गांधी आजही प्रस्तुत ठरण्यामागची दहा कारणं

30 जानेवारी 2023 रोजी म. गांधींच्या हौताम्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत..

पुढच्या आठवड्यात (30 जानेवारी) महात्मा गांधींच्या हौतात्म्याला 75 वर्षं पूर्ण होतील. गांधींच्या मृत्यूला इतकी वर्षं झाल्यानंतरही ते प्रस्तुत ठरतात का? ते प्रस्तुत ठरायला हवेत का? गांधी, त्यांचं चरित्र, त्यांच्या कल्पना एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्येही का प्रस्तुत ठरतात, याची दहा मजबूत कारणं मी या स्तंभात नोंदवणार आहे.

पहिलं कारण- गांधींनी बळाचा वापर न करता अन्याय्य अधिसत्तेचा प्रतिकार करण्याची साधनं भारताला व जगाला पुरवली, म्हणून ते आज प्रस्तुत ठरतात. जोहान्सबर्गमधील एम्पायर थिएटरमध्ये 9 सप्टेंबर 1906 रोजी झालेल्या एका बैठकीत सत्याग्रहाची कल्पना जन्माला आली. त्या वेळी गांधींच्या नेतृत्वाखाली उपस्थित भारतीयांनी वंशभेदी कायद्यांचा निषेध म्हणून स्वतःला अटक करवून घेण्याचा निर्धार केला. त्यानंतर 95 वर्षांनी दहशतवाद्यांनी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत स्फोट घडवून कोसळवली. हे दोन ‘9 सप्टेंबर’चे दिवस: यातील एक दिवस अहिंसक संघर्षाद्वारे व वैयक्तिक त्यागाद्वारे न्याय मागण्याची आठवण करून देतो; तर दुसरा दिवस दहशत व बळ यांद्वारे शत्रूला धमकावण्याची खूण म्हणून ओळखला जातो. इतिहासाने दाखवून दिल्यानुसार, अन्यायाविरोधातील निषेधाचे रूप म्हणून इतर पर्यायी मार्गांपेक्षा सत्याग्रहाचा मार्ग अधिक नैतिक, आणि बहुधा अधिक परिणामकारकसुद्धा असतो. दक्षिण आफ्रिका व भारत इथल्या ब्रिटिश राजवटीविरोधात सत्याग्रहाचा अवलंब पहिल्यांदा झाला, त्यानंतर गांधींच्या या पद्धतीचं अनुकरण अनेक असामान्य लोकांनी केलं- अमेरिकेतील नागरी अधिकारांच्या संघर्षात झालेला सत्याग्रहाचा वापर बहुधा सर्वांत लक्षणीय ठरावा.

दुसरं कारण- गांधींनी त्यांच्या देशाच्या व संस्कृतीच्या अवगुणांची दखल घेत असताना आणि त्यांवर उपाय करण्यासाठी प्रयत्नशील राहताना या देशावर व संस्कृतीवर प्रेम केलं, म्हणून ते आजही प्रस्तुत ठरतात. इतिहासकार सुनील खिलनानी यांनी एकदा म्हटलं होतं की, गांधी केवळ ब्रिटिशांशी लढत नव्हते, तर ते भारताशीही लढत होते. त्यांचा समाज, आपला समाज खोलवरच्या व सर्वव्यापी विषमतेने ग्रासलेला असल्याचं गांधींना माहीत होतं. भारतीयांना खऱ्या स्वातंत्र्यासाठी अधिक सज्ज करण्याच्या या इच्छेतूनच त्यांनी अस्पृश्यतेविरोधातील संघर्ष सुरू केला. ते सर्वार्थाने स्त्रीवादी नव्हते, पण स्त्रियांना सार्वजनिक जीवनामध्ये आणण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले.

तिसरं कारण- गांधी व्यवहारात हिंदू होते, पण त्यांनी धर्माच्या आधारे नागरिकत्वाची व्याख्या करणं नाकारलं, म्हणून गांधी आजही प्रस्तुत ठरतात. जातिव्यवस्थेने हिंदूंचं आडवं विभाजन केलं, तर धर्माने भारताचं उभं विभाजन केलं. गांधींनी या उभ्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या अनेकदा परस्परांविरोधी राहिलेल्या गटांमध्ये पूल बांधण्यासाठी परिश्रम केले. हिंदू व मुस्लीम समुदायांमध्ये सलोखा प्रस्थापित करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता; या ध्यासाचा पाठपुरावा करण्यासाठी ते जगले आणि अखेरीस त्यांनी त्यासाठी मरायचीही तयारी दाखवली. 

