भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

कोलकाता येथे भारतातील पहिली ट्रॅम 24 फेब्रुवारी 1873 रोजी सुरू झाली, त्याला आज दीडशे वर्षे पुरी झाली.

आता देशात ट्रॅम सुरू असलेले एकमेव शहर कोलकाता हेच आहे. पण तेथेही आता केवळ दोनच मार्गावर ट्रॅमसेवा सुरू आहे. | telegraphindia.com

भारतातील ट्रॅमचा ओझरता इतिहास तिच्या दीडशेव्या वाढदिवसानिमित्त देताना एकच गोष्ट मनात येते की, आता तरी ट्रॅमचं वाहतूक आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व लहान-मोठ्या शहरांना नीटपणे कळावं आणि मोठमोठे रस्ते आणि मेट्रोवर मोठा खर्च न करता उपलब्ध चांगल्या रुंदीच्या रस्त्यांवरच एका बाजूला ट्रॅमचे रूळ ट्रॅममार्ग तयार करून तिथं ट्रॅम सुरू करण्याच्या योजना आखण्यात याव्या. यामुळे प्रवाशांनाही चांगली सुविधा मिळेल आणि तीही अगदी परवडण्याजोगी.

ट्रॅम आज फारच थोड्या लोकांना आठवत असेल कारण भारतातील ज्या शहरांमध्ये ट्रॅम सुरू होती त्यातील कोलकाता वगळता बाकी सर्व शहरातील ट्रॅम केव्हाच बंद करण्यात आल्या आहेत. ट्रॅम विजेवर चालत असल्यानं प्रदूषण होतच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रॅम हे सार्वजनिक वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. आदर्श म्हणावा असा. कारण एकाच वेळी ट्रॅममधून तिच्या क्षमतेनुसार म्हणजे एका डब्यात साधारण 50 आणि दोन डबे असतील तर दुप्पट प्रवासी एकाच वेळी जाऊ शकतात. म्हणजेच साधारण कमीतकमी 20 मोटारी रस्त्यावर येत नाहीत. त्यामुळं वाहतूक सुलभ तर होतेच शिवाय मोटारींमुळे होणारं प्रदूषणही कमी होतं. आता पर्यावरण संरक्षणाच्या मोहिमेत ट्रॅमचं महत्त्व किती आहे हे यावरून कळतं. त्यामुळेच आता अनेक शहरांमध्ये ट्रॅम सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे.

तसं पाहिलं तर भारतात ट्रॅम सर्वप्रथम कलकत्त्यात (आता कोलकाता) 24 फेब्रुवारी 1873 रोजी सुरू झाली, त्याला आज शुक्रवार, 24 फेब्रुवारीला दीडशे वर्षे पुरी होतील. त्यामुळंच ट्रॅमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं कोलकात्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रमही होणार आहेत. पाणी पुरवण्यासाठी आणि रस्ते धुण्यासाठी म्हणून ज्या घोडे जोडलेल्या ट्रॅमचा उपयोग 1920 च्या सुमाराला केला जात असे, ती ट्रॅम यावेळी पुन्हा धावणार आहे. तिच्या जोडीला 1920 मध्ये लाकडाच्याच बनवलेल्या आणि नंतरची दोन दशके वापरात असलेल्या (परंतु पुढे दीर्घकाळ डेपोमध्येच असलेल्या) दोन ट्रॅमदेखील असणार आहेत. या ट्रॅम इतिहासाच्या साक्षीदार आहेत. या दीर्घ काळात त्यांनी मोठे दुष्काळ, दोन महायुद्धे, भारताचा स्वातंत्र्य संग्राम, आणि जातीय दंगलीही पाहिल्या आहेत आणि आता त्या स्वतःच इतिहासाचा भाग बनल्या आहेत.

