ती!

हा लढा अजूनही संपलेला नाही!

ruralindiaonline.org

भगवान के घर देर है अंधेर नही ।।

नुसत्या त्या आठवणीनं आजही 
भयभीत होते, थरथरू लागते 
सगळ्यावर तूर्त तरी पडदा पडलाय 
असं वाटतंय खरं.
त्यामुळंच असेल कदाचित 
आता जरासा धीर आलाय 
सारंच काही संपलेलं नाही इथं 
अद्यापही उशिरा का असेना, 
न्याय मिळू शकतो, 
यावर विश्वास वाटू लागलाय. 
ही केवढी दिलासा देणारी बाब आहे!

***

खरं तर काहीच सुचत नव्हतं 
न्यायालयानं दिलेली शिक्षा 
अचानक कमी करून, 
पशूंनाही लाज वाटेल अशा प्रकारे 
एका असहाय गर्भार महिलेवर 
पाशवी अत्याचार करणाऱ्यांना, 
तिच्या डोळ्यासमोर 
तिच्या डझनभर नातेवाईकांची 
निर्घृण हत्या करणाऱ्या 
आणि नंतर 
तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांतील 
तब्बल अकरा जणांना 
जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट कशी मिळते? 
तीही सर्व नियम धाब्यावर बसवून, 
साक्षात सर्वोच्च न्यायालयाची तमा न बाळगता, 
हे करण्याची हिंमत 
ते कुणाच्या पाठिंब्यानं करतात? 
ते तर सगळ्यांनी ओळखलंय.
कारण असं की, 
याला केंद्रीय गृहखात्याचीच संमती आहे 
आणि ते खातं सांभाळणाऱ्यालाही 
अनेक गुन्ह्यांबद्दल 
अगदी तडीपारीची शिक्षाही 
भोगावी लागली आहे, 
त्याला अशा आपल्या समधर्मींबाबत 
कणव आली नसती, 
तरच नवल म्हणावं लागलं असतं,
म्हणूनच मला वाईट वाटतंय. 
पण त्याहूनही वाईट ते याचं की, 
एकीकडे कुठल्या दुरदूरच्या स्त्रिया 
मला न्याय मिळावा यासाठी 
नाउमेद न होता 
सर्वतोपरी प्रयत्न करत होत्या, 
त्याचं अप्रूप होतं, 
हे खरंच
त्यामुळंच तर एक बहीण
त्यावेळा मारली गेली,
तरी आता
या स्त्रियांनीच तिची जागा घेतलीय
ही भावनाच सुखावत होती.
तरीदेखील
आपल्याच आजूबाजूच्या स्त्रिया 
त्या शिक्षा माफ करून 
मुक्त करण्यात आलेल्यांना 
ते जणू फार मोठा पराक्रम करून आल्याप्रमाणं ओवाळत होत्या, 
त्यांच्या हार फुले देऊन केलेल्या सत्कारात 
सहभागी होत होत्या
हे पाहून होणारं दुःख खूपच वेदना देणारं होतं. 
आणि तिथंच कुणी तरी 
ते तर उच्चवर्णीय आहेत, 
त्यांच्यावर चांगले संस्कार झाले आहेत, 
ते असं करू शकणार नाहीत 
असं त्या नराधमांबद्दल निर्लज्जपणे सांगत होता. 
हे कोणते संस्कार म्हणायचे? 
बहुधा त्यांच्या संघटनेचेच असावेत, 
ते ज्याला महान मानतात 
त्या त्यांच्या नेत्यानंच 
कधी म्हटलं होतं ना की, 
छत्रपती शिवाजी महाराजांनी 
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला 
आदरानं सहीसलामत सोडून दिलं 
ही त्यांची चूकच होती. 
त्या नेत्याचे हे बोल त्यांना आठवले असणार 
म्हणून ती चूक आपण करायची नाही 
असा निश्चय त्यांनी केला असणार.

