कुमारवयीन नायकांच्या प्रथमपुरुषी कथनांची जी काही पुस्तके आपण वेगवेगळ्या वयात वाचलेली असतील त्यातल्या अनेक पुस्तकांशी या पुस्तकाचे धागे जोडले जाऊ शकतात, परंतु तरीही हे पुस्तक स्वतंत्र नक्की आहे. वैयक्तिक कथनाच्या निमित्ताने ते सामाजिक होत नाही, परंतु प्रत्येकाला आपलीच गोष्ट वाटावी असे 'सार्वजनिक' नक्की आहे. हे पुस्तक त्या काळाचे समग्र चित्र रंगवत नाही किंवा त्यावर भाष्य करत नाही, पण अनुभवविश्वाच्या दृष्टीने ते काळाचे प्रतिनिधी नक्की होते.
आज, म्हणजे 2025 मध्ये, वयाच्या चाळिशीत असलेल्या मराठी वाचकांच्या पिढीला कुमारवयाचे पात्र केंद्रस्थानी असलेले आणि ‘कमिंग ऑफ एज’ म्हणजेच ‘मोठे होणे, घडणे’ ही प्रक्रिया सांगणारे आत्मकथनाचे साहित्यप्रकार चांगलेच परिचित आहेत. मग ते साने गुरुजींचे 'श्यामची आई', श्याम किंवा धडपडणारा श्याम असो, रवींद्रनाथ टागोरांचे पु. ल. देशपांडेंनी अनुवादित केलेले 'पोरवय' असो, ना. धों. ताम्हणकरांचा गोट्या असो, भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे असो, प्रकाश नारायण संत यांच्या लंपनची वनवास-शारदा संगीत-पंखा-झुंबर ही पुस्तकांची मालिका असो किंवा मिलिंद बोकीलांची शाळा असो. या आणि अशा अनेक कथा-कादंबऱ्यांतील कुमारवयीन नायक या पिढीत लोकप्रिय आहेत.
स्वतः या पिढीचे असलेल्या आणि त्यानंतरच्याही पिढीतल्या लेखकांनी आपल्या इतर वैविध्यपूर्ण लेखनाशिवाय या पद्धतीचे लेखन आवर्जून केलेले आहे. एकूण जगभरातल्या साहित्यात अशा प्रकारचे लेखन विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. आणि मुख्य म्हणजे ते अत्यंत लोकप्रिय आहे. राजकारण, इतिहास, समाजकारण, तत्त्वज्ञान अशा अत्यंत गंभीर विषयांवर सैद्धांतिक चर्चा करणाऱ्या लेखकांनाही या प्रकारच्या लेखनाचा मोह आवरलेला नाही. अशा प्रकारच्या लेखनातून ते त्यांच्या स्वतःच्या आठवणींना तर उजाळा देत असतातच शिवाय त्या निमित्ताने त्या त्या वेळच्या त्यांच्या परिघातल्या समाजावर सहजपणे मार्मिक भाष्य करून जातात. वाचकांच्या दृष्टीने या प्रथितयश लेखकांच्या वैयक्तिक आयुष्याकडे बघण्याचा तो एक झरोकाही असतो.
रोहन प्रकाशनाकडून नुकतेच आलेले, साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त लेखक प्रणव सखदेव यांचे ‘के कनेक्शन्स’ हे पुस्तक हे याच प्रकारच्या साहित्य मालिकेतले एक उठावदार नवे प्रकरण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. खुद्द लेखकानेच ‘सफरनाम्यात’ (म्हणजेच या पुस्तकाच्या प्रस्तावनेत) ज्यांचे अशा प्रकारचे लेखन आपल्याला आवडले, अशा काही पूर्वसूरींचा निर्देश केला आहे, त्यात गणेश मतकरींचे ‘खिडक्या अर्ध्या उघड्या’, पंकज भोसलेंचे ‘विश्वामित्र सिंड्रोम’, हृषीकेश गुप्तेंचे ‘गोठण्यातल्या गोष्टी’, निखिलेश चित्रेंचे ‘गॉगल लावलेला घोडा’, प्रसाद कुमठेकरांचे ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’, अनिल साबळेंचे ‘पिवळा पिवळा पाचोळा’ यांचा समावेश आहे.
