मी चरित्रे खूप वाचतो. त्यांत परदेशी व्यक्तींच्या चरित्रांचा समावेश प्रामुख्याने असतो. फॅबिओ फर्नांडो रिझी या कॅनडातील विद्वानाने लिहिलेले 'बेनेडेट्टो क्रोचे अँड इटालिअन फॅसिझम' (Benedetto Croce and Italian Fascism) नावाचे पुस्तक मी नुकतेच वाचले. त्यात बेनेडेट्टो क्रोचे या महान तत्त्वज्ञाच्या जीवनकहाणीच्या अनुषंगाने त्याच्या समकालीन समाजाचे वर्णन करण्यात आले आहे.
रिझींचे पुस्तक वाचताना मला 1920ची इटली आणि 2020चा भारत या दोहोंमध्ये अनेक विलक्षण साम्यस्थळे आढळली. नरेंद्र मोदींप्रमाणेच बेनिटो मुसोलिनीचेही मिथक निर्माण करण्यात आले होते. 'ड्यूचे'च्या (मुसोलिनीच्या) अलौकिक बुद्धिमत्तेची प्रशंसागीते गाण्यास उत्सुक असलेल्या लेखकांनी आणि प्रचारकांनी मुसोलिनी नावाचे मिथक निर्माण केले. फॅसिझमचा नेता असलेल्या मुसोलिनीला हे प्रचारक 'ईश्वरी अवतार', ‘अत्यंत धार्मिक मनुष्य', 'अत्यंत दूरदर्शी मनुष्य' असे संबोधू लागले. अशा प्रकारे 'ड्यूचे' (मुसोलिनी) नावाचे मिथक तयार झाले- ‘एक असा नेता जो सदैव योग्य तेच करतो... जिथे अन्य लोक डळमळतात तिथे धैर्याने ठामपणे उभा राहतो.’
डिसेंबर 1925मध्ये इटलीच्या सरकारने एक नवीन कायदा पारित केला. त्याद्वारे प्रसारमाध्यमांवर आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर अनके बंधने लादण्यात आली. या कायद्याच्या परिणामस्वरूप काही महिन्यांच्या आतच इटलीतील महत्त्वाची सर्व वृत्तपत्रे एकापाठोपाठ एक फॅसिस्टांच्या नियंत्रणाखाली आली. आर्थिक अडचणींमुळे अथवा राजकीय दबावामुळे काही वृत्तपत्रांच्या मालकांना आपली वृत्तपत्रे सक्तीने विकावी लागली. सर्व उदारमतवादी संपादकांना राजीनामे द्यावे लागले आणि त्यांच्या जागी सरकारधार्जिण्या माणसांची नेमणूक झाली.
सत्ताधारी पक्षाचे आणि मुसोलिनीच्या विचारसरणीचे वर्णन त्याच वर्षी (1925मध्ये) बेनेडेट्टो क्रोचेने पुढील शब्दांत केले आहे, ‘त्यात भावनोद्दीपित वक्तृत्वाचे आणि अधिकारशाहीचे असे विचित्र मिश्रण होते. तिथे कायद्यांबद्दल आत्यंतिक आदर असल्याचा दावा करून कायद्यांचे उल्लंघन केले जायचे. अतिआधुनिकतेबरोबरच तिथे जुन्या, बुरसटलेल्या संकल्पना एकत्रच नांदत होत्या. सद्य संस्कृतीचा तिरस्कार करत नवे संस्कार निर्माण करण्याचे निष्फळ प्रयत्नही सुरू होते.'
या अनुषंगाने 1920मधले इटालिअन शासन आणि आजचे मोदी सरकार यांमध्ये कमालीचे साम्य आढळते. सध्याचे सरकार संविधानाविषयी आदरपूर्वक बोलते... मात्र संविधानाचा गाभा आणि त्याची आशयमूल्ये यांचे उघडपणे उल्लंघन करते. हे शासन पुरातन महानतेचे गोडवे गात आधुनिक विज्ञानाचा अवमान करते, पुरातन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याच्या नावाखाली आपल्या आदिम भोगवादी स्वार्थाचे प्रकटीकरण करते.
