भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख घटनांचे अवलोकन करायचे झाल्यास त्यात सोलापूरच्या मार्शल लॉ आंदोलनाचा ठळकपणे उल्लेख करावाच लागेल ! कारण 1930 साली सोलापूरच्या जनतेने चार दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते आणि भारतात फक्त सोलापूर येथे ब्रिटीशांनी मार्शल लॉं पुकारून संपूर्ण शहर लष्कराच्या ताब्यात दिले होते ! सोलापूर सोडून इतर ठिकाणी तीव्र आंदोलने झाली पण ब्रिटिश लष्कराच्या ताब्यात केवळ सोलापूर हे शहर देण्यात आले होते !
1857 च्या स्वातंत्र्यसमरानंतर ब्रिटीशांनी आपल्या धोरणात बदल केला व देशात काही कारखाने उभारण्यास प्रोत्साहन दिले तर काही कारखाने स्वत: उभे केले. सोलापूरातही सहा कापड गिरण्या 1877 ते 1909 या काळात उभारल्या गेल्या. सोलापूर हे 'गिरणगाव' म्हणून त्या काळात प्रसिद्ध होते. जवळपास वीस ते पंचवीस हजार गिरणी कामगार त्यात काम करीत होते. हे कामगार राजकीयदृष्ट्या खूपच जागरूक होते. ज्यावेळी देशात कुठलेही कामगार कायदे अस्तित्वात नव्हते त्यावेळी 1920 साली संप करून कामाचे तास कमी करून घेतले व मजुरीतही वाढ करून घेतली होती, 'भीमरावचा संप' अशी इतिहासात त्याची नोंद आहे!
या पार्श्वभूमीवर 1920 नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वाचा देशात उदय झाला व सामान्य जनताही स्वातंत्र्य आंदोलनात रस्त्यावर यायला सुरवात झाली. सोलापूरातही प्रभात फेर्या, राष्ट्रीय गाणी यांनी वातावरण ढवळून निघत होते. गिरणी कामगारांचा त्यात मोठा सहभाग असायचा. अशात पहिले महायुद्ध झाले, त्याचा फटका संपूर्ण जगाला बसत होता, आर्थिक मंदीमुळे गिरणी कामगारांची पगार कपात करण्यात आली, त्याविरुद्ध मुंबईच्या गिरणी कामगारांनी 1928 साली संप केला. सोलापूरातही त्याचे पडसाद उमटत होते. सोलापूरात गिरणी कामगरांमध्ये डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर, भाई छन्नुसिंग चंदेले, भाई विभूते व त्यांच्या तालमीत तयार झालेले कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आदींचा चांगलाच संपर्क होता. सत्याग्रहामध्ये सामान्य लोक व कामगारही मोठ्या संख्येने सामील होत होते. सोलापूर नगरपालिकेमध्ये काही सरकारधार्जिण्या नगरसेवकांनी गव्हर्नरला मानपत्र देण्याचा ठराव आणला होता, तो बहुमताने फेटाळला गेला आणि काही दिवसांनी म. गांधींना मानपत्र देण्याचा ठराव मात्र संमत करण्यात आला! याचा राग कलेक्टर हेनरी नाईट यांना होताच. तशात नगरपालिकेवर तिरंगा झेंडा फडकविण्याचा ठराव संमत करण्यात आला. त्यावेळचे नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी पुढाकार घेतला व 6 एप्रिल 1930 रोजी सोलापूर नगरपालिकेवर तिरंगा झेंडा डौलाने फडकू लागला!
अशातच म. गांधींचा मिठाचा सत्याग्रह सुरू झाला. जिथे समुद्र किनारा नाही तेथील लोकांनी दारूबंदीचा प्रचार करावा, ताडीची झाडे काढून टाकावीत असे आवाहन गांधींनी केले होते. त्याप्रमाणे सोलापुरात दारू गुत्त्यांसमोर निदर्शने, प्रभात फेर्या आदींनी वातावरण ढवळून निघाले होते. म. गांधींना ब्रिटीशांनी 4 मे 1930 रोजी मध्यरात्री सूरतच्या जवळील कोराडी येथे अटक केली, ही बातमी सोलापुरात 5 मे ला संध्याकाळी पोचली. 6 मे रोजी स्थानिक नेत्यांच्या जाहीर निषेध सभा झाल्या. वातावरण गरम झाले होते. गिरणी कामगार कामावर न जाता निषेध मोर्चांमध्ये सहभागी होत होते.
