ई. एस. रेड्डी : एक महान गांधी-कोश

एक गांधी अभ्यासक म्हणून घडलेल्या माझ्या प्रवासात ते मला पितृस्थानीच राहतील.

नेल्सन मंडेला यांना डांबण्यात आलेल्या कोठडीच्या बाहेर ई. एस. रेड्डी | फोटो सौजन्य - शफीऊर रहमान

काही दिवसांपूर्वीच ई.एस. रेड्डी यांचे निधन झाले. त्यांच्या आयुष्यातील आणि कर्तृत्वातील महत्त्वाचे पैलू मांडणारा स्मृतिलेख मी 'फायनान्शिअल टाईम्स'मध्ये लिहिला आहे. माझ्यासाठी किंवा माझ्यासारख्या इतर गांधी-अभ्यासकांसाठी त्यांचे स्थान काय होते ते व्यक्त करण्यासाठी या स्तंभात मात्र मी त्यांना अधिक व्यक्तिगत आदरांजली अर्पण करणार आहे.

एनुगा श्रीनिवासुलु रेड्डी यांना 1994मध्ये मी पहिल्यांदा भेटलो. न्यूयॉर्कमध्ये आमची भेट झाली होती. ‘महान गांधी-कोश’ (great Gandhi-reservoir) हीच रेड्डींची ओळख गोपालकृष्ण गांधींनी मला करून दिली होती. त्यांना लाभलेल्या या अभिधानाची अनुभूती पुढची 25 वर्षे मी पदोपदी घेतली. त्याचे काही पुरावे बंगळूरूतील माझ्या डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये आहेत. त्याच्यामध्ये तीन मोठे फोल्डर्स आहेत... त्यांची नावे - E.S. Reddy Material, Instalment I, II and III, (ई.एस. रेड्डी साधने, खंड - 1, 2 आणि 3) गोपाल गांधींच्या (आणि आता माझ्याही) या मित्राने वर्षानुवर्षे शेकडो फायली मला भेट दिल्या आहेत. कधी इमेलच्या स्वरूपात तर कधी कुरियरने पाठवलेल्या सीडीमधून त्याने त्या दिलेल्या आहेत. माझ्या या उपकारक मित्राने उदार अंतःकरणाने मला पाठवलेल्या साधनांमध्ये अर्धा डझन भाषांतल्या वृत्तपत्रांतील, नियतकालिकांतील लेख; गांधींशी संबंधित, तीन देशांमधल्या व्यक्तींची माहिती; गांधींच्या निधनानंतर त्यांच्यावर प्रसिद्ध झालेली चिकित्सक भाष्ये आणि असे बरेच काही होते.

जगातील सर्वश्रेष्ठ गांधी अभ्यासक अशी ओळख निर्माण होण्यापूर्वी ई.एस. रेड्डी यांनी एका वेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य संपादन केले होते. 1924ला त्यांचा जन्म झाला. दक्षिण भारतामध्ये, स्वातंत्र्यलढ्यात सामील झालेल्या कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे व्यावसायिक आयुष्य त्यांनी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काम करण्यामध्ये व्यतीत केले. तिथेही संयुक्त राष्ट्रांच्या केंद्राला अफ्रिकेतील वर्णद्वेषी धोरणाच्या (Apartheid) विरोधात निर्देशित करण्यासाठी त्यांनी बराच काळ काम केले. दक्षिण अफ्रिकेतील वर्णद्वेषी सत्तेला सुरुंग लावण्यासाठी आणि सरतेशेवटी क्षीण करण्यासाठी कोणत्याही इतर अफ्रिकाबाह्य व्यक्तीच्या मानाने श्री.रेड्डी यांनी त्यांच्या परीने अधिक काम केले होते. 