1920च्या दशकात इटलीतील बहुसंख्य विचारवंतांना सक्तीने हद्दपार करण्यात आले असताना बेनेडेट्टो क्रोचे मात्र मातृभूमीतच राहून फॅसिझमला बौद्धिक आणि नैतिक विरोध करत राहिला. त्याच्या चरित्रकाराने म्हटले आहे, ‘सरकारकडून प्रसारमाध्यमे आणि शिक्षणसंस्था यांचा वापर मुसोलिनीचा पंथ वृद्धिंगत करण्यासाठी आणि सत्ताधीशांपुढे शरणागती पत्करण्याची वृत्ती जनतेत बाणवण्यासाठी केला जात होता. नवीन पिढीने कुठलेही प्रश्न न विचारता स्वतःला मुसोलिनीला अर्पण करत त्याच्यावर विश्वास दाखवावा, त्याचे आज्ञापालन करावे आणि त्याच्यासाठी लढावे अशी मागणी केली जात होती. याविपरीत क्रोचेने जनतेपुढे उदारमतवादी मूल्ये प्रस्तुत केली, स्वातंत्र्याचा उपदेश केला, एक स्वतंत्र मनुष्य म्हणून मनुष्यत्वाच्या आत्मसन्मानाचे संरक्षण केले, जनतेने आपले निर्णय स्वतः घेऊन त्यांची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले.'
रिझींचे पुस्तक पुढे वाचत असताना मला हा परिच्छेद आढळला-
'1926च्या अखेरीस इटलीतील उदारमतवाद नामशेष झाला होता. मुसोलिनीने आपली सत्ता बळकट केली होती आणि आपली हुकूमशाही अविरत सुरू राहावी यासाठी नवीन कायदेव्यवस्था निर्माण केली होती. राजकीय पक्षांवर बंदी घातली होती आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य नष्ट केले होते. विरोधी पक्षांना निःशस्त्र आणि संसदेस निष्प्रभ केले होते. 1927च्या अखेरीस कुठलाही राजकीय कृतिकार्यक्रम हाती घेणे अशक्य झाले होते. खासगी पत्रव्यवहारात अथवा सार्वजनिक जागेवर सरकारवर टीकाप्रदर्शन करणे धोकादायक झाले होते. सरकारच्या धोरणांच्या विपरीत मतप्रदर्शन केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागू शकत होती. मंत्रालयाच्या अखत्यारीत एक सक्षम, पुनरुज्जीवित पोलीस विभाग होताच... शिवाय ओवरा (OVRA) असे गूढ नाव असलेल्या एका नवीन, कार्यक्षम, गुप्त पोलीससंस्थेची निर्मिती फॅसिझमच्या विरोधाचे कुठलेही चिन्ह दडपण्यासाठी आणि मतभेदांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा आणण्यासाठी पोलीसप्रमुखांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. फॅसिस्ट नेत्यांसह हजारो लोकांची माहिती लवकरच त्यांनी गोळा केली आणि देशात अन् परदेशात अनेक स्पेशल एजंट्सचे, गुप्तहेरांचे, खबऱ्यांचे प्रभावी जाळे निर्माण केले.'
भारतात नागरिकांवर सतत पाळत ठेवण्यासाठी (‘रिअल टाइम सर्व्हेलंस’साठी) भारताच्या गृह मंत्रालयाने वित्त आयोगाकडे 50 हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची बातमी रिझींच्या पुस्तकातला हा मजकुर लिहून घेत असताना आली. हे सगळे अशा पार्श्वभूमीवर घडते आहे... जेव्हा केंद्राकडील थकीत निधी राज्यांना अद्याप मिळालेला नाही आणि स्वतंत्र वृत्तीच्या विचारवंतांवर, कार्यकर्त्यांवर, पत्रकारांवर खोटे खटले दाखल करून गृहमंत्रालयाने आपल्या अधिकारांचा गंभीर गैरवापर केला आहे.
1929मधील इटालिअन संसदेचे वर्णन रिझींनी पुढील शब्दांत केले आहे, ‘सरकारच्या निर्णयांवर केवळ शिक्कामोर्तब करण्याचे काम संसद करत आहे. विरोधी पक्षाचे जे थोडेफार सदस्य उरले आहेत त्यांच्या भाषणांकडे दुर्लक्ष केले जायचे आणि बहुतांश वेळा सभागृहातून अथवा प्रेक्षक गॅलऱ्यांतून जोरजोरात केल्या जाणाऱ्या उपरोधक टीका-टिप्पण्यांद्वारे त्यांचा आवाज दाबला जायचा.'
