टेलिग्राफसाठी मी लिहितो याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे हे वृत्तपत्र मला जे म्हणायचे असते ते मोकळेपणाने लिहू देते. दुसरे एक कारण म्हणजे, कोलकाता येथील बुद्धिवंतांनी माझ्या मनाला प्रज्ज्वलित केले आहे, घडवले आहे. ते शहर सोडून मला आता पस्तीस वर्षे उलटली असली तरीही तेथील बुद्धिवंतांशी संवाद साधणे तसेच त्यांच्याशी चर्चा-वादविवाद करणे यापासून मी आजही स्वतःला थांबवू शकलेलो नाही.
सुविख्यात राजकीय विश्लेषक पार्थ चटर्जी हे कोलकात्यातील असेच एक बुद्धिवंत आहेत ज्यांच्याशी मी अनेकदा - जाहीररीत्या आणि खासगीतही - वादविवाद केलेले आहेत. सध्या 'लेक टेरेस'मधील जदुनाथ भवन येथे असलेल्या समाजविज्ञान विभागात (Centre for Studies in Social Sciences) पार्थ यांनीच मला पहिल्यांदा कामाची संधी दिली. एखादा शिष्य जसा आपल्या पूर्वीच्या गुरूचे प्रभाव झटकून टाकण्याचे मार्ग शोधत राहतो अशा प्रकारच्या आमच्या नात्यामध्ये काहीएक फ्रॉइडीयन घटकही असावा, असे मला वाटते.
पार्थ चटर्जी आणि मी (इतर अनेक विषयांबरोबरच) भारतातील सर्वांत लोकप्रिय खेळावरही वादविवाद केला आहे. काही वर्षांपूर्वी, 1990 मध्ये, बंगालच्या जगमोहन दालमिया (बीसीसीआय आणि आयसीसी या संघटनांचे माजी अध्यक्ष) म्हणाले होते की, कसोटी क्रिकेटमध्ये सामना अनिर्णित (drow) असण्याची तरतूद रद्द करावी अशी त्यांची इच्छा आहे. पैसे देणाऱ्या प्रेक्षकाला निकालाची अपेक्षा असते, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांनी असा प्रस्ताव मांडला की, कसोटी दीर्घ स्वरुपातील मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये रूपांतरित करावी, ज्यामध्ये दोन्ही गटांना पहिल्या इनिंगमध्ये 90 व दुसऱ्या इनिंगमध्ये 60 ओव्हर्स मिळतील. यावर मी टेलिग्राफमध्ये दालमियांच्या प्रस्तावावर खेद व्यक्त करून त्या वक्तव्याची निर्भत्सना केली. हनिफ मोहम्मद आणि सुनील गावस्कर यांनी प्रतिस्पर्धी गटाला विजय मिळू न देण्यासाठी कशी तासन तास फलंदाजी केली होती याच्या अचंबित करणाऱ्या कथांचा स्वतः साक्षीदार असल्यामुळे मी आग्रहाने त्या लेखात असे नोंदवले होते की, अनिर्णित सामन्यातही त्याची स्वतःची अशी एक मोहकता असते आणि विलक्षण नाट्यमयता असते. पार्थ चटर्जी यांनी त्या लेखाला त्वरित प्रत्युत्तर लिहिले. त्यात त्यांनी, 'स्वतःच्या डोळ्यांसमोर होऊ घातलेला बदल नीट ओळखता येत नाही असा कल्पनाविश्वात रमणारा भ्रमित' अशा शब्दांत माझी संभावना केली होती.
