इयान जॅक यांना आदरांजली

'भारतमित्र' म्हणून परिचित असणारे ब्रिटीश लेखक, संपादक इयान जॅक यांचे 28 ऑक्टोबरला निधन झाले..

कल्पितकथा लिहिणाऱ्यांच्या बाबतीत लागू होणारी बाबच पत्रकारांनाही लागू होते. भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही वृत्तपत्रांमधील बहुतांश स्तंभकार (केवळ पुरुष नव्हे) वयानुसार बढाईखोर व सरधोपट लेखन करू लागतात. इयान जॅक याला अपवाद ठरले. ते सत्तरीत आल्यावरही तिशीत असल्यासारखे ताजं व चित्रमय लिहायचे. त्यांना क्लाइड नदीवरचं पुस्तक पूर्ण करता आलं नाही, पण त्यांचं एकंदर लेखनकार्य इतकं संपन्न व व्यापक आहे की, एखादा तरुण उत्साही संपादक इयान जॅक यांच्या लेखनाचे अनेक खंड सहजपणे प्रकाशित करू शकेल.

मला आयुष्यात आत्तापर्यंत अनेक लक्षणीय माणसं भेटली आहेत. अभ्यासक, लेखक, कलावंत, क्रीडापटू, वैज्ञानिक, उद्योजक, राजकारणी व कार्यकर्ते म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. यातील जवळपास निरपवादपणे सर्वांमध्येच स्वाभिमान मोठ्या प्रमाणात होता. ‘अपने को बहुत समझते हैं’ या हिंदीतल्या उक्तीप्रमाणे यातील काही जण तर उघडपणे स्वतःच्या उपलब्धींची बढाई मारणारेही होते; तर काही जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे नम्रतेच्या मुखवट्याआडून आत्मस्तुती साधणारे होते. वाट कोणतीही असो, पण त्यांना आपण भेटलो की काही मिनिटांतच ते स्वतःचं महत्त्व स्पष्टपणे जाणवून देत आले आहेत.

मी शेकडो यशस्वी अथवा प्रसिद्ध माणसांना भेटलो, त्यातील दोन जण मात्र वरील नियमाला स्पष्ट अपवाद आहेत. एक आहेत- क्रिकेटपटू गुंडाप्पा विश्वनाथ. दुसरे आहेत- लेखक इयान जॅक. इयान यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं. विश्वनाथ यांच्याप्रमाणे इयान यांच्यामध्येसुद्धा असाधारण वैयक्तिक सभ्यतेसह प्रचंड व्यावसायिक श्रेष्ठत्वाचा मिलाफ झाला होता. इयान त्यांच्या पिढीतील सर्वांत थोर स्तंभकार व साहित्यविषयक संपादक होतेच, शिवाय अत्यंत चांगुलपणा व दयाभाव राखणारे माणूससुद्धा होते. त्यांचं लेखन वाचणं हा प्रचंड सुखकारक अनुभव असायचा; त्यांच्याशी ओळख असणं हा आनंदाचा आणि स्वतःचा सन्मान वाटावा असा भाग होता.

त्यांचं कुटुंब स्कॉटिश होतं, पण त्यांचा पिंड मात्र ब्रिटिश होता. इयान जॅक यांनी दीर्घ काळ भारतात रस वाटत आला होता. ते 1970 च्या दशकात बातमीदार म्हणून पहिल्यांदा भारतात आले, त्या वेळी ते ‘संडे टाइम्स’साठी काम करत होते; त्यानंतर अनेकदा त्यांच्या भारतात फेऱ्या होत राहिल्या. स्त्रीवादी प्रकाशिका उर्वशी बुटालिया व माहितीपट दिग्दर्शिका नसरीन मुन्नी कबीर या त्यांच्या दोन घनिष्ठ भारतीय मैत्रिणी होत्या. इयान यांना बंगाल व बंगाली लोकही खूप आवडायचे. त्यांना भारतीय ट्रेनमधून प्रवास करायला आणि लहान भारतीय शहरांना भेट द्यायला आवडत असलं, तरी ‘कलकत्ता हे बहुधा आणि चमत्कारिकपणे, राहण्याच्या दृष्टीने सर्वांत रोचक भारतीय शहर आहे (फक्त थोडी रोख रक्कम सोबत हवी)’ असं त्यांचं आग्रही मत होतं (माझ्याशी झालेल्या त्यांच्या एका लिखित संवादातील हा उल्लेख आहे).

