आपले मनोबल उंचावणाऱ्या दोन स्त्रिया

कोरोना साथीच्या काळात त्यांच्या जीवनकथा वाचणे म्हणजे काहीसे सुधारणा घडवणारे आणि स्वतःला उन्नत करणारे आहे

पाओली मरे आणि जानकी अम्मल

इमिलीओ सालगरी या एकोणिसाव्या शतकातील इटालियन लेखकाने एकेठिकाणी असा उल्लेख केला आहे की, 'सामानाच्या त्रासाविना केलेला प्रवास म्हणजे वाचन'.  कोरोनाच्या (COVID-19) काळात हा अतिशय उपयुक्त सल्ला आहे. सध्या प्रत्येकजण सक्तीनेच घरात बांधला गेला असल्यामुळे, अनेक साहित्यकृती आणि विद्वत्कृती निरनिराळ्या देशांची, निरनिराळ्या कालखंडांची सफर घडवण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. त्या मनाला-विचारांना चालना देऊ शकतात आणि हृदयाची उन्नतीही करु शकतात.

'मानवजात नव्या साथीच्या आजाराला तोंड देत आहे' असे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित करण्याच्या काहीच दिवस आधी, आद्य स्त्रीवादी व नागरी हक्क कार्यकर्त्या पाओली मरे यांचे आत्मचरित्र मी वाचायला घेतले होते. 1910 मध्ये दक्षिण अमेरिकेत जन्मलेल्या पाओली यांना तीन प्रकारच्या भेदभावाला सामोरे जावे लागले - वर्ग, वर्ण आणि लिंग. त्यांच्या अनाथ असण्याने या सगळ्यात आणखीच भर टाकली. त्यांच्या नाकळत्या वयातच आईचेही निधन झाले. दुखणेकरी वडलांनी त्यांना एका संस्थेत दाखल केले. पाओली यांचे पालनपोषण त्यांच्या मावशी-पॉलाईन यांनी केले. पॉलाईन अत्यंत चारित्र्यवान स्त्री होती. भावंडांना आणि भाच्यांना सांभाळायची जबाबदारी असल्यामुळे त्यांनी लग्नही केले नाही. पाओली यांनी स्वतःच्या स्मृतिग्रंथात त्यांचे, त्यांच्या धाडसी व निस्वार्थी स्वभावाचे आणि स्वतःच्या कामाविषयी असणाऱ्या निष्ठेचे (त्या शालेय शिक्षिका होत्या) हृद्य चित्र रेखाटले आहे. 

पाओली यांनी विद्यापीठात शिकायला जाणारी कुटुंबातील पहिली स्त्री व्हायचे ठरवले ते आपल्या मावशीचा आदर्श समोर ठेवून. अत्यंत जिकिरीने संघर्ष केल्यानंतर न्यूयॉर्कच्या बर्नाड कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. तिथेच त्यांना सर्जनशील लेखनामध्ये रुची वाटू लागली. कथा, कविता आणि समाजकार्यात मुशाफिरी करत असतानाच त्यांनी स्वतःला नागरी हक्क चळवळीशी जोडून घेतले.

1930 मध्ये दक्षिण अमेरिकेच्या तुलनेत उत्तर अमेरिकेमध्ये वर्णद्वेष (जो आजही अस्तित्वात आहे) तुलनेने कमी कुटीलतेने व कमी क्रूरपणे व्यक्त झाला होता.  स्वतःच्या मावशीला भेटण्यासाठी घरी परतण्याच्या प्रवासाविषयी; त्या दरम्यान बसेस, ट्रेन, हॉटेलांमध्ये आपल्याला कसा भेदभाव सहन करावा लागला; त्याचा सामना आपण कसा केला या सगळ्याविषयी पाओली आपल्या या स्मृतिग्रंथात स्पष्टपणे लिहितात. त्यांनी पुढील शिक्षण घ्यायचा निश्चय केला आणि उत्तर कोरोलिना या त्यांच्या राज्यातील अव्वल विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केला. मात्र त्यांच्यापाशी आवश्यक ती सर्व शैक्षणिक पात्रता असूनही, केवळ कृष्णवर्णीय असल्याच्या कारणावरून विद्यापीठाने त्यांना प्रवेश नाकारला.

