जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या धोरणांना विरोध करतात, तसेच त्यांच्या पक्षाचा राजकीय पराभव करण्याचा प्रयत्न करतात... त्यांनी प्रथमतः हे समजून घ्यायला हवे की, नरेंद्र मोदींनी दोन लोकसभा निवडणुकांमध्ये इतका प्रभावी विजय कसा मिळवला आणि देशभरातल्या मतदारांच्या इतक्या मोठ्या समूहात ते इतके लोकप्रिय का आहेत?
एका प्रतिष्ठित विद्वान गृहस्थांनी मला लिहिले, "मला खरोखर असे वाटते की, जर एखाद्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना यशस्वीरीत्या करायचा असेल तर त्याने अत्यंत काळजीपूर्वकरीत्या त्यांची शक्तीस्थळे समजून घ्यायला हवीत. मोदींजवळ अनेक कौशल्ये आहेत आणि त्यांची अनेक सामर्थ्यस्थळे आहेत. त्यावर वरकडी म्हणजे त्यांची निरामय जीवनशैली, प्रचंड शारीरिक-मानसिक ऊर्जा आणि ध्येयाप्रति असलेली बांधिलकी. हे स्पष्टच आहे की, त्यांचं काम हाच त्यांचा विरंगुळा आहे... त्यामुळे कधीच सुट्टी न घेता ते सतत कामात गुंतलेले असतात.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्ताधीश म्हणून ते अत्यंत आत्मविश्वासाने वावरतात. जागतिक शिखर संमेलन असो नाहीतर रस्त्यालगतचे चहाचे दुकान... त्यांची उपस्थिती कुठेही अनुचित वाटत नाही.
तिसरी जमेची बाब म्हणजे त्यांचे प्रभावी वक्तृत्व. परिस्थितीनुसार संभाषण करण्याचे त्यांचे कौशल्य खरोखर विलक्षण आहे. 'मन की बात' करणारे पितामह, निवडणुकांच्या प्रचारसभेत भावनोद्दीपित भाषण करणारे राजनेते, जागतिक शिखर संमेलनातले मुत्सद्दी अशी त्यांची विविध रूपे आहेत. भाषेवर... प्रामुख्याने हिंदी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व आहे आणि परिस्थितीनुसार ते बोलीभाषेतल्या शब्दांचा आणि वाक्प्रचारांचा वापर त्यांच्या संभाषणात करतात. अत्यंत सहजगत्या वस्तुस्थितीचा विपर्यास करून खोटे बोलण्याची कला त्यांना अवगत आहे.
चौथा मुद्दा म्हणजे त्यांना अनेक गोष्टींत रुची आहे आणि त्यामुळेच त्यांना सर्व ताज्या घडामोडींची बित्तंबातमी असते. पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक शक्तिशाली आणि निर्दयी सहायक त्यांना गृहमंत्री म्हणून लाभला आहे."
हे विद्वान गृहस्थ आयुष्यभर मूलतत्त्ववादाचे विरोधक आणि लोकशाही-बहुलतावादाचे समर्थक राहिले आहेत. मोदी-शहांचे शासन त्यांना धोकादायक आणि फुटीरतावादी वाटते. माझे स्वतःचेही तेच मत आहे... मात्र या गृहस्थांनी लक्षात आणून दिले आहे की, आपल्यासारख्या लोकशाहीवादी आणि विविधतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींनी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, अशी कुठली गोष्ट आहे जिच्यामुळे आपण ज्याला विरोध करत आहोत तो नेता बहुसंख्य भारतीयांना इतका आकर्षक वाटतो?
हिंदुत्ववादाविरुद्धचा लढा हा विचारांचा लढा आहे. धार्मिक आणि भाषिक विविधता, लिंग-जातींची समानता, राज्यसत्तेची विधायक चिकित्सा, परकीय संस्कृती आणि सभ्यतेबद्दल उदारमतवादीपणा या आपल्या संविधानाच्या आधारशीलांवर त्यांना आक्रमण करायचे आहे... त्यामुळे या मूल्यांचा त्याग आणि पराजय होण्याचा धोका हिंदुत्वापासून संभवतो. या सर्व मूल्यांना पुनःप्रस्थापित करणे हे हिंदुत्वविरोधी लढ्याचे उद्दिष्ट आहे... मात्र हिंदुत्वाविरुद्धचा लढा हा अपरिहार्यपणे (हिंदुत्ववादी) व्यक्तिमत्त्वांविरुद्धचा लढाही बनतो. आता भारताच्या सार्वत्रिक निवडणुका या राष्ट्रपतीच्या निवडणुकीप्रमाणे अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित बनत आहेत. अशा स्थितीत ज्या व्यक्तीने 2014 आणि 2019 या वर्षांमध्ये नरेंद्र मोदींविरुद्ध अत्यंत दारुण पराभव पत्करला... ती 2024मध्ये यशस्वी होऊ शकेल?
