पर्यावरणीय संकटासंदर्भात धर्माचं स्थान

पर्यावरणीय संकट केवळ तंत्रज्ञानाच्या वाईट उपयोजनामुळे किंवा वाईट तंत्रज्ञानामुळे निपजलेलं नसून वाईट कल्पनांमधून निपजलेलं आहे, असं प्राध्यापक नस्र मानतात.

पर्यावरणीय संकट सोडवण्यामध्ये विविध धार्मिक परंपरा कोणतं योगदान देऊ शकतात, याचं मूल्यमापन ‘रिलिजन अँड द ऑर्डर ऑफ नेचर’मध्ये केलेलं आहे. “जगभरातील धर्म परस्परांना संपन्न करतील आणि पृथ्वीला झालेल्या जखमांवर निसर्गाच्या पावित्र्यासंदर्भातील सामायिक परिप्रेक्ष्याच्या आधारे उपाय करतील”, अशी आशा नस्र व्यक्त करतात.

निसर्गाला मानवाने दिलेल्या गैरवागणुकीकडे लक्ष देणं हवामानाच्या संकटामुळे आपल्याला भाग पडलं आहे. पण भारताच्या पर्यावरणविषयक समस्या या अर्थातच केवळ जागतिक उष्णतावाढीतून निपजलेल्या नाहीत. उत्तर भारतातील शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेलं हवा प्रदूषण, निष्काळजीपणे बांधण्यात आलेले रस्ते व धरणं यांमुळे सध्या हिमालयात होत असणारा विध्वंस, घटत चाललेली भूजलपातळी, रसायनांमुळे दूषित होणारी माती, जैवविविधतेचा ऱ्हास- हे सगळं हवामानबदलाच्या अलाहिदा सुरू आहे. पर्यावरणविषयक गैरवर्तनाच्या विविध रूपांचा मानवी आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर अल्पकालीन पातळीवर विपरित परिणाम होतो. भारताने व जगाने निवडलेल्या आर्थिक प्रारूपाच्या दीर्घकालीन व्यवहार्यतेबाबतही यातून महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.

पर्यावरणीय आव्हानाशी कशा रितीने लढा द्यायचा याविषयीची पुस्तकं सध्या मुबलक प्रमाणात प्रकाशित होत आहेत. परंतु, 50 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका पुस्तकावर सदर लेखामध्ये लक्ष केंद्रित केलं आहे. हे पुस्तक असायला हवं तितकं प्रसिद्ध नाही, पण त्यातील आशयसूत्रं त्या काळी प्रस्तुत ठरणारी होती, आणि बहुधा आपल्या काळात ती अधिक प्रस्तुत ठरणारी आहेत.

‘मॅन अँड नेचर: द स्पिरिच्युअल क्रायसिस ऑफ मॉडर्न मॅन’ असं या पुस्तकाचं नाव होतं, आणि लेखक होते सय्यद हुसैन नस्र- ते त्या वेळी तेहरान विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. आता नव्वदीमध्ये असणाऱ्या नस्र यांचं आयुष्य विलक्षण रोचक व अत्यंत रचनात्मक राहिलं आहे. इराणमध्ये विद्वानांच्या व लेखकांच्या कुटुंबात जन्मलेल्या नस्र यांचं शिक्षण ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये व ‘हार्वर्ड’मध्ये झालं, आणि 1958 ला ते त्यांच्या मायदेशात परतले. पाश्चात्त्य राष्ट्रांमधील प्रतिष्ठित व चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव नाकारत ते तेहरानमध्ये शिकवू लागले, विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या आणि फार्सी व इंग्रजी भाषांमध्ये अनेक पुस्तकं लिहिली, त्याचप्रमाणे वेळप्रसंगी त्यांनी फ्रेंच व अरबी भाषांमध्येही लेखन केलं. परंतु, 1979 मधील इराणी क्रांतीमुळे त्यांना स्वतःच्या मायदेशातून बाहेर पडावं लागलं, कारण सत्ताधारी अयातोल्लाहांना स्वतंत्र विचार मानवत नव्हते. तेव्हापासून नस्र यांनी अमेरिकेतील काही विद्यापीठांमध्ये शिकवणं सुरू ठेवलं आणि त्याच वेळी वैचारिक इतिहासाच्या क्षेत्रांमध्ये व विशेषतः तुलनात्मक धर्माच्या क्षेत्रातील त्यांचं लेखनकार्यही मोठ्या प्रमाणात सुरू राहिलं.

पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये पर्यावरणविषयक गैरवर्तनाबाबत वाढती जागरूकता दिसते, पण “सर्वसाधारणतः या उघड समस्यांचं विश्लेषण करणारे लोकच ‘विकास’ पुढे नेण्याच्या गरजेविषयी बोलतात, किंवा ऐहिक अस्तित्वातून अंगावर आलेल्या परिस्थितीमधील ‘मानवी दुर्दशे’विरोधात युद्ध गरजेचं असल्याचं मानतात. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, मानव आणि निसर्ग यांच्यातील समतोलाचा विध्वंस झाल्यामुळे उद्भवलेल्या समस्या नष्ट करण्यासाठी निसर्गावर आणखी विजय मिळवावा व त्याला अंकित करावं, अशी त्यांची इच्छा असते... मोजक्याच लोकांची वास्तवाला सामोरं जाण्याची तयारी आहे. निसर्गाकडे आणि एकंदर नैसर्गिक पर्यावरणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आक्रमकतेचा व युद्धाचा राहील तोपर्यंत या समाजात शांतता शक्य नाही, ही वस्तुस्थिती स्विकारायला बहुतेक जण तयार नसतात,” अशी टिप्पणी प्राध्यापक नस्र यांनी ‘मॅन अँड नेचर’च्या सुरुवातीला केली आहे.

शिकागो विद्यापीठात 1966 च्या उन्हाळ्यात दिलेल्या भाषणांवर ‘मॅन अँड नेचर’ हे पुस्तक आधारलेलं आहे. त्यामुळे या पुस्तकाचा मुख्य अपेक्षित श्रोता व वाचक पाश्चात्त्य, त्यातही अमेरिकी होता. परंतु, भारत व चीन यांसारख्या देशांच्या विकासविषयक धोरणांनी उत्साहाने पाश्चात्त्य नमुने स्वीकारले असल्यामुळे नस्र यांनी दिलेले धोक्याचे इशारे आपल्यालाही लागू पडणारे आहेत.

पर्यावरणविषयक समस्येची मुळं कल्पनांच्या प्रांतात रुजलेली असल्याचं प्रतिपादन नस्र करतात. ‘निसर्गावर आपली संपूर्ण अधिसत्ता आहे, आणि आपल्याला योग्य वाटेल त्या रितीने निसर्गाचा वापर व गैरवापर करणं आणि निसर्गाला अंकित करून त्यावर वर्चस्व गाजवणं याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे’, असं आधुनिक माणूस अहंकाराने मानत आला. “निसर्गावर वर्चस्व गाजवण्याच्या या वृत्तीमुळेच अतिरिक्त लोकसंख्या, ‘श्वास घ्यायला जागा’ नसणं, शहरी जीवनातील कोंडी व घनीभवन, सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांचं संपत जाणं, नैसर्गिक सौंदर्याचा विनाश, यंत्रं व त्याच्या उत्पादनांद्वारे जिवंत पर्यावरणाची हानी करणं, मानसिक आजारांमध्ये झालेली असाधारण वाढ आणि इतर हजारो अडचणींपैकी काही अडचणी पूर्णतः दुर्धर असल्यासारख्या वाटतात,” असं नस्र यांनी लिहिलं आहे.

प्राध्यापक नस्र पुढे लिहितात, “आधुनिक माणसाची निसर्गावरील वर्चस्वाची भावना आणि निसर्गाविषयीची भौतिक संकल्पना यांचा कमी-अधिक संयोग होऊन माणूस लोभापोटी व हावेपोटी पर्यावरणाकडून अधिकाधिक मागणी करू लागतो.” “विशेषतः सुविकसित अमेरिकेत गोष्टींमधील शक्यता अमर्याद असल्याची धारणा दिसते, जणू काही रूपांचं जग मर्यादित नसून त्या रूपांच्या मर्यादांनीच बांधीव झालेलं असतं, अशी ही धारणा आहे,” याबद्दल नस्र नाराजी व्यक्त करतात.

अर्थव्यवस्था ही स्वतंत्र विद्याशाखा म्हणून विकसित झाल्यामुळे ‘माणूस आणि त्याचं सामर्थ यांमधील अमर्याद ताकदी’ची ही भ्रामक जाणीव निर्माण झाली, कारण या विद्याशाखेमध्ये ‘माणूस हा केवळ भौतिक गरजा असलेला जीव मानला जातो’, असं प्रतिपादन प्राध्यापक नस्र करतात. आधुनिक विज्ञान व आधुनिक अर्थशास्त्र या दोघांनीही माणसाला नैतिक वा आध्यात्मिक संयमाच्या कल्पनेपासून दूर नेलं. निसर्गाचा ‘शक्य तितका पूर्ण वापर करावा व उपभोग घ्यावा’, ‘निसर्गाविषयी कोणतंही दायित्व व जबाबदारी न मानता त्याचा लाभ घ्यावा’, अशा धारणांना या आधुनिक विषयांनी प्रोत्साहन दिलं. मानवाला पुढेही टिकून राहायचं असेल, तर निसर्गासोबत कसं जगायचं हे नव्याने शिकावं लागेल, त्यामुळे निसर्गाच्या पावित्र्याची जाणीव पुनर्प्रस्थापित करण्यासाठी धारणा व आचरण यांच्या आधुनिकेतर व्यवस्था आवश्यक आहेत (असं प्राध्यापक नस्र मानत होते).

