मानवता स्थापनेसाठी नवी वसाहत

साने गुरुजींच्या 'नवा प्रयोग' या कादंबरीतील एक प्रकरण

साने गुरुजींच्या बरीच वर्षे उपलब्ध नसलेल्या चार पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या साधना प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होणार आहेत. - 'क्रांती', 'नवा प्रयोग', 'संध्या' आणि 'सोन्या मारुती' ही ती चार पुस्तके. क्रांती, नवा प्रयोग आणि संध्या या कादंबऱ्या आहेत. संवेदनशीलतेची, सेवाकार्याची आणि त्यागाची महती प्रासादिक पद्धतीने त्यांत मांडलेली आहे. तर सोन्या मारुती या पुस्तकात वसंता आणि वेदपुरुष यांच्या भेदक, टोकदार संवादाची सात दर्शने आहेत. स्वरूप आणि भाषेचा लहेजा वेगवेगळा असला, तरी यातील समाजजीवनावरचे भाष्य मार्मिक आहे. ते आजही लागू पडते, अंतर्मुख करते आणि चिंतेतही टाकते. 11 जून 2025 रोजी साने गुरुजींचा 75 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त गुरुजींना अभिवादन म्हणून 10 आणि 11 जून हे दोन दिवस त्यांच्या क्रांती आणि नवा प्रयोग या कादंबऱ्यांतील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.

नवा प्रयोग ही साने गुरुजींनी लिहिलेली शेवटची कादंबरी. या कादंबरीचा नायक घनश्याम हा कामगारनेता आहे, कामगारांच्या हक्कांसाठी एका कारखान्यात त्याने संप घडवून आणलेला आहे, परंतु संप यशस्वी नाही झाला तर कामगारांची दैना होऊ नये म्हणून त्याने एक नवा प्रयोग योजून ठेवलेला आहे. नवी वसाहत वसवावी; नवसमाजनिर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखवावे; सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र सहकारी शेती करावी; छोटे उद्योगधंदे उभारावे; स्वतंत्र सुखी जीवन जगावे; असा तो नवा प्रयोग त्याच्या मनात आहे. गुरुजींच्या स्वप्नातील सर्वांगसुंदर भारतीय संस्कृतीचं दर्शन या कादंबरीत घडतं. कादंबरीतील ‘सीमोल्लंघन’ या आठव्या प्रकरणाचा हा एक अंश – 


जमीन नांगरून झाली. काही काही तात्पुरती पिके नदीच्या पाण्यावर करण्यात आली होती. भाजीपाला लावण्यात आला. फुलझाडेही फुलू लागली होती. सर्वांना अपार उत्साह वाटत होता.

आणि पावसाळा आला. जमीन भिजली. वाफसा होऊन पेरणी करण्यात आली. सर्वांना आनंद झाला. पिके वाढत होती. फुले फुलत होती. मुले खेळत होती. मोठी माणसे काम करीत होती. स्वर्गनिर्मिती होत होती.

घना, सखाराम व इतर सारे देशाचे काय होणार इकडेही लक्ष देत होते. वर्तमानपत्रे येत. चर्चा चालत. फाळणी होणार, हे ऐकून प्रथम सर्वांना वाईट वाटले. परंतु घनाने साऱ्या गोष्टी नीट समजावून दिल्या.

तो म्हणाला, आज ना उद्या हे प्रश्न उपस्थित झालेच असते. सलग अशा कोट्यवधी लोकांना तरवारीच्या जोरावर कोण कोठवर रोखून धरणार ? आपणास गेल्या हजार वर्षांत एकजीव होता आले नाही, ही गोष्ट खरी. संतांनी, ध्येयवादी लोकांनी प्रयत्न केले. परंतु सहा हजार मैलांवरची साम्राज्यसत्ता आली आणि तिने तो पूर्वजांचा समन्वय प्रयोग धुळीला मिळवला. फोडा नी झोडा- यावरच तर साम्राज्यशाही टिकत असते. एकत्र राहून रोज कटकटी असण्याऐवजी दूर होऊनही समंजस राहिले तर चांगलेच म्हणायचे, ही गांधीजीची दृष्टी असावी. दोन देशांत एक आत्मा, एक मन निर्मिण्यासाठी ते सारी शक्ती खर्चतील.

