प्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडणारे येरेवान शहर

'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचा भाग 6

येरेवान येथील इरेबुनी संग्रहालय

2 ऑक्टोबर 2019 रोजी गांधींजींच्या 150व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखाली  'जय जगत 2020 - जागतिक शांती मार्च' या पदयात्रेला दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीस्थळापासून- राजघाटपासून- सुरुवात झाली. तीन महिने भारतात तर उरलेले नऊ महिने विदेशात, अशी वर्षभर चालणारी ही 14 हजार किलोमीटरची पदयात्रा 10 देशांतून प्रवास करणार होती. या यात्रेदरम्यान जगभर अहिंसा, शिक्षण व सामाजिक न्यायाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण व कार्यक्रम होणार होते.पदयात्रेचा मूळचा मार्ग हा राजघाट ते वाघा-बॉर्डर; तिथून पाकिस्तान, इराण, आर्मेनिया, जॉर्जिया, नंतर बाल्कन राष्ट्रे, मग इटली आणि शेवटी स्वित्झर्लंड असा होता. या पदयात्रेची सांगता 2 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय असलेल्या जिनिव्हा येथे होणार होती.

मराठीतील प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील या पदयात्रेत सहभागी झाले होते, त्या अनुभवावरील लेख समकालीन प्रकाशनाकडून लवकरच येणाऱ्या 'क्षितिजापारच्या संस्कृती' या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट केला आहे. तो संपूर्ण लेख क्रमशः आठ भागांत प्रसिद्ध करीत आहोत. त्यातील हा भाग 6. 
- संपादक

मासीसची शाळाही अतिशय भव्य होती. त्यांनी इनडोअर बास्केटबॉलचा हॉल पदयात्रींना उतरायला दिला होता. शेजारी किचन होते आणि डायनिंग हॉलही खूप मोठा होता. आर्मेनियाच्या सगळ्याच शाळांतून की दुपारच्या जेवणाची सोय शाळेतच होत होती. आपल्याकडच्या सारखेच मध्यान्ह भोजन. खेड्यातल्या शाळा साध्या होत्या पण या शहरांमध्ये मात्र सगळी व्यवस्था अत्यंत आधुनिक होती. अर्ताशार्तला आम्ही पाहिले त्याप्रमाणे अगदी व्यावसायिक वाटाव्यात अशा तिघी जणी सकाळी स्वयंपाक करायला आल्या. आपल्याकडे जसे नुसते खिचडीचे एक मोठे पातेले उकडून देतात तसे नव्हते. त्या स्वयंपाकघरात गॅसपासून ते मायक्रोवेव्ह ओव्हनपर्यंत सगळी उपकरणे सज्ज होती. सकाळी पावाची गाडी शाळेसमोर उभी राहिली आणि ताज्या पावाचे गठ्ठे उतरवले गेले. हा सगळा रशियन वारसा असावा बहुतेक. 
    
सकाळी निघण्यापूर्वी त्या शाळेतही विद्यार्थ्यांसमवेत कार्यक्रम झाला. या पदयात्रेमध्ये गावातले लोक जरी कमी भेटले तरी विद्यार्थ्यांशी संभाषणे मात्र चांगली होत होती. त्यात एक उपक्रम असाही होता की विद्यार्थ्यांना शांती-संदेशाची भेटकार्डे वाटली जात. त्यावर त्यांनी आपले नाव लिहून आणि हवा तो संदेश लिहून परत द्यायची असत. ही सगळी कार्डे नंतर जिनिव्हामध्ये एकत्र केली जाणार होती. अहिंसेचा आणि शांतीचा संदेश हा पुढच्या पिढीला देणे हेच जास्त योग्य होते.
    
मासीसहून पदयात्रा निघाली. आता पुढचा मुक्काम येरेवान होता. हा सगळा भाग राजधानीचे उपनगर असल्यासारखाच होता मात्र मुख्य शहर साधारण पंचवीस किलोमीटर दूर होते. हायवेच्या कडेनेच चालत गेलो. शहर जवळ आले की अशा हमरस्त्याच्या कडेने जसे दृश्य दिसते तशाच प्रकारचे ते होते. मोटारींची गॅरेजेस, स्पेअर पार्टस्‌ची दुकाने. शोरूम्स, लहान कारखाने, फेरीवाले, सफरचंद विकणाऱ्या गाड्या आणि वाहनांची वर्दळ.
    
