शास्त्रीजींकडून मोदींना काय शिकता येईल...

शास्त्रींचा वारसा 2020 मधील भारताला अधिक लागू पडतो.

फोटो सौजन्य: twitter.com

2 ऑक्टोबर ही मोहनदास करमचंद गांधी यांची जयंती. त्यांचा चरित्रकार म्हणून मी नेहमी या दिवशी त्यांचे स्मरण करतो आणि त्यांच्याविषयी लिहितोदेखील... मात्र 2 ऑक्टोबर 2020 या दिवशी मी दुसऱ्या एका उल्लेखनीय भारतीयाविषयी लिहिण्याचे ठरवले आहे... ज्यांचादेखील जन्म याच तारखेला झाला होता. ते होते लाल बहादूर शास्त्री.

माझ्या नित्यक्रमात बदल करण्याचे कारण असे - गांधींचा वारसा कालातीत आणि वैश्विक असला तरी शास्त्रींचा वारसा मात्र 2020 मधील भारताला अधिक लागू पडतो. केवळ दीडेक वर्षांसाठीच ते पंतप्रधान होते मात्र त्या अत्यल्प काळातही त्यांनी काही उल्लेखनीय गोष्टी केल्या... ज्या आज भारताचे पंतप्रधानपद भूषविणाऱ्या व्यक्तीनेही अनुसरणे आवश्यक आहे.

2 ऑक्टोबर 1902 रोजी जन्मलेल्या लाल बहादूर शास्त्रींनी तरुणपणीच स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले आणि अनेक वर्षे कारावासात काढली. अतीव धैर्य आणि दृढ सचोटी या त्यांच्याकडील गुणांमुळे त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. नेहरूंच्या मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत असताना एका रेल्वे अपघातानंतर त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला... तेव्हा यांतील दुसऱ्या गुणवैशिष्ट्याची प्रखर प्रचिती आली. ही नैतिक कृती तेव्हाही दुर्मीळ होती आणि आज तर ती अकल्पनीय आहे. कालांतराने त्यांना मंत्रीमंडळात पुन्हा समाविष्ट करण्यात आले आणि नेहरू दिवसेंदिवस त्यांच्यावर अधिकाधिक भिस्त ठेवू लागले. स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून ते शास्त्रींकडे पाहू लागले.  

जून 1964मध्ये शास्त्रींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच मँचेस्टर गार्डियनच्या नवी दिल्लीतील प्रतिनिधीने त्यांची मुलाखत घेतली. 'A Sparrow’s Strength' या शीर्षकाच्या लेखात त्या पत्रकाराने ते संभाषण नोंदवले आहे. 'स्वतःविषयी पहाडासारखा विश्वास असणारे', 'अत्यंत कणखर', 'कमी आणि तीक्ष्ण वाक्यांत बोलणारे – शब्द वाया न घालवणारे’ असे शास्त्री त्याला दिसले.  

इतर काही लोक मात्र फारसे प्रभावित झाले नव्हते. ऑक्टोबर 1964मध्ये कैरो येथील सभा आटोपून परतत असताना शास्त्री कराचीमध्ये काही काळ थांबले. पाकिस्तानचे अध्यक्ष फिल्ड मार्शल अयुब खान यांच्याशी त्यांची तिथे भेट झाली. किरकोळ देहयष्टीच्या या लोकशाहीवाद्याला पाहून आणि त्याचे नम्र, शालीन वागणे पाहून तो आडदांड हुकूमशहा अजिबात प्रभावित झाला नाही. लोकप्रिय आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पूर्वसुरींचे उत्तराधिकारी म्हणून शास्त्री सर्वथैव अपात्र वाटत होते. अशा या आपल्या पंतप्रधानांशी भेट झाल्यानंतर अयुब त्यांच्या साहाय्यकाला म्हणाले, ‘ही व्यक्ती नेहरूंची उत्तराधिकारी आहे तर!’ 

