वेरिअर एल्विन आणि ईशान्य भारत याबद्दलचं सत्य

वेरिअर एल्विन यांची मरणोत्तर निंदानालस्ती होत असताना त्यांचा एक चरित्रकार म्हणून मी शांत राहू शकत नाही.

तथ्यं स्पष्ट करणं आवश्यक आहेच, पण संदर्भ स्पष्ट करणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘व्हॉट्स-अ‍ॅप विद्यापीठा’तून लिहिलेला लेख आणि व्यापक अर्थाने हिंदू उजव्या विचारसरणीच्या गटांकडून होणारे असे निराधार दोषारोप हे मुळात तुच्छतावादातून, किंबहुना द्वेषातून केले जातात. यामध्ये ईशान्य भारताविषयीची चर्चा वर्तमानाऐवजी भूतकाळाकडे वळवण्याचा प्रयत्न असतो. मणिपूर गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ जळतं आहे. या जमातीय संघर्षावर काही उपाय नजरेच्या टप्प्यात आलेला नाही; दरम्यान, याचे चिंताजनक परिणाम मिझोरम, नागालँड व मेघालय या राज्यांमध्ये दिसू लागले आहेत.

मणिपूरमध्ये दोन जमातींमधील हिंसाचार उफाळून आल्यानंतर लगेचच, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समाजमाध्यमांवरील एका दाव्यासंदर्भात मला अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. ‘नेहरूंनी ख्रिस्ती मिशनरी वेरिअर एल्विनसोबतच्या एका करारावर सह्या केल्या होत्या. या करारानुसार, हिंदू साधूंना नागालँडमध्ये प्रवेशास बंदी घालण्यात आली. परिणामी, नेहरूंच्या राजवटीत नागालँड हे ख्रिस्तीबहुल राज्य झालं. आज नागालँडमध्ये 88 टक्के ख्रिस्ती लोक आहेत’ असा हा दावा होता. (लिंक)

मी 1999 मध्ये वेरिअर एल्विन यांचं चरित्र लिहिलं होतं, त्यामुळे मला या विषयावर विचारणा होत राहिली. स्वातंत्र्यानंतर नागा सशस्त्र बंडखोरीमुळे भारताच्या मध्यभूमीवरील लोकांना नागालँडमध्ये प्रवेश करण्यापासून परावृत्त केलं जात असे, पण नागालँडसंदर्भात किंवा कशाहीसंदर्भात नेहरू व एल्विन यांच्यात काही करार झालेला नव्हता, असं उत्तर मी यावर दिलं. नेहरू व एल्विन यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून, म्हणजे 1870च्या दशकापासून नागा प्रदेशातील डोंगराळ भागांमध्ये ख्रिस्ती मिशनरी सक्रिय होते. किंबहुना एल्विन यांना ख्रिस्ती मिशनऱ्यांबाबत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतही अविश्वास वाटत होता, ही वस्तुस्थिती आहे. आदिवासींनी स्वतःची धर्मश्रद्धा व रूढी टिकवाव्यात, आणि हिंदू अथवा ख्रिस्ती होऊ नये, अशी एल्विन यांची इच्छा होती.

‘व्हॉट्स-अ‍ॅप’द्वारे पसरवल्या जाणाऱ्या खोटेपणाचा प्रतिवाद करण्यासाठी मी सर्वसाधारणतः या स्तंभाचा वापर करत नाही- कारण तसं करायचं झालं तर मला दुसरं फार काही करता येणार नाही. इथे मात्र मी याला अपवाद केला आहे- त्याची तीन कारणं आहेत. एक, नेहरूंवर कथितरित्या लादलेल्या कपोलकल्पित ‘करारा’व्यतिरिक्तही वेरिअर एल्विन यांच्याविषयी ऑनलाइन जगात अनेक प्रकारची खोटी माहिती पसरलेली आहे. ईशान्य भारतात ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला एल्विन यांनी चालना दिली, आणि त्यामुळे मणिपूरमधील बहुतांशाने हिंदू मैतेई समुदाय व बहुतांशाने ख्रिस्ती कुकी समुदाय यांच्यातील सध्याच्या संघर्षाला काही अंशी एल्विन जबाबदार आहेत, असाही दावा केला जातो.