आधी बराच वेळ व्हिन्सेंट माझ्यासोबत चालत होता. तो फ्रान्समधला एक पत्रकार-प्रवासी. अशा प्रकारे प्रवास करणे आणि ती प्रवासवर्णने लिहिणे हा त्याचा छंद होता. फ्रान्समधल्या पिरनिज पर्वतरांगांमध्ये लहानशा सायकलवरून केलेल्या प्रवासवर्णनाचे पुस्तक त्याने मला दाखवले होते. त्याला फोटोग्राफीचा नाद होता आणि ती नजरही चांगली होती. या पुस्तकात त्यानेच काढलेले फोटो छापलेले होते. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले की तो त्याचा कॉम्प्युटर उघडून बसायचा आणि दिवसभरात जे काही पाहिले त्याच्या नोटस्‌ अगदी नियमितपणे लिहून काढायचा. तो भारतातही चालला होता. अशी पदयात्रा म्हणजे त्याच्यासारख्या पत्रकाराला पर्वणीच होती; विशेषत: भारतात. त्याला ह्या पदयात्रेतून जो भारत बघायला मिळाला तो एरवी बघायला मिळणे अवघडच. आणि तोसुद्धा पायी चालत, क्षणोक्षणी रसरशीत अनुभव घेत.
    
नंतरचा काही वेळ डॅनी सोबत होता. डॅनी म्हणजे पदयात्रेतला वल्ली होता. सगळा अवतार एखाद्या हिप्पीसारखा. व्यवसायाने तो माळी होता. स्वित्झरलंडमध्ये राजगोपाल यांचे एक मित्र होते. त्यांच्या बागेची देखभाल तो करत असे. तिथे त्याने पदयात्रेबद्दल वाचले आणि नंतर त्या मित्रांच्या घरी त्याची राजगोपालांशी प्रत्यक्ष भेट झाली. त्याला झाडांचे प्रचंड प्रेम. भारतात चालत असताना तर तो म्हणे कुठेही जंगलात गडप व्हायचा. येरेवानलाही मी पाहिले की आवारातल्या एका झाडावरच तो दोन तास चढून बसला. मात्र त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पाळी नसली तरी तो स्वत:हून भांडी घासायला किंवा केर काढायला येत असे.

पाश्चिमात्य पुरुष घरातली कामे करायला लाजत नाहीत. आपल्याकडे ही  क्रांती होणे अजून बाकी आहे. दुसरे एक अंग म्हणजे तो आपली जेवणाची प्लेट अतिशय कलात्मक रितीने सजवायचा; साधा नाश्ता असला तरी. त्या प्लेटकडे बघत राहावेसे वाटे. दोन-तीन वेळा हे पाहिल्यावर मी त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला की त्याने काही वर्षे आपल्या आजीचे रेस्टॉरंट सांभाळले होते. मुळातच युरोपिअन लोकांची खाद्यसंस्कृती नामांकित. त्यात अशी दृष्टी असली की अधिकच बहार. अन्नाचे पोषणमूल्य आणि चव तर महत्त्वाची असतेच पण तुम्ही ते कसे पेश करता यावरही आस्वाद अवलंबून असतो. तेव्हापासून मीसुद्धा शक्य तितके त्याचे अनुकरण करायला लागलो. 
    
एकता परिषदेचे काम महाराष्ट्रात नसल्याने या पदयात्रेमध्ये महाराष्ट्रातली माणसे कमी होती. एक मी, पुण्याचे योगेश मथुरिआ आणि सेवाग्राम आश्रमातले जालिंदर चानोले. योगेशभाई हीसुद्धा एक आगळीवेगळी व्यक्ती. मुळचे मंबईचे, एका नामांकित आयटी कंपनीमध्ये अतिशय वरच्या पदावर काम केलेले, नोकरी निमित्ताने सगळे जग पालथे घातलेले आणि शेवटची काही वर्षे अमेरिेकेत राहिलेले. त्यांच्या पत्नीचा 2005 मध्ये कॅन्सरमुळे अकाली मृत्यू झाला आणि योगेशभाईंना विरक्ती आली.

