युट्युबमुळे मला गवसलेला खजिना... 

मी या संगीतप्रेमींच्या ऋणात राहणंच पसंत करेन...

संगीताकडे मी ‘अपघातानं’ वळलो. काही वर्षांपूर्वी माझा एक मोठा अपघात झाला होता. त्यात पायाच्या घोट्याला जखम झाली होती आणि खांदाही निखळला होता. त्यामुळे काही आठवडे बिछान्याला खिळलो होतो. त्या काळात मला पुस्तकं वाचता येत नव्हती. मग मी लॅपटॉप उघडून आलेले इमेल्स पाहायचो, वाचायचो. (आवश्यक त्या इमेल्सना एका हातानं टाईप करत थोडक्यात उत्तरंही द्यायचो.) 

2012च्या उन्हाळ्यात हा अपघात झाला. त्याआधी काही वर्षांपासून माझ्याकडे संगीताचा एक अमूल्य ठेवा होता. या काळात मला या खजिन्याचा खूप उपयोग झाला. मल्याळम लेखक आणि संगीतातले उत्तम जाणकार एस. गोपालकृष्णन यांच्या संगीताचा हा खजिना... आठवड्यातून दोनतीनदा गोपाल त्यांच्या काही संगीतरचना आम्हा काही जणांना इमेलद्वारे ऐकण्यासाठी पाठवायचे. अगदी पहाटे-पहाटेच हे संगीत ऐकण्याचं आवतन येत असे आणि मग दिवसभर कधीही आम्ही ते ऐकू शकत असू.

अपघातापूर्वीच्या दिनक्रमात माझी सकाळ नेहमीच धावपळीची, दगदगीची असे. त्यामुळे मी गोपाळचं संगीत तेव्हा क्वचित कधीतरी ऐकत असे. कधी कधी तर अशा खूपशा रचना त्या-त्या वेळी न ऐकल्यानं साठून राहत असत. मग कधी तरी मी ते एकदाच सगळं ऐकायचो. या सगळ्या संगीतरचना माझ्या कॉम्प्युटरवर नेहमीच हाताशी असायच्या, विशेषतः मी संशोधनासाठी काढलेली टिपणं टाईप करत असताना बॅकग्राउंडला हे शास्त्रीय संगीत शांतपणे चालू असायचं.

पायाला प्लॅस्टर, खांद्याला पट्ट्या लावलेल्या... अशा परिस्थितीत मी सकाळी उठायचो तेव्हा खिन्न, उदास वाटायचं... दिवसभर हा असाच मूड असायचा. माझ्यासमोर अख्खा दिवस पडलेला असायचा. दिवसभर काय करायचं हा प्रश्नच होता. पूर्वी मी कबन पार्कमध्ये नेहमी चालायला जायचो. त्यामुळे खूप उल्हसित वाटायचं. पण आता ही शक्यताही नव्हती. याआधी काम करताना एका बाजूला स्क्रीनवर संगीत वाजत असायचं. गोपाळनं सुचवलेलल्या सगळ्या संगीतरचना मी एकेक करून ऐकायचो आणि आता मी दुखावलेल्या पायासह, पट्ट्या लावलेल्या खांद्यासह बिछान्यात पडून होतो, उदासवाणा! मग यूट्यूबवर काही ऐकायला लागलो तर त्याच्या अल्गोरिदमनं मला सगळ्या त्याच संगीतरचना सुचवल्या. यूट्यूबच्या या शिफारसी आणि ते संगीत ऐकत मी थोडा वेळ माझं दुखणं विसरलो.  

...तेव्हा यूट्यूबवर सलगपणे काही मी ऐकलं असेन तर ते एस. गोपाळकृष्णन यांच्या रचना. त्या दिवशी तर गोपाळनं ‘कृष्ण नी बेगानी बारो’ या रचनेची लिंक पाठवली होती. कर्नाटकी संगीतात मोठं नाव असणाऱ्या एम.एल. वसंतकुमारी यांनी ते गायलं होतं. हे माझं विशेष आवडतं गाणं आहे. ते ऐकल्यानंतर मी सुप्रसिद्ध गायक बॉम्बे जयश्री यांच्या आवाजातलं हेच गाणं ऐकलं.