चौथं कारण- गांधी गुजराती संस्कृतीने ओथंबलेले होते आणि गुजराती गद्यलेखनावर त्यांचं सर्वमान्य प्रभुत्व होतं, पण ते संकुचित मनोवृत्तीचे प्रादेशिकतावादी नव्हते, म्हणून ते आजही प्रस्तुत ठरतात. स्वतःपेक्षा वेगळ्या धर्मांसाठीही त्यांच्या मनात जागा व प्रेम होतं, त्याचप्रमाणे स्वतःहून वेगळ्या भाषांसाठीही त्यांच्या मनात जागा व प्रेम होतं. भारतातील धार्मिक व भाषिक वैविध्याविषयीचं त्यांचं आकलन परदेशस्थ भारतीयांमध्ये घालवलेल्या काळात सखोल झालं. परदेशात असताना त्यांचे सर्वांत निकटचे सहकारी हिंदू होते, तसेच बहुतेकदा मुस्लीम किंवा पारशीसुद्धा होते, आणि त्यात गुजराती सहकाऱ्यांइतकेच तामीळ भाषिकसुद्धा होते.

पाचवं कारण- गांधी देशभक्त होते आणि आंतरराष्ट्रीयतावादीसुद्धा होते, म्हणून ते आजही प्रस्तुत ठरतात. त्यांनी भारतीय सभ्यतेची श्रीमंती व वारसा समजून घेतला होता, पण विसाव्या शतकात कोणताही देश विहिरीतील बेडकासारखा नसेल हे त्यांना माहीत होतं. स्वतःला दुसऱ्याच्या आरशामध्ये पाहणं उपयुक्त ठरतं. खुद्द गांधींवर भारतीयांइतकाच पाश्चात्त्यांचाही प्रभाव पडला होता. त्यांच्या तात्त्विक व राजकीय दृष्टिकोनावर गोखले व रायचंदनबाही यांच्याइतकंच टॉलस्टॉय व रस्किन यांचंही ऋण होतं. गांधींनी वांशिक भेदांपलीकडे जाणारी घनिष्ठ मैत्री जोपासली होती. इतर अनेकांसोबतच हेन्री व मिली पोलक, हरमान कॅलेनबाख व सी. एफ. अँड्र्यूज्, यांनी गांधींच्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनामध्ये कळीची भूमिका निभावली.

गांधींच्या वारशामधील हे पाच पैलू टिकले नसते तर स्वतंत्र भारत पूर्णतः वेगळ्या वाटेवर जाण्याची शक्यता का होती, हे मी इथे आता विस्ताराने स्पष्ट करत नाही. गांधींनी हिंसा टाळून संवादाला पसंती दिली, त्यामुळे आपल्या देशामध्ये बहुपक्षीय लोकशाही उदयाला यायला मदत झाली, आणि देशात एकपक्षीय एकाधिकारशाही राज्यसंस्था प्रस्थापित झाली नाही (स्वयंनिर्णयनाचा हिंसक मार्ग निवडलेल्या बहुतांश आशियाई व आफ्रिकी देशांचं भवितव्य त्या दिशेने गेलं). गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या लोकांनी लिंगभावात्मक व जातीय समतेवर भर दिल्यामुळे ही तत्त्वं आपल्या संविधानामध्ये नोंदवली गेली. गांधी व जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या लोकांनी धार्मिक व भाषिक स्वातंत्र्यांवर भर दिल्यामुळे भारतामध्ये एका श्रेष्ठ धर्माच्या व एका श्रेष्ठ भाषेच्या आधारावर नागरिकत्वाची व्याख्या केली गेली नाही (इतर अनेक देशांमध्ये अशी व्याख्या केली गेली).

इथे आंबेडकर व नेहरू यांचा उल्लेख जाणीवपूर्वक केला आहे. लोकशाही व सर्वसमावेशक राजकीय प्रेरणा असलेल्या स्वतंत्र भारताच्या निर्मितीमध्ये केवळ गांधींचं योगदान होतं असा दावा मी एक क्षणभरसुद्धा करणार नाही. परंतु, गांधींनी त्यांच्या नेतृत्वाद्वारे, आणि लोकशाही, सांस्कृतिक अनेकतावाद व सामाजिक समता यांवर वारंवार भर देऊन अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली.