नेहरूंचे निधन झाले तेव्हा भारत आणि पाकिस्तान काश्मीरविषयीच्या वादाचे शांततामय मार्गाने निराकरण करण्याच्या अगदी समीप आले होते... मात्र शास्त्रींना पाहिल्यानंतर आणि त्यांच्या भेटीनंतर अयुब खान यांनी वाटाघाटींचा आणि संवादाचा मार्ग त्यागून बळाचा वापर करून काश्मीरचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला.

ऑगस्ट 1965मध्ये पाकिस्तानने खोऱ्यात घुसखोर पाठवले. सप्टेंबरच्या सुरुवातीला छंब सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला... पण शेवटी असे निष्पन्न झाले की, फिल्ड मार्शल अयुब खान यांनी या धोतीमधल्या लहानखुऱ्या गांधीवाद्याच्या निर्धाराला आणि लढाऊ वृत्तीला अतिशय कमी लेखले होते... कारण पंजाबमध्ये नवी फ्रंट उघडण्यासाठी शास्त्रींनी ताबडतोब मंजुरी दिली. भारतीय सैनिकांनी सीमा ओलांडली आणि पाकिस्तानातील एक अव्वल शहर असणाऱ्या लाहोरच्या दिशेने कूच केले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने 22 सप्टेंबर रोजी युद्धबंदी लागू होईपावेतो तीन दिवस तिथे उग्र धुमश्चक्री झाली.

पाकिस्तानच्या बाजूने हे युद्ध कडव्या धार्मिक उद्घोषांसह खेळले गेले. हिंदू काफिरांच्या विरोधातील इस्लामी धार्मिक युद्ध आपण चालवले आहे याच भावनेने पाकिस्तान या युद्धाकडे बघत होता. भारतीय बाजूला चाललेला उद्घोष मात्र पूर्णपणे वेगळा होता. परमवीर चक्र मिळवणाऱ्या उत्तरप्रदेशमधील एका सैनिकाचे नाव होते अब्दुल हमीद. राजस्थानमधील एका सैनिकाने पाकिस्तानचे दोन तळ उद्ध्वस्त केले आणि त्या सैनिकाचे नामकरण उपरोधाने (किंवा सूचकपणे) अयुब खान असे करण्यात आले.

पाकिस्तानने स्वतःला मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केले असले तरी भारत स्वतःला हिंदू राष्ट्र मानत नाही हे लाल बहादूर शास्त्री जाणून होते आणि तसे त्यांनी दृढतापूर्वक सांगितलेही होते. युद्धबंदी लागू झाल्यानंतर पंतप्रधानांनी रामलीला मैदानावर मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. ते हिंदीमध्ये बोलले; ज्याचे इंग्लीश भाषांतर मी पुढे वापरले आहे. स्वतः हिंदू असलेले शास्त्री त्यांच्या भाषणात म्हणाले, ‘या सभेचे अध्यक्ष मीर मुश्ताक हे मुस्लीम आहेत. काही वेळापूर्वी तुम्हाला ज्यांनी संबोधित केले ते श्रीयुत फ्रॅंक अँथनी ख्रिश्चन आहेत. इथे शीख आणि पारशीही आहेत. आपल्या देशाविषयीची एक अद्वितीय बाब म्हणजे इथे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि इतर सर्व धर्मांचे लोक आहेत. आपल्याकडे मंदिरे आहेत, मशिदी आहेत, गुरुद्वारा आणि चर्च आहेत... पण हे सर्व आपण राजकारणात आणत नाही. ...हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील फरक आहे. पाकिस्तान मात्र स्वतःला इस्लामिक राष्ट्र मानते आणि धर्माला एक राजकीय घटक म्हणून वापरते. आपल्याला आवडणारा कोणताही धर्म निवडण्याचे आणि आपापल्या पद्धतीने त्याचे पालन करण्याचे स्वातंत्र्य भारतीयांना आहे आणि राजकारणाबाबतच बोलायचे तर आपल्यातील प्रत्येक जण दुसऱ्याइतकाच भारतीय आहे.’ 