8 मे ला काही कामगार रुपाभवानी मंदिराजवळची शिंदीची झाडे तोडू लागले तेव्हा डि. एस. पी. प्ले फेयर व कलेक्टर हेनरी नाईट यांनी काही जणांना अटक केली. ही बातमी समजताच लोक मोठ्या संख्येने तेथे जमले व अटक केलेल्या कामगारांची सुटका करा अशी मागणी करू लागले. कलेक्टरने गोळीबार केला, त्यात शंकर शिवदारे या तरुणाचा बळी गेला. कामगार अधिकच चिडले व त्यांनी मंगळवार पेठ पोलिस चौकी जाळली. चौकीमध्ये दोन पोलिस होते, ते आगीत मृत्यूमुखी पडले. नंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी गोळीबार केला, त्यात चार माणसे मेली. त्यामुळे लोक जास्त संतापले व त्यांनी गोल चावडी येथील न्यायलयाची इमारत पेटवून दिली. 9 मे ला पोलिस गोळीबारात 9 माणसे मारली गेली. वातावरण अधिकच चिघळले. ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या बायका मुलांनी घाबरून आपला जीव वाचविण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या इमारतीमध्ये आसरा घेतला. सरकारी कार्यालये व पोलिस ठाणी यांच्यावर कामगारांचा रोष होता, कारण ती जुलमी ब्रिटिश सत्तेची प्रतीक होती! सोलापूर शहर शांत होत नाही हे बघून कलेक्टर नाईटने मुंबईला अहवाल पाठविला व लष्कराची मदत मागविली. मुंबईच्या गृह सचिवांनी केंद्र सरकारला कळविले ते असे- 'सोलापुरात 18000 कामगार मोकाट सुटले आहेत, ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना धोका आहे, ते जीव मुठीत धरून जगत आहेत तरी लष्कर ताबडतोब पाठवावे.'
दि. 9, 10, 11 व 12 मे 1930 असे चार दिवस सोलापूर स्वतंत्र होते! युथ लीगचे तरुण कार्यकर्ते, कामगार हे सर्व मिळून शहराची सर्व कामे करीत होते, कुठेही गोंधळ नव्हता, रस्त्यावरची वाहतूक सुद्धा स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे नियंत्रित करीत होते. रामकृष्ण जाजू व इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. कलेक्टर कचेरीवर, फौजदार चावडीवर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. फक्त गोरे अधिकारी व पोलिस हे कुठेच दिसत नव्हते !
गोरे अधिकारी व गोर्या सैनिकांचेच लष्कर 12 मे च्या रात्री सोलापूरात पोहोचले आणि मग मात्र शहरात मार्शल लॉं लागू करण्यात आला, संपूर्ण शहर लष्कराने ताब्यात घेतले आणि सगळीकडे ब्रिटिश सानिकांचा नंगा नाच सुरू झाला. घराबाहेर कुणी दिसला की गोळीबार करून त्याला मारले जात होते, अशी अनेक निरपराध माणसे मारली गेली. नागरपालिकेवरील तिरंगा झेंडा काढण्याचा हुकूम लष्कराने दिला, नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी त्यास नकार दिला, तेव्हा लष्करी न्यायालयाने त्यांना 6 महीने सक्तमजुरी व 10,000 रु. दंड अशी शिक्षा दिली. तुळशीदास जाधव यांना ५ वर्षे सक्तमजुरी व 3000 रु. दंड, 5 वर्षे सक्तमजुरी व 2000 रु. दंड ठोठावण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. अंत्रोळीकर, भाई छन्नुसिंग चंदेले, जगन्नाथ मास्तर, रामभाऊ राजवाडे, बंकटलाल सोनी आदि अनेक नेत्यांना सक्तमजुरीच्या शिक्षा झाल्या. डॉ. अंत्रोळीकर व भाई चंदेले यांच्या मालमत्ता जब्त करण्यात आल्या. मुख्य म्हणजे मंगळवार पेठ पोलिस चौकी जळीत प्रकरणी व दोन पोलिसांना जाळले बाबत चार लोकांना त्यात गोवण्यात आले, राजद्रोहाचाही गुन्हा त्यांच्यावर लावण्यात आला ते म्हणजे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे व पत्रकार असलेले अवघ्या २२ वर्षांचे कुर्बान हुसेन यांच्यावर लष्करी कोर्टात खटला चालविण्याचा फार्स करण्यात आला व या चार जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली! वास्तविक या चारही जणांचा पोलिस चौकी जळीत प्रकरणात प्रत्यक्ष काही संबध नव्हता पण खोटे पुरावे उभे करून फाशीची शिक्षा देण्यात आली.
येरवडा तुरुंगात 12 जानेवारी 1931 रोजी या चार हुतात्म्यांना फासावर लटकाविण्यात आले. हे चार हुतात्मे म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचेच प्रतीक आहेत. यावेळी सर्व सोलापूर शोक करीत होते. शेकडो वर्षाची परंपरा असलेली सोलापूरतील नंदीध्वजाची - काठ्यांची मिरवणूक 12 जानेवारी 1931 रोजी निघाली नाही! या चार हुतात्म्यांच्या बलिदनामुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिकाना प्रेरणा मिळाली. कामगारवर्गीय सत्ता असलेल्या त्यावेळच्या रशियन नेत्यांनी मार्शल लॉ उठावाचा ' सोलापूर कम्युन' असे संबोधून गौरव केला आहे!
- रविंद्र मोकाशी
Tags: मल्लप्पा धनशेट्टी श्रीकिसन सारडा कुर्बान हुसेन महात्मा गांधी Load More Tags
Add Comment