लष्करविषयक इतिहासकार बालाकोटला असे ठिकाण म्हणून ओळखतात जिथे महाराजा रणजितसिंह आणि अहमद बरेलवी यांच्या सैन्यात मे 1831 मध्ये मोठी लढाई झाली होती. सर्वसामान्य लोक बालाकोटला असे ठिकाण म्हणून ओळखतात जिथे भारतीय वायूदलाने जैश-ए-मुहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर फेब्रुवारी २०१९मध्ये छापा टाकला होता.
हा स्तंभदेखील त्याच ठिकाणाविषयी आहे. आणि तो या दोन्ही मोठ्या घटनांविषयी नसून, त्या घटनांदरम्यानच्या काळात घडलेल्या तिसऱ्या एका घटनेविषयी आहे. 1939 च्या मे महिन्यात भारतातील एका थोर देशभक्त व्यक्तीने बालाकोट आणि आसपासच्या प्रदेशाला भेट दिली, आणि तिने त्या रम्य भूप्रदेशाची व त्यावर वसलेल्या लोकांची नोंद मागे ठेवली. तिच्या अप्रकाशित डायरीमध्ये ही नोंद समाविष्ट आहे, जिची प्रत मला अर्काइव्हमध्ये मिळाली.
या भारतीय देशभक्ताचे मूळ नाव होते, मेडलिन स्लेड. एका ब्रिटिश नौदलप्रमुखाची ती कन्या. अहमदाबाद आणि सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमांत, त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर त्या गांधींच्या अनुयायी बनल्या. त्यांनी स्वीकारलेल्या देशाशी स्वतःची ओळख जोडली जाण्याची आणखी एक खूण म्हणून त्यांनी स्वतःचे नाव बदलून मीरा असे ठेवले. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान त्या दीर्घकाळ तुरुंगवासातही होत्या. शोषितांची बाजू घेण्यासाठी वर्णाची बंधने ओलांडणारी व्यक्ती म्हणून त्यांचे राष्ट्रीय चळवळीवरील साहित्यात मोठ्या प्रमाणात स्मरण केले जाते.
मीरा बहनविषयी मला पुष्कळ माहीत होते. परंतु त्यांनी 1939 मध्ये बालाकोटला भेट दिली होती हे मात्र मला नुकतेच समजले. आता सार्वभौम आणि एकमेकांपासून स्वतंत्र असलेली भारत व पाकिस्तान ही राष्ट्रे तेव्हा अस्तित्वात नव्हती. बालाकोट हे ब्रिटिशकालीन भारताच्या वायव्य सरहद्दीलगतच्या प्रांतातील ठिकाण होते. खुदाई खिदमतगार या संघटनेचा निवास या प्रांतात होता, या संघटनेचे नेतृत्व मीरा बहनपेक्षाही लक्षणीय अशा एका गांधी अनुयायाने केले होते, त्यांचे नाव होते खान अब्दुल गफार खान. त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावातून अहिंसा आणि परस्पर-विश्वासाने सुसंवादाचा मार्ग स्वीकारण्याकडे संघर्षप्रिय पठाणांचे मन वळवले होते.
1939 च्या वसंत ऋतूमध्ये गांधींनी मीरा यांना सूतकताई व विणकामाला प्रोत्साहन देण्यासाठी सरहद्द प्रांतात पाठवले. याच दौऱ्यामध्ये त्यांनी ॲबोटाबाद (जे गाव आता नाट्यमयरित्या प्रसिद्ध झाले आहे, कारण अमेरिकेच्या ‘नेव्ही सील्स’नी शोधून काढून ठार करण्यापूर्वी ओसामा बिन लादेन याच ठिकाणी लपला होता) या गावातून जाणाऱ्या रस्त्यानेच बालाकोटला भेट दिली. मीरा यांनी त्यांच्या डायरीमध्ये तिथले निसर्गवर्णन याप्रमाणे केले आहे: 'शहरे आणि शेतांभोवती ओढ्यांच्या काठाने हिरवी झाडे आहेत. हळुवारपणे उतारावर वसवलेल्या शेतांनी उतरणी आणि वळणे निर्माण करून तपकिरी व हिरव्या रंगांच्या सूक्ष्म वैविध्यातून समुद्राच्या लाटांचे दृश्य साकारले आहे, त्यामध्ये जिथे तिथे पाचूप्रमाणे दिसणारी भाताची शेते आहेत. आणि हे सर्व लहानसे जग निळ्या टेकड्यांनी वेढलेले आहे, त्यांच्या मागे मोठे बर्फाळ पर्वत आहेत.'
