आपल्याला सहा पदरी संकटाचा मुकाबला करायचा आहे

फोटो सौजन्य: pmindia.gov.in

ऑगस्ट 1947 मध्ये जन्माला आलेला भारत देश आतापर्यत अनेक कठीण प्रसंगांना सामोरा जात आलेला आहे. देशाच्या फाळणीमुळे वाट्याला आलेल्या यातना, 1960 च्या दशकातील दुष्काळ व युद्धे, 1970 च्या दशकात इंदिरा गांधींनी लादलेली राष्ट्रीय आणीबाणी, आणि 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात व 1990 च्या दशकाच्या पूर्वार्धात झालेल्या धार्मिक दंगली, हे सर्व इथे ध्यानात घेतले पाहिजे.  

पण सध्याचा काळ आपल्या देशासाठी सर्वाधिक आव्हानात्मक काळ ठरू शकतो. याचे कारण, COVID-19 या साथीच्या रोगाने देशासमोर किमान सहा निरनिराळी संकटे निर्माण केलेली आहेत.  ती कोणती ते पुढे पाहू. 

पहिले आणि अगदी उघड संकट आहे वैद्यकीय क्षेत्रासमोरील संकट. कोरोना संसर्गित नागरिकांची संख्या जसजशी वाढत आहे तसतसा आधीच कमकुवत असलेल्या आणि क्षमतेपेक्षा अधिक भार पडलेल्या आपल्या स्वास्थ्य प्रणालीवरील दबावही वाढत आहे. त्याचवेळी, क्षयरोग, हृदयविकार, उच्च रक्तदाब इत्यादी त्रास असणाऱ्या लाखो भारतीयांना डॉक्टर आणि दवाखान्यांतून जी आरोग्य सेवा एरवी अगदी सहज उपलब्ध होऊ शकली असती, त्यासाठी त्यांना आता बऱ्याच खस्ता खाव्या लागतील. कारण या साथीच्या रोगाला हरवण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित झाल्याने इतर अनेक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष होण्याचीही शक्यता आहे.

याहून अधिक काळजीची बाब आहे देशात दरमहा जन्माला येणाऱ्या लाखो नवजात अर्भकांविषयीची. गेल्या काही वर्षांमध्ये नवजात अर्भकांच्या लसीकरणाची एक संस्थात्मक रचना आपल्याकडे उभी करण्यात आलेली आहे, जेणेकरून अनेक प्राणघातक रोगांपासून (जसे की गोवर, गालगुंड, पोलिओ, घटसर्प) नवजात अर्भकांचे रक्षण केले जाईल. पण आता संपूर्ण लक्ष COVID-19 वर वळवल्यामुळे राज्य सरकारे आपल्या सर्वांत अल्पवयीन नागरिकांना लसीकरण पुरवण्यात कमी पडत आहेत, असा काही अहवालांचा निष्कर्ष आहे. 

दुसरे आणि अगदी स्वाभाविक संकट म्हणजे – आर्थिक संकट.  वस्त्रोद्योग, विमानसेवा, पर्यटन आणि आदरातिथ्य (hospitality) अशा रोजगार निर्मिती करणाऱ्या व्यवसायांचे या महामारीने प्रचंड नुकसान केलेले आहे.  इतकेच नव्हे तर या लॉकडाऊनचा असंघटित क्षेत्रावर जास्त परिणाम झालेला आहे, लाखोंच्या संख्येने मजूर, विक्रेते आणि कारागीर बेरोजगार झालेले आहेत. या वर्षी मार्च महिन्यापर्यंत सात टक्के असणारा बेकारीचा दर या महामारीत 25 टक्क्यांपर्यंत पोचल्याचा अंदाज भारतीय अर्थव्यवस्था निरीक्षण केंद्राने (The Centre for Monitoring Indian Economy) वर्तवला आहे.  