कोलकाता येथील वर्तमानपत्रातील ही बातमी संगणकावर महाजालावर वाचल्यावर आठवणीतील ट्रॅम डोळ्यासमोर आली. कलकत्त्यात ट्रॅम सुरू झाल्यावर नंतरच्याच वर्षी मुंबईतही 9 मे 1874 रोजी ट्रॅम सुरू झाली. घोडे जोडलेली ही ट्रॅम कुलाबा - क्रॉफर्ड मार्केट मार्गे पायधुनी आणि बोरीबंदर पासून काळबादेवी मार्गे पायधुनी या मार्गांवर सुरू करण्यात आली होती. लहानपणी मुंबईला गेलं की ट्रॅमचा प्रवास हे आकर्षण असायचं. ती एकमजली तसंच दुमजलीही असायची. ती रुळांवरूनच धावायची. पण ते रूळ नेहमीच्या रस्त्यांवरच असायचे. आणि रस्त्याच्याच पातळीवर असल्यानं ट्रॅमच्या आजूबाजूनं वाहनं, म्हणजे मोटारी, बग्ग्या व्हिक्टोरिया जात असायच्या. बाकी ट्रक, सायकली, मोटरसायकली असत आणि पादचारीही. ट्रॅमचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या चालकाला ती उभं राहूनच चालवावी लागायची. कारण त्याला बसायला सीट वगैरे व्यवस्था नव्हती. महत्त्वाची बाब म्हणजे ट्रॅम रूळावरून धावत असली, तरी ते धावणं तसं संथगतीचं असायचं. म्हणजे चालणाऱ्यांनाही जरा वेगानं जाऊन ट्रॅम पकडता येई. ट्रॅमचं तिकिट अगदी माफक म्हणावं असं असायचं. 10-15-25 पैसे (तेव्हाचे नवे पैसे) असं. प्रवास मात्र लांबचा. दादरपासून थेट बोरीबंदर (आता सीएसटी), कुलाबा गाठता यायचं. ट्रॅमचे इतरही बरेच मार्ग होते. ट्रॅम दोन्ही बाजूंनी चालायची. न वळताच ज्या दिशेनं आली त्याच दिशेला परत जायची. त्यासाठी वरची विजेच्या तारांना (पेंटाग्राफप्रमाणे) स्पर्श करणारी उंच दांडी फिरवली जायची. तिच्या टोकाला एक चाक असे आणि ते वरच्या विजेच्या तारांखाली स्पर्श करीत असे. मग चालक दुसऱ्या टोकाला जाऊन ट्रॅम सुरू करायचा. त्यावेळी ही अगदी आश्चर्याची बाब वाटायची. ट्रॅमच्या दिशेत असा बदल होई, जेथे दुसरे ट्रॅममार्गही असत त्या ठिकाणाला (रेल्वेप्रमाणेच) ट्रॅम टर्मिनस म्हणत. आजही दादर (पूर्व) ची ओळख दादर टीटी अशीच आहे. पण ती का, हेही अनेकांना ठाऊक नसतं. 

ट्रॅमचं तिकिटही लहानसं - लोकलचं असतं साधारण तसंच - असायचं. ते जवळ असलं की बस्स! मध्येच वाटलं तर ट्रॅम सोडून नंतर धावत जाऊन पुन्हा त्याच ट्रॅममध्ये आरामात बसता यायचं. कारण ट्रॅमचा संथ वेग. त्यामुळं कोणीही कुठेही उतरायचं आणि थोड्या वेळानं पुन्हा चढायचं, असा खेळ अनेकजण करत. ट्रॅमची घंटाही वेगळी असे, टेबलावर, ऑफिसांमध्ये कुणाला बोलावण्यासाठी वाजवण्यात येणाऱ्या टेबलावर असते त्या घंटेसारखी, पण मोठ्या आकाराची. तिचा आवाजही ऐकावासा वाटत असे. तो दचकावून न टाकताच ट्रॅम येत असल्याची सूचना देत असे. तीही धमालच. त्या काळातच कुणातरी (बहुधा हरी विनायक वाडेकर यांनी - चूकभूल द्यावी घ्यावी) ‘पुण्यात ट्रॅम’ नावाचा सुंदर विनोदी लेख लिहिला होता.

