चार नगरांतील नारळीकरांचे विश्व

चार नगरांतील नारळीकरांचे विश्व

आत्मचरित्रातून दिसणारा नारळीकरांचा वैज्ञानिक दृष्टीकोन

शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक हे शब्द उच्चारले की पाठोपाठ जयंत नारळीकरांचे नाव आपसूक घेतले जाते, इतका त्यांचा भारतातल्या विज्ञानजगतावर प्रभाव आहे. नुकतेच 20 मे 2025 रोजी त्यांचे निधन झाले, त्यानंतर साधना साप्ताहिकात आणि कर्तव्यसाधनावरदेखील नारळीकरांच्या कर्तृत्वाविषयी मान्यवरांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. प्रस्तुत लेखात स्वतः नारळीकर स्वतःविषयी, आणि विज्ञान, शिक्षण, संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टीकोन याविषयी काय म्हणतात हे त्यांच्या 'चार नगरांतील माझे विश्व' या आत्मचरित्राच्या आधारे राहुल विद्या माने यांनी मांडले आहे.


जयंत नारळीकर यांचे ‘चार नगरांतील माझे विश्व’ हे आत्मचरित्र प्रवासवर्णनासारखे आहे. त्यांना माणूस म्हणून केलेल्या त्यांच्या प्रवासात काय दिसले, काय भावले किंवा नाही, काय पटले किंवा नाही अशा दृष्टिकोनातून त्यांनी लेखन केले आहे. या प्रवासाच्या केंद्रस्थानी आहेत ज्ञान-विज्ञानची केंद्रे, संस्था आणि विद्यापीठे.

पुस्तकाविषयी ते स्वतःच म्हणतात - “माझे आजवरचे आयुष्य मुख्यत्वेकरुन चार नगरांत गेले. : बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे. प्रत्येक संक्रमणाच्या वेळी आपण एक धाडस करतो आहोत असे वाटायचे. बनारसच्या शांत, सुखासीन जीवनपद्धतीला रामराम ठोकून परदेशात तीव्र चढाओढीच्या वातावरणात पदार्पण करताना आपण निकटवर्तीयांपासून दूर, एकटे आहोत, यापुढची तीन वर्षे स्वदेशी, स्वगृही परत जायला मिळणार नाही, ही जाणीव मन व्यथित करत होती. पण केंब्रिजचे आव्हानही आकर्षित करत होते. रँग्लर परांजपे आणि महाजनी व त्यांच्या पाठोपाठ माझे वडील यांच्याप्रमाणे आपणही काही पराक्रम गाजवावा असे वाटे. केंब्रिज सोडून भारतात परतायचा निर्णय घेतला तेव्हा 'कशाला हे धाडस करता?' हे विचारणारे अनेक जण भेटलेच; पण तेव्हासुद्धा आपल्या हातून देशबांधवांकरता काहीतरी सकारात्मक घडावे हा विचार प्रेरक ठरला. एक प्रख्यात सुसंस्थापित संशोधनाची जागा सोडून दुस-या नगरात शून्यातून नवी संस्था निर्माण करायचे आव्हान स्वीकारणे पुढे धाडसाचे वाटले तरी आकर्षितही करत होते. अशा ह्या चार नगरांतल्या माझ्या पुढच्या तीन आव्हानांची ही आत्मकथा आपल्याच शब्दांत सांगावी म्हणून हे पुस्तक लिहिण्याचे धैर्य करत आहे. आत्मचरित्र कसे लिहावे याचे काही दंडक असले तर ते मला माहीत नाहीत. मला माझ्या गोष्ट जशी सांगावीशी वाटली तशी मी सांगितली आहे. तज्ज्ञांनी चूकभूल द्यावी घ्यावी !”

