विवेकानंद आणि टागोर या दोघांशी मैत्र साधणारा स्कॉटिश

गेडेस यांनी टागोरांना विविध विद्याशाखांचे एकत्र शिक्षण देण्याविषयीची एक योजना पाठवली होती...

पॅट्रिक गेडेस | फोटो सौजन्य: dundeescottishculture.org

स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर हे आधुनिक काळातील दोन थोर बंगाली होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बंगालवर, भारतावर आणि जगावर त्या दोघांचाही प्रचंड प्रभाव होता आणि तो आजतागायत टिकून आहे. टागोर आणि विवेकानंद जवळपास समकालीनच होते, आणि दोघेही कोलकाता व आसपासच्या परिसरात राहिले. आणि जरी ते दोघेही एकमेकांचे कार्य निसंशय ओळखून असले तरी त्यांची प्रत्यक्ष भेट मात्र एकदाच झाली होती असे दिसते. जानेवारी 1899 मध्ये अमेरिकन कौन्सिल जनरलच्या पत्नीने आयोजित केलेल्या चहापानादरम्यान त्यांची भेट झाली होती. 

हा स्तंभ अशा एका उल्लेखनीय स्कॉटिश व्यक्तीबाबत आहे ज्याचे विवेकानंद आणि टागोर या दोघांशीही मैत्र निर्माण झाले होते. त्यांचे नाव पॅट्रिक गेडेस. जगभरातील पर्यावरणविषयक आणि नगररचनाविषयक वर्तुळांमध्ये प्रशंसापात्र असलेल्या गेडेस यांच्याविषयी उच्चशिक्षित बंगालींनीही फारसे ऐकले असण्याची शक्यता नाही. मात्र ही अशी व्यक्ती होती ज्यांच्याविषयी टागोरांनी एकदा म्हटले होते की, त्यांच्यापाशी ‘वैज्ञानिकाची अचूकता व प्रेषिताची दृष्टी; आणि त्याचवेळी स्वतःच्या कल्पना साकार करण्यासाठी कलावंताची क्षमतादेखील’ आहे. 

इतिहासकार मर्डो मॅकडोनाल्ड यांच्या Patrick Geddes’s Intellectual Origins या नव्या सुरेख पुस्तकात हे शब्द उद्धृत केलेले आहेत. ज्ञानाबाबतच्या गेडेस यांच्या आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनावर मॅकडोनाल्ड भर देतात. गेडेस हे एकाचवेळी वनस्पतीशास्त्रज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतकेच नव्हे तर नगररचनाकारदेखील होते. आणि आपल्या नगररचनेच्या व्यवसायात त्यांनी या सर्व विद्याशाखांचा संयोग घडवला होता. बहुतेक शास्त्रज्ञ (आणि बरेचसे समाजशास्त्रज्ञदेखील) यांच्यात न आढळणारी तीव्र कल्पनाशक्तीही गेडेस यांच्यापाशी होती.    

1900 च्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेमध्ये पॅट्रिक गेडेस यांची स्वामी विवेकानंदांशी पहिली भेट झाली. तेव्हा ते दोघेही त्या देशात व्याख्याने देत होते. त्याच वर्षीच्या उन्हाळ्यात पॅरिसमध्ये त्यांची पुन्हा भेट झाली, जेव्हा फ्रान्सच्या या राजधानीत एक जागतिक मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि तिथे पॅट्रिक यांचाही एक स्टॉल होता. स्वामींना प्रवासात साथ करण्यासाठी त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता सोबत होत्या. या प्रसंगानंतर काही वर्षांतच विवेकानंदांचे देहावसान झाले. गेडेस मात्र निवेदितांच्या निकट संपर्कात राहिले. एक स्कॉटिश मनुष्य आणि एक आयरिश स्त्री यांचे चांगले सख्य जुळले. रामकृष्णांच्या शिकवणुकीद्वारे निवेदितांनी त्यांना भारतीय अध्यात्माची ओळख करून दिली; तर गेडेस यांनी त्यांना फ्रेंच विद्वान फ्रेडरिक ले प्ले (Frederic Le Play) यांच्या साहित्यातून मानवी भूगोलाचा परिचय करून दिला. ‘मला काही अंशी युरोप समजून घ्यायला शिकवल्याबद्दल’ अशा शब्दांत 'The Web of Indian Life' हे पुस्तक निवेदितांनी गेडेस यांना अर्पण केले आहे. 