हे गाणं ऐकून मला कधीतरी वाचनात आलेला एक प्रसंग आठवला. मूळ अमेरिकन असलेल्या पण कर्नाटकी संगीतात प्रावीण्य मिळवलेल्या जॉन हिगीन्सनं एकदा उडपी शहराला भेट द्यायचं ठरवलं होतं. त्या वेळी हिगीन्सला त्याच्या रंगावरून उडपीतल्या एका कृष्णमंदिरात प्रवेश नाकारला गेला. तेव्हा तो रस्त्यात उभा राहूनच ‘कृष्ण नी बेगानी बारो’ हे गाणं गायला लागला. त्याचं हे गाणं म्हणजे मंदिरातल्या पुरोहितांच्या कृतीचा निषेधच होता. हिगीन्स या गाण्याचा प्राचीन इतिहास आणि त्याबाबतच्या लोकभावना सांगतो. सोळाव्या शतकात कनकदास नावाच्या एका कवीला त्याच्या जातीमुळे मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. तेव्हाही या कृष्णभक्तानं (कनकदासानं) रस्त्यात उभं राहून हे गाणं गायला सुरुवात केली होती. ते ऐकून पुरोहित चांगलेच वरमले होते. हे चित्र पाहून भगवान कृष्ण स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी मंदिरात जायला मज्जाव करणारी ती भिंतच तोडून टाकली आणि आपल्या सच्च्या भक्ताला दर्शन दिलं, अशी आख्यायिका आहे.  

ही आख्यायिका आठवल्यानं मी यूट्यूबवर पुन्हा हिगीन्सनं गायलेलं ‘कृष्ण नी बेगानी बारो’ हे गाणं शोधलं. त्यापाठोपाठ ख्रिस्ती घराण्यात जन्मलेले के.जे. येसूदास यांचंही गाणं शोधलं. अशा प्रकारे रोज सकाळी मी संगीत ऐकून माझा वेळ घालवायला लागलो. त्यामुळे काही वेळ फ्रॅक्चरच्या वेदना विसरायला मदत व्हायची.

यूट्यूबचा शोध मला लागण्याआधी मी ध्वनिमुद्रिकांमार्फत संगीत ऐकायचो. वर्षानुवर्षं जमा केलेल्या सीडीज्‌, कॅसेट्सचा खूप मोठा संग्रह माझ्याकडे आहे. मोठ्या प्रवासात दोन आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सच्या दरम्यान प्रतीक्षा करण्याच्या काळातही संगीत ऐकण्यासाठी यातलं काही मी हाताशी ठेवत असे. वाद्यसंगीत ऐकण्यासाठी मी अली अकबर खान, निखिल बॅनर्जी, रवी शंकर, विलायत खान, एन. राजम, बिस्मिल्ला खान आणि शास्त्रीय संगीत (गीतं) ऐकावंसं वाटलं, तर भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मंसूर, मालिनी राजुरकर, किशोरी आमोणकर, बसवराज राजगुरू ऐकत असे. अपघातानंतर माझ्यासाठी जणू नवं जगच खुलं झालं. त्यामुळे माझा हा खासगी संगीत-संग्रह लोकांसाठीही खुला करावा असं मला वाटतंय.

नेमकेपणानं सांगायचं झालं तर 2018च्या जानेवारी महिन्यातल्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात संगीत ऐकायला लागलो. थोर सरोदवादक बुद्धदेव दासगुप्ता यांच्या मृत्यूनंतर मी युट्यूबवर संगीत ऐकायला सुरुवात केली. तेव्हापासून युट्यूबवर गाणी ऐकणं मला खूप आवडायला लागलं. 1980मध्ये मी कलकत्त्याला शिकायला होतो तेव्हा दासगुप्तांचे अनेक कार्यक्रम मी प्रत्यक्ष जाऊन ऐकले आहेत. दासगुप्ता इंजिनिअर म्हणून पूर्ण वेळ काम करत असल्यानं त्यांना कलकत्त्याबाहेर फारसे कार्यक्रम करणं शक्य झालं नाही. त्या मानानं अली अकबर खान, अमजद अली खान या त्यांच्या समकालीन संगीत कलाकारांनी देशभरात खूप कार्यक्रम केले. बुद्धदेव दासगुप्तांच्या काही आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. 2010मध्ये एकदा ते बंगळुरूत कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन गेलो होतो. एव्हाना त्यांचं बरंच वय झालं होतं. त्यांच्याकडे पाहूनही ते जाणवत होतं. कार्यक्रमाची सुरुवात करतानाच ते म्हणाले, ‘मी काही आता पूर्वीचा बुद्धदेव दासगुप्ता राहिलेलो नाही पण बंगळुरूवरून कार्यक्रमाचं आमंत्रण आलं, म्हणून मी स्वतःला रोखू शकलो नाही.’  