डॉ. नारळीकर यांच्या बालपणाची आणि तारुण्याची बरीच वर्षे बनारसमध्ये गेली. बनारस हिंदू विद्यापीठामधील गणित विभागात त्यांचे वडील प्राध्यापक होते. या विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय हे ऑक्सफर्ड-केम्ब्रिज विद्यापीठांच्या वास्तुरचनेने प्रभावित झाले होते व हे नवे विद्यापीठ साकारताना ऑक्स-ब्रिजचे अनुकरण काही बाबतीत तरी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ऑक्सफर्डमधून आयसिस नदी तर केंब्रिजमधून ग्रांटा नदी वाहते म्हणून त्यांनी आपलेही नवे विद्यापीठ गंगातीरी १९१६ मध्ये सुरू केले.

विद्यापीठे आणि लोकशाही
विद्यापीठ हे निर्भय, स्वतंत्र आणि समर्पित असे ज्ञान निर्मितीचे केंद्र असावे आणि त्यात कोणाचीही ढवळाढवळ असू नये, याबद्दल आग्रही असलेले प्रा. नारळीकर बी.एच.यू.ची एक आठवण यानिमित्ताने सांगतात. युनायटेड प्रोव्हिन्सेस सरकारने विद्यापीठावर देखरेख ठेवायला सैनिक तुकडी पाठवायचा निर्णय घेतला. त्या वेळी डॉ. राधाकृष्णन यांनी कुलगुरू या नात्याने विद्यापीठाच्या आवारात सैन्याला किंवा पोलिसांना पाऊल ठेवू द्यायला विरोध केला. ‘आमच्या आवारात कायद्याचे पालन होईल आणि शांतता राखली जाईल याची हमी मी कुलगुरू म्हणून देतो. बाहेरचे सैन्य आम्हाला नको.’ असे त्यांनी ठणकावून सांगितल्याने ब्रिटीश सरकारने माघार घेतली. असामान्य प्रतिष्ठेचा व गुणवत्तेचा माणूस कुलगुरू असलं तर शासन त्याच्यापुढे दबते. या पार्श्वभूमीवर आजची परिस्थिती विदारक आहे.” अशी खंतही ते व्यक्त करतात. 

केंब्रिज विद्यापीठात गेल्यावर ट्रायपॉस या गणितातील संशोधन करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण असलेल्या परीक्षेच्या तयारीच्या दरम्यान त्यांचे मार्गदर्शक-गुरु आणि त्यांच्या संशोधनाच्या प्रश्नाचा उलगडा झाला. “संशोधनाच्या उंबरठ्यावर” यामध्ये ते म्हणतात, “मी दारावरची घंटा वाजवल्यावर आतून कुत्र्याच्या भुंकण्याचा प्रतिसाद आला. लवकरच स्वतः फ्रेड हॉईल यांनी दार उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते व हात पुढे करून त्यांनी माझे अभिनंदन करून आत घेतले. खुर्चीवर स्थानापन्न झाल्यावर त्यांनी सरळ मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले, मी तुला संशोधनासाठी विचार करायला काही प्रश्न सुचवतो—पहा तुला कसे वाटतात ते. पहिला प्रश्न होता विश्वरचनाशास्त्रातला. दुसरा गुरुत्त्वाकर्षणाच्या लहरींशी जोडलेला तर तिसरा व्यापक सापेक्षतेच्या समीकरणाशी. रेडीओ स्त्रोतांच्या मुळाशी असलेल्या इलेकट्रोन कानांच्या उर्जेचा वर्णपट काय असेल, हा चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न होता अद्ययावत संगणक वापरून ताऱ्याच्या अंतर्भागाचे चित्र अधिकाधिक अचूक रेखाटण्याचा. मला असे वाटले होते की विश्वरचनाशास्त्राच्या संदर्भात ते त्यांनीच 1948 साली मांडलेल्या स्थिरस्थिती (Steady State) सिद्धांताचा उल्लेख करतील. यावर काही प्रश्न नाहीत काय असं मी विचारल्यावर ते स्मित करून म्हणाले की या वादग्रस्त सिद्धांताच्या भोवऱ्यात माझ्यासारख्या नव्या संशोधक विद्यार्थ्याने भरकटू नये. पुढे जे काही घडणार होते त्याचे पुनरावलोकन करताना मला या संभाषणातल्या वक्रोक्तीचा अनुभव येतो.”

