काही आवडते ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटू

भारत - ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेच्या निमित्ताने...

1987 मधील विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिअन संघासह कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर

‘ऑस्ट्रेलिअनिझम’ म्हणजे जिंकण्याचा - नियमांच्या अधीन राहूनच मात्र गरज पडल्यास नियमांची शेवटची मर्यादा गाठून - एकमात्र निर्धार. मानवी शरीराच्या कार्यक्षेत्रातच जे ‘अशक्य’ आहे ते आपण करू शकतो असा विश्वास ऑस्ट्रेलिअनांना आहे आणि ‘यांना काय अशक्य आहे?’ असे वाटून आपल्याला अचंबित करण्यातही ते कायम यशस्वी झाले आहेत. याचा अर्थ असा की, जोवर शेवटची विकेट पडत नाही किंवा शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत तो सामना – विशेषतः कसोटी सामना - ते कधीही हरलेले नसतात.

मी कव्हर टू कव्हर वाचलेले पहिले पुस्तक एका ऑस्ट्रेलिअन माणसाने लिहिलेले होते. त्याचे नाव केथ मिलर होते आणि तो त्याच्या देशाने घडवलेला सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू होता. 1956मध्ये खेळातून निवृत्त झाल्यानंतर मिलरने त्याच्या क्रीडाक्षेत्रातील जीवनाबद्द्लचे ‘क्रिकेट क्रॉसफायर’ नावाचे आत्मचरित्र लिहिले. एका भारतीय प्रकाशकाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आणि त्याच्या काही प्रती त्याने हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात पाठवल्या जिथे मी लहानाचा मोठा झालो होतो. मिलरने क्रिकेट खेळणे सोडून दशकभराचा काळ लोटल्यानंतर,  भारतातील त्याच्या पुस्तकाची बहुधा शेवटची प्रत डेहराडूनच्या राजपूर रोडवरील दुकानातून माझ्या वडिलांनी विकत आणली आणि माझ्याकडे सुपुर्त केली. 

पोरगेलासा असताना मी ‘क्रिकेट क्रॉसफायर’ वाचले... तेव्हा त्यातल्या दोन गोष्टींनी मला प्रभावित केले - पहिली म्हणजे कर्णधार डॉन ब्रॅडमनविषयीची मिलर यांची संमिश्र भावना आणि दुसरी म्हणजे भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल मिलर यांना असलेले ममत्व. ब्रॅडमन हे त्यांच्या काळातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू होते या शब्दांत लेखकाने त्यांची दखल घेतलेली आहे... मात्र एक व्यक्ती म्हणून ब्रॅडमन हटवादी आणि स्वार्थीही होते असे मिलर यांना जाणवले. मिलर ज्या भारतीयांविरुद्ध खेळले होते ते त्यांना खेळाडू म्हणून आणि माणूस म्हणूनही आवडले होते. जवळपास अर्धशतकाहून अधिकचा काळ लोटला असला तरी मला आठवते की, मिलर यांच्या पुस्तकात मुश्ताक अली, सी.एस. नायडू, विनू मंकड आणि विजय मर्चंट यांची लहानशी पण प्रेमपूर्वक शब्दचित्रे आहेत.  

‘क्रिकेट क्रॉसफायर’ हे पुस्तक मी 1967मध्ये किंवा 1968मध्ये वाचले असावे. याच काळात मी ‘स्पोर्ट अँड पास्टटाईम’  नावाच्या (आता बंद झालेल्या) नियतकालिकात प्रसिद्ध होणारे जॅक फिंगलटन यांचे लेख वाचायला सुरुवात केली होती. हे नियतकालिक तेव्हाच्या मद्रासमध्ये ‘कस्तूरी अँड सन्स’ या माध्यमसमूहाकडून (आजही त्याचे नाव हेच आहे.) चालवले जात होते. मिलर यांच्याही दशकभर आधी फिंगलटन हे ब्रॅडमन यांच्यासह (त्यांच्या नेतृत्वाखाली) खेळले होते. पुढे फिंगलटन यांचेही पुस्तक वाचून मला हे कळायचे होते की,  ‘ब्रॅडमन हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटू होते आणि फारसे आवडावे अशा व्यक्तिमत्त्वाचे नव्हते.’ असे फिंगलटन यांनीही म्हटले आहे.

