एका बाजूला अनिल देशमुख आपण स्वतः निर्दोष आहोत हे सांगतात. तर दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा कशी तटस्थ नव्हे तर भ्रष्ट आहे, सरकारी वर्दीतील अधिकारीच कसे गुन्हेगार आहेत हेही दाखवण्याचा रोखठोक प्रयत्न करतात. या पुस्तकात संदर्भसूची दिलेली आहे, ती जर पाहिली तर देशमुखांनी आपल्या प्रत्येक विधानाला संदर्भ दिला आहे. तेव्हा ते सारेच कपोलकल्पित, एकांगी म्हणता येणार नाही. पण स्वतः निर्दोष असल्याचे सांगण्याच्या नादात इतर बाजू चुकीच्या पद्धतीने मांडल्या जाऊ शकतात हेही नाकारता येऊ शकत नाही.
माझे ज्येष्ठ स्नेही रेवणसिद्ध लामतुरे यांनी मला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुस्तक वाचा असे सुचवले. मी लगेच साधना मीडिया सेंटरमधून पुस्तक मागवून वाचले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुरुवातीला अनिल देशमुख गृहमंत्री होते. काही दिवसातच ‘ते दरमहा शंभर कोटी रुपये लाच वसूल करून द्यायला लावतात’ अशी बातमी झळकली. त्या प्रकरणात त्यांना पदत्याग करावा लागला. त्यांच्यावर आरोप करणारा सचिन वाझे हा सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी असला तरी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यामागचे सूत्रधार होते हे या पुस्तकातून स्पष्ट होते. अनिल देशमुख यांच्यावर हा आरोप होणे आणि त्यांची सर्वोच्च न्यायालयातून जामिनावर मुक्तता होणे एवढाच घटनाक्रम या पुस्तकात घेतलेला आहे. आत्मकथन असले तरी आत्मचरित्र नाही.
हे पुस्तक वाचताना मला न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या ‘हे मला सांगायलाच हवे’ या पुस्तकाची आठवण झाली. ते पुस्तक म्हणजे एका घटनेमागचे धागेदोरे सांगणारे आत्मकथन होते. आपल्या आयुष्यात आलेला एखादा घटनाक्रम, त्याच्या मागची कारणे, त्याचे परिणाम, धागेदोरे सांगून आयुष्याची मांडणी करणे ही आत्मकथन लिहिण्याची नवीन पद्धत आली आहे. अनिल देशमुख यांच्यासारख्या राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्यांनी असे काही लिहावे याचे सुरुवातीला आश्चर्य वाटले. पुस्तकाचे नावसुद्धा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर : राजकीय षड्यंत्र उलथून टाकणाऱ्या गृहमंत्र्याची आत्मकथा’ असे लांबलचक आहे. पण त्यांची भाषा ओघवती आहे. त्यांनी अतिशय शांत बुद्धीने लिहिले आहे. त्यांच्या लिखाणात आततायीपणा दिसत नाही. स्वतःचे समर्थन करण्यासाठी, आपण कसे निष्पाप आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी हे लिहिले आहे असे आपण समजून घेतले, तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला कायदेशीर आधार प्राप्त होतो. त्यांनी लिहिलेले सगळेच खोटे असेल का, सगळेच खरे असेल का? हा प्रश्न आहेच, तरीही त्यात व्यक्त केलेला घटनाक्रम आणि बारीक सारीक तपशील हे अचंबित करणारे आहेत. त्यासाठी हे पुस्तक वाचनीय ठरते.
25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकाने भरलेली स्कार्पियो गाडी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळली, तिथे पुस्तक सुरू होते. ती कोणी ठेवली? कशी ठेवली? याची पाळेमुळे शोधताना सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्याशी देशमुखांचा संबंध कसा आला, त्या दोघांनी आपणास गृहमंत्र्यांच्या नावाने मुंबई शहरातून दरमहा 100 कोटी रुपये अनधिकृतपणे जमा करावे लागतात, असा चुकीचा आरोप कसा केला, या आरोपावरून राजकीय गदारोळ कसा माजला. मविआ सरकारने त्याची दखल कशी घेतली, देशमुखांनी राजकीय दबावामुळे नव्हे तर नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रीपद कसे सोडले, हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात देशमुखांनी केला आहे.
