संघ परिवार : एकाधिकारशाहीचा चेहरा असणारी एक सांप्रदायिक संघटना

संघटनेच्या धारणा आणि कृती तथाकथित अभिमानापेक्षा पूर्वग्रहातून 

source: PTI

महात्मा गांधींचे शेवटचे सचिव प्यारेलाल यांनी ‘महात्मा गांधी - द लास्ट फेज’ या त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिले आहे की, ‘1947मध्ये झालेली भारताची फाळणी आणि त्यासोबत झालेला भयावह हिंसाचार या घटनांनी हिंदू अंधराष्ट्रवादाला सुपीक भूमी उपलब्ध करून दिली. त्याचे सर्वात गंभीर पर्यवसान हिंदू मध्यमवर्गामध्ये आणि सरकारी सेवांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिरकाव होण्यात झाले. त्यांना काँग्रेसमधील हिंदू गटाची छुपी सहानुभूती मिळण्यासही सुरुवात झाली.’

हिंदू अंधराष्ट्रवाद्यांची संघटना कशासाठी उभी राहिली आणि तिचे उद्देश काय होते हे प्यारेलाल यांनी त्यांच्या वाचकांसाठी स्थूलरूपाने मांडले आहे. त्यामुळे ते लिहितात - 'रा. स्व. संघ ही एक जातीयवादी, निमलष्करी आणि हुकूमशाही प्रवृत्तीची, महाराष्ट्रातून नियंत्रित केली जाणारी संघटना होती... हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय त्यांनी जाहीर केले होते. ‘मुस्लीममुक्त भारत’ हे घोषवाक्य त्यांनी स्वीकारले होते. त्या काळामध्ये ते - निदान उघडपणे तरी - फार क्रियाशील नव्हते. मात्र (दक्षिण पंजाबमधून) सर्व हिंदू आणि शीख बाहेर पडण्याची ते वाट पाहत आहेत हे ठळकपणे सूचित केले गेले होते आणि पाकिस्तानने जे केले त्याचा सूड ते त्यानंतर भारतीय मुसलमानांवर उगवणार होते.’

फाळणीच्या जखमा आणि विस्थापितांचे दैन्य यांच्याशी झगडणाऱ्या नवस्वतंत्र भारताला खरेतर अंतर्गत शत्रूकडूनच गंभीर धोका सहन करावा लागत होता. हिंदू अंधराष्ट्रवादाच्या लाटेची ही सुरुवात होती. 1947च्या उत्तरार्धामध्ये हिंदू मध्यमवर्गातील सहानुभूती बाळगणारे लोक, त्यातले ज्येष्ठ अधिकारी आणि धुरंधर राजकारणी यांच्यामध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यश आले होते. मात्र दोन उल्लेखनीय हिंदू व्यक्ती सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाच्या विरोधात निश्चयपूर्वक उभ्या राहिल्या. भारताच्या पाठीशी राहण्याची निवड करणाऱ्या मुस्लिमांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावण्याचा त्यांचा निर्धार होता.

हे दोन आदर्श आणि अनुकरणीय हिंदू होते - पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे मार्गदर्शक महात्मा गांधी. प्यारेलाल असे लिहितात - ‘या शोकांतिकेचा जिवंत साक्षीदार आपल्याला व्हायचे नाही असे गांधीजींनी ठरवलेले होते. भारतीय संघराज्यामध्ये मुस्लीम अल्पसंख्य नाहीत आणि भारतीय संघराज्याचे तेही समान नागरिक असताना त्यांना त्यांच्या भविष्याविषयी असुरक्षितता का वाटावी? कुणीही भयाच्या छायेत जगते आहे, उन्नत माथ्याने हिंडू-फिरू शकत नाही हे पाहणे गांधींना वेदनादायक होते. सर्वहारा वर्गाच्या प्रश्नांचा कैवार घेण्याचा आणि निराधारांशी स्वतःला जोडून घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न असे. भारतीय मुस्लिमांकरता त्यांनी मनःपूर्वक काम केले.’