***

आणि माझ्या चिमुकलीच्या नुसत्या आठवणीनं
गोठलेली अश्रूची नदी वाहू लागते
अगदी आजही तो प्रसंग डोळ्यापुढं
येतो अगदी जशाचा तसा
अन् थरकाप होतो .. मेंदू बधीर होतो
आणि कितीही नकोसं वाटलं
तरी सुन्न सन्न करून टाकणारं
त्या वेळचं ते दृश्य
डोळ्यापुढं साकारतं
अगदी जसंच्या तसं
सर्व मोठ्यांना मारूनही 
समाधान झालं नसावं त्यांचं. 
म्हणून माझ्यापासून 
त्या जेमतेम तीन वर्षांच्या बछडीला 
त्यांनी हिसकावून घेतलं 
तिच्या केविलवाण्या अबोल आक्रोशानं 
त्यांना दयेऐवजी चेवच आला 
आणि त्यांच्यातीलच एका राक्षसानं 
तिला उचलून पाय धरले तिचे 
आणि हवेतच गरागरा फिरवून 
धाडकन दगडावर आदळलं 
मी जोरात किंचाळले असं वाटलं 
पण तोंडातून आवाजच फुटला नाही 
इच्छा असूनही डोळे मिटता आले नाहीत 
अन ते दृश्य मनावर कोरलं गेलं अगदी कायमचंच.
पण एवढ्यानं, 
अगदी माझ्या चिमुकलीला क्रूरपणं मारूनही 
त्यांचं समाधान झालं नव्हतं. 
मग त्यांची विकृत नजर 
माझ्याकडं वळली 
मी तिथंच होते थरथर कापत असलेली. 
जेमतेम एकवीस वर्षांची 
आणि पुन्हा गर्भवती होते, 
पण ते पुन्हापुन्हा सांगूनही उपयोग झाला नाही. 
त्यांची वासना जागी झाली. 
सर्वांचीच. 
आणि ती शमवायला समोर मी होतेच 
जणू बावरली हरिणी 
वाघांच्या पुढ्यात 
पुढं जे काही घडलं ते खरोखरच कल्पनातीतच. 
पशू म्हणे बलात्कार करत नाहीत,
(अन ही तर माणसारखी माणसंच, तरी) 
सगळ्यांनीच आपली वासना शमवली  
प्रतिकार शक्यच नव्हता 
माझी शुद्ध केव्हाच हरपली होती 
कदाचित नंतर कधीतरी साऱ्यांच्या वासना थंडावल्यावर 
त्यांनी माझ्याकडं पाहिलं 
अन् मी निपचीत पडलेली पाहून 
त्यांची समजूत झाली की हीही मेली 
आता त्यांना मोकाट सुटता येणार होतं ...
काय झालं आणि कुणी केलं
हे सांगायला कुणीच उरलेलं नाही म्हणून 
झपाट्यानं निघूनही गेले असणार तिथून 
कारण जेव्हा केव्हा मी शुद्धीवर आले 
तेव्हा तिथं नव्हतं माझ्याशिवाय कुणीच 
होत्या फक्त अगणित वेदना 
अगदी जीवघेण्या 
शरीराहूनही मन दुखावणाऱ्या 
कशीबशी सावरले त्यातून 
अन् प्रयत्न करून 
हळूहळू उठून उभी राहिले 
अंगावर काहीच राहिलं नव्हतं 
आणि पायांवर जे काही होतं 
ते रक्तानं माखलं होतं 
असह्य वेदनांनीच 
मी जिवंत असल्याची जाणीव झाली 
अन् त्याबरोबरच 
त्या नराधमांना शिक्षा देण्याची तीव्र इच्छा. 
खूप प्रयत्न करून तशीच चालत होते 
कुणा आदिवासी दयाळू भावानं 
अंग झाकायला कापडं दिली 
आदिम माणुसकीची ती प्रेरणा. 
तक्रार करण्यासाठी पोलिसांकडं गेले 
बराच काळ त्यांनी दादच दिली नाही 
आणि दिल्यावर गुळमुळीत काहीतरी लिहिलं 
पण मीही पाठपुरावा केला 
काही भल्या वकिलांनी मला मदत केली 
आणि खऱ्या गुह्याची नोंद करायला लावली