आपला पंचाऐंशीवा वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच 15 जानेवारी 2018 रोजी दासगुप्तांचं निधन झालं. ते गेल्याची बातमी कळल्यानंतर मी आयपॉडमधली त्यांनी केलेली गोरख कल्याण आणि जयजयवंती यांची रेकॉर्डिंग्ज ऐकायला लागलो. मग जरा कॅसेट्सची शोधाशोध केली. 1980च्या राष्ट्रीय कार्यक्रमाची एक कॅसेट त्यात सापडली, दासगुप्तांनी वाजवलेला केदार राग त्यातून ऐकला... निवळ जादूई! यूट्यूबआधी मी माझ्याकडच्या कॅसेट्स किती तरी वेळा पुन्हापुन्हा ऐकल्या आहेत. त्यात काही खासगी कार्यक्रमांच्या दुर्मीळ रेकॉर्डिंग्जही आहेत. दासगुप्ता गेले त्या आठवड्यात त्यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्या आणखी काही संगीतरचना यूट्यूबवर उपलब्ध करून दिल्या. ‘छाया बिहाग’ हा त्यातला एक अतिशय सुरेख राग... त्यावर तासाभरापेक्षाही अधिक वेळ त्यांनी सरोदवादन केलं, ही रचना मी पुन्हापुन्हा ऐकली, अत्युच्च आनंदाचा अनुभवच तो!    

‘कृष्ण नी बेगानी बारो’ हे माझं यूट्यूबवर ऐकलेलं, वारंवार ऐकलेलं पहिलं गाणं. दुसरं बुद्धदेव दासगुप्ता यांचं. करोना महामारीचा उद्रेक सुरू झाला, तेव्हापासून मी यूट्यूबवर बरंच काही ऐकलं. तासन्‌तास मी यूट्यूबवर काहीतरी ऐकत असतो. कधीकधी क्रिकेटबद्दल ऐकतो. मी अलीकडेच ऐकलेला शेन वॉर्न आणि मायकल अर्थटन या दोघांमधला संवाद ऐकण्याची शिफारस करेन, तुम्ही तो जरूर ऐका. याशिवाय साहित्यिक, वैचारिक आशयही मी ऐकत असतो. सी.एल.आर. जेम्स आणि स्टुअर्ट हॉल यांचा संवादही आवर्जून ऐकण्यासारखा आहे. असं बरंच काही मी ऐकत असलो, तरी प्रामुख्यानं संगीतच जास्त ऐकतो आणि संगीत ऐकतानाही मला फक्त माझ्या काळातल्या संगीतकारांबदद्ल, गायकांबद्दलच प्रेम वाटतं असं नाही. ‘अमुक कलाकार आमच्या पिढीचा... म्हणून तो महान...’ हे ओलांडून मी पुढे गेलो आहे. वेकंटेश कुमार, कलापिनी कोमकली, अश्विनी भिडे-देशपांडे, प्रिया पुरुषोत्तम या समकालीन गायकांच्या रचनाही मी आवडीनं आणि आवर्जून ऐकतो.