गांधींच्या अभ्यासासाठी वाहून घेणे त्यांना निवृत्तीनंतर, त्यांच्या वयाच्या साठीत शक्य झाले. गांधी, त्यांचा प्रभाव आणि त्यांचा वारसा यांवर रेड्डींनी डझनावारी पुस्तके लिहिली आहेत. आणखी दोन पुस्तके त्यांच्याकडून लिहून पूर्ण झाली होती. ती आता प्रकाशनाच्या मार्गावर आहेत... मात्र या (किंवा इतरही) क्षेत्रांतील विद्वानांप्रमाणे स्वामित्व भावनेचा लवलेशही रेड्डी यांच्यापाशी नाही; त्यांच्याकडे असणाऱ्या साधनांविषयी जिज्ञासा असणाऱ्या कुणालाही ती साधने ते उपलब्ध करून देत. अनेक अभ्यासकांना व्यक्तिशः मदत करण्याबरोबरच त्यांनी नेहरू मेमोरिअल म्युझिअम आणि लायब्ररी, येल युनिव्हर्सिटी अशा संस्थांना हजारो दुर्मीळ कागदपत्रे दान केली आहेत. अहमदाबाद येथील साबरमती आश्रमासाठीच्या पहिल्या संगणकासाठी खर्च करणारेदेखील श्री.रेड्डीच होते... ज्याच्यामुळे गांधींच्या आश्रमातील पत्रांच्या अमूल्य संग्रहाचे डिजिटायझेशन शक्य झाले. 

काही दिवसांपूर्वीच ई.एस. रेड्डी यांचे निधन झाले. त्यांच्या आयुष्यातील आणि कर्तृत्वातील महत्त्वाचे पैलू मांडणारा स्मृतिलेख मी 'फायनान्शिअल टाईम्स'मध्ये लिहिला आहे. माझ्यासाठी किंवा माझ्यासारख्या इतर गांधी-अभ्यासकांसाठी त्यांचे स्थान काय होते ते व्यक्त करण्यासाठी या स्तंभात मात्र मी त्यांना अधिक व्यक्तिगत आदरांजली अर्पण करणार आहे.

प्राथमिक साधनांचा अखंड स्रोत पुरवण्यासोबतच श्री.रेड्डी काही पुस्तकेही सुचवत असत. उदाहरणार्थ, दक्षिण अफ्रिकेत गांधींनी जे सत्याग्रह केले त्यासंबंधी दोन प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी केलेले, दुर्मीळ असलेले लेखन त्यांनी मला वाचण्यासाठी सुचवले होते. ती पुस्तके भवानी दयाल आणि रावजीभाई पटेल यांची होती. जेव्हा मी गांधींचे चरित्र लिहिण्यास प्रारंभ केला तेव्हा श्री.रेड्डी यांनी काही विषय ठळक केले... जिथे काळजीपूर्वक लक्ष पुरवण्याची गरज होती. एका मेलमध्ये त्यांनी लिहिले - ‘गांधी आणि ज्यू या विषयासाठी तुम्हाला जवळजवळ एखादे प्रकरणच द्यावे लागेल... गांधींविषयी स्नेह असलेले पाश्चिमात्य विद्वान या विषयाला स्पर्श करू इच्छित नसत... कारण ‘जर्मनीतील ज्यूंनी सामूहिक आत्महत्या करावी’ असे गांधींचे उद्धृत लुई फिशरने त्याच्या पुस्तकात दिले आहे.’ ते पुढे म्हणाले - ‘या विषयावरील माझ्याकडच्या कागदपत्रांचे संकलन मी सोबत जोडत आहे. त्याच्यामध्ये मार्टिन बुबेर आणि जुदा एल मॅग्नस (हिब्रू विद्यापीठाचे मानद प्रमुख) यांनी गांधींना लिहिलेल्या पत्रांतला मजकूर आहे. हे दोघेही अरबांशी स्नेहसंबंध प्रस्थापित करू इच्छित होते.’

अफ्रिकेत गांधीनी केलेल्या संघर्षाविषयीची त्यांची स्वतःची स्मरणिका ‘सत्याग्रह इन साऊथ अफ्रिका’ या नावाने ओळखली जाते. या नेत्याने स्वतःच स्वतःविषयी जे लिहिले आहे त्याच्या पलीकडे जाण्यासाठी श्री.रेड्डी यांनी मला आग्रह केला. महात्म्याच्या 140व्या जयंतीदिनी, 2 ऑक्टोबर 2009 रोजी पाठवलेल्या पत्रात ते नोंदवतात - ‘गांधींनी सत्याग्रहाचे पुरेसे श्रेय तमिळींना दिले नाही आणि कछलिया, रुस्तुमजी, अडजानिया इत्यादी गुजरात्यांची पुष्कळ स्तुती केली असे मला जाणवते. याचे कारण कदाचित असे असावे की, त्यांचे सामाजिक जीवन गुजरात्यांसोबतच होते... मात्र सत्याग्रहातून (गुजराती) व्यापारी बाहेर पडल्यानंतर तमिळींनीच तंबी नायडू यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह सुरू ठेवला होता.’

