भारतीय प्रजासत्ताकासोबत जगलेलं आयुष्य

गोपाळकृष्ण गांधी यांच्या 'द अनडाइंग लाइट: अ पर्सनल हिस्ट्री ऑफ इन्डिपेन्डन्ट इंडिया' या पुस्तकाचा परिचय

पल्या विशेषाधिकारी कौटुंबिक पार्श्वभूमीची गोपाळ गांधींना सखोल जाणीव आहे. या पार्श्वभूमीची आपल्याला कितीदातरी मदत कशी झाली आणि क्वचित प्रसंगी त्याचा अडथळाही कसा झाला, हे त्यांना ठाऊक आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी लिहिल्या आहेत, तसंच नवी दिल्लीतील त्यांच्या घरी ये-जा असणाऱ्या अनेक देदीप्यमान असामान्य व्यक्तींविषयीही लिहिलं आहे. गोपाळ लिहितात : ‘आमच्या कुटुंबाला “हरिजन सेवे”चं वलय वारशात मिळालं होतं, पण आमच्या निकटवर्तीय मित्रमंडळींमध्ये कोणीही दलित नव्हतं. अगदी नावालाही कोणी दलित नव्हतं. मुस्लीम, ख्रिस्ती व शीख मित्रमंडळी होती. अमेरिकेतील काळ्या समुदायामधले लोक, जगभरातील काही ज्यूसुद्धा आमच्या कुटुंबाचे मित्र होते. पण एकही भारतीय दलित या वर्तुळात नव्हता.’

मी 22 एप्रिल 2020 रोजी ट्विटरवर एका सूत्राला धरून काही पोस्ट्सची मालिका प्रसिद्ध केली. लोकसेवक, राजनैतिक अधिकारी, लेखक व अभ्यासक अशा रूपांमधील गोपाळकृष्ण गांधी हे सध्या हयात असलेल्या सर्वांत लक्षणीय भारतीयांपैकी एक असून त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस हे त्या पोस्ट-मालिकेमधील सूत्र होतं. गोपाळकृष्ण गांधींनी या देशासाठी दिलेलं योगदान, त्यांच्या चारित्र्यामधील डौल आणि सभ्यता, तसंच व्यक्तीशः माझ्यावरचं त्यांचं ऋण, इत्यादींबद्दल मी लिहिलं होतं. ‘आधुनिक भारताचा इतिहास आणि महात्मा गांधी यांच्याविषयी गोपाळ गांधी यांच्याकडून मला प्रचंड गोष्टी शिकायला मिळाल्या,’ असं मी तेव्हा लिहिलं.

आता पाच वर्षांनंतर, गोपाळ गांधींचा ऐंशीवा वाढदिवस येऊ घातला असताना त्यांचं माझ्यावरचं (आणि इतर अनेक भारतीयांवरचं) ऋण आणखीच वाढेल, असं एक पुस्तक प्रकाशित नुकतंच प्रकाशित झालं. गोपाळ गांधी यांच्या आयुष्याचा प्रवास भारतीय प्रजासत्ताकाच्या प्रवासासोबत समांतरपणे होत आला, तर या प्रजासत्ताकाच्या प्रगतीविषयी, तसंच अधोगतीविषयी त्यांनी लिहिलेलं सूक्ष्मदर्शी, वाचनीय आणि प्रचंड उद्बोधक असं हे पुस्तक आहे. या पुस्तकातील कथनामध्ये व्यक्तिगत संस्मरणं आणि व्यापक ऐतिहासिक घडामोडींची वर्णनं यांची परस्परांशी गुंफण घातलेली आहे. यातील ऐतिहासिक घडामोडींच्या वर्णनाला त्यांच्या विस्तृत वाचनाचा आणि भारताविषयीच्या सखोल आकलनाचा आधार आहे. लेखकाच्या आणि त्याच्या देशाच्या या उलथापालथींनी भरलेल्या प्रवासातील प्रमुख कृतिघटकांची व घटनांची विलक्षण आणि बहुतेकदा आधी पाहण्यात न आलेली छायाचित्रं या पुस्तकातील मजकुराला अधिक संपन्न करतात. काही चित्रपटांचे आस्थेने केलेले उल्लेख (हिंदी, इंग्रजी, बंगाली वा तामिळ, असे हे चित्रपट आहेत) या पुस्तकातून समोर येतात. गोपाळ गांधींचं आयुष्य साहित्य, अभ्यास आणि प्रशासकीय सेवा यांसोबतच चित्रपटांनीही समृद्ध केलं, हे उघड आहे.