कलकत्त्यापाठोपाठ अनेक शहरांमध्ये ट्रॅम सुरू झाल्या होत्या. मुंबई - 1874, नाशिक 1879 मद्रास (आता चेन्नई) - 1895, कानपूर 1907, कोचीन (आता कोची), दिल्ली- 1908, पाटणा 1903, भावनगर 1926 ही ती शहरे, पण नंतर थोड्याच वर्षांत वाढती वस्ती, रहदारीचा वेग तिच्यामुळं कमी होतो, पुरेसे प्रवासी नाहीत म्हणून तोटा होतो इ. कारणांनी किंवा कंपनी बंद पडल्यानं, कोलकाता वगळता बाकी सर्व शहरांतील ट्रॅम 1933 ते 1964 या काळात हळूहळू बंद केल्या गेल्या. त्यापूर्वी पाटणा येतील ट्रॅम तर 1903 सुरू झाल्यानंतर त्याच वर्षी बंद करण्यात आली होती. सर्वात शेवटी मुंबईची ट्रॅम-सेवाही 31 मार्च 1964 रोजी बंद करण्यात आली. ती चालवणाऱ्या बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅन्ड ट्रामवे कंपनी अर्थात ‘बेस्ट’कडून कलकत्त्याच्या कंपनीने बऱ्याच ट्रॅमकार घेतल्या होत्या. त्यामुळे आता देशात ट्रॅम सुरू असलेले एकमेव शहर कोलकाता हेच आहे. पण तेथेही आता केवळ दोनच मार्गावर ट्रॅमसेवा सुरू आहे.

तेव्हांच्या कलकत्त्यात ट्रॅम सुरू झाली खरी, पण तेथे सुरू झालेली ट्रॅम त्याच वर्षी 1873 च्या नोव्हेंबरमध्ये बंद पडली. (मुंबईतील मात्र सुरू झाल्यावर व्यवस्थित मात्र चालू राहिली.) ती सिआल्डा ते आर्मेनियन स्ट्रीट या मार्गावर धावत होती. नंतर 1880 मध्ये ‘कलकत्ता ट्रामवे’ कंपनीची स्थापना करण्यात आली. आता ट्रॅम पुन्हा सुरू झाली आणि ती वाफेच्या इंजिनावर धावणारी ट्रॅम होती. कालांतराने म्हणजे 1902 मध्ये विजेवर चालणाऱ्या ट्रॅम सुरू झाल्या. एकोणिसाव्या शतकाअखेर कलकत्त्यामध्ये ट्रॅम कंपनीकडं 166 ट्रॅमगाड्या, 1000 घोडे आणि सात वाफेवर चालणारी इंजिने होती. एकूण मार्ग 19 मैल लांबीचे होते. 1900 मध्ये विजेवरील ट्रॅम सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली. त्यासाठी 4 फूट साडेआठ इंच रुंदीचे (ब्रॉड गेज) मार्ग तयार करण्यासाठी रूळ टाकण्यात आले. या मार्गावर 1902 मध्ये विजेवर चालणारी ट्रॅम प्रथमच धावली. ती एस्प्लेनेड ते किद्दरपूर या मार्गावर धावली. साधारण दशकापूर्वी म्हणजे 2013 मध्ये आधुनिक कालानुसार ट्रॅमचे रंगरूपही पालटलं आहे आणि आता तर वातानुकूलित ट्रॅमही सुरू करण्यात आल्या आहेत. कलकत्त्यात एके काळी सर्वात जास्त 37 मार्गांवर ट्रॅम धावत होती. पण ते एकापाठोपाठ एक असे बंद करण्यात आले. तरीही आजघडीला यापैकी 30 मार्ग अगदी सुस्थितीत आहेत. पण त्यातील फक्त दोन मार्गांवर ट्रॅम धावत आहे. तीही नव्या आकर्षक रूपात. आशादायक विशेष गोष्ट अशी की, हवामान बदलाच्या परिणामांमुळे आता जगभर बहुतेक देशांमध्ये पर्यावरण रक्षणाची जाणीव होऊन पर्यावरणाचे महत्त्व लोकांना कळले आहे आणि पर्यावरण रक्षणाबाबत जाणीव झाल्यामुळे त्यादृष्टीनं प्रयत्न होत आहेत. म्हणूनच आता ट्रॅम जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारण ती अन्य वाहनांप्रमाणे प्रदूषण करत नाही. म्हणूनच ती पर्यावरणपूरक आहे, हे मुद्दाम सांगितले जात आहे. शिवाय ट्रॅम ही आता कोलकाताची निशाणीच (आयकॉनच) बनली आहे.