श्री.रेड्डी यांनी मला याचीही आठवण करून दिली की, गांधींच्या सामाजिक दृष्टीचे वर्धन ठिकठिकाणच्या विस्थापित लोकसमूहांमध्ये (diaspora) झाले. त्यांनी असे म्हटले - ‘दक्षिण अफ्रिकेतील अनुभवांमुळे गांधींनी शेतकरी, कामगार आणि स्त्रिया यांचा चळवळीत समावेश केला. या संघर्षातून अनेक व्यापारी बाहेर पडले... मात्र हे गरीब लोक त्यांच्या व्यक्तिगत अडीअडचणींमधूनही अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने आणि गांधींच्या फारशा मार्गदर्शनाशिवायही आंदोलनांत सहभागी झाले. 1913मध्ये गांधींनी स्त्रियांना सहभागी होण्यास सांगितले आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला... मात्र तो निर्धारित संख्येपेक्षा कमी होता. 

ई.एस. रेड्डी यांच्याकडे गांधींच्या आयुष्यातील आणि त्यांच्या उपक्रमांतील सूक्ष्म तपशिलांविषयी आश्चर्यकारकरीत्या विस्तृत माहिती होती. ही माहिती ते मुक्तहस्ते देत होते आणि ती मिळवण्याची इच्छा जगभरचे अनेक अभ्यासक बाळगत होते. तथ्ये, हकिगती यांवर प्रभुत्व असण्याबरोबरच त्यांना गांधींच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि चारित्र्याबद्दल सखोल, निश्चित, गाढ आकलनही होते. जून 2011मध्ये आमच्या दरम्यान झालेल्या आदानप्रदानात हे स्पष्ट झाले. आजच्या काळातील काही प्रसिद्धीवेड्या साधूंपेक्षा गांधी सर्वस्वी वेगळे होते अशा अर्थी त्यापूर्वी मी एका वर्तमानपत्रातील स्तंभात लिहिले होते. बाबा रामदेव यांच्यावर मी मुख्य भर दिला होता... जे त्याच दरम्यान भ्रष्टाचाराविरोधात नवी दिल्लीत उपोषणाला बसले होते... मात्र उपोषणस्थळी पोलीस आल्यानंतर त्यांनी तिथून पलायन केले.

मी माझ्या स्तंभात गांधींविषयी असे म्हटले होते की, ते असे राजकारणी आणि समाजसुधारक होते ज्यांच्याकरता नैतिक आणि आध्यात्मिक जीवन समान महत्त्वाचे होते. त्याचबरोबर मी हेदेखील नोंदवले होते की, राजकीय कृतिशीलतेप्रमाणे त्यांचा नैतिक शोध जाहीररीत्या घडत नव्हता, तो त्यांच्या स्वतःच्या आश्रमांमध्ये एकांतात चालत होता. गांधींचा एकांतवास आणि त्यांचे अध्यात्म एकत्रच घडत होते... त्यामुळे त्यांच्या दोन उपक्रमांच्या दरम्यान ते साबरमती किंवा सेवाग्राम येथील त्यांच्या आश्रमात महिनोन्‌महिने विचार करण्यात, शोधण्यात, सूत कातण्यात व्यतीत करत आणि दुसऱ्या बाजूला मी असेही लिहिले होते की, ‘आपले आजचे गुरू असे एका दिवसासाठीही करू शकणार नाहीत. जेव्हा पोलिसांनी रामदेव यांना दिल्लीबाहेर जाण्याची सक्ती केली तेव्हा रामदेव असे म्हणाले की, ते हरिद्वार येथील त्यांच्या आश्रमात त्यांचा (तथाकथित) ‘सत्याग्रह’ सुरू ठेवतील... मात्र त्यानंतर केवळ 20 तासांतच प्रसारमाध्यमांतील आपल्या भाऊबंदांपासून नजीकच्या ठिकाणाच्या शोधात त्यांनी हरिद्वार सोडले. दिल्लीबाहेर नॉयडा इथे अनेक टेलिव्हिजन वाहिन्यांची मुख्य कार्यालये आहेत हे रामदेव यांना ठाऊक होते आणि त्यांना स्वतःलाच तिथे जावे लागणार होते... कारण त्यांना हे ठाऊक होते की, या वाहिन्या स्वतःला राष्ट्रीय पातळीवरच्या म्हणवत असल्या तरीही त्या त्यांचे बातमीदार किंवा निवेदक उत्तराखंडसारख्या दुर्लक्षित राज्यात पाठवणार नाहीत.’

