एप्रिलच्या दरम्यान जेव्हा कोरोनाची ही साथ वेगाने पसरायला सुरुवात झाली तेव्हा अशी भीती होती की, दुसऱ्या महायुद्धानंतरचा इंग्लंडमधला हा पहिलाच उन्हाळा असेल जेव्हा तिथे क्रिकेट खेळले जाणार नाही. सुदैवाने तसे काही घडले नाही. वेस्ट इंडीजविरुद्ध तीन आणि पाकिस्तानविरुद्ध तीन असे सहा सामने खेळवले जाण्याइतपत तिथली परिस्थिती निवळली. लक्षणीयरीत्या रिकाम्या मैदानांत हे सामने खेळवले गेले मात्र जगभर त्यांचे थेट प्रक्षेपण झाले. या भीतीदायक व वेदनादायक काळात आश्रय आणि दिलासा मिळवण्यासाठी माझ्या या आवडत्या खेळामध्ये इतर लाखो क्रिकेटप्रेमींप्रमाणेच मी पुष्कळ वेळ व्यतित केला. सरतेशेवटी दोन्ही मालिका इंग्लंडने जरी आरामात जिंकल्या तरी सामन्यांमध्ये चढाओढ नव्हती असे नाही. महान खेळाडू जिमी अँडरसन याने त्याची सहाशेवी कसोटी विकेट घेतली; आजपर्यंत केवळ फिरकी गोलंदाजांसाठीच राखीव असणाऱ्या संघात पहिला न्यू बॉल गोलंदाज सहभागी झाला आणि क्रिकेटच्या दृष्टीने या उन्हाळ्याचा शेवट आनंदात झाला.
इंग्लंडमधील कसोटी क्रिकेट पाहण्याच्या आनंदातील एक भाग म्हणजे तो पाहताना मनात कुठली अपराधीपणाची भावना नसते. मी सकाळी लवकर उठून काम करणारा माणूस आहे. त्यामुळे दुपारी साडेतीनला क्रिकेट सुरु होण्यापूर्वी काही तास मी एकाग्रचित्ताने वाचन किंवा लिखाण करू शकतो. सामन्यातली मधली चाळीस मिनिटांची विश्रांतीदेखील मला माझ्या कामासाठी वापरता येऊ शकते. इंग्लंडमधल्या सामन्यात व्यत्यय आणणाऱ्या पावसामुळे विश्रांतीचा कालावधीही काहीवेळा वाढतो. भारतातील सामने मात्र नेमके माझ्या कामाच्या तासांमध्येच असतात. किंवा ऑस्ट्रेलियामधले सामने माझ्या झोपेच्या आणि कामाच्या अशा दोन्ही वेळांना आडवे येतात. इथे मात्र मी माझी व्यावसायिक कर्तव्ये आणि आवडीच्या गोष्टीचा ध्यास या दोन्ही गोष्टी कुठल्याही त्रासाशिवाय सहजतेने पार पाडू शकतो.
इंग्लंडमधले सामने आता टीव्हीवर पाहता येतात पण मी जेव्हा तरुण होतो तेव्हा हे सामने 'लाइव्ह पाहण्या’ऐवजी ‘ऐकावे’ लागत असत. मी दिवसेंदिवस संख्येने घटत चाललेल्या अशा भारतीय क्रिकेटप्रेमींपैकी एक आहे, ज्यांच्या क्रिकेटच्या शिक्षणाला रेडिओद्वारे आकार आला आणि रेडिओमुळेच त्याचे पोषण झाले. मी जी पहिली मालिका ऐकल्याचे मला आठवते ती 1966च्या उन्हाळ्यात खेळली गेली होती. तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. आजवरचा सर्वांत महान क्रिकेटपटू आणि कर्णधार गारफिल्ड सेंट ऑबर्न सोबर्स यांची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांच्या बळावर वेस्ट इंडीजने तीन - एक ने इंग्लंडला सहजगत्या पराभूत केले. तेव्हापासून इंग्लंडमधील प्रत्येक उन्हाळ्यातील क्रिकेट मी पाहत आलो आहे. याला अपवाद केवळ 1986चा. कारण त्या वर्षी मी अमेरिकेत होतो आणि तिथे रेडिओ किंवा टीव्ही उपलब्ध नसल्यामुळे कपिलच्या 'डेव्हिल्स'नी तीन कसोटी मालिकांमध्ये दोन - शून्यने इंग्लंडचा जो दारुण पराभव केला तो मला पाहता आला नाही.
