भारतीय क्रिकेटचं विकेंद्रीकरण व लोकशाहीकरण 1974च्या वसंतात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरू झालं. या सामन्यातील प्रत्येक चेंडू टाकला जात असताना मी प्रत्यक्ष ते पाहिलं होतं- आटोक्यापलीकडचं वाटणारं उद्दिष्ट गाठताना कर्नाटकाने मुंबईला पराभूत केलं. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कर्नाटकातील महान माजी क्रिकेटपटूंचा सन्मान अजूनही करण्यात आलेला नाही, ही बाब प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला अवमानकारक वाटायला हवी - अगदी कर्नाटक राज्यात न राहणाऱ्यांनासुद्धा. कदाचित कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनला या अन्यायाची जाणीव होईल, आणि उशिरा का होईना ते या परिस्थितीत सुधारणा करून चंद्रा, प्रास, शांता व विशी यांची नावं या मैदानातील स्टँडना देतील.
मी मार्च 1974मध्ये बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियम इथे पहिल्यांदा क्रिकेटचा सामना पाहिला. तेव्हा मी 16 वर्षं पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर होतो. त्यानंतर मी या मैदानावर झालेले क्लब पातळीवरचे, राज्या-राज्यांमधले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असंख्य सामने पाहिले. भारतातील सर्वांत सुंदर किंवा सर्वांत सुसज्ज क्रीडास्थळांमध्ये या मैदानाचा समावेश कदाचित केला जाणार नाही; पण मला या मैदानावर क्रिकेट पाहायला सर्वांत आवडतं. रणजी ट्रॉफीत खेळणाऱ्या कर्नाटक संघाचा मी कायमचा समर्थक आहे आणि त्यांचं (नि त्यामुळे माझंही) हे घरचं मैदान आहे. चिन्नास्वामी स्टेडियम माझ्या घरापासून चालत 15 मिनिटांवर आहे; शिवाय, माझ्या आवडत्या बागेपासून आणि माझ्या आवडत्या कॅफेपासून या मैदानापर्यंतचं अंतर म्हणजे क्रिकेटचा बॉल फेकला तरी पोचेल इतकं कमी आहे- त्यामुळे या जागेला माझ्या मनात खास स्थान आहे.
हे मैदान बांधण्यासाठी खटपट केलेल्या व्यक्तीचं नावच त्याला दिलेलं आहे. एम. चिन्नास्वामी हे पेशाने वकील आणि पूर्णपणे असाधारण धाटणीचे क्रिकेट-प्रशासक होते. म्हणजे त्यांच्या कारकीर्दीला कधी भ्रष्टाचाराचा किंवा साट्यालोट्याच्या व्यवहारांचा कलंक लागला नाही. त्यांनी पूर्णतः क्रिकेट या खेळाला, आणि विशेषतः कर्नाटकमधील क्रिकेटच्या हितकार्याला वाहून घेतलं होतं.
कर्नाटकाने, म्हणजे आधीच्या म्हैसूर राज्याने 1960च्या दशकारंभापासून भारतीय संघाला क्रिकेटपटूंचा स्थिर गतीने पुरवठा सुरू ठेवला आहे. परंतु, तामिळनाडू, मुंबई, दिल्ली व पश्चिम बंगाल यांसारख्या इतर समर्थ रणजी संघांकडे स्वतःची म्हणता येतील अशी मैदानं होती, तसं मैदान मात्र कर्नाटकच्या रणजी संघाकडे नव्हतं- या संघाला बंगळुरूतील सेंट्रल कॉलेजच्या मैदानावर ‘होम मॅच’ खेळाव्या लागत. चिन्नास्वामी यांनी ही परिस्थिती सुधारण्याचं काम एकहाती मार्गी लावलं. त्यांनी सरकारला शहराच्या मध्यवर्ती भागात (आधी रिकामा असणारा, पण तांत्रिकदृष्ट्या सैन्याच्या ताब्यातील) एक भूखंड या मैदानासाठी द्यायला लावला. दीर्घकालीन भाडेकरारावर तत्कालीन ‘म्हैसूर स्टेट क्रिकेट असोसिएशन’ला हा भूखंड मिळाला, तेव्हा चिन्नास्वामी या संस्थेचे सचिव होते. भाडेकराराचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यावर संस्थेने वास्तुरचनाकार व कंत्राटदार यांना बोलावलं आणि त्यांनी सचिवांच्या देखरेखीखाली मैदनाचं बांधकाम पूर्ण केलं. चिन्नास्वामी यांच्यामुळे या मैदानाच्या व्यवहारात कोणतीही लाचखोरी झाली नाही.