कोलकात्यात असताना पार्थ आणि मी, इतिहास व राजकारण या विषयांवर कितीदा गप्पांचे अड्डे जमवले होते! आणि त्यातील काही क्रिकेटवरही होते. कोलकात्यातील आणखी एक बुद्धिवंत रुद्रांशू मुखर्जीदेखील बहुतेक वेळा आमच्या गप्पांत सहभागी होत. क्रिकेटविषयीची त्यांची आवड त्यांच्या इतिहासाविषयीच्या प्रगाढ अभ्यासाहून तुलनेने कमीच प्रसिद्ध आहे. क्रिकेटचे चाहते असण्याच्या बाबतीत पार्थ आणि रुद्रांशू मुखर्जी यांना माझ्याहून दोन अधिकचे लाभ झालेले आहेत. ते आता माझ्यापेक्षा वृद्ध असल्यामुळे या खेळाविषयी त्यांच्याकडे माझ्याहून अधिक किस्से जमा झालेले आहेत. दुसरे म्हणजे, ते कोलकात्यात लहानाचे मोठे झालेले आहेत. याचा अर्थ असा की, बालवयाचे असल्यापासूनच त्यांना क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ठिकाण उपलब्ध होते. देशाबाहेरील लॉर्ड्स आणि मेलबर्न या सर्व मैदानांमध्ये निर्विवादपणे श्रेष्ठ असणारे इडन गार्डन हे त्या ठिकाणाचे नाव. 1950 पासून तिथे होत आलेल्या कसोटी सामन्यांना हे दोघे हजेरी लावत असत. त्यामुळेच हजारे, उमरिंगर, सोबर्स आणि हार्वे यांना त्यांनी प्रत्यक्ष मैदानात पाहिले आहे. मी मात्र या दिग्गजांविषयी केवळ वाचले आहे.
दुसऱ्या बाजूला, पार्थ आणि रुद्रांग्शू यांच्यापेक्षा एक लाभ मला अधिक झाला आहे. तो म्हणजे, माझे राज्य कर्नाटक हे गेली दहा वर्षे रणजी चषकाचे विजेतेपद पटकावते आहे. मात्र या दोघांच्या बंगालने हे विजेतेपद शेवटचे मिळवले होते ते ब्रिटिश राजवटीच्या काळात. या माझ्या मित्रांनी त्यांच्या उत्तरायुष्यात तब्बल पाच वेळा बंगालला अंतिम सामन्यात खेळताना पाहिले; आणि त्या प्रत्येक प्रसंगी पराजित होतानाही पाहिले. त्यांपैकी त्यांचे चार पराभव हे मुंबईकडून झालेले आहेत. मुंबईने 1958 ते 1973 या सलग वर्षी रणजी चषक जिंकलेला आहे. मात्र मार्च 1974 मध्ये रणजीतल्या अंतिम फेरीत राजस्थानशी सामना करण्यापूर्वी, उपांत्य फेरीत चिन्नस्वामी स्टेडियमवर कर्नाटकने जेव्हा मुंबईला हरवले तेव्हा मी तिथेच होतो. कर्नाटकने गेल्या दशकात हा चषक मुंबईपेक्षा दोनवेळा अधिक मिळवला आहे.
सध्या गाजणारे 'इंडियन प्रीमियर लीग' हेच देशांतर्गत मुख्य क्रीडासत्र असल्यामुळे आता साठी उलटलेल्या क्रिकेटप्रेमींसाठी रणजी चषक म्हणजे काय होते हे नव्या पिढीला पटवून देणे अवघड आहे. 1960 आणि 1970 मध्ये फार कमी कसोटी सामने खेळले जात; आणि टेलिव्हिजनवरही थेट प्रक्षेपणाचीही सुविधा नव्हती, तेव्हा आमच्यापैकी अनेकांना आपापल्या राज्यांच्या संघांचे प्राक्तनच महत्त्वाचे वाटायचे. रणजी सामने हे वीस ते तीस हजारांच्या गर्दीचे आकर्षण होत असत. त्याशिवाय कित्येक जण रेडिओ व वर्तमानपत्रांतील बातम्यांतून सामन्यांविषयी जाणून घेत. त्यावेळी प्रत्येकाच्याच कट्टर निष्ठा जागृत होत. तमिळ क्रिकेटप्रेमींचे प्रतिपादन असे असायचे (जे वस्तुस्थितीच्या नेमके उलट होते) की, वेंकटराघवन हा प्रसन्नापेक्षा चांगला ऑफ-स्पिनर आहे. त्याचवेळी बंगाल्यांचे ठाम मत असायचे (ते देखील वास्तवाहून निराळे होते) की, भारतीय कसोटीमध्ये त्यांच्या क्रिकेटपटूचे पुरेसे प्रतिनिधित्व नसण्यामागे काहीतरी दृढमूल असे कट-कारस्थान आहे.