त्यानंतर योगेशभाईंनी आपले सगळे आयुष्य अहिंसा आणि शांतीचा संदेश देण्यासाठी घालवायचे ठरवले. पुण्यात बाणेरला कॅन्सरच्या पेशंटसाठी एक आश्रम काढला. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ह्या संदेशाच्या प्रसारासाठी ते पदयात्रा काढू लागले. अहमदाबाद-वाघा बॉर्डर अशी 2013 मध्ये काढली. पाकिस्तानने येऊ दिले नाही म्हणून परत आले. नंतर 2016 साली पुणे-कोलंबो-पुणे अशी 5,600 किलोमीटरची पदयात्रा काढली तर 2018 साली दक्षिण आफ्रिकेची 1,320 किलोमीटरची पदयात्रा केली. त्यांचा राजगोपालांशी पूर्वी परिचय नव्हता. तो 2019 मध्येच झाला, पण पदयात्रेच्या ह्या कल्पनेने भारून ते त्यात सामील झाले. त्यांनी निधी गोळा करण्याची आणि समन्वयाची जबाबदारी स्वीकारली. जगात अशा प्रकारे पायी चालणाऱ्या अनेक व्यक्तींशी योगेशभाईंचा संबंध. त्यामुळे त्यांच्याकडून संबंधित माहिती कायम कळत राहायची. 
    
जालिंदर चानोले यांनी वर्ध्याच्या गांधी आश्रमासाठी आयुष्य समर्पित केलेले आहे. योगेशभाईंसोबत ते दक्षिण आफ्रिकेमध्ये चाललेले होते. म्हणून तेही जय जगत पदयात्रेमध्ये सामील होते. दुसरा म्हणजे इकेडा किन्सिन हा बौद्ध भिक्षु. तोही दक्षिण आफ्रिकेत योगेशभाईंबरोबर चालला होता आणि म्हणून याही पदयात्रेत सामील झाला होता. त्याचा वेष म्हणजे एक पातळसा पांढरा झगा आणि त्यावर एक सोनेरी उपरणे. कितीही थंडी असली तरी तो एवढेच घालायचा. खांद्याला कायम एक झोळी. त्यात एक डफ आणि तो वाजवायची एक लहानशी काठी.  

पूर्वीच्या निष्ठावान, सर्वसंगपरित्याग केलेल्या बौद्ध भिक्षुसारखीच त्याची राहणी होती. तो वागायला बोलायला अतिशय नम्र होता. पण त्याची एक वैताग आणणारी सवय म्हणजे पदयात्रा सुरू झाली रे झाली की तो रेकल्यासारखा, त्याच्या त्या डफावर ढूम ढूम वाजवत, ‘नमो म्योहो रेंगे क्यो’ या मंत्राचे पठण सुरू करायचा आणि अजिबात न थांबता सतत म्हणतच राहायचा. हा मंत्र तेराव्या शतकातल्या निचिरेन नावाच्या जपानी बौद्ध भिक्षुने प्रसारित केलेला आहे (अर्थ - मी कमल सूत्राने वर्णिलेल्या दिव्य धर्माला वंदन करतो). बरं, त्याला काही सुरेल चाल असावी तर तीही नाही. निव्वळ गिरमीटासारखा गेंगाणा नाद.

या लोकांची धारणा अशी की हा मंत्र सतत म्हणत राहिले की दुरितांचा नि:पात होऊन सर्वत्र आनंद पसरतो. अशी समजूत असल्याने तो सतत म्हणावाच लागतो (जोपर्यंत मंत्र चालू तोवरच आनंद). खरं तर कोणत्याही मंत्राचा अर्थ समजला आणि तो मनात स्थिर झाला की परत परत म्हणायची गरज नसते. हवे तर त्यावर मनातल्या मनात चिंतन करत राहावे. उपनिषदातल्या सूत्रांचे असेच असते. पण धर्म संघटित झाला की असले कर्मकांड वाढते. शिवाय त्याला जोड भ्रामक विज्ञानाची. ते आपल्याकडेही आहे म्हणा.

सतत मंत्र म्हणत राहिले की चांगल्या लहरी पसरतात अशी समजूत. प्रत्यक्षात नुसता गोंगाट किंवा ध्वनी प्रदूषण होते. शिवाय ही श्रद्धेची गोष्ट असल्याने सांगायची सोय नाही. पदयात्रेमध्ये यावरचा एक सोपा उपाय लक्षात आला म्हणजे इकेडापासून लांब राहायचे. तो सर्वात पुढे चालत असल्याने आपण मध्ये किंवा सर्वांत मागे राहायचे. पदयात्रा पुढे चालत राहिली असती तर मात्र त्याबाबतीत काही तरी करावे लागले असते. 
     
