सत्य सांगणारे

अडचणी वाढल्या असल्या तरी, माओच्या काळाप्रमाणे क्षी यांच्या काळातही काही व्यक्ती प्रवाहाविरोधात निधडेपणाने पोहायचा प्रयत्न करतच राहतील..

चीनमधील भूमिगत इतिहासकार ‘राज्यसंस्थेने मांडलेल्या वास्तवाच्या आवृत्तीला आव्हान देऊ पाहतात, अस्थिर करू पाहतात व त्याचा प्रतिवाद करू पाहतात,’ असं जॉन्सन यांनी नमूद केलं आहे. हे राज्यसंस्थेबाहेरचे आणि अनेकदा राज्यसंस्थेविरोधात असणारे लेखक व चित्रपटकर्ते त्यांच्या कामातून ‘कायमच अस्तित्वात असलेला आणि लोकांनीही ज्यासाठी संघर्ष कायम सुरू ठेवला असा खुला व मानवीय चीन’ दाखवू पाहतात.

‘भूतकाळावर नियंत्रण ठेवणारा भविष्यकाळाचं नियंत्रण करतो: वर्तमानकाळावर नियंत्रण ठेवणारा भूतकाळाचं नियंत्रण करतो,’ ही जॉर्ज ऑर्वेलच्या ‘1984’ या कादंबरीतील एक गाजलेली ओळ आहे. इथे ऑर्वेलच्या दृष्टीसमोर स्टॅलिनचा रशिया होता, पण त्याची ही उक्ती कमी-अधिक प्रमाणात सर्वच एकाधिकारशाही राजवटींना लागू होणारी आहे. अशा राजवटीत सत्ताधारी पक्ष, आणि सत्तेची धुरा सांभाळणारा नेता इतिहासाची आपली आवृत्ती जनतेमधील प्रत्येक व्यक्तीच्या- तरुण वा वृद्ध, पुरुष वा बाई, श्रीमंत वा गरीब, समलिंगी वा भिन्नलिंगी अशा सर्वांच्या- गळी उतरवू पाहतात.

तुलनेने खुल्या समाजात इतिहासाची कोणतीही एकच आवृत्ती सर्व नागरिकांवर थोपवता येत नाही. उदाहरणार्थ, अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाची सत्ता असते तेव्हा ते वांशिक संबंध कसे होते वा कसे असायला हवेत याबद्दलचं त्यांचं मत लादण्याचा प्रयत्न करू शकतात, पण या घटितांचं अत्यंत भिन्न आकलन राखणारे लोक या मांडणीचा जोरकसपणे प्रतिवाद करतील.

भारतासारख्या उणिवाग्रस्त वा अंशतः लोकशाही असणाऱ्या व्यवस्थांमध्येसुद्धा भूतकाळाविषयीचे राज्यपुरस्कृत दृष्टिकोन तीव्र वादविवादाला कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, मोदी सरकारने स्वतःकडील सर्व संसाधनांचा वापर करून हिंदू-मुस्लीम संबंधांचं विशिष्ट (आणि हेतूपुरस्सर पक्षपाती असणारं) चित्र मांडायचा प्रयत्न केला. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय प्रजासत्ताकासाठी दिलेल्या योगदानाचं अवमूल्यन करण्यासाठीही त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण तरीही सरकारी हुकूमानुसार न चालणारी संकेतस्थळं, प्रकाशनसंस्था, यू-ट्यूब वाहिन्या व अगदी क्वचित काही वृत्तपत्रंसुद्धा टिकून आहेत; त्यामुळे या मुद्द्यांचं निराळं आकलन असणारे लोक स्वतःची मतं या स्त्रोतांद्वारे लोकांपर्यंत पोचवू शकतात. मोदी सरकार सध्या मांडू पाहत असलेलं नवीन ‘प्रसारण विधेयक’ या स्वतंत्र आवाजांना दडपण्याचा प्रयत्न करणारं आहे.

आपल्या समकाळामध्ये लोक कसे विचार करतात- आणि कसा विचार करत नाहीत- यावर नियंत्रण ठेवायचा जितका कठोर प्रयत्न चिनी कम्युनिस्ट पक्षाने केला असेल तितका दुसऱ्या कोणत्याही संघटनेने केलेला नाही. स्वतःच्या देशाचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ रंगवताना चिनी कम्युनिस्ट पक्षाने चार मध्यवर्ती प्रतिपादनं मांडलेली आहेत व त्यांचं समर्थन केलं जातं:

एक, कम्युनिस्ट पक्ष कायम योग्य व बिनचूक असतो, आणि नेताही (एकेकाळी माओ त्से-तुंग, आता क्षी जिनपिंग) कायम योग्य व बिनचूक असतो;

दोन, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे महान नेता अथकपणे दिवस-रात्र, उन्हाळा असो, पावसाळा असो वा हिवाळा असो सतत चीनच्या उन्नतीसाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात, राष्ट्राला सुरक्षित व समर्थ करू पाहत असतात आणि लोकांना आनंदी व संपन्न करू पाहत असतात.