आपल्याकडे जे मुसलमान बंधू राहतील त्यांना निर्भय वाटेल असे आपले वर्तन हवे. आपण भारतवर्षाचे - दहा हजार वर्षांचे - सर्वांना एकत्र नांदवून बघण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी झटू. आपल्या या लहानशा वसाहतीत आपण तो प्रयोग करीतच आहोत. येथे आपण भूमीच सुपीक करीत आहोत, लागवडीस आणीत आहोत ,असे नाही; तर मनोभूमीचीही मशागत करीत आहोत. येथे लाला आहे, कुतुब आहे, अहमद आहे; तसेच रामदास, बाबू, रघुनाथ वगैरे आहेत. येथे स्पृश्य आहेत, येथे अस्पृश्य आहेत. आपण भेदांपलीकडे जाऊन मानवतेची स्थापना येथे करीत आहोत."

15 ऑगस्ट 1947! हिंद स्वातंत्र्य घोषवण्यात आले. त्या वसाहतीत तिरंगी झेंडा फडकविण्यात आला. रानफुलांच्या माळांची तोरणे सर्वत्र लावण्यात आली. नवीन केलेल्या बगीचातीलही काही फुले त्या माळांत नि तोरणांत होती.

परंतु एकेक विलक्षण वार्ता कानावर येऊ लागल्या. निर्वासितांच्या करुण वार्ता कानावर येऊ लागल्या. कत्तली, मारामाऱ्या. सखाराम खिन्न झाला. देशात शांती यावी म्हणून त्याने तीन दिवस उपवास केला. तो त्यांच्या वसाहतीच्याजवळच एक गंभीर दृश्य त्यांना आढळले. त्या पाहा. काही बैलगाड्या जात आहेत. कोण आहे त्याच्यात ?

रामदास नि बापू गेले. ती दहा मुसलमान कुटुंबे होती. ती दूरच्या एका गावची होती. त्या गावच्या लोकांनी, 'येथून जा' असे त्यांना सांगितले. काय करतील विचारे ? होते नव्हते ते गाड्यात घालून जात होते.

"कोठे जाणार ?" रामदासाने विचारले.

"अल्लाको मालूम !" एकजण दु:खाने म्हणाला.

"तुम्ही आमच्यात रहा. आमच्यात मुसलमान मित्रही आहेत. आम्ही येथे सहकारी जीवन जगतो. सारे भाऊ भाऊ जणू बनलो आहोत. प्रभूनेच तुम्हाला रस्ता दाखवला असेल. नका जाऊ दूर. ही मुले भुकेली आहेत." रामदासने गोड वाणीने सांगितले.

इतक्यात कुतुब, लाला, अहमद हेही आले.

"यही रहना. ये सब दोस्त है. खतरा नहीं, धोखा-दगा नहीं. सबके साथ काम करना, मौजसे रहना." कुतुब म्हणाला.

घना व सखारामही आले. त्यांनी त्या सर्वांना आपल्या वस्तीत नेले. त्यांची त्यांनी व्यवस्था केली. मुलांना दूध देण्यात आले.

तिकडे महात्माजी देशातील ज्वाला शांत करीत होते. हिंदमध्ये नीट रहा, मी पाकिस्तान शांत करायला जाईन, म्हणत होते. स्वराज्य आले, परंतु राष्ट्राचा आत्मा मला कोठेच दिसत नाही, असे ते करूणपणे म्हणाले.

घना व सखाराम दु:खी होते. परंतु दु:ख विसरून ते सर्वांबरोबर राबत. पावसाळा संपत आला. पीक मस्त आले. ज्वारी, बाजरी, मकई यांचे पीक आणि रब्बीच्या पिकाचीही पेरणी झाली. गहू, हरबरा पेरण्यात आला. तिकडे थंडीत होणाऱ्या कोबी वगैरे भाज्या लावण्यात आल्या. काकड्या, भोपळे भरपूर लागले. एकेक भोपळा मोठ्या हंड्याएवढा; आणि टमाटोची नवीन लागवड खूप करण्यात आली. थोडे थोडे सोनखत त्यांना टाकण्यात आले.

