स्त्री ही वस्तू आहे - ती आपल्याइतकी ताकदवान नाही म्हणून तिच्यावर हक्क दाखवणं, स्त्रीचे स्वतंत्र विचारच मुळात मान्य नसणं, आपली मतं तिला मान्य नसतील तर मग हिंसा करून ती मान्य करायला भाग पाडणं, तरीही तिचा विरोध होत राहिला तर मग तिला कायमचं संपवणं, अशा आपल्या पितृसत्ताक विषम समाजव्यवस्थेतूनच राहूलची वृत्ती तयार झाली. आणि त्यातूनच त्यानं हे चुकीचं कृत्य केलं. राहूलला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, ती होईल असे स्पष्ट दिसतं आहे. पण एवढ्यानं दर्शनाला न्याय मिळणार आहे का? जोपर्यंत ही बुरसटलेली मानसिकता जिवंत आहे, तोपर्यंत दर्शनासारख्या मुलींना त्रास होतच राहणार आहे.
दर्शना. तिची नुकतीच वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून एमपीएससी परीक्षेतून निवड झाली होती. दर्शनाचं सर्वत्र कौतुक होत होतं. एका खासगी क्लासतर्फे आयोजित सत्कार समारंभासाठी दर्शना पुण्यात आली होती. सत्कार झाला. अनेक मित्रमैत्रीणींना, परिचयातील व्यक्तींना भेटली आणि राहूल हंडोरे या मित्रासोबत ती ट्रेकिंगसाठी गेली. राहूलची आणि तिची यापूर्वीचीच मैत्री होती. पोलिसांनी पत्रकार परिषदेतून दिलेल्या माहितीनुसार, राहूलने तिला लग्नाची मागणी घातली होती. तिने राहूलला नकार दिला होता. याचा राग मनात धरून राहूलने तिचा खून केला. दर्शनाचं आयुष्य संपलं. उज्ज्वल भविष्यासाठी कठोर मेहनत करून ती परीक्षा पास झाली होती. राहूलनं तिचं भविष्यच नाहीसं केलं. राहूलच्या आयुष्यातही आता जन्मभर कोठडीच असेल.
याकडे केवळ एक हत्येची केस म्हणून पाहता येणार नाही. किंवा एकतर्फी प्रेमातून खून, एवढा मर्यादित विचार करणंही चुकीचं ठरेल. दर्शना आणि राहूल ज्या परीक्षेचा अभ्यास करायचे त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी महाराष्ट्रात लाखो मुलं-मुली आहेत. यापैकी कितीतरी मुलं-मुली एकमेकांचे चांगले मित्रमैत्रीणी आहेत, यातले कित्येक एकमेकांवर प्रेम करतात, दोघेही अधिकारी होऊन भविष्यात पुढं काय काय करायचं याची स्वप्नं रंगवतात. देशाचं भविष्य असणाऱ्या अशा लाखो मुला-मुलींच्या आयुष्यावर, विचारांवर प्रभाव टाकणारी ही घटना आहे. या घटनेमुळे पालकही आपल्या पाल्यांबाबत चिंताग्रस्त झाले आहेत. याला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे या घटनेचा वेगवेगळ्या अंगांनी विचार करायला हवा.
मैत्री करणं गुन्हा आहे का? :
गेल्या चार दिवसांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये अशा चर्चा आहेत की, ‘आपण घरापासून दूर कशासाठी आलो आहोत? तर अभ्यासासाठी आलो आहोत. मग आपण फक्त अभ्यासच केला पाहिजे. मैत्री-प्रेम या फंदात पडलंच नाही पाहिजे. मैत्री- प्रेम यात अडकणं म्हणजे विचलित होणं आहे. त्यापेक्षा यापासून दूर राहून आपलं ध्येय साध्य करणं हेच बरं. नाहीतर मग यामुळं अशी परिस्थिती निर्माण होते.’ कितीतरी पालक आपल्या मुलींना आता फोन करून काळजीच्या स्वरात चौकशी करत आहेत. ‘बेटा कुणाच्याही नादी लागू नको, आपण भलं आणि आपला अभ्यास भला’, असे सल्ले देत आहेत. काही पालकांची आणि काही विद्यार्थ्यांची अशी मानसिकता तयार होणं साहजिक आहे. यात त्यांचा दोष नाही, ते या परिस्थितीच्या अनुषंगाने सुरक्षित वाटेल असा विचार करताहेत. पण एक गोष्ट मात्र इथं दुर्लक्षित करता येणार नाही. ती म्हणजे, मैत्री किंवा प्रेम ही जाणूनबूजून करावयाची गोष्टच नाही, किंवा ती डबा बंद करून ठेवावा तशी दाबून ठेवायची गोष्ट नाही. ही नैसर्गिक गोष्ट आहे. आपण जेव्हा घरातून शाळेत जातो, शाळेतून कॉलेजात जातो, शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षेच्या, किंवा इतर परिक्षांच्या अभ्यासासाठी दूर शहरात जातो, तेव्हा आपलं सामाजिकीकरण होत असतं. नवे मित्र-मैत्रीणी भेटणं, एकमेकांशी मैत्री-प्रेम होणं हे नैसर्गिक आहे. अनोळखी ठिकाणी, दूरच्या शहरात आपल्या ओळखीचं, जवळचं कोणीतरी असावं ही भावना स्वाभाविक आहे. त्यामुळं मुलामुलींची मैत्री-प्रेम यात गैर काहीही नाही. पण मैत्री, प्रेम याचे अर्थ समजून घेणं, ही नाती कशी असतात, ती कशी निभावायची असतात, या नात्यांमधल्या जबाबदाऱ्या काय असतात याचा विवेक नसेल तर मग चुकीच्या गोष्टी हातून घडतात.