वाटेतल्या एका बागेत जेवणाचा विश्राम घेऊन आम्ही येरेवानमध्ये पोहोचलो. तिथल्या महानगरपालिकेने आमचे स्वागत नगरातल्या पुरातत्त्वीय संग्रहालयात करण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी काही नगरसेवक हजर होते. येरेवान ही आता राजधानी असली तरी मुळात ते एक प्राचीन शहर होते आणि त्या शहरातल्या एका टेकडीवर जुने अवशेष सापडलेले होते. त्या टेकडीच्या पुढच्या भागात हे पुरातत्त्वीय ‘इरेबुनी’ संग्रहालय महानगरपालिकेने उभारलेले होते. येरेवानचे पूर्वीचे नाव इरेबुनी. 
    
स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर संग्रहालयाचे संचालक, डॉ. मिखायेल बदालयान यांनी स्वत: सगळे संग्रहालय आम्हाला दाखवले. आमच्याकडून फी घेतली गेली नाही. इरेबुनी किंवा येरेवान ही ‘उरार्त्रु’ संस्कृतीच्या ‘वान’ साम्राज्याची राजधानी होती आणि हे साम्राज्य साधारण इ.स.पूर्व 900 ते 600 या काळात भरभराटीला आलेले होते. या ठिकाणी अर्गिष्टी नावाच्या राजाने इ.स.पूर्व 782 मध्ये आपल्या राजधानीची स्थापना करून एक नगरदुर्ग उभारला होता.

आपल्याकडे जसे सम्राट अशोकाचे शीलालेख मिळतात तसा या उल्लेखाचा एक शीलालेखच तिथे मिळालेला होता. त्या घटनेला 2,750 वर्षे झाली म्हणून 1968 मध्ये हे संग्रहालय उभारले गेले (रशियन राजवटीच्या काळात). उरार्त्रु हा शब्द अरारातवरूनच आलेला आहे. कॉकेशस पर्वताच्या मधल्या सखल भागात हे राज्य विकसित झाले होते. ज्या टेकडीवर हे संग्रहालय बांधले होते तीवरच अर्गिष्टीने बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष सापडलेले होते जे साधारण 2,800 वर्षे इतके जुने होते. त्या अवशेषांवरून तटबंदी असलेला हा नगरदुर्ग कसा दिसत असेल याचे एक मॉडेल संग्रहालयात सुरुवातीला मांडलेले होते ज्यावरून या नगराच्या भव्यपणाची कल्पना येत होती. त्यामध्ये पुढच्या बाजूला धार्मिक विभाग होता ज्यामध्ये खाल्दी या नगरदेवतेचे मंदिर होते. मधला भाग प्रशासकीय होता ज्यामध्ये राजाचे आणि उमरावांचे वाडे होते. कडेचा भाग व्यापारी होता जिथे दुकाने आणि बाजार होता. 
    
या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जे अवशेष सापडले ते फारच चांगल्या स्थितीत होते. त्यामध्ये दगडाची आणि तांब्याची हत्यारे जशी होती तशीच नाना तऱ्हेच्या माळा, सोन्याचे व चांदीचे अलंकार, तऱ्हेतऱ्हेची मातीची भांडी, दगडी जाती, बाणांची टोके, छतावर आणि भिंतींवर काढलेली रंगीत चित्रे, मातृदेवतांच्या मातीच्या मूर्ती आणि धार्मिक विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा समावेश होता.

जगामध्ये शेतीची आणि पशुपालनाची सुरुवात झालेले जे अतिप्राचीन प्रदेश आहेत त्यामध्ये अरारात खोऱ्याचा समावेश होतो. इथे गहू, बार्ली, ओटस्‌ आणि इतर तृणधान्ये पेरली जात, त्यासोबत मसूर, हरभरा, तीळ, अंबाडी अशी पिके, वेगवेगळ्या भाज्या आणि मुख्य म्हणजे सफरचंद, पीच, अक्रोड, डाळिंब, प्लम, चेरी आणि द्राक्षे अशा फळांची लागवड केली जात असे. द्राक्षांच्या किमान बारा प्रजाती इथे होत्या आणि सध्याही त्या लावल्या जातात. तृणधान्यापासून बिअर आणि द्राक्षांपासून वाइन बनवण्याची पद्धत त्या काळातही माहीत होती आणि किल्ल्याच्या व्यापारी भागात वाइन साठवण्याचे महाकाय कुंभ अखंड अवस्थेत सापडले होते. आपल्याकडे वापरतात अगदी तशीच दगडाची जाती आणि पाटे-वरवंटे होते आणि गहू, बार्ली व इतर तृणधान्ये दळून वापरली जात.

