या दिवशी, आणि वर्षातील इतरही दिवसांमध्ये आपण गांधींचे शब्द व त्यांनी दिलेले इशारे आठवायला हवेत. राजकीय वाद सोडवण्यासाठी अहिंसेचा पाठपुरावा केल्याबद्दल, आंतरधर्मीय सलोख्याशी निष्ठा राखल्याबद्दल आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा लढा दिल्याबद्दल गांधी अधिक ओळखले जातात, पण आज आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या पर्यावरणीय संकटावर मात करण्याची इच्छा आपल्याला असेल तर त्याबाबतसुद्धा गांधींचा वारसा तितकाच ठामपणे प्रस्तुत ठरतो.
सुमारे तीस वर्षांपूर्वी ‘इंडस्ट्रीयलाइज- अँड पेरिष’ (औद्योगिकीकरण करा- आणि नष्ट व्हा) या शीर्षकाखाली प्रकाशित झालेलं गांधींच्या लेखनाचं एक संकलन वाचत असताना मला पुढील लक्षवेधी टिप्पणी दिसली. मुळात ‘यंग इंडिया’च्या 20 डिसेंबर 1928 रोजीच्या अंकात प्रकाशित झालेली गांधींची ही विधानं अशी होती: ‘ईश्वर करो आणि भारत कधीही पाश्चात्त्य धाटणीच्या औद्योगिकीकरणाच्या मागे न लागो. एका बारक्याशा बेटरूपी साम्राज्याच्या (इंग्लंड) आर्थिक साम्राज्यवादाने आज जगाला साखळदंडांमध्ये जखडून टाकले आहे. तीस कोटी लोकसंख्या असलेल्या एखाद्या राष्ट्राने (भारत) अशाच प्रकारचे आर्थिक शोषण करायला सुरुवात केली, तर टोळधाड शेताचा नाश करते त्याप्रमाणे जगाचा विध्वंस होईल.’
पर्यावरणीय दृष्टीने, संसाधनकेंद्री, ऊर्जाकेंद्री औद्योगिक विकासाच्या अतिरेकाविरोधातील इशारा म्हणून या विधानाचा अर्थ लावण्याचा मोह होतो. आर्थिक शोषणाच्या या (पाश्चात्त्य प्रेरणा असणाऱ्या) पद्धती स्वीकारून आज भारत व चीन खरोखरच शेतावर आलेल्या टोळधाडीप्रमाणे जगाचा नाश करतील असा धोका उभा आहे.
मानवी लालसेचा टीकाकार; गावकेंद्री (त्यामुळे कमी हावरट) अर्थव्यवस्थेचा कैवारी; हानिकारक किंवा विध्वंसक सरकारी धोरणांविरोधातील अहिंसक निदर्शनांचा अग्रणी म्हणून गांधी हे पर्यावरणवादी चळवळींचे एक पूर्वज असल्याचे पूर्वीपासून मानले जात आले आहे. चिपको आंदोलन व नर्मदा बचाव आंदोलन यांसारख्या भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यावरणवादी उपक्रमांचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती स्वतःचे विचार व कृती गांधींच्या पाऊलखुणांवरून जाणाऱ्या असल्याचे जाहीर करत आल्या आहेत. दिवंगत अर्थशास्त्रज्ञ ई. एफ. शुमाकर (‘स्मॉल इज ब्युटीफुल’ या पुस्तकाचे लेखक) यांच्यासारख्या पाश्चात्त्य पर्यावरणवाद्यांनी आणि जर्मनीतील 'ग्रीन पार्टी'सारख्या प्रभावशाली पक्षाच्या विचारकांनीही गांधींचा अनुकरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून उल्लेख केला आहे.
आपल्या सध्याच्या चिंतांचा पूर्वअंदाज बांधणाऱ्या गांधीविचारातील काही पैलूंबद्दल बोलून या स्तंभात मी भविष्यवेधी ‘हरित गांधीं’ची बाजू आणखी बळकट करू पाहणार आहे. विशेषतः झाडं व झाडांनी पुरवलेलं आच्छादन याबद्दल गांधींनी केलेल्या काही तुलनेने अज्ञात विधानांवर मी लक्ष केंद्रित करणार आहे.