‘सरतं लहानपण आणि न आलेलं मोठेपण यांच्या मधला अडनिड्या कुमारवयाचा अवकाश आपल्याला कायम भुरळ घालत आलेला आहे आणि त्याविषयी लिहिताना आपण जाणीवपूर्वक कथा आणि कादंबरी यांच्या मधला अवकाश व्यापणारा ‘मोझॅक नॉव्हेल’ हा रूपबंध निवडला आहे’, असेही लेखक सांगतात. एकाच व्यक्तीच्या आयुष्यातल्या प्रसंगांशी निगडित असलेला, परंतु सलग आत्मचरित्र किंवा आत्मकथन नसलेला; एकमेकींशी जोडलेल्या परंतु तरीही स्वतंत्र असलेल्या कथांचा जणू काही कोलाज असे ‘मोझॅक नॉव्हेल’चे स्वरूप असते. ‘के कनेक्शन्स’ वाचताना या रूपबंधाची लेखकाने केलेली निवड रास्तच आहे हे लक्षात येते.
के कनेक्शन्समध्ये बारा कथा आहेत. त्यातल्या पाच वेगवेगळ्या नियतकालिकांतून पूर्वप्रसिद्ध झालेल्या होत्या आणि त्यानंतर पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने लेखकाने इतर कथा लिहिल्या आहेत. हे पुस्तक कसे आकाराला आले त्याची प्रक्रिया प्रस्तावनेत हृद्य पद्धतीने त्यांनी मांडली आहे. ती मुळातून वाचण्यातच मजा आहे.
पुस्तकाच्या शीर्षकातला ‘के’ हे कुमारचे म्हणजे नायकाच्या नावाचे आद्याक्षर आणि कनेक्शन्स म्हणजे त्या कुमारचे वेगवेगळे नातेसंबंध, कुमारशी संबंधित गोष्टी असा अर्थ अभिप्रेत आहे. पुस्तकातल्या प्रकरणांची किंवा कथांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यात कुमारशी संबंध असलेल्या आणि केवळ शब्दार्थ पाहिले तर एकमेकींशी काहीही संबंध नसलेल्या दोन-तीन गोष्टींची सांगड उभयान्वयी शब्द किंवा विरामचिन्हांनी घातलेली दिसते. उदाहरणार्थ ‘जगबुडी आणि पतंगीचा ठिपका’, ‘एमटीबी पुराण, अर्थात दिन्या गेला दूर’ इत्यादी. पुस्तकाचे शीर्षक हे प्रकरणांच्या शीर्षकांतूनही वारंवार समोर येत राहते. पुस्तकाचे संपादन अनुजा जगताप यांनी केलेले आहे तर मुखपृष्ठ आणि रेखाचित्रे अन्वर हुसेन यांची आहेत. मुखपृष्ठावरील चित्र आणि आतली रेखाचित्रे यांतूनसुद्धा नायकाचे विचारतरंग आणि त्याच्या विश्वातल्या त्याच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी यांचे ‘कनेक्शन’ राखले गेले आहे. 186 पानांच्या या पुस्तकाची मांडणी आणि छपाई उत्कृष्ट आहे.
कुमारवयातल्या मुलांचे वेगवेगळे नातेसंबंध म्हणजे आई-वडील, भावंडे, आजी-आजोबा, शेजारी, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, मित्रांचे आई-वडील, वयाने मोठे मित्र, आवडणाऱ्या मुली हे सर्व यात हजेरी लावतात. सायकल, पतंग, क्रिकेट यांसारखे जिव्हाळ्याचे खेळ, नेहमीच्या वावराच्या परिसरातल्या दुकानांमध्ये आणि बाजारांमध्ये भेटणारी माणसे, आवडता खाऊ, वयात येतानाचे पौगांडावस्थेतले अवघडलेपण अशा सर्व गोष्टींना ह्या कथा स्पर्श करतात. नायकाचे म्हणजेच स्वतः लेखकाचे कुमारवयातले विचारविश्व, अनुभवविश्व आणि भावविश्व हे तिन्ही वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रमाणात वाचकांना उलगडून दाखवतात.
मुलांची दुःखे, हळहळ, अपराधीपणाची भावना, समजू नये असे काहीतरी अटळपणे समजल्याची भीती आणि असुरक्षितता अशा काही अनवट भावनांकडेही लेखक आपल्याला घेऊन जातो. ‘आईस्क्रीम आण्णा आणि मिस युनिव्हर्स भाभी’, ‘बोरकूट आणि नदीकाठचा मुलगा’, ‘एमटीबी पुराण, अर्थात दिल्या गेला दूर’ या तीन कथांमध्ये अशा सहजपणे वर्णन न करता येण्याजोग्या तरल भावनांचा आविष्कार लेखकाने सहजरीत्या केला आहे.