‘मॅन अँड नेचर’ची पहिली आवृत्ती 1968 मध्ये प्रकाशित झाली, तेव्हा सय्यद हुसैन नस्र तेहरानमध्येच राहत होते. एका दशकाने त्यांनी इस्लामी कट्टरतावाद्यांनी देश सोडायला भाग पाडलं. नस्र यांनी अमेरिकेत स्वतःचं जगणं पुन्हा उभारलं, आणि तिथे इतर विषयांवरील पुस्तकं लिहून प्रकाशित केल्यावर अखेरीस त्यांनी ‘मॅन अँड नेचर’मधील आशयसूत्रांची हाताळणी करणारं आणखी एक पुस्तक लिहिलं. ‘रिलिजन अँड द ऑर्डर ऑफ नेचर’ अशा शीर्षकाचं हे पुस्तक 1996 मध्ये प्रकाशित झालं. त्यात नस्र असं प्रतिपादन करतात की, आधुनिक पाश्चात्त्य जगामधील ‘इहवादी मानवतावाद व ऐहिक मानवाचं निरंकुशत्व’ यांचा मानवी व नैसर्गिक इतिहासावर ‘प्रमाणाबाहेर परिणाम’ झाला, कारण “निसर्ग व त्याच्या शक्ती यांवरील वर्चस्वाला आता कोणताही धार्मिक आळा उरलेला नाही, मग संपत्ती कमावण्यासाठी निसर्गाला अंकित करायचं असू दे वा इतर सभ्यतांवर विजय मिळवणं असू दे किंवा या दोन्ही गोष्टी करायच्या असू देत, त्याला काही धरबंध उरला नाही.” “निसर्गाच्या पावित्र्यावर विश्वास ठेवणारा, जवळपास सर्वत्र दिसणारा दृष्टिकोन बाजूला ठेवून निसर्गापासून माणसाला दूर नेणारा आणि निसर्गाला जीवनाचा पूर्वज न मानणारा दृष्टिकोन” मानवी समाजाने स्वीकारला, या दृष्टिकोनामध्ये “निसर्गाकडे केवळ निर्जीव वस्तुमात्र म्हणून पाहिलं जातं आणि निव्वळ ऐहिक माणसाने त्यावर वर्चस्व मिळवून त्याचा सोयीसाठी वापर करायला हवा असं मानलं जातं,” असं नस्र या दुसऱ्या पुस्तकात लिहितात.

पर्यावरणीय संकट सोडवण्यामध्ये विविध धार्मिक परंपरा कोणतं योगदान देऊ शकतात, याचं मूल्यमापन ‘रिलिजन अँड द ऑर्डर ऑफ नेचर’मध्ये केलेलं आहे. “जगभरातील धर्म परस्परांना संपन्न करतील आणि पृथ्वीला झालेल्या जखमांवर निसर्गाच्या पावित्र्यासंदर्भातील सामायिक परिप्रेक्ष्याच्या आधारे उपाय करतील”, अशी आशा नस्र व्यक्त करतात.

आजच्या तंत्रज्ञानीय आशावाद्यांविरोधात जाणारा हा दृष्टिकोन आहे. सौरऊर्जा, हायड्रोजन व पवनऊर्जा यांसारख्या ऊर्जेच्या नवीन स्त्रोतांद्वारे पर्यावरणीय संकटावर उपाय करायला हवा आणि पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या गाड्यांकडे वळायला हवं, कार्बन-कॅप्चर व जिओ-इंजिनियरिंगचा वापर करायला हवा, असं तंत्रज्ञानीय आशावादी मानतात. ‘क्लायमेट कॅपिटलिझम’ अशा सूचक नावाचं अलीकडेच प्रकाशित झालेलं आणि जगातील सर्वोच्च स्थानावरील काही अब्जाधीश तंत्रज्ञांनी प्रशंसा केलेलं पुस्तक अशा अभिनव शोधांना वस्तुरूप देणारं आहे. माणूस “हवामानबदलाची समस्या जगातील प्रभुत्वशाली आर्थिक व्यवस्थेअंतर्गत (म्हणजे भांडवलशाही अंतर्गत) हाताळू शकतो आणि प्रगती ठप्प होणार नाही याची खातरजमा करू शकतो,” असा दावाही त्यात आत्मविश्वासाने करण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूला, पर्यावरणीय संकट केवळ तंत्रज्ञानाच्या वाईट उपयोजनामुळे किंवा वाईट तंत्रज्ञानामुळे निपजलेलं नसून वाईट कल्पनांमधून निपजलेलं आहे, असं प्राध्यापक नस्र मानतात. “सध्याचं संकट हे मुख्यत्वे निसर्गाविषयीची शहाणीव लोप पावल्यामुळे आणि आंतरिक आध्यात्मिक पेचांमुळे उद्भवलेलं आहे, ते केवळ वाईट अभियांत्रिकीतून निपजलेलं नाही,” असं ते लिहितात.

