चित्रपटगृहात फक्त नऊ प्रेषक असणे आणि उर्वरित 91 रिकाम्या खुर्च्या असणे हे आपल्या समाजाच्या अभिरुचीच्या सामूहिक करंटेपणाचे द्योतक नसून आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थितीचे वास्तववादी प्रतिबिंब आहे. आठवडाभर पिचल्यानंतर, आणि ‘स्व’त्व गमावल्यानंतर आपल्या बोचणाऱ्या वास्तवापासून पलायन इच्छिणाऱ्यांकडून पुन्हा त्याच सामाजिक प्रश्नांना भिडणारे चित्रपट पाहण्याची अपेक्षा ठेवणे चूक ठरेल.
‘कस्तुरी’चा अस्वस्थ दरवळ हे मकरंद दीक्षित यांचे कस्तुरी या चित्रपटाविषयीचे ‘रवंथ’ वाचनात आले. हा समीक्षणसदृश लेख निश्चितच या आशयघन चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करणारा ठरतो, यात वाद नाही. त्याचबरोबर साधना परिवारातर्फे या चित्रपटाच्या प्रचार आणि प्रसारासाठी घेण्यात आलेल्या आणि 16 डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या दोन मुलाखती (दिग्दर्शक विनोद कांबळी आणि दोन मुख्य बालकलाकार - समर्थ सोनावणे आणि श्रवण उपळकर) निश्चितच वाचण्यासारख्या झाल्या आहेत. चांगल्या कलाकृतीच्या प्रसारासाठी 'साधना'ने उचलेले हे पाऊल नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.
67व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट बालचित्रपट या पुरस्काराने सन्मानित आणि अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक झालेल्या या चित्रपटाने एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाला हात घातलेला आहे. चित्रपटात सफाई काम आणि पोस्टमार्टेम करणाऱ्या कुटुंबातील एका मुलाच्या भावविश्वाचे कसे वास्तववादी चित्र साकारलेले आहे, तसेच दिग्दर्शक आणि सर्व कलाकारांनी या चित्रपटासाठी किती कठोर मेहनत घेतलेली आहे याचा अंदाज मकरंद दीक्षित यांचा लेख आणि साधना साप्ताहिकामधील दोन मुलाखती वाचल्यानंतर आपल्याला येतो. दीक्षित यांनी म्हटल्याप्रमाणे कमी अधिक फरकाने आपण सर्वांनीच कुठे ना कुठे या विश्वाचे छोटे-मोठे अनुभव घेतलेले असतात आणि ते न पाहिल्यासारखे करून दुर्लक्षिलेले असतात.
बार्शीसारख्या छोट्या शहरात घडणाऱ्या चित्रपटाचे कथानक वाचून माझ्या डोळ्यांसमोर आमच्या गावाजवळच्या बेळगाव जिल्ह्यातील अथणी या तालुक्याच्या ठिकाणचे काहीसे असेच चित्र वारंवार येत होते. गावाला जाताना, किंवा गावातून शहराकडे परतताना तालुक्याच्या बसथांब्यापासून अगदी जवळ परंतु काहीसे आडोशाला असलेली एक छोटेखानी पोस्टमार्टेम अर्थात शवविच्छेदनाची अडगळीची खोली प्रत्येक वेळी दिसत असे. आणि आत काय असेल, काय सोई असतील, किती स्वच्छता असेल याचा विचार करून अंगावर काटा येई. ‘कस्तुरी’चे कथानक वाचल्यानंतर मात्र तालुक्याच्या ठिकाणची ती खोली वारंवार आठवत होती आणि तिथेदेखील कुणी चित्रपटातील गोपी किंवा वास्तवातील सनी चव्हाणसारखा मुलगा अशी सर्व कामे करत असतील असे चित्र समोर येत होते.
या लेखाचा उद्देश मात्र या चित्रपटाचा आणखीन एक समीक्षणात्मक लेख लिहिण्याचा नसून काहीसा वेगळा आहे. कारण मी हा चित्रपट पाहिलेला नाही. दिल्लीत असल्याकारणाने हा चित्रपट पाहणे अजून तरी शक्य झालेले नाही. मकरंद दीक्षित यांनी लेखात नमूद केल्याप्रमाणे नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप या दोन प्रथितयश निर्माता-दिग्दर्शकांनी एकत्र येऊन या चित्रपटाची प्रस्तुती केली असली तरीही या चित्रपटाचे म्हणावे तसे प्रमोशन झालेले नाही की याचा ट्रेलरदेखील आलेला नाही. त्यामुळे लेखाद्वारे या चित्रपटाचा उत्कृष्ट परिचय करून दिल्याबद्दल दीक्षित यांचे आभार मानावेसे वाटतात. त्यांच्या लेखनामुळेच हा चित्रपट माहीत झाला आणि यथावकाश संधी मिळताच हा चित्रपट पाहण्याची इच्छा नक्कीच निर्माण झाली आहे.