दर्शना आणि राहूल या दोघांची जुनी मैत्री होती. दर्शनानं एमएस्सीपर्यंत, तर राहूलनं बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलंय. थोडक्यात दोघंही उच्चशिक्षित आहेत. दोघांनी मैत्री करावी का? तर जरूर करावी. यात कुणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही. राहूलशी मैत्री केली, त्याच्यासोबत ती ट्रेकिंगला गेली यात दर्शनाची कोणतीही चूक नाही. असे अनेक मित्र-मैत्रीणी सोबत फिरत असतात, गप्पा मारत असतात. पण मैत्री म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, सहजीवन म्हणजे काय याचा कुठलाही विवेक नसलेला राहूल दर्शनानं दिलेला लग्नासाठीचा नकार पचवू शकला नाही.
चूक दर्शनाची की राहूलची?
विद्यार्थ्यांमध्ये सकाळचा नाश्ता करताना, चहाच्या गाड्यांभोवती, लायब्ररीच्या बाहेर याविषयी चर्चा चालू आहेत. यातले काही विद्यार्थी दर्शनाला दोषी ठरवत आहेत, तर काही राहूलला. काही मुलामुलींना वाटतं, “दर्शनानं त्याच्याशी मैत्री करूनच मुळात चूक केली.” काहींच्या मते, “दर्शनानं प्रेम केलं, आणि लग्नाला नकार दिला ही तिची चूक आहे.” तर काहींना वाटतं, “आपण इथं अभ्यास करायला आलो होतो, मग अशी मैत्री करायलाच नको होती. त्यामुळंच हे सगळं झालं.” या काही निवडक प्रतिक्रिया आहेत. काही विद्यार्थी तर आणखी खालच्या पातळीवर जाऊन प्रतिक्रिया देत आहेत. त्या इथं लिहिणं गैर आहे. खरंतर या सगळ्या प्रतिक्रिया आपलं समाजमन दाखवतात. विद्यार्थी कसा विचार करतात, प्रेम-मैत्री याकडं कसं पाहतात हे दिसून येतं.
दर्शनाला ओळखणाऱ्या काही परिचितांच्या मते, “ती गुणी मुलगी होती. वारकरी संप्रदायाचे तिच्यावर संस्कार होते. तिनं राहूलशी मैत्री केली हा तिचा दोष नाही. राहूलच्या सोबत तिनं फिरायला जाणं यातही तिचा दोष नाही. राहूलने तिच्या मनमोकळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला आणि निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिचा घात केला.”
अशी वेगवेगळी मतं जाणून घेतल्यावर आणि राहूलने ज्या पद्धतीने दर्शनाचा घातपात केला हे पाहिल्यावर यात दर्शनाची चूक होती असं म्हणता येत नाही. त्यामुळं दर्शनावर आरोप करणं, तिच्या चुका काढणं, तिच्या मैत्रीला दोषी ठरवणं हे चुकीचं तर आहेच, पण ते तिच्यावर अन्यायकारकदेखील होईल. मग तिला दोषी ठरवणाऱ्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत, त्या मुद्यांकडं पाहायचं कसं? तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्यांच्या मानसिकतेचं काय? आणि महत्त्वाचं म्हणजे राहूलनं जी कृती केलीय, त्या कृतीकडं, ती कृती करतानाच्या त्याच्या मानसिकतेकडं पाहायचं कसं? हे खरे प्रश्न आहेत.