तीन, कम्युनिस्ट पक्षावर, त्याच्या धोरणांवर वा त्याच्या व्यवहारावर सार्वजनिकरीत्या किंवा खाजगीत टीका करणारे लोक राष्ट्राचे शत्रू आहेत, ते परकीय सत्तांच्या वतीने कार्यरत असतात;

चार, कम्युनिस्ट पक्षाने ही टीका ठामपणे व वेगाने शमवली नाही- आणि टीकाकारांची विल्हेवाट लावली नाही- तर चीन, 1949 मध्ये कम्युनिस्टांनी सत्ता हातात घेतली त्याआधीच्या अंधाऱ्या कालखंडात पुन्हा निघून जाईल- त्या काळात देश दुफळी, संघर्ष व यादवी युद्ध यांनी जर्जर झालेला होता, आणि द्वेषयुक्त पाश्चात्त्य सत्तांच्या पकडीत गेला होता.

इतिहासासंदर्भात सत्ताधारी पक्षाच्या मताविरोधातील मतभिन्नता दर्शवण्याचं प्रमाण चीनमध्ये भारताच्या तुलनेत- आणि अर्थातच अमेरिकेच्या तुलनेत- खूप कमी आहे. 1949 पासून सत्ताधारी राजवटीविरोधात बोलल्यास वा लिहिल्यास स्वतःची नोकरी गमावण्याचा, किंवा अटक होण्याचा, किंवा छळ केला जाण्याचा, किंवा अगदी जीवे मारले जाण्याचाही धोका सहन करावा लागतो. पण, अलीकडच्या एका पुस्तकातून समोर आल्यानुसार, चीनमध्ये अजूनही काही अनुकरणीय दाखले घालून देणाऱ्या व्यक्ती आधुनिक चिनी इतिहासाविषयी, आणि विशेषतः कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासाविषयी आपल्या सहनागरिकांना सत्य सांगून हे धोके पत्करत आहेत.

या पुस्तकाचं नाव आहे ‘स्पार्क्स: चायनाज् अंडरग्राउन्ड हिस्टोरियन्स अँड देअर बॅटल फॉर द फ्यूचर’. या पुस्तकाचे लेखक इयान जॉन्सन यांनी पत्रकार म्हणून अनेक वर्षं चीनमध्ये वास्तव्य केलं आणि शेवटी तिथल्या राजवटीने त्यांना हद्द पार केलं. तिथे राहत असताना त्यांनी देशाच्या बहुतांश भागांमध्ये प्रवास केला, अनेक स्तरांमधील लोकांच्या मुलाखती घेतल्या- यामध्ये निबंधकार, पत्रकार, ब्लॉगर व माहितीपट करणारे अशा अनेकांचा समावेश होता, आणि प्रस्तुत पुस्तक त्यावरच आधारलेलं आहे. याबद्दल बोलत असताना जॉन्सन वाचकांना चिनी भूप्रदेशातील वैविध्याचीही ओळख करून देतात- तिथला शहरी व ग्रामीण भूप्रदेश, तिथला सांस्कृतिक व सभ्यतांचा इतिहास, आणि तिथल्या संपन्न कलात्मक, साहित्यिक व तात्त्विक परंपरा यांच्याशी वाचकाचा परिचय करून देतात. त्यांच्या कथनातून कम्युनिझमपलीकडचा चीन समोर येतो, आणि कदाचित कम्युनिझमनंतरच्या चीनलाही त्यातून प्रेरणा मिळेल अशी शक्यता दिसते.

माओ त्से-तुंग 1949 पासून ते 1976 मध्ये त्याचे निधन होईपर्यंत चीनमध्ये सत्तेवर होता; त्याने स्वतःच्या लोकांवर केलेल्या अनन्वित अत्याचारांबद्दल जॉन्सन परखडपणे लिहितात. माओला शत्रू गरजेचे होते, त्यामुळे त्याला सगळीकडे तेच दिसत असत- शेतात व कारखान्यात, शहरात व गावात, अगदी कम्युनिस्ट पक्षातही तो शत्रूंचा शोध घेत असे. कधी कोणताही किरकोळ गुन्हासुद्धा न केलेल्या लाखो ताठ कण्याच्या व कष्टाळू चिनी नागरिकांवर माओच्या गुंडांनी ‘प्रति-क्रांतिकारी’ किंवा ‘लोकांचे शत्रू’ असल्याचा शिक्का मारला. यातले जे लोक नशीबवान होते त्यांना केवळ त्यांच्या घरांमधून हुसकावून लावण्यात आलं वा शारीरिक कष्टाची कामं देण्यात आली; नशीबवान नसलेल्यांना तुरुंगवास भोगावा लागला किंवा मारून टाकण्यात आलं.