शांत स्थितीत अथवा युद्धजन्य परिस्थितीत नरेंद्र मोदींना दुरन्वयानेही अशा प्रकारचे भाषण करताना पाहणे अशक्य जरी नसले तरी अवघड निश्चित आहे. विशेषतः पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात नरेंद्र मोदींनी स्वतःच्या प्रतिष्ठेची किंमत मोजून, आपल्या राष्ट्राची किंमत मोजून त्यांची धोरणे स्पष्टपणे बहुसंख्याकधार्जिणी आखली आहेत आणि त्यांचे राजकारणही स्पष्टपणे बहुसंख्याकधार्जिणे राखले आहे.  

दुसऱ्या एका मुद्द्यावरही लाल बहादूर शास्त्री नरेंद्र मोदींपेक्षा वेगळे ठरतात. तो मुद्दा म्हणजे कॅबिनेटमधील इतर मंत्र्यांना सबल करण्याची शास्त्रींची क्षमता आणि इच्छा. 'जय जवान, जय किसान' ही शास्त्रींची घोषणा सर्वपरिचित आहे... मात्र त्यांनी शेती व संरक्षण ही दोन अत्यंत महत्त्वाची खाती त्यांच्या दोन सर्वाधिक कार्यक्षम मंत्र्यांकडे सुपुर्त केली होती ही बाब मात्र बव्हंशी विस्मृतीत गेली आहे. शास्त्रींच्या मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री म्हणून काम पाहताना यशवंतराव चव्हाणांनी पुष्कळ काळ प्रलंबित असलेल्या आपल्या सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष दिले. सी. सुब्रमण्यम यांनी शास्त्रींच्याच हाताखाली कृषिमंत्री म्हणून काम पाहत असताना हरितक्रांतीची बीजे रोवली.

केवळ या दोन व्यक्ती अपवाद नव्हत्या तर शास्त्रींच्या मंत्रीमंडळामध्ये इतरही उत्कृष्ट मंत्री होते - एम. सी. छागला (शिक्षण), एस. के. डे (सामाजिक विकास) आणि सुशीला नायर (आरोग्य) या सर्वांनीदेखील स्वायत्ततेचा आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेतला. आज मोदींच्या मंत्रीमंडळाबाबत अशी कल्पना करणेही शक्य नाही. 

स्वतःच्या चुका मान्य करून त्या सुधारण्याची इच्छा असणे या तिसऱ्या वैशिष्ट्याबाबतही लाल बहादूर शास्त्री नरेंद्र मोदींहून वेगळे आहेत. 26 जानेवारी 1965 रोजी दक्षिणेकडील राज्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून शास्त्रींनी शासकीय कामकाजातून इंग्लीश भाषा वगळावी असे ठरवले आणि त्याऐवजी हिंदी हीच सबंध देशाची 'अधिकृत' भाषा असावी असे ठरवले. तामीळनाडूमध्ये याचा बहुसंख्येने निषेध करण्यात आला. हा निषेध इतका उग्र आणि तीव्र होता की, हिंदी लादणे ही चूक होती हे कबूल करणे पंतप्रधानांना भाग पडले. 11 फेब्रुवारी 1965 रोजी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणातून शक्य तितक्या मोहक पद्धतीने त्यांनी ते केलेही आणि विशेष म्हणजे तेव्हा ते इंग्लीशमधून बोलले. 

पंतप्रधानांनी त्यांना झालेली 'खोल व्यथेची जाणीव' आणि 'या दुर्दैवी घटनांमुळे बसलेला धक्का' व्यक्त करून बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की, गैरसमज आणि अनाठायी भीती दूर व्हावी म्हणून जोवर दक्षिण भारतीयांची इच्छा असेल तोवर इंग्लीश वापरली जाईल या जवाहरलाल नेहरूंनी दिलेल्या आश्वासनाचा ते संपूर्ण सन्मान करतील आणि त्यानंतर त्यांनी स्वतः चार आश्वासने दिली...