सहावं कारण- गांधी त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढे जाणारे पर्यावरणवादी होते. अनिर्बंध वृद्धी व उपभोक्तावाढ यातून पृथ्वीचा विध्वंस होऊ शकतो, याचा अंदाज त्यांनी बांधला होता. डिसेंबर 1928मध्ये त्यांनी लिहिलं होतं: “भारताने कधीही पाश्चात्त्यांप्रमाणे औद्योगिकीकरणाची कास धरू नये, अशी ईश्वराकडे प्रार्थना आहे. एका लहानखुऱ्या बेटावरील राजसत्तेच्या (इंग्लंड) साम्राज्यवादाने आज जगाला साखळदंडांमध्ये अडकावून ठेवलं आहे. तीस कोटी लोकसंख्या असलेल्या पूर्ण राष्ट्राने असंच आर्थिक शोषण करायचं ठरवलं, तर त्यातून टोळधाडीप्रमाणे जग उद्ध्वस्त होईल.” हे विधान असामान्य मर्मभेद करणारं आहे. पाश्चात्त्य देशांनी सुरू केलेला भांडवलकेंद्री, संसाधनकेंद्री व ऊर्जाकेंद्री औद्योगिकतेचा मार्ग अनुसरणारे चीन व भारत खरोखरच जगाला टोळधाडीप्रमाणे उद्ध्वस्त करण्याचा धोका आहे. गांधींनी त्यांच्या जीवनातून व कार्यातून संयम व जबाबदारी यांच्या नीतिमत्तेचा कैवार घेतला- आपल्या पृथ्वीचं भवितव्य या नीतिमत्तेचा व्यापक स्वीकारावर अवलंबून आहे.

सातवं कारण- नवीन घडामोडींनी व नवीन अनुभवांना सामोरं जाताना वाढण्याची व उत्क्रांत होण्याची क्षमता गांधींमध्ये होती, म्हणून ते आजही प्रस्तुत ठरतात. अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड किन्स यांच्या नावावर- बहुधा चुकून- नोंदवलं जाणारं एक प्रसिद्ध अवतरण पुढीलप्रमाणे आहे: ‘तथ्यं बदलतात त्यानुसार मी चार बदलतो. तुमचं कसं असतं, सर?’ गांधींनी 1934 मध्ये  प्रत्यक्षात केलेलं एक विधान असं होतं: ‘मी सुसंगतीची धास्ती घेतलेली नाही. मी त्या-त्या क्षणी स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असेन, तर माझ्या चेहऱ्यातून व्यक्त होणाऱ्या विसंगतीबद्दल माझी काही हरकत नाही.’ 


हेही वाचा : वरदान रागाचे (अरुण गांधी यांच्या 'Gift of Anger' या पुस्तकाचा कर्तव्य साधनावर लेखमाला स्वरूपात प्रसिद्ध झालेला मराठी अनुवाद


गांधींनी त्यांच्या जीवनप्रवासामध्ये खासकरून तीन अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचे विचार बदलले. वंश, जात व लिंगभाव, याबाबतीत त्यांनी स्वतःच्या तारुण्यातील पूर्वग्रह सोडून दिले आणि अधिक पुरोगामी भूमिका घेतल्या. अविचारी वंशद्वेष्टेपणापासून फारकत घेत ते तत्त्वनिष्ठ वंशद्वेषविरोधी झाले, जातीय उतरंडींना भिडस्तपणे व अनिच्छेने आव्हान देणारी भूमिका सोडून त्यांनी या उतरंडींना थेट व स्पष्टपणे आव्हान दिलं, स्त्रियांना न-राजकीय कामांपुरतं मर्यादित ठेवणारी भूमिका सोडून त्यांनी सार्वजनिक अवकाशातील व स्वातंत्र्यसंघर्षातील स्त्रियांच्या सहभागाला मोकळेपणाने प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.

आठवं कारण- अनुयायांमध्ये नेते घडवण्याची दुर्मिळ कला गांधींना साधली होती, म्हणून ते आजही प्रस्तुत ठरतात. ते गुणवत्ता ओळखायचे, तिची जोपासना करायचे, ती विकसित करायचे आणि मग स्वतःहून तिची पुढील वाढ व्हावी यासाठी तिला मोकळं सोडायचे. त्यांच्या भोवती घोळका करणारे त्यांचे अनेक अनुयायी इतिहास घडवून स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करते झाले. अनुयायीपणापासून नेतृत्वापर्यंतचा प्रवास केलेल्या या लक्षणीय व्यक्तिमत्वांमध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, कमलादेवी चट्टोपाध्याय, सी. राजगोपालचारी, झाकिर हुसैन, जे. बी. कृपलानी, जे. सी. कुमारप्पा, सरला देवी (कॅथरीन मेरी हेलमन), अशा अनेक, अनेक लोकांचा समावेश होतो.