एकीकडे आपल्यापेक्षा श्रीमंत आणि अधिक चांगल्या पद्धतीने देश चालवणाऱ्या पश्चिम युरोपात सध्या बेरोजगार झालेल्या नागरिकांना या महामारीत तग धरून राहता यावे यासाठी पुरेशी आर्थिक मदत केली जात आहे. तर दुसरीकडे तुलनेने गरीब आणि दुय्यम व्यवस्थापन असणाऱ्या आपल्या प्रजासत्ताक देशामध्ये मात्र या निराधारांना राज्यांकडून अल्पशी मदत मिळत आहे.

मानवतेसमोरील संकट हे आपल्याला भेडसावणारे तिसरे मोठे संकट आहे. भारतातील या महामारीचे चित्र स्पष्ट करणारे, आपापल्या मूळ गावी परतण्यासाठी मैलोन् मैल पायी निघालेल्या स्थलांतरितांचे फोटो आणि व्हिडीओ फक्त दिसतील. 

या महामारीचे गांभीर्य लक्षात घेता तात्पुरता देशव्यापी लॉकडाऊन अनिवार्य होता हे मान्य केले, तरी त्याचे नियोजन अधिक हुशारीने करता आले असते हेही तितकेच खरे आहे. लाखो भारतीय स्थलांतरित आहेत, ते आपले गाव सोडून दूरच्या शहरात येऊन काम करतात आणि त्यांची कुटुंबे तिथेच त्यांच्या मूळ गावी राहत असतात हे भारतीय जीवनमानाविषयी प्राथमिक समज असणाऱ्या कोणालाही ठाऊक असायला हवे. ही वस्तुस्थिती पंतप्रधानांना किंवा त्यांच्या सल्लागारांना अविश्वसनीय कशी वाटली.

पंतप्रधानांनी एक आठवडा (चार तास नव्हे) आधी लॉकडाऊनची सूचना नागरिकांना दिली असती आणि या काळात पूर्वीप्रमाणेच नियोजित रेल्वे, बस सेवा सुरु राहतील अशी हमी दिली असती, तर ज्यांना आपापल्या घरी परतायचे होते ते सुरक्षित आणि आरामशीर प्रवास करून आपापल्या घरी पोहोचले असते. 

तज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनचा आराखडा काटेकोरपणे न आखल्यामुळे सार्वजनिक आरोग्याची समस्येची तीव्रता वाढली आहे. बेरोजगार झालेल्या नागरिकांना मार्च महिन्यातच आपापल्या गावी जाऊ द्यायला हवे होते, जेव्हा त्यांच्यातील काहीजणच कोरोना संक्रमित होते. पण आता दोन महिने उलटून गेल्यानंतर सरकार अपराधी भावनेने त्यांच्यासाठी रेल्वेची व्यवस्था करत आहे, तेव्हा आता त्यातील हजारो नागरिक कोरोनाचा संसर्ग गावोगाव घेऊन जाण्याची शक्यता आहे. 

देशाला भेडसावणारे मानवतेसमोरील संकट हे मोठ्या सामाजिक संकटाचाच एक भाग आहे. COVID-19 येण्याच्या फार आधीपासूनच भारतीय समाज जाती व वर्ग यांमध्ये विभागाला गेला आहे, आणि धर्माच्या बाबतीत पूर्वग्रहाने ग्रासलेला आहे. त्यात ही महामारी आणि तिची अयोग्य हाताळणी यांमुळे ही दरी आणखीच वाढली आहे. कोरोना संकटाचे ओझेदेखील व्यस्त प्रमाणत विभागले गेले आणि आधीच आर्थिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या वर्गावर त्याचा अधिकाधिक भार लादला गेला. 

