भट्ट यांनी प्रेरणा दिलेल्या चिपको आंदोलनाची संक्षिप्त पण गहन अर्थ व्यक्त करणारी व्याख्याही त्यांनी या पुस्तकात दिली आहे. ‘पहाडी गावकऱ्यांमध्ये त्यांच्या जंगलांविषयी सुप्तपणे असणारी सहानुभूती जागी करण्याचा आणि त्यांच्या आंतरिक संवेदनेचं रूपांतर सामाजिक कटिबद्धतेमध्ये करण्याचा एक मार्ग चिपको आंदोलनाने दाखवला.’ ही कटिबद्धता केवळ जंगलांच्या विध्वंसाविरोधातील निदर्शनांमधूनच दिसली असं नाही, तर वनांच्या पुनर्स्थापनेमध्येही या आंदोलनाने पुढाकार घेतला. भट्ट यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलनाच्या स्वयंसेवकांनी गावकऱ्यांसोबत काम करून गढवालमधील डोंगरउतारावरच्या अनेक नापीक भागांना पुन्हा हिरवंगार केलं. याचे स्थानिक पर्यावरणावर अत्यंत हितकारक परिणाम झाले.
सामाजिक कार्यकर्ते व चिपको आंदोलनातील अग्रणी चंडीप्रसाद भट्ट यांच्याविषयी मला अतीव आदर आहे. मी विशीमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना पहिल्यांदा भेटलो आणि त्या भेटीने माझं आयुष्य बदलून गेलं. त्यानंतर मी त्यांना अनेकदा भेटलो आहे. या प्रत्येक भेटीत मला भारतासमोरच्या व जगासमोरच्या नैतिक, राजकीय व पर्यावरणीय आव्हानांसंदर्भात आणि ही आव्हानं आटोक्यात ठेवण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात काही ना काही नवीन मर्मदृष्टी मिळत आल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी चंडीप्रसाद भट्ट यांचं आत्मचरित्र हिंदीमध्ये प्रकाशित झालं. आता समीर बॅनर्जी यांनी ‘जन्टल रेझिस्टन्स’ या शीर्षकाखाली त्या पुस्तकाचं इंग्रजीत भाषांतर केलं आहे. भट्ट यांचा जन्म 1934 मध्ये झाला, तेव्हा भारत ब्रिटिशांची वसाहत होता. त्यांच्या आत्मचरित्रातील सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणी चित्रमय रितीने नोंदवल्या आहेत, त्याचप्रमाणे थोरली बहीण (जिच्याशी त्यांचं घनिष्ठ नातं होतं), त्यांचे शिक्षक, गावातील ज्येष्ठ मंडळी व कष्टकरी कनिष्ठ जातींमधील व्यक्ती यांची हेलावून टाकणारी व्यक्तिचित्रंही या भागात आहेत. मध्य हिमालयातील भूप्रदेश, तिथले डोंगर, जंगलं, शेतं व नद्या, हे सगळंच त्यांच्या पुस्तकातील या पानांमधून जिवंत झालं आहे. भट्ट लिहितात, ‘मला अलकनंदा नदीचं वाहतं पाणी प्रिय होतं आणि नदीच्या लयबद्ध प्रवाहाने मला भावनिकदृष्ट्या खूप प्रेरणा मिळत असे.’
ब्राह्मण असल्यामुळे लहानपणी चंडीप्रसाद यांना उच्च सामाजिक स्थान लाभलं. परंतु, त्यासोबत संपन्नता नव्हती. ते एक वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यांचं कुटुंब आत्यंतिक दारिद्र्यात नसलं तरी गरीब होतं. ते लिहितात, ‘माझं सगळं बालपण सतत अभावाच्या आर्थिक स्थितीमध्ये गेलं. कोणतीच गोष्ट मुबलक नव्हती, आमच्याकडे कधीच पुरेसे पैसे नसत, आणि आमच्या गरजेची प्रत्येक वस्तू अपुरीच असल्याचं जाणवायचं.’ पौगंडावस्थेत असताना त्यांना घरातील चूल पेटती ठेवण्यासाठी स्वतः जमीन कसावी लागली आणि गायींना चरायला न्यावं लागलं.