भावी नेत्यांची जोपासना करण्याची गांधींची क्षमता पाहिली की स्वतंत्र भारतामधल्या तीन सर्वांत प्रभावशाली पंतप्रधानांची या संदर्भातील अकार्यक्षमता अधिक ठळकपणे समोर येते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व नरेंद्र मोदी यांची स्वभाववृत्ती व राजकीय विचारसरणी यांमध्ये बरीच भिन्नता आहे. परंतु, एका बाबतीत ते एकमेकांसारखे आहेत- पक्ष, सरकार, राज्यसंस्था या गोष्टी स्वतःच्या ओळखीशी जोडण्याची प्रवृत्ती या तिघांमध्येही दिसते. इंदिरा गांधींनी सत्तेच्या या वैयक्तिकीकरणाची प्रक्रिया नेहरूंच्या पुढे नेली आणि मोदींनी ती इंदिरा गांधींच्याही पुढे नेली आहे. हे तिन्ही नेते स्वतःला अपरिहार्य मानत होते आणि आपली जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही अशीही त्यांची धारणा होती. पुढील पिढीतील नेत्यांची जोपासना करण्यासाठी त्यांनी फारसं काही केलं नाही. (राजकारणाबाहेर सत्तेच्या वैयक्तिकीकरणाचं हे वैशिष्ट्य भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक धुरीणांमध्ये, तसंच भारतीय नागरी समुदाय संघटनांच्या नेत्यांमध्येही दिसतं. ते त्यांच्या संघटनेचं अस्तित्व स्वतःच्या ओळखीशी जोडायला प्रोत्साहन देतात.)

नववं कारण- विरोधकाचा दृष्टिकोन समजून घेण्याची, तसंच विरोधकाशी संवाद साधायची तयारी असणं आणि सन्माननजक तडजोडीचा प्रयत्न करणं, या गुणांमुळे गांधी आजही प्रस्तुत ठरतात. त्यांनी जिना व आंबेडकर या त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांबाबत, आणि दक्षिण आफ्रिकेतील व भारतातील साम्राज्यवादी प्रतिनिधींबाबत समेट घडवायचा प्रयत्न संयमीपणे अनेक वर्षं केला. गांधींना कोणाहीबाबत वैयक्तिक अप्रियता वाटत नसे अथवा त्यांच्यात द्वेषभावही नव्हता; त्यांचे केवळ वैचारिक किंवा राजकीय मतभेद असायचे, आणि तेही सोडवता येतील अशी त्यांना आशा वाटत असे. अढी बाळगणं त्यांना शक्यच होत नसे.

दहावं कारण- गांधींनी राजकीय जीवनात पारदर्शकता राखली होती, त्यामुळे ते आजही प्रस्तुत ठरतात. कोणीही त्यांच्या आश्रमात प्रवेश करू शकत असे, त्यांच्याशी वादविवाद घालू शकत असे, आणि प्रत्यक्षात खरोखरच घडलं त्यानुसार, कोणीही त्यांच्यापाशी जाऊन त्यांचा खूनही करू शकत होतं. त्या काळातील असो अथवा आपल्या काळातील असो, सुरक्षेने पछाडलेल्या इतर राजकीय नेत्यांच्या जगण्याशी गांधींचं हे वागणं किती विसंगत वाटतं!

मी इथे संक्षिप्तपणे नोंदवलेले गांधींच्या जीवनातून मिळणारे धडे केवळ भारतातच प्रस्तुत ठरणारे आहेत असं नाही. परंतु, आक्रमक धार्मिक बहुसंख्याकवाद, निंदा व शिवराळपणाची राजकीय संस्कृती, नेते व सरकारं यांच्याकडून होणारा असत्यांचा पुरवठा, नैसर्गिक पर्यावरणाचा विध्वंस, आणि वाढणारं व्यक्तिस्तोम, या भारतातील सध्याच्या वातावरणामध्ये गांधी बहुधा सर्वाधिक प्रस्तुत ठरतात.

(अनुवाद- प्रभाकर पानवलकर)

- रामचंद्र गुहा, बंगळूरू
ramachandraguha@yahoo.in
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)


 

Tags: महात्मा गांधी रामचंद्र गुहा कालपरवा प्रभाकर पानवलकर अनुवादित लेख राजकारण Load More Tags

Comments:

Anup Priolkar

Nice article referring to all the aspects of Gandhi ji past n present.

Satyendra Singh

गांधी जी अब लिखने के लिए नायक नहीं जीने के लिए हैं।

Add Comment