त्यांच्या लेखातील एका छोट्या परंतु सामाजिकदृष्ट्या कळीच्या मुद्द्याकडे लक्ष अधोरेखित करणे हा या लेखाचा मर्यादित उद्देश आहे. दीक्षित यांनी लेखात नमूद केले आहे, ‘चित्रपटाचा दर्जा व बॉक्स ऑफिसचा परस्परसंबंध नसतो. एखादी अभिजात कलाकृती आर्थिक निकषांवर अपयशी ठरून प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेलेली असते.’ कलाकृती आणि बाजार (मार्केट) यांच्यामधील संबंधांविषयीचे हे वास्तववादी निरीक्षण नोंदवल्यानंतरचे त्यांचे मात्र त्यांचे पुढचे वाक्य खटकते – ‘चित्रपट संपल्यावर नऊ प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली स्तब्धता व नंतर एकाच वेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट हे या कलाकृतीचे यश तर उर्वरित 91 खुर्च्या रिकाम्या असणे हे आपल्या सर्व समाजाच्या अभिरुचीचे सामूहिक करंटेपणच अधोरेखित करते…’ या वाक्याबरोबर दीक्षित वास्तववादातून भोळ्या आदर्शवादाकडे सरकतात. चित्रपटगृहातील बहुतांश खुर्च्या रिकाम्या असणे हे कदापि सामूहिक करंटेपणा अधोरेखित करत नाहीत, तर याउलट ते आपल्या समाजाचे वास्तववादी प्रतिबिंब आहे. एक वेळ सुमार चित्रपटांच्या वेळी खुर्च्या रिकाम्या असणे आपण समजू शकतो, परंतु कस्तुरीसारख्या वास्तववादी आणि आशयघन चित्रपटाच्या वेळी बहुतांश खुर्च्या रिकाम्या असणे यामागील सामाजिक संदर्भ आणि परिप्रेक्ष्य समजून घेणे गरजेचे ठरते.
महत्त्वाच्या सणवारांच्या वेळी सुपरस्टार अभिनेत्यांचे चित्रपट येत असतात आणि त्याला तुडुंब गर्दी असते. अशा चित्रपटांच्या सिनेमॅटिक दर्जाविषयी न बोललेलेच बरे किंवा समीक्षकांनी कितीही टीका केली तरीही असे चित्रपट प्रेक्षक वर्गाकडून डोक्यावर उचलले जातात आणि चित्रपटगृहाला उत्सवी रुप प्राप्त होते. याबाबत नजीकच्या काळातील शाहरुख खानचे ‘जवान’ आणि ‘पठाण’ किंवा सलमानचा ‘टायगर 3’ हे निव्वळ करमणूक प्रधान आणि मार-झोड आणि ॲक्शन सीक्वेन्सने ओसंडून वाहणारे चित्रपट डोळ्यासमोर येतात. मालेगाव या शहरात तर तेथील प्रेक्षकांनी हद्दच केली होती, तिथे दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘टायगर 3’ च्या प्रदर्शनावेळी सलमानच्या चाहत्यांकडून चक्क चित्रपटगृहाच्या आत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले आणि आतिषबाजी केली गेली. या घटनेमागील सुरक्षितता धाब्यावर बसवून केलेला मूर्खपणा तूर्तास बाजूला ठेवल्यास आपल्याला ‘टायगर 3’ मधील प्रेक्षकांचा अतिउत्साह आणि कस्तुरीसारख्याच इतर आशयघन अभिजात चित्रपटांकडे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ यातील समान धागा पाहता येऊ शकतो. तसाच काहीसा प्रकार ‘जवान’ आणि ‘पठाण’बाबत देखील सांगता येईल.
चित्रपट ‘जवान’ असो, ‘पठाण’ असो किंवा सलमानचा ‘टायगर 3’; अशा चित्रपटांसाठी छोट्या-मोठ्या चित्रपटगृहांत आणि मल्टिप्लेक्समध्ये गर्दी करणारा समूह पांढरपेशा आणि कष्टकरी दोन्ही वर्गांतील आहे. यातील बहुतांश लोक आपल्या दैनंदिन कामातून पिचलेले आहेत आणि जाणते-अजाणतेपणातून त्यांच्यामध्ये एक दुरावलेपण (alienation) आलेले आहे. आठवडाभर काम करून, दररोज कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी क्रित्येक तास रहदारीत व्यतीत केलेल्या किंवा पाश्चिमात्य देशांच्या वेळेनुसार आपल्या येथील पूर्ण रात्र निशाचरासारखे काम केल्यानंतर आपल्या तुटपुंज्या पगारातून, सर्व खर्च भागवून, जेमतेम बचत केलेल्या या व्यक्ती आहेत. या सर्व गोष्टींचे आठवडभराचे संचित तुंबल्यानंतर, आलेले तुटलेपण आणि तुसडेपण याचा निचरा आठवड्याच्या शेवटी पार्टी करून अथवा ‘जवान,’ ‘पठाण,’ ‘टायगर 3,’ किंवा आताचा ‘ॲनिमल’ यांसारखे चित्रपट आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर पाहण्यात धन्यता मानून होतो. असे चित्रपट पाहण्यास त्यांना आपल्या मेंदूला जास्त ताण द्यावा लागत नाही. आणि अशा वेळी ते काही काळापुरता आपले पिचलेले ‘स्व’त्व विसरून चित्रपटाच्या आभासी जगतात रममाण होतात. तितकाच तो काय त्याच्या अंत:करणाला दिलासा मिळतो. आणि अशा प्रकारे नकळत समाजाचा हा भागदेखील एका चक्रामध्ये (लुप) मध्ये अडकलेला आहे असे आपल्याला पाहायला मिळते.
