साने गुरुजींच्या बरीच वर्षे उपलब्ध नसलेल्या चार पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या साधना प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होणार आहेत. - 'क्रांती', 'नवा प्रयोग', 'संध्या' आणि 'सोन्या मारुती' ही ती चार पुस्तके. क्रांती, नवा प्रयोग आणि संध्या या कादंबऱ्या आहेत. संवेदनशीलतेची, सेवाकार्याची आणि त्यागाची महती प्रासादिक पद्धतीने त्यांत मांडलेली आहे. तर सोन्या मारुती या पुस्तकात वसंता आणि वेदपुरुष यांच्या भेदक, टोकदार संवादाची सात दर्शने आहेत. स्वरूप आणि भाषेचा लहेजा वेगवेगळा असला, तरी यातील समाजजीवनावरचे भाष्य मार्मिक आहे. ते आजही लागू पडते, अंतर्मुख करते आणि चिंतेतही टाकते. 11 जून 2025 रोजी साने गुरुजींचा 75 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त गुरुजींना अभिवादन म्हणून 10 आणि 11 जून हे दोन दिवस त्यांच्या क्रांती आणि नवा प्रयोग या कादंबऱ्यांतील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
त्यापैकी क्रांती या कादंबरीतील हे एक प्रकरण . या कादंबरीची नायिका ही स्वतःसाठी आणि आपल्या गावासाठी शिक्षणाचा ध्यास घेणारी आहे. तिच्या कामाची सुरुवात या 'दिवाळी' नावाच्या प्रकरणात दिसते.
दिवाळीची सुट्टी लागली होती. शांता आपल्या खेडेगावातील घरी गेली. तिच्या गावचे नाव शिवतर. शिवतर गावाला मराठी शाळा नव्हती. गावात लिहिणारा, वाचणारा क्वचितच असे. गावात अज्ञान होते. तसे दारिद्र्यही होते. गावची जमीन सावकारांची, जमिनदारांची. गोविंदराव चव्हाणांची तेथेच बरीच जमीन होती. काही गुजराथी व मारवाडी सावकारांची होती. इतरही सावकार छोटेमोठे होते. गावात सारे भित्रे. तसे ते समोर वाघ येता तर त्याला काठीने मारते; परंतु साधा पोलीस आला. तर ते घाबरत. इंग्रजी राज्यातील हा आमचा सर्वात मोठा अध:पात, आत्मा जणू चिरडला गेला. वाघाच्या इंगळासारख्या डोळ्याला नजर देणारे शेतकरी पोलिसाच्या काळ्या डगल्याला, त्या लहानशा दंडुक्याला भितात आणि मामलेदार म्हणजे तर काही विचारूच नका.
प्रकाशाशिवाय अंधार कसा जाणार, सूर्योदयाशिवाय धुके कसे जाणार? औषधाशिवाय रोग कसा हटणार? प्रेमाशिवाय कलह कसे मिटणार? आणि ज्ञानाशिवाय भीती कशी जाणार? रामनाम म्हटले म्हणजे भुते जातात. जीवनात राम आला म्हणजे कोणता सैतान समोर उभा राहील? ज्ञान म्हणजे रामनाम. स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव म्हणजेच रामनाम.
शांतीला वाटले आपल्या गावातील बहिणींना शिकवावे. ती घरोघर जाई व प्रेमाने बोले. तुम्ही लिहायला, वाचायला शिका असे सांगे.
"शांते, आम्हाला शिकून मडमीण का व्हायचे आहे?" एक भगिनी म्हणाली.
"आम्हाला का नोकरी करायची आहे?' दुसरीने विचारले.
"नोकरीसाठी नाही शिकायचे. मडमीण होण्यासाठी नाही. परंतु मडमीण सात समुद्रापलीकडून एकटी येते. कशाच्या जोरावर? ज्ञानाच्या. ज्ञानामुळे ती निर्भय असते. तुम्हाला रेल्वेने कोठे जायचे झाले तर बरोबर कोणी हवं. आधीच गरीब, परंतु दुप्पट खर्च असा होतो. तिकीट कोठले ते वाचता येत नाही. स्टेशन कोणते ते कळत नाही. तिकिटाची किंमत किती ती समजत नाही. यासाठी शिका'' शांता म्हणाली.
"खरेच की शांता, आम्हाला जायचे होते नगरदेवळा, तर उतरून पडलो जळगाव ला. कोण फजिती !" पार्वती म्हणाली.
"आणि आम्हाला पंढरपूरला जाताना तिकिटाची किंमत जास्त घेतलीन् त्या मास्तराने. म्हणे कसा एकादशीला तिकिटे महाग होतात !" अनसूया म्हणाली.
