्यांच्या प्रयत्नाने या गावांमधल्या शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था होत होती
आर्मेनिया हा देश जरी पश्चिम महाराष्ट्राएवढा असला तरी त्याची लोकसंख्या आहे फक्त 30 लाख. त्यातीलही सुमारे 10 लाख एकट्या येरेवान शहरात राहतात. मग बाकीची शहरे. बहुसंख्य माणसे अंतर्भाग सोडून शहरांकडे गेलेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लोकसंख्येची घनता अगदी विरळ आहे. याचे प्रत्यंतर लिंजार गावामध्ये येत होते. रशियन काळात शैक्षणिक सोयीसुविधा बांधण्यावर मोठा भर असल्याने शाळा अगदी भव्य बांधलेली असली तरी या शाळेत पहिली ते नववी पर्यंतचे विद्यार्थी होते फक्त 25 तर शिक्षक होते 14 आणि शिक्षकेतर कर्मचारी 9! मूळची इमारत दणकट होती पण आता देखरेख-दुरुस्ती कठीण जात होती. शाळा मोठी होती, पण मुख्य अडचण शौचालयाची होती. मुख्य इमारतीपासून थोडेसे दूर एक लहानसे शौचालय होते. आपल्याकडे चराचे असते तसे. खालची जमीन सिमेंट-काँक्रिटची होती पण तिला केवळ एक चौकोनी छिद्र केलेले. खाली आठ-दहा फूट खड्डा. तो एका बाजूने उघडा. उत्तरेकडच्या डोंगराळ भागात बहुधा शौचालयांची अशीच पद्धत असते. मी कैलास यात्रेला गेलो होतो तेव्हा तिबेटमध्ये अशीच शौचालये होती. अफगणिस्तानमध्येही अशीच होती आणि आता कॉकेशसमध्येही तशीच. तापमान इतके खाली जाते तेव्हा मैला कुजत नाही बहुतेक. काही ठिकाणी त्यावर चुनखडी किंवा माती टाकतात. प्रत्येक हवामानात जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तयार होतात हेच खरे.
संध्याकाळी मी एकटाच कडेच्या रस्त्याने फिरायला गेलो. आपल्याकडच्या डोंगराळ तालुक्यात जशी टेकडीच्या उतारावर घरे असतात तशी घरे होती. एकापासून एक लांब. उतरती पत्र्याची छपरे. बहुतेक घरांभोवती पेंढा रचून ठेवलेला होता. बिन वाशिंडाची दणकट काळी गुरे, अंगावर भरपूर केस असलेले कुत्रे, क्वचित कुठे जुने ट्रॅक्टर, एखादी मोडकी व्हॅन; कुठल्याही शेतकरी गावासारखे दृश्य होते. दुसऱ्या बाजूला विस्तृत टेकड्या पसरल्या होत्या. त्या सगळ्या बर्फाच्छादित होत्या. रस्ता वळणावळणाने फिरत जाऊन घाटमाथ्यावर पोहोचला. तिथून दुसऱ्या गावाला जाणाऱ्या रस्त्याची पाटी लावलेली होती. मात्र त्या मातीच्या रस्त्यावर सर्वत्र बर्फ पसरले होते.
रात्री शाळेचे हेडमास्तर आणि त्यांची बायको आम्हाला भेटायला आली. सोबत काही शिक्षक आणि कर्मचारीही होते. तिने घरी बनवलेले चीज आणि पिशवी भरून सफरचंदे भेट म्हणून आणली होती. त्यांच्याशी बोलताना समजले की या भागात मुख्यत: सफरचंदांच्या बागा होत्या. मधल्या सखल भागात बार्ली लावत होते. पशूपालन हा जोडधंदा होता. स्त्रियांमध्ये विणकाम करायचीही परंपरा होती. हेडमास्तरांच्या बायकोने स्वत: विणलेले रुमाल दाखवले. ते लोकरीचे होते पण मधून मधून रेशमासारखा धागा होता. तिने त्यावर आर्मेनियन अंकलिपी विणली होती. ती कलाकुसर फारच उच्च दर्जाची होती. हेडमास्तरांनी सोबत स्थानिक व्होडका आणली होती. त्यांचा मान राखायचा म्हणून तिचा स्वाद आम्ही काही जणांनी घेतला. त्या सगळ्यांची इच्छा आम्ही रात्रभर त्यांच्यासोबत त्या व्होडकाचा आस्वाद घ्यावा अशी होती. सोबत तोंडी लावायला चीज हवे तितके होते. पण पूर्वी रशियात ऐकलेला उपदेश लक्षात होता. रशियन माणसाबरोबर कधीही व्होडका प्यायला बसायचे नाही. तो उपदेश आर्मेनियामध्येही ग्राह्य होता. झोपायला जाताना मनात आले की आपल्याकडच्या हेडमास्तरांनी शाळेत येऊन असे केले तर? पुलंचा विनोद आठवला - त्यांची द्राक्ष संस्कृती, आपली रुद्राक्ष संस्कृती!
रात्री एकदा उठलो होतो. बाहेरचे दृश्य अप्रतिम देखणे होते. होळी पौर्णिमा दोन दिवसांनी होती. चंद्र वरती आला होता आणि समोरच्या हिमाच्छादित टेकड्यांवर चांदण्याचा रस पसरल्यासारखे वाटत होते. आकाश पूर्णपणे निरभ्र होते आणि त्या हवेत प्रदूषण नसल्याने चंद्र अत्यंत रेखीव दिसत होता. काही तारे लुकलुकत होते. तेही अतिशय रेखीव. असे आकाश आपल्याकडे कधीही दिसत नाही. मात्र थंडीही गारठवणारी होती. अंगात जॅकेट होते तरी फार वेळ उभे राहवेना.
- मिलिंद बोकील
(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)
वाचा 'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचा भाग 1-
जय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल
Tags:Load More Tags
Add Comment