‘मूडीज’, ‘स्टँडर्ड अँड पुअर’, ‘फीच’ इत्यादींसारख्या आघाडीच्या वित्तसंस्थांमार्फत एखाद्या देशाला दिल्या जाणाऱ्या गुंतवणूकविषयक पतमानांकनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व असते. या मानांकनाच्या दर्जानुसार त्या देशातील कोणकोणत्या क्षेत्रांत व किती प्रमाणात विदेशी चलन आणि प्रकल्पांच्या माध्यमातून गुंतवणूक करायची याबाबतची धोरणे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून राबविली जात असतात.
त्यापैकी ‘मूडीज’ या अमेरिकेतील प्रतिष्ठित पतमानांकन संस्थेने गेल्या आठवड्यात भारताचे सार्वभौम मुल्यांकन Baa3 पर्यंत खाली आणले. (गुंतवणुकीसाठीच्या) मानांकनाचा हा सर्वांत खालचा दर्जा आहे. मानांकनामध्ये भारताला याधीच सर्वांत खालच्या पायरीवर उभे करणाऱ्या ‘स्टँडर्ड अँड पुअर’ आणि ‘फीच’ या मुल्यांकन संस्थांच्या रांगेत आता मूडीज देखील येऊन बसले आहे.
या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देताना ‘मूडीज’ने सांगितले, ‘(भारताच्या पतमानांकनात घट करण्याचा) हा निर्णय कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असला तरी तो कोरोनाच्या दुष्परिणामांमुळे घेण्यात आलेला नाही. किंबहुना, या महामारीने भारताच्या पत रूपरेषेमध्ये (क्रेडीट प्रोफाईलमध्ये) असलेली अस्थिरता आणखी वाढवली आहे. महामारीचा धक्का बसण्यापूर्वीपासूनच ही अस्थिरता वाढतच होती. आणि याच कारणाने गेल्या वर्षाबाबत नकारात्मक चित्र उभे राहिले.
लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ही नकारात्मक बातमी नेमकी तेव्हा आली जेव्हा सत्ताधारी पक्ष नेमका नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाचा सहावा वर्धापनदिन साजरा करत होते. दरम्यान, दिल्लीमधील दोन वरिष्ठ स्तंभ लेखकांनी मोदींच्या कार्यकाळातील वस्तुस्थितीची जाणीव करून देणारी चिकित्सा केली. मोदी एक आर्थिक सुधारक ठरतील अशी आशा एकेकाळी दोघांनाही वाटली होती आणि मोदी बरोबर त्याच्या उलट निघाल्यामुळे दोघांचाही भ्रमनिरास झालेला आहे. इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रात लिहिणाऱ्या तवलीन सिंग यांना वाटते की हे अपयश म्हणजे बऱ्याच अंशी अरुण जेटलींच्या अकाली मृत्यूचा परिणाम आहे. त्यामुळे घडले असे की, (किंवा त्या असे प्रतिपादन करतात) ‘अचानक सरकारचे प्राधान्यक्रम आणि प्रतिमा बदलली’
‘द प्रिंट’मध्ये लिहिताना शेखर गुप्तांनी मोदींना सल्ला देणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांना यासाठी कारणीभूत ठरवत त्यांच्यावर दोषारोप केलेला आहे. त्यांच्या मते, हे अधिकारी सावध भूमिका घेणारे आणि जोखीम न पत्करणारे आहेत. आणि ते नरसिंह राव आणि अटल बिहारी वाजपेयी अशा पूर्वीच्या पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या धडाडीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसारखे नाहीत.
माझे स्वतःचे विश्लेषण मात्र याहून खूप निराळे आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचे काम निराशाजनक झाले याला ना त्यांचे वाईट सल्लागार जबाबदार आहेत ना चांगल्या सल्लागारांचे अकाली निधन. उलट त्यांच्या स्वतःच्या चुका आणि दोष त्यासाठी कारणीभूत आहेत. दोन वेळा संपूर्ण बहुमत मिळवूनदेखील नरेंद्र मोदी देशाच्या आर्थिक आघाडीवर त्यांच्या समर्थकांना अपेक्षित असणारी प्रगती करू शकले नाहीत. याचे कारण म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेषकरून तीन वैशिष्ट्ये सांगता येतील.