‘द अनडाइंग लाइट : अ पर्सनल हिस्ट्री ऑफ इन्डिपेन्डन्ट इंडिया’ अशा शीर्षकाच्या या पुस्तकामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या भारावलेल्या आरंभिक अवस्थेचं चित्रमय वर्णन येतं. त्यात महात्मा गांधींनी शेवटच्या काळात केलेली उपोषणं व त्यांचा मृत्यू, नेहरू व पटेल यांच्यातील वाद आणि समेट, इत्यादींचाही संदर्भ त्यात येतो. त्यानंतर पुस्तकातलं कथन कालानुक्रमे पुढे जातं. गोपाळ गांधी यांनी प्रत्येक वर्षानुसार एक छोटं, खुसखुशीत शैलीतील प्रकरण लिहिलं असून गेल्या दीड दशकाविषयीचं त्यांचं आकलन शेवटच्या प्रकरणात एकत्रितरीत्या वाचायला मिळतं. 

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या व देशाची फाळणी होण्याच्या थोडेसेच आधी जन्मलेले गोपाळ गांधी भारतीय प्रजासत्ताकासोबतच मोठे झाले. त्यांचे आईवडील देवदास व लक्ष्मी शांतपणे देशभक्तीची भावना जोपासत असत आणि त्याचा प्रभाव त्यांच्या मुलावरही पडला. आईवडिलांसोबतच तारा, राजमोहन व रामचंद्र या तितक्याच लक्षणीय भावंडांचा आपल्यावर कसा प्रभाव पडला हे गोपाळ गांधींनी प्रेमाने आणि निगुतीने सांगितलं आहे. इतर शेकडो प्रभावशाली व्यक्ती या पुस्तकातून समोर येतात आणि वाचकाचं कुतूहल वाढवतात. त्यातील काही व्यक्ती प्रसिद्ध आणि वादग्रस्त पंतप्रधानांसारख्या आहेत, तर काही आधी अज्ञात राहिलेल्या शिक्षकांसारख्या व सामाजिक कार्यकर्त्यांसारख्याही आहेत.

गोपाळ गांधी यांच्या आईचे वडील, स्वातंत्र्यसेनानी सी. राजगोपालाचारी (‘राजाजी’) यांचं व्यक्तिमत्व या पुस्तकात मध्यवर्ती स्थानी असल्याचं जाणवतं. राजाजी स्वतंत्र भारताच्या सरकारमध्ये उच्च पदांवर होते. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी त्यांना एकेकाळी अत्यंत प्रिय असणाऱ्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र पार्टी हा विरोधी पक्ष स्थापन केला. राज्यसंस्थेच्या बंधनांमधून मुक्त असलेल्या अर्थव्यवस्थेची गरज त्यांच्या पक्षाने जोरकसपणे मांडली. ‘माझ्या आयुष्यावरील सर्वांत मोठा प्रभाव’ राजाजींचा होता, असं गोपाळ गांधी नोंदवतात. राजाजींकडून त्यांना ‘निष्पक्षपाती व न्याय्य संविधान, समता व अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांवर आधारीत लोकशाही प्रजासत्ताक, आणि प्रजेच्या स्वातंत्र्याला सर्वाधिक मूल्य देणारी राज्यसंस्था’ या कल्पनांचं आकलन झालं. 

