कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे 21 आणि 22 मार्च, 1920 रोजी झालेल्या परिषदेला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या परिषदेचा शतकमहोत्सवी भव्य सोहळा राज्य शासनाने माणगाव येथेच आयोजित केला होता. मात्र 'COVID-19' या विषाणूच्या जागतिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तो पुढे ढकलण्यात आला. आज 2020 मध्ये या घटनेकडे आपण सम्यक दृष्टीने पाहायला हवे. 'शंभर वर्षांपूर्वी समाजातील बहिष्कृत (अस्पृश्य) वर्गाची परिषद कशी झाली असेल?', असा विचार आजच्या घडीला व्हायला हवा.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक चळवळीसाठी 'माईलस्टोन' ठरणारी ही परिषद होती. तशीच ती प्रस्थापितांना धक्का देणारीही होती. समाजभान म्हणून आपल्याला या परिषदेचे वस्तुनिष्ठ आकलन होणे आवश्यक वाटते. त्यासाठी प्रत्यक्ष परिषदस्थळी जाऊन काळाच्या कसोटीवर आपणास प्रत्यक्ष अनूभूती घेता आली तर ती गोष्ट अधिक उचित ठरेल.
शंभर वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली भाषणे, त्यावेळचे वातावरण, सामाजिक स्थिती, समाज मंदिर(तक्क्या), समोरचे मोठा बुंधा असलेले जुने चाफ्याचे झाड, गाव परिसर, जुन्या जाणत्या माणसांच्या आठवणी याची अनुभूती जुने-नवे संदर्भ शोधायला आपणास मदत करतील. माणगाव परिषदेचे प्रमुख संयोजक आप्पा दादगौंडा पाटील यांच्या वाड्याचे अवशेष पहावेत. सुकुमार पाटील यांचे घरी परिषदेत बसण्यास वापरलेला जाजम पहावा, तो हातात घ्यावा. चाफ्याच्या झाडाला हस्तस्पर्श व्हावा आणि आंबेडकर पुतळ्याजवळ काही क्षण स्तब्ध उभे राहावे. आपलं भावूक मन शंभर वर्षे मागे जाईल... (संचारबंदी संपल्यावर हे शक्य आहे.)
वर्तमानात माणगाव अधिकच प्रगल्भ दिसून येते. इचलकरंजी रस्त्यावरून पश्चिमेकडे माणगावच्या हद्दीत प्रवेश करताच सारनाथ स्तूपाची भव्य आकर्षक कमान आपले स्वागत करते. रस्ता तर अगदी डांबरी आणि चकाचक. खरंतर मूळगाव दीड-दोन किलोमीटर आत असूनही आज मात्र या कमानीपासूनच दुतर्फा नव्या पद्धतीच्या आकर्षक इमारती लक्ष वेधून घेतात. ऐतिहासिक असलेले माणगाव आज नव्या रुपात आपणास पाहायला मिळते.
याच वर्षी स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत गावाला पन्नास लाखाचे बक्षिसही मिळाले आहे. आज प्रत्येक कुटुंबाचे शौचालय आहे. गावात स्वच्छता आणि गल्लोगल्ली डांबरी रस्ते पाहायला मिळतात. मुख्य रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसून येते. गावची लोकसंख्या आज दहा हजारच्या घरात आहे.
एकेकाळी गावात पाच ते सहा पाण्याची तळी होती. आज मात्र प्राथमिक शाळेसमोर एक तळे दिसून येते. उरलेली तळी भराव टाकून त्यावर इमारती किंवा तत्सम वापर होतोय. गावात माध्यमिक शाळा, सेवा संस्था, वाचनालय, सुसज्ज ग्रामपंचायत अशा सुविधा आज मिळत आहेत. दक्षिणेला पंचगंगा नदी वाहते आहे. तिच्यामुळे शेत जमीन हिरवीगार आहे. शेती, व्यवसाय आणि नोकरी यामुळे गाव तसे समृद्ध आहे. लोकांचे राहणीमान सुधारले आहे. वेगवेगळ्या समाजाचे लोक आज गावाच्या विकासासाठी एकत्र येत आहेत. ही विधायक गोष्ट आहे.