राहूलची मानसिकता काय असू शकते? :
राहूलने जे काही कृत्य केले आहे ते अत्यंत थंड डोक्याने आणि विचारपूर्वक केलेलं कृत्य आहे. गुन्हेगाराला शिक्षा देताना कोर्ट त्या गुन्हेगाराच्या मानसिकतेचाही विचार करतं. त्यासाठी एक शब्द आहे – 'Mens rea.' (Mens rea refers to a criminal condition in which a person intentionally breaks the law.) गुन्हेगाराचं ‘इंटेन्शन’ काय होतं हे समजून घेतलं जातं. म्हणजे थोडक्यात, त्याच्या हातून ते चुकून घडलंय की त्यानं ते जाणून-बुजून केलंय. या केसमध्ये दर्शनाचा जीव घेणं हे राहूलचं इंटेन्शन स्पष्ट आहे. त्या इंटेन्शननुसार, नियोजनपूर्वक त्यानं कृती केली. आणि तो पसार झाला. वेगवेगळ्या राज्यांत फिरत राहिला. राहूल हाही एक विद्यार्थीच होता. छोटी-मोठी कामं करून परीक्षा देत होता. तो सराईत गुन्हेगार नव्हता. त्याला पकडणं पोलिसांना फारसं अवघड गेलं नाही. थोडक्यात, आपण दर्शनाला संपवायचं याची त्यानं मानसिक तयारी केली असणार, त्यानुसार त्यानं प्रत्यक्ष खून करण्यासाठी साधनं गोळा केली असणार आणि तिला सोबत घेऊन जाऊन निर्मनुष्य ठिकाणी तिची हत्या केली केली असणार.
हेही वाचा : वास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा... - सतीश देशपांडे
‘जी मुलगी आपल्याशी मैत्री करते, एवढं चांगलं बोलते आणि अधिकारी झाल्यावर लग्नाला मात्र नकार देते. ही मुलगी आपल्या आयुष्यात येणार नसेल तर मग ती इतर कुणाच्याही आयुष्यात येऊ देणार नाही. किंवा माझ्या वाट्याला दु:ख आल्यामुळं तिलापण मी सुखानं जगूच देणार नाही.’ या विचारांतूनच राहूलनं तिला संपवलं. जिच्याशी मैत्री केली, जिच्यासोबत अभ्यास केला त्या आपल्या आवडत्या मैत्रिणीला आपण संपवूच कसं शकतो? खरंतर राहूल जी मैत्री करता होता, त्याला मुळात मैत्री म्हणताच येणार नाही. त्यात त्याचा स्वार्थ दडलेला होता. तिच्याकडं पाहण्याचा त्याचा पुरूषी, पितृसत्ताक दृष्टिकोन कायम होता. मैत्री ही निखळ असते. राहूल आपल्या कलुषित दृष्टिकोनातून या मैत्रीला समजूच शकला नाही. समोरची व्यक्ती नकार देऊ शकते, स्वतंत्र निर्णय घेऊ शकते, निर्णय बदलू शकते, ती आपल्या आयुष्यात नाही येऊ शकत हे विचारच मुळात तो पचवू शकला नाही. राहूलच्या डोक्यात असणारी पितृसत्ताक - पुरूषप्रधान संस्कृती, मुलींकडून-बायकांकडून फक्त होकारच ऐकायचा ही आपल्या समाजाला लागलेली सवय, या समाजाचाच राहूल एक भाग असणं, स्त्री ही वस्तू आहे - ती आपल्याइतकी ताकदवान नाही म्हणून तिच्यावर हक्क दाखवणं, स्त्रीचे स्वतंत्र विचारच मुळात मान्य नसणं, आपली मतं तिला मान्य नसतील तर मग हिंसा करून ती मान्य करायला भाग पाडणं, तरीही तिचा विरोध होत राहिला तर मग तिला कायमचं संपवणं, अशा आपल्या पितृसत्ताक विषम समाजव्यवस्थेतूनच राहूलची वृत्ती तयार झाली. आणि त्यातूनच त्यानं हे चुकीचं कृत्य केलं. राहूलला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, ती होईल असे स्पष्ट दिसतं आहे. पण एवढ्यानं दर्शनाला न्याय मिळणार आहे का? जोपर्यंत ही बुरसटलेली मानसिकता जिवंत आहे, तोपर्यंत दर्शनासारख्या मुलींना त्रास होतच राहणार आहे.