याच कारणामुळे आता कोलकाता येथील ट्रॅम यात्रा या ट्रॅम लव्हर्स म्हणजे ट्रॅमप्रेमी गटाने तिचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी, म्हणजे 150 वे वर्ष मोठ्या जल्लोषात साजरे करण्याची योजना आखली आहे. त्याबाबत या गटाचे सदस्य साग्निक गुप्ता यांनी सांगितले की, शहरातील सर्वात जुन्या प्रवासी वाहनाची कहाणी ट्रॅम सांगेल. ती शहराची जुनी सोबतीण आहे. म्हणूनच पश्चिम बंगाल वाहतूक मंडळाच्या (वेस्ट बेंगॉल ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन, अर्थात डब्ल्यूबीटीसी) मदतीने आमच्या वतीने विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्यात चर्चा, मुलांसाठी निबंधलेखन स्पर्धा, यांबरोबर व्हिक्टोरिया स्मारक ते एस्प्लेनेड डेपो अशी पदयात्राही आयोजित केली जाणार आहे. तसेच एस्प्लेनेड डेपो येथे 1938 मधील 142 क्रमांकाच्या ट्रॅममध्येच ट्रॅम म्युझियम साकार करण्यात आले आहे आणि ते पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. आता राष्ट्रीयीकरण झालेली कंपनी 24 कोटी रुपये खर्चून अस्तित्वात असलेल्या ट्रॅम मार्गांचे नूतनीकरण करणार आहे.

या कार्यक्रमाबाबत माहिती देताना संयोजक म्हणाले, "ट्रॅमकडे केवळ तिला वारसा मूल्यामुळे महत्त्व आहे, या दृष्टीने पाहिले जाऊ नये. तर ती सार्वजनिक वाहतुकीचे उपयुक्त साधन असल्यामुळे आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे तिचे महत्त्व मोठे आहे, हेही लक्षात घेतले जावे." यावेळी उपस्थित असलेले जर्मन दूतावासाचे मॅनफ्रेड ऑस्टर यासंदर्भात बोलताना म्हणाले की, 1968 मध्ये आमच्या तत्कालीन पश्चिम जर्मनीमध्ये ट्रॅम बंद करण्यात आली होती. पण नंतर थोड्या काळातच आम्हाला तसे करणे ही आमची चूक होती हे कळले. त्यामुळे 1989मध्ये बर्लिनची भिंत पडल्यानंतर आणि दुसऱ्या महायुद्धानंतर विभागलेले जर्मनीचे पूर्व जर्मनी आणि पश्चिम पश्चिम जर्मनी हे दोन्ही भाग पूर्वीप्रमाणेच एक झाल्यानंतर आम्ही (पूर्वीच्या) पूर्व आणि पश्चिम जर्मनीला जोडणारे ट्रॅमचे रूळ टाकले. आता तुम्ही जर्मनीच्या कोणत्याही भागात सहजपणे जाऊ शकता. आणि ट्रॅमला लोक मोटारीपेक्षाही अधिक पसंती देत आहेत. मेलबर्नमध्येही 250 कि.मी. लांबीचे ट्रॅम मार्ग आहेत. त्यांवर 1763 थांबे आहेत. तेथे ट्रॅम कंडक्टर म्हणून काम करणारे रॉबर्तो डी आंद्रिया हे कोलकाता येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा : तारांगणातील 'मांडव' - मांडू (मध्यप्रदेश) येथील ‘सोलो बॅकपॅक ट्रीप’चा अनुभव - मकरंद ग. दीक्षित