मिलर आणि फिंगलटन वाचत असतानाच्या काळातच मी माझ्या घरात पहिल्यांदा ऑस्ट्रेलिअन आवाजही ऐकले. 1960च्या दशकाच्या शेवटी भारतीय घरांमध्ये टेलिव्हिजन नव्हते... त्यामुळे माझ्यासारख्या क्रिकेटवेड्यांना मुद्रित माध्यमांतून आणि रेडिओवरून खेळाविषयी जाणून घ्यावे लागे. भारताचा 1967-68चा ऑस्ट्रेलिया दौरा (ज्यामध्ये चार-शून्यने आपण हरलो होतो) मी कदाचित ऐकला असावा. त्यानंतरच्या हिवाळ्यात वेस्ट इंडीजने ‘डाऊन अंडर’चा (ऑस्ट्रेलिअन) दौरा केला तेव्हाच्या माझ्या आठवणी मात्र अजूनही स्पष्ट आहेत. मी वेस्ट इंडीजच्या बाजूने होतो, ज्याचे नेतृत्व डॉन यांच्यापेक्षाही श्रेष्ठ अशा एका क्रिकेटपटूने केले होते. त्याचे नाव गारफिल्ड सोबर्स... त्यामुळे यजमानांकडून ‘तीन–एक’ने झालेल्या वेस्ट इंडीजच्या पराभवामुळे मी निराश झालो होतो... मात्र एबीसीच्या समालोचनामुळे हायसे वाटले होते कारण समालोचकांचे प्रतिनिधित्व करत होते उत्साही अलन मॅकगिल्व्हरी आणि हुशार व चिंतनशील लिंडसे हॅसेट.   

डेहराडूनमध्ये हिवाळ्यात गोठवणारी थंडी असे. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याच्या पहाटे पाच वाजता उठण्यासाठी आणि आमच्या फिलिप्सच्या रेडिओ सेटपाशी अंगाचे मुटकुळे करून उभे राहण्यासाठी इच्छाशक्ती पणाला लागत असे. घरातल्या इतर कुणालाही जाग येऊ नये म्हणून रेडिओचा आवाज कमी ठेवलेला असे. थंडीने दात वाजत असत आणि पाय कापत असत. काही अंशी हे थंडीमुळे होत असे पण बऱ्याच प्रमाणात ते मॅकगिल्व्हरी व हॅसेट यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या वर्णनामुळे निर्माण झालेल्या उत्कंठेपोटी होत असे. 

इंग्लंड, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि भारत यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यांदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण ऐकल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत आणि माझ्या घरी येणाऱ्या क्रीडाविषयक नियतकालिकांत (सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीलाच स्पोर्ट अँड पास्टटाईम बंद झालेले असले तरी तोवर त्याची उणीव भरून काढण्यासाठी मुंबईच्या ‘स्पोर्ट्सवीक’चे आगमन झालेले होते.) त्या सामन्यांविषयी निवांतपणे वाचता येत असल्यामुळे 1970मधला संपूर्ण हिवाळा माझ्यासाठी आत्यंतिक आनंदाने भारलेला होता. मोठा झाल्यावर आणि स्वतःच पुस्तके खरेदी करू लागल्यानंतर उपरोल्लेखित जॅक फिंगलटन आणि राय रॉबिनसन यांचे साहित्य वाचले. रॉबिनसन हे मिलर किंवा फिंगलटन यांच्या पातळीवरचे सामने खेळले नसले तरी त्यांना शैलीची उत्तम जाण होती. 