श्री.रेड्डी यांनी तो स्तंभ प्रसिद्ध झाल्यानंतर वाचला आणि मला त्याच्यावर एक लांबलचक मजकूर लिहून पाठवला. रामदेव यांच्यासारख्या व्यक्ती आध्यात्मिकतेच्या इतिहासापेक्षा प्रसिद्धीच्या इतिहासाशी संबंधित असतात या माझ्या विधानाला त्यांचा विरोध नव्हता... मात्र त्यांनी असे म्हटले होते की, "गांधींविषयी तुम्ही जे सूचित केले आहे त्याविषयी मला अडचण आहे. रामदेव आणि तत्सम व्यक्तींप्रमाणे गांधी केवळ छायाचित्रकारांसाठी कृत्रिमपणे एखादी गोष्ट नव्हते किंवा सवंग पत्रकारांना पोसत नव्हते. पण गांधींना लोकांशी संवाद साधण्याची ओढ होती. त्यांच्या दौऱ्यांच्या दरम्यान ते ‘हरिजन’ या त्यांच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून लोकांशी बोलत. स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित राजकीय विषयांवर त्यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांना मुलाखतीही दिल्या. त्यांना स्वतःकरता प्रसिद्धीचा ध्यास नव्हता. कारण ते कोणत्याही सन्मानाच्या, कार्यालयाच्या, सत्तेच्या किंवा पैशाच्या मागे नव्हते... मात्र ती प्रसिद्धी त्यांच्या ध्येयासाठी आवश्यक होती. परिणामतः त्यांना आणि त्यांच्या कार्यालाही प्रसिद्धी मिळाली."

श्री.रेड्डी यांच्या मेलमध्ये पुढे लिहिले होते - ‘गांधींनी त्यांची साधना खासगीत केली... मात्र त्यांचा धर्म खासगी नव्हता. त्यांची प्रार्थनांची सत्रे जाहीररीत्या होत असत. (त्यात सर्व धर्म हे परमेश्वराप्रत जाणारे निरनिराळे मार्ग आहेत असे प्रतिपादन असे.) अन्याय निवारणार्थ राजकारणात सक्रिय असणे त्यांच्या आध्यात्मिकतेत अनुस्यूत होते. अरविंदांप्रमाणे त्यांनी स्वतःला केवळ आश्रमाशी बांधून घेतले नव्हते... मात्र त्यांच्या आध्यात्मिकतेपोटी लोकांनी त्यांच्या मागे यावे अशी इच्छा त्यांनी बाळगली नाही. भगव्या वस्त्रांऐवजी एखाद्या गरीब शेतकऱ्याचा वेश त्यांनी परिधान केला. स्वतःच्या असफलतेची जाणीव झाल्यामुळे त्यांनी ‘महात्मा’ हे संबोधनही नाकारले. धर्माचा वापर न करता त्यांनी लोकांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला... कारण ते अंध भक्तांच्या शोधात नव्हते.’

गांधींचे त्यांच्या मुलांशी असणारे गुंतागुंतीचे नातेसंबंध या विषयाची चिकित्सा करण्याचा महत्त्वाचा सल्ला मला श्री.रेड्डी यांनी दिला. रेड्डींनी नोंदवल्यानुसार ‘हरीलाल यांच्याशी असणारा गांधींचा व्यवहार निश्चितपणे भावनाशून्य आणि असंवेदनशील होता. ते नेहमी पुरुषसत्ताक दृष्टीकोनाने, त्यांच्या मुलांना येऊन त्यांची सेवा करण्यास सांगत.’ दक्षिण अफ्रिकेत गांधींवर जी टीका झाली तिच्याकडेही अधिक लक्ष पुरवण्याची विनंती श्री.रेड्डी यांनी मला केली.