मुन्नी कबीर यांनी 1990च्या दशकाअखेरीला माझी इयान जॅक व त्यांच्या पत्नी लिंडी शार्प यांच्याशी ओळख करून दिली. आम्ही त्यानंतर लंडन व बंगळुरू इथे आणि इतरही ठिकाणी भेटलो. आमच्यात बऱ्यापैकी नियमितपणे पत्रव्यवहारसुद्धा होता. ऑक्टोबर 2014 मध्ये गांधींच्या चरित्रासाठी संशोधन करत असताना मी त्यांना लेखी संवादात विचारलं, ‘1921 मध्ये पहिल्यांदा असहकाराचं मोठं आंदोलन झालं तेव्हा तत्कालीन ब्रिटिश वृत्तपत्रांमध्ये गांधींविषयी साशंकतावादी किंवा अपमानास्पद प्रतिक्रियांचा लोट उसळला, पण ‘ग्लास्गो हेराल्ड’मध्ये एक अतिशय विचारी व समतोल मूल्यमापन करणारा लेख आला होता. तर, ते वृत्तपत्र कोणत्या प्रकारचं होतं? उदारमतवादी की डाव्या विचारांचं?’

या माझ्या संक्षिप्त चौकशीला त्यांनी दीर्घ व चिंतनशील प्रतिसाद दिला. शब्दमर्यादेमुळे तो इथे पूर्णपणे नोंदवता येत नाही, याचं वाईट वाटतं. इयान मला म्हणाले की, ते स्वतः 1965 साली ‘हेराल्ड’मध्ये रुजू झाले, तेव्हा ते ‘एक रूढिवादी विचारांचं व कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या जवळचं उद्योगस्नेही वृत्तपत्र’ म्हणून ओळखलं जात होतं, लंडनमधील वेगाने लोप पावणाऱ्या औद्योगिक भूतकाळाचा अभिमान तिथे बाळगला जात होता. त्या वेळी या वृत्तपत्रात एक नव्हे तर दोन बातमीदार जहाजउभारणीच्या घडामोडींचं वार्तांकन करत असत.’ त्या वेळी ‘हेराल्डला कामगार संघटना आवडत नसत.. त्यांच्या दोन संपादकीय लेखकांपैकी एक जण कन्झर्वेटिव्ह पक्षाचा संसदेतील उमेदवार होता. त्या वेळी जॉर्ज मॅकडोनाल्ड फ्रेझर सहायक संपादक होते- नंतर लगेचच त्यांना ‘फ्लॅशमॅन’ कादंबरीमालेचे लेखक म्हणून प्रसिद्धी व संपत्ती मिळाली. या कादंबरीमालेमध्ये ब्रिटिश साम्राज्याचा विनोदी (पण अनुदार नसलेला) लेखाजोखा होता.’