मला या दोन्ही दृष्टिकोनांविषयी सहानुभूती वाटते, आणि दोन्ही दृष्टिकोन पक्षपाती वाटतात. अपरंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातील नवनवीन शोधांचं स्वागत व्हायला हवं; आणि निसर्गाविषयी अधिक काळजी घेणारा दृष्टिकोनही अंगीकारायला हवा. जीवनशैलीनेही अर्थातच फरक पडतो. अब्जाधीशांना त्यांची खासगी विमानं, त्यांच्या खासगी नौका, अनेक खंडांमधील त्यांची प्रचंड मोठी घरं न सोडता हवामानबदलाला आळा घालण्याची इच्छा आहे. त्याच वेळी समकालीन जगामध्ये धर्म हा अनेकदा सौहार्दाऐवजी संघर्षाचा स्त्रोत ठरतो आहे. काही विशिष्ट व्यक्ती त्यांच्या धर्मश्रद्धेच्या शिकवणुकीमुळे पृथ्वीशी अधिक सौम्यपणे वागण्याची शक्यता आहे, पण इतर अनेक जण स्वतःच्या धर्मश्रद्धेचा आधार घेत हिंसाचाराला व युद्धाला प्रोत्साहन देण्याची शक्यताही जास्त असते. बुद्ध, फ्रान्सिस ऑफ सिसी व महात्मा गांधी या काही अत्यंत मोजक्या धार्मिक व्यक्तिमत्त्वांनी पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार नीतिमत्तेला चालना देण्यासाठी धर्मश्रद्धेचा अर्थबोध यशस्वीरित्या मांडला आणि त्याच वेळी आंतरवैयक्तिक व आंतरसामुदायिक सहानुभूती निर्माण करण्यासाठीही प्रयत्न केला.


हेही वाचा : जगाच्या बचावासाठी स्थानिक कृतीचं महत्त्व - रामचंद्र गुहा


तंत्रज्ञानीय अभिनवतेद्वारे माणसांना अधिक आरामदायक जीवनशैली लाभेल, ही गैरसमजुतीवर आधारलेली धारणा प्राध्यापक नस्र यांनी उत्कृष्टरित्या उलगडून दाखवली आहे. आध्यात्मिक बदलाविषयी त्यांनी केलेलं आवाहन प्रशंसनीय आहे. पण कदाचित स्वतः (प्रचलित अर्थाने) धार्मिक नसतानासुद्धा निसर्गाचा आदर राखणारी नीतिमत्ता व नैसर्गिक संसाधनांच्या वापरामधील संयम जोपासणं शक्य आहे. शेवटी, पर्यावरणीय संकटाविषयी सजग होण्यासाठी मूलगामी संस्थात्मक बदलही आवश्यक आहेत - अधिक विकेंद्रित, अधिक पारदर्शक, प्रतिनिधित्वाची व शासनाची अधिक योग्य लोकशाही  रूपं आवश्यक आहेत. निवडणुकांसाठीचा निधीपुरवठा कसा असावा, निवडणुका कशा लढल्या जाव्यात व त्यात कोण जिंकावं, सत्ताधारी पक्षाने कोणत्या धोरणांना व कायद्यांना चालना द्यावी, माध्यमांनी काय बोलावं आणि कशाचं वार्तांकन करू नये, हे कोळशाच्या व पेट्रोकेमिकलच्या क्षेत्रातील कंपन्या ठरवणार असतील तर, अशी राजकीय व्यवस्था पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार राहण्याची शक्यता नाही.

(अनुवाद : प्रभाकर पानवलकर)

- रामचंद्र गुहा, बंगळूरू
ramachandraguha@yahoo.in
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: पर्यावरण रामचंद्र गुहा मराठी लेख सय्यद हुसैन नस्र मॅन अँड नेचर seyyed hossein nasr religion and order of nature ramchandra guha environment religion Load More Tags

Comments:

Manjiri Deshmukh

अतिशय उपयुक्त व उपयोगी माहीती माझ्या सारख्या साध्या शिक्षकाला हे ज्ञानाच वरदानच ! ही माहीती अधिकाधिक विद्याथ्यॅापयॅंत पोहचवण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद

Add Comment