"एकादशीला का तिकीट महाग होते? शेंगाचे दाणे महाग होतात, खजूर महाग होतो." आनंदी म्हणाली.
"परंतु आपले अज्ञान. त्यामुळे फसतो. त्या पाचोऱ्याचे बाजारात माळणी भाजी विकायला बसत. एक पोलीसदादा येई व उचली वांगी, उचली कांदे, उचली मिरच्या. परंतु एक माळीदादा तेथे होता. त्याच्या वांग्याना हात लावताच तो म्हणाला, 'नाव टिपीन. नाहीतर ठेव खाली वांगी.' तो पोलीस घाबरला. पुन्हा त्याची पीडा आली नाही. ही पीडा कशाने गेली?' शांतेने विचारले.
"त्याला लिहिता वाचता येत होतं म्हणून." अनसूया म्हणाली.
"शेतकऱ्याला पत्र लिहिता येत नाही, अर्ज लिहिता येत नाही. साक्षीदाराशिवाय आलेली मनीऑर्डर मिळत नाही. सर्वत्र त्याला दक्षिणा ठेवावी लागते. हे सारे अज्ञान नको का दवडायला? मागील वर्षी पीक आले नव्हते. कलेक्टर कसा म्हणे 'जमाखर्च दाखवा. कोठून दाखवणार जमाखर्च?" शांता म्हणाली.
"घरातील मडकी रिकामी आहेत, हे का कलेक्टरला माहीत नव्हते? येऊन बघायची होती त्याने. गाडग्या मडक्यांचेही लिलाव केले !" पार्वती म्हणाली.
"परंतु आपणाजवळ ज्ञान असते, निर्भयता असती, तर आपण लढा केला असता. तुम्ही शिका. मी शिकवीन. तुमच्याबरोबर मी कापूस वेचायला येईन. तुम्हाला गाणी सांगेन. आपले दुर्दैव आपण दूर केले पाहिजे." शांतेने सांगितले.
"पण शांते, तू काही म्हण. आपले दैवच खोटे' एक म्हातारी बाई म्हणाली.
"नाही आजी, हे दैव बिव लबाडांनी निर्माण केले आहे. म्हणे तुला शनीची साडेसाती आहे. आजी, जसे सूर्यचंद्र आहेत, तसा एक आकाशात शनी असतो. त्याचा ग काय संबंध? खरी साडेसाती या सावकारांची. सावकाराचा शनी आपल्या राशीला न आला तर आपली धान्याची रास घरी नाही का राहणार? कुणी शनी नाही नी मंगळ नाही. काही श्रम न करता हात पाहणारा लठ्ठ पोटाचा होतो. काही श्रम न करता सावकार लठ्ठ पोटाचा होतो. सावकारही अभिषेक करायला सांगतो. चार आणे देतो. आपल्याला वाटते आपणही असेच करावे. वेडी आपण!" शांता म्हणाली.
"खरेच आपण वेडी'' अनसुया म्हणाली.
"मग येणार ना शिकायला?" शांतेने विचारले.
"हो. येऊ" साऱ्या म्हणाल्या.
"मी म्हातारीही येईल" ती वृद्धा म्हणाली.
शांतेचा वर्ग सुरू झाला. मुकुंदरावांपासून तिने एक प्रार्थना करून घेतली होती. ती प्रार्थना आरंभी म्हटली जाई.
सदा भजा पूजा आपण ज्ञान-भगवाना
ज्ञानावीण जगती मोठे अन्य दैवत ना ।।
ज्ञान नसे तरी ना मान
नसे ज्ञान तरी ना स्थान
ज्ञान मिळवू दुनियेमधले घेऊ आता आण ||
शक्ती एक आहे ज्ञान
ज्ञान देई निर्भयपण
ज्ञान हवे स्त्री-पुरुषांना सर्व माणसांना ||
लिहायास वाचायास
नको कुणी येइ न ज्यास
असा ध्यास लागो आता सर्व हिंदुस्थाना ||
अडाणी न पडून राहू
स्त्रिया अम्ही वरती येऊ
स्त्रियांस का आत्मा बुद्धी हृदय भावना ना ||
पिळवणूक करि मग कोण
अडवणूक करि मग कोण
कमावील तोची खाईल, श्रमे त्यास दाणा ||
ज्ञान मिळवू निर्भय होऊ
शेतकरी वरती येऊ
खरेखुरे राजे होऊ लूट थांबवू ना ||
अशी ती सोपी तेजस्वी प्रार्थना शिवतरांतील लहानथोर भगिनी म्हणू लागल्या. वर्गात मोठा आनंद असे. म्हाताऱ्या बायांबरोबर लहान मुलीही येत. मोठी गंमत येई. तेथे अक्षरे शिकता शिकता कितीतरी गोष्टी दुसऱ्या ऐकायला मिळत.