पण, ‘1921मध्ये चित्र काहीसं वेगळं असावं. त्या वेळी सर रॉबर्ट ब्रूस संपादक होते. (लिबरल पक्षाचे पंतप्रधान डेव्हिड) लॉइड जॉर्ज यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे त्यांना ‘नाइटहूड’चा किताब प्राप्त झाला होता’, असं इयान यांनी लिहिलं होतं. त्यानंतर या वृत्तपत्राच्या अधिकृत इतिहासाचा दाखला देत इयान यांनी ब्रूस देशांतर्गत घडामोडींचे जाणकार असल्याचं नोंदवलं. ‘परदेशात काय घडत आहे यावर नजर ठेवणं व त्या घडामोडींचं मूल्यमापन करणं’ ही जबाबदारी ब्रूस यांनी वृत्तपत्रातील इतर पत्रकारांवर दिली होती. त्यामुळे ‘अशांपैकी कोणीतरी गांधींविषयी लिहिलं असणार- त्यांना बऱ्याच प्रमाणात स्वातंत्र्यही दिलं गेलं असेल. पण वृत्तपत्राचा एकंदर झोक सहानुभूतीला नसणार,’ असं इयान यांनी लिहिलं होतं.

या खासगी पत्रामध्ये इयान जॅक यांच्या सार्वजनिक लेखनातील सर्व वैशिष्ट्यं दिसत होती- स्थळकाळाचं सखोल भान, सामाजिक व राजकीय इतिहासाचा मिलाफ साधण्याची क्षमता, तंत्रज्ञानाबद्दलचा मोह, मानवी स्वभावाच्या लकबींविषयी त्यांना वाटणारा रस, ब्रिटनच्या जगाशी असणाऱ्या गुंतागुंतीच्या संबंधांबद्दलचं त्यांचं तीक्ष्ण आकलन, ही त्यांची वैशिष्ट्यं होती.


हेही वाचा : विवेकानंद आणि टागोर या दोघांशी मैत्र साधणारा स्कॉटिश - रामचंद्र गुहा 


‘द गार्डियन’मध्ये जॉन लॉइड या त्यांच्या एका घनिष्ठ समकालीनाने लिहिल्यानुसार, ‘इयान जॅक यांनी पत्रकार म्हणून समकालीन वादसंवादाच्या अवकाशाला आकार दिला. यात ते कायम औदार्याने वागले, “पण असं असेल तर...?” हा प्रश्न ते कायम तयार ठेवत असत, त्यातून अधिक खोलवरच्या दृष्टींचा शोध घेत असत. इतर कोणताही ब्रिटिश पत्रकार त्या पातळीवर कार्यरत नव्हता आणि इयान मृत्यूवेळीसुद्धा सक्रिय होते.’

यांच्या लेखावर आलेल्या अनेक वाचकप्रतिक्रियांमध्ये नोंदवलं होतं की, हे वाचक ‘गार्डियन’च्या शनिवारच्या अंकात कायम पहिल्यांदा इयान जॅक यांचा लेख वाचायला घेत असत. ‘ते अनेक अर्थांनी गार्डियनचे सर्वोत्तम लेखक होते. पण एका अर्थी गार्डियनने त्यांना लपवून ठेवलं. ऑनलाइन आवृत्तीत त्यांचं लेखन ठळकपणे येत नव्हतं.’ दुसऱ्या एका वाचकाने इयान यांचं वर्णन ‘सन्मान्य, चारित्र्यवान व प्रचंड कसब असणारा’ असं केलं होतं. त्यांचं लेखन ऑक्सब्रिज (ऑक्सफर्ड-केम्ब्रिज) वारशाचा उघडपणे दाखवणारं असायचं. त्यात सुस्पष्ट निरीक्षणं असायची, पण अनकेदा ती स्वतःच्या अनुभवातून आलेली व त्यांचा उल्लेख करणारी असायची,’ ही आणखी एका वाचकाची टिप्पणीसुद्धा माझे मित्र इयान यांना सुखावणारी ठरली असती.