माओमध्ये लहरी व खुनशी मनोवृत्तीचं खास मिश्रण झालेलं होतं. ‘शेकडो फुलं बहरून यावीत’ असं म्हणत त्याने 1956 मध्ये लोकांना आपल्या मनातलं मोकळेपणाने व्यक्त करायला सांगितलं. नागरिकांनी त्याच्या उक्तीनुसार कृती सुरू केल्यावर त्याने स्वतःचं आवाहन मागे घेतलं आणि ‘उजव्यांविरोधातील मोहीम’ सुरू केली, त्यात लेखक, शिक्षक, विद्यार्थी, वकील, व्यवस्थापक, सनदी सेवक, वैज्ञानिक, किंबहुना स्वतःच्या डोक्याने विचार करण्याची कमी-अधिक क्षमता वा प्रशिक्षण असलेल्या कोणालाही सरसकट संपवण्यात आलं. या प्रक्रियेत ‘विद्यापीठं, माध्यमिक शाळा, संशोधन संस्था व सरकारी कार्यालयं उद्ध्वस्त झाली. हजारो लोकांना श्रमछावण्यांमध्ये पाठवण्यात आलं. बाहेर असलेल्यांना नमतं घ्यायला लावण्यात आलं, त्यांनी पक्षाचा प्रत्येक लहरीपणा शब्दशः अनुसरत आपलं भवितव्यही इतरांच्या वाटेने जाणार नाही असा प्रयत्न केला,’ असं जॉन्सन लिहितात.


हेही वाचा : व्यक्तिनिष्ठ पंथांचा संक्षिप्त इतिहास - रामचंद्र गुहा


जॉन्सन यांच्या पुस्तकात नोंदवले गेलेले अनेक ‘भूमिगत इतिहासकार’ हे राज्यसंस्थेने तुरुंगात डांबलेल्यांची किंवा मारलेल्यांची मुलं किंवा भावंडं आहेत. त्यांना त्यांच्या वैयक्तिक दुःखामुळे चीनमधील कम्युनिस्ट राजवटीची काळोखातील बाजू व्यापक जनतेसमोर मांडण्याची प्रेरणा मिळाली. ‘मोठी लांब झेप’, ‘सांस्कृतिक क्रांती’, तिबेटचा विद्ध्वंस, व तथाकथित ‘महान कर्णधारा’ने मांडलेले व पार पाडलेले इतर विध्वंसक प्रकल्प, यांविषयी सत्य सांगायचा प्रयत्न हे इतिहासकार करत असतात.

जॉन्सन यांनी ज्यांच्याविषयी लिहिलं आहे त्यांपैकी बहुतांश मतभिन्नता दर्शवणारे लोक विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात कार्यरत होते. हा ‘असाधारण खुलेपणाचा कालखंड’ होता. इंटरनेटच्या वाढीने त्यांना प्रोत्साहन मिळालं, तिथे त्यांना स्वतःचं लेखन व चित्रपट अधिक मुक्तपणे पसरवणं शक्य झालं. इतर काहींनी 1980च्या दशकात काम सुरू केलं- त्या वेळीही तुलनेने कलात्मक व व्यक्तिगत स्वातंत्र्य होतं, ते जून 1989 मध्ये तिआनमेनमधील हत्याकांडानंतर संपुष्टात आलं. परंतु, जॉन्सन यांनी आधीच्या घटनांचीही चर्चा केली आहे- 1950 च्या दशकाखेरीला कम्युनिस्ट पक्षावर टीका करणारे लेख व कविता असलेली चक्रमुद्रित नियतकालिके छोट्या संख्येने वितरित केली जात असत.

हे भूमिगत इतिहासकार ‘राज्यसंस्थेने मांडलेल्या वास्तवाच्या आवृत्तीला आव्हान देऊ पाहतात, अस्थिर करू पाहतात व त्याचा प्रतिवाद करू पाहतात,’ असं जॉन्सन यांनी नमूद केलं आहे. हे राज्यसंस्थेबाहेरचे आणि अनेकदा राज्यसंस्थेविरोधात असणारे लेखक व चित्रपटकर्ते त्यांच्या कामातून ‘कायमच अस्तित्वात असलेला आणि लोकांनीही ज्यासाठी संघर्ष कायम सुरू ठेवला असा खुला व मानवीय चीन’ दाखवू पाहतात.