***

पुन्हा माझ्या छकुलीची आठवण आली, 
अन् पूर्वी कधीतरी ऐकलेली कथाही.
बालपणीच्या मैत्रिणीनं सांगितलेली 
त्यातही एका बालिकेला 
असंच भयानक मरण आलेलं
पण कथेत ती मग हवेतूनच 
त्या नराधमाला म्हणाली होती म्हणे की, 
तुझा काळ जन्माला आलाय 
आणि तो अगदी सुखरूप आहे. 
कालांतरानं तोच तुझा नाश करील! 
मनात आलं माझ्या चिमुरडीनं 
मनोमन असंच काही म्हटलं असेल का? 
कारण बराच काळ त्यांची चलती राहिली 
अनेक प्रयत्न करून 
त्यांची काळी कृत्यं दडपण्याचा प्रयत्न झाला
पण गुन्ह्याला कधीतरी वाचा फुटतेच!
तसंच झालं तरीही त्यांना आशा होती
कारण न्यायालय त्यांचंच होतं
पण मग मात्र मोठंच दडपण आलं 
नाइलाजानं प्रकरण अन्य ठिकाणच्या 
जिथं खराखुरा न्याय मिळेल 
अशा ठिकाणी हलवलं गेलं 
तिथं मात्र न्याय मिळाला 
त्या साऱ्यांना शिक्षा झाली 
सर्वजण कारावासात गेले 
जन्मभरासाठी

***

पण त्यांचे पाठीराखे गप्प नव्हते 
त्यांचे प्रयत्न सुरूच होते.
काही काळानंतर पुन्हा पळवाट काढून
सारे नियम धाब्यावर बसवून
त्यांना शिक्षेतून सूट देण्यात आली 
ते सत्कार मिरवणुका वगैरे 
ते कसे सद्गुणी संस्कारी आहेत असं 
त्यांचं गुणगान सुरु झालं 
मग पुन्हा न्यायासाठी प्रयत्न. 
पर्यायच नव्हता. 
आणि तेच सारे साथी पुन्हा धावून आले 
मदतीसाठी 
परत एकदा लढा सुरू 
यावेळी मात्र अनेक न्यायप्रेमींचा पाठिंबा 
अन तो आवाज सतत वाढतच होता 
सर्वोच्च न्यायालयानंही कडक शब्दांत 
गुन्हेगारांच्या पाठिराख्यांची हजेरी घेतली 
आणि त्या नराधमांना 
पुन्हा कारावासात जायला फर्मावलं.

तूर्त तरी या साऱ्यावर पडदा पडला आहे, 
की तसं वाटतंय? 
कारण त्यांना शिक्षेतून सूट हवी असेल, 
तर पुन्हा जेथे शिक्षा दिली गेली 
तिथेच याचना करायला सांगितलंय 
आणि त्यामुळंच काळजी वाटतेय 
कारण दरम्यानच्या कालावधीत 
बराच बदल झाला आहे 
आता तिथंही त्यांचंच सरकार आहे
त्याच्यापुढं हे प्रकरण नेलं गेलं तर ...
आता ही एकच चिंता उरी आहे
ती कधी मिटेल...?

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: supreme court violence crime justice bilkis bano case Load More Tags

Comments:

SURESH BHATEWARA

एकूणच न्यायदान व्यवस्थेबद्दल शंका यावी, असे भासत होते. मात्र गेल्या सप्ताहात परिस्थिती बदललेली दिसते आहे. एका हिंस्त्र प्रसंगाचे दीर्घ काव्याद्वारे आपण शब्दबद्ध केलेले वर्णन अंगावर शहरे आणणारे आहे.

Dattaram Jadhav

मन आणि शब्द गोठून गेले. कोणत्या शब्दांत व्यक्त होऊ तेच कळत नाहीं!!

ARVIND GOKHALE

जे काम दहा हजार शब्दांनाही कमी पडले असते ते केतकरांनी आपल्या या काव्यातून करून दाखवले आहे. अंगावर शहारे उभे करणारे हे काव्य निश्चितच आपल्याला सुन्न करून सोडते.

Vinayak Gopal Phadke

I was sobbing initially and then I was shunned

Add Comment