प्यारेलाल यांनी वर्णन केलेल्या घटनांना सत्तरहून अधिक वर्षे लोटल्यानंतरही हे शब्द आज वाचणे खूप बोधप्रद आहे. 1947च्या उत्तरार्धात भारतीय राजकारणामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये रा. स्व. संघ परिघाबाहेर गौणस्थानी होता. त्या काळातील जातीय तणावांचा फायदा घेऊन स्वतःचा प्रभाव वाढवण्याची आशा त्याला होती. भारताच्या सुदैवाने गांधींच्या आणि नेहरूंच्या निश्चयामुळे या संघटनेचा विस्तार रोखला गेला. नेहरूंनी त्यांच्या सरकारातील प्रत्येकाला हे स्पष्ट केले की, भारताचे उद्दिष्ट ‘हिंदू पाकिस्तान’ होण्याचे अजिबात नाही. त्याच वेळी हिंदू मुस्लीम सलोख्याकरता कलकत्ता आणि दिल्ली इथे गांधीजींनी यशस्वीपणे उपोषण केले. 30 जानेवारी 1948 रोजी रा. स्व. संघाच्या माणसाने गांधींची हत्या केली आणि त्यामुळे त्यांच्या अनुयायी हिंदूंना धक्का बसला आणि ते भानावर आले... त्यामुळे त्यानंतर काही काळ रा. स्व. संघाचा मनसुबा फोल ठरला.

सांप्रतकाळी भारतीय राजकीय आणि सामाजिक जीवनात रा. स्व. संघ काठाबाहेर गौणस्थानी राहिलेला नाही... तर अग्रस्थानी आलेला आहे. या संघटनेचे राजकीय रूप असणारा भारतीय जनता पक्ष केंद्र सरकार आणि अनेक राज्य सरकारे नियंत्रित करतो आहे. हिंदू मध्यमवर्गातला मोठा गट गुप्तपणे नव्हे तर कर्णकर्कश स्वरात संघाच्या राजकीय व वैचारिक अजेंड्याचे समर्थन करतो आहे. नागरी सेवांतील उच्चपदस्थ, उच्चस्तरावरील अधिकारी आणि सैन्यदलातील काही उच्चपदस्थ अधिकारीदेखील राज्यघटनेशी असणारी बांधिलकी त्यागून हिंदुत्वाचे आणि सत्ताधाऱ्यांचे कट्टर समर्थक झाले आहेत.

1947मध्ये रा. स्व. संघाच्या दृढ धारणा होत्या... त्यांविषयी प्यारेलाल यांचे असे निरीक्षण आहे - ‘त्यांनी (संघाने) हिंदू राष्ट्र निर्माणाचे ध्येय ठेवले होते. ‘मुस्लीममुक्त भारत' अशी घोषणा त्यांनी अवलंबली होती.’ या उद्धृताचा पहिला भाग आजही लागू होणारा आहे. दुसरा भाग पूर्णपणे वगळला नसला तरी त्यात त्यांनी (अनिच्छेने आणि इतरांच्या सुदैवाने) बदल केला आहे. फाळणीनंतर नजीकच्या काळातच रा. स्व. संघाच्या अनेक नेत्यांना मुस्लिमांपासून भारताची पूर्णतः सुटका व्हावी असे वाटत होते मात्र हे शक्य राहिलेले नाही याची पुरेपूर जाणीव 1950च्या दशकात त्यांना झाली. हा समाज फार मोठा होता आणि देशभरात इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला होता की, सर्व पातळ्यांवर ‘शुद्धीकरण’ करणे ही कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडची बाब होती. भारतीय मुस्लिमांकडे पाहण्याच्या रा. स्व. संघाच्या सध्याच्या दृष्टीकोनाची पुनर्रचना अशी झाली आहे - इथे जन्मलेले आणि इथे राहत असलेले मुस्लीम जोवर हिंदूंचे राजकीय, धर्मशास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, संस्थात्मक आणि नैतिक श्रेष्ठत्व मान्य करतील... तोवरच या देशात राहू शकतात.