फॅबिओ फर्नांडो रिझींचे पुस्तक एका देशातील एकाच व्यक्तीवर लक्ष केंद्रित करते आणि तुलनात्मक विश्लेषण टाळते... मात्र लेखक हे नोंदवतो की, 'इटालिअन फॅसिझमने हुकूमशाही सरकारची निर्मिती केली आणि त्याची व्याप्तीही वाढवली... मात्र एकपक्षीय निरंकुश समाज निर्माण करण्यासाठीचा वेळ आणि सामर्थ्य त्यांच्याकडे नव्हते.’ याचा एकच अर्थ निघू शकतो की, मुसोलिनीची इटली कितीही भयंकर असली तरी हिटलरच्या जर्मनीइतकी ती भयंकर नव्हती.
रिझींनी लिहिलेले बेनेडेट्टो क्रोचेचे वैचारिक चरित्र वाचल्यानंतर मी डेव्हिड गिलमोरच्या The Pursuit of Italy (इटलीचा वेध) या उत्कृष्ट पुस्तकाकडे वळलो ज्यात प्राचीन काळापासूनचा देशाचा विस्तृत आणि वाचनीय इतिहास नमूद केला आहे. या पुस्तकाच्या 400 पानांपैकी 30 पाने मुसोलिनीच्या अधिपत्याखालील वर्षांचे वर्णन करतात. रिझींप्रमाणेच गिलमोर यांनी इटलीच्या भूतकाळाबद्दल जे म्हटलेय त्याच्याशी मी बघत असलेल्या आपल्या देशाच्या वर्तमानाचे प्रचंड साम्य आहे. या पुस्तकातील पुढील उद्गार लक्षात घ्या...
'1930मध्ये सरकारची शैली अधिकच भपकेबाज झाली. गणवेशातील अधिकाधिक अधिकारी; अधिकाधिक सैन्यसंचालन; अधिकाधिक सेन्सॉरशिप; अधिकाधिक दडपशाही; नेत्यांची वाढती भाषणे; श्रोत्यांच्या, भव्य जनसमुदायाच्या आरोळ्या; चित्रविचित्र हावभाव; मातृभूमी आणि मातृभूमीच्या गौरवाबद्दल मुसोलिनीने केलेल्या प्रत्येक वक्तव्यास प्रतिसाद देताना 'ड्यूचे, ड्यूचे, ड्यूचे' म्हणून केलेला त्याचा जयजयकार!'
नरेंद्र मोदींच्या सरकारविषयीही तसेच म्हणावेसे वाटत आहे... विशेषतः 2019मध्ये पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कालखंडाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्या प्रत्येक उद्गारावर 'मो-दी!, मो-दी! मो-दी!' अशा हर्षोल्लसीत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
वक्तृत्वप्रचुर मुसोलिनीला जनतेत इतकी प्रचंड लोकप्रियता कशी मिळाली या प्रश्नाचे उत्तर गिलमोर देतो, 'मुसोलिनी दीर्घकाळ तग धरू शकला याचे अंशतः कारण म्हणजे त्याने इटलीच्या अस्मितेच्या (italianata) काही मुद्द्यांचे उदात्तीकरण केले, त्याने जनतेच्या मनात आशा आणि भय निर्माण केले आणि नागरिकांना पटवून दिले की, इटलीच्या उदारमतवादी राजकारण्यांनी आणि युद्धकाळातील मित्रराष्ट्रांनी त्यांचा विश्वासघात केला... ज्यामुळे त्यांना ‘विकृत शांती' स्वीकारणे भाग पडले आणि उज्ज्वल भवितव्यापासून ते वंचित झाले.'
मोदींनी अस्मितेच्या याच मुद्द्याचा वापर यशस्वीरीत्या केला... ज्यात त्यांनी कथित सुवर्णयुगाचा दाखला दिला... जेव्हा हिंदू केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही सर्वश्रेष्ठ होते. भूतकाळातील मुस्लीम आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांमुळे हिंदू आपल्या स्थानावरून पदच्युत झाले. मोदींनी स्वतःला असा नेता म्हणून पुढे आणले जो हिंदूंची आणि देशाची अधिकच अधोगती होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या भ्रष्ट काँग्रेस राजकारण्यांशी लढतो आहे.