बालाकोटला जाताना निम्म्या वाटेत एके ठिकाणी मीरा आणि त्यांच्या सोबतचे खुदाई खिदमतगार रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले. दुसऱ्या दिवशी पहाटे मीरा चालत फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्या संदर्भात त्या लिहितात, 'शेतांमध्ये कामाला सुरुवात झाली होती. मक्याची मळणी, पाखडणी व नांगरणी अशी सगळीच कामे सुरु होती. घराकडे परत येताना उन्हाळ्यातील मधुर कोकीळकूजन माझ्या कानी पडले.'
न्याहरी झाल्यानंतर मीरा आणि त्यांच्यासह असणारे लोक बालाकोटला जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना एक वनक्षेत्रातील बंगला दिसला, त्यांच्या मते 'बापूजींना थोडा आराम आणि शांतता मिळू शकेल अशी ती जागा' होती. समुद्रसपाटीपासून 3900 फूट अशा सुसह्य उंचीवर ती जागा होती : 'बर्फाने आच्छादलेल्या देवदार वृक्षांमध्ये, आणि मागे असलेल्या पर्वत दऱ्यांमध्ये पूर्णतः एकाकी असे ते अतिशय आकर्षक ठिकाण होते, मात्र तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य होते.' (आदल्याच वर्षी गांधी सरहद्द प्रांतात आले होते; आणि पुढच्या दौऱ्याचे चिंतन करत होते. तो दौरा कधीच होऊ शकला नाही, मात्र बालाकोटपासून इतक्या नजीकच्या ठिकाणी महात्म्याने वनक्षेत्रातील बंगल्यात तब्येत सुधारावी यासाठी कदाचित निवास केला असता असा विचार आता चमत्कारिक वाटतो).
बालाकोट गावाकडे जाणारा मार्ग कूनहार नदीच्या खोऱ्यातून जातो. हा रस्ता 'अरुंद आणि कच्चा' होता, त्याचबरोबर तो 'तीव्र उतारचढ असणारा आणि वळणावळणाचा' होता. आणि त्यावरचे उंचवटे व वळणे यांच्याशी वाटाघाटी करणे कारला अवघड जात होते. रस्ता जरी हिमपर्वतांवरून कोसळत वेगाने वाहणाऱ्या प्रवाही नदीच्या उजव्या काठाकाठानेच जात असला तरी आसपासचा निसर्ग मीरा यांचे लक्ष वेधून घेत होता. खडकाळ भूभागावरून जात असल्यामुळे आणि वाटेत येणाऱ्या वळणांना व उतारचढांना ठेचकाळत असल्यामुळे, ती नदी पूर आलेल्या साबरमतीप्रमाणे उसळलेल्या लाटांमुळे रौद्ररूप धारण करते. तिच्या काठाच्या अलीकडे पलीकडे आणि काठालगतच्या उथळ पाण्यात मोठमोठे वृक्ष आहेत जे झेलमपर्यंतच्या त्यांच्या विस्तारादरम्यान इथे प्रवाहाच्या तावडीत सापडलेले आहेत; मात्र जे अधिक यशस्वी आहेत असे इतर काही उतावीळपणे मध्यभागातूनच प्रवाह पार करतात.'