दुसरं कारण- एल्विन यांचं मरणोत्तर खलचित्रण करणारी ही प्रवृत्ती केवळ हिंदू उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. आसामचे मुख्यमंत्री आणि ईशान्येतील सर्व राज्यांसंदर्भात भाजपची मुख्य धुरा सांभाळणारे हिमान्त बिस्वा शर्मा यांनीसुद्धा ही प्रवृत्ती आत्मसात केली आहे. तिसरं कारण- भाजप कट्टर हिंदुत्वाशिवाय इतर सर्व धर्मश्रद्धांविषयी वैरभाव राखत असला, तरी वेरिअर एल्विन मात्र अतिशय खुल्या मनाचे होते, आदिवासी संस्कृतीविषयी सखोल सहानुभूती वाटत असल्यामुळे त्यांनी स्वतःचा ख्रिस्ती धर्मही बाजूला ठेवला होता.

शर्मा यांनी एल्विन यांच्यावर अलीकडे केलेल्या आरोपांविषयी मी बोलणारच आहे. पण त्याआधी, मी लिहिलेलं चरित्र न वाचलेल्या लोकांसाठी वेरिअर एल्विन यांची थोडक्यात ओळख करून देणं गरजेचं वाटतं. (‘सॅव्हेजिंग द सिव्हिलाइज्ड: वेरिअर एल्विन, हिज ट्रायबल्स अँड इंडिया’ या मी लिहिलेल्या चरित्राची दुसरी सुधारित आवृत्ती 2011मध्ये आली). वेरिअर एल्विन यांचा जन्म 1902 मध्ये झाला, त्यांचं शिक्षण ‘ऑक्सफर्ड’मध्ये झालं आणि 1927 मध्ये ते भारतात ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी आले. पण महात्मा गांधी व त्यांच्या वर्तुळाच्या प्रभावाखाली येऊन एल्विन यांनी चर्चला सोडचिठ्ठी दिली आणि ते मध्य भारतातील आदिवासींसोबत काम करायला लागले. आदिवासी जीवन, लोककथा व कला या संदर्भात त्यांनी  1930-40च्या दशकांमध्ये संस्कृतिवर्णनपर लेखन केलं- हे अशा स्वरूपाचं आद्य कार्य होतं.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एल्विन भारतीय नागरिक झाले. 1954 मध्ये त्यांची ‘नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर प्रोव्हिन्स’चे, अर्थात ‘नेफा’चे (आजचा अरुणाचल प्रदेश) मानवशास्त्रीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. हा प्रदेश भारत व चीन यांच्या सीमेवर होता- त्याचा नकाशा तयार केलेला नव्हता आणि तिथे प्रशासनही नव्हतं. ब्रिटिश राजवटीची तिथे जवळपास काहीच उपस्थिती नव्हती. भारतीय प्रशासनाला एल्विन यांच्या मानवशास्त्रीय कौशल्याची मदत घेऊन या प्रदेशातील अनेकविध आदिवासी समुदायांमध्ये बंध निर्माण करता येतील, अशी आशा होती.

बऱ्याच प्रमाणात हे काम यशस्वीरित्या पार पडलं. ईशान्य भारतातील राज्यांपैकी अरुणाचल प्रदेश या एकाच राज्यात मोठी सशस्त्र बंडखोरी अस्तित्वात आलेली नाही. एल्विन व त्यांच्या सहकाऱ्यांनी आदिवासींचे जमिनीवरचे व वनांवरचे अधिकार टिकवण्यासाठी अथक काम केलं, भिन्न जमातींमधील जोडभाषा म्हणून हिंदीला चालना दिली, आणि हिंदू व ख्रिस्ती अशा दोन्ही धर्मप्रसारकांना या प्रदेशाबाहेर ठेवलं- हे यामागचं एक कारण आहे.

जवाहरलाल नेहरूंचं निधन होण्याच्या काही महिने आधी, फेब्रुवारी 1964मध्ये वेरिअर एल्विन यांचं निधन झालं. यानंतर सुमारे सहा दशकांनी- 11 ऑगस्ट 2023 रोजी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीतील एका वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला, त्यात त्यांनी असा दावा केला की, ‘पंडित नेहरूंनी ईशान्येसाठीचा पहिला सल्लागार म्हणून एका युरोपात जन्मलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली. आसाममध्ये तेल सापडलं असूनही तिथे तेलशुद्धीकरण प्रकल्प राबवू नये, असा सल्ला या व्यक्तीने नेहरूंना दिला का? अशा सल्लागारामुळेच त्यांनी गोपीनाथ बोर्डोलोई यांना भारतरत्न नाकारलं का?’