एके दिवशी अमरनाथ अकस्मात आला. तो तेथील लोकांना महात्माजींचा आशीर्वाद घेऊन आला होता. अमरनाथ दिल्लीस गेला होता. या नवप्रयोगाची माहिती त्यांनी गांधीजींना दिली. मुसलमान निर्वासितांना कसे आपल्यात घेतले ते सांगितले. त्यांनी वसाहतीला आशीर्वाद दिला. अमरनाथने सरदारांचीही भेट घेतली. वसाहतीचा प्रयोग उद्या विलीनीकरणानंतरही चालू राहायला हवा. या प्रयोगाला मदत मिळायला हवी, असे त्याने सांगितले. त्या प्रयोगाची हकिकत ऐकून सरदारांनी धन्यवाद दिले. अमरनाथ या सर्व गोष्टी सांगायला आला होता.

त्याने सारी शेती पाहिली. तो प्रसन्न झाला.

रात्री सर्वांना जमवून तो म्हणाला, "काळ बदलला आहे. राजेरजवाड्यांचे युग जात आहे. इंदूर वगैरे संस्थाने विलीन होऊन एक नवीन प्रांत बनवला जाईल. परंतु जे नवे मंत्रिमंडळ येईल ते तुमच्या प्रयोगास सर्वतोपरी मदत देईल. मी दिल्लीला अनेकांना भेटून तुमच्या प्रयोगाची माहिती त्यांना सांगितली. सर्वांनी तुम्हाला धन्यवाद दिले आहेत. आणि तुम्ही परित्यक्त मुसलमान बंधुभगिनींनाही आपल्यात घेतलेत, हे ऐकून गांधीजींचे डोळे आशेने चमकले! तुमच्या या प्रयोगाला त्यांनी शुभ इच्छिले आहे. आणखी काय पाहिजे ? असेच येथे खपा. बाहेरची शेती करा नि हृदयाची करा. शेती उभय प्रकाराची असते. ज्वारी-बाजरी-गव्हाची ही बाहेरची शेती, आणि प्रेम, दया, धैर्य, ज्ञान, यांची मानसिक शेती. दोन्ही पिके येथे मस्त येवोत."

अमरनाथ गेला.

थोड्या दिवसांनी वसाहतीचा पहिला वाढदिवस आला. परंतु देशातील परिस्थिती लक्षात घेऊन तो साजरा करण्यात आला नाही. दिवस जात होते. गांधीजींच्या उपवासाची, बाँब फेकल्याची आणि अखेर त्यांच्या खुनाची, अशा हृदयविदारक वार्ता आल्या. सर्वांची तोंडे सुकून गेली. एक दिवस सर्वांनी उपवास केला.

सखाराम म्हणाला, "गांधीजींनी दु:ख गिळून कर्तव्य करायला शिकवले आहे. ते आपण करीत राहू. आपण येथे नीट नांदू तर ते आपल्याजवळ आहेत असा अनुभव येईल."

काही दिवस वातावरण उदास होते. परंतु कामात पुन्हा सारे रमले. दुसरे वर्ष सुरू झाले होते. मालती लहान मुलांमुलींना शिकवी. ती त्यांच्याबरोबर काम करी, त्यांना गोष्टी सांगे. गाणी शिकवी. मोठ्या माणसांना सखाराम, घना हे शिकवीत. कोणी निरक्षर राहायचे नाही असा संकल्प होता. पार्वतीने तर ध्यास घेतला शिकण्याचा. ती आता वर्तमानपत्रं वाचू लागली होती.

वसाहतीला रंगरूप येत होते. नव-सृष्टी, नव-संस्कृती निर्माण होत होती.

श्रमणाऱ्या, धडपडणाऱ्या ध्येयार्थी जीवांनो, श्रमा. तुमची धडपड वाया जाणार नाही.

- पांडुरंग सदाशिव साने

Tags: साधना आंतरभारती नवा प्रयोग सर्वधर्म समभाव खरा तो एकचि धर्म साने गुरुजी साने गुरुजी 75 वा स्मृतीदिन मूल्यव्यवस्था Load More Tags

Comments:

Hira Janardan

Nation is passing through dark ages.Guruj's words r Still giving hope n courage.

Dattaram V. Jadhav

सानेगुरुजींच्या मनातील भारत साकार करण्यासाठी भारतीय प्रयत्न करीत आहेत पण भारतातील धर्मांधतेला राजाश्रय आहे. त्यामुळे प्रयत्न करणाऱ्यांची दमछाक होत आहे.

Add Comment