ते विद्यार्थी म्हणून उदासीन कसे होते, परीक्षा पास होताना त्यांना कशी अडचण येत असे आणि मॅट्रिक होईपर्यंत त्यांना कशा शाळा बदलाव्या लागल्या, याबद्दल चंडीप्रसाद यांनी प्रांजळपणे कथन केलं आहे. विद्यापीठात शिक्षण घेण्याचा प्रश्नच नव्हता. सुदैवाने एका स्थानिक बस-कंपनीमध्ये बूकिंग क्लार्कची नोकरी मिळाल्यामुळे त्यांना किरकोळ मासिक पगार मिळू लागला. या बस यात्रेकरूंना हिमालयातील पवित्र प्रार्थनास्थळांची यात्रा घडवून आणत. कामाचा भाग म्हणून देशाच्या विभिन्न भागांमधील भारतीयांशी भेट झाल्यामुळे चंडीप्रसाद यांचं सांस्कृतिक व भौगोलिक विश्व विस्तारलं. बावीस वर्षांचे असताना त्यांनी पहिल्यांदा मोटर-कार पाहिल्या. श्रीमंत बिर्ला कुटुंबातील सदस्यांना बद्रिनाथला घेऊन जाणाऱ्या या कार होत्या. ‘मला प्रत्यक्षात कोणी बिर्ला परिवारातील व्यक्ती कधीच पाहायला मिळाली नाही, पण त्यांच्या ड्रायव्हरांनी घातलेले टापटीप पोशाख बघून मला बिर्लांच्या उच्च स्थानाची पुरेशी कल्पना आली.’
भट्ट गढवालमध्ये राहत होते त्या ठिकाणी, 1956 मध्ये आदरणीय गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश नारायण यांनी भेट दिली. तरुण चंडीप्रसाद त्यांचं भाषण ऐकायला गेले. साठ वर्षांनी त्यांनी नोंदवलेल्या आठवणीनुसार, जेपींचे ‘शब्द माझ्या विवेकबुद्धीच्या गाभ्याला स्पर्श करून गेले.’ त्यानंतर चंडीप्रसाद यांची भेट स्थानिक सर्वोदयी कार्यकर्ते मानसिंग रावत यांच्याशी झाली व त्यांच्या सोबत ते पहाडी भागांमध्ये पदयात्रांसाठी जाऊ लागले. जेपींचे शब्द आणि मानसिंग यांचा प्रत्यक्ष दाखला, यांमुळे भट्ट यांना गढवाल मोटर ओनर्स युनियनमधील नोकरी सोडून पूर्ण वेळ सामाजिक कार्याला वाहून घेण्याची प्रेरणा मिळाली.
भट्ट यांनी 1960च्या दशकात त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने कामगार सहकारी संस्था व महिला मंगल दलं स्थापन केली. त्यांनी सौम्यपणे जातीय भेदभावाशी लढा द्यायचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे पूर, बस-अपघात, इत्यादींमधील पीडितांच्या सुटकेसाठीही पुढाकार घेतला. 1960च्या दशकाअखेरीला गढवालमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं बरंच मोठं स्थान निर्माण झालं होतं.
दरम्यान, भट्ट यांनी हिमालयातील व्यापारी वनीकरणाच्या लुटीचा सूक्ष्म अभ्यास सुरू केला होता. नैसर्गिक जंगलांमध्ये वृक्षतोड करताना निसर्गाचं व माणसांचं शोषण कसं होतं, याबद्दल ते संवेदनशीलतेने लिहितात. वृक्षतोडीसाठी कामावर घेतल्या जाणाऱ्या मजुरांना तुटपुंजं वेतन दिलं जात असे, या वृक्षतोडीतून मिळणारा बराचसा नफा कंत्राटदाराला मिळत होता- कंत्राटदार तिथलं लाकूड मैदानी प्रदेशांतील कारखान्यांमध्ये विकायचा. हा विध्वंस बघून भट्ट यांच्या मनात प्रश्न उभा राहिला: ‘हा शोषणकारी वेडेपणा थांबवता येईल का?’ हे थांबवता येईल, पण त्यासाठी पहाडी लोकांना पुन्हा एकदा स्वतःच्या जंगलांवर नियंत्रण मिळवावं लागेल, ही जंगलं त्यांच्या उपजीविकेसाठी व जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती, असा विचार त्यांनी केला.