दरम्यान सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षाच्या खासदारांनी (आणि दुर्दैवाने वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी) कोरोनाच्या काही प्रकरणांचे ज्या पद्धतीने चित्र रेखाटले त्यामुळे भारतात मुळात अस्थिर असणाऱ्या मुस्लीम अल्पसंख्याकांना अधिकच असुरक्षित वाटू लागले आहे. कुठलीही शहानिशा न करता भारतीय मुस्लिमांवर कोरोना संसर्गासंबंधी कलंक लागला तेव्हा पंतप्रधानांनी मौन पत्करणे पसंत केले. आखाती देशांकडून जेव्हा यावर मोठ्या प्रमाणत टीका होऊ लागली तेव्हा ‘संसर्गाला धर्म समजत नाही’ असे वेदनाशामक प्रतिपादन त्यांनी केले. पण सत्ताधारी पक्षाने आणि त्यांच्या ‘गोदी मिडिया’ने पेरलेले विष तोपर्यंत देशभरातल्या सामान्य भारतीयांच्या जाणिवांत पुरते मुरलेले होते. 

चौथे संकट पहिल्या तीन संकटाइतके ठळक नाही. पण तरीही ते बरेच गंभीर ठरू शकते. ते म्हणजे हळूहळू पसरत जाणारे मानसिक संकट. बेरोजगार झालेल्या, नाईलाजाने पायी घरी जावे लागलेल्या लोकांनी जी शहरे सोडली आहेत तिथे परत येण्याचा आत्मविश्वास कदाचित त्यांच्यामध्ये कधीच येणार नाही.  

आणखी विशेष काळजी आहे ती येणाऱ्या काळात एकट्याने लढा द्याव्या लागणाऱ्या शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची. प्रौढ लोकांमध्येसुद्धा वाढत्या आर्थिक असुरक्षिततेमुळे औदासिन्य आणि इतर मानसिक आजार मूळ धरू शकतात आणि त्याचा खोल परिणाम त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर होऊ शकतो. 

पाचवे संकट म्हणजे भारतीय संघराज्यावादाचे कमकुवत होणे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी केंद्र सरकारला गैरवाजवी टोकाचे अधिकार स्वतःकडे घेण्याचा अधिकार बहाल करतात. किमान कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या महिन्यांत तरी राज्य सरकारांना आवश्यक तेवढी स्वायतत्ता देण्यात आली नाही, अन्यथा ते स्थानिक पातळीवर त्यांच्या पद्धतीने  या संकटाशी दोन हात करू शकले असते. या काळात केंद्र सरकार मात्र मनमानी आणि प्रसंगी परस्पर विरोधी सूचना जारी करत राहिले. दरम्यान राज्य सरकारांकडे केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक संसाधनांचा तुटवडा निर्माण झाला, जीएसटी मधील राज्य सरकारांचा हक्काचा हिस्सादेखील केंद्राने दिला नाही. 

सहावे संकट – बऱ्याच अंशी पाचव्या संकटाशी जोडलेले आहे – ते म्हणजे भारतीय लोकशाही कमकुवत होणे. या महामारीचा फायदा घेत बुद्धिवाद्यांना आणि आंदोलकांना बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम (UAPA) सारख्या कडक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. संसदेत चर्चा केल्याविना अनेक अध्यादेश मंजूर करण्यात आले आणि अनेक धोरणात्मक निर्णयही घेण्यात आले. वर्तमानपत्र आणि टीव्ही वाहिन्यांच्या मालकांवर त्यांनी सरकारवर टीका करू नये म्हणून दबाव आणण्यात आला. दरम्यान राज्यसंस्था आणि सत्ताधारी पक्ष पंतप्रधानांचा वैयक्तिक पंथ (personality cult) पुढे घेऊन जाण्याचे कार्य करत राहिले. आणीबाणीच्या काळात ‘इंदिरा म्हणजे इंडिया आणि इंडिया म्हणजे इंदिरा’ असे म्हणणारी देवा कांत बारूह ही एकमेव व्यक्ती होती. मात्र आता केंद्रीय मंत्र्यांमध्ये पंतप्रधानांचे अवाजवी गोडवे गाण्याची चढाओढच लागलेली दिसते.
 