1903 मध्ये भगिनी निवेदितांनी पॅट्रिक गेडेस यांना भारतातील एका नियोजित विद्यापीठाविषयी लिहिले आहे. या उपक्रमासाठीचा निधी उद्योगपती जमशेटजी टाटा यांच्याकडून येणार होता. टाटांना भारताच्या वैज्ञानिक भवितव्यासाठीची ही गुंतवणूक करण्याचा सल्ला स्वामी विवेकानंदांनीच दिला होता. मात्र त्यानंतर स्वामी निधन पावले होते; त्यामुळे निवेदिता यांनी दीर्घकाळ प्राध्यापकी केलेल्या गेडेस यांना या नव्या भारतीय विद्यापीठाची रचना कशी असावी याविषयी काही सूचना पाठवण्यास सांगितले. त्यांनीही निवेदितांना पत्रांची मालिकाच लिहिली. मध्ययुगीन तसेच आधुनिक काळातील युरोपिय व अमेरिकन विद्यापीठे, त्यांच्या शिकवण्याच्या व शिकण्याच्या व्यवस्था, आणि भारतात विद्यापीठ स्थापन करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी त्यांच्यापाशी असलेले अनुभवजन्य ज्ञान व सूचना यांचे विहंगमावलोकन या पत्रांत मिळते. 

निवेदितांना लिहिलेल्या पत्रांमध्ये गेडेस यांनी शिक्षणाविषयीच्या गाढ पर्यावरणीय दृष्टिकोनाची रूपरेखा मांडली आहे. ते लिहितात: ‘आपल्याजवळच्या भूप्रदेशाच्या निसर्ग-अभ्यासापासून सुरुवात करून, केवळ भौतिक अर्थाने भूगोल लक्षात घेऊन, थेट निसर्गावर आधारलेल्या व्यवसायांद्वारे आपण आपल्या सामाजिक जीवनाशी जोडतो. इथूनच आपल्या संस्था विकसित होतात, आणि त्यांच्याशी संलग्न किंवा त्यांच्यातून निर्माण झालेल्या कल्पनादेखील. त्या कल्पना आपण भूगोलाच्या विस्तीर्ण प्रदेशावर, इतिहासाच्या विस्तृत पल्ल्यावर वाढत जाणाऱ्या वर्तुळांत रेखाटतो; त्या त्यांच्या सामान्य व उत्क्रांत होत गेलेल्या वस्तुनिष्ठ व व्यक्तीनिष्ठ अशा दोन्ही दृष्टिकोनांबाबतीत सारख्याच असतात. म्हणजे प्रत्येक पातळीवर, पहिल्यांदा आपल्याला दिसते की, कसे निसर्गाने या व्यवसायांना आणि संस्थांना बद्ध केले आहे; पण नंतर असे समजते की, आदर्शांनी कसे आध्यात्मिक आणि ऐहिक जीवनाला पुनरुज्जीवित केले आहे, शिक्षण निर्धारीत केले आहे, आणि वाङ्मय व कला यांमध्ये त्यांनी अभिव्यक्त केले आहे.'  

टाटांच्या निधीतून 1909 मध्ये भारतीय विज्ञान संस्था स्थापन झाली, तेव्हा तिथे भूगोल -गेडेस यांनी ज्याला ‘निसर्गाभ्यास’ म्हटले होते- विभागच नव्हता. 1980 च्या दशकात या संस्थेने पर्यावरणशास्त्राचे केंद्र (Centre for Ecological Sciences,) स्थापन केले, त्यानंतर आजपर्यंत त्या केंद्राने मानव – निसर्ग संबंधांवर उत्कृष्ट संशोधन केले आहे. 

1911 मध्ये भगिनी निवेदितांचे निधन झाले. तीन वर्षांनंतर, त्यांच्या आठवणींनी प्रेरित होऊन पॅट्रिक गेडेस भारतात आले. पुढील जवळपास दशकभराचा काळ त्यांनी नागरीकरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास करत भारतीय उपखंडातच व्यतीत केला. काळाच्या पुढे असणाऱ्या आणि आजही कालसुसंगत असणाऱ्या त्यांच्या भारतीय नगररचनेसंबंधातील कार्याविषयी मी दुसऱ्या ठिकाणी लिहिले आहे. इथे मला मुख्यत्वेकरून त्यांच्या रवींद्रनाथांशी असणाऱ्या संबंधांविषयी लिहायचे आहे. 

1915 मध्ये कोलकाता येथे पहिल्यांदा टागोर आणि गेडेस यांची भेट झाली. त्यानंतर 1917 च्या सप्टेंबरमध्ये ते दार्जिलिंगमध्ये शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस (ज्यांचे चरित्र हा स्कॉटिश मनुष्य कालांतराने लिहिणार होता) यांच्या घरी ते पुन्हा भेटले. त्यानंतरही बरीच वर्षे त्यांचा एकमेकांशी अधूनमधून परंतु नेहमीच मनोवेधक असा पत्रव्यवहार होता (The Tagore-Geddes Correspondence संपादन: बाशाबी फ्रेझर (कोलकाता विश्वभारती : 2004) मध्ये तो पुनःप्रकाशित करण्यात आला आहे). एप्रिल 1919 मध्ये गेडेस टागोर यांना लिहितात, ‘‘शिक्षण’ आणि ‘जंगल’ या दोन्ही विषयांवरील तुमच्या व्याख्यानांकरता तुमचे अभिनंदन! दोन्ही आपापल्या पद्धतीने सुरेख होती’. 