नोव्हेंबर 1925मध्ये गांधी पश्चिम भारतातील कच्छच्या वाळवंटात गेले. या भागात तुटपुंजा पाऊस पडतो आणि सतत वाहत्या नदीचा अभाव असल्यामुळे इथे झाडांचीही वानवा आहे. जयकृष्ण इंद्राजी या सामाजिक कार्यकर्त्याकडे गांधी उतरले होते. इंद्राजी ‘गुजरातचे रत्न’ असल्याचं गांधी म्हणाले होते आणि इंटरनेटवर एका ठिकाणी इंद्राजींचं वर्णन ‘एथ्नोबॉटनिस्ट’ असं करण्यात आलं आहे. गांधींच्या वीस वर्षं आधी, 1849 मध्ये जन्मलेले जयकृष्ण स्वप्रशिक्षित वनस्पतिततज्ञ होते. नंतरच्या काळात त्यांनी पोरबंदर संस्थानासोबत काम केलं (एकेकाळी गांधींच्या पूर्वजांनीही या संस्थानिकांची नोकरी केली होती). वनस्पती व झाडं यांमध्ये भारतीय फारसा रस घेत नसल्याबद्दल निराशेचा सूर लावत जयकृष्ण म्हणाले: ‘युरोपीय लोकांना त्यांच्या देशांमधील वनस्पतींविषयी माहीत असतं, त्याविषयी ते लिहितात, आणि माझ्या देशवासियांना त्यांच्या अंगणातल्या वनस्पतींविषयी, त्यांच्या पायांखाली चिरडल्या जाणाऱ्या वनस्पतींविषयीही माहीत नसतं.’ या निष्काळजीपणाशी झगडण्यासाठी जयकृष्ण यांनी पोरबंदरमधील बर्डा टेकड्यांवरील वनस्पतींचा एक पथदर्शी अभ्यास करून लेखन केलं. कच्छच्या महाराजांचं या अभ्यासाकडे लक्ष गेलं आणि त्यांनी जयकृष्ण यांना स्वतःच्या प्रांतात निमंत्रित केलं; तिथे ‘एथ्नोबॉटनिस्ट’ जयकृष्ण यांनी वाळवंटातील वनीकरणाला चालना दिली, तसंच त्या संस्थानातील वनस्पतींविषयी संशोधन करून त्यावर एक पुस्तक लिहिलं.
जयकृष्ण यांना भेटल्यावर गांधींनी लिहिलं होतं की, ‘जयकृष्ण इंद्राजी यांना बर्डामधील प्रत्येक झाड आणि प्रत्येक पान माहीत आहे. वृक्षारोपणावर त्यांची इतकी मोठी श्रद्धा आहे की, ते याला सर्वांत महत्त्वाचं स्थान देतात. या माध्यमातून बरंच काही साध्य करता येईल, असा विश्वास त्यांना वाटतो. याबाबतीत त्यांचा उत्साह व त्यांची श्रद्धा यांची इतरांना लागण होतेच होते. मलाही खूप पूर्वी याची लागण झाली. कच्छच्या राज्यकर्त्यांनी व प्रजेनेही इच्छा झाल्यास, त्यांच्यात राहणाऱ्या या विद्वान माणसाचा पुरेपूर लाभ करून घ्यावा आणि एक सुंदर वन उभारावं.’
जयकृष्ण यांनी गांधींना ‘एका सुंदर मोकळ्या जागे’त झाड लावायला सांगितलं. ‘कच्छमध्ये मी केलेलं हे सर्वांत सुखद कार्य’ होतं असं गांधींनी नमूद केलं आहे. त्याच दिवशी वृक्षसंरक्षणासाठी एका संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेला ‘यश लाभो’ अशी आशा गांधींनी व्यक्त केली.
