1899 ते 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेले साने गुरुजी, संपूर्ण महाराष्ट्राला लेखक व स्वातंत्र्यसेनानी म्हणून परिचित आहेत. महात्मा गांधींची हत्या झाल्यावर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी एकवीस दिवसांचे उपोषण सुरू केले होते, उपोषणाच्या चौदाव्या दिवशी त्यांनी दोन पानांचे सायंदैनिक सुरू केले, त्याचे नाव 'कर्तव्य'. परंतु चार महिन्यांनी त्यांनी ते दैनिक बंद केले आणि त्यानंतर दोन महिन्यांनी (15 ऑगस्ट 1948 रोजी) साधना साप्ताहिक सुरू केले, गेली 75 वर्षे ते अखंड प्रकाशित होत आहे. आणि आता सात दशकांनंतर (8 ऑगस्ट 2019 रोजी) 'कर्तव्य' पुन्हा जन्माला येत आहे, पण डिजिटल पोर्टलच्या रुपात; एका मर्यादित अर्थाने यालाही सायंदैनिक म्हणता येईल.

कर्तव्य साधना या पोर्टलवर रोज एक लेख किंवा व्हिडिओ/ऑडिओ अपलोड केला जाईल, पुढे पुढे हे प्रमाण वाढत जाईल. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला व क्रीडा, साहित्य, संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी विषयांवरील लेख, मुलाखती, रिपोर्ताज व अन्य प्रकारांतील मजकूर लिखित किंवा चित्र, ऑडिओ/ व्हिडिओ स्वरूपात या पोर्टलवर असेल. शिवाय, आठवड्यातून एकदा इंग्लिश भाषेतील लेखन असेल.

साधना साप्ताहिक व कर्तव्य साधना ही दोन भावंडे आहेत. या दोन्हींचे ध्येय एकच आहे, त्यांचा वारसा व वसा समान आहे. त्यामुळे ही दोन्ही परस्परांना पूरक भूमिका बजावत राहतील. मात्र साप्ताहिकातील मजकूर कर्तव्यवर नसेल आणि कर्तव्यवरील मजकूर साप्ताहिकात नसेल, दोन्हीच्या वेबसाईट स्वतंत्र ठेवल्या आहेत. पण एका वेबसाइटवरून दुसरीकडे सहजतेने जाता यावे अशी सुविधा केली आहे, वाचकांनी या दोन्हींचा लाभ घ्यावा अशीच अपेक्षा आहे.

कर्तव्यवर तुलनेने कमी शब्दसंख्येचे लेख व कमी वेळेचे व्हिडिओ राहतील. मात्र विश्लेषणात्मक व चिकित्सक मजकुराला/आशयाला अधिक पसंती दिली जाईल. भाषा अधिक सोपी, प्रवाही व किमान सभ्यता पाळणारी असावी याकडे लक्ष दिले जाईल. ताज्या विषयांना वा घडामोडींना प्राधान्य दिले जाईल. सम्यक व सकारात्मक दृष्टिकोन ठेवत व भारतीय संविधानाला सुसंगत ठरतील अशा भूमिका घेत कर्तव्यची वाटचाल होत राहील.

'सर्व प्रकारच्या विषमता व सर्व प्रकारचे वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे, या ध्येयाने हे साप्ताहिक जन्म घेत आहे' , असे साने गुरुजींनी साधनाच्या पहिल्या अंकाच्या संपादकीयात म्हटले होते. त्या ध्येयाचा उच्चार इथे करणे हे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे ठरेल, मात्र आमच्या मनातील भावना तशीच आहे. 'सर्व काही जुळून आले तर कर्तव्य पुन्हा जन्माला येईलही कदाचित', असेही गुरुजींनी त्याच संपादकीय निवेदनात लिहिले होते. एक्काहत्तर वर्षांनंतर तो योग जुळून आला आहे याचा आम्हाला आनंद आहे, मात्र घेत असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक आहे. त्यामुळे साधनाप्रमाणेच कर्तव्यवरही वाचकांचा लोभ राहावा अशी विनंती आहे.

साधना ट्रस्ट मार्फत साप्ताहिक, प्रकाशन व मीडिया सेंटर ही तीन मुख्य युनिट्स चालवली जात आहेत, कर्तव्य हे आता चौथे युनिट झाले आहे. साधनाने डिजिटल माध्यमात उतरावे यासाठी इंडिपेंडंट अँड पब्लिक स्पिरिटेड मीडिया फाऊंडेशन (IPSMF) या संस्थेने भरीव अर्थसहाय्य व प्रोत्साहन दिले आहे. त्यासोबतच हे डिजिटल पोर्टल सुरू करण्यासाठी अनेक व्यक्तींचा व संस्थांचा सहभाग महत्वपूर्ण राहिला आहे. इव्होनिक्स (Evonix), पुणे या सॉफ्टवेअर कंपनीने डिझाईन केले आहे. एम. के. सी. एल.(MKCL), पुणे या संस्थेने सातत्याने तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन दिले आहे. याशिवाय अनेक हितचिंतकांनी वेळोवेळी आवश्यक ती मदत केली आहे. साधना ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी गंभीर व जबाबदार पत्रकारितेचा (Serious journalism) दूरगामी विचार करून, हे पोर्टल चालवण्यासाठी नियोजन केले आहे. या पोर्टलद्वारे तरुण वर्ग आणि मुद्रित (प्रिंट) माध्यमापासून दूर असलेला वाचक वर्ग साधनाशी जोडला जाईल अशी आशा आहे.

साधना ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात विवेक सावंत (अध्यक्ष), हेमंत नाईकनवरे (सचिव), गणपतराव पाटील, सुहास पळशीकर, हमीद दाभोलकर, विनोद शिरसाठ यांचा समावेश आहे.

कर्तव्य साधनाचे दैनंदिन कामकाज पाहणारी टीम :

संपादक : विनोद शिरसाठ

सहसंपादक : सुहास पाटील

मुख्य समन्वयक : सुदाम सानप

व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि संपादन  : साईनाथ जाधव

संपर्क / कार्यालय :

कर्तव्य साधना

431, शनिवार पेठ, वीर मारुती चौक, पुणे 411030

Ph : 020 24451725

Mob : 7058286750

Email : editor@kartavyasadhana.in / admin@kartavyasadhana.in

The Independent and Public Spirited Media Foundation has provided financial support to Sadhana Trust (Weekly Sadhana and Kartavya Sadhana) for the purpose of reporting and publishing stories of public interest. IPSMF does not take any legal or moral responsibility whatsoever for the content published by Sadhana on their website weeklysadhana.in and kartavyasadhana.in or on any of its other media platforms.