सदर लेखात ‘युरोपात जन्मलेल्या व्यक्ती’चं नाव दिलं नव्हतं. तीन दिवसांनी मुख्यमंत्री शर्मा यांच्या ट्विटर-पानावरून प्रसिद्ध झालेल्या मजकुरात मात्र इतकीही भीड बाळगलेली नव्हती. ‘पंडित नेहरूंनी युरोपात जन्मलेल्या वेरिअर एल्विन यांना ईशान्येतील कामकाजाबाबत सरकारला सल्ला देण्यासाठी नेमलं. काँग्रेसच्या घोडचुकांना तेव्हापासून सुरुवात झाली,’ असं त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

इथे काही तथ्यं स्पष्ट करणं आवश्यक आहे. वेरिअर एल्विन यांना केवळ नेफाचं सल्लागार नेमण्यात आलं होतं; ईशान्य भारतातील इतर कोणत्याही भागाच्या प्रशासनामध्ये त्यांची काहीही भूमिका नव्हती. नागालँड वा मणिपूर इथल्या, आणि अर्थातच आसामच्या प्रशासनात त्यांचा सहभाग नव्हता. पण एल्विन यांनी आसाममध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्प होऊ दिला नाही, गोपीनाथ बोर्डोलोई यांना भारतरत्न मिळू दिलं नाही, आणि आज भाजप काँग्रेसवर ईशान्येतील ज्या घोडचुकांचं खापर फोडतं त्याचा उगम एल्विन यांच्यापासून झाला, असं आसामचे मुख्यमंत्री निर्लज्जपणे लिहितात.


Read Also : No Confidence Motion : Opposition’s Boomerang - Vinay Hardikar


तथ्यं स्पष्ट करणं आवश्यक आहेच, पण संदर्भ स्पष्ट करणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘व्हॉट्स-अ‍ॅप विद्यापीठा’तून लिहिलेला लेख आणि व्यापक अर्थाने हिंदू उजव्या विचारसरणीच्या गटांकडून होणारे असे निराधार दोषारोप हे मुळात तुच्छतावादातून, किंबहुना द्वेषातून केले जातात. यामध्ये ईशान्य भारताविषयीची चर्चा वर्तमानाऐवजी भूतकाळाकडे वळवण्याचा प्रयत्न असतो. मणिपूर गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ जळतं आहे. या जमातीय संघर्षावर काही उपाय नजरेच्या टप्प्यात आलेला नाही; दरम्यान, याचे चिंताजनक परिणाम मिझोरम, नागालँड व मेघालय या राज्यांमध्ये दिसू लागले आहेत.

मणिपूरमधील हिंसाचार व क्लेशकारक परिस्थितीला आणि एकंदर ईशान्येतील वाढत्या नाजूक परिस्थितीला पूर्णतः ‘डबल इंजिनचं सरकार’ जबाबदार आहे. मणिपूरमध्ये आणि केंद्रातही गेली अनेक वर्षं काँग्रेस नव्हे तर भाजप सत्तेवर आहे. मणिपूरमधील रक्तरंजित संघर्ष थोपवण्यात आलेल्या अपयशाला मणिपूरचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृह मंत्री व पंतप्रधान हे तिघे मुख्यत्वे जबाबदार आहेत, पण सत्ताधारी पक्षाचे या प्रदेशातील ‘समस्यानिवारक’ धुरीण असणाऱ्या आसामच्या मुख्यमंत्र्यांकडेसुद्धा यातील दोषाचा काही वाटा जातो.

मणिपूरमधील शोकांतिकेचा काहीच ठपका स्वतःवर व त्यांच्या पक्षावर येऊ नये यासाठी आता आसामचे मुख्यमंत्री खूप पूर्वीच मरण पावलेल्या व्यक्तींविषयी आणि भूतकाळाविषयी बोलत आहेत. ही त्यांची कृती त्यांच्या वरिष्ठांची निव्वळ नक्कल करणारी आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी कायमच असे वितंडवादी दोषारोप करत असतात. त्यांच्या सरकारने नागरी स्वातंत्र्यांची दडपशाही केल्याचा पुरावा समोर मांडला, तर ते इंदिरा गांधींचा व 1975-77मधील आणीबाणीचा उल्लेख करतात. मुळात भारताच्या अधिपत्याखाली असणाऱ्या प्रदेशात चीनने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा बिनतोड पुरावा समोर मांडला, तर ते जवाहरलाल नेहरू आणि 1962 च्या युद्धाचा उल्लेख करतात.

