14 ते 16 एप्रिल या तीन दिवसांच्या काळात, मराठी वृत्तवाहिनीवर एक बातमी आणि ती देणाऱ्या पत्रकाराला अटक व जामिनावर सुटका असे एक छोटेसे थरारनाट्य घडून आले. त्यामुळे राज्यातील व काही प्रमाणात राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारितेच्या क्षेत्रातही खळबळ उडाली. त्यावर बरेच चर्चामंथन घडून आले आहे. तर त्या नाट्यामधील मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष वेधणारा आणि पत्रकारितेच्या मूलतत्वांचा आग्रह धरणारा हा एक लेख...
15 एप्रिलच्या पहाटे एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे उस्मानाबाद येथील प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना अटक करून त्याच दिवशी दुपारी वांद्रे, मुंबई येथील पोलिस मुख्यालयात चौकशीसाठी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे सोडण्यात आले. ही अटक व चौकशी कशामुळे, तर 14 एप्रिलच्या सकाळी राहुल यांनी, परप्रांतीय लोकांसाठी रेल्वे गाड्या सोडल्या जाणार असल्याची एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरून दिलेली बातमी एका उद्रेकाला कारणीभूत ठरली, असा पोलिसांचा आरोप. म्हणजे त्या दिवशी सायंकाळी वांद्रे रेल्वे स्टेशनजवळ काही हजार परप्रांतीय लोक एकत्र आले आणि रेल्वे सोडा अशी मागणी करू लागले; त्याची दोन कारणे पोलिसांसमोर प्रथमदर्शनी आली. एक मुंबईत वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय लोकांच्या संघटनेच्या विनय दुबे या नेत्याने तो जमाव संघटित करण्यासाठी सोशल मीडियावरून केलेला प्रचार; दुसरे एबीपी माझावरून राहुल कुलकर्णी यांनी दिलेली बातमी.
विनय दुबे यांच्या अटकेचे स्वागतच झाले, कारण इतक्या बेजबाबदारपणे या माणसाने जमाव संघटित होण्यासाठी चिथावणी कशी दिली असा तो मुद्दा होता. मात्र राहुल यांच्या अटकेबाबत उलट सुलट चर्चा दोन दिवस चालत राहिली. कारण एबीपी माझा ही वृत्तवाहिनी मागील दीड दशक तरी मराठीत पहिल्या तीन क्रमांकामध्येच मानली जाते (बातम्यांचा / कार्यक्रमांचा दर्जा व प्रेक्षक संख्या या दोन्ही बाबतीत.), आणि राहुल हा मराठी वृत्तवाहिन्यांवरील पहिल्या दहा वार्ताहर - पत्रकारांपैकी (गुणवत्ता व विश्वासार्हता या दोन्ही बाबतीत) मानला जातो.
या मोठ्या वृत्तवाहिनीचे व या प्रसिद्ध पत्रकाराचे पाठीराखे वा चाहते भरपूर आहेत, तसे काही टीकाकारही आहेत. असे चाहते व टीकाकार काही व्यक्तिगत राग-लोभ आणि काही प्रमाणात वैचारिक भूमिकांमधील साम्य-भेद या दोन कारणांमुळे आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आवेशपूर्ण वक्तव्ये, प्रतिक्रिया व लेख येणे साहजिक होते. परिणामी या दोन्ही बाजूंच्या लोकांकडून काही प्रमाणात मूळ मुद्दे सोडून चर्चा झाली, विपर्यास केला गेला, विषयांतर केले गेले, भलतेच तर्क लढवले गेले. अर्थात असे काही सनसनाटी घडते तेव्हा अशा प्रकारची चर्चा कळत वा नकळत घडणे साहजिक होते. मात्र फार थोड्या ज्येष्ठ पत्रकार संपादकांनी मूळ मुद्दा काय आहे, याकडे लक्ष वेधून त्यावरच टीका टिप्पणी केली, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.
राहुलने उस्मानाबाद येथून दिलेली माहिती व एबीपी माझाचा मुंबई कार्यालयातील निवेदक, या दोघांनी मिळून दिलेल्या त्या दोन-अडीच मिनिटांच्या बातमीची ध्वनीचित्रफित उपलब्ध आहे. शिवाय, रेल्वे प्रशासनाच्या ज्या पत्राच्या आधारे ती बातमी दिली गेली, ते पत्र राहुलने स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर टाकले आहे. त्यामुळे, ते पत्र काळजीपूर्वक वाचले आणि त्या बातमीची ध्वनीचित्रफीत काळजीपूर्वक ऐकली व पाहिली तर दोन प्रश्न मनात येतात. एक- ही बातमी वांद्रे येथे काही हजारांचा जमाव निर्माण होण्यास कारणीभूत ठरली का? दुसरा प्रश्न- ही बातमी रेल्वे गाड्या सुरू होण्याबाबत लोकांच्या मनात काही गोंधळ वा संभ्रम निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकेल अशी होती का?