जानेवारी 2013 मध्ये काँग्रेस मध्यवर्ती सत्तेत असताना पक्षाच्या वारसदाराच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीचे उघड पुनरावलोकन करून त्याबद्दल कोलकात्याच्या टेलीग्राफमध्ये लिहिलेल्या लेखात मी म्हटले होते, 'राहुल गांधींचे वर्णन अत्यंत सौम्य शब्दांत करायचे झाल्यास ते एक सहृदय, हौशी व्यक्ती आहेत. आपल्या प्रशासकीय क्षमतेचे कुठलेही प्रदर्शन त्यांनी आजवर केलेले नाही, त्यांनी कधीही मोठ्या आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, एखाद्या गंभीर समस्येबद्दल वचनबद्धतेने तोडगा शोधण्यासाठी आपली ऊर्जा व्यतीत केलेली नाही... किंबहुना कुठलीही गंभीर समस्या त्यांच्या ध्यानातही आली नाही.'
मी पुढे लिहिले, ‘श्रीयुत गांधी विद्यार्थिदशेत असते, एखाद्या खासगी क्षेत्रात नोकरी करत असते किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय चालवत असते तर त्यांच्या उथळ हौशीपणाने काही फरक पडला नसता... मात्र भारतातल्या सर्वाधिक मोठ्या, पुरातन आणि अद्यापही सर्वाधिक प्रभावशाली अशा राजकीय पक्षाच्या उपाध्यक्षासाठी, संभाव्य नेत्यासाठी आणि खरंतर पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी ही वृत्ती निश्चितच योग्य नाही.'
भारतीय राजकारणावर लिहिणाऱ्या लेखकांकडून हास्यास्पद, अविवेकी विधाने प्रसृत होण्याची शक्यता असते. त्यांत माझाही समावेश होतोच... पण माझ्या या एका समीक्षणावर मात्र मी ठाम आहे. साडेसात वर्षांनंतरही राहुल गांधींचा राजकारणातला उथळ हौशीपणा कायम आहे. हिंदीभाषक उत्तरप्रदेशातून तीन वेळा खासदारपद भूषवूनही अस्खलितपणे हिंदी बोलता न येणे हे त्यांच्या राजकीय उथळपणाचे सर्वाधिक ठळक लक्षण आहे.
2014 आणि 2019 या वर्षांच्या सार्वत्रिक निवडणुकांत राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या पराजयाचे एक कारण म्हणजे बहुसंख्य भारतीय ज्या भाषेत बोलतात ती भाषा ते अस्खलितपणे बोलू शकत नव्हते. नरेंद्र मोदी हिंदीवर निर्विवाद प्रभुत्व गाजवत असताना त्यांच्यासमोर राहुल गांधींची अडखळती, तोतरी हिंदी पूर्णतः विरोधाभासी वाटत होती. राहुल गांधींच्या पराभवाची इतरही काही कारणे होती. राहुल गांधींचा प्रशासकीय कामांतला अननुभव आणि ते घराणेशाहीच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात ही त्यांतली ठळक कारणे.
राहुल गांधी हे भारताच्या तीन भूतपूर्व पंतप्रधानांचे पुत्र, नातू, पणतू आहेत ही बाब अनेक भारतीयांच्या दृष्टीने जमेची नव्हे... कारण जन्मजात, वडिलोपार्जित वारशाच्या आधारावर मिळणाऱ्या विशेष हक्कांबद्दल बहुसंख्य भारतीयांच्या मनात अधिकाधिक नकारात्मक भावना निर्माण होत आहे. मोदी सरकारच्या धोरणांवर प्रतिक्रिया, टीका करताना तर ही बाब पूर्णतः गैरसोयीची आहे. जेव्हा राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष प्रसारमाध्यमांवर दडपण टाकल्याचा, त्यांचे दमन केल्याचा आरोप पंतप्रधान पंतप्रधानांवर आणि विद्यमान सरकारवर करतात करतो तेव्हा सत्ताधाऱ्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते - इंदिरा गांधींनी अणीबाणीत काय केले होते? पंतप्रधानांनी आपल्या सीमेत चीनला घुसखोरी कशी करू दिली? याबद्दल जेव्हा राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष विद्यमान सरकारला प्रश्न विचारतो तेव्हा सरकारची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते - 1962मध्ये जवाहरलाल नेहरूंनी चीनसमोर पत्करलेल्या शरणागतीचे काय? 2019मध्ये राहुल गांधींनी आपल्या पक्षाच्या निवडणूक प्रचारमोहिमेत 'चौकीदार चोर है' अशा घोषणेद्वारे पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची चूक केली. ही घोडचूक ठरली. त्याऐवजी 2014मध्ये जे 'अच्छे दिन' येण्याचे वचन सरकारने दिले होते... त्याचे काय झाले या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करायला हवा होता. अर्थात ज्या पंतप्रधानांचे नाव बोफोर्स घोटाळ्याशी जोडले गेले होते... त्यांच्या पुत्राने सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करावेत ही बाबही अतिमूर्खपणाचीच ठरली असती.