एम. चिन्नास्वामी
‘गुजरात स्टेट क्रिकेट असोसिएशन’च्या घरच्या मैदानाला नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं ही निंदनीय आणि मानहानीकारक बाब आहे. परंतु, ‘कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन’च्या घरच्या मैदानाला एम. चिन्नास्वामी यांचं नाव देणं मात्र समर्पक ठरतं. या मैदानातील विविध स्टँडना अजून राज्यातील महान क्रिकेटपटूंची नावं देण्यात आलेली नाहीत, ही मात्र निराशाजनक आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विजय मर्चन्ट, आणि विनू मंकड (व इतर) यांच्या नावाचे स्टँड आहेत. दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानाला अलीकडे एका राजकीय नेत्याचं नाव देण्यात आलं (हीसुद्धा खेदजनक बाब आहे); पण किमान तिथले स्टँड तरी बिशन बेदी, मोहिंदर अमरनाथ व विरेंद्र सेहवाग यांच्या कार्याचा सन्मान करणारे आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया इथल्या क्रिकेटच्या मैदानांमध्येही तिथे खेळून ख्यातनाम झालेल्या क्रिकेटपटूंची नावं स्टँडना आणि गेटांना दिलेली आहे- मेलबोर्डन क्रिकेट ग्राउन्डवर शेन वॉर्न, अॅडिलेड ओव्हल इथे क्लॅरी ग्रिमेट, लॉर्ड्सवर डेनिस कॉम्प्टन व बिल एडरिख, ओव्हलवर जॅक हॉब्स - आदींची नावं आढळतात. बंगळुरूमध्ये मात्र क्रिकेटच्या या मुख्य मैदानावर जी. आर. विश्वनाथ, एरापल्ली प्रसन्न व भागवत चंद्रशेखर यांसारख्या खेळाडूंनी कर्नाटकासाठी व भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान केलेला नाही.
कर्नाटकाला भारतीय क्रिकेटमधील एक शक्तिकेंद्र केलेल्या खेळाडूंविषयी जाहीर आदर व्यक्त करणाऱ्या खुणा या मैदानावर नाहीत, याची खंत मलाच नव्हे तर राज्यातील सर्व क्रिकेट चाहत्यांना वाटते. ब्रिजेश पटेल यांच्याशी बोलताना मी एकदा हा मुद्दा उपस्थित केला- त्या वेळी ते क्रिकेटच्या प्रशासकीय रचनेचा भाग व्हायचे होते. कर्नाटकने 1974मध्ये पहिल्यांदा रणजी ट्रॉफीत विजय मिळवला, तेव्हा ते त्या संघाचा भाग होते. दशकभरापूर्वी ते कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनमधील पदाच्या शर्यतीत सहभागी होण्याआधी आमचं या विषयावर बोलणं झालं होतं. चिन्नास्वामी स्टेडियममधील स्टँडना विश्वनाथ, प्रशन्न व चंद्रशेखर यांची नावं द्यावीत, अशी विनंती मी त्यांना केली. कर्नाटकाने दिल्ली व मुंबई संघांचा पराभव करत रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं तेव्हा त्यात ‘विशी’ यांची फलंदाजी, ‘प्रास’ व ‘चंद्रा’ यांची गोलंदाजी यांचा सिंहाचा वाटा होता. त्याआधी, 1971 मध्ये या त्रिकुटाने भारताला वेस्ट इंडीज व इंग्लंड इथे पहिल्यांदा मालिकाविजय मिळवून देण्यातही महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांचा सन्मान केल्याने कर्नाटकातील क्रिकेटचाही सन्मान होईल.