इयान जॅक हे उत्कृष्ट शैली लाभलेले गद्य लेखक होते, पण स्वतःच्या लेखनाविषयी त्यांना चमत्कारिक न्यूनगंड होता. ‘द गार्डियन’मध्ये हजारभर शब्दांचा लेख लिहिण्यात त्यांना अडचण नव्हती आणि ‘ग्रॅन्टा’ किंवा ‘लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स’ या नियतकालिकांमध्ये ते (दहा हजार किंवा अधिक शब्दांचा) दीर्घ लेखसुद्धा सहजपणे लिहीत असत. या लेखनकामातून तीन संकलित पुस्तकं प्रकाशित झाली. यातल्या एका पुस्तकाचं ‘अ कंट्री फॉर्मरली नेम्ड ग्रेट ब्रिटन’ हे उत्कृष्ट नाव भविष्यवेधी ठरलं. दुसऱ्या एका पुस्तकात त्यांचे भारतावरील सर्वोत्तम लेख एकत्र केले होते, त्याचं शीर्षक होतं ‘मोफस्सिल जंक्शन.’ पण अनेक वर्षं त्यांनी एखादा विषय घेऊन त्यावर पूर्ण पुस्तक लिहायचं टाळलं. प्रकाशक त्यांना रेल्वेविषयी एक पुस्तक लिहिण्यासाठी विनवत होते (रेल्वे हेइयान यांचं सुरुवातीचं आणि कायम टिकून राहिलेलं प्रेम होतं); मित्रमंडळींनी त्यांना स्कॉटलंडमधील जडणघडणीच्या वर्षांच्या आठवणी लिहायला सांगितलं. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी क्लाइव्ह नदीचा व तिच्या भवतालाचा सामाजिक इतिहास लिहिण्यासाठीचं काम सुरू केलं. या संदर्भातील मसुद्याची दोन प्रकरणं वाचायला मान मिळाला होता. या उत्कृष्ट लेखनात वैयक्तिक स्मृतीचा प्रवाहीपणे ऐतिहासिक व तंत्रज्ञानीय तपशिलाशी संयोग साधला होता. (यातील एक प्रकरण जेम्स वॅट यांचं विलक्षण व्यक्तिचित्र रेखाटणारं होतं).

या आदरांजलीच्या शेवटच्या भागात मला वार्ताहर इयान जॅक यांच्या लेखनाचे काही नमुने द्यावेसे वाटतात. त्यांची पत्रं त्यांच्या स्तंभांइतकीच माहितीपूर्ण व मार्मिक, पण थोडी अधिक मोकळिकीने लिहिलेली असायची (बहुधा ते आनंदाने हे करत असावेत). त्यांच्यासारखेच स्कॉटिश मूळ असणारे गॉर्डन ब्राउन ब्रिटनचे पंतप्रधान झाले तेव्हा मी इयान यांच्याकडे त्यांच्याबद्दल चौकशी केली. तर, इयान म्हणाले, ‘ते कायम प्रचंड माहिती ग्रहण करत असतात- ते त्यांचं ठळक वैशिष्ट्य आहे. पंतप्रधान म्हणून हे गुण चांगले आहेत की नाही, हा वेगळा प्रश्न; पण किमान भयंकर सारकोझीपेक्षा गॉर्डन बरे.’

काही वर्षांनी, ‘माओवाद्यांची भुरळ पडलेल्या व गांधींविषयी अतिटीकात्मक भूमिका घेतलेल्या’ एका तरुण भारतीय व्यक्तीला आणि ‘भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची आणि हिंदुत्वासह समर्थ राष्ट्राच्या संकल्पनेची भुरळ पडलेल्या, आणि अर्थातच गांधींविषयी तितकीच टीकात्मक भूमिका घेणाऱ्या’ दुसऱ्या एका व्यक्तीला मी भेटणार होतो, तेव्हा मी इयान यांना एक पत्र लिहिलं होतं. ‘अतिरेकवाद व हिंसाचार तरुण पुरुषाला इतका का आकर्षित करतो?’ असा प्रश्न मी त्यांना विचारला.