या पुस्तकात वारंवार उल्लेख होणारी दुसरी व्यक्ती म्हणजे अतुलनीय शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी. गोपाळ गांधी लहान असतानाच त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आप्तवर्तुळातील असणाऱ्या सुब्बुलक्ष्मींविषयी जिव्हाळा वाटू लागला. सुब्बुलक्ष्मी यांच्या संगीताचा व व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर शाश्वत प्रभाव पडला. त्यांच्यावर मोठा प्रभाव पाडणारं तिसरं व्यक्तिमत्व समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांचं होतं. जेपींचा ‘लखलखीत प्रामाणिकपणा, शांत वक्तृत्व, देखणेपण, आणि अर्थातच, त्यांचं सफाईदार इंग्रजी’ यांबद्दल तरुणपणी गोपाळ गांधींना आदर वाटत असे. आपल्या या प्रशंसकाच्या विनंतीला मान देऊन जेपी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजात भाषण द्यायला आले, तेव्हा भारत-चीन संघर्ष शिगेला पोचला होता. ‘त्यांनी संथ सुरात मोजूनमापून पण उत्स्फूर्तपणे भाषण केलं. या भाषणाच्या पूर्वार्धात त्यांनी स्वातंत्र्यसंघर्षाच्या काळात राष्ट्रवादाचा अर्थ कोणता होता ते सांगितलं- वसाहतीकरण, आत्मसन्मान परत मिळवणं, स्वावलंबन, आत्मविश्वास आणि साधन म्हणून अहिंसेचं पालन, हे या संघर्षातील महत्त्वाचे मुद्दे होते. भाषणाच्या उत्तरार्धात त्यांनी राष्ट्रवादाचा आता कोणता अर्थ झाला आहे, त्याचा उहापोह केला. आता लष्करी पवित्रे घेणं, शेजाऱ्यांना धमकावणारा फाजील देशाभिमान आणि त्याला असहिष्णुतेचं इंधन पुरवणं, असा राष्ट्रवादाचा अर्थ झाल्याचं ते म्हणाले.’

गोपाळ गांधींनी जेपींच्या भाषणासंबंधी लिहिलेली ही आठवण आपल्या वर्तमानाशी थेट जुळणारी आहे. तसंच १९६०च्या दशकात भारत सरकारने अधिकृत सरकारी वापरातून इंग्रजीचं उच्चाटन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबतची आठवणही आजच्या संदर्भात प्रस्तुत ठरते. त्या कालखंडात ‘मी खूपच दयनीय द्विधावस्थेत अडकलो. माझं हिंदीवर प्रेम होतं, पण त्यातील साम्राज्यवादी पवित्र्यांचा मला तिटकारा होता. या विषयावरील राजाजींच्या तीव्र भूमिकेचा माझ्यावर प्रभाव असल्यामुळे मी सरकारच्या प्रस्तावित धोरणाचा निःसंदिग्ध विरोध केला.’

भारत देशाचा प्रवास या पुस्तकातील कथनामध्ये वरचढ ठरतो. देशाच्या प्रवासातील प्रमुख घडामोडींचा व वादविवादांचा आढावा प्रस्तुत पुस्तकात घेतला असून त्यासोबत गोपाळ गांधींनी स्वतःचं भाष्यही केलं आहे. कर्नाटकी संगीतात गायकाला साथ देणारा व्हायलीनवादक असतो, तशा तऱ्हेने देशाच्या प्रवासाविषयी बोलताना लेखकाच्या व्यक्तिगत प्रवासाविषयीचं वर्णन साथ देत येतं. गोपाळ गांधी यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून पहिल्यांदा तंजावरच्या ग्रामीण भागात नियुक्ती मिळाली, त्याबद्दलचा एक मोहक वृत्तान्त या पुस्तकात वाचायला मिळतो. तिथे त्यांनी सिरियन ख्रिस्ती, तामिळ जैन व मुस्लीम माणसांसोबत काम केलं. त्यानंतर (राष्ट्रपतींचे सचिव, तसंच पश्चिम बंगालचे राज्यपाल अशा) आणखी उच्चस्तरीय पदांवर काम करत असतानाच्या अनुभवांमधून मिळालेल्या मर्मदृष्टीही गोपाळ गांधींनी नोंदवल्या आहेत. तीन खंडांमधील चार देशांमध्ये पाच वेगवेगळ्या नियुक्त्यांद्वारे गोपाळ गांधींनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी केलेलं दक्षिण आफ्रिकेतील व श्रीलंकेतील राजकारणाचं वर्णन विशेष मूल्यवान वाटतं.

