सुप्रशासक तत्त्वज्ञानी राणी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त (31 मे 2025)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ३१ मे २०२५ पासून मोठ्या जोशात साजरी होतेय. लोकोत्तर ठरणाऱ्या महान गुणांच्या जोरावर त्यांनी मध्य भारतात माळवा प्रांतात आणि भारतवर्षातील जनतेच्या मनात अमीट ठसा उमटवला. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय यांच्या परंपरेतील लोककल्याणराज्याचा वारसा अहिल्यादेवींनी पुढे नेला. छत्रपती शिवरायांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि सर्वसमावेशकतेचा आचार समोर ठेवून अहिल्यादेवींनी तीस वर्षे राज्यकारभार केला. राज्यकर्त्यांने लोकांमध्ये राहिले पाहिजे, लोकांसाठी जगले पाहिजे हा कल्याणकारी राजकीय विचार अहिल्यादेवी जगल्या.

अहिल्यादेवी होळकरांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या खेड्यात झाला. माणकोजी शिंदे-पाटील यांची ही मुलगी. लहानपणापासूनच धाडसी. राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ होते. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी छोट्या अहिल्येला आपली सून करून घेतली. तिला प्रशासनाची व्यवस्था शिकवली, तिच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या. मल्हाररावांनी त्यांना राज्यकारभाराची सर्व सूत्रे शिकवली आणि अहिल्यादेवींनी ती उत्तम आत्मसात केली, आणि पुढचा विचार केला. त्यांनीही मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला. होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविली. ज्याच्याकडे बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, अशी अहिल्यादेवी होळकर यांची धारणा होती. राजाने प्रजासेवा हीच देवपूजा मानावी या उदात्त विचारांनी त्यांनी राज्य केलं. त्यांच्या राज्यकारभारात याचे प्रतिबिंब ठायी ठायी दिसते.

सती जाण्यापेक्षा त्यांनी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या आग्रहावरून जनहित महत्त्वाचे मानले. अहिल्यादेवी म्हणत, ‘‘सती जाणे कोणत्या शास्त्रात नाही आणि सती गेल्याने कोणताही मोक्ष किंवा पुण्य मिळत नाही.अशा परंपरेची पद्धत बंद केली पाहिजे.’’ सती प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. 

अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीत दत्तक वारस कायदा मंजूर करून घेतला. आपल्या राज्यातील लोकांना जाती किंवा धर्माच्या नावाखाली अस्पृश्यता पाळण्यावर बंदी घातली. सर्वांना समान वागणूक दिली. पुढील काळात महात्मा फुले यांनी आपल्या शाळेचे नाव ‘अहिल्या आश्रम’ ठेवले आणि राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठीच्या दवाखान्याला ‘अहिल्या स्मरणार्थ दवाखाना’ असे नाव दिले. यावरून अहिल्यादेवींच्या विचारांची कल्पना यावी.

अहिल्यादेवींनी जंगलतोडीवर कुऱ्हाडबंदी आणली. घरातील प्रत्येक माणसाच्या नावावर पाच झाडे असे गणित देऊन झाडे लावून घेतली. जे झाडे लावत नाहीत त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा आदेश काढला. आपल्या स्वत:च्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून स्वत:च्या घरापासून सुधारणेची सुरुवात केली.

परराज्यांशी सलोख्याचे संबंध राहावे म्हणून त्यांनी पंधरा राज्यांत आपले वकील नेमले होते. इतर राज्यांतील नऊ वकील होळकर राज्याच्या दरबारात होते. अहिल्यादेवींनी निर्माण केलेल्या प्रशासन व्यवस्थेत प्रजेची उन्नती व विकास, सामाजिक शांतता, सुव्यवस्था, समता व ममत्व, न्याय, स्वातंत्र्य या मूलभूत मानवी मूल्यांचा प्रत्यक्ष आस्वाद त्या काळात जनता घेत होती. आजच्या प्रशासनाला अहिल्यादेवींच्या कारभारापासून खूप काही शिकण्यासारखे आहे.

इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्यादेवींच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते. ‘चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुक्काम करू शकता. तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा. कूच करताना, मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा.’

अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत. लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. राज्याची राजधानी ही नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. महेश्वर आणि इंदूर ही सुंदर शहरे आजही भारतात वेगळी ठरतात. त्यामागे अहिल्यादेवी यांची दृष्टी होती.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी काव्य, संगीत, कला व उद्योग यांची समृद्ध नागरी होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी आणि संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवींनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान मिळे. वेतन दिले जात असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी सुरू केली. महाराष्ट्रातील मालेगाव हे कपडा व्यापाराचे शहर अहिल्यादेवींनी वसवले. या शहरात हिंदू मुस्लिमांनी एकदिलाने रहावे अशी शिकवण अहिल्यादेवींनी दिली. 

इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. हा लेखक म्हणतो, जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल.

अहिल्याबाई होळकर या न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे, नदीघाट, बारवा, तळी, कुंडे बांधली. एवढेच नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ, सोमनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 

अहिल्यादेवी श्रेष्ठ शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा तीस वर्षांचा राज्यकाळ हा एक स्वप्नवत कालखंड होता. या काळात कायद्याचे राज्य होते. जनतेची भरभराट होत होती. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला. पुण्यश्लोक म्हटले. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती म्हणून ख्यात झाल्या. आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. इतिहासकार अहिल्यादेवींना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात.

अहिल्यादेवी शूर होत्या पण युद्ध ही विनाशकारी प्रथा आहे असं त्यांचं मत होतं. 'युद्ध करावे तर आरपारचे करावे, रोज उठून रयतेला जगणे मुश्किल होईल अशी युद्धखोरी कामाची नाही', असं त्यांना वाटत असे. कारण त्यामुळे प्रजेची हानी होते आणि ज्या धनामुळे लोकांची प्रगती होण्याची शक्यता असते त्याचाही दुरुपयोगच होतो. खेरीज राज्याचा नेता युद्धात गुंतल्यामुळे प्रजेला त्याचा उपयोग होत नाही. शक्तीचा उपयोग राज्याचे नंदनवन करण्यासाठी व्हावा असा त्यांचा दृष्टीकोन होता. 
 
अटकेपार झेंडे रोवणाऱ्या राघोबांनाही अहिल्यादेवींनी नमवले. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर रघुनाथराव पेशवे यांनी इंदौरवर आक्रमण करण्याची तयारी सुरू केली. याची खबर लागताच अहिल्याबाईंनी सैन्य तयार केलं, त्यात एक स्त्रियांची तुकडीही तयार केली होती. परंतु आधी रघुनाथरावांना पत्र लिहिलं. “आपण एका स्त्रीबरोबर युद्ध करुन स्वतःची अपकिर्ती करुन घेवू नका. तुमच्या नावाला कलंक लागेल. तो पुन्हा कधीही पुसला जाणार नाही. मी एक स्त्री आहे. प्रामाणिकपणाने प्रजेच्या कल्याणासाठी पैसे मिळवले आहेत. माझ्या प्रामाणिकपणाची सर्वांना जाण आहे. माझा पराभव झाला तर मला कोणी नावे ठेवू शकणार नाही. पण तुमचा पराभव झाला तर सर्व लोक तुम्हाला नावे ठेवतील. तुमची अपकीर्ती सर्वत्र पसरेल.” या पत्रानंतर राघोबांनी त्यांच्या राज्यावर चालून जाण्याचा बेत रद्द केला हा इतिहास आहे.

नर्मदा नदीच्या किनारी महेश्वर राजधानी झाल्यानंतर 1767 ते 1795 या काळात अहिल्यादेवींनी उत्तम प्रशासनाचे दाखले देत भारतासमोर आदर्श उभा केला. लोककल्याणकारी कार्यक्रम राबवत आदर्श प्रशासन निर्माण केलं. कर व्यवस्था, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सवलती, न्याय देण्याची व्यवस्था उभी केली. सात बाराचा उतारा ही संकल्पना त्यांचीच. सतीसह इतरही अनेक अनिष्ट प्रथांना त्यांनी विरोध केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळकर प्रशासनात त्यांनी सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने अनेक जातीच्या लोकांचा समावेश केला. 
 
आपल्या खासगी तिजोरीतून नर्मदा, गंगा, गोदावरी, प्रवरा, तापी अशा नद्यांच्या किनारी घाट बांधून घेतले. नद्यांच्या पर्यावरणाची काळजी घेतली. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. ही त्यांची दृष्टी बघितली तर त्या काळाच्या किती पुढे बघत होत्या हे लक्षात येते. महेश्वरमध्ये पेठा, हवेल्या उभारल्या गेल्या. तिथे सोनार, विणकर यासारख्या कुशल कारागीरांना बोलवण्यात आलं. महेश्वरी साडीला राजाश्रय इथेच मिळाला. जिल्हा परिषदांच्या पद्धतीतून खेड्यापर्यंत न्यायनिवाडा करण्यासाठीची यंत्रणा उभारली. हुंडाबंदीचं धोरण राबवण्यासोबतच दारुबंदीसाठी कठोर पावलं उचलली. मुलींची पाठशाळा आणि महिलांना शस्त्रशिक्षण सुरू केलं. वैद्यांना आमंत्रित करून क्षय रोगावर संशोधन सुरू करण्यात आलं. जंगलतोडीविरोधात कुऱ्हाडबंदी जाहीर केली. बंधारे, तळी बांधून सिंचनाने बागायती क्षेत्र वाढवलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला.
 