माणगावकरांनी नुकतेच एक पुरोगामी पाऊल ऊचलले आहे. गावचे सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असूनही शतक महोत्सवाचे औचित्य साधून गावच्या एकमताने अर्चना कांबळे या महिलेची सरपंच पदावर निवड केली आहे. अद्ययावत समाजमंदिर, त्यापुढे क्रांतीबा जोतिबा फुले सभागृह आणि लंडन हाऊसची प्रतिकृती (डॉ.आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान) नव्याने साकार होत आहे. गावच्या प्रवेशद्वारावर सारनाथची लेणी स्वागत करतात. जिथे डॉ. आंबेडकर यांनी भाषण दिले, तिथेच त्यांचा पुतळा उभारला आहे. शासन-प्रशासन आणि समाज यांच्या पुढाकाराने या सर्व गोष्टी होत आहेत. त्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून सुमारे तीन-साडेतीन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शतकमहोत्सवी कार्यक्रम गावाबाहेरील भव्य जागेत संयोजित आहे. आज हे सर्व अनुभवताना किती छान वाटते...
पण शंभर वर्षापूर्वीच्या सामाजिक स्थितीचा आपण विचार करू, तर काय दिसते? कोणत्या पार्श्वभूमीवर माणगाव परिषद पार पडली असेल? तिचे आयोजन करताना काय विचार झाला असेल? तिचे तत्कालीन परिणाम काय झालेत? या सर्व गोष्टीही पाहाव्या लागतील.
महाराजा सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या आर्थिक मदतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बडोद्यातील नोकरीत त्यांना अस्पृश्यतेचे अत्यंत वाईट अनुभव आले. नोकरीचा राजीनामा देऊन ते मुंबईत परतले. डॉ.आंबेडकर प्राध्यापक झाले. 'माझ्या गरीब आणि अस्पृश्य, अज्ञानी बांधवांना मला जागृत केले पाहिजे', असा त्यांचा मनोदय होता. समतेचा पुरस्कार करणारे शाहू महाराजही याच विचारात होते. आपल्या संस्थानातील कागल इलाख्यात अस्पृश्यांसाठी एखादी परिषद घ्यावी, असे त्यांच्या मनाने निश्चित केले. वेदोक्त प्रकरणामुळे समस्त ब्रह्मवृंदात त्यांच्याबद्दलचा असंतोष खदखदत होताच. अशा परिस्थितीत त्यांचे विश्वासू असलेले माणगावचे आप्पाराव पाटील यांच्यावर त्यांनी परिषदेची जबाबदारी सोपवली.
आप्पाराव पाटील हे जैन समाजाचे असले तरी अस्पृश्य समाजाप्रती त्यांच्या मनात कणव होती. ते पुरोगामी विचारांचे होते. माणगाव येथे दलित समाजाची लोकवस्तीही बऱ्यापैकी होती. आप्पाराव आणि नाना मास्तर, नागोजी कांबळे, गणू सनदी, कासीम मास्तर आदी गावकरी कार्यकर्त्यांनी परिषदेची जबाबदारी स्वीकारली. तत्कालीन परिस्थिती पाहता ही किती अवघड गोष्ट होती, हे आपल्या लक्षात येईल.
दळणवळण आणि प्रसार माध्यमांची कमतरता असतानाही आप्पाराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 21 आणि 22 मार्च, या दोन दिवशी परिषदेचे आयोजन केले. गुढीपाडव्याच्या दिवशी ही परिषद सुरू झाली. आज आपण या परिषदेचा नामोउल्लेख 'माणगाव परिषद' असाच करतो, परंतु परिषदेचे नाव होते 'दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत (अस्पृश्य) वर्गाची परिषद'.