संग्रहालय बघून झाल्यावर संचालक आम्हांला मागच्या टेकडीवर घेऊन गेले. तिथे जुन्या राजधानीची तटबंदी अजून शाबूत होती. आतल्या मोठ्या महालाच्या खांबाचे तळखडे स्पष्ट दिसत होते. या नगरात जे गुलाम किंवा वेठबिगार मजूर बाहेरून आणलेले होते त्यांच्या देवतेचे एक मंदिरही भग्न स्वरूपात होते. संचालक म्हणाले की रशियन काळात हे उत्खनन घाईघाईने आणि धश्चोट पद्धतीने झाले त्यामुळे अनेक अवशेषांची हानी झाली. या टेकडीच्या समोरच्या बाजूला दुसरे एक लहान टेकाड त्यांनी दाखवले. त्याखाली मजूर किंवा कामगार लोकांच्या घरांचे अवशेष होते. मात्र त्याचे उत्खनन अजून व्हायचे होते. (आपल्याकडे हरप्पा संस्कृतीच्या काळातही मुख्य नगरदुर्गापासून काही अंतरावर कामगारांची घरे बांधण्याची पद्धत होती). चालता चालता कडेने हळूहळू उगवू लागलेल्या रानफुलांकडे त्यांनी निर्देश केला. ही फुले त्या काळातही तशीच होती. 
    
या टेकडीवरून सर्वदूर येरेवान शहर तर दिसत होतेच शिवाय पश्चिमेला अरारात पर्वतही स्पष्ट दिसत होता. येरेवान शहराचे दर्शन कोणत्याही मोठ्या शहराचे असते तसेच होते. शहराच्या मध्यातून गेलेला मोठा रस्ता, त्या कडेच्या इमारती, त्यांची उतरती छपरे, पर्णहीन झाडे आणि रस्त्यावरून जाणारी वाहने. अरारात पर्वत मात्र प्राचीन जगाची आठवण करून देत होता. ज्या जागेवर आम्ही उभे होतो तिथे मात्र प्राचीन आणि अर्वाचीन जगाचा सांधा जोडला जात होता.

- मिलिंद बोकील
(ललित आणि वैचारिक या दोन्ही प्रकारातले साहित्य लिहिणारे फार कमी लेखक मराठीत आहेत, आणि ज्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असतो असे लेखक तर त्याहून कमी आहेत. त्या दोन्ही बाबतीत  मिलिंद बोकील हे आघाडीवरचे नाव आहे.)

वाचा 'पदयात्रा: आर्मेनियामधली' या दीर्घ लेखाचे इतर भाग-
1. 
जय जगत 2020: न्याय आणि शांततेच्या दिशेने टाकलेले पाऊल 
2. बर्फाळ कॉकेशस पर्वतरांगा आणि आर्मेनियन शाळा 
3. अझरबैजान सीमेलगतचा धोकादायक टप्पा 
4. अरारात पर्वताच्या पायथ्याशी...
5. चाळीस पदयात्रींचे आदरातिथ्य करणारे शेतकरी जोडपे

Tags:Load More Tags

Comments:

Pro. Bhagwat Shinde

सुंदर,अप्रतिम लेखमाला. लेखक व संपादक दोहोंचेही मनःपूर्वक अभिनंदन. या लेखमालेतील कितीतरी व्यक्तिमत्त्वे प्रत्यक्ष न भेटूनही मनात घर करुन राहणारी आहेत.जगात एवढी चांगली,कल्पक, सर्जनशील व संवेदनशील माणसं अनुभवताना जग सुंदर वाटायला लागतं.आपणही या सौंदर्यात भर घालण्यासाठी काहीना काही करण्याची उमेद मिळते.

Add Comment

संबंधित लेख