जय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल

'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचा भाग 1

फोटो सौजन्य: www.jaijagat2020.org

2 ऑक्टोबर 2019 रोजी  गांधींजींच्या 150व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखाली  'जय जगत 2020 - जागतिक शांती मार्च' या पदयात्रेला दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीस्थळापासून- राजघाटपासून- सुरुवात झाली. तीन महिने भारतात तर उरलेले नऊ महिने विदेशात, अशी वर्षभर चालणारी ही 14 हजार किलोमीटरची पदयात्रा 10 देशांतून प्रवास करणार होती. या यात्रेदरम्यान जगभर अहिंसा, शिक्षण व सामाजिक न्यायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण व कार्यक्रम होणार होते.पदयात्रेचा मूळचा मार्ग हा राजघाट ते वाघा-बॉर्डर; तिथून पाकिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, नंतर बाल्कन राष्ट्रे, मग इटली आणि शेवटी स्वित्झर्लंड असा होता. या पदयात्रेची सांगता 2 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय असलेल्या जिनिव्हा येथे होणार होती.

मराठीतील प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील या पदयात्रेत सहभागी झाले होते, त्या अनुभवावरील लेख समकालीन प्रकाशनाकडून लवकरच येणाऱ्या 'क्षितिजापारच्या संस्कृती' या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. तो संपूर्ण लेख क्रमशः आठ भागांत प्रसिद्ध करीत आहोत.
- संपादक

अलिकडच्या काळातील एक महत्त्वाचे गांधीवादी कार्यकर्ते म्हणजे पी. व्ही. राजगोपाल. हे मूळचे मल्याळी पण त्यांनी आपली सगळी हयात घालवली ती मध्य प्रदेशात. गांधीवादी असले तरी गांधींच्या इतर अनुयायांप्रमाणे एखादा आश्रम काढून ते थांबले नाहीत तर मध्य प्रदेशात त्यांनी ‘एकता परिषद’ नावाचे एक संघटन स्थापले आणि तिच्यामार्फत मुख्यत: आदिवासी आणि ग्रामीण शेतमजुरांना जमिनीचे मालकीहक्क मिळावेत म्हणून लढे दिले. काही वर्षे ते ‘गांधी पीस फाउंडेशन’चेही उपाध्यक्ष होते. लोकजागृती करण्याची त्यांची एक आवडती पद्धत म्हणजे पदयात्रा काढणे. 

आमची आणि त्यांची मैत्री जवळ जवळ तीस वर्षांपासूनची. त्यांच्या काही पदयात्रांमध्ये मी पूर्वी सहभागी झालेलो होतो. पहिली होती ती मध्य प्रदेशात. ‘जल, जंगल और जमीन - ये हो जनता के अधीन’ असा तिचा नारा होता. त्यामध्ये मी बैगा आदिवासींची वस्ती असलेल्या मंडला जिल्ह्यात प्रामुख्याने चाललो. नंतरची एक होती ती बिहारमध्ये. तीसुद्धा जमिनीच्या प्रश्नावर. त्यात मी गया जिल्ह्यात चाललो. नंतर 2007 मध्ये त्यांनी ग्वाल्हेर ते दिल्ली असा 25 हजार आदिवासी आणि शेतमजुरांना घेऊन एक लाँग-मार्च काढला होता. त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी एक लाख लोकांना घेऊन दिल्लीकडे कूच केले होते. त्या दोन पदयात्रांमध्ये मी जाऊ शकलो नव्हतो. मात्र त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या त्यावेळच्या काँग्रेस सरकारने मान्य केल्या होत्या. एकता परिषद आणि इतर संघटनांच्या मागण्यांना यश येऊनच 2006 साली वन हक्क कायदा करण्यात आला आणि देशातल्या हजारो आदिवासींना पूर्वापार कसत असलेल्या जमिनींचे मालकी हक्क मिळाले.

राजगोपाल हे एक नामांकित राजकीय कार्यकर्ते असले तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व या प्रतिमेला छेद देणारे आहे. मूर्ती लहानखुरी आणि चेहेरा कायम हसतमुख. ज्याला ‘सेन्स ऑफ ह्युमर’ म्हणतात तो अतिशय उत्तम. लहान लहान कारणांनी चेहेऱ्यावर कायम हसू फुटत असतं. अत्यंत गंभीर आणि बिकट प्रश्नांवर काम करत असतानाही या माणसाच्या चेहऱ्यावर कधी आठी नसते की चिंता नसते. त्यामुळे त्यांचा सहवास फार आल्हाददायक असतो. दुसरी गोष्ट म्हणजे मल्याळी असल्याने असेल कदाचित पण केस अद्याप काळे आहेत आणि चिरतारुण्याचे जणु काही वरदान आहे.