इथल्या प्राथमिक शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केला. (सध्या मात्र मुक्कामाच्या खोलीची पूर्णतः पडझड झाली आहे. तिथे नव्याने बांधकाम करून स्मारक करता येईल.) डॉ.आंबेडकरना गावात येण्यासाठी रुकडीच्या रेल्वे स्थानकावरून पायी यावे लागले, हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, "उपाशी रहा, मरा, परंतु मुलांना शिकवा."
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी अत्यंत प्रभावी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी आंबेडकरांचा गौरव केला. "डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि एक वेळ अशी येईल की ते भारताचे पुढारी होतील", असे दूरदृष्टीचे सूचक उद्गार छत्रपतींनी यावेळी काढले होते.
परिषदेत एकूण पंधरा ठराव संमत करण्यात आले. त्यात, बहिष्कृत लोकांना मानवी हक्क मिळावेत, सर्व मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे देण्यात यावे, मेलेल्या जनावरांचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे गुन्हा आहे, भावी कायदे कौन्सिलात बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात निवडून देण्यात यावेत, असे महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आले.
मूकनायक अंकाच्या वृत्तांतानुसार सभेला 5000 लोक उपस्थित होते, अशी नोंद आहे. त्या काळाच्या मानाने ती खूपच होती. तत्पूर्वी सदर परिषद ही बाटलेल्या लोकांची आहे आणि बाटलेला माणूसच तिचा अध्यक्ष आहे,असाही प्रसार करून अनेकांना परिषदेस जाण्यास रोखले होते. तरीही कार्यकर्त्यांनी गावोगावी परिषदेची पत्रके वाटली होती.
परिषदेचे तत्काळ पडसाद प्रथम गावावर उमटले. ज्यांनी पुढाकार घेऊन आपल्या समाजाच्या विरुद्ध जाऊन अस्पृश्य परिषदेसाठी योगदान दिले, त्या आप्पाराव पाटील यांना स्वजातीने अक्षरशः वाळीत टाकले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना कोल्हापुरातच रहावे लागले. तिकडे माणगावातील अस्पृश्यांना स्पृश्यांनी अडचणीत आणले. त्यांच्यावर चहुबाजूनी अघोषित बंदी आणली. अस्पृश्यांना पाणी मिळेना, गुरांसाठी चारा मिळेना, सरपणासाठी लाकूड मिळेना, की अन्नधान्य मिळेना. जणू गुलामगिरीच. शाहूराजांनी गावकऱ्यांना सक्त ताकीद देऊन अस्पृश्यांवरील गावकऱ्यांची बंदी उठवली.
डॉ.आंबेडकर हे वादळी तुफान प्रस्थापिताना धक्का देणार, हे या परिषदेमुळे निश्चित झाले. ही परिषद म्हणजे त्यांच्या सामाजिक चळवळीचा आरंभबिंदू ठरला. आंबेडकरांनी आपल्या भाषणात मुंबई इलाख्यातील अशाप्रकारची ही पहिलीच परिषद असल्याचे नमूद केले आहे. असे असूनही आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की, या परिषदेची छायाचित्रे उपलब्ध होत नाहीत. परिषदेच्या मूळ पत्रिका आढळत नाहीत. मूकनायक आणि जुन्याजाणत्या माणसांच्या आठवणींवरून परिषदेचा वृत्तांत जपला जातोय. यातून नव्याने उभारत असलेल्या माणगावने धडा घेतला पाहिजे. आपल्या ऐतिहासिक अभिलेख, वस्तूंचे जतन जाणीवेने केले पाहिजे. किमान शतकमहोत्सवी कार्यक्रमानिमित्ताने उपलब्ध होत असलेले सर्व पुरावे, अभिलेख, वस्तू यांचा संग्रह करावा, त्यांचे जतन करून निगा राखावी. ग्रामपंचायत, गावचावडी, शाळा, संस्था व माध्यमांनी ही जबाबदारी घ्यावी. पुढच्या पिढीला अस्सल इतिहास आणि सामाजिक परिस्थितीचे आकलन व्हावे, यासाठी एवढे करणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य आहे!
- विश्वास सुतार, कोल्हापूर
suvishw73@gmail.com
Tags:Load More Tags
Add Comment