आपल्या परिचयाची माणसे कुणी ‘गुगल’वर जात नाही आणि आपल्या मित्रांच्या माहितीसाठी कुणी विकिपिडियावर विसंबून राहू शकत नाही... मात्र माझ्या आणि एनुगा रेड्डी यांच्या पहिल्या भेटीला जवळपास दोन दशके उलटल्यानंतर मी काही कारणाने स्वतःला त्यांच्या विकिपिडिया पेजवर पाहिले. तिथे मला हे कळले की, त्यांचा जन्म 1 जुलै 1924 रोजी झाला. ही खरोखरच त्यांची जन्मतारीख आहे का हे विचारण्यासाठी मी श्री.रेड्डी यांना मेल लिहिलं... आणि त्यात पुढे असेही म्हटले की, हे खरे असल्यास ती अतिशय लोभस आणि औत्सुक्याची बाब आहे... कारण माझे स्वतःचे वडील त्याच दिवशी, त्याच महिन्यात आणि त्याच वर्षी जन्मले होते. याला होकारात्मक किंवा नकारात्मक असा कोणताच प्रतिसाद त्यांनी दिला नाही. हरकत नाही. एक गांधी अभ्यासक म्हणून घडलेल्या माझ्या प्रवासात ते मला पितृस्थानीच राहतील.

...आणि इतरही अनेक गांधी अभ्यासकांच्या प्रवासात ते त्याच स्थानी असतील. निको स्लेट, दिन्यार पटेल आणि इयान देसाई हे अमेरिकन इतिहासकार; उमा मेस्त्री, गुलाम वहीद आणि कल्पना हिरालाल हे दक्षिण अफ्रिकन इतिहासकार; अनिल नौरिया, वेणू माधव गोविंदु, गोपालकृष्ण गांधी, त्रिदीप सुहृद हे भारतीय इतिहासकार यांचा (इतर अनेकांसह) त्याच्यामध्ये समावेश आहे. या सर्व व्यक्तींनी गांधींविषयीच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. आणि त्यांना श्री.रेड्डी यांनी साहाय्य केले आहे, मार्गदर्शन केले आहे, सल्ले पुरवले आहेत... तसेच क्वचित प्रसंगी कानउघाडणीही केली आहे.  

कार्यकर्ते हे बऱ्याचदा स्वतःच्या कल्पनाच सर्वश्रेष्ठ मानणारे आणि पुरेशा माहितीअभावी एखाद्या गोष्टीविषयी मत तयार करणारे असतात; तर अभ्यासक बऱ्याचदा स्वार्थी आणि संकुचित वृत्तीचे असतात. रेड्डींसारखा कार्यकर्ता आणि अभ्यासक याला अपवाद होता. धैर्य आणि शहाणपणा या गुणांसोबत त्यांच्या ठायी करुणा आणि ऋजुताही होती. 

ई.एस. रेड्डी हे मला माहीत असलेल्या सर्वश्रेष्ठ मानवांपैकी होते. दक्षिण अफ्रिकेतील, भारतातील आणि जगभरातील ज्या अगणित विद्वानांना त्यांनी प्रोत्साहित केले आणि प्रेरणा दिली. त्या विद्वानांच्या कामातून श्री. रेड्डी यांचे उदाहरण आणि त्यांचा वारसा सदैव जिवंत राहतील. 

(अनुवाद: सुहास पाटील)

- रामचंद्र गुहा

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)


कर्तव्य साधनावर प्रसिद्ध झालेले रामचंद्र गुहा यांचे सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

Tags: अनुवाद रामचंद्र गुहा सुहास पाटील ई. एस. रेड्डी महात्मा गांधी इतिहासकार Ramchandra Guha Suhas Patil E S Reddy Mahatma Gandhi Historian Load More Tags

Comments:

रमेश दोंदे

अतिशय माहितीपूर्ण.

विष्णू दाते (कांदिवली)

उत्कृष्ट लेख!

अरुण कोळेकर , शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी.

नवीन माहिती आणि संदर्भ पुरविणारा लेख. दशांगुळे उरणारा महात्मा.

Chhaya dhaghe

Very nice and deep information. I like it...

Add Comment