यातील पहिल्या प्रश्नाचे खरे उत्तर फक्त पोलिसांकडे मिळू शकेल. त्यांच्याकडे काय स्वरूपाचे रिपोर्ट आले, ते किती खरे-खोटे होते, यावर ते अवलंबून असेल. त्याबाबत ते किती चौकशी करू शकतील, न्यायालयात हे प्रकरण किती लावून धरू शकतील, हे सध्या तरी बाहेरच्यांना सांगता येणार नाही. मात्र त्यात फार तथ्य नसेल तर, राज्य सरकार व त्यातील तीन घटकपक्ष हा विषय लावून धरायला फारसे इच्छुक नसतील (राहुल, वा त्याची वृत्तवाहिनी यांच्यावर सरकारमधील कोणाचा रोष असेल तर ती शक्यता वेगळी). शिवाय, या वृत्तवाहिनीचे चालक-मालक व संपादक यांचे सरकार दरबारी असलेले वजन लक्षात घेता, त्यांनी ठरवले तर ते हे प्रकरण सहज मिटवू शकतात (या घटनेचा आपल्या वृत्तवाहिनीला फायदाही उचलता येईल, असा विचार व्यवस्थापनाने केला तर ती शक्यता वेगळी.) पण सामान्यतः दिसते असे की, वांद्रे येथील तो उद्रेक ताबडतोब शमवता आला आणि त्यातून मोठे म्हणावे असे काही नुकसान झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणावर लवकरच पडदा पडणार आणि ते विस्मृतीतही जाणार!
मात्र दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर पत्रकारितेत मूल्यांचा आग्रह धरणारे व त्यासाठी यथाशक्ती कार्यरत असणाऱ्यांनी स्वतः पुरते तरी शोधायला हवे. हा विषय सोडून देणे किंवा त्यावर भाष्य न करणे हा एक पर्याय असू शकतो. पण तसे करणे म्हणजे जबाबदारी टाळणे. तर या संदर्भात आम्हाला दिसते ते असे...
21 दिवस देशभर लागू असलेला लॉकडाऊनचा कालखंड 14 एप्रिल रोजी संपणार होता, पण त्याच्या आदल्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तो कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती आणि त्याबाबत आणखी काही वा अंतिम निर्णय 14 एप्रिलच्या सकाळी 10 वाजता पंतप्रधान त्यांच्या भाषणात जाहीर करणार होते. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष (भीती की सुटका अशा संमिश्र भावनेने) लागले होते. म्हणजे देशात काय चालू होणार आणि काय बंद राहणार, याबाबतचे स्पष्टीकरण त्या भाषणातून येणार हे उघड होते. असे असताना, त्या दिवशी सकाळी 9 वाजता एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीवरून, परप्रांतीयांसाठी रेल्वेगाड्या सोडल्या जाणार असल्याची बातमी देण्याचे कारण काय होते? आम्हाला अधिक काही exclusive हाती लागले आहे, हे एक तास आधी दाखवणे यापलिकडे त्यातून काय साध्य होणार होते? बरे, तसे काही exclusive सांगायचे असेल तर त्याची खात्री का करून घेतली नाही?
रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत चालू असलेली चर्चा-सूचना करणारे जे पत्र कोणातरी अतिउत्साही अधिकाऱ्याने राहुलकडे दिले ते 13 तारखेचे होते. मुळात ते पत्र पत्रकारांना माहिती देण्यासाठी लिहिले गेलेले नव्हते, म्हणजे प्रशासनातील कोणी तरी अर्धवट माणसाने त्या पत्राची नक्कल (चोरून?) राहुलकडे पाठवली असणार. ठीक आहे, बातमी हाती लागते आहे तर ती करावी, पत्रकारितेचा तो धर्मच आहे. पण मग त्या पत्रानंतर जे काही बारा-पंधरा तास उलटले, त्या काळात त्या पत्रातील प्रस्तावाबाबत रेल्वे प्रशासनाने काही निर्णय घेतला का, ही विचारपूस तरी बातमी देताना राहुलने करायला हवी होती. म्हणजे तो निर्णय पक्का झालाय, रद्द झालाय की त्यात काही बदल झालाय, याची खातरजमा करायला हवी होती. शिवाय, त्या पत्रातील माहितीची योग्य ती तपासणी एबीपी माझाच्या संपादकीय विभागानेही करायला हवी होती.