तीन वर्षांनंतर गेडेस यांनी टागोरांना विविध विद्याशाखांचे एकत्र शिक्षण देण्याविषयीची एक योजना पाठवली. शांतीनिकेतनमध्ये टागोर उभारत असलेल्या विद्यापीठात वापरली जाऊ शकेल म्हणून काहीशा आगंतुकपणे ती योजना त्यांनी पाठवली होती. उत्तरादाखल टागोरांनी लिहिले: ‘माझे ध्येय साध्य करण्यासाठी मी नेहमीच आपल्यासारख्या व्यक्तीच्या मदतीची इच्छा बाळगली आहे, ज्यांच्यापाशी केवळ सर्वसमावेशक सहानुभूती आणि कल्पनाशक्तीच असेल असे नाही तर विस्तृत ज्ञान आणि विश्लेषक दृष्टीही असेल. वास्तुरचनाशास्त्रातील आपल्या दृष्टीचा अफाटपणा मी नेहमीच आश्चर्यमिश्रीत कौतुकाने पाहत आलो आहे. मात्र या वेळी मला हे कळवावे लागते आहे की, आपल्या याच दृष्टीने आम्हाला पुरवलेल्या दृष्टिकोनाच्या पार्श्वभूमीचा व्यावहारिक उपयोग करून घेणे माझ्या क्षमतेबाहेरचे आहे. माझ्या स्वतःच्या प्रकृतीधर्माच्या काही स्वभाववैशिष्ट्यांना माझ्या कामाचा बहुतेक भाग मनाच्या अंतःस्तरातील अनाकलनीय पातळीवर असण्याची गरज भासते. माझ्या सर्व कृतींमध्ये 'खेळाचा' भाग असतो. — कमीअधिक प्रमाणात, एखादी कविता लिहिण्याप्रमाणेच त्या असतात; केवळ अभिव्यक्तीचे माध्यम वेगळे असते. तुम्ही सुचवलेल्या योजनांमध्येदेखील असेच घटक मोठ्या प्रमाणात आहेत ज्यांनी मला तीव्रपणे आकृष्ट केले आहे, मात्र त्यांत भाषिक अभिव्यक्तीचा फरक आहे, ज्यांचा वापर करणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे.’

1924 मध्ये गेडेस युरोपात परत आले. तिथे मॉनपेलिये (Montpellier) या फ्रेंच शहरात त्यांनी एक संस्था स्थापन केली. दोन वर्षांनंतर त्यांनी टागोरांना लिहिले, ‘इथे नुकत्याच झालेल्या चर्चेमध्ये आम्ही सर्व याविषयी शोक व्यक्त करत होतो की, विविध क्रांतिकारी पक्षांची आपापली पुष्कळ गीते आहेत; परंतु खऱ्या अर्थाने पुरोगामी असणाऱ्या पक्षांकडे मात्र अजूनही अशी गीते नाहीत. राष्ट्रसंघाची (त्याच्या अंगभूत मर्यादांसह) अभिव्यक्ती असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहानुभावाच्या व सदिच्छेच्या चळवळीला व्यक्त करू शकेल अशा एखाद्या गीताची उणीव असल्याची खंत आम्हाला वाटते... त्यामुळे जसजशी चर्चा वाढत गेली तसे सर्वजण एका सुरात यावर सहमत झाले की, आपल्याला हव्या असणाऱ्या गीतासाठी आपण टागोरांना विचारायला हवे. आपण लिहाल का? मॉनपेलियेमधील आमच्या संगीतविद्यालयाचे प्रमुख -जे स्वतः एक प्रशंसनीय संगीतकार आणि खरे ध्येयवादी आहेत- त्यांच्या अमूल्य प्रभावाच्या जोरावर आमच्याच तरुण कवींपैकी एकाकडून, या गीताचे फ्रेंचमध्ये उत्तम भाषांतर करून घेतील. एवढेच नाही तर आम्हाला इकडे पश्चिमेत काही अडचण भासली तर ते स्वतः ते गीत युरोपीय पद्धतीने संगीतबद्ध करण्यासाठी पराकाष्ठा करतील.' 