जयकृष्ण इंद्राजी
कच्छमध्ये वनस्पतितज्ञ जयकृष्ण यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गांधींना दक्षिण आफ्रिकेतील एकेकाळच्या रखरखीत व उजाड शहरात झालेलं परिवर्तन आठवलं. या ठिकाणी गांधींनी वकिली केली होती आणि कार्यकर्ता म्हणून त्यांची आरंभीची जडणघडणही तिथे झाली. तर, गांधी लिहितात: ‘जोहान्सबर्गचा प्रदेशही असाच होता. तिथे एकेकाळी केवळ खुरटं गवत उगवत असे. तिथे एकही इमारत नव्हती. चाळीस वर्षांमध्ये हे ठिकाण एक सुवर्णशहर झालं आहे. एकेकाळी बादलीभर पाण्यासाठी लोकांना बारा आणे मोजावे लागत असत आणि काही वेळा सोडा-वॉटरवर काम भागवावं लागत असे. काही वेळा अशा पाण्याने त्यांना स्वतःचा चेहरा व हात धुवावे लागत! आज तिथे पाणी आहे आणि झाडंही आहेत. सुरुवातीपासूनच सोने खाणींच्या मालकांनी या प्रदेशाला तुलनेने हरितपट्टा म्हणून रूपांतरित केलं आणि उत्साहाने दूरदूरच्या प्रदेशांमधून रोपटी आणून इथे लावली, त्यातून पावसाचं प्रमाण वाढलं. वृक्षतोडीमुळे पावसाचं प्रमाण कमी झाल्याचे आणि वृक्षारोपणामुळे हे प्रमाण वाढल्याचे इतर ठिकाणचे दाखलेही आहेत.’
काही वर्षांनी साबरमती आश्रमात असताना गांधींना झोपण्यापूर्वी कापूस पिंजून त्याची दोरी करायची होती. दोरीवर घासण्याकरता बाभळीच्या झाडाची काही पानं बागेतून आणावीत, असं गांधींच्या पट्टशिष्या मीरा यांनी आश्रमातील एका तरुणाला सांगितलं. त्या मुलाने एक खूप मोठा पानांचा घड आणला, त्यातील प्रत्येक पानाची घट्ट घडी घातलेली होती. अशा स्थितीत पानं पाहून ‘ही सर्व लहान पानं झोपी गेली होती’ असं गांधी उद्गारल्याचं मीरा यांनी नोंदवलं आहे. ‘त्यांच्या डोळ्यांत संतापाची व करुणेची भावना दिसत होती... झाडं आपल्यासारखीच सजीव असतात. ती जगतात व श्वासोच्छवास करतात, आपल्यासारखीच ती खातात व पितात, आणि आपल्यासारखीच त्यांनाही झोप गरजेची असते. रात्रीच्या वेळी झाड विश्रांती घेत असताना अशी त्याची पानं तोडणं हीनपणाचं आहे’, असं गांधी म्हणाले. मीरा यांच्या कथनानुसार, इतका पानांचा गठ्ठा घेऊन आलेल्या मुलावर गांधी नाराज झाले. तत्पूर्वी एका जाहीर सभेत ‘नाजूक कळ्यांचा’ प्रचंड हार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं, तेव्हासुद्धा ते नाराज झाले होते.