वर्णसंघर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असल्याने वर्णभेदाविरुद्ध शर्थीने लढण्यासाठी आपण वकील व्हायचे असे पाओली यांनी ठरवले. वॉशिंग्टन डी.सी. मधील कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांसाठीच्या हॉवर्ड विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. तिथे काही ख्यातनाम प्राध्यापकांनी त्यांना शिकवले. लोकांवरील वर्णाधारीत बंधने काढून टाकावीत यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यामध्येही हे प्राध्यापक सक्रिय होते. पाओली यांनी तिथे उत्तम प्रकारे अध्ययन पूर्ण केले आणि पुढील पदवी घेण्याकरता हार्वर्ड लॉ स्कुलमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला. परंतु 'हार्वर्ड लॉं’ने त्याच दरम्यान हॉवर्ड विद्यापीठातील काही पुरुष विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यामुळे उत्कृष्ट गुणवत्ता असूनही 'हार्वर्ड लॉं'ने पाओली यांची उपेक्षा करत त्यांना प्रवेश नाकारला.

नाउमेद न होता पाओली मरे न्युयॉर्कला गेल्या. तिथे वर्णभेद व वर्गभेदाच्या विरोधात काम करत त्यांनी वकिलीही यशस्वीपणे केली. त्यानंतर आफ्रिका आणि आशियातील वसाहतवादविरोधी चळवळींनी प्रेरित होऊन (गांधीही त्यांचे प्रेरणास्थान होते) त्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या घाना देशात गेल्या. तिथल्या लॉ स्कुलमध्ये शिकवताना घानातील तरुणांना त्यांनी स्वतःकडील ज्ञान आणि आदर्शवादही दिला. तिथून स्वतःच्या राज्यात परत आल्यानंतर त्यांनी 'येल लॉ स्कुल'मध्ये (Yale Law School) डॉक्टरेट होणे पसंत केले. डॉक्टरेट यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडलेली शेवटची अभूतपूर्व गोष्ट म्हणजे एपिस्कोपल चर्चमध्ये झालेली नियुक्ती.  अशी नियुक्ती झालेल्या त्या पहिल्याच स्त्री ठरल्या.

ही एका विलक्षण आयुष्याची कहाणी आहे. आणि पाओली मरे यांनी ती अतिशय सुंदर पद्धतीने कथनही केली आहे. मी आजपर्यंत पुष्कळ स्मृतिग्रंथ, आत्मचरित्रे- त्या विषयातील मर्मज्ञ म्हणून वाचलेली आहेत. मी वाचलेल्या आत्मचरित्रांमध्ये पाओली मरे यांच्या आत्मचरित्राला मी सर्वश्रेष्ठ तीन किंवा चार क्रमांकाचे स्थान देईन. प्रेमाने, शिकवण्याच्या भूमिकेतून आणि करुणेतून पाओली यांनी लेखन केले आहे. त्यांचे मित्र, शिक्षक आणि कॉम्रेडस् यांची चित्रणे त्यांनी स्पष्टपणे रेखाटलेली आहेत; व ती कमालीची सुंदर आहेत. वर्णभेद आणि लिंगभेद यांची भयानकता त्यांनी कुठेही न कचरता सांगितली आहे. मात्र या कथनाचा सूर अतीव खेदाचा आहे, मनात राग ठेवून केलेल्या प्रतिवादाचा नाही.

पाओली मरे यांचे आत्मचरित्र वाचून संपवल्यानंतर लगेचच मी आद्य स्त्री वैज्ञानिक इ. के. जानकी अम्मल यांच्या चरित्राचे हस्तलिखित वाचायला सुरुवात केली. त्याच्या लेखिका सावित्री प्रीत नायर या विज्ञान विषयाच्या इतिहासकार आहेत. आणि त्यांचे हे पुस्तक पुढील वर्षाच्या प्रारंभी  प्रकाशित व्हायचे आहे. जानकी अम्मल या पाओली यांच्यापेक्षा काहीशा सुदैवी होत्या कारण लिंगभेद आणि त्वचेच्या रंगावरून लोकांचे पूर्वग्रह त्यांनाही सहन करावे लागले असले, तरी निदान त्यांचे कुटुंब तरी सुस्थितीत होते. तरीही वसाहतवादाच्या काळात आणि पितृसत्ताक भारतात जन्माला आल्यामुळे त्यांनाही प्रचंड अडथळ्यांचा सामना करावा लागला. या अडथळ्यांवर मोठ्या धाडसाने आणि निश्चयाने त्यांनी मात केली.

