खोज - शोध परिवर्तनाचा

मेळघाट : शोध स्वराज्याचा - भाग 3

'खोज'मधील सहकारी | (फोटो सौजन्य - पुर्णिमा)

मेळघाट हा एक वंचित आणि उपेक्षित प्रदेश असल्याने त्यामध्ये निरनिराळ्या स्वयंसेवी संस्था काम करत असणे स्वाभाविक होते. त्यांच्यामधलीच एक होती... ती म्हणजे ‘खोज’. खोज संस्था स्थापन केली ती बंडू साने, पुर्णिमा उपाध्याय आणि त्यांचे सहकारी यांनी. बंडू आणि पुर्णिमा यांचा परिचय झाला तो ‘अनुभव शिक्षा केंद्र’ या प्रक्रियेमध्ये. 

कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये सामाजिक संवेदनशीलता वाढवण्यासाठीचा हा कार्यक्रम होता. मुंबईमधील ‘युवा’ नावाची संस्था हा कार्यक्रम कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भातील निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये चालवत होती. बंडू आणि पुर्णिमा जरी या प्रक्रियेमधून भेटले तरी त्या अगोदरची त्यांची जडणघडण मात्र पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने झालेली होती. 

बंडू मूळचा नागपूरचा, जन्म 18 ऑगस्ट 1966. एका निम्न-मध्यमवर्गीय कष्टकरी कुटुंबातला. त्याचं आडनाव साने जरी असलं तरी मुळातल्या ‘सनैश्वर’ या आडनावाचे ते अपभ्रंश रूप होते. सनैश्वरचे सनेसर झाले आणि त्यातून साने हे आडनाव प्राप्त झाले. (कोकणात जे साने आडनाव असते त्याच्याशी याचा काही संबंध नाही.) सहा भावंडांत तो चौथा. घरची परिस्थिती बेताची असली तरी त्यांच्या घराण्यात पैलवानी, मल्लविद्या आणि दांडपट्टा यांची परंपरा होती. त्यांचे पूर्वज नागपूरकर भोसल्यांकडे नोकरीला होते. बंडूचे आईवडील मात्र रोजंदारी आणि लहानमोठे व्यवसाय करून पोट भरत. बंडूही लहानपणी सूप, झाडू, टोपल्या या वस्तू तयार करण्यात आईवडिलांना मदत करायचा. 

बंडू पाचवीपर्यंत मिशनरी शाळेत शिकला. त्यानंतर नागपूरच्या बेझन बाग परिसरातल्या ‘गुरू नानक विद्यालया’तून दहावी पास झाला. अकरावी-बारावीची दोन वर्षे सेमिनरी हिल्सवरच्या सेंट फ्रान्सिस उच्च माध्यमिक विद्यालयात काढून त्याने हिस्लॉप कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून 1991मध्ये तो जीवशास्त्रात बी.एस्सी. उत्तीर्ण झाला. या काळात राहायची सोय शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहामध्ये होती... पण घरच्या साधारण परिस्थितीमुळे हॉटेलमध्ये वेटरगिरी कर, नाहीतर राजगिरा-मुरमुऱ्याचे लाडू वीक किंवा उसाचा चरक चालव अशी कामे करूनच हे शिक्षण पूर्ण केले. बंडूची बाकी भावंडेही अशीच शिकत होती.

बंडू हिस्लॉप कॉलेजमध्ये शिकत असतानाच ‘अनुभव’ या प्रक्रियेच्या संपर्कात आला होता आणि त्या माध्यमातून त्याचा सामाजिक कार्याशी परिचय झाला होता. ‘युवकांचा विकास’ आणि ‘विकासासाठी युवक’ असे ‘अनुभव’ प्रक्रियेचे सूत्र होते... मित्र, सहयोगी आणि साथी अशा तीन टप्प्यांमधून युवकांचे प्रशिक्षण केले जात असे. या प्रशिक्षणात स्त्री-पुरुष समानता, जातिभेद निर्मूलन, पर्यावरणीय जागृती, राजकीय सक्षमता असे विषय असतच... शिवाय निरनिराळ्या सामाजिक संस्थांच्या आणि संघटनांच्या प्रत्यक्ष कामाशी युवकांचा परिचय करून दिला जात असे. या प्रशिक्षणात असतानाच बंडू ‘नर्मदा बचाव आंदोलना’ने मध्य प्रदेशातील मणीबेली इथे केलेल्या सत्याग्रहात 1991मध्ये सामील झाला होता आणि त्यात त्याला अटकही झाली होती. मेळघाटशी ओळखही याच प्रक्रियेमधून झाली. 