1920 च्या दशकातील इटलीशी संबंधित असलेले पुस्तक, 2020 मधील भारतात वाचत असताना तेव्हाच्या इटलीची आजच्या भारताशी अनेक साधर्म्यस्थळे आढळून आल्याने मी काहीसा निराश झालो होतो... मात्र या पुस्तकातील काही मुद्दे आश्वासक आहेत. मुसोलिनीच्या इटलीच्या विपरीत भारतातील मोदींच्या भाजपला इतर पक्षांच्या राजकीय विरोधाचा सामना करावा लागतो. केंद्रात तो विरोध क्षीण असला तरीही देशातील किमान अर्धा डझन राज्यांत हा विरोध बऱ्यापैकी सशक्त आहे. प्रसारमाध्यमांवर अंकुश ठेवला जात असला तरी त्यांचे पूर्णतः निर्दालन झालेले नाही. मुसोलिनीच्या इटलीत सरकारच्या चुकांचे निर्देशन करण्यासाठी फक्त बेनेडेट्टो क्रोचे होता... परंतु मोदींच्या भारतात सर्व प्रांतांत अनेक विद्वान लेखक आहेत जे आपल्या संविधानाच्या आधारभूत मूल्यांच्या संरक्षणार्थ आपापल्या भाषेत निर्भयपणे आवाज उठवत आहेत.
मुसोलिनीने आपले शासन कसे बळकट केले याचे वर्णन ‘The Pursuit of Italy’ या पुस्तकात केल्यानंतर डेव्हिड गिलमोर म्हणतो, 'समाजाचा उत्कर्ष करण्यास अपयशी ठरल्याने फॅसिझमची जनमानसावरील मोहिनी क्षीण झाली. आपल्याला चांगला शासक लाभला आहे असा भ्रम इटालिअन लोकांच्या मनात निर्माण करण्यात आला... परंतु आपल्याला समृद्ध जीवन लाभले आहे असा भ्रम त्यांच्या मनात निर्माण होऊ शकला नाही.' जनतेला रोजगार आणि समृद्धी देण्यात मुसोलिनी अपयशी ठरला. मोदींनी तर आर्थिक स्तरावर यापेक्षाही वाईट कामगिरी केली आहे. उदारीकरणानंतरच्या तीन दशकांत भारतीय अर्थव्यवस्थेने जी प्रगती केली होती ती मोदींच्या अविचारी, अव्यवहार्य धोरणांमुळे निरस्त झाली.
आज लाखो तरुण नरेंद्र मोदींचे अंधभक्त आहेत. अशा तरुणांचे आणि आपले भविष्य कसे असेल ते जाणून घेण्यासाठी बेनेडेट्टो क्रोचेने मुसोलिनीच्या लाखो तरुण अंधभक्तांबद्दल काय म्हटले आहे ते बघावे लागेल. जेव्हा हा इटालिअन हुकूमशहा मरण पावला आणि त्याचे सरकार अखेर कोसळले तेव्हा त्या अत्याचारी सरकारनं दिशाभूल केलेल्या, शोषण केलेल्या, विश्वासघात केलेल्या लाखो तरुणांच्या नैतिक ऊर्जेचा खजिना कसा वाया गेला याचे क्रोचे अत्यंत दुःखद मनाने वर्णन करतो.
बेनिटो मुसोलिनीला आणि त्याच्या फॅसिस्टांना वाटले की, ते इटलीवर अनंत काळ राज्य करतील. नरेंद्र मोदींना आणि भाजपलाही तसेच वाटत आहे. अनंत काळ राज्य करण्याची ही दिवास्वप्ने कधीच सत्यात येणार नाहीत... परंतु जोवर सद्यःस्थितीतील सरकार सत्तेवर राहील तोवर ते त्याची आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि नैतिक स्तरावर भयानक किंमत वसूल करत राहतील. मुसोलिनीने आणि त्याच्या पक्षाने इटलीचे जे नुकसान केले ते भरून काढायला अनेक दशके लागली. मोदी आणि त्यांचा पक्ष देशाचे जे नुकसान करत आहे ते भरून काढायला भारताला इटलीपेक्षाही अधिक वेळ लागेल.
(अनुवाद: प्रगती पाटील)
- रामचंद्र गुहा
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)
Tags: अनुवाद रामचंद्र गुहा प्रगती पाटील इटली बेनिटो मुसोलिनी फॅसिझम बेनेडेट्टो क्रोचे फॅबिओ फर्नांडो रिझी डेव्हिड गिलमोर Ramchandra Guha Pragatil Patil Benito Mussolini Fascism Benedetto Croce Fabio Fernando Rizi David Gilmour Load More Tags
Add Comment