हे खरे आहे की, एक दीड-दशक आपल्या वृत्तवाहिनीत कार्यरत असलेला अभ्यासू , अनुभवी व विश्वासू असा पत्रकार बातमी देतोय म्हटल्यावर तशी गरज संपादकीय विभागात कार्यरत असणाऱ्यांना वाटली नसणार. हेही खरे आहे की, स्पर्धात्मक वातावरण व आम्हीच सर्वांत पुढे हे दाखवण्याची गरज यामुळे ती बातमी चुकीची ठरली तर काय, हा प्रश्न त्यावेळी कोणाला पडला नसणार. आणि हेही खरेच आहे की, पंतप्रधानांच्या भाषणानंतर (रेल्वे सुरू होण्याची घोषणा झाली नाही म्हणून) ती बातमी एबीपी माझाने पुन्हा दाखवली नाही. तरीही मूळ मुद्दा उरतोच की ती बातमी अतिउत्साह व अर्धवट माहितीच्या आधारावर दिली गेली की नाही? तर होय! पण एबीपी माझाचे सर्व लोक (संपादक राजीव खांडेकर यांच्यासह) म्हणताहेत की, त्या बातमीत आम्ही तारीख व वेळ सांगितली नाही, ठिकाण सांगितले नाही, अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्याचा विचार सरकार करीत आहे, इत्यादी तपशील तेवढे दिलेत. बरोबर आहे.
मात्र मूळ बातमी ऐकली व पाहिली तर, काय मिळते. निवेदकाचे पहिलेच वाक्य असे आहे, "सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. मजूर अडकले आहेत, त्यांना गावी परत पाठवण्यासाठी प्रत्येक डीविजनमधून ट्रेन धावणार आहेत." त्याचवेळी स्क्रीन वर वाक्य येते, "रेल्वे सुरू करण्याचा विचार?" पुढे प्रतिनिधी राहुल माहिती देतात, "पत्र इशू करण्यात आलं आहे, तपशील गेले आहेत. रेल्वे सुरू करायच्या आहेत. वेगळा प्लॅन बनलेला आहे." बातमीच्या शेवटाला पुन्हा एकदा, राहूल "मजूर, कामगार यांना त्यांच्या गावाकडे पाठवण्यासाठी रेल्वे सुरू केल्या जाणार आहेत"
ही बातमी काहींना खात्री देणारी, काहींना आशा निर्माण करणारी, काहींना आवराआवरी करीत धावपळ करायला लावणारी आणि काहींच्या मनात संदिग्धता निर्माण करणारी आहेच आहे! आणि कोरोनामुळे हवालदिल झालेल्या, टीव्हीकडे डोळे लावून बसलेल्या, सरकारकडून काय निर्णय येतोय यांच्याकडे कान लावून बसलेल्या, मजूर व कामगार वर्गात गोंधळ माजवण्याची क्षमता असणारी अशीही आहेच! अर्थात, कोणत्याही वृत्तवाहिनीत एकामागोमाग ब्रेकिंग न्यूज ज्या गतीने येतात आणि दिल्या जातात ते पाहता, त्यावेळी राहुल व एबीपी माझा मधील कोणालाही त्याचे भान न येणे किंवा गांभीर्य लक्षात न येणे सहज शक्य आहे. आणि म्हणून ते क्षम्यही आहे.
पण खरा आक्षेपार्ह मुद्दा पुढचा आहे, 'ती बातमी देण्यात आम्ही काहीच चूक केलेली नाही, आम्ही त्यावर ठाम आहोत', असे या वृत्तवाहिनीतील सर्वजण म्हणत आहेत. याचा अर्थ आत्मपरीक्षण करायला ते तयार नाहीत. आमच्याकडून अतिउत्साहाच्या भरात किंवा अजाणतेपणी किंवा अनवधानाने एक छोटी चूक झाली, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे म्हणण्याची हिम्मत त्यांच्यापैकी कोणीही दाखवलेली नाही. हे आश्चर्यकारक आहे आणि धक्कादायकही!