केंब्रिज विद्यापीठाची लोकशाहीमधील भूमिका सांगताना ते म्हणतात, “मी केंब्रिजला येण्यापूर्वी तेथील प्रख्यात ‘डीबेटिंग सोसायटी’ केंब्रिज युनियनची ख्याती ऐकली होती. एका सर्वमान्य इंग्लिश क्लबच्या धर्तीवर ऑक्सफर्ड आणि केंब्रिज युनियनची रचना झाली होती. पण त्याचे वैशिष्ट्य प्रस्थापित झाले होते तेथील वादविवाद सभांमुळे. ब्रिटनचे नाणावलेले वक्ते, या दोन युनियनमधील व्याख्यान सभांत शिकून तयार झाले. त्यांत देशातले पंतप्रधान, पार्लमेंट सदस्य आदींचा समावेश होतो. या वादविवाद सभांत श्रोता म्हणून प्रवेश मिळावा म्हणून मी युनियनचा आजीव सभासद झालो. या डिबेटकडे राष्ट्रीय पत्रकारांचे तसेच समाजधुरिणांचे, राजकारण्यांचे लक्ष असते. पण कौतुक याचे वाटते की सरकारविरुद्ध सडेतोडपणे मत व्यक्त करायला नागरिकच काय, विद्यार्थीदेखील चाचरत नाहीत. आपण जरी ब्रिटिशांकडून डेमोक्रसीची दीक्षा घेतली तरी ती आपल्या रक्तात भिनायला अजून काही दशके जावी लागतील.”

विश्वनिर्मितीचे दोन सिद्धांत - आमनेसामने :
पारंपारिक - धार्मिक समजुती, पूर्वग्रह आपल्या आधुनिक विज्ञान संशोधनाच्या प्रक्रियेवर कसा नकारात्मक परिणाम घडवून आणू शकतात याबद्दल प्रा. नारळीकर यांनी एक महत्त्वाची आठवण सांगितली आहे. ते म्हणतात, “तर खरे विश्व स्थिरस्थितीचे की महास्फोटातले? हे तपासून पाहायला विश्वाची पूर्वकाळातली घनता मोजून ती आजच्या घनतेइतकीच आहे, का त्यापेक्षा जास्त होती हे ठरवले पाहिजे. केंब्रिजमधील कॅव्हेंडीश प्रयोगशाळेतील रेडीओ खगोल विभागाचे मुख्य प्राध्यापक मार्टिन राईल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेडीओ लहरींच्या दूरदूरच्या स्त्रोतांची संख्या मोजून असा दावा केला की दूरच्या स्त्रोतांचे वितरण जास्त दाटीवाटीने आहे. जेव्हा आपण दूरचा स्त्रोत पाहतो तेव्हा तो सध्याच्या स्थितीत नसतो. तेथून प्रकाश (रेडीओ लहरींच्या रुपात) आपल्याकडे यायला जितका वेळ घेतो तितक्या कालखंडापूर्वीचे ते दर्शन असते. म्हणून राइलचा असा दावा होता, की ही पाहणी महास्फोटाच्या कल्पनेला (बिग बँग थेअरी) ला दुजोरा देत होती आणि स्थिर स्थितीच्या विश्वाला (स्टेडी स्टेट थेअरी) ‘चुकीचा सिद्धांत’ असा शेरा बहाल करत होती. जनसामान्याला विशेषतः पाश्चात्त्य देशात, अनादी-अनंत विश्वापेक्षा एका ठराविक वेळी जन्मलेल्या विश्वाची कल्पना अधिक भावते. पूर्वी आर्चबिशप अशरने म्ह्टले होते, की विश्वाची उत्पत्ती ख्राईस्टपूर्वी सहा हजार वर्षे झाली होती. जरी हा कालखंड आज चुकीचा ठरतो तरी देवाने अमुक वेळी विश्वाची निर्मिती केली ही धारणा ज्युडो-ख्रिश्चन-इस्लाम धर्माची आहे. एखाद्या वैज्ञानिक सिद्धांताच्या तपासणीत असे ‘गैर-वैज्ञानिक’ निकष प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीत्या शिरू नयेत, पण तसे घडत राहते हे मी वेळोवेळी अनुभवले आहे. राइलच्या शोधाला वारेमाप प्रसिद्धी मिळाली याचे प्रमुख कारण त्यातील निष्कर्षांचा धार्मिक विश्वासाना आधार मिळतो हे होते. स्वतः राइल धार्मिक प्रवृत्तीचा आणि धार्मिक कुटुंबात वाढला असल्याने त्याची प्रवृत्ती स्वाभाविकपणे महास्फोटाच्या बाजूने असावी यात नवल नाही.”