पदवीधर झाल्यावर 1992 ते 1995 काळात तो नागपूरच्या ‘युवा’ कार्यालयात ‘अनुभव’ प्रक्रियेचा समन्वयक म्हणून काम बघू लागला. या काळात त्याने 1993मध्ये नागपूर विद्यापीठातून लोकप्रशासन या विषयातून एमए केले. नंतर विधी महाविद्यालयातून एलएलबी ही पदवीसुद्धा घेतली. 

या काळात महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला पुर्णिमा मोठी होत होती. दुसरे टोक म्हणजे डोंबिवली. पुर्णिमाचे वडील मुळात उत्तर प्रदेशात तुरुंग विभागाच्या सेवेत होते. तिथून त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेतली आणि ते मुंबईत आले. कल्याण-डोंबिवली परिसरातल्या उद्योगांमध्ये त्यांचा अवजड वजनकाट्यांच्या आलेखनाचा (कॅलिबरेशनचा) व्यवसाय होता. महाराष्ट्र शासनाकडून तसा अधिकृत परवानाही त्यांनी घेतलेला होता. 

पुर्णिमाला पाच भावंडे. ती शेवटची. मोठे तीन भाऊ आणि दोन बहिणी. तिचे शालेय शिक्षण डोंबिवलीच्या ‘ग्रीन्स इंग्लिश मिडिअम स्कूल’मधून झाले. चण लहानशी असली तरी ती अतिशय सभाधीट आणि बोलकी... त्यामुळे शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घ्यायची. वडील तिला म्हणायचेच की, तू चांगली वकील होशील. वडील चांगले वाचणारे आणि गांधीवादी मूल्ये मानणारे होते... मात्र पुर्णिमा मुंबईच्या सोमैया कॉलेजमध्ये बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षात असताना 1992च्या डिसेंबर महिन्यात त्यांचे कर्करोगाने अकाली निधन झाले. 

वडील गेल्यावर घरच्या आर्थिक परिस्थितीत एकदम फरक पडला. मोठे दोघे भाऊ वेगळे राहून जेमतेम आपला संसार पाहत होते. मोठी बहीण रेल्वेमध्ये नोकरीला. तिचे लग्न झाले होते. घरात आता पुर्णिमा, तिची आई, एक भाऊ आणि बहीण. आई जुन्या, घरगुती वळणाची होती. त्या सगळ्यांमध्ये पुर्णिमाच धडाडीची. 

वडील गेल्यामुळे व्यावसायिक परवाना रद्द झाला, भावांचे परवानेही रद्द झाले होते. त्यांचे प्रयत्न संपल्यावर पुर्णिमा आपल्या दोन्ही बहिणींसह मुंबईला मंत्रालयात गेली आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी झगडून तिने वडिलांच्या परवान्याचे आईच्या नावावर नूतनीकरण करून आणले. भावांचे परवानेही परत मिळाले. मग तिला समजले की, वडील उत्तर प्रदेशच्या सरकारी सेवेत असल्याने पेन्शनसाठी पात्र होते... मात्र ती पेन्शन त्यांना मिळाली नव्हती. ती मग आईसोबत लखनौला गेली. तिथल्या नोकरशाहीचा भुलभुलैयाशी आणि कागदपत्रांच्या जंजाळाशी सामना करून आईला महिना 1,800 रुपये इतकी पेन्शन मिळवून आणली. 

अगदी लहान वयात केलेल्या या धडपडीमुळे पुढच्या काळात कराव्या लागलेल्या जनवकिलीचा पाया चांगला पक्का झाला... शिवाय सरकारी यंत्रणांशी निधडेपणाने कसे झुंजायचे आणि आपले हक्क कसे पदरात पाडून घ्यायचे याचा धडाही गिरवता आला.