त्यांनी काय सांगितले? त्यात किती सत्यता आहे? याहीपेक्षा महत्त्वाचा ठरतो तो घटनाक्रम. याच सुमारास तया स्कॉर्पिओ गाडीच्या तथाकथित मालकाचा म्हणजेच या सर्व घटनेच्या साक्षीदाराचा त्याचा खून पडतो. त्याच्या खुनाचा आरोप सचिन वाझेवर होतो. अनिल देशमुख यांच्यावर लाच गोळा करायला सांगतात या कारणावरून गुन्हेगारीचा आरोप नोंदवला जातो. त्याची चौकशी ईडी आणि सीबीआयमार्फत केली जाते. अनिल देशमुख चौकशीला सामोरे जातात. राज्य सरकारकडून न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाची स्थापना केली जाते. या आयोगासमोर साक्ष देताना सचिन वाझे आणि परमबीर सिंह हे आमच्याकडे अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कसलेही पुरावे नाहीत, असे सांगतात. त्याचा अहवाल सरकारला सादर होतो. दुसरीकडे न्यायालयात केंद्र सरकार अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची साखळी सिद्ध करू शकत नाही. कारण देशमुखांनी माझ्याकडे लाच मागितली असे सांगणारा कोणीही साक्षीदार सापडत नाही. शेवटी त्यांची न्यायालयातून जामिनावर मुक्तता होते. प्रथम ईडीच्या आणि नंतर सीबीआयच्या प्रकरणातही जामीन दिला जातो. उच्च न्यायालयाने दिलेल्या या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाते आणि अखेर त्यांची सर्वोच्च न्यायालयातून जामिनावर मुक्तता होते. हा कालखंड फेब्रुवारी 2021 ते डिसेंबर 2022 सुमारे 22-23 महिन्यांचा आहे. त्याची तपशीलवार सत्य गोष्ट पुस्तकातून सांगत असल्याचा देशमुखांचा दावा आहे.
यात त्यांनी अत्यंत रोखठोकपणे नावानिशी तपशील सांगितला आहे. त्यात विद्यमान राजकीय नेत्यांची नावे आहेत. केंद्र सरकार कशा पद्धतीने त्यांच्या हाताखालील यंत्रणांचा (गैर)वापर करते, याचे अनेक दाखले देण्यात आले आहेत. ‘सीबीआय आणि ईडी हे केंद्रसरकारच्या पिंजऱ्यातले पोपट आहेत’ असे न्यायालयाने म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर ते खरंच कसे पोपट आहेत, याचे अचंबित करणारे आनुषंगिक तपशीलदेखील देशमुखांच्या लिखाणातून कळतात.
विशेष म्हणजे मी जेव्हा हे पुस्तक वाचले तेव्हा आणीबाणी जाहीर झाली त्याला पन्नास वर्षे होत आलेली होती. त्या अनुषंगाने वर्तमानपत्रांत मजकूर येत होता. त्याही प्रकरणात काँग्रेसने आणि इंदिरा गांधी यांनी आपल्या हाताखालच्या सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला हे झाले सिद्ध झाले होते, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार इंदिरा गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली होती आणि त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. सरकारी यंत्रणा सरकार आपल्या बाजूने राबवते ही गोष्ट आता तर अधिकच स्पष्ट आणि सर्वसामान्य झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ज्याचा खून झाला तो मनुष्य निष्पाप होता किंवा नाही हे कायदेशीर यंत्रणेतून सिद्ध झालेच नाही. म्हणजे सरकारी यंत्रणांचा गैरवापर ही एक गोष्ट, पण एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत यंत्रणा जर जात असेल तर कशावर भरवसा ठेवणार? काँग्रेसच्या राजवटीतही असे घडले असेल, पण ते अद्याप तरी उघडपणे बाहेर आलेले नाही.