क्रिकेटविषयी लिहिणारे लेखक आणि समालोचक हे माझ्या तरुणपणातले माझे आवडते ऑस्ट्रेलिअन्स होते. बंगळूरमध्ये 1979मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटूंना मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी वयाच्या विशीत होतो. केरी पॅकर यांच्यामुळे त्यांची बाजू काहीशी कमकुवत होती. 1980चे दशक मी ऑस्ट्रेलिअन खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळताना पाहिल्याविनाच गेले... पण ते एका अर्थी चांगले झाले... कारण पॅकर यांच्याबाबत तडजोड करावी लागली असली तरीही त्या दशकात ऑस्ट्रेलिअन संघ पूर्ण क्षमतेचा असूनसुद्धा विशेष तुल्यबळाचा नव्हता. सुदैवाने 1990 आणि 2000 या दशकांमध्ये उच्च दर्जाचे ऑस्ट्रेलिअन संघ - आज मी ज्या ठिकाणाला माझे घर म्हणतो त्या - बंगळूरमध्ये खेळले आणि ते सामने पाहण्यासाठी मी नेहमी मैदानावर उपस्थित होतो. पॉन्टिंग आणि वॉ ब्रदर्स यांची फलंदाजी, मॅकग्राथ आणि वॉर्न यांची गोलंदाजी आणि हेली आणि गिलख्रिस्ट यांचे यष्टीरक्षण यांमध्ये मी चिंब भिजून गेलो होतो. 

आयुष्यभर या देशातील खेळाडूंविषयी वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आणि त्यांना पाहिल्यानंतर मी अकरा सर्वकालीन ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटूंचा कसोटी संघ चर्चेकरता समोर ठेवतो. हा क्रम फलंदाजीनुसार आहे.1. व्हिक्टर ट्रम्पर 2. आर्थर मॉरीस 3. डॉन ब्रॅडमन 4. रिकी पॉन्टिंग 5. अ‍ॅलन बॉर्डर 6. केथ मिलर 7. अ‍ॅडम गिलख्रिस्ट 8. शेन वॉर्न 9. डेनिस लिली 10. बिल ओ‘रिली 11. ग्लेन मॅकग्राथ

या अकरा जणांमधून मी स्टिव्ह स्मिथला वगळले आहे... कारण तो अजूनही खेळतो आहे. तरीसुद्धा मला वाटते की, यातल्या सलामीच्या फलंदाजांच्या निवडीबाबत वाद होऊ शकतात. तात्कालिकतेच्या पूर्वग्रहामुळे काही क्रिकेटप्रेमींना मार्क टेलर आणि मॅथ्यू हायडेन यांची निवड करावी असे वाटू शकेल... कारण त्यांची धावा मिळवण्याची क्षमता भावी पिढ्यांकरता टेलिव्हिजनद्वारे चित्रांकित झाली आहे आणि ते यूट्यूबवर पुनःपुन्हा पाहिले जाणे शक्य आहे. ट्रम्पर यांनी मात्र ऑस्ट्रेलिअन क्रिकेटच्या स्मृतींमधली आणि दंतकथांमधली खास जागा व्यापली आहे. जॅक फिंगलटन आणि गिडेन हाय यांचे (आणि इतरही अनेकांचे) लेखन त्याची साक्ष देते. 

ट्रम्पर यांच्याप्रमाणेच आर्थर मॉरीस हेही अव्वल दर्जाचे आक्रमक फलंदाज होते. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा एकसारखाच सामना करण्याचे त्यांचे प्रभुत्व त्यांचे सहकारी खेळाडू आणि विरोधक या दोन्हींकडून मान्य केले गेले आहे. माझ्या या अकरा जणांच्या यादीमध्ये मॉरीस यांनी टेलर आणि हायडन या त्याच्या डावखुऱ्या सहकाऱ्यांच्या पुढचे स्थान निश्चित केले आहे.