1973 मध्ये व्यापारी वनीकरणाविरोधात गावकऱ्यांनी केलेल्या पहिल्या निदर्शनांचं संघटन करण्यात व त्याचं नेतृत्व करण्यात भट्ट यांचा सक्रिय सहभाग होता. हीच निदर्शनं पुढे एकत्रितरित्या ‘चिपको आंदोलन’ म्हणून ओळखली गेली. चिपको आंदोनाविषयी कित्येक पुस्तकं व अभ्यासू लेख लिहिले गेले आहेत. मी स्वतः या आंदोलनावर व त्याच्या ऐतिहासिक उगमावर डॉक्टरेटसाठी प्रबंध लिहिला. भट्ट यांचं आत्मकथन कशामुळे वेगळं व वैशिष्ट्यपूर्ण ठरतं, याची नोंद समीर बॅनर्जी यांनी ‘भाषांतरकाराच्या टिपणा’त केली आहे. ‘अकादमिक कथनाचं स्वरूप क्वचितच मानवी परिश्रम, आशा व भावभावना यांना अनुकूल असतं. अशा कथनांमध्ये शब्द, वाक्यं, भाषा व ‘वाद’ यांमधून स्पष्टीकरणात्मक, अर्थबोधात्मक व विश्लेषणात्मक चौकटी समोर येतात; या चौकटी जमिनीवरच्या, अधिक परखड वास्तवापासून दुरावलेल्या असतात, त्यामुळे कार्यकर्त्याच्या जीवनातील भावविश्व या शाब्दिक विश्वात हरवून जातं,’ असं बॅनर्जी लिहितात.
बॅनर्जी यांच्या टिप्पणीमधील सत्याचा प्रत्यय भट्ट यांच्या आत्मकथनात अनेक ठिकाणी येतो. उदाहरणार्थ, चिपको आंदोलनाला तोंड फुटलं त्याच वर्षी भट्ट यांचा लखनौमधील एका वरिष्ठ नोकरशहाशी सामना झाला, तो प्रसंग याचा दाखला ठरणारा आहे. वनांवर सरकारऐवजी समुदायाचं नियंत्रण असावं, ही बाजू मांडण्यासाठी भट्ट त्या नोकरशहाची भेट घ्यायला गेले होते. ‘मी त्यांना अभिवादन केलं, पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही. मी अनेकदा नमस्कार म्हणालो, तरी काही प्रतिसाद आला नाही, तेव्हा मी अनिच्छेने त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. थोड्या वेळाने त्याने एक जाडजूड, मातकट रंगाची सिगारेट शिलगावली- नंतर कोणीतरी मला सांगितलं की, त्याला सिगार असं म्हणतात आणि बड्या साहेबांना ती खूप आवडते. धूर सोडत ते माझ्याकडे वळले नि त्यांनी विचारलं, “तुम्ही हे सगळं काय करताय?” रोखलेल्या नजरेने झुरके घेत ते माझ्या दिशेने धूर सोडत राहिले. मी त्यांच्या समोर आमची बाजू मांडायचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यात काही रस नव्हता. पहाडी शेतकरी तुच्छतेचे धनी होते आणि त्यांची छोटी केंद्रं म्हणजे सुंदर राज्यव्यवस्थेच्या शरीरावरची गळवं होती; या शरीराची निगा राखणं हे या अधिकाऱ्यांचं कर्तव्य होतं.’
भट्ट यांनी या व्यक्तिचित्राइतकंच सुस्पष्ट पण त्याहून कितीतरी अधिक सहानुभूतीने दुसरं एक व्यक्तिचित्रही रंगवलं आहे. मार्च 1974 मध्ये, म्हणजे मी हा लेख लिहितोय त्याच्या बरोब्बर पन्नास वर्षं आधी, रेणी या गावात झालेल्या चिपको निदर्शनाच्या विलक्षण नेत्या गौरा देवी यांच्याविषयी भट्ट यांनी लिहिलं आहे. गौरा देवी कधीही शाळेत गेल्या नव्हत्या, आणि कमी वयातच त्या विधवा झाल्या, त्यामुळे स्वतःचा जमिनीचा छोटा तुकडा कसून त्यांना दारिद्र्यात जीवन कंठावं लागत होतं. तरीही, त्यांनी स्वतःचा वेळ व ऊर्जा खर्चून 1965 मध्ये स्वतःच्या गावात महिला मंगल दल स्थापन केलं, आणि नऊ वर्षांनी हिमालयाच्या इतिहासातील सर्व चिपको आंदोलनांपैकी बहुधा सर्वांत लक्षणीय निदर्शनाचं नेतृत्व केलं.