पहिले वैशिष्ट्य म्हणजे तज्ज्ञ आणि तज्ज्ञता या दोहोंबाबत त्यांनी बाळगलेला संशय. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या, प्रेरणेच्या आणि इच्छाशक्तीच्या बळावर उच्चस्थानावर पोचलेला स्वयंसिद्ध व्यक्ती असल्याने मोदींना उच्चभ्रू संस्थांमधून रीतसर शिक्षण घेणाऱ्यांविषयी संशय वाटतो. ते स्वतः 'हार्वर्ड'पेक्षा 'हार्डवर्क'ला प्राधान्य देत असल्याचे त्यांचे विधान याविषयीच्या त्यांच्या धारणेचे प्रमाण आहे. वस्तुतः पहिला दुसऱ्याला ( 'हार्वर्ड' 'हार्डवर्क'ला) अटकाव करत नाही; हार्वर्डमधून पीएचडी प्राप्त केल्यानंतर अभिजित बॅनर्जी यांनी निष्ठापूर्वक काम केले नसते तर ते कधीही अर्थशास्त्रासाठीचे नोबेल जिंकू शकले नसते. राज्यकारभार उत्तम चालावा यासाठी ऊर्जा केंद्रित करणे आणि विशेष ज्ञान असणे या दोहोंची आवश्यकता असते.
निश्चलनीकरणाचे संकट - ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक वर्षे मागे नेले - रोखता आले असते, जर मोदींनी रिझर्व्ह बँकेच्या (शिकागो-शिक्षित) गव्हर्नरचा व्यावसायिक सल्ला ऐकला असता. अलीकडचे उदाहरण म्हणजे COVID-19 च्या साथीचा प्रादुर्भाव फार कमी गंभीर होऊ शकला असता जर पंतप्रधानांनी त्यांची धोरणे स्वतःच्या नाट्यमय आणि थाटामाटाच्या कलानुसार ठरवण्यापेक्षा देशातील अग्रेसर साथविकारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन ठरवली असती.
दुसरे वैशिष्ट्य हे पहिल्याशीच संबंधित आहे, ते म्हणजे पंतप्रधानांनी स्वतःभोवती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा पंथ (personality cult) निर्माण केला. पंतप्रधानांसोबत काम केलेल्या एका तंत्रज्ञाने एकदा मला सांगितले होते की, सर्व सल्लेगारांना तिथे एकच शिरस्ता अनुभवावा लागतो तो म्हणजे 'निव्वळ तोंडपुजेपणा, शून्य प्रतिष्ठा'.
ज्या एका ओळीच्या बळावर पंतप्रधानांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली ती ' मोदी है तो मुमकिन है' ची घोषणा सर्व काही सांगून जाते. केवळ मोदी दहशतवादाला तोंड देतील, केवळ मोदी आणि मोदीच एकट्याने पाकिस्तानचा (आणि आता चीनचा) पाणउतारा करतील, मोदी स्वतः भ्रष्टाचार नष्ट करतील, मोदी नक्कीच भारताला विश्वगुरू बनवतील, या पद्धतीचा विचार सत्ताधारी पक्ष आणि केंद्र सरकारामध्ये बोकाळलेला आहे. परंतु भारतासारखे मोठे आणि गुंतागुंतीचे राष्ट्र केवळ एका व्यक्तीच्या इच्छेच्या बळावर योग्य तऱ्हेने आणि परिणामकारकरित्या चालवता येऊ शकत नाही, मग ती व्यक्ती कितीही दूरदृष्टीची असो किंवा 'हार्डवर्कर' असो.
पंतप्रधानांचा आत्मविश्वास आणि सामर्थ्य लक्षात घेऊनही त्यांचे वर्तन मात्र हेच दर्शवते की, ते स्वतः सतत असुरक्षित बाळगणारे आहेत. चांगले काम करणारे त्यांचे मंत्री असोत किंवा त्यांचे सल्लागार असोत, या मंडळींचे जाहीर कौतुक करण्याची मोदींची अनिच्छा हा याच असुरक्षिततेचा पुरावा आहे.
त्यांच्याभोवती आणि केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर गुजरात केडरच्या अधिकाऱ्यांची भाऊगर्दी हे सुद्धा त्याचेच द्योतक आहे. दुसरी खूण म्हणजे काही अद्वितीय आयएएस अधिकाऱ्यांना टाळण्याची त्यांची प्रवृत्ती. जी कदाचित एकेकाळी काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे, यामुळे आहे. अग्रस्थानी असणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांमध्येही एखाद्याच्या बौद्धिक दर्जापेक्षा नेत्याशी असणारी त्यांची निष्ठा मोदी सरकारसाठी अधिक मोलाची आहे.
पूर्वी 2013-14 मध्ये, जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदासाठीची मोहीम उघडली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीकडे न झुकलेल्या अनेक भारतीयांनीही त्यांना उत्साहाने पाठिंबा दिला होता. काँग्रेस सरकारच्या काळातील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला विटलेल्या भारतीयांनी मोदींकडे एक तत्पर आर्थिक सुधारणावादी म्हणून, उद्योजकीय गतिशीलतेचे पाश मुक्त करणारे भारतीय डेंग शाओपिंग म्हणून पाहिले. त्यांची ऊर्जा, त्यांचे स्वयंसिद्धत्व आणि त्यांचे वक्तृत्व यांनी सर्वांना प्रभावित केले. आणि मोदींनी त्यांचा रा. स्व. संघातील भूतकाळ मागे सोडलेला आहे हे त्यांचे प्रतिपादन सकृतदर्शनी लोकांनी ग्राह्य मानले.