हल्लीच, मला यूट्यूबवर आणखी एक खजिना गवसला. किराणा घराण्याच्या महान गायिका रोशन आरा बेगम यांची काही गाणी. बेगम या उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या शिष्या. फाळणीनंतर त्या लाहोरला आल्या. 1982मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या गात होत्या. 2009मध्ये मी लाहोरला गेलो होतो, तेव्हा अनारकली बाजारात रोशन आरा बेगम यांच्या गाण्यांच्या काही कॅसेट्स शोधत होतो. त्यांतली शंकरावरची एक संगीतरचना मला खूपच भावली. अगणित वेळा मी ती ऐकली असेल. आता मागच्या आठवड्यातच मला दिल्लीत झालेल्या एका संगीतकार्यक्रमाची रेकॉर्डिंग सापडली. साधारण 1950मधल्या कार्यक्रमाची ही रेकॉर्डिंग आहे. त्यातलं मुख्य आकर्षण म्हणजे त्यात आळवलेला ‘नुरानी’ हा दुर्मीळ राग आणि त्या कार्यक्रमाची खासियत म्हणजे ‘हा आहे ऑल इंडिया रेडिओ आणि आजच्या राष्ट्रीय संगीत कार्यक्रमात तुम्ही ऐकणार आहात, पाकिस्तानच्या रोशन आरा बेगम यांची रागदारी...’ अशी साद घालणारा सूरजित सेन यांचा आवाज… अहाहा!      

मागच्या काही वर्षांत मी यूट्यूबवर खूप संगीत ऐकलं, ऐकतो आहे. अनेक जण त्यांच्या संग्रहातील खास गाणी, रेकॉर्डिंग्ज अगदी निःस्वार्थ हेतूनं, इतरांकरता उपलब्ध करून देतात. त्यांचे आभार मानायला हवेत. या प्रत्येकाचे अगदी नाव घेऊन आभार मानावेत असंही मला वाटतं पण संगीत व्यवसायातल्या काही संकुचित विचारांच्या मक्तेदारांकडून, वकिलांकडून कायदेशीर कचाट्यात अडकवून या व्यक्तींना छळलं जाऊ नये असं मला वाटतं. माझ्यासारखे अनेक जण आपली सांगीतिक भूक भागवण्यासाठी यूट्यूबवर जातात, त्यांना संगीत क्षेत्रातल्या रथी-महारथींवर प्रेम असणं म्हणजे काय हे नेमकं कळू शकेल. यूट्यूबवर असा विविध प्रकारचा सांगीतिक खजिना खुला करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मी या संगीतप्रेमींच्या ऋणात राहणंच पसंत करेन. तिरस्कार, मत्सर, हेवा, बदल्याची भावना, दुरभिमान, पूर्वग्रह यांनीच भोवताल बजबजलेला असताना काही लोक महत्त्वाचा सांगीतिक ठेवा सगळ्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठांवर उपलब्ध करून देत आहेत... हे मानवजातीचे खरे हिरो...!

(अनुवाद : प्रियांका तुपे)

- रामचंद्र गुहा, बेंगळूरू

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: अनुवाद रामचंद्र गुहा संगीत युट्यूब Load More Tags

Comments:

सूर्यकांत वैद्य

या.रामचंद्र गुहा जी, तुमच्या लिखाणाचा मी चाहता आहे, आपल्या संगीत प्रेमाने तुमच्या प्रेमातच पडलो !

दीपक पाटील

शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन ऐकून त्यावर लिहिलेला लेख वाचण्यास मिळणे या दोन्ही गोष्टी आलभ्य लाभाच्या आहेत. त्यातही राजकीय व सामाजिक विषय हाताळणारे 'गुहा' असतील तर आनंद वेगळाच ! खूप छान लेखन...सोबतच्या लिंक्समूळे दूधात साखर !

प्रकाश हाटे

जुने ते सोने महणतात ते काही खोटे नाही.जुन्या गायक/गायिकेचया रचना पुन्हा पुन्हा ऐकावाशा वाटतात.पूर्वीचे गीतकार पृगलभ होते.छान छान कविता/गाणी लिहायचे.पूर्वीचे संगीतकार देखील सहज सोप्या चाली लावून रसिकांच्या काळजात ऊतरवायचे.आता चागली गाणी लिहिणारे गीतकार राहिले नाहीत अशी खंत लता मंगेशकर यांनीही वयकत केली आहे

Add Comment