मी एके ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे रा. स्व. संघाचे राजकीय प्रारूप औपरोधिकपणे (ironically) इस्लामकडून - मध्ययुगीन इस्लामकडून - आयात केले गेले आहे. खिलाफतच्या भरभराटीच्या काळात मुस्लिमांना ज्यूंपेक्षा आणि ख्रिश्चनांपेक्षा ठळकपणे वरचढ अधिकार होते. यांतल्या ख्रिश्चनांची फार मोठ्या प्रमाणात छळणूक झाली नाही... मात्र कुटुंब सांभाळण्यासाठी व उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांना कनिष्ठ किंवा दुय्यम स्थान स्वीकारावे लागले. याच पद्धतीने आजच्या भारतात रा. स्व. संघ टिकून राहिला तर मुस्लिमांनाही दुय्यम स्थान स्वीकारावे लागेल.

रा. स्व. संघाच्या इतिहासाविषयी आणि त्याच्या समाजशास्त्राविषयी अनेक विद्वानांनी माहितीपूर्ण ग्रंथांचे लेखन केले आहे. रा. स्व. संघानेही, संघ स्वयंसेवक नसणाऱ्यांना ‘संघ कोणते काम करतो...’ हे समजावून देण्याकरता आपल्या बाजूने डझनावारी पुस्तके आणि पत्रिका प्रसिद्ध केल्या आहेत. तथापि त्यांचे हे विपुल (आणि विस्तारणारे) साहित्य, त्यांची विचारप्रणाली आणि कार्यपद्धती सारांशरूपाने सहा शब्दांत सांगता येते - आम्ही मुस्लिमांना त्यांची जागा दाखवून देऊ.

हिंदुत्वाच्या अभिमानाच्या पुनःप्राप्तीसाठी, जीर्णोद्धारासाठी आणि पुनरुत्थानासाठी रा. स्व. संघ कटिबद्ध असल्याचा संघाचा दावा आहे... मात्र या संघटनेचे आणि तिच्याशी संबंधित राजकीय पक्षाच्या प्रत्यक्षातील धारणा आणि कृती या तथाकथित ‘अभिमाना’पेक्षा पूर्वग्रहातून आणि विकृतीनेच निश्चित केल्या गेल्या आहेत. भाजपकडून चालवली जाणारी राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांच्या कृती विचारात घ्याव्यात. जम्मूचा व काश्मीरचा विध्वंस, अयोध्येतील मंदिराच्या उभारणीसाठी मिळवलेला विजय, आंतरधर्मीय विवाहांविरोधातील कायदे आणि या सगळ्याहून महत्त्वाचे म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा आणि शांततापूर्ण मार्गांनी त्याला विरोध करणाऱ्यांची छळणूक हे सर्व मुस्लिमांना त्यांची जागा दाखवण्याच्या आकांक्षेनेच प्रेरित होते.

1947मध्ये दिल्ली इथे झालेल्या एका संभाषणाविषयी प्यारेलाल यांनी ‘महात्मा गांधी - द लास्ट फेज’ या पुस्तकात लिहिलेले आहे. प्यारेलाल स्वतः त्याचे साक्षीदार आहेत ‘गांधींच्या पक्षातील एक सदस्य चर्चेमध्ये हस्तक्षेप करत असे म्हणाले की, निर्वासित छावण्यांमध्ये रा. स्व. संघाच्या लोकांनी उत्तम काम केले आहे. अवघड काम करण्यासाठीची शिस्त, धैर्य आणि क्षमता त्यांनी दाखवली आहे. त्याला उत्तरादाखल गांधीजी म्हणाले, ‘हिटलरचे नाझी आणि मुसोलिनीच्या नेतृत्वात काम करणारे फॅसिस्ट यांच्याकडेदेखील हे गुण होते हे विसरू नका.’ ‘बाह्यतः एकचालकानुवर्ती (totalitarian outlook) असणारी जातीयवादी संघटना’ असे त्यांनी रा. स्व. संघाचे वर्णन केले.