मलबार येथे 1897 मध्ये जन्मलेल्या जानकी अम्मल यांचे शिक्षण मद्रास येथे झाले. तिथेच त्यांनी त्या काळातील भारतीय स्त्रियांपेक्षा वेगळा मार्ग निवडून विज्ञानाचा विशेष अभ्यास करायचे ठरवले. पदवी संपादन केल्यानंतर आणि ॲन आर्बरमधील मिशिगन विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवण्यापूर्वी त्यांनी तेथील स्थानिक महाविद्यालयात 'वनस्पतीशास्त्र' हा विषय शिकवला. 1924 मध्ये, साधी साडी नेसणाऱ्या या सडपातळ मल्याळी स्त्रीने आजवर कधीही न पाहिलेल्या भूमीच्या दिशेने आपले जहाज समुद्रात झोकून दिले. ॲन आर्बर येथे त्यांनी एम. एस्सी. व पी.एच.डी. पूर्ण केली आणि विज्ञान विषयात डॉक्टरेट करणाऱ्या त्या पहिली स्त्री (आणि अमेरिकेतील विद्यापीठातून वनस्पतीशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारी पहिली स्त्री) ठरल्या.

जानकी यांचे सुरवातीचे बरेचसे संशोधन हे गवतांवर होते. पी.एच.डी. पूर्ण केल्यानंतर त्या युनायटेड किंगडममध्ये गेल्या व तिथल्या जॉन इन्स फलोत्पादन संस्थेत (John Innes Horticultural Institute) दाखल झाल्या. सरी येथे थोर वनस्पतीशास्त्रज्ञ सायरील डार्लिंग्टन यांच्यासोबत त्यांनी काम केले. हा विख्यात इंग्लिश मनुष्य आपल्या या तरुण साहाय्यिकेमुळे इतका प्रभावित झाला की, 'लागवडीखालील रोपांचे गुणसूत्रीय नकाशे' (A Chromosome Atlas of Cultivated Plants) या विषयावरील लेखनात सहयोग देण्यासाठी त्यांनी विचारणा केली. त्या विषयातील मैलाचा दगड ठरलेले हे लेखन 1945 मध्ये प्रकाशित झाले. आणि त्या लेखनाने त्या क्षेत्राला निर्णायकरित्या नवा आकार दिला.

जॉन इन्स सेंटरमध्ये संशोधन करण्यात जानकी रमल्या. यु.के. मध्ये काही स्त्रिया तसेच पुरुषांशी त्यांची मैत्री झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मात्र देशाची सेवा करण्यासाठी त्या परत आल्या. लंडन येथे जवाहरलाल नेहरूंशी झालेल्या भेटीमुळे त्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली. वनस्पती सर्वेक्षणाची पुनर्रचना करून आणि तरुण स्त्रियांना संशोधनात पुढे येण्यासाठी प्रेरित करून भारतीय विज्ञान क्षेत्राला त्यांनी मोठे योगदान दिले. याप्रकारचे संचालकीय आणि निरीक्षकीय काम करत असतानाच प्रत्यक्ष संशोधनामध्येही त्या सक्रिय होत्या. प्रथितयश नियतकालिकांतून त्यांचे संशोधनांचे निकाल प्रसिद्धही होत होते. भारतामध्ये मानववंश-वनस्पतीशास्त्र (ethno-botony) या विषयाची रुजुवात त्या करत होत्या. त्यांची ज्ञानलालसा तर अकल्पनीय होती. वयाच्या सत्तरीत लडाख येथे, नेहमीप्रमाणे त्यांच्या साडीमध्ये (आणि पायात बूट घालून) तेथील रोपांवर त्या संशोधन करत होत्या. हे सर्व घडत असतानाच त्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या, प्रशासकीय यंत्रणांच्या आणि राजकीय वर्गाच्या पूर्वग्रहांनाही तोंड देत होत्या. त्यांनी जे सन्मान आणि बढतीच्या संधी नाकारल्या होत्या, त्या त्यांच्याहून कमी दर्जाच्या अधिकारी पुरुषांना दिल्या गेल्या.