क्षी जिनपिंग 2012मध्ये सत्तेवर आले तेव्हापासून अशा स्वतंत्र इतिहासकारांचं काम आणखी अवघड झालं. क्षी यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या आरंभी चिनी कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास शक्य तितक्या सर्वोत्तम रितीने मांडायचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला. राज्यसंस्थेची चाकरी करणारे अनेक इतिहासकार पक्षाच्या ‘महान विजयांचा व उत्कृष्ट उपलब्धीं’चा गौरव करण्यासाठी दिमतीला घेण्यात आले. चटकन दिशाभूल होण्याची शक्यता असलेल्या तरुण पिढ्यांना पक्षाचं व त्याच्या नेत्यांचं इतक्या दशकांमधील शौर्य व स्वार्थत्याग यांची योग्य ओळख करून द्यावी, अशी सूचना या सर्वांना करण्यात आली. त्याच वेळी, या सरकारी कारकुनांनी ‘पक्षाच्या इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या वा त्याचं खलचित्रण करू पाहणाऱ्या कोणत्याही चुकीच्या प्रवृत्तींचा निग्रहाने विरोध’ करावा, असंही आवर्जून सांगण्यात आलं.

अडचणी वाढल्या असल्या तरी, माओच्या काळाप्रमाणे क्षी यांच्या काळातही काही व्यक्ती प्रवाहाविरोधात निधडेपणाने पोहायचा प्रयत्न करतच राहतील. कारण, जॉन्सन लिहितात त्याप्रमाणे, ‘चीनमध्ये स्वतंत्र विचार जिवंत आहे. तो चिरडला गेलेला नाही.’ काही लेखक, पत्रकार, कलावंत व चित्रपटकर्ते ‘पक्ष अजेय नसल्या’चं दाखवून देत असतात. 

जिआंग क्षूए

या पुस्तकातील व्यक्तींविषयी वाचताना त्यांचं नैतिक व शारीरिक धाडस पाहून, आणि त्यांची वैचारिक स्पष्टता पाहून मी थक्क झालो. जिआंग क्षूए ही लेखिका कम्युनिस्ट चीनमधील इतिहासाच्या व्यवहाराबद्दल म्हणते, ‘माओ. आम्ही इतिहासाचं पुनर्लेखन करायला हवं असं तो म्हणाला. पण इतिहास घडला आहे. कादंबरी असेल तर तिचं तुम्ही पुनर्लेखन करू शकता. पण इतिहास असेल तर त्याचं पुनर्लेखन कसं करता येईल? सद्सद्विवेक जागा असलेली कोणतीही व्यक्ती पुनर्लिखित इतिहास नाकारेल.’ 

एक पत्रकार झांग शिहे म्हणतो की, तो वागतो तसंच लिहितो- ‘मी काहीतरी बघितल्यावर खरोखर संतापलो तर मला त्याबद्दल बोलावंच लागतं, असा माझा स्वभाव आहे.’ अकादमिक अभ्यासक चेन होंग्यूओ उपहासाच्या सुरात विचारतो, ‘आपल्या काळाचं राजकारण म्हणजे “आंधळ्यांना दिशा दाखवणारे वेडे” अशा स्वरूपाचं आहे का?’

आणि अखेरीस पुन्हा जिआंक क्षूएचं एक विधान नोंदवतो. क्षूएचं काम निरर्थक व अप्रस्तुत आहे, आणि कम्युनिस्ट चीनसारख्या तीव्र नियंत्रण असणाऱ्या हुकूमशाहीत त्या कामाचा काहीही परिणाम होणार नाही, असं तिच्या एका मित्राने तिला सांगितलं. यावर ती म्हणाली, ‘मला हे पटत नाही. आपण प्रयत्न करतो का, याला अर्थ असतो. मला एका असामान्य समाजामध्ये सामान्य व्यक्ती म्हणून जगायचं आहे. मला खरं काय असेल ते सांगता यायला हवं आणि माझ्या मनातलं व्यक्त करता यायला हवं, असं वाटतं.’

(अनुवाद - प्रभाकर पानवलकर)

- रामचंद्र गुहा, बंगळूरू
ramachandraguha@yahoo.in
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: ian johnson ramchandra guha sparks history china history communism historians Load More Tags

Add Comment