आणि म्हणूनच मग पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भात आक्षेप घेण्याचा फार मोठा नैतिक अधिकार एबीपी माझाला राहणार नाही. पोलिसांनी वांद्रे येथील घटनेसाठी ती बातमी जबाबदार आहे की नाही याचा नीट तपास केला नाही, आधी नोटीस का बजावली नाही, त्यांनी इतक्या तातडीने व इतक्या धोकादायक परिस्थितीत राहुलला मुंबईला का नेले, इत्यादी प्रश्न मग कसे विचारता येतील? अर्धवट वा अपुऱ्या वा अधिकृतपणे न आलेल्या माहितीवर आधारित, सर्वांत महत्वाची बातमी (पंतप्रधानांच्या राष्ट्राला उद्देशून होणाऱ्या भाषणाच्या एक तास आधी) देण्यासाठी तुम्ही जर अधीर झालेला असाल; तर पोलिसांनी त्यांना मिळालेल्या अर्धवट वा अपुऱ्या वा सांगोवांगीच्या माहितीचा आधार घेऊन केलेल्या कारवाईला तुम्ही आम्ही विरोध कसा करू शकणार? तो कितपत समर्थनीय मानला जाणार? 'आम्ही आमचे जनहिताचे कर्तव्य पार पाडण्यासाठी अशा बातम्या देतो', असा लंगडा युक्तीवाद तुम्ही करणार असाल तर, पोलिसांकडूनही तसाच युक्तीवाद येणार यात विशेष ते काय! त्यांना तर बिचाऱ्यांना (?) मोठा काही अनर्थ ओढवला गेला की, तातडीने त्यासाठी जबाबदार ठरलेल्या घटकांचा खरा खोटा शोध घेऊन किंवा संशयित म्हणून पकडून वरिष्ठांकडे, सरकारकडे आणि न्यायालयाकडे सादर करावे लागते. असो.
तर मूळ मुद्दा असा आहे की, ज्या प्रकारे बातमी दिली गेली ते चूक होते आणि ज्या प्रकारे राहुलला अटक केली गेली तेही चूक होते. पोलिस व सरकार अशी चूक सहसा मान्य करीत नाहीत. ते एकवेळ आरोपपत्र मुद्दाम कच्चे ठेवतील, पुरावे अर्धवट देतील, पळवाटा मोकळ्या ठेवतील आणि आरोपीला सुटून जाण्यास मदत करतील; पण 'आमची चूक झाली', असे कधी म्हणणार नाहीत. कारण त्या व्यवस्थेला ते परवडत नाही. पण पत्रकारिता हा केवळ अंगीकृत व्यवसाय नाही, तो पेशा आहे, तेथे काही प्रमाणात तरी ध्येयवाद अपेक्षित आहे. त्यामुळे, झालेली चूक कबूल करणे हा पत्रकारितेत गुण मानला जातो. गुणवत्ता व विश्वासार्हता असलेल्या माणसांनी तशी चूक कबूल केली तर त्यांचा मोठेपणा वाढीस लागतो. तसा मोठेपणा राहुल, राजीव यांनी मिळवावा अशी इच्छा त्यांच्या अनेक (आम्हीही त्यातलेच) हितचिंतकांची आहे! अर्थात, एबीपी माझाच्या व्यवस्थापनाला हा असा 'व्यवहार' कितपत झेपणार आहे, हे मात्र त्यांचे त्यांना माहीत!
ताजा कलम :
प्रिंट व इलेक्ट्रॉनिक या दोन्ही माध्यमांतील राजीव खांडेकर यांच्या कर्तृत्वाविषयी कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. पण ज्यांना कोणाला राहुलच्या क्षमतेविषयी पुरेशी माहिती नसेल त्यांनी, त्याचा साधना दिवाळी अंक 2016 मधील 'माझी दुष्काळ डायरी' हा 30 पानांचा मर्मभेदी लेख वाचावा.
- विनोद शिरसाठ
editor@kartavyasadhana.in
(वाचा 'माझी दुष्काळ डायरी' हा राहुल कुलकर्णी यांचा लेख साधना अर्काईव्हवर किंवा पीडीएफ स्वरुपात)
Tags: लॉकडाऊन महाराष्ट्र राहुल कुलकर्णी एबीपी माझा राजीव खांडेकर विनोद शिरसाठ पत्रकारिता Corona Lockdown Maharashtra Rahul Kulkarni ABP Majha Rajiv Khandekar Vinod Shirsath Journalism Load More Tags
Add Comment