आपल्याला कसे अडकवले गेले, अटक झाली, कारागृहात पाठवण्यात आले, कारागृहात असताना कसा त्रास दिला गेला, आपल्या कुटुंबियांना, आप्तेष्टांना कसे छळले गेले, या सर्व कालावधीत केंद्रसरकार म्हणून असणारी यंत्रणा आपल्याशी कशी अन्यायाने वागली, “शेवटी सत्याचाच विजय होतो” यावर विश्वास ठेवून आपण आपले संतुलन कसे राखले, आपल्या कुटुंबियांना, आप्तेष्टांना कसे छळले गेले, याची वर्णन लिहिले आहे. मात्र मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवलेली गाडी का लावली गेली होती? लावणाऱ्याचा हेतू काय होता? त्याचे पुढे काय झाले? याबाबत कोणताही तपशील या पुस्तकात देण्याला आलेला नाही.
एका बाजूला ते आपण स्वतः निर्दोष आहोत हे सांगतात. तर दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा कशी तटस्थ नव्हे तर भ्रष्ट आहे, सरकारी वर्दीतील अधिकारीच कसे गुन्हेगार आहेत हेही दाखवण्याचा रोखठोक प्रयत्न करतात. या पुस्तकात संदर्भसूची दिलेली आहे, ती जर पाहिली तर देशमुखांनी आपल्या प्रत्येक विधानाला संदर्भ दिला आहे. तेव्हा ते सारेच कपोलकल्पित, एकांगी म्हणता येणार नाही. पण स्वतः निर्दोष असल्याचे सांगण्याच्या नादात इतर बाजू चुकीच्या पद्धतीने मांडल्या जाऊ शकतात हेही नाकारता येऊ शकत नाही.
अनिल देशमुख यांचे हे पुस्तक ऑगस्ट 2024 मध्ये प्रकाशित होऊन सुमारे दहा महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यातील तपशील खरे की खोटे याचीसुद्धा माध्यमांतून फारशी चर्चा झाली नाही, याचे वैषम्य वाटते. कदाचित दुर्लक्ष करण्याची माध्यमांची सुद्धा एक रीत असावी. पण सध्याचे राजकीय वातावरण बघता या पुस्तकाची चर्चा सर्वच राजकीय-सामाजिक आघाड्यांवर व्हायला हवी होती. वस्तुनिष्ठतेच्या निकषावर हे पुस्तक तपासून पाहण्याची गरज आहे. काही गैर असेल किंवा आक्षेपार्ह असेल त्याबद्दल खुलासा होणे आवश्यक होते. पण तसे घडलेले नाही. विद्यमान केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने त्याच्यावर खुलासा यायला हवा होता. पण तसे घडलेले नाही. राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने त्याची दखल घेणे सोयीस्करपणे टाळले असावे, पण माध्यमांनीही त्याची दखल न घेणे याचे मात्र आश्चर्य वाटते. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत सुद्धा या पुस्तकाची जर चर्चा झाली असती तर सत्ताधारी राजकीय पक्षाला त्याचा लाभ झाला असता असे मला वाटते.
सुमारे अडीचशे पानाचे हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे या नामांकित प्रकाशकाने प्रकाशित केले असून त्याची किंमत 499 रुपये ठेवण्यात आली आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वतः अनिल देशमुखांनी तयार केले होते. पण ते प्रकाशकांना मान्य झाले नाही. त्यामुळे देशमुखांची छबी आणि मागे अशोकस्तंभ आणि सत्यमेव जयते लिहिलेले हे मुखपृष्ठ आहे. एकूण छपाईच्या आणि मांडणीच्या दृष्टीने पुस्तक सुंदर आहे.राजकीय दृष्ट्या एखाद्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी या पुस्तकाचे वाचन करणे अभ्यासकाला उपयुक्त ठरू शकते.
पुस्तकाचे नाव :- डायरी ऑफ ए होम मिनिस्टर : राजकीय षड्यंत्र उलथून टाकणाऱ्या गृहमंत्र्याची आत्मकथा
लेखक :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख
प्रकाशक :-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
किंमत :- 499
पृष्ठ संख्या :- 260
- अॅडव्होकेट देविदास वडगांवकर, तांबरी, धाराशिव
(लेखक व्यवसायाने वकील आहेत.)
Tags: मविआ अनिल देशमुख सचिन वाझे परमबीर सिंह पोलिस अंबानी मुकेश अंबानी मोदी केंद्रसरकार राज्यसरकार भ्रष्टाचार शंभर कोटी लाच स्कॉर्पिओ स्फोटके Load More Tags
Add Comment