गावातील तरुण म्हणू लागले, आपण का मागे राहावे? बायांचा वर्ग सुरू झाला की बाहेर येऊन ते ऐकत. बाहेरून बघत. त्यांचीही ज्ञानपिपासा जागृत झाली. एके दिवशी काही किसान युवक शांतेकडे आले व म्हणाले, "आमचाही वर्ग घेत जा ना, ताई."
"काय मोहन, तू सुद्धा शिकणार वाटते?" शांतेने विचारले.
"मी का माणूस नको होऊ? आमच्या गावातील आयाबहिणी पुढे चालल्या. आम्ही मागे का राहू?" तेजस्वी मोहनने उत्तर दिले.
"काल माझी बायको म्हणे 'तुमचे नाव लिहून दाखवते. माहेरी गेले तर तुम्हाला पत्र लिहीन. परंतु तुम्हाला वाचायला कुठे येते? मग जाल शेजारच्या रमीकडे. माझ्याजवळ शिका आता," गणपती सांगितले.
"परंतु बायको असे म्हणाली म्हणून ओरडलास नाही ना तिच्या अंगावर, मारले बिरले नाहीस ना?" शांतेने हसून विचारले.
"नाही ताई. तुम्ही हिताचे तेच करीत आहात. शेतकऱ्याची फार फजिती बघा. वर्तमानपत्र हातात असले म्हणजे मामलेदार खुर्ची देतो, पोलीस रामराम करतो. नाहीतर 'तिकडे बस', 'साब है अंदर', असे सांगून हाकलून देतो" गणपतने अनुभव सांगितला.
"हे बघ मोहन चित्र. हे चीन देशातील आहे. हे शेतकरी शेतात भाकर खायला झाडाखाली बसले आहेत व खाता खाता वर्तमानपत्र वाचीत आहेत. एका हातात नांगर व दुसऱ्या हातात क्रांती वर्तमानपत्र असे होईल तेव्हा स्वराज्य जवळ येईल." शांता म्हणाली.
ते तरुण ते चित्र पाहू लागले. काही दुसरेही शेतकरी भोवती जमले. चित्र पाहू लागले. माना डोलवू लागले.
"ताई, धान्य दिवाणखान्यात का कोणी पेरतो? गालिचे, जाजमे यावर का कोणी पेरतो? धान्य बाहेर शेतात पेरावे लागते. तेव्हा ते फोफावते. स्वराज्याचे विचार शेतकऱ्याच्या नांगराशी येऊन मिळतील तेव्हाच फोफावतील. दिवाणखान्यातील राजकारण का स्वराज्य आणून देईल?" मोहनने प्रश्न केला.
"मोहन, किती महत्त्वाची गोष्ट सांगितलीस तू. संपत्ती निर्माण करणारे तुम्ही जेव्हा जागृत व्हाल, आजूबाजूस काय चालले आहे पाहाल, तेव्हाच स्वातंत्र्य येईल. खरे गोरगरिबांचे स्वातंत्र्य येईल. इंग्रजांनी आपणास अडाणी ठेवले आणि आपल्या देशातील श्रीमंतांसही. आपण शिकू, तर खपणार नाही. गरीब लोकांना तेथे काँट्रॅक्टर वगैरे किती छळतात. त्यांच्यात ज्ञान जाईल, निर्भयता जाईल तर या लुटारूंची लूट मग कशी चालणार?" शांता लाल होऊन म्हणाली.
"त्या पलीकडे कंडारी गावी कोणी शिकवायचा वर्ग काढला तर जमीनदार म्हणू लागले 'शिकायला जाल तर कामावर ठेवणार नाही.' रात्री दहा दहा वाजेपर्यंत घरी राबवू लागले. म्हणजे शिकायला जाता येऊ नये." गणपतने इतिहास सांगितला.
"ताई, आणखी दाखवा ना चित्रे." मोहन म्हणाला.
"हे बघा एक. हे चीनचे स्वातंत्र्यवीर. रात्री जेवण झाल्यावर यांनी हातात पाट्या पेन्सिली घेतल्या आहेत. बरोबर बंदूक असते. बरोबर पाटी असते. स्वातंत्र्य मिळवायचे असेल व मिळालेले टिकवायचे असेल तर आजूबाजूस काय चालले आहे ते कळले पाहिजे. म्हणून चिनी शेतकरी बंदुकीबरोबर पाटीही घेतो" शांतेने सांगितले.