एकूण सर्वच कथांमध्ये लेखकाची शैली प्रांजळ आहे, मात्र त्याचबरोबर दुसऱ्याला काही सांगताना स्वतःकडे महत्त्व खेचून घेण्याचा नायकाचा वयसुलभ स्वभावदोष थोडासा लेखक म्हणून लेखनातही डोकावल्यासारखा वाटतो. काही ठिकाणी कथानायक खूपच प्रौढपणे विचार करतो. ते थोडेसे अपेक्षितही आहे, कारण मुळात या वयात जाणिवेने ‘मोठं होण्याचे’ असे प्रसंग येतात. मात्र आपला हा विचार मोठ्या माणसासारखा आहे याची जाणीव जेव्हा कुमार बोलून दाखवतो, तेव्हा त्याचे ते प्रौढपण कोवळे राहत नाही. आपल्या विचार आणि कृतीची इतकी स्पष्ट जाणीव असणं हे इतर संदर्भांच्या तुलनेत ‘फार फेच्ड’ म्हणजेच ‘अशक्य कोटीतले’ भासते.
उदाहरणार्थ, बाजारातल्या भाजीवालीचा नवरा गेल्यानंतर तिच्याकडून भाजी घेताना तिच्याशी कुमारने मारलेल्या गप्पा, ह्या गप्पा म्हणून नव्हे, तर एक खूप प्रौढ संवाद म्हणून आपल्यासमोर येतात आणि ‘मी जरा मोठ्या माणसांसारखंच बोललो’ ही जाणीवही येते. किंवा आपल्या शेजारच्या काकांनी रेल्वेखाली उडी मारून जीव दिला हे समजल्यावर ‘त्याच्याआधी पाचच मिनिटं आपण त्यांना रेल्वे स्टेशनवर विमनस्क अवस्थेत पाहिलं होतं आणि त्यांनी आपल्या हाकेला ओ दिली नव्हती’ ही आठवण स्वतःपर्यंतच ठेवण्याचा खूप प्रौढ विचार कुमार त्यावेळेस करतो. किंवा ‘आपण आपल्या मित्राची नवी महागडी सायकल असूयेपोटी चोरली आणि ती आपल्या घरून खरंच चोरीला गेली याची घरातल्या मोठ्या माणसांना खबरच कशी लागली नाही, आपण कसं कोणाला हे सांगितलं नाही आणि ज्याची सायकल होती त्यानेही सांगितलं नाही’, याचे समर्थन तो जे समर्थन करतो, ते थोडसे चुकीचे, किंबहुना, बनचुकेपणाचे वाटते. हा सगळाच अडनिड्या वयातला अडनिडा प्रकार असल्यामुळे या गोष्टी खपून तर जातात पण फारश्या रुचत मात्र नाहीत, असे अडनिडे काहीतरी त्याविषयी वाटत राहते.
कुमारवयीन नायकांच्या प्रथमपुरुषी कथनांची जी काही पुस्तके आपण वेगवेगळ्या वयात वाचलेली असतील त्यातल्या अनेक पुस्तकांशी या पुस्तकाचे धागे जोडले जाऊ शकतात, परंतु तरीही हे पुस्तक स्वतंत्र नक्की आहे. वैयक्तिक कथनाच्या निमित्ताने ते सामाजिक होत नाही, परंतु प्रत्येकाला आपलीच गोष्ट वाटावी असे 'सार्वजनिक' नक्की आहे. हे पुस्तक त्या काळाचे समग्र चित्र रंगवत नाही किंवा त्यावर भाष्य करत नाही, पण अनुभवविश्वाच्या दृष्टीने ते काळाचे प्रतिनिधी नक्की होते आणि म्हणूनच हे पुस्तक निश्चितपणे वाचनीय आहे.
के कनेक्शन्स
लेखक : प्रणव सखदेव
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : 186
किंमत : 275 रु.
- ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com
Tags: pranav sakhdev coming off age growing up adolescence moziac प्रणव सखदेव रोहण प्रकाशन नावे पुस्तक के कनेक्शन्स रोहन प्रकाशन पौगंडावस्था कुमार कुमार साहित्य Load More Tags
Add Comment