गांधींची रा. स्व. संघाविषयीची मते 72 वर्षांनंतर समर्पक ठरतात का? नक्कीच... अजूनही ती अतिशय चांगल्या प्रकारे लागू पडतात. त्यांनी वापरलेली विशेषणे आज मात्र उलट करावी लागतील. ‘बाह्यतः जातीयवादी असणारी एकचालकानुवर्ती संघटना’ अशा दृष्टीतून आता कदाचित रा. स्व. संघाकडे पाहावे लागेल. 1947मध्ये भारतीय जीवनाच्या काठावर असणारा रा. स्व. संघ 2019मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभावशाली झाला आहे. केंद्र सरकार नियंत्रित करणारे रा. स्व. संघाचे सदस्य पत्रकारितेचे दमन करत आहेत, न्यायव्यवस्थेचा ताबा मिळवू पाहत आहेत. लाच देऊन आणि बळजबरी करून इतर पक्ष चालवत असलेल्या राज्य सरकारांना सुरुंग लावण्याचा किंवा ती उलथून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वयंसेवी संस्थांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या नव्या कायद्यांमागेही हिंदुत्वाच्या विचारसरणीशी निष्ठा न बाळगणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांना निष्प्रभ करणे हीच प्रेरणा आहे.

राजकीय प्रक्रिया, शासकीय संस्था, नागरी समाज, इतकेच नव्हे तर लोक काय खातात, त्यांचा वेश काय असायला हवा, त्यांनी कुणाशी विवाह करावा किंवा करू नये या सगळ्यावर रा. स्व. संघ आणि भाजप ताबा मिळवू पाहत आहे. एखाद्या देशामध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूवर - मग तो राजकीय, सामाजिक, संस्थात्मक, विचारप्रणालीसंदर्भात असा कोणताही असो - नियंत्रण ठेवण्याची इच्छा 'टोटलिटेरिअन' या शब्दाच्या लिखित व्याख्येशी तंतोतंत जुळणारी आहे. मुस्लिमांना कलंकित करणे, त्यांची राक्षसी प्रतिमा उभी करणे यासाठी अविरतपणे चाललेले त्यांचे प्रयत्न त्यांची जातीय मनोवृत्ती स्पष्टपणे दर्शवतात.

1947च्या उत्तरार्धात महात्मा गांधींनी केलेले रा. स्व. संघाचे वर्णन तेव्हाही आणि आत्ताही पूर्णपणे (आणि खेदकारकपणे) अचूक राहिलेले आहे. रा. स्व. संघ ही - सत्तेच्या काठावरून असो किंवा थेट सत्तास्थानावरून - एकाधिकारशाहीचा चेहरा असणारी एक सांप्रदायिक संघटना यापेक्षा वेगळे काहीही नाही.
(अनुवाद : सुहास पाटील)

- रामचंद्र गुहा, बेंगळूरू

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)
 

Tags: संघ परिवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रा. स्व. संघ महात्मा गांधी प्यारेलाल महात्मा गांधी- द लास्ट फेज mahatma gandhi ramchandra guha rss pyarelal mahatma gandhi- the last phase Load More Tags

Comments:

Avinash Shrirang Yamgar

अप्रतिम , साक्षेपी आणि समयोचीत लेख..

Popat Pagar

अतिशय समयोचित,स्पष्ट लिहले आहे. रामचंद्र गुहा सरांचा अभ्यास आहे.

Suyog Kawale

Guha Sir, Your articles are " Must read " for all youths of India... I wish they reach to the larger part of the society....

Add Comment