गोपाळ गांधींना संपूर्ण भारताचं आकलन व समज आहे, हे या पुस्तकातून सिद्ध होतं. पण बहुधा तामिळ, बंगाली व दिल्लीवाल्यांविषयीचं त्यांचं आकलन व समज सर्वोत्कृष्ट म्हणावी लागेल. ईशान्य भारत व काश्मीर या अशांत सीमावर्ती भागांनाही या कथनात वाजवी जागा मिळते.

‘द अनडाइंग लाइट’मध्ये अनेक हेलावून टाकणाऱ्या कथा आहेत. राजाजी व त्यांची मुलगी नमागिरी यांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर तिथे दिलेल्या भेटीचा वृत्तान्त असा आहे. त्या वेळी राजाजी भारताचे गव्हर्नर जनरल होते. हैदराबादच्या निझामाने राजाजींच्या मुलीला एक हिरेजडित हार भेट म्हणून दिला. असे भपकेबाज दागिने विधवेला शोभून दिसत नाहीत, असं सांगून राजाजींनी हा हार परत केला. यावर नमागिरींनी आपल्या वडिलांना खडे बोल सुनावले. ‘आम्ही गांधींचे अनुयायी आहोत, त्यामुळे आम्ही महागड्या वस्तू स्वतःकडे राखत नाही,’ असं राजाजींनी निझामाला सांगायला हवं होतं, असं नमागिरी म्हणाल्या. 

राजाजींचे जुने मित्र व राजकीय प्रतिस्पर्धी ई. व्ही. रामास्वामी (‘पेरियार’) यांच्याबद्दलची कथाही अशीच बरंच काही सांगून जाणारी आहे. आपल्या दुसऱ्या विवाहावेळी राजाजींनी साक्षीदार म्हणून सही करावी, अशी विनंती पेरियार यांनी केली. त्यावर राजाजींनी नकार दिला. पण राजाजींनी या वेळी होकार दिला असता तर ‘तामिळनाडूतील ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर संभाषित मोठ्या प्रमाणात शमलं असतं’, असं गोपाळ गांधी लिहितात.


हेही वाचा - एकपक्षीय वर्चस्वाबाबत राजाजी यांनी दिलेला धोक्याचा इशारा (रामचंद्र गुहा)


पल्या विशेषाधिकारी कौटुंबिक पार्श्वभूमीची गोपाळ गांधींना सखोल जाणीव आहे. या पार्श्वभूमीची आपल्याला कितीदातरी मदत कशी झाली आणि क्वचित प्रसंगी त्याचा अडथळाही कसा झाला, हे त्यांना ठाऊक आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी लिहिल्या आहेत, तसंच नवी दिल्लीतील त्यांच्या घरी ये-जा असणाऱ्या अनेक देदीप्यमान असामान्य व्यक्तींविषयीही लिहिलं आहे. गोपाळ लिहितात : ‘आमच्या कुटुंबाला “हरिजन सेवे”चं वलय वारशात मिळालं होतं, पण आमच्या निकटवर्तीय मित्रमंडळींमध्ये कोणीही दलित नव्हतं. अगदी नावालाही कोणी दलित नव्हतं. मुस्लीम, ख्रिस्ती व शीख मित्रमंडळी होती. अमेरिकेतील काळ्या समुदायामधले लोक, जगभरातील काही ज्यूसुद्धा आमच्या कुटुंबाचे मित्र होते. पण एकही भारतीय दलित या वर्तुळात नव्हता.’

लेखकाची ही चिंतनशील शहाणीव काही व्यापक ऐतिहासिक मूल्यनिवाड्यांमध्येही उमटताना दिसते. त्यातील काही निरीक्षणं पुढीलप्रमाणे :

‘नेहरू, पटेल व आंबेडकर यांच्या प्रतिमांना आज देशात पूजनीय मानलं जातं, पण त्यांच्या विचारांचा व संदेशांचा अभ्यास करायला हवा याची मात्र कोणाला फिकीर नाही. हे पाहून या तीनही नेत्यांना गंमत वाटली असती, ते हताशही झाले असते आणि यातील धोकाही त्यांना दिसला असता.’