पहिले... प्रत्येक राज्याला त्याचा व्यवहार सबंधित राज्याने निवडलेल्या भाषेमध्ये - मग ती स्थानिक भाषा असेल किंवा इंग्लीश - चालवण्याचे संपूर्ण आणि निरंकुश स्वातंत्र्य असेल. 

दुसरे म्हणजे एका राज्याचे दुसऱ्या राज्याशी होणारे व्यवहार एकतर इंग्लीशमध्ये होतील अथवा विश्वसनीय इंग्लीश भाषांतरासह होतील. 

तिसरे... केंद्र सरकारशी इंग्रजीत व्यवहार करण्याची बिगरहिंदी राज्यांना मुभा असेल आणि बिगरहिंदी राज्यांच्या संमतीशिवाय या व्यवस्थेत बदल केला जाणार नाही.

चौथे... केंद्रातील कामकाजाच्या चलनवलनामध्ये इंग्रजीचा वापर सुरू राहील.

नरेंद्र मोदींनी शास्त्रींपेक्षा कितीतरी अधिक क्लेशदायक चुका केल्या आहेत. नोटाबंदी आणि वाईट रितीने योजलेली टाळेबंदी ही त्याची केवळ दोन उदाहरणे. त्यांच्या चुका अतीव त्रासाला कारणीभूत झाल्या आहेत, आपली अर्थव्यवस्था व आपला सामाजिक बंध यांचे नुकसान केले आहे आणि असे असूनही त्याची उपरती किंवा पश्चात्ताप होत असल्याचे त्यांनी दुरन्वयेही कुठे व्यक्त केलेले नाही. 

आपल्या पंतप्रधानांची सध्याची कारकिर्द अजून साडेतीन वर्षे आहे. सांप्रदायिकतेचा पूर्णतः अभाव, कॅबिनेटमधील सहकाऱ्यांसोबत काम करण्याची आणि त्यांना सबल करण्याची इच्छा, स्वतःच्या चुका मान्य करण्याची आणि त्या दुरुस्त करण्याची तयारी अशा काही गोष्टी प्रत्यक्षात याव्यात म्हणून विद्यमान पंतप्रधानांना त्यांचे महान पूर्वसुरी लाल बहादूर शास्त्री यांच्या उदाहरणातून काही शिकण्यासाठी अद्यापही वेळ आहे.  

अर्थात असे काही शिकण्यासाठी नरेंद्र मोदी सक्षम आहेत का हा मुद्दा वेगळा!

(अनुवाद: सुहास पाटील)

- रामचंद्र गुहा

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: अनुवाद रामचंद्र गुहा लालबहादूर शास्त्री महात्मा गांधी नरेंद्र मोदी पाकिस्तान अयुब खान Ramchandra Guha Lalbahadur Shastri Mahatma Gandhi Narendra Modi Pakistan Ayub Khan Load More Tags

Comments:

Narayan Samant

मुळात एका ब्लफमास्टर वा वाचाळवीर फेकंदाज माणसाची तुलना शास्त्रीं बरोबर करणच चुकीचं आहे. शास्त्री तर सोडाच पण मनमोहनसिंग बरोबर पण तुलना होऊच शकत नाही. आपल्याच घरात चोरी करणारा आणि आता देशाची संपत्ती आपलीच समजून मित्रांना निवडणुकीत मदतीचा मोबदला म्हणून विकणारा खरा अॅक्सिडेंटल पंतप्रधान झाला हे दुर्दैव.ट्रॅक्टरच्या ट्युबवर शेतीपंप चालवणे, गटरच्या गॅसवर चहा उकळवणे, दिवे, टाळ्या थाळ्या, गोमूत्र हे असले अकलेचे दीवे पाझळलेल्याची तुलना शास्त्रींसह हा मोठा विनोद आहे.

Add Comment