इंग्लंडमधील कसोटी क्रिकेट पाहणे नेहमीच आनंदाचे असते आणि विशेषकरून त्यात भारत खेळणार नसेल तेव्हा तर ते अधिकच आनंदाचे असते. कारण अशावेळी कठोरपणे निःपक्ष राहून राष्ट्राभिमानाच्या विषारी भावनेशिवाय केवळ शुद्ध सौंदर्यानुभूतीच्या हेतूने क्रिकेट पाहता येते. आणि भारतीय समालोचकांचे नसणे आनंदात त्याहूनही भर घालणारे असते. हिंदी, तमिळ किंवा मराठी समालोचकांना ऐकणे कदाचित उत्साहाचे असू शकेल, परंतु इंग्रजी भाषेत निवेदन करणाऱ्या भारतीयांमध्ये मात्र तरल सूक्ष्मता आणि नीरक्षीरविवेकाचा अभाव असतो. त्यामुळे तसेही एखादा स्वतः जे पाहतोच आहे त्यात फारशी मूल्यात्मक भर पडत नाही. ते अति प्रमाणात बोलत राहतात आणि घडणाऱ्या प्रत्येकच घटनेवर बोलतात. त्याचप्रमाणे संपूर्ण वेळ ते निलाजरेपणाने हेच उघड करत असतात की, ते ज्या संघाच्या बाजूने आहेत तो संघ कसोटी सामन्यात जिंकणे एवढेच काय ते त्यांना प्राप्तव्य आहे.
टेलिव्हिजनवरचे मला आवडणारे समालोचक हे तीन भिन्न देशांतील आहेत. ते (इंग्रजी वर्णानुक्रमे) इंग्लंडचे मायकेल आथरटन, वेस्ट इंडीजचे मायकेल होल्डिंग आणि ऑस्ट्रेलियाचे शेन वॉर्न. या उन्हाळ्यात हे सर्व उपस्थित होते. आथरटन व होल्डिंग अगदी सुरुवातीपासून होते तर शेन वॉर्न निम्म्यातून सहभागी झाले. आथरटन हे विलक्षण कसोटी क्रिकेटपटू होते, होल्डिंग त्यांच्याहूनही चांगले तर वॉर्न हे तिघांमध्ये सर्वोत्तम होते. तरीदेखील आथरटन स्वतः खेळत असत त्या काळाविषयी कधीही बोलत नाहीत, होल्डिंगदेखील क्वचित बोलतात. वॉर्न यांचे स्नेहल व मोकळे व्यक्तिमत्त्व आणि क्रिकेट बॉलसोबतची त्यांची आश्चर्यकारक कामगिरी यांच्यामुळे वॉर्न काहीवेळेला स्वतःचा संदर्भ देत बोलतात, मात्र तो ढोबळपणे किंवा बढाईखोरपणे दिलेला नसतो.
हे त्रिकुट अतिशय विलोभनीयरीत्या एकमेकांना परस्परपूरक आहे. ते परस्परांहून वेगवेगळ्या देशांतील आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावर त्यांनी एकमेकांहून भिन्न गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे आथरटन फलंदाजीविषयी, होल्डिंग जलद गोलंदाजीविषयी आणि वॉर्न फिरकी गोलंदाजीविषयी सर्वाधिक अधिकारवाणीने बोलू शकतात. 1975 साली होल्डिंग यांनी कसोटीमध्ये पदार्पण केले; 2011च्या अखेरपर्यंत वॉर्न इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत होते. त्यामुळे ते सर्व मिळून जवळपास चार दशकांचा प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव एकत्र आणतात. होल्डिंग आणि वॉर्न हे जगाला धूळ चारणाऱ्या धुरंधर संघांकडून खेळलेले आहेत त्यामुळे ते स्वतःच्या सर्वोत्तम काळाविषयी सुयोग्य (तरी त्यांच्या प्रत्यक्ष कर्तृत्वाहून काहीसा नम्र कमीपणा घेत) अभिमानाने बोलू शकतात. आथरटन जेव्हा इंग्लंडच्या संघात खेळत होते तेव्हा त्या संघाने खेळात कधीही वर्चस्व राखले नव्हते; त्यामुळे हा सामुदायिक यशप्राप्तीचा अभाव आथरटन यांच्या नम्र व्यक्तिमत्त्वाशी सुसंगतच आहे. त्यांची व्यक्तिमत्त्वेदेखील बरीचशी असमान आहेत. वॉर्न यांचा चैतन्यपूर्ण उत्साह हा होल्डिंग यांच्या शांत उत्कटतेशी आणि आथरटन यांच्या मितभाषी भावनाविरहीततेशी संपूर्णतया विरोधी आहे. मात्र व्यक्तिमत्त्वातील व सांस्कृतिक पार्श्वभूमीबाबतच्या त्यांच्यातील सर्व तफावती जमेला धरूनही या तीन समालोचकांमध्ये दोन वैशिष्ट्ये समान आहेत; खेळाचा इतिहास आणि तंत्रे यांचे प्रगल्भ ज्ञान आणि स्वतःच्या राष्ट्राविषयीचा पक्षपातीपणा ओलांडण्याची क्षमता (आणि इच्छादेखील).