मी काँग्रेस पक्षाचा सदस्य नाही, त्यामुळे त्या पक्षाच्या गतकालीन पंतप्रधानांच्या बचावार्थ मला काही म्हणायचं नाही. पण मी वेरिअर एल्विन यांचं चरित्र लिहिलं आहे, त्यामुळे त्यांची मरणोत्तर निंदानालस्ती होत असताना मी शांत राहू शकत नाही. एक ख्रिस्ती माणूस चर्चच्या व्यवस्थेला सोडचिठ्ठी देऊन धार्मिक अनेकत्ववाद आत्मसात करतो, परदेशात जन्मलेला असूनही या देशाला आपलं मानून इथे प्रचंड योगदान देतो, ही बाब एल्विन यांची नालस्ती करणाऱ्या धर्मवेड्या व परभयगंडाने ग्रासलेल्या लोकांना कळणं शक्य नाही, त्यामुळे त्याबद्दल कौतुक वाटण्याची तर अपेक्षाही करता येणार नाही.

वेरिअर एल्विन हे काही परिपूर्ण, निर्दोष व्यक्तिमत्व नव्हतं. ते त्यांच्या विषयाविषयी अवाजवी स्वप्नरंजन करत असत. एका गोंड स्त्रीशी झालेला त्यांचा पहिला विवाह अपयशी ठरला, त्याला बहुतांशाने तेच जबाबदार होते (त्यांनी दुसरा विवाहसुद्धा एका आदिवासी स्त्रीशीच केला आणि त्यांचं हे दुसरं वैवाहिक नातं तुलनेने अधिक यशस्वी ठरलं). पण त्यांचं काम आणि वारसा अजूनही महत्त्वाचा आहे. मध्य भारतातील आदिवासी जीवनाविषयी त्यांनी केलेलं अभ्यासू लेखन सुंदर आणि संवेदनशील आहे. आदिवासींची जमीन व वनं हिरावून न घेता किंवा त्यांना स्वतःच्या संस्कृतीविषयी शरम वाटायला न लावता त्यांचं भौतिक जीवन कसं सुधारायचं, याचं उत्तम मार्गदर्शन ‘अ फिलॉसॉफी फॉर नेफा’ या त्यांच्या पुस्तकात केलेलं आहे.

‘व्हॉट्स-अ‍ॅप’सोबतच पुस्तकं वाचायलाही वेळ असलेल्यांना मी लिहिलेलं एल्विन यांचं चरित्र वाचता येईल किंवा खुद्द एल्विन यांची पुस्तकं वाचता येतील. हिंदुत्ववादी गट खोटेपणा पसरवून एका अभ्यासकाची व लोकसेवकाची प्रतिमा मलीन करत आहे; त्या व्यक्तीची स्वतःच्या कार्याबद्दलची बांधिलकी काय तोडीची होती, हे या पुस्तकांच्या वाचनातून अधिक उलगडू शकेल. एल्विन यांचे समकालीन व सहकारी असणाऱ्या तिघा जणांनी केलेलं त्यांचं मूल्यमापन नोंदवून मी हा स्तंभ संपवतो आहे.

एल्विन हे काही ‘भावनारहित तंत्रज्ञ नव्हते; ते कवी, कलावंत व तत्त्वज्ञ होते; आणि देशातील विशाल मनुष्यबळ असणाऱ्या अनेक मोठ्या संशोधनसंस्थांपेक्षा जास्त व अधिक चांगलं काम एल्विन यांनी व्यक्तिगत प्रयत्नांमधून उभं केलं,’ असं विख्यात मानवशास्त्रज्ञ एस. सी. दुबे यांनी लिहिलं आहे. एल्विन यांच्या मृत्यूनंतर कलकत्त्यातील ‘अमृत बझार पत्रिके’मध्ये आलेल्या संपादकियामध्ये म्हटलं होतं की, भारताने ‘देशातील सर्वांत प्रख्यात मानवशास्त्रज्ञ गमावला आहे, इतकंच नव्हे तर या देशाला आपलं घर मानून, इथल्या लोकांमध्ये पूर्णपणे मिसळून गेलेला आणखी एक- आणि बहुधा शेवटचा उदारमतवादी इंग्रज मनुष्यही गमावला आहे.’ याच अंकामध्ये ‘लिट्ल थिएटर ग्रुप’ या प्रसिद्ध बंगाली नाट्यकंपनीचं एक निवेदनही प्रसिद्ध झालं होतं-

इन मेमरी ऑफ
डॉ वेरिअर एल्विन
द बेस्ट ऑफ इंडियन्स

अशा (एल्विन यांचा सर्वोत्तम भारतीय म्हणून गौरव करणाऱ्या) ओळी त्यात होत्या.

अनुवाद : प्रभाकर पानवलकर

Tags: ramchandra guha jawaharlal neharu verrier elwin Load More Tags

Add Comment