विज्ञान प्रसारामागील खुली भूमिका 
विज्ञान सोपं करून सांगणं का अतिशय गरजेचं आहे याबद्दल डॉ. नारळीकर यांचे चिंतन या पुस्तकात अनेक ठिकाणी आपल्याला भेटते. ते म्हणतात, “सामान्य वाचकाला विज्ञान-तंत्रज्ञान याबद्दल जिज्ञासा आहे, तशी भीती पण आहे. भीती याकरता की हे विषय आपल्याला समजणार नाहीत, असा त्यांचा समज दृढ आहे. म्हणून ज्याला सोप्या भाषेत आणि तांत्रिक शब्दांचे अवडंबर न ठेवता लेखन करता येते त्याला या क्षेत्रात पुष्कळ वाव आहे. एखादी वैज्ञानिक कल्पना साध्या गोष्टी, उदाहरणे सांगून उपमा विशद करता येते. अर्थात ही तारेवरची कसरत असते. कारण लेखकाला मूळ वैज्ञानिक गाभ्याशी फारकत घेऊन लिहिता येत नाही. यादृष्टीने सोपे लिहिताना विज्ञानावरही अन्याय करून चालत नाही. आणखी एक गोष्ट बहुभाषिक भारतात महत्त्वाची आहे, ती म्हणजे विविध भाषांतून विज्ञान प्रसाराची असणारी नितांत गरज. जरी विज्ञानासाठी इंग्रजी ही जागतिक भाषा मानली जाते तरी सामान्य माणूस विज्ञानाची प्राथमिक माहिती मातृभाषेतून ग्रहण करणे पसंत करतो.” 

आणि प्रकटली विज्ञानकथा....
त्या ओघानेच मराठी विज्ञानकथांच्या युगाला कशी सुरुवात झाली याची कहाणी ते सांगतात. 1974 मध्ये मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान लघुकथांची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात त्यांनी सहभाग कसा घेतला ही गोष्ट मुळातून वाचण्यासारखी आहे. या स्पर्धेत आपल्या लोकप्रियतेचा गैरफायदा मिळू नये म्हणून नारळीकर यांनी आपले नाव नारायण विनायक जगताप घेऊन आपल्या पत्नीच्या म्हणजे डॉ. मंगला यांच्या हस्ताक्षरात कथा लिहून आणि दुसराच कुठलातरी पत्ता आपला म्हणून लिहून कथा स्पर्धेत पाठवून दिली. नारळीकर यांच्या कथेला पहिले पारितोषिक मिळाल्यावर त्यांना खरे नाव उघड करावे लागले. त्यांची ही पुरस्कारप्राप्त कथा ‘कृष्णविवर’ ही त्या वेळच्या साहित्य संमेलन अध्यक्ष दुर्गाबाई भागवत यांच्या नजरेस पडली. त्यांनी कराड येथील साहित्य संमेलनात या कथेचे आणि नारळीकरांचे कौतुक केले. विज्ञानकथेच्या माध्यमाने त्यांनी साहित्यात एक नवे दालन उघडले असे गौरवोद्गार त्यांनी काढले. इतकी मान्यता लाभूनही नारळीकर म्हणतात की, “मराठी साहित्यात आणि साहित्यिकांत विज्ञानकथा वांड:मयाला अपेक्षित अशी प्रतिष्ठा लाभली नाही. विज्ञान म्हणजे की समजायला अवघड विषय अशीच भावना सर्वसामान्यांत असते. त्यामुळे विज्ञानकथा देखील समजायला अतिशय अवघड आहे, असा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर करणाऱ्या विज्ञान कथा निर्माण व्हायला हव्यात.”

वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व 
प्रा. नारळीकर यांचे आयुष्य म्हणजे खगोलशास्त्रातील त्यांचे संशोधन, भौतिकशास्त्र मध्ये त्यांनी केलेले लेखन आणि विज्ञान-शिक्षणाचा त्यांनी केलेला प्रसार एवढंच नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल त्यांची तळमळ वादातीत आहे. याबद्दल ते एक आठवण सांगतात. दि. 14 नोव्हेंबर 1976 रोजी डॉ. नारळीकर यांनी दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू व्याख्यान दिले होते. अध्यक्षस्थानी आणीबाणीतील पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्या भाषणाच्या अनुषंगाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल त्यांची कृतिबद्ध होत गेलेली भूमिका सांगताना ते म्हणतात, “आपल्या समाजावर, सर्व स्तरांवर, अंधश्रद्धांचा किती जबरदस्त पगडा आहे. वैयक्तिक व सार्वजनिक दोन्ही स्तरांवर निर्णय तर्कशुद्ध विचारसरणीने घेण्याऐवजी रूढी, परंपरा आणि वेडगळ समजुतींच्या आधारे घेतले जातात. सर्वात व्यापक अंधविश्वास आहे फलज्योतिषावर. ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो, हा विश्वास इतका खोलवर जनमनात रुजलाय की त्याला कसलाही वैज्ञानिक पुरावा नाही, त्याची भाकिते वैज्ञानिक निकषांवर उत्तीर्ण होत नाहीत, हे वास्तव दुर्लक्षिले जाते. पत्रिका जुळल्याशिवाय लग्न नाही, पितृपक्षात नवी खरेदी करायची नाही, अवसेला सर्जरी टाळायची, ग्रहांना अनुकूल दिवस-वेळ ठरवूनच मंत्र्यांना शपथ द्यायची, प्रस्थान ठेवून प्रवासाला बाहेर पडणे आदी अनेक उदाहरणे दैनंदिन जीवनात सापडतात. सुशिक्षित स्त्री-पुरुष तर सारासार विचार न करता अशा अंधविश्वासाच्या आहारी गेलेले दिसतात. इतकेच नव्हे, आजची तरुण पिढी तर आमच्या वेळच्या तरुण पिढीपेक्षाही अधिक अंधश्रद्ध आहे, कारण त्यांच्या जीवनातले ताण-तणाव, स्पर्धा वाढली आहे. भारताकडे पूर्वी साधूसंतांच्या शिकवणीचा, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा, पुष्कळ साठा आहे. परंतु आजच्या दिवसात दिसणारी बरेच उदाहरणे आहेत ढोंगी बाबांची... लेख, व्याख्याने, रेडीओ, टी.व्ही. आदी माध्यमांतून सामान्य जनांत वैज्ञानिकता वाढवण्याचा, त्यांना सजग करण्याचा प्रयत्न करत वैज्ञानिक दृष्टीकोनामागचे नेमके तथ्य सांगायचा प्रयत्न मी वेगवेगळ्या अंगाने करत आलोय. पण तरीही उद्दिष्ट अजून हाती आलेय असे वाटत नाही. ते पुष्कळ दूर आहे; असेच आजही वाटते.”
 