ब्रिजेश पटेल यांना माझी सूचना रुचली नाही. अशाने प्रत्येक जण स्टँडला स्वतःची नावं देण्याची मागणी करायला लागेल, असं ते म्हणाले. पण विशी, प्रास नि चंद्रा यांचा सन्मान केला, तर नंतरच्या काळात कर्नाटकातून भारतीय संघात गेलेल्यांपैकी- विशेषतः राहुल द्रविड, अनिल कुंबळे व जवागल श्रीनाथ या थोर क्रिकेटपटूंमधील कोणीही तक्रार करणार नाही, असं मी त्यांना सांगितलं. द्रविड, कुंबळे आणि श्रीनाथ यांनी आधीच्या त्रिकुटाला आदर्श मानतच स्वतःची कारकीर्द घडवली आणि त्यांना स्वतःची नावं स्टँडना दिली जाण्याची अजिबातच घाई नाही.
कर्नाटकातील रणजी संघामध्ये विशी, प्रास व चंद्रा यांचा कनिष्ठ सहकारी राहिलेल्या आणि नंतर पटेल यांच्याप्रमाणे क्रिकेट प्रशासनाचा भाग झालेल्या एका क्रिकेटपटूशी या वर्षाच्या सुरुवातीला बोलताना मी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला. या क्रिकेटपटूचं नाव आहे रॉजर बिनी. आमची एका विमानतळावर गाठ पडली- आम्ही दोघेही बंगळुरूला जाणाऱ्या विमानाची वाट पाहत होतो. माझ्यासारख्या इतर क्रिकेटचाहत्यांच्या वतीने विनवणी करण्याची ही संधी सोडायला नको, असा विचार करून मी त्यांना भेटलो. चिन्नास्वामी स्टेडियममधील स्टँडना कर्नाटकातील महान माजी क्रिकेटपटूंची नावं द्यायला आपण पाठिंबा द्याल का, असं मी बिनी यांना विचारलं.
माझ्या या प्रश्नावर बिनी यांनी काहीसा अभिमान दाखवत उत्तर दिलं की, ते बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्यावर एका विशिष्ट राज्याची नव्हे संपूर्ण भारतीय क्रिकेटची जबाबदारी आहे. पण ते आधी ‘कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन’चे अध्यक्षही राहिले होते, याची आठवण मी त्यांना करून दिली. त्या वेळी हा विषय पुढे नेण्यासाठी त्यांनी काही केलं होतं का? या माझ्या प्रश्नावर ते काहीच बोललेले नाहीत. विमानाकडे जाणारी आम्हा प्रवाशांची रांग हळूहळू पुढे जात होती, त्या वेळात मी त्यांना आणखी त्रस्त केलं. त्यांच्या आणि माझ्या या घरच्या मैदानातील स्टँडना विशी, प्रास व चंद्रा यांच्यासोबतच आमच्याच राज्याच्या रहिवाशी असणाऱ्या शांता रंगास्वामी या पहिल्या थोर महिला भारतीय क्रिकेटपटूचंही नाव यापूर्वीच दिलं जायला हवं होतं, असं मी त्यांना म्हणालो. आपल्या ज्येष्ठ खेळाडूंचं वैयक्तिक व व्यावसायिक ऋण बिनी यांच्यावरही असल्याची आठवणसुद्धा मी करून दिली. मी बोलत असताना बिनी अस्वस्थपणे रांगेत पुढे जात होते- त्यांनी माझ्या युक्तिवादात तथ्य असल्याचं मान्य केलं नाही, पण किमान ते थोडे शरमल्यासारखे वाटले.
रॉजर बिनी न बोलता शांत राहिले असताना मी शेवटचा वार केला. सलमान रश्दी यांनी त्यांच्या ताज्या कादंबरीत तीन पात्रांना एरापल्ली, गुंडाप्पा व भागवत अशी नावं दिली आहेत, क्रिकेटमध्ये आधी कधी रस न दाखवलेला एक आंग्ल-अमेरिकी कादंबरीकार कर्नाटकाविषयी लिहिताना प्रास, विशी आणि चंद्रा यांचा सन्मान करतो, यावरून सदर क्रिकेटपटूंचं राज्याच्या इतिहासातील आणि लोकांच्या मनातील स्थान स्पष्ट होतं, असं मी त्यांना सांगितलं.