आता मी थोडा आणखी वादाचा मुद्दा उपस्थित करतो. या अकरा जणांचा कर्णधार कोण असेल? ब्रॅडमन हा स्वाभाविक पर्याय आहे हे ठाऊक असूनही मी अ‍ॅलन बॉर्डर यांची निवड करेन. डॉन यांनी ज्या संघांचे नेतृत्व केले होते तो संघ सर्वच बाबतींत आश्चर्यकारकपणे प्रतिभासंपन्न होता... त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होता. दुसऱ्या बाजूला बॉर्डर यांनी ऑस्ट्रेलियाला त्याच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक पडत्या काळामध्ये रस्ता दाखवला. त्यांनी तरुण खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि सांघिक वृत्ती वाढवली यांविषयी कुणाचेच दुमत नाही. हा संघ विरुद्ध फ्रॅंक वॉरेल यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीजचा सार्वकालिक संघ अशा सामन्याची कल्पना केली तरी मी ब्रॅडमन यांच्यापेक्षा बॉर्डर यांच्यावरच भरवसा ठेवेन.

ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटूंच्या या कौतुकाचा शेवट एका इंग्लिशमनच्या उल्लेखाने करतो. हे इंग्लिशमन म्हणजे जॉन अरलॉट, क्रिकेटविषयी लिहिणाऱ्या लेखकांमधले सर्वात खुला विचार असणारे. 1948च्या इंग्लंडच्या दौऱ्यानंतर अरलॉट यांनी ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटूंच्या खेळण्याच्या पद्धतीविषयी लहानसा मात्र लक्षवेधी लेख लिहिला आहे. त्याची सुरुवात या प्रश्नांनी होते - ‘ऑस्ट्रेलिअन खेळाडू वेगळे का आहेत? ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना इतर देशांच्या विरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्यापेक्षा वेगळा का असतो? आणि तो वेगळा आहे असे आपल्याला का वाटते?’ पुढे आपल्या लेखात अरलॉट यांनी अशा सामन्यांचे वर्णन केले आहे जे सामने त्यांनी पाहिले होते किंवा त्यांच्याविषयी वाचले होते आणि ज्यांमध्ये ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटूंची काही खास गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने समोर आली होती. 

अरलॉट यांनी त्यांच्या लेखाचा शेवट करताना लिहिले होते की, ‘अ‍ॅशेस टेस्ट’मध्ये (इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील कसोटी मालिकांमध्ये) जेव्हा इंग्लिश संघ खेळला तेव्हा त्याला ‘ऑस्ट्रेलिअन फलंदाजी, गोलंदाजी, यष्टीरक्षण, नेतृत्व आणि ‘ऑस्ट्रेलिअनिझम’ यांना तोंड द्यावे लागले.’ ‘‘ऑस्ट्रेलिअनिझम’ म्हणजे जिंकण्याचा - नियमांच्या अधीन राहूनच मात्र गरज पडल्यास नियमांची शेवटची मर्यादा गाठून - एकमात्र निर्धार. मानवी शरीराच्या कार्यक्षेत्रातच जे ‘अशक्य’ आहे ते आपण करू शकतो असा विश्वास ऑस्ट्रेलिअनांना आहे आणि ‘यांना काय अशक्य आहे?’ असे वाटून आपल्याला अचंबित करण्यातही ते कायम यशस्वी झाले आहेत. याचा अर्थ असा की, जोवर शेवटची विकेट पडत नाही किंवा शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत तो सामना – विशेषतः कसोटी सामना - ते कधीही हरलेले नसतात.’

एका इंग्लीशमनच्या दृष्टीकोनातून हे लिहिले गेलेले होते... मात्र आपल्या संघाला ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळताना पाहिलेल्या भारतीयांनाही या मतात आपला प्रतिध्वनी जाणवेल. ‘डाऊन अंडर’मध्ये लवकरच सुरू होणारी कसोटी मालिका अरलॉट यांच्या सत्तर वर्षांपूर्वीच्या या टिपण्यांतले तथ्य पुन्हा एकदा नक्कीच सिद्ध करेल.

(रामचंद्र गुहा यांचे 'The Commonwealth of Cricket' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.)

(अनुवाद – सुहास पाटील)

- रामचंद्र गुहा

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: अनुवाद रामचंद्र गुहा क्रिकेट ऑस्ट्रेलिया Ramchandra Guha Sports Cricket Australia Load More Tags

Comments:

विष्णू दाते

छान! रामचंद्र गुहांच क्रिकेटवरचं वर्चस्व ही जाणवण्यासारखं!

Add Comment