‘नेहरूंच्या भारतापासून इंदिरांच्या भारतापर्यंत झालेलं स्थित्यंतर हा प्रामाणिक प्रयत्नांच्या युगापासून बेचैन अभिनयापर्यंतच्या बदलाचाच भाग होता. ... नेहरूंच्या रूपात एका व्यक्तीला भारताच्या सेवेसाठी नेमण्यात आलं, तर इंदिरांच्या बाबतीत एका व्यक्तीच्या सेवेसाठी भारताला दिमतीला घेण्यात आलं.’

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानकाळासंदर्भात गोपाळ लिहितात : ‘मोदी हे एस.एस. इंडिया या जुन्या जहाजाचे नवीन कप्तान नव्हते, तर एस.एस. भारत या नवीन जहाजाचे नवीन धुरीण होते. जुन्या जहाजाला दोन वाफेच्या इंजिनांमधून ऊर्जा मिळत होती - त्यातील एक इंजिन लोकशाही प्रजासत्ताकवादाचं होतं, तर दुसरं धर्मनिरपेक्षतेचं होतं. नवीन जहाजाला मात्र बहुसंख्याक राष्ट्रवाद व हिंदुत्ववाद या इंजिनांमधून ऊर्जा मिळते.’

हे विधान वाचल्यावर मी आणखी दोनशे पानं (आणि तीस वर्षं) मागे जाऊन गोपाळ गांधी यांच्या रोजनिशीतील काही उतारे पुन्हा वाचले. या उताऱ्यांमध्ये डिसेंबर १९९२मधील बाबरी मशीद विध्वंसाचा उल्लेख करून लिहिलं आहे की, ‘३० जानेवारी १९४८नंतर हा भारताच्या इतिहासातील सर्वांत अंधारलेला क्षण आहे, असं मला वाटतं. आपली सभ्यताच कोसळण्याच्या काठावर आहे का, असा प्रश्न यातून उपस्थित होतो.’

पुस्तकाच्या अखेरच्या भागात लेखकाने आजच्या भारतासमोरील काही महत्त्वाच्या समस्या नोंदवल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेला पर्यावरणीय विध्वंस, सांप्रदायिक द्वेष, संस्थांची ढासळती स्वायत्तता आणि भूतकाळाचा शस्त्रासारखा होणारा वापर, अशा मुद्द्यांचा समावेश आहे. गोपाळ गांधी यांनी भारतीय प्रजासत्ताकामधील आदर्श तत्त्वं त्यांच्या तारुण्यात अनुभवली आणि प्रौढ वयात कायम ती अंमलात आणली, पण आता या आदर्श तत्त्वांना वरील प्रश्नांमुळे आव्हान मिळतं आहे. तरीही, गोपाळ गांधींनी त्यांच्या पुस्तकाचा शेवट शांतचित्ताने आशावादी सुरात केला आहे. ‘भारताचं तेज मंदावू शकतं, पण ते लोप पावू शकत नाही,’ असं ते लिहितात.

- रामचंद्र गुहा
(लेखक विख्यात इतिहासकार आणि राजकीय  - सामाजिक विश्लेषक आहेत.)
भाषांतर- प्रभाकर पानवलकर


द अनडाइंग लाइट : अ पर्सनल हिस्ट्री ऑफ इन्डिपेन्डन्ट इंडिया
(The Undying Light : A Personal History of Independent India)

लेखक : गोपाळकृष्ण गांधी
प्रकाशक : Aleph Book Company
पृष्ठसंख्या : 624
मूल्य : ₹ 749.00

Tags: अनुवाद महात्मा गांधी सी. राजागोपालाचारी गोपाळकृष्ण गांधी प्रजासत्ताक रामचंद्र गुहा ram guha ramchandra guha new book book review autobiographical book IAS IFS Undying Light Gopalkrishna Gandhi mahatma gandhi C. Rajagopalachari नवे पुस्तक बाबरी मशीद babri masjid मोदी narendra modi कालपरवा Load More Tags

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/