रणजी चषकामुळेच 'क्रिकेटप्रेमी' अशी आमची ओळख ठळकपणे झाली, त्यामुळे 1980 मधील संभाषणात पार्थ, रुद्रांग्शू आणि मी, भारतीय व पाश्चात्त्य क्रिकेटइतकेच बंगाल व कर्नाटक क्रिकेटविषयीही बोलत असू. माझे हे दोन्ही मित्र त्यांच्या जन्माच्या कित्येक वर्षे आधी, म्हणजे 1938-39 दरम्यान झालेल्या, बंगालच्या रणजी सामन्यातील विजयाच्या कथा ऐकतच लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांच्या त्यावेळच्या संघातील दोन स्टार खेळाडू हे अभारतीय- इंग्रज होते व ते बंगालमधील व्यावसायिक होते. त्यांची नावे होती - ए. एल. हौसी आणि टी. सी. लॉंगफिल्ड. माझे असे मत होते की, ही आद्याक्षरे अलेक्झांडर लिंडसे आणि थॉमस चार्ल्स या नावांसाठीच आहेत. परंतु पार्थ आणि आणि रुद्रांग्शू यांनी मला सांगितले की, इडन गार्डनमधील चाहते त्यांना प्रेमाने आणि आस्थेने अनुक्रमे, अमृत लाल व तुलसी चरन या नावांनी संबोधत असत.
माझ्या बंगाली मित्रांना रणजीतील त्यांच्या संघांच्या विजयाविषयीची माहिती अप्रत्यक्ष, दुय्यम किंवा तिय्यम स्रोतांतून मिळालेली आहे. याउलट माझा संघ माझ्या आयुष्यातच रणजी चषक कित्येकवेळा जिंकलेला आहे. आणि त्यातील काहीवेळा मी स्वतः 'चिअर' करत त्यांना मैदानात प्रत्यक्ष पाहिलेले आहे. मला वाटते की, कोलकात्यातील 1980 च्या त्या गप्पांमध्ये त्यावेळी मी काहीतरी विजयोत्माद नक्कीच व्यक्त केला असेन. एवढेच एक कारण, या महिन्याच्या सुरुवातीला माझ्या मेलबॉक्समध्ये येऊन दाखल झालेल्या पार्थ चटर्जींच्या मेलमधील मजकुराचे स्पष्टीकरण देऊ शकेल. पार्थ यांच्या नेहमीच्या मेल्सप्रमाणे हा मेलही संक्षिप्त होता. परंतु गेल्या काही दिवसांतील आमचा पत्रव्यवहार मतभिन्नतेविरोधातील दडपशाही आणि एकाधिकारशाहीचा उदय यांसारख्या गंभीर विषयांवर असताना हा मेल मात्र क्रिकेटविषयी होता. केवळ दहा शब्दांचाच. आणि त्यात लिहिले होते - 'बंगालकडून कर्नाटकचा धुव्वा! थ्री चियर्स फॉर पिग्गी लाल, हिप हिप हुर्रे!'
पार्थच्या संघाने माझ्या संघाला रणजी सामन्यातील उपांत्य फेरीमध्ये पराभूत केले आणि तेही इडन गार्डनच्या मैदानात! मला शंका आहे की, माझे हे मित्र त्यावेळी प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहू शकले असतील. परंतु त्यांनी तिथे काय घडते आहे याविषयी त्या-त्यावेळी नक्की अतिशय बारकाईने जाणून घेतले असेल. मी स्वतः या सामन्याकडे फारसे लक्ष पुरवले नव्हते. परंतु पार्थच्या मेलवरून असे दिसते - आणि इंटरनेटवर पाहून त्याला पुष्टीही मिळते - अरुण (पिग्गी) लाल हा बंगाल संघाचा प्रशिक्षक होता.
माझ्या जुन्या मित्राच्या आणि वरिष्ठाच्या आनंदाचा मी हेवा करणार नाही किंवा खरंतर काही प्रतिवादही करणार नाही. कारण हा आनंद साजरा करण्यासाठी त्याला खुप वाट पहावी लागली आहे. एरवी कर्नाटकने एकवेळ त्याचा जुना प्रतिस्पर्धी असणाऱ्या मुंबई किंवा त्याहून जुना प्रतिस्पर्धी असणाऱ्या तमिळनाडूकडून पराभूत होण्यापेक्षा बंगालकडून पराभूत होणे याचा मला सामान्यतः खेद वाटला असता. आणि त्याहीपेक्षा माझ्या दुःखात भर घालणारी गोष्ट म्हणजे पार्थ चटर्जींना मी जितकी वर्षे ओळखतो त्याहून अधिक वर्षे मी पिग्गी लाल यांना ओळखतो.