इप्सितस्थळी पोचल्यानंतर मीरा यांनी त्या ठिकाणाचे वैशिष्ट्यपूर्ण व हुबेहूब चित्र रेखाटले. ‘बालाकोट हे लहानश्या टेकडीच्या एका बाजूभोवती मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे चिकटलेले एक मोठे गाव आहे. कागन खोऱ्याच्या तोंडाशीच ते वसलेले आहे. त्याच्यापाशी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. तुकड्यातुकड्यांनी असलेले खडकाळ पायरस्ते पायऱ्यांप्रमाणेच दिसतात, आणि बऱ्याचदा त्यांच्यामधून प्रवाह खाली वाहत येतो. बाजार खचाखच भरलेला आहे. खाली असणाऱ्या घरांची छते त्यांच्यावरच्या घरांच्या गच्च्या झाल्या आहेत. दुकानदारांपैकी बहुतेकजण हिंदू आणि शीख दिसतात.’
मीरा यांना असे सांगितले गेले की, बालाकोट येथे राहणारे गुजर मेंढपाळ 'त्यांच्या कळपाच्या लोकरीचे धागे काढून आणि विणून उत्तम प्रतीच्या चादरी बनवतात'. मात्र मीरा यांची निराशा झाली कारण गुजर त्या गावात नव्हते. ते त्यांच्या दरवर्षीच्या उन्हाळी स्थलांतरासाठी उंच पर्वतांवरील कुरणांमध्ये गेले होते. त्यांचा उतरलेला चेहरा पाहून त्यांच्यासोबत आलेल्या खुदाई खिदमतगारांचे प्रमुख अब्बास खान म्हणाले की, काही गुजरांना पुढच्याच दिवशी गावात घेऊन येण्याकरता ते काही निरोप्यांना पाठवतील. ते आले तेव्हा मीरा यांनी त्यांना ‘त्यांच्या लोकर उद्योगाविषयी अनेक प्रश्न विचारले’.
बालाकोट नंतर मीरा आणि त्यांचे सोबती पुढे पर्वतांमध्ये निघून गेले. भोगरमांग नावाच्या गावात त्यांनी मुक्काम केला. त्या गावात डोंगरउतारावर भाताची शेते व्यवस्थित रचलेली होती, शिवाय तिथे विणकाम आणि मधमाशीपालन देखील होते. मीरा याने प्रभावित झाल्या. त्यांनी असे लिहिले की, 'मात्र त्या गावातील इतर कशाहीपेक्षा कोणत्या गोष्टीने माझ्या हृदयाला उल्हसित केले असेल तर ती म्हणजे तिथे असणारी हिंदू-मुस्लिम एकता.’ त्यांना असे दिसले की, एका प्रेमळ, पिकलेल्या केसांच्या लहानखुऱ्या वृद्ध कुटुंबप्रमुखाचे हिंदू कुटुंब एका तरुण खान परिवाराशी जवळीकीचे संबंध ठेवून होते. खान यांनी सांगितल्यानुसार ते वृद्ध गृहस्थ त्यांच्या वडील आणि आजोबांचे मित्र होते. आणि त्यांनी हेही सांगितले की, हे दोन्ही समाज नेहमीच परस्पर सहकार्याच्या आणि एकमेकांची कदर करण्याच्या वातावरणात जगत आले आहेत. हे ऐकल्यानंतर मीरा यांनी असे लिहिले की, 'माझ्या हृदयात उस्फुर्तपणे ही प्रार्थना आली, 'या लहानश्या गावापर्यंत कोणताही 'नेता' पोहचू नये आणि त्यांचे मधुर व नैसर्गिक जीवन बिघडवू नये!'