आपल्या देशामध्ये विज्ञान शिक्षणाची आणि त्या ओघाने संशोधनाची दिशा काय असावी याबद्दल ते एके ठिकाणी म्हणतात, “सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला अस्ताला जातो म्हणजे नेमके काय? पूर्व कुठे आणि पश्चिम कुठे? उगवणे आणि अस्ताला जाणे म्हणजे काय? एक वेळ सूर्य म्हणजे कुठली गोष्ट हे जरी विद्यार्थ्याला माहीत असले तरी त्यांना अजून काहीतरी शंका असतीलच. दरवेळी पूर्वेला उगवणारा सूर्य तोच का दरवेळी वेगळा असतो. तोच असला तर पश्चिमेला गडप झालेला part पूर्वेला कसा दिसू शकतो. विद्यार्थ्याला स्वतःला हे प्रश्न सुचले तर उत्तमच...पण त्यांचे निराकरण करणे शिक्षकाचे कर्तव्य ठरते. जरी त्यांना हे प्रश्न सुचले नाहीत तरी ते प्रश्न शिक्षकांनी सुचवायला हवेत.

नेहरूंचे एक उद्गार नारळीकर आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेवर टिपणी करताना सांगतात, “विद्यापीठ हे मानवता, तर्कशुद्ध विचारसरणी, कल्पनांच्या भराऱ्या आणि सत्याच्या शोधासाठी असते. मानवजातीची उच्चस्तर उद्दिष्टे गाठण्याच्या प्रयत्नांचे ते द्योतक आहे. जर विद्यापीठे आपली कर्तव्ये नीट बजावत असली तर राष्ट्राचे आणि त्याच्या नागरिकांचे कुशल आहे असे समजावे.”
 
आयुकाच्या मुख्यद्वारातून आत प्रवेश करताना समोर भिंतीवर दिसते ते आयुकाचे ‘स्मृतीचिन्ह’. आयुकाच्या कार्याची आठवण करून देणारे हे चित्र कीर्ती त्रिवेदी यांनी सुचवले. चित्राचे दोन अर्थ काढता येतात. एक म्हणजे या आकृतीतील रेषा अमुक ठिकाणी सुरु होत नाही आणि अमुक ठिकाणी संपत नाही. विश्वाचा अभ्यास असाच अनादि-अनंत असतो. तसेच या चित्रातील रेषेचा गुंतावला पाहून असे दिसते की आयुका पण आपल्या कार्याद्वारे विद्यापीठांशी गुंतलेली आहे. आयुका ही भारतातली पहिलीवहिली वैज्ञानिक संशोधन संस्था होती जिने विज्ञानप्रसार व शालेय विद्यार्थ्यांत विज्ञान रुजवणे यासारखे जनताभिमुख कार्यक्रम हाती घेतले. त्यामागे नारळीकरांचीच प्रेरणा होती. अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींमुळे नारळीकरांचे हे आत्मचरित्र वारंवार वाचनीय आहे. अशा “वैज्ञानिक आत्मकथा” आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असावा असे वाटते, जेणेकरून तरुणांना प्रेरणा मिळावी. 
 
- राहुल विद्या माने
nirvaanaindian@gmail.com
(स्वतंत्र पत्रकार, अनुवादक, लेखक)

Tags: autobiography चार नगरांतील माझे जीवन मुंबई पुणे जयंत नारळीकर आयुका Inter-University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA) IUCAA TIFR टाटा मूलभूत संशोधन संस्थान Tata Institute of Fundamental Research Cambridge केंब्रिज बीएचयू (बनारस हिन्दू यूनिवर्सिटी) बनारस हिन्दू यूनिवर्सिटी बीएचयू BHU Benares Hindu University Load More Tags

Add Comment