1970 मध्ये सेंट स्टीफन्स कॉलेजसाठी मी त्यांच्याच नेतृत्वाखाली क्रिकेट खेळलो आहे. 16 कसोटी सामने जिंकणारा पिग्गी सलामीला फलंदाजी आणि कुठल्याही ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करायचा. (क्रिकेट समालोचक म्हणूनही तो लोकप्रिय ठरला). तो अतिशय धाडसी आहे. कॅन्सरच्या जोवघेण्या दुखण्यातून सावरून स्वतःचे आयुष्य त्याने नव्याने घडवले आहे. त्याच्यासारखे चारित्र्य आणि क्षमता असणारी व्यक्ती ज्यांना मार्गदर्शनासाठी मिळाली आहे ते बंगाली तरुण क्रिकेटपटू फार भाग्यवान आहेत.
1974 मध्ये दिल्लीकडून पदार्पण करताना पिग्गी लालने रणजी चषक मिळवला होता. काही वर्षांनंतर त्याला कोलकातामध्ये काम मिळाले आणि तेव्हापासून तो पश्चिम बंगालसाठी खेळू लागला. त्याच्यापुर्वीच्या अमृतलाल हौसी व तारक चंद लॉंगफिल्ड यांच्याप्रमाणेच तो नैसर्गिक बंगालनिवासी झाला. 1989-90 मध्ये बंगाल जेव्हा दुसऱ्यांदा रणजी चषक जिंकला तो मुख्यतः या माझ्या जुन्या कॉलेज कप्तानामुळेच! तो फलंदाजी करत असताना मिळणाऱ्या प्रत्येक धावेसरशी 30 हजारांचा समूह 'लाल सलाम' असा जयघोष करत होता.
पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट आता सत्तेत राहिलेले नाहीत. आणि हल्ली रणजीच्या अंतिम सामन्यांनाही फार कमी गर्दी होते. या वर्षीच्या अंतिम सामन्यात पिग्गी लाल स्वतः खेळत नव्हता, तो प्रशिक्षक होता. आणि तो सामना राजकोटमध्ये खेळवला गेला होता. आपल्या भूमीपासून दूर, बंगाल संघाने संघर्ष केला आणि अखेरीस त्यांचा पराभव झाला. या निकालाविषयीच्या माझ्या भावना काहीशा संमिश्र होत्या. एका बाजूला पिग्गी लाल आणि पार्थ चटर्जी या माझ्या मित्रांसाठी मला वाईटही वाटत होते आणि दुसऱ्या बाजूला असेही वाटत होते की, सौराष्ट्राने या आधी कधीही रणजी चषक मिळवले नव्हते. त्यामुळे त्यांचे नावही बंगाल, कर्नाटक (व इतर संघांच्या बरोबरीने) चषकावर कोरले गेले, हे देखील चांगलेच झाले.
एक शेवटचा मुद्दा. इंडियन प्रीमियर लीगने देशातील प्राधान्याचे क्रीडासत्र म्हणून रणजी सामन्यांची जागा संपूर्णपणे व्यापली आहे. परंतु आयपीएल भोवती असणारा गाजावाजा लक्षात घेऊनही मला असे नाही वाटत की, चाहत्यांच्या त्यांच्या संघासाठीच्या निष्ठा तितक्याच गाढ आणि चिरस्थायी राहिलेल्या आहेत. मला कुठेतरी अशी शंका वाटते की, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि नाईट रायडर्स कोलकाता यांचे दोन चाहते एकमेकांच्या संघांच्या बाजूने तीस ते चाळीस वर्षांनंतरही वादविवाद करत राहतील.
(अनुवाद- सुहास पाटील)
- रामचंद्र गुहा
Tags: रणजी ट्रॉफी क्रिकेट अनुवाद Ramchandra Guha Ranaji Trophy Cricket IPL आयपीएल Load More Tags
Add Comment