हिंदू-मुस्लिम सुसंवादाचा आदर्श असणारे हे गाव मीरा यांच्या भेटीचे शेवटचे ठिकाण होते. पुढच्याच दिवशी सकाळी त्या ॲबोटाबादला जाण्यासाठी निघाल्या. काही आठवड्यांनंतर त्या गांधींकडे सेवाग्रामला परत आल्या. 1939 च्या सप्टेंबरमध्ये युरोपात दुसऱ्या जागतिक महायुद्धाला तोंड फुटले आणि त्याने इतिहास कायमचा बदलला. भारत आणि भारतीयांसाठीच्या लढ्याच्या परिणामांमध्ये हिंदू आणि मुस्लिमांत खोल दरी निर्माण होणे हादेखील एक होता; मीरा यांना ज्याची भीती होती त्याप्रमाणे 'नेत्यांनी' त्याला चिथावणी दिली होती आणि आणि आगीत तेल ओतले होते. असे नेते दोन्ही समाजांमध्ये मोठ्या संख्येने होते. लढा जसजसा पुढे गेला तशी सरहद्दीलगतच्या प्रांतात या जातींमध्ये एकेकाळी असणारी सुसंवादाची प्रेरणा पूर्णतः कोलमडली, त्याचसोबत गफार खान यांच्या पक्षाने प्रतिस्पर्धी मुस्लीम लीगसाठी मैदान जलदगतीने मोकळे केले. वायव्य सरहद्द प्रांताला पंजाबइतके रक्तरंजित दंगे अनुभवावे लागले नसले तरी 1947 च्या ऑगस्टनंतर पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंना आणि शिखांना पाकिस्तान सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला.
मीरा यांनी भेट दिलेले बालाकोट आता ओळखताच येणार नाही इतके बदलले आहे. त्याचा नैकधर्मी स्वभाव आता उरलेला नाही; उलटपक्षी, ते आता इस्लामी मूलतत्त्ववादाला उत्तेजन देणाऱ्या लढाऊंना प्रशिक्षण देणारे केंद्र बनले आहे. आता तिथला भूप्रदेशही नक्कीच वेगळा दिसत असेल; दक्षिण आशियातील इतर पर्वतीय प्रदेशांतही जंगले जलदगतीने विरळ होत चालली आहेत. दगडांनी आणि लाकडांनी बांधलेली आकर्षक अशी घरे काँक्रीटच्या कुरूप रचनांमध्ये परिवर्तित होत आहेत. आणि एकेकाळी भर जोमात असणारे हे कौशल्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
ऐतिहासिक स्मृतींमधला एक धागा या स्तंभाने प्रस्तुत केला, परंतु आता शेवट मी एका विचाराने करणार आहे ज्याबाबत वर्तमानकाळ भूतकाळातून धडा घेऊ शकतो. एकेकाळी वायव्य सरहद्द प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या खैबर पख्तूनख्वा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या प्रांतात आता केवळ मूठभरच हिंदू व शीख उरलेले आहेत. दुसऱ्या बाजूला भारतातील बहुतेक राज्यांत मुस्लीम अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणावर (आणि बरेचदा असुरक्षितही) आहेत. एखादा अशी आशा ठेवू शकतो का की, हिंदू आणि मुस्लिमांमधील 'परस्पर सहकार्यभावना व एकमेकांची कदर' जी मीरा यांनी बालाकोटच्या आसपास एकदा पाहिली होती; ती आपल्या देशातील गावांमध्ये खात्रीने प्रस्थापित होऊ शकेल? की आपले 'नेते' त्यात अडथळे आणतील?
(अनुवाद- सुहास पाटील)
- रामचंद्र गुहा, बेंगळूरू
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)
Tags: रामचंद्र गुहा बालाकोट मेडलिन स्लेड मीरा बहन महात्मा गांधी वायव्य सरहद्द प्रांत खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफार खान हिंदू-मुस्लिम Ramachandra Guha Balakot Madeleine Slade Mira Behn Mahatma Gandhi North West Frontier Provinces Khudai Khitmatgar Khan Abdul Ghaffar Khan Hindu-Muslim Load More Tags
Add Comment