गौरा देवी यांचं 1991 मध्ये निधन झालं, तेव्हा ‘त्यांच्या मागे त्यांनी केलेल्या सौम्य प्रतिकाराचं तेजस्वी व स्फूर्तिदायी सामर्थ्य उरलं, त्यातून आम्हाला विषमता व दडपशाही यांविरोधात लढण्यासाठी मार्गदर्शन मिळत राहिलं. ‘दडपशाहीविरोधात लढण्याची त्यांना वाटणारी कळकळ त्यांच्या स्वतःच्या आणि कित्येक पिढ्या गरिबीशी व वैयक्तिक शोकांतिकेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या सहकारी महिलांच्या जगण्यातील खडतर प्रसंगांमधून आलेली होती,’ असं भट्ट लिहितात. त्यांच्यात पोलादी धाडसासोबतच सखोल करुणाही होती; त्यामुळे त्यांची आठवण नोंदवताना भट्ट म्हणतात, ‘गौरा देवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेणीजवळची वृक्षतोड थांबवली तेव्हा त्या मला म्हणाल्या, लाकूडतोड्यांनी चुकीचं वर्तन केलं असलं तरी त्यांच्याविषयी मी अधिकाऱ्यांकडे वाईट बोलू नये, अन्यथा त्या माणसांना स्वतःची उपजीविका गमवावी लागेल. या प्रसंगात झालेलं त्यांच्या उत्तुंग स्वभावाचं दर्शन मला कधीच विसरता येणार नाही.’
भट्ट यांनी प्रेरणा दिलेल्या चिपको आंदोलनाची संक्षिप्त पण गहन अर्थ व्यक्त करणारी व्याख्याही त्यांनी या पुस्तकात दिली आहे. ‘पहाडी गावकऱ्यांमध्ये त्यांच्या जंगलांविषयी सुप्तपणे असणारी सहानुभूती जागी करण्याचा आणि त्यांच्या आंतरिक संवेदनेचं रूपांतर सामाजिक कटिबद्धतेमध्ये करण्याचा एक मार्ग चिपको आंदोलनाने दाखवला.’ ही कटिबद्धता केवळ जंगलांच्या विध्वंसाविरोधातील निदर्शनांमधूनच दिसली असं नाही, तर वनांच्या पुनर्स्थापनेमध्येही या आंदोलनाने पुढाकार घेतला. भट्ट यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलनाच्या स्वयंसेवकांनी गावकऱ्यांसोबत काम करून गढवालमधील डोंगरउतारावरच्या अनेक नापीक भागांना पुन्हा हिरवंगार केलं. याचे स्थानिक पर्यावरणावर अत्यंत हितकारक परिणाम झाले.
हेही वाचा : जगाच्या बचावासाठी स्थानिक कृतीचं महत्त्व - रामचंद्र गुहा
भट्ट हे मूलतः जमिनीवर काम करणारे संघटक आहेत, पण ते एक मर्मग्राही विचारवंतसुद्धा आहेत. विशेषतः शाश्वत आर्थिक उपाययोजनांसंदर्भातील त्यांचे विचार मौलिक आहेत. अविचारीपणे रस्तेबांधणी करणं, हे जोशीमठ शहरातील घरं पडण्यामागचं एक कारण असल्याचा इशारा त्यांनी 1976 मध्येच दिला होता. हिमालयामध्ये मोठी धरणं का सुसंगत नाहीत, हे स्पष्ट करणारे अनेक पथदर्शी निबंध त्यांनी 1980 च्या दशकात लिहिले. ‘माझे आधीच नाजूक असणारे पर्वत अधिकाधिक नाजूक होत असल्याचं मला जाणवतंय,’ असं ते लिहितात. ‘माणसं आता त्यांचं भरणपोषण करणाऱ्या जमिनीपासून व नैसर्गिक संसाधनांपासून दुरावली आहेत. व्यापारी हितसंबंधांनी सगळं काबीज केलं आहे, आणि मानसिक व भावनिक बदल, त्याचप्रमाणे जुळवून घेण्याच्या प्रक्रिया यांमुळे लोक जमिनीपासून दुरावत व्यापाराच्या जवळ जात आहेत,’ त्यामुळे हे घडल्याचं ते नोंदवतात.
चंडीप्रसाद भट्ट यांचं आत्मचरित्र हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यांनी स्वतःच्या अनुभवांचं केलेलं कथन सामाजिक व पर्यावरणीय इतिहासाविषयी अनेक संपन्न मर्मदृष्टी देणारं असून त्यात गांधीनंतरच्या गांधीवादाच्या इतिहासाचाही आलेख उभा राहतो. हे पुस्तक काहीएक वाङ्मयीन मूल्य राखणारा दस्तऐवजसुद्धा आहे. या पुस्तकाला योग्य तितका व्यापक वाचकवर्ग लाभेल, असा मला विश्वास वाटतो.
(अनुवाद - प्रभाकर पानवलकर)
- रामचंद्र गुहा, बंगळूरू
हेही वाचा :
Add Comment