...मात्र या व्यवधानांत तिचे कॉलेजचे वर्ष बुडाले. एरवीही तिला त्या शिक्षणात गोडी वाटत नव्हती. ते नुसते पुस्तकी शिक्षण घ्यायच्याऐवजी आपण जगण्याला उपयोगी असे काहीतरी शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनाने घेतले. त्याच वेळी मोठ्या बहिणीने समाजकार्याच्या व्यावसायिक पदवीविषयी तिला सांगितले... कारण बहिणीच्या एका मैत्रिणीची मुलगी मुंबई महानगरपालिकेमध्ये ‘पब्लिक रिलेशन्स ऑफिसर’ म्हणून नोकरीला लागली होती आणि तिचे चांगले चालले होते.

आपल्या बहिणीला चांगली नोकरी मिळेल या अपेक्षेने तिने पुर्णिमाला बीएसडब्ल्यू करतेस का असे विचारले आणि अशी पदवी मुंबईच्या ‘निर्मला निकेतन’ या कॉलेजमध्ये मिळत असल्याचेही सांगितले.  पुर्णिमाला तो पर्याय आवडला आणि पुढच्या वर्षी म्हणजे 1993मध्ये प्रवेशपरीक्षा आणि मुलाखत देऊन तिने बीएसडब्ल्यू या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला. 

हा अभ्यास तिच्या स्वभावाला आणि प्रवृत्तींना अगदी साजेसा होता. या शिक्षणक्रमात पुस्तकी अभ्यासाबरोबर क्षेत्रकार्यालाही फार महत्त्व होते. पहिल्या वर्षी त्यांनी मराठवाड्यातील भूकंपग्रस्त गावांमध्ये  सेवाकार्य केले होते. पुर्णिमाच्या धडाडीच्या स्वभावामुळे विद्यार्थ्यांचे एक शिबिर आयोजित करणाऱ्या टीममध्ये दुसऱ्या वर्षी तिची निवड झाली. कॉलेजमधील ही मुलेमुली विदर्भातल्या संस्थांचे काम पाहायला निघाली. त्यामध्ये वरोऱ्याचे आनंदवन, गडचिरोलीजवळच्या ‘सर्च’ संस्थेचे शोधग्राम आणि मेंढा-लेखा गाव यांचा समावेश होता. 

निर्मला निकेतन महाविद्यालय हे अनुभव शिक्षा केंद्राच्या प्रक्रियेमधले मुंबईचे समन्वयक केंद्र होते... त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना अनुभव प्रक्रियेशी जोडून घ्यायची संधी सहजच मिळत असे. बंडू नागपूर कार्यालयाचे काम करत होता... त्यामुळे त्यांच्या विदर्भ अभ्यासदौऱ्यात बंडू आणि त्याचे सहकारी सामील झालेले होते. हा अभ्यासदौरा यशस्वीपणे पार पडला. तो संपल्यानंतर त्यांपैकी दहा जणांनी पुढील काही दिवस विदर्भात अजून काही कामे पाहण्याकरता आठदहा दिवसांचा दौरा ठरवला होता. 

हेमलकसा येथील डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्या कार्यासोबतच अन्य काही जणांचं कार्य समजून घ्यायची या विद्यार्थ्यांची इच्छा होती. हेमलकसाला जाण्यासाठी ही मंडळी गडचिरोली बसस्थानकावर आली. बस सुटायला अवकाश होता. अभ्यासदौरा तर केला... पुढे काय? असा प्रश्न या तरुण मुलामुलींना पडला. तेव्हा त्यांनी ठरवले की, आपणही आपला एक गट करून अशाच प्रकारे समाजकार्य करावे. या गटाला नाव काय द्यायचे? त्या वेळी ते ‘सर्च’ संस्था पाहून आले होते. त्यांच्या मनात आले की, शोधाची ही संकल्पना चांगली आहे... पण असे इंग्रजी नाव नको. आपल्या भारतीय समाजाला पटेल, रुचेल, शोभेल असे देशी नाव असावे... म्हणून मग ‘खोज’ हे नाव त्यांना सुचले. तुमचे ‘सर्च’ तर आमचे ‘खोज’. नोंदणी करताना मात्र त्यावर अधिक विचार करून समर्पक असे नाव A Quest for Knowledge, Hope, Opportunity and Justice असे केले. 