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सभोवताली जमलेला खूशमस्कऱ्यांचा गोतावळा, गांधीपरिवाराची वर्षानुवर्षे अंधभक्ती करून राज्यसभेच्या आणि पक्षाच्या सचिवपदाच्या जागा मिळवणारी माणसे हे याच एका गोष्टीचे निदर्शक आहेत की, जोवर सोनिया किंवा त्यांची अपत्ये काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत राहतील तोवर पक्षाला भवितव्य नाही. दुसऱ्या बाजूला वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन व्यापक अर्थाने भारतीय लोकशाहीच्या हिताचा विचार केला असता हे स्पष्टच दिसून येते की, गांधी, नेहरू परिवारांशी संबंधित नसलेला मनुष्य विरोधी पक्षनेतेपदी असल्यास सरकारच्या वर्तमान धोरणांवरच्या त्याच्या टीकेच्या उत्तरादाखल मोदी सरकारला भूतकाळातल्या गांधी-नेहरूंच्या खऱ्याखोट्या चुकांकडे अंगुलीनिर्देश करून मूळ मुद्द्याला बगल देणे कठीण होईल. गांधी-नेहरू नसलेल्या काँग्रेस पक्षाध्यक्षाने अर्थव्यवस्थेतील गैरव्यवहार, कोरोना महामारी, प्रसारमाध्यमांचे दमन, चीनपुढील शरणागती या मुद्द्यांवर कठोर प्रश्न विचारल्यास विद्यमान सरकारला त्यांच्या उत्तरादाखल नेहरू, इंदिरा किंवा राजीव यांच्या चुकांबद्दल बोलणे कठीण जाईल आणि जर हा गांधीपरिवाराशी संबंधित नसलेला काँग्रेस पक्षाध्यक्ष अस्खलित हिंदी बोलत असेल, त्याला जनाधार असेल, सातत्याने कठोर परिश्रम करण्याची क्षमता त्याच्यात असेल... तर निवडणुकीतही त्याच्या पक्षाला उत्तम यश मिळू शकेल.
राहुल गांधी हे एक सहृदय, हौशी व्यक्ती आहेत असे मी म्हणालो होतो. आपल्या वारसाहक्कांविषयी द्विधा मनःस्थिती असलेली गांधी-नेहरू परिवारातली ती एकमेव व्यक्ती आहे आणि त्यामुळे किमान ते सहृदय आहेत. त्यांच्या मातोश्री आणि भगिनी या दोघीही कट्टर वंशवादी आहेत. आपल्या धोरणांवरच्या कुठल्याही टीकेच्या उत्तरादाखल 'मी इंदिरा गांधींची नात आहे' असे म्हटले की त्या टीका बंद व्हायला हव्यात असेच काहीसे प्रियांका गांधींना वाटते. पक्षावर आणि पर्यायाने देशावर आपल्या परिवाराचे राज्य असायला हवे याबद्दल सोनिया गांधींच्या धारणा अधिकच तीव्र आहेत. आपली माता आणि भगिनी यांच्या विपरीत राहुल गांधींचे याबाबतीतले वेगळेपण निश्चितच स्पृहणीय आहे. आपल्या परिवाराशी संबंधित नसलेल्या व्यक्तीची काँग्रेस पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात ते यशस्वी होतील का; पडद्यामागची सोनिया, राहुल, प्रियांका गांधीत्रयी अंकुश न ठेवता त्याला नेतृत्वाचे सर्वाधिकार देईल का हाही एक यक्षप्रश्न आहे.
गेल्या दोन दशकांपासून मी काँग्रेस पक्षाच्या घराणेशाहीचा टीकाकार आहे. मला पुन्हा टीका करावीशी वाटते... कारण काही कारणांस्तव आज कधी नव्हे तितकी ती आवश्यक आहे. गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे गंभीर नुकसान केले आहे. त्यांनी आणि त्यांच्या सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेचा ऱ्हास केला आहे, समाजात दुफळी निर्माण केली आहे आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उणावली आहे... आणि त्यांच्या विद्यमान कालखंडाची चार वर्षे अद्याप बाकी आहेत. भारतास आर्थिक, राजकीय आणि नैतिक पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी 2024मध्ये नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या पक्षाला सत्तेवरून पदच्युत करणे आवश्यक आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका उथळ, हौशी व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा देशापुढे प्रस्तुत केल्यास इच्छित परिणाम प्राप्त होण्याची शक्यता नगण्य आहे.
(अनुवाद- प्रगती पाटील)
- रामचंद्र गुहा, बेंगळूरू
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)
Tags: कॉंग्रेस घराणेशाही राहुल गांधी सोनिया गांधी नरेंद्र मोदी राजकारण हिंदुत्व हिंदुत्ववादी Ramchandra Guha Congress Family Dynasty Gandhi Family Rahul Gandhi Sonia Gandhi Narendra Modi Hindutva Amit Shah Load More Tags
Add Comment