इयान यांनी पत्रोत्तरात लिहिलं: ‘प्रश्न चांगला आहे. या आकर्षणाचं कारण टेस्टोस्टेरोन असेल का? की कल्पकतेचा अभाव? किंवा शिकार व अन्नसंकलनाचा अनेक सहस्रकांचा काळ कारणीभूत असेल का? सैन्य व युद्ध यांचे आधीचे मार्ग बहुतांशाने थोपवण्यात आल्याचा आपण आनंद मानायला हवा बहुधा. मग त्यातून नागरी जीवनातील हिंसक वर्तन वाढलं असेल तरीसुद्धा ठीक. ही परिस्थिती अर्थातच आणखी खालवली आहे. कामाच्या ठिकाणी स्त्रियांची भूमिका अधिक विस्तारली आहे आणि खुद्द काम (किमान बहुतांश क्षेत्रांमध्ये तरी) आधीपेक्षा कमी शारीरिक स्वरूपाचं उरलं आहे.’

नोबेल पुरस्कार मिळालेल्या अनेक लेखकांचं काम नंतर घसरणीला लागल्याचं प्रतिपादन करणारा माझा एक स्तंभलेख मी 2008 साली इयान यांना पाठवला. ‘पण टागोरांनी 1913 नंतर काही चांगलं लिहिलं का? असे प्रश्न विचारणारी भरमसाठ पत्रं तुम्हाला कोलकात्यावरून येतील,’ असं उत्तर त्यांनी दिलं. त्यानंतर स्वतःचं मतही नोंदवलं: ‘लेखकांनी विशिष्ट टप्प्यावर लेखन थांबवणं इष्ट असतं. ही उक्ती खरं ठरवणारा दाखला व्ही. एस. नायपॉल यांचा आहे. (आत्तापर्यंत) फिलीप रॉथ याला अपवाद ठरलेत आणि कदाचित सॉल बेलोही अपवाद असतील. पण लेखकांना, विशेषतः कादंबरीकारांना सांगण्यासारखं काही उरलेलं नाही अशा स्थितीला सामोरं जावं लागतं. पैशासाठी व स्वाभिमानासाठी लेखन करतच राहावं लागणं, हा या क्षेत्राचा एक भयंकर भाग आहे. कदाचित वयामुळे ‘नोबेलोत्तर’ विकृती निर्माण होत असेल. नोबेल पुरस्कार मिळतो तेव्हा सर्वसाधारणतः लेखक प्रगतिपथावर असतात. ओरहान पामुक यांना नोबेल मिळालं तेव्हा ते तरुण होते, त्यामुळे त्यांचा दाखला कसा ठरतोय ते पाहावं लागेल.’

कल्पितकथा लिहिणाऱ्यांच्या बाबतीत लागू होणारी बाबच पत्रकारांनाही लागू होते. भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही वृत्तपत्रांमधील बहुतांश स्तंभकार (केवळ पुरुष नव्हे) वयानुसार बढाईखोर व सरधोपट लेखन करू लागतात. इयान जॅक याला अपवाद ठरले. ते सत्तरीत आल्यावरही तिशीत असल्यासारखे ताजं व चित्रमय लिहायचे. त्यांना क्लाइड नदीवरचं पुस्तक पूर्ण करता आलं नाही, पण त्यांचं एकंदर लेखनकार्य इतकं संपन्न व व्यापक आहे की, एखादा तरुण उत्साही संपादक इयान जॅक यांच्या लेखनाचे अनेक खंड सहजपणे प्रकाशित करू शकेल. आणि कदाचित त्यांच्या निवडक पत्रव्यवहाराचंही पुस्तक प्रकाशित करता येईल.

(अनुवाद - प्रभाकर पानवलकर)

- रामचंद्र गुहा
ramachandraguha@yahoo.in

Tags: Ramchandra Guha Marathi Articles इतिहासकार इतिहास साहित्य भारतमित्र ब्रिटीश स्तंभलेखक रामचंद्र गुहा मराठी Load More Tags

Add Comment