अशा रितीने 1995मध्ये गडचिरोली बसस्टँडवर खोजचा जन्म झाला. विदर्भाच्या या दौऱ्यात दुसरी एक गोष्ट झाली... ती म्हणजे पुर्णिमाची आणि बंडूची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. निर्मला निकेतनचा हा गट नंतरच्या महिन्यांमध्ये मेळघाटच्या अभ्यासासाठी आला आणि पुर्णिमाला तिथल्या आदिवासी जीवनाची ओळख झाली.  

‘खोज’ नाव धारण केलेला हा गट 1996मध्ये पदवी घेऊन बाहेर पडला. पुर्णिमाला समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण (एमएसडब्ल्यू) घ्यायचे नव्हते. तिला प्रत्यक्ष काम करायचे होते. तिला मेळघाट खुणावत होता. आपल्याला जर खरोखरच काही मूलभूत काम करायचे असेल तर मेळघाटसारख्या ठिकाणी जायला पाहिजे असे तिला वाटत होते... त्यामुळे परीक्षा झाल्याझाल्याच तिने तिकडे जायची जुळवाजुळव सुरू केली. 

‘खोज’ या गटाचा या कामाला पाठिंबा असला तरी प्रत्यक्ष मेळघाटमध्ये जायला पुर्णिमा आणि प्रशांत शिंदे असे दोघेच तयार झाले. नागपूरहून बंडू सामील होणार होता. आता या कामाला मदत कोण करणार? अभ्यासदौऱ्यादरम्यान ओळख झालेल्या काही फंडिंग एजन्सीज्शी संपर्क साधला. त्यांचे मत असे पडले की, आधी काम सुरू करावे आणि नंतर मदत घ्यावी. 

हा सल्ला बरोबरच होता... पण कामाला सुरुवात करण्यासाठी तरी काही अर्थसाहाय्य हवे होते. त्यांनी मुंबईतल्या आपल्या हितचिंतक मित्रमैत्रिणींना साकडे घातले आणि थोडीफार मदत मिळवली. अमरावतीच्या डॉ. अविनाश सावजी यांनी स्थानिक संपर्क करून दिले. त्यांच्या परिचयाच्या श्री. छोटूभाऊ वरणगावकर यांनी परतवाडा इथे त्यांच्या घरात राहायची सोय केली. 

मे 1996मध्ये अशा रितीने धडपडत ‘खोज’चे काम सुरू झाले. संस्थेची विधिवत नोंदणी 1997 मध्ये झाली. कार्यकर्ते या भागातच राहत आहेत हे पाहिल्यावर ‘ऑक्सफॅम’ (ग्रेट ब्रिटन) या फंडिंग एजन्सीने महिना 10,000 रुपये इतकी मदत सुरू केली. सगळा खर्च चालवण्यासाठी ती पुरेशी नव्हती... पण कार्यकर्त्यांना काहीतरी आधार तरी झाला. नागपूरहून अरुणा शेट्ये ही तरुण मुलगीही येऊन मिळाली. नंतर 1997च्या अखेरीस दिल्लीच्या ‘इंडो-ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी’ (आयजीएसएसएस) या संस्थेमार्फत बंडू आणि पुर्णिमा यांना प्रत्येकी महिना 3,000 रुपये इतकी पाठ्यवृत्ती मिळू लागली. 

- मिलिंद बोकील

(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत  मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)



वाचा 'मेळघाट : शोध स्वराज्याचा' या लेखमालेतील इतर लेख - 

1. गावा हत्ती आला...

2. मेळ नसलेला घाट?

Tags: लेखमाला मिलिंद बोकील मेळघाट : शोध स्वराज्याचा भाग 3 पुर्णिमा बंडू खोज मेळघाट Series Melghat Milind Bokil Part 3 Khoj Purnima Bandu Load More Tags

Comments:

विष्णू दाते

स्वयंफूर्तीने मिळालेले कार्यकर्ते हे "खोज"चे मोठेच बळ आहे!

Milind Sohan Ukey

Khoj, goodwork ,I know bandu from intial, he was very sensitive & curious for poor men ,always , Bandu & his patner I saluted him , its work for nation good choice it, very difficulty duty compare to other duty, I know well as a ex - men many critical place & people problem

Add Comment