"स्वराज्य म्हणजे गंमत नाही' म्हातारा पांडू म्हणाला.
"होय पांडबा. स्वराज्य म्हणजे दृढ निश्चय. अपार कष्ट. सारखा ध्यास." शांतेने सांगितले.
"मग आमचा घ्याल ना वर्ग ताई?" शंकरने विचारले.
"होय. बायकांचा संपला की मग तुमचा" शांता म्हणाली.
"बायका पुढे व आम्ही मागे. शांताताई बायकांचीच बाजू घेणार'' मोहन हसून म्हणाला.
"आपण बायकांना कमी मानतो हीच चूक" शांता हसून म्हणाली.
"पण ताई, तुमची सुट्टी संपली म्हणजे मग काय?" पांडूने विचारले.
"मग मोहन शिकवील. मोहन, तू येत जा ना जरा दिवसाही माझ्याकडे शिकायला." शांतेने सांगितले.
"जात जा रे. एकटा तर आहे. बायको तर मिळत नाही." पांडू म्हणाला.
"बाप होता तर मोहनची त्याने पुन्हा पुन्हा तीन लग्ने केली. परंतु नवी नवरी मरायची. मोहनला मुलगी देणे म्हणजे मरणाला देणे असे म्हणतात लोक'' गणपत बोलला.
"मोहन, तू हो आपला संन्याशी." शांता म्हणाली.
"तो का बामण आहे?" शंकर हसून म्हणाला.
"जो केवळ जगाची सेवा करील तो संन्यासी" शांता गंभीरपणे म्हणाली.
"मोहन, ताईजवळ शीक. मग आमचा मास्तर हो. परंतु मारू बिरू नको हो छडी आम्हा म्हाताऱ्यांना !" पांडू म्हणाला.
"परंतु मोहन, तू भराभर नाही शिकलास तर मी तुला छडी मारीन, कान ओढीन. चालेल ना?'' शांतेने गमतीने विचारले.
"बैल भरभर चालायला हवा म्हणून आम्ही टोचतोच की !" मोहन म्हणाला.
"तू का बैल?" गणपती विचारले.
"असे मुक्या प्राण्यांना टोचणे वाईट, पांडबा, आपल्या गावात तरी बैलाला आर टोचायची नाही हा नियम करा. पंजाबात, गुजराथेत बैलाला किती प्रेमाने सांभाळतात. त्याला टोचणार नाहीत पराणीने, त्याला शिवी देणार नाहीत तोंडाने'' शांता म्हणाली.
"मालक म्हणतो आज इतके नांगरून झालेच पाहिजे. मग आम्ही काय करावे ताई?"
"आपण बंड करावे. गरीब प्राण्यांची बाजू घ्यावी'' शांता रागाने म्हणाली.
"आपल्या देशात गरीब माणसांचीही कोणी बाजू घेत नाही, तर गरीब प्राण्यांची कोण घेणार?" शंकरने विचारले.
"आपल्या देशात मुंग्यांना साखर पेरणारे आहेत. कबुतरांना धान्य ओतणारे आहेत. परंतु माणसांना उपाशी मारतात, सावकारीने गळे कापतात'' गणपत त्वेषाने बोलला.
"मी येऊ का मग शिकायला वेळ मिळताच?" मोहनने विचारले.
"ये" शांता म्हणाली.
आता पुरुषांचा वर्गही सुरू झाला. उत्साहाने लोक शिकू लागले. गावातील भिकू सुताराने फळे करून दिले. वर्गात शांतेने चित्रे लावली. मोठ्या अक्षरातील म्हणी लावल्या. तेथे तिने दोन नकाशे टांगले. शांतेच्या उत्साहाला सीमा नव्हती. पहाटे उठून गावात प्रभातफेरी ती काढी. साक्षरतेची गाणी म्हणे. मुलेमुली त्यात सामील होत. गावात नवजीवन आले. नवप्रकाश आला
दिवाळीमध्ये दिवे लावायचे. ज्ञानाचा दिवा हा खरा दिवा. हिंदुस्थानातील शेकडा 90 लोकांजवळ ज्ञानाचा दिवा येईल त्या दिवशी खरी दिवाळी. त्या दिवशी आत्मदेवाची दिवाळी. शांता शिवतर गावात ज्ञानाच्या शिवशंकराची, त्या ज्ञानरूप मृत्युंजयाची स्थापना करीत होती. तिने खरी दिवाळी साजरी केली.
- पांडुरंग सदाशिव साने
Tags: sane guruji साने गुरुजी क्रांती कादंबरी साधना डिजिटल पुनर्मुद्रण कादंबरी Load More Tags
Add Comment