जानकी अम्मल यांचे आयुष्य एक आदर्श नमुना आहे. आणि चरित्रलेखकाच्या बाबतीतही त्यांचे भाग्य फार चांगले आहे. प्रीत नायर यांनी युनायटेड स्टेट्समधील फार-फ्लंग अर्काईव्ह, यु.के., आणि भारत इथून त्यांच्याविषयीचे संदर्भ तपासत त्यांच्या विषयातील उत्साह आणि ऊर्जा त्यांच्याच उंचीने साधली आहे. जानकी अम्मल यांचे विज्ञानात त्यांना तुल्यबळ असणाऱ्या व्यक्तींशी आणि स्वतःच्या विस्तारलेल्या कुटुंबाशी असलेले संबंध (जे फार जवळकीचे होते) त्यांनी जाणून घेतले आहेत. जानकी अम्मल यांची विज्ञानातील संशोधने आणि त्यांनी मिळवलेले यश याविषयी त्यांनी तज्ञतेने कथन केले आहे, परंतु त्याची भाषा सर्वसामान्य वाचकालाही समजण्याजोगी आहे. आणि तरीही त्यातील गुंतागुंत व सुक्ष्मता यांच्यात कुठेही तडजोड केलेली नाही. हे चरित्र प्रकाशित होईल तेव्हा ते एखाद्या भारतीय वैज्ञानिकाचे आजपर्यंतचे सर्वोत्कृष्ट चरित्र ठरेल. या संशोधनाच्या विषयातील ज्ञानाधिकारामुळे आणि त्याची हाताळणी करण्यातल्या संवेदनशीलतेमुळे सी. व्ही. रामन, होमी भाभा आणि मेघनाद सहा यांच्यासारख्या पुरुष वैज्ञानिकांच्या उपलब्ध असणाऱ्या चरित्रांनाही ते खूपच मागे टाकणारे आहे.

एक उच्चवर्णीय पुरुष म्हणून मी ही दोन पुस्तके अचंब्याने, विस्मयाने आणि स्वतःच्या कमकुवतपणाची जाणीव करून घेत वाचली. पाओली मरे किंवा जानकी अम्मल यांनी एकदोनदा नव्हे तर आयुष्यभर सहन करावा लागलेला भेदभाव माझ्यासारख्या पुरुषांच्या वाट्याला कधीच येत नाही. या वरवर अनुल्लंघ्य भासणाऱ्या अडथळ्यांवर मात करून आपली आत्मप्रतिष्ठा सांभाळत त्या आपापल्या विषयांतील विद्वत्तेला व समाजाला महत्त्वपूर्ण योगदान देत राहिल्या. कोरोना (COVID-19) साथीच्या या काळात पाओली मरे आणि जानकी अम्मल यांच्या जीवनकथा वाचणे म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा घडवणारे आणि उन्नत करणारे आहे. या दोघींकडे असणारे धैर्य आणि डौल या  मानवजातीने काही अंशी जरी दाखवला तर या अतिशय अवघड परिस्थितीतही आपल्याला आशावाद नक्कीच बाळगता येऊ शकेल.

(अनुवाद- सुहास पाटील)

- रामचंद्र गुहा

Tags: रामचंद्र गुहा पाओली मरे जानकी अम्मल आत्मचरित्रे विसावे शतक Ramchandra Guha Pauli Murray Janaki Ammal Biography Load More Tags

Comments: Show All Comments

Atul Teware

सुंदर

Shyam

गुहा यांचे लेखन नेहमीच वेगळे व दुर्लक्षित राहिले अशा व्यक्ती उजेडात आणणारे आहे

ugaonkar

Very good This we could understand because of Dr Guha. Thanks Doctor

vishwas pendse

खूप छान!स्फूर्तीदायक

Sanjay n bagal

पुस्तक परिचय व माहिती चांगली

Sanjeev Manohar Wadikar

व्यक्तीशः मला रामचंद्र गुहा यांचे लिखाण प्राधान्यक्रमाने वाचायला आवडते , कारण ते अभ्यास पूर्ण माहिती ( नेहमीच नवीन काहीतरी ) वाचनाची ओढ निर्माण व्हावी या पद्धतीने लिहीलेले असते. सदरचा लेखही याला अपवाद नाही. लेखत उल्लेखलेली दोनही पुस्तके वाचण्यासाठीची प्रेरणा , वाचकांना या लेखातून नक्कीच मिळेल.

Atul Teware

Nice

Add Comment