गुजराती व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात गांधींनी ही कहाणी मीरा यांच्या शब्दांत सांगितली आहे आणि मग स्वतःची एक विस्तृत टिप्पणी जोडली आहे, ती अशी: ‘वाचकांनी याकडे भावूक बाष्कळपणा म्हणून पाहू नये.. गाडीत भरून येणाऱ्या भाज्या आम्ही खातो तेव्हा एखादा उंटच गिळंकृत करत असतो, पण रात्री विश्रांती घेणाऱ्या झाडाचं एक पान तोडल्यावर इतक्या क्षुल्लक बाबीचा मात्र आम्ही ताण घेतो, या वागण्यात विसंगती आहे असा आरोप माझ्यावर किंवा मीराबाईंवर होऊ नये. एखादा खाटिकसुद्धा काहीएका प्रमाणात मानवीय असेल. माणूस मटण खात असला तरी मेंढरांचा कळप झोपेत असताना त्यांची कत्तल करत नाही. प्राणी असो वा वनस्पती, सर्व जीवसृष्टीविषयी आत्यंतिक आस्था बाळगणे, हे (मानवतेचं) सार आहे. सुखाच्या शोधात असताना इतरांची काहीच फिकीर न करणारा निश्चितपणे माणूसपणाच्या पातळीवर गेलेला नसतो. तो अविचारी असतो!’
तर, संसाधनांच्या उपभोगामध्ये संयम बाळगण्याची बाजू मांडून झाल्यावर गांधींनी भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांना मिळालेल्या स्थानाची प्रशंसा केली. ते लिहितात: ‘भारताने वृक्षांबद्दल व इतर संज्ञाशील जीवांविषयी अतिशय जिव्हाळ्याची भावना जोपासली आहे. दमयंती शोक व्यक्त करत वनामध्ये या झाडाजवळून त्या झाडाजवळ जात असल्याचं वर्णन कवी करतो. शकुंतलेने झाडांसोबतच पक्ष्यांना व प्राण्यांना स्वतःचे सोबती मानलं होतं. त्यांच्यापासून झालेली फारकत तिला किती वेदनादायी वाटली, हे महाकवी कालिदासाने आपल्याला सांगितलं आहे.’
‘द गार्डियन’मध्ये गेल्या वर्षी आलेल्या एका लेखानुसार, ‘कार्बन वेगळा करण्याच्या नैसर्गिक क्षमतेमुळे- वातावरणातून कार्बन काढून तो लाकडात बंद करण्याच्या क्षमतेमुळे- झाडं हवामानविषयक आणीबाणी हाताळण्यातील एक साधा व सोपा मार्ग ठरत आहेत’ हे आता आपल्याला माहीत झालं आहे. मानवी कृतीमुळे उद्भवलेल्या जागतिक उष्णतावाढीचा व हवामानबदलाचा दाखला मिळण्याच्या कित्येक दशकं आधी गांधी याबद्दल बोलत व लिहीत होते. दुसऱ्या- पण तितक्याच महत्त्वाच्या कारणांसाठीही त्यांनी वृक्षारोपण करण्याचा कैवार घेतला: झाडं सावली व निवारा पुरवायला मदत करतात, माती व जलसाठे स्थिर व्हायला सहाय्य करतात, आणि मानवेतर सृष्टीविषयीच्या मानवी आस्थेचं दर्शन घडवतात, अशी कारणं त्यांनी नोंदवली होती. हवामानविषयक आणीबाणीमुळे गांधींची ही विधानं अधिक मर्मग्राही ठरतात.
पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे, त्याच्या आसपास हा लेख प्रकाशित होतो आहे. या दिवशी, आणि वर्षातील इतरही दिवसांमध्ये आपण गांधींचे शब्द व त्यांनी दिलेले इशारे आठवायला हवेत. राजकीय वाद सोडवण्यासाठी अहिंसेचा पाठपुरावा केल्याबद्दल, आंतरधर्मीय सलोख्याशी निष्ठा राखल्याबद्दल आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा लढा दिल्याबद्दल गांधी अधिक ओळखले जातात, पण आज आपल्या समोर उभ्या ठाकलेल्या पर्यावरणीय संकटावर मात करण्याची इच्छा आपल्याला असेल तर त्याबाबतसुद्धा गांधींचा वारसा तितकाच ठामपणे प्रस्तुत ठरतो.
अनुवाद - प्रभाकर पानवलकर
- रामचंद्र गुहा, बंगळूरू
ramachandraguha@yahoo.in
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)
Tags: Gandhi Environment Ecology Jaykrishna Indraji World Environment Day Load More Tags
Add Comment