नरेंद्र मोदींना संशयाचा फायदा देण्यामध्ये या सद्हेतू असणाऱ्या भारतीयांची चूक झाली. मोदी हे पंतप्रधान म्हणून इतके निराशादायी ठरण्याचे तिसरे कारण म्हणजे ते हृदयातून गुप्तपणे जमातवादी संघवाले राहिले आहेत. त्यांच्या जाहीर वक्तव्यांमध्ये ते उघडपणे जातीयवादी दिसणार नाहीत याची काळजी ते घेतात - जरी तिथेही ते घसरु शकतात. जसे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या निदर्शकांना 'ते त्यांच्या कपड्यांवरून ओळखतील' असे त्यांनी त्यांच्या कुख्यात प्रतिक्रियेमध्ये सांगितले होते. कुठल्याही बाबतीत त्यांचे या संदर्भाने मौन बाळगणेच अधिक बोलके असते.
त्यांचे खासदार आणि कॅबिनेट मंत्री निर्दोष मुस्लिमांच्या झुंडबळीतील आरोप्यांचे जाहीर समर्थन करत असताना त्यांचे शांत राहणे, त्यांचेच गृहमंत्री जेव्हा मुस्लिमांना 'वाळवी' म्हणून संबोधत होते, तेव्हा त्यांचे शांत राहणे, तबलिगी जमात प्रकरणाला जेव्हा बीजेपीचा आयटी सेल अविरतपणे जातीय रंग देत होता त्यावेळी त्यांचे शांत असणे, आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ढळढळीतपणे भेदभावकारक असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला त्यांचे असणारे समर्थन - हे सर्व एवढेच दाखवते की, त्यांची निष्ठा ही कडव्या हिंदुत्वाच्या विचारप्रणालीशीच आहे. या विचारप्रणालीनुसार भारत हे मूलतः हिंदू राष्ट्र आहे आणि त्यामुळे भारतीय मुस्लिमांनी मातृभूमीशी असणारी सदैव निष्ठा सिद्ध करत राहावे, अन्यथा त्यांना छळणुकीचा धोका संभवतो.
जेव्हा नरेंद्र मोदींच्या पक्षाची आणि त्यांच्या सरकारची ताकद मुस्लिमांना त्यांची जागा दाखवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ लागली, तेव्हा यात काहीच आश्चर्य वाटण्याजोगे नव्हते की, अर्थव्यवस्था COVID-19 च्याही आधीच कोसळू लागली, आपल्या प्रसारमाध्यमांना धमकावले जाऊ लागले आणि भीती दाखवली गेली, आपल्या सार्वजनिक संस्थांचा संकोच होऊ लागला, आपला सामाजिक सलोखा बिघडू लागला. धृवीकरणावर आधारित राजकारण राष्ट्राच्या प्रगतीला कधीही अनुकूल होऊ शकत नाही.
नरेंद्र मोदींनी मे 2014 मध्ये ज्याचे वचन दिले होते, पंतप्रधान झाल्याला सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ते मायावीच भासत असेल तर त्याची जबाबदारी स्वतः नरेंद्र मोदींचीच आहे. त्यांच्या विश्वासू सहकाऱ्याचा मृत्यू नव्हे, त्यांच्या अंतर्गत वर्तुळातील काही अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता नव्हे तर त्यांची स्वतःची स्वयंश्रेष्ठत्वाची भावना, तज्ज्ञांविषयी त्यांना वाटणारा संशय, श्रेय इतरांसोबत वाटण्याची त्यांची नाखुषी, तरुण वयात कवटाळलेली जमातवादी विचारसरणीचा त्याग न करण्याची त्यांची अकार्यक्षमता ही स्वतः नरेंद्र मोदींची वैशिष्टये हेच सांगतात की, त्यांच्याविषयी श्रद्धा बाळगणाऱ्या त्यांच्या भाबड्या समर्थकांच्या विश्वासापेक्षा किंवा आशेपेक्षा इतिहास त्यांना अधिक कठोरपणे पारखून घेईल.
(अनुवाद: सुहास पाटील)
- रामचंद्र गुहा
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)
Tags: रामचंद्र गुहा मृदगंधा दीक्षित नरेंद्र मोदी Ramchandra Guha Narendra modi Load More Tags
Add Comment