ब्रिजेश पटेल आणि रॉजर बिनी या दोघांनाही क्रिकेट प्रशासनाचा भाग असताना हे काम करायला मुबलक संधी मिळाली होती- त्यांच्याहून आधीच्या पिढीतील व अधिक थोरवी प्राप्त केलेल्या क्रिकेटपटूंची नावं मैदानातल्या स्टँडना देणं त्यांना शक्य होतं. मग त्यांनी तसं का केलं नाही? स्थानिक आयपीएल संघांना पाठबळ पुरवणाऱ्या व्यापारी प्रायोजकांचं मन मोडेल, अशी भीती यामागे होती का? की, प्रशासकीय सत्तेच्या अहंकारामुळे त्यांना इतर क्रिकेटपटूंचं जाहीर कौतुक करवत नाही?
याहून अधिक अटकळी बांधण्यात अर्थ नाही. शक्य तितक्या लवकर विशी, प्रास, चंद्रा व शांता यांची नावं चिन्नास्वामी स्टेडियममधील स्टँडना देणं योग्य आणि न्याय्य ठरेल; त्यानंतर काही वर्षांनी किरमाणी, द्रविड, श्रीनाथ व कुंबळे यांसारख्या निःस्वार्थीपणे कर्नाटकाची व भारतीय क्रिकेटची सेवा केलेल्या आणखी चौघांची नावंही इतर स्टँडना दिली जावीत, इतकंच मी नोंदवू इच्छितो.
हेही वाचा : काही आवडते ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटू - रामचंद्र गुहा
कर्नाटकाने पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली, त्याला पुढच्या वर्षी 50 वर्षं पूर्ण होत आहेत. मुंबईला विजयी स्थानावरून खाली खेचून माझ्या (कर्नाटक) संघाने दिल्ली, हैदराबाद, तामिळनाडू, बडोदा, रेल्वे, पंजाब-हरयाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, सौराष्ट्र व गुजरात यांसारख्या संघांना नंतरच्या काळात या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरण्यासाठी वाट खुली करून दिली, ही एक खऱ्या अर्थाने दैदिप्यमान घटना होती, असं मी इतरत्रही नोंदवलं आहे. नंतरच्या वर्षांमध्ये कर्नाटकानेही आठ वेळा रणजी ट्रॉफी जिंकली. अलीकडच्या वर्षांत या स्पर्धेत मुंबईचा विजय जास्त वेळा होताना दिसतो, पण 1958 ते 1974 या काळात मुंबई संघाने रणजी ट्रॉफीवर गाजवलेलं तसं वर्चस्व मात्र आता दिसत नाही.
भारतीय क्रिकेटचं विकेंद्रीकरण व लोकशाहीकरण 1974च्या वसंतात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरू झालं. या सामन्यातील प्रत्येक चेंडू टाकला जात असताना मी प्रत्यक्ष ते पाहिलं होतं- आटोक्यापलीकडचं वाटणारं उद्दिष्ट गाठताना कर्नाटकाने मुंबईला पराभूत केलं. परंतु, हा लेख मी वैयक्तिक कारणांसाठी लिहिलेला नाही. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कर्नाटकातील महान माजी क्रिकेटपटूंचा सन्मान अजूनही करण्यात आलेला नाही, ही बाब प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला अवमानकारक वाटायला हवी - अगदी कर्नाटक राज्यात न राहणाऱ्यांनासुद्धा. कदाचित कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनला या अन्यायाची जाणीव होईल, आणि उशिरा का होईना ते या परिस्थितीत सुधारणा करून चंद्रा, प्रास, शांता व विशी यांची नावं या मैदानातील स्टँडना देतील. आगामी विश्वचषकातील बंगळुरूमध्ये होणाऱ्या पाच सामन्यांपैकी पहिला सामना 20 ऑक्टोबरला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे- त्याआधी हे नामकरण व्हावं, अशी आशा.
(अनुवाद - प्रभाकर पानवलकर)
- रामचंद्र गुहा, बंगळूरू
ramachandraguha@yahoo.in
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)
Tags: articles on cricket ramchandra guha marathi cricket chinnaswamy stadium sachin tendulkar रामचंद्र गुहा मराठी क्रिकेट क्रीडा वर्ल्डकप विश्वचषक worldcup Load More Tags
Add Comment