या विनंतीला उत्तरादाखल टागोर म्हणाले: ‘आपण ज्याविषयी विचारणा केलीत ते गीत मी लिहिण्याचा प्रयत्न करेन. मात्र तुम्हाला हे ठाऊक असायला हवे की, माझ्या मातृभाषेच्या तुलनेत तुमची भाषा सहजासहजी माझ्या सर्जनाच्या स्वाधीन होणार नाही. आणि हा आत्मविश्वासाच्या अभावाचा प्रारंभिक अडथळाच मला या कामापासून दूर करेल अशी भीती वाटते. (असे दिसते की, ज्या आंतरराष्ट्रीयतावादी (internationalist) गाण्याविषयी विचारणा झाली होती ते शेवटी लिहिले गेलेच नाही.) 

1929 च्या ऑगस्टमध्ये गेडेस यांनी टागोरांना लिहिले: ‘काल रात्री मी तुमच्या 'सर्जनशील एकात्मतेविषयी' (Creative Unity) ताज्या औत्सुक्याने आणि नव्या आनंदात वाचत होतो. तुम्ही जशा कल्पना मांडता तशा मी कधी मांडू शकेन! आमच्यापाशी कल्पना आहेत; त्या व्यक्त करण्याची गरजही आहे, मात्र (मला अशी भीती वाटते की, कदाचित पुरेसे प्रेमैक्य नसल्याने) उणीव आहे ती केवळ अभिव्यक्तीची! 

1930 मध्ये गेडेस यांनी टागोरांना मॉनपेलियेमध्ये आमंत्रित केले. त्या उन्हाळ्यात टागोर ऑक्सफर्ड येथे हर्बर्ट व्याख्यानासाठी जाणार होते. फ्रान्समधल्या या मित्राला भेटण्याची त्यांची पूर्ण तयारी झाली होती, मात्र नंतर छातीत दुखणे उद्भवल्यामुळे आणि ऑक्सफर्डमधील कामासाठी तंदुरुस्त असावे यासाठी त्यांच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांना मॉनपेलियेचा दौरा रद्द करावा लागला. दोघांसाठीही खेदाच्या आणि दिलगिरीच्या भावनेने तो त्यांनी रद्द केला. त्यानंतर त्यांना एकमेकांना पुन्हा कधीही पाहता आले नाही.  
    
शिकण्याच्या बाबतीतील एकात्मिक आणि प्रयोगशील दृष्टिकोनाबाबत दोघांनाही असणारा रस, त्यांचा आंतरराष्ट्रवाद, त्यांचे निसर्गप्रेम आणि मानवी ज्ञानाच्या मर्यादांविषयी खोलवरचा आदर या सर्व गोष्टींनी एक स्कॉटिश पर्यावरणतज्ज्ञ आणि बंगाली कवी यांना एकत्र आणले होते. मर्डो मॅकडोनाल्ड यांनी लिहिल्यानुसार: 'टागोर आणि गेडेस यांनी एक महान करार केला होता. दोघांनीही आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन गृहीत धरलेला होता, संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी दोघेही असामान्यरित्या कार्यरत होते आणि दोघांनाही पर्यावरणशास्त्राचे महत्त्व मान्य होते.'
    
गेडेस यांचा बौद्धिक वारसा प्रशंसनीयरित्या पुढे चालवला त्यांचे अमेरिकन अनुयायी लुईस ममफोर्ड यांनी. Technics and Civilization आणि The Culture of Cities या त्यांच्या महान पुस्तकांत त्यांच्या मार्गदर्शकाच्या शिकवणुकीची छाप दिसते. ममफोर्ड यांनी गेडेस यांच्याविषयी एकदा अशी टिपणी केली आहे, ‘गेडेस यांच्या स्कॉटलंडने युरोपला आलिंगन दिले आणि त्यांच्या युरोपने जगाला!’ त्याच चालीवर आपणही गेडेस यांच्या मित्राविषयी असे म्हणू शकतो , 'टागोरांच्या बंगालने भारताला आलिंगन दिले आणि त्यांच्या भारताने जगाला!'

(अनुवाद- सुहास पाटील)

- रामचंद्र गुहा, बेंगळूरू

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: अनुवाद रामचंद्र गुहा पॅट्रिक गेडेस स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर भगिनी निवेदिता जमशेदजी टाटा पर्यावरण शिक्षण Patrick Geddes Ramchandra Guha Swami Vivekanand Ravindranath Tagore Bhagini Nivedita Jamshetji Tata Environment Education Load More Tags

Comments:

खूप दीघंपण छान लेख

भाषा थोडी जड असुन लेख थोडा अधिक लांबला गेला आहे

Vishwas Sutar

नव्या गोष्टी समजून आल्या. गुहा सरांचे लेखन व व्याख्यान म्हणजे बौद्धिक खुराकच !

Add Comment