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून आपण काय शिकलो ? :
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा शाळा-महाविद्यालयांच्या परिक्षांपेक्षा अधिक व्यापक, वैविध्यतापूर्ण असतो. इथं विज्ञान-तंत्रज्ञान विषयापासून ते समाजशास्त्र-मानववंशशास्त्र विषयापर्यंत अनेक विषयांची किमान ओळख झालेली असते. भारतीय राज्यघटना, मानवी हक्क हे विषय अभ्यासघटकांत आवर्जून समाविष्ट करण्यात आलेले आहेत. स्त्रियांविषयी, वंचित घटकांविषयीचे कायदे अभ्यासात आहेत. आता तर नीतिशास्त्रासारखा विषय राज्यसेवा मुख्य परीक्षेत आलाय. याचा उद्देश असा आहे की, विद्यार्थ्यांनी आपली मूल्यव्यवस्था समजून घेतली पाहिजे, आपले आचरण हे भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांप्रमाणं असायला हवं, इतिहासाकडं, भारतातील सामाजिक, सांस्कृतिक परंपरांकडं आपण डोळसपणे पाहायला हवं. पण खेदाची बाब अशी की, या सगळ्या विषयांतील घटकांना आपले विद्यार्थी तोंडपाठ करतात, भारतीय राज्यघटनेतील कमीतकमी कलमांची 15-20 वेळा उजळणी करतात, पण ह्या गोष्टी काही अपवाद वगळता कोणीही विद्यार्थी आचरणात आणण्याचा विचारही करत नाही. आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बुरसटलेल्या सामाजिक परंपरांचा इतका पगडा असतो की, हे अभ्यासक्रमातले विषय या पारंपरिक मानसिकतेसमोर पराभूत होतात.
भारतीय राज्यघटनेचा, मानवी हक्कांचा अभ्यास करताना आपण देशातील, जगातील सगळ्या नागरिकांचं स्वातंत्र्य मान्य करतो. सगळ्यांचे हक्क आपण मान्य करतो, पण प्रत्यक्षात बहीण, मैत्रीण, प्रेयसी यांचे निर्णय स्वातंत्र्य, अधिकार मात्र कधीच मान्य होत नाहीत. अभ्यासात शिकलेली समानतेची मूल्ये आचरणात आणायची वेळ आल्यावर आपण त्याकडं पाठ फिरवतो. भावी सनदी सेवकांना आदर्श आणि व्यवहार यांची सांगड घालता यायला हवी. पण हे आदर्श फक्त पुस्तकात बंदिस्त राहतात. पुणे असो वा दिल्ली असो, इथल्या पेठांमधली, ओल्ड राजिंदरनगरसारखा भागातील मुलामुलींची मैत्री, प्रेमप्रकरणं ही तिथंच विरून जातात. यातली बोटावर मोजण्याइतकीच मुलंमुली एकमेकांच्या आयुष्यात येतात. असं का होतं, तर या मुलामुलींना मैत्री हवी असते, प्रेमही हवं असतं, पण जात-धर्म-परंपरा या चौकटी तोडायच्या नसतात, ती हिम्मत नसते. नाहीतर मग राहूलसारखं थेट टोकाचं पाउल उचलताना दिसतात.
स्वतंत्र विचार करावा, आपल्या वर्तनात समानतेसारखी मूल्य असावीत, नकार पचवावा, लोकशाही मूल्यं अंगिकारावीत असं कधीच आपल्या परीक्षार्थींच्या मनावर कोणी बिंबवत नाही. हजारो, लाखो विद्यार्थी आज या प्रवाहात आहेत. हे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात. प्रचंड मेहनत करतात. पण आदर्श आणि व्यवहार यांची सांगड कशी घालावी हे त्यांना कुणीच शिकवत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव, प्रेम, मैत्री या विषयांवर त्यांच्याशी कुणीही संवाद साधत नाही. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, खासगी क्लासेस, माध्यमं या सर्वांनीच या विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष केलंय. हे विद्यार्थी सर्वांना हवेत, फक्त गर्दीसाठी, आंदोलनांसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी. काही अपवादात्मक प्रयत्न वगळता या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार गांभिर्यानं होताना दिसत नाही. हे आपलं मनुष्यबळ तर आहेच, पण देशाचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि या भविष्याकडं आपण अक्षम्य दुर्लक्ष करीत आहोत.
- सतीश देशपांडे
sdeshpande02@gmail.com
(लेखक, मुक्त पत्रकार आहेत.)
Tags: राहुल हंडोरे स्पर्धा परीक्षा दर्शना पवार स्त्री स्वातंत्र्य राजकारण darshana pawar murder case rahul handore competitive exams politics satish deshpande Load More Tags
Add Comment