माझे मित्र आणि समानधर्मा ‘क्रिकेट नट’ (cricket nut) राजदीप सरदेसाई यांना मी या माझ्या तीन प्रिय व्यक्तींची यादी सांगितली. तेव्हा ते म्हणाले की ते स्वतःकरता या त्रिकुटात नासीर हुसैन यांचा समावेश करून त्याचा चौकोन बनवतील. हुसैन मलाही आवडतात, त्यांच्या परखड आणि स्पष्ट वागण्याबोलण्याच्या पद्धतीसाठी. त्याचबरोबर आथरटन यांच्याप्रमाणेच त्यांच्यातही कोणत्याही बाबतीतील संकुचिततावादाचा लवलेश नाही; मग तो वर्णविषयक असेल, राष्ट्रविषयक असेल, धर्मविषयक असेल किंवा इतर कोणताही.
ही बाब सगळ्याच इंग्लिश समालोचकांच्या बाबतीत नेहमीच प्रत्ययाला येणारी नाही. ब्रायन जॉन्स्टन यांचे उदाहरण घ्या. माझ्या तरुणपणी बीबीसीच्या कसोटी सामना विशेष कार्यक्रमात ते हमखास असायचेच. आणि ब्रिटीश श्रोतृवर्गातील ते सर्वाधिक लोकप्रिय रेडिओ समालोचक होते. 1976 सालच्या, वेस्ट इंडिजच्या इंग्लंड दौऱ्याच्या काळात 'जॉनर्स' यांना ऐकल्याचे मला स्पष्ट आठवते. वेन डॅनियलस् किंवा अँडी रॉबर्टस् यांच्याकडून आलेल्या शॉर्ट बॉलचे वर्णन त्यांनी 'ओंगळवाणा,खरोखरच ओंगळवाणा' असे तुच्छतादर्शक केले. बॉब विलिस आणि ख्रिस ओल्ड यांच्याबाबत मात्र त्यांनी 'एक उत्कृष्ट बाउन्सर' असे शब्द सन्मानपूर्वक वापरले. त्यात अशी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न दिसत होता की, दुष्ट व निर्दयी वेस्ट इंडियन्सनी फलंदाजाला इजा करण्यासाठी बाउन्स केले; आणि तीच कृती खिलाडूवृत्तीचे इंग्लिश क्रिकेटपटू मात्र प्रतिस्पर्ध्याला बाद करण्यासाठी करत होते.
त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा जावेद मियांदाद याने विश्वचषकाच्या उद्घाटनासाठीच्या पाकिस्तानी पथकाचा भाग असल्यामुळे इंग्लंडचा दौरा केला तेव्हा केवळ जॉन्स्टन यांनी त्यांच्याविषयी बोलताना केलेला ‘Mum and I’ (‘Me and Dad’ वरून कोटी करत) असा टिपण्णीवजा उल्लेख स्वतः त्यांच्यासाठी (आणि घरबसल्या ऐकणाऱ्या त्यांच्या श्रोत्यांसाठी) अगदी खसखस पिकवणारा होता. मात्र माझ्या किशोरवयीन कानांना तेव्हाही तो त्यातल्या स्वसंस्कृतीकेंद्रिततेमुळे आणि असभ्यतेमुळे खटकला होता. त्या वर्षी भारताचे विश्वचषकासाठीचे कर्णधार एस् वेंकटराघवन होते. त्यांचे वर्णन या महाशयांना ‘rent a caravan’ असे करावेसे वाटले. आणि तसे करताच ते स्वतःशीच अस्फुट हसले, पण त्यांच्या ब्रिटीश श्रोत्यांमध्ये मात्र निसंशय मोठे हसू उमटले असणार.