भारतातील आरोग्य व्यवस्थेवर क्षमतेपेक्षा अधिक भार पडला आहे, भारताची आर्थिक व्यवस्था ढासळू लागली आहे, भारतीय समाज दुभंगलेला आणि ठिसूळ झालेला आहे, भारतीय संघाराज्यवाद पूर्वीपेक्षा कमकुवत झालेला आहे, भारताचे सरकार दिवसेंदिवस हुकुमशाहीकडे वाटचाल करते आहे – या सगळ्यांच्या एकत्रित परिणामांमुळेच कोरोनाचे हे संकट देशासाठी फाळणीनंतरचे सर्वांत मोठे संकट ठरू लागले आहे. 

आपली अर्थव्यवस्था, समाज आणि राज्यसंस्था बऱ्यापैकी शाबूत ठेवत एक देश म्हणून या अतिशय अवघड काळातून आपण सहीसलामत कसे बाहेर येऊ शकू? सध्या देश ज्या अनेक संकटांतून जात आहे त्यांच्या सर्व (आणि एकमेकांशी जोडल्या गेलेल्या) परिमाणांचा विचार सरकारने सर्वांत आधी करायला हवा. 

दुसरे म्हणजे, 1947 मध्ये नेहरू आणि पटेलांनी जी पाऊले उचलली, त्यातून सध्याच्या सरकारने धडा घ्यायला हवा. नेहरू आणि पटेलांना त्यावेळी देशासमोरील संकटाची तीव्रता लक्षात आली, आणि त्यांनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या त्यांच्या पूर्वीपासूनच्या विरोधकांना मंत्रिमंडळात स्थान दिले. त्या पद्धतीचे राष्ट्रीय सरकार उभे करणे आता कदाचित शक्य होणार नसले तरी विरोधी पक्षातील क्षमता आणि कौशल्य असणाऱ्या नेत्यांशी सल्लामसलत करण्यापासून पंतप्रधानांना कोणीही अडवलेले नाही.

तिसरे, केवळ नाट्यमय परिणाम देणारे निर्णय घेण्याऐवजी पंतप्रधानांनी अर्थ, विज्ञान, आणि सार्वजनिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा आदर करण्यास आणि त्यांच्या सल्ल्यांनुसार निर्णय घेण्यास शिकले पाहिजे. चौथे म्हणजे केंद्र आणि सत्ताधारी पक्ष यांनी भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यांच्या हात धुवून मागे लागणे सोडून दिले पाहिजे. पाचवे, प्रशासकीय सेवा, लष्करी दल, न्यायसंस्था आणि विविध तपास संस्था यांना सत्ताधीशांच्या हातातले बाहुले न बनवता त्यांची स्वायत्तता एकमताने टिकवली पाहिजे. 

भूतकाळ आणि वर्तमानाची मला जेवढी समज आहे त्यावर आधारित हे सल्ले मी दिलेले आहेत. ‘हे साधेसुधे संकट नाही तर कदाचित आपल्या प्रजासत्ताक इतिहासातील हे सर्वांत मोठे आवाहन असू शकेल’ याचा पुन्हा पुन्हा उच्चार करत राहणे एवढेच माझ्या हातात राहते. या संकटातून सुटका करून घेण्यासाठी आपले शहाणपण, सर्व संसाधने आणि सगळी करुणा इत्यादींची गरज भासणार आहे. 

(अनुवाद- मृदगंधा दीक्षित) 

- रामचंद्र गुहा

Tags: रामचंद्र गुहा कोरोना COVID-19 नरेंद्र मोदी मृदगंधा दीक्षित Ramchandra Guha Corona Narendra Modi Load More Tags

Comments:

Arun kolekar

नेमके विश्लेषण. समस्या आणि उपाययोजनासह विवेचन.

Mayuri mohite

True words about current situation.

Govardhan Garad

True thoughts on present situation.

sanjay bagal

nice article

Krushna hambarde

Nice analysis of current crucial affect in India in corona ers

Add Comment

संबंधित लेख