राजगोपाल आता 72 वर्षांचे असले तरी दिसतात चाळीशीतले. अनेक वर्षे ते ब्रह्मचारी होते पण साठीत त्यांनी जिल कार-हॅरिस या कॅनेडियन कार्यकर्तीशी लग्न केले. जिल आमची दुसऱ्या एका कारणाने मैत्रीण. मी ज्या ‘लीड’ फेलोशिपचा सदस्य होतो त्या लीड-इंडियाची ती काही वर्षे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होती. ती मुळात भारतात आली होती ती एक वर्ष एका यू.एन.डी.पी. प्रकल्पावर काम करण्यासाठी, पण मग भारताच्या - विशेषत: भारतातील स्वयंसेवी चळवळीच्या - प्रेमात पडून गेली 35 वर्षे इथेच राहिलेली आहे. जिलसुद्धा आता 64 वर्षांची आहे पण दोघेही नवरा-बायको चालायला वाघ आहेत. दिवसाकाठी पंचवीस-तीस किलोमीटर चालणे त्यांना काहीच वाटत नाही.  

पदयात्रांच्या या अनुभवांपासून स्फूर्ती घेऊन राजगोपाल यांनी गांधींजींच्या 150व्या जयंतीनिमित्त जागतिक पातळीवर अहिंसेचा संदेश देण्यासाठी 2019 मध्ये ‘जय जगत’ या पदयात्रेची घोषणा केली. तसे हे स्वप्न ते आधीचे अनेक वर्षे बघत होते आणि तिची तयारी 2012 च्या पदयात्रेपासून सुरू झाली होती. दिल्लीतील महात्मा गांधींच्या राजघाट या समाधीपासून 2 ऑक्टोबर 2019 रोजी निघायचे आणि पायी मजल दरमजल करीत 2 ऑक्टोबर 2020 रोजी जिनिव्हामध्ये तिचा समारोप करायचा अशी कल्पना होती. पदयात्रेचा मूळचा मार्ग हा राजघाट ते वाघा-बॉर्डर; तिथून पाकिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, नंतर बाल्कन राष्ट्रे, मग इटली आणि शेवटी स्वित्झर्लंड असा होता. मात्र पाकिस्तानने या यात्रेला प्रवेश देण्यास साफ नकार दिला. मग मार्ग बदलून अहमदाबादहून इराणमधल्या शिराझ बंदरात जायचे आणि तिथून उत्तरेकडे चालत आर्मेनियामध्ये जायचे असे ठरवण्यात आले. 

मधल्या काळात म्हणजे 2 ऑक्टोबर 2019 पासून तीन महिने भारतातच पदयात्रा करायचे असे ठरले. तशी ही यात्रा निघाली. त्यामध्ये कायम चालणारे सुमारे चाळीस देशी आणि दहा-बारा विदेशी पदयात्री होते. राजगोपाल आणि जिल अर्थातच त्यांच्यासोबत होते. दिल्ली ते चंबळ प्रदेशातील मुरैना इथपर्यंत बसने प्रवास झाला. मुरैनापासून मात्र चालत निघून भोपाळ-नागपूर मार्गे विंध्य-सातपुडा ओलांडून 30 जानेवारी रोजी वर्धा इथे ही यात्रा आली. भारतातल्या प्रवासाचा तिथे समारोप झाला.

फेब्रुवारीत इराणला जायचे होते. मी त्या टप्प्यावर सहभागी होणार होतो. मात्र तेव्हाच ट्रंप महाशयांनी इराणशी युद्ध सुरू केले आणि इराणमध्ये जाणे अशक्य होऊन बसले. चालणे तर दूरची गोष्ट. मग पुढचा टप्पा म्हणून पदयात्रींचा एक गट 16 फेब्रुवारी 2020 रोजी जिलच्या नेतृत्त्वाखाली आर्मेनियाला गेला आणि आर्मेनियाच्या दक्षिण टोकाला जाऊन त्यांनी उत्तरेकडे पदयात्रेला सुरुवात केली. पदयात्रींचा दुसरा गट 5 मार्चला आर्मेनियाला जाणार होता. राजगोपाल त्या गटात होते. मीही त्याच गटामध्ये सामील व्हायचे ठरवले आणि त्याप्रमाणे आर्मेनियाची राजधानी येरेवानला पोहोचलो. 

- मिलिंद बोकील
(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत  मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)

वाचा 'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचा भाग 2- 
बर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा 

Tags:Load More Tags

Comments:

जवाहर नागोरी

सर्व लेख खूप छान आहेत. खूप आवडले. आजच सापडले फेसबूकवर. अफाट माहिती भरली आहे.

जयप्रकाश सावंत

चांगली सुरुवात. पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे.

Add Comment

संबंधित लेख