1970 च्या कसोटी सामन्यांच्या समालोचकांच्या समुहाचे इतर सदस्य ब्रायन जॉन्स्टन यांच्या इतके असभ्य आणि कडवे राष्ट्रवादी नसले तरी काही प्रमाणात इंग्लंडधार्जिणे होतेच. याला एकच अपवाद होता तो जॉन अरलॉट यांचा. ते सुसंस्कृत आणि विश्वबंधुतावादी व्यक्ती होते आणि जवळपास सर्वच क्षेत्रांमधील वर्णवादाचे आयुष्यभर विरोधक होते. आथरटन आणि हुसैन हे माझ्याहून वयाने किमान दशकभर लहान आहेत. त्यांनी त्यांच्या तरुणवयात ब्रायन जॉन्स्टन यांना कधी ऐकले होते की नाही आणि त्यांच्याविषयी त्यांचे काय मत होते, हे मला ठाऊक नाही. सुदैवाने त्यांचे स्वतःचे चारित्र्य आणि आयुष्यभराचा अनुभव यांनी त्यांना अरलॉट यांच्या परंपरेच्या दिशेने नेले; जॉन्स्टन यांच्या नाही. यासंबंधात ते कसा विचार करतात याला दोन गोष्टींनी आकार दिला असणार – या दोघांपैकी एकाचा विवाह पश्चिम भारतीय व्यक्तीशी झालेला असणे आणि दुसऱ्याचे वडील मद्रासचे रहिवासी असणे. त्याचदरम्यान ब्रिटीश समाजदेखील बहुजातीय आणि पूर्वीपेक्षा अधिक सांस्कृतिक भिन्नता सामावून घेणारा असा होत गेला.
गेले काही आठवडे मी क्रिकेट पाहण्यात आनंदाने व्यतित केले, ज्याची मी (या साथीमुळे) अपेक्षा केली नव्हती. तरीदेखील या उन्हाळ्यातील क्रिकेटच्या समालोचनातील चित्तवेधक भाग हा केवळ खेळाविषयी असण्याऐवजी नैतिक आणि राजकीय होता. ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आंदोलनाने मायकेल होल्डिंगला वांशिक भेदभावाबाबतच्या त्यांच्या स्वतःच्या अनुभवांविषयी विचारायला निवेदकाला प्रवृत्त केले. ज्याचे उत्तर त्यानेही उत्कटतेने आणि वाक्चातुर्याने दिले. त्याच्या या हृद्य कथनाच्या चित्रफिती आता कायमच्या राहतील; जिमी अँडरसनच्या सहाशेव्या कसोटी विकेटच्या पुनःप्रसारणाहूनही दीर्घकाळ...
ताजा कलम : या कसोटीतील एका सामन्यामध्ये पावसामुळे दिल्या गेलेल्या विश्रांतीदरम्यान मी यूट्युबवर गेलो आणि योगायोगाने मायकेल आथरटन आणि शेन वॉर्न यांच्यातील संवादाची तासाभराची उत्कृष्ट चित्रफित तिथे मिळाली. या संवादामध्ये आथरटन यांनी स्वतःची बाजू सहजगत्या सांभाळली आहे, जे त्यांनी त्यांच्या खेळण्याच्या दिवसांत अभावानेच केले होते. त्यावेळी त्यांच्याकडे बॅट होती आणि वॉर्न यांच्यापाशी बॉल.
(अनुवाद: सुहास पाटील)
- रामचंद्र गुहा
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)
Tags: क्रिकेट क्रीडा रामचंद्र गुहा कोरोना कोविड शेन वॉर्न मायकेल आथरटन नासीर हुसैन मायकेल होल्डिंग Ramchandra Guha Corona COVID-19 Shane Warne Michael Atherton Michael Holding Nasser Hussain Load More Tags
Add Comment