एका मर्यादित अर्थाने पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की, या दोन्ही समूहांत साम्यस्थळे आहेत. कथानकात सांगितल्याप्रमाणे संडास साफ करणे किंवा पोस्टमार्टेम करण्याआधी दारू पिल्याशिवाय म्हणजेच आपले ‘स्व’त्व विसरल्याशिवाय असे काम करता येऊ न शकणे आणि वर उल्लेखलेली विविध कामे करणाऱ्या कष्टकरी तसेच पांढरपेशा वर्गातील बहुतांश जनतेला पुन्हा ‘स्व’त्वाचा विसर पडल्याशिवाय पुन्हा येणाऱ्या नीरस सोमवाराला तोंड देणे शक्य होणार नाही. अर्थात दोहोंची दाहकता नक्कीच वेगळी आहे, पण या दुष्टच्रकाचे स्वरूप मात्र तेच आहे.
हेही वाचा :
‘कस्तुरी’ सिनेमाचे दिग्दर्शन करताना... - विनोद कांबळे
‘कस्तुरी’मध्ये गोपी आणि आदिम साकारताना... - समर्थ सोनवणे, श्रवण उपळकर
त्यामुळेच चित्रपटगृहात फक्त नऊ प्रेषक असणे आणि उर्वरित 91 रिकाम्या खुर्च्या असणे हे आपल्या समाजाच्या अभिरुचीच्या सामूहिक करंटेपणाचे द्योतक नसून आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थितीचे वास्तववादी प्रतिबिंब आहे. मकरंद दीक्षित किंवा साजिद इनामदार यांसारख्यांसाठी ‘कस्तुरी’सारख्या आशयघन अस्सल अभिजात कलाकृतींचा आस्वाद घेऊन स्तब्ध होणे सोपे असते. किंवा देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवले जाणारे कलात्मक, दर्जेदार पण काहीसे क्लिष्ट चित्रपट पाहून त्यांना दाद देणे सोपे असते; पण म्हणून आपल्या समाजाचा जो भाग असे चित्रपट बघत नाही; किंवा जो फक्त सलमान, शाहरूखचे चित्रपट किंवा ‘ॲनिमल’सारखे चित्रपट आठवड्याच्या शेवटी बघण्यात धन्यता मानतो, त्यांच्या अभिरुचीवर बोट ठेवणे योग्य होत नाही. आठवडाभर पिचल्यानंतर, आणि ‘स्व’त्व गमावल्यानंतर आपल्या बोचणाऱ्या वास्तवापासून पलायन इच्छिणाऱ्यांकडून पुन्हा त्याच सामाजिक प्रश्नांना भिडणारे चित्रपट पाहण्याची अपेक्षा ठेवणे चूक ठरेल. समाजाच्या या बहुसंख्य भागाकडून असे चित्रपट पाहण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे त्यांच्यावर अवास्तव अपेक्षा लादण्यासारखेच झाले.
त्यामुळे ‘कस्तुरी’ सारखे इतरही अनेक आशयघन चित्रपट निर्माण होणे आवश्यक असले, आणि याचे स्वागतच असले, तरीही त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळणे समाजाच्या करंटेपणाचे लक्षण ठरत नाही. जोपर्यंत समाजाच्या या मोठ्या भागाचे दुरावलेपण (alienation) कमी होत नाही तोपर्यंत अशा आशयघन चित्रपटांसाठी जेमतेम प्रेक्षक असणे आणि समीक्षकांनी याबाबत वारंवार तक्रार करणे स्वाभाविकच असणार आहे. या दुरावलेपणाचा प्रत्यक्ष संबंध आपल्या समाज व्यवस्थेशी आहे. जोपर्यंत आपण एका सर्जनशील नवसमाजव्यवस्थेची कास धरत नाही तोपर्यंत अशा आशयघन सामाजिक चित्रपटांसाठी गर्दी होण्याची अपेक्षा फोल ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. कला आणि राजकारण यांना वेगळे केले जाऊ शकत नाही असे म्हणतात ते उगाच नव्हे.
- साजिद इनामदार
sajidinamdar1994@gmail.com
(लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथे संशोधक विद्यार्थी आहेत.)
हेही पाहा :
Tags: interview cinema bilingual film sadhana digital मुलाखत सिनेमा मराठी चित्रपट कस्तुरी makarand dixit मकरंद दीक्षित सिनेमा अभिरुची जवान शाहरुख खान Load More Tags
Add Comment