एका पत्रात त्या लिहितात- 'चिरंजीव तुकाराम होळकर यांस अहिल्याबाईंचा आशीर्वाद. तुम्ही शेगाव परगण्यात लोकांवर मन मानेल तसा जुलूम करून त्यांच्याकडून पैसे वसूल केले आहेत. प्रजेच्या मामल्यासाठी महालच्या अधिकाऱ्यांना तुम्ही तंग केलेत. ह्याचे काय कारण? तुम्हास कळवण्यात येते की, आजपर्यंत तुम्ही मन मानेल त्याप्रमाणे रुपये वसूल केलेत. त्याचा खुलासा सरकारात पेश करावा. यापुढे देण्या-घेण्याच्या संबंधात स्वार पाठवून कोणत्याही प्रकारचा अन्याय केलात आणि त्याबद्दल तक्रार आली तर तुमचे ते कार्य अक्षम्य समजले जाईल.' तुकोजी होळकरांनी त्यांच्याविरोधात पेशव्यांकडे तक्रार केली, नाना फडणविसांनी महादजी शिदे यांना बाईंना समज द्यावी असे सांगितले. तेव्हा महादजींनी "बाई साऱ्यापेक्षा अधिक शहाणी आहे. संशय आला तर ती कोणासही बधायची नाही. पैसा व बुद्धी दोन्ही तिच्यापाशी मजबूत आहे. दौलतीचा नाश होईल मग सर्वांचे डोळे उघडतील." असे उत्तर दिले, अहिल्यादेवींच्या सुप्रशासनाचे हे प्रशस्तिपत्रच म्हणता येईल.

आपल्याच शासनकर्त्यांवर अशा पद्धतीने वचक ठेवणाऱ्या आणि त्यांना सतत कर्तव्याची जाणीव करुन देणाऱ्या अहिल्यादेवी जनतेच्या एकेक पैशाचा हिशोब चोख ठेवत होत्या. त्यांनी खासगी आणि सरकारी तिजोरीचे हिशेब वेगळे ठेवले होते. महेश्वर दरबारची पत्रे या पुस्तकात या व्यवहारांमधला पारदर्शकपणा पाहायला मिळतो. 'सरकारी तिजोरीची भिस्त वेगवेगळ्या करांवर असे. माळव्याचा वसूल 74 लाख रुपये इतका होता, अहिल्याबाईंच्या काळात तोच महसूल वाढून 1 कोटी साडेपाच लाख इतका झाला.'
 
अहिल्यादेवी समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान आहेत. धनगर समाज त्यांना माता मानतो. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने धनगर समाजाच्या प्रश्नांची चर्चा होणे स्वाभाविक आहे. धनगर समाजाचे आरक्षण, शिक्षण, मेंढपाळ वर्गापुढच्या समस्या, शेळ्या मेंढ्यांच्या खरेदी विक्रीचा प्रश्न, प्रशासकीय, राजकीय सत्तेतला वाटा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्व, महिलांमधून नवे नेतृत्व उभे राहण्याचा मुद्दा या प्रश्नांची तड लागावी अशी समाजाची अपेक्षा आहे. अहिल्यादेवींच्या धनगर समाजात स्वातंत्र्यानंतर एकही महिला आमदार, खासदार, मंत्री होत नाही. राज्यात सत्तेच्या प्रमुख पदावर दिसत नाही. हे चित्र बदलले पाहिजे. त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने हे प्रश्न ऐरणीवर आणून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करूयात. अहिल्यादेवींना अभिवादन!
 
- राजा कांदळकर
rajak2008@gmail.com 

(लेखक राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत.)

Tags: ahilyadevi holkar punyashlok ahilyadevi holkar ahilyabai holkar holkar ahilyabai ahilya ahilyadevi malharrao holkar peshwe raghobadada अहिल्याबाई अहिल्याबाई होळकर अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक इंदौर सात बारा राजा कांदळकर राष्ट्रसेवादल सेवादल Load More Tags

Comments:

Hira

यशस्वी,कर्तबगार राणी अहिल्याबाईंची इतिहासकारांनी उपेक्षा केली. उत्कृष्ट व उद्बोधक शब्दचित्र. धन्यवाद!!

Dattaram V. Jadhav

जाहीर अभिवाचन व्हावं अशी सुंदर माहिती मिळाली. धन्यवाद!

Add Comment

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/