आता थोडे भारतातील इतर शहरांमधील ट्रॅमबाबत. कलकत्त्यापाठोपाठ अनेक शहरांमध्ये ट्रॅम सुरू झाल्या. मुंबई- 1874, नासिक (आता नाशिक) 1879, मद्रास (आता चेन्नई)- 1895, कानपूर 1907, कोचीन (आता कोची), दिल्ली - 1908, पाटणा 1903 भावनगर 1926 ही ती शहरे होती हे वर सांगितलेच आहे. यातील मुंबई, चेन्नई, दिल्ली येथील ट्रॅमबाबत माहिती होती. परंतु नाशिकमध्येही ट्रॅम होती ही बाब आश्चर्याचीच वाटली. अर्थात ती 1933 मध्येच बंद करण्यात आल्यामुळे तिच्याबाबत माहिती असणारं वा तिच्याबाबत सांगणारं कुणी भेटणंही जवळ जवळ अशक्यच होतं. मात्र माहिती महाजालावरच काही स्थळांवर याबाबत माहिती मिळाली. नाशिकमधील ट्रॅम नॅरोगेज म्हणज 2 फूट 6 इंच (76.2 सें.मी.) मार्गावरच सुरू करण्यात आली होती. एव्हरार्ड कॅलथ्रॉप हा तिचा सल्लागार अभियंता होता. (काही काळानंतर त्याने प्रख्यात बार्शी लाइट रेल्वे सुरू केली). सुरुवातीला येथे ट्रॅमला दोन डबे असत. ती चार घोड्यांच्या मदतीनेच चालवली जात असे. जुन्या म्युनिसिपल इमारतीपासून ते नाशिक रोड रेल्वे स्टेशन या साधारण 8 ते 10 किमी अंतराच्या मार्गावर चालवली जात असे. या मार्गावर तेव्हा दाट झाडी होती. आणि प्रवासासाठी घोडागाड्या किंव एक-दोन टॅक्सी उपलब्ध होत्या. या ट्रॅमसाठी एका खासगी कंपनीनं भांडवल पुरवलं होतं. काही काळानं नासिक ट्रॅमवे कंपनीनं भारतात प्रथमच पेट्रोल इंजिनच्या सहाय्याने चालणारी ट्रॅम सुरू केली. पण सतत पडलेला दुष्काळ आणि प्लेग यांच्यामुळे कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले आणि अखेर 1933 च्या सुमारास नाशिकमधील ट्रॅम बंद पडली.. 

मद्रास (आता चेन्नई) मध्ये 7 मे 1895ला ट्रॅम सुरू करण्यात आली. तीही विजेवर चालणारी. भारतात विजेवर चालणारी ही पहिली ट्रॅम होती. ती मोठ्या आकाराचा जड माल नेत असे. ती खुपच लोकप्रिय होती आणि हजारो प्रवासी दिवसभरात तिनं प्रवास करत. 1921 हा तिचा सर्वात भरभराटीचा काळ होता. तेव्हा एकूण 97 ट्रॅमकार 24 किमी मार्गावर धावत होत्या. पण 1950 च्या सुमाराला कंपनीचं दिवाळं निघालं. अखेर 12 एप्रिल 1953 ला ती बंद पडली. कानपूरला ट्रॅम 1907 मध्ये सुरू झाली. त्यावेळी मार्ग चार मैलाचा होता आणि 20 ट्रॅमकार होत्या. त्या एक डबा असलेल्या आणि विजेवर चालणाऱ्या होत्या. 16 मे 1933 ला ही सेवा बंद केली गेली. कोचीन (आता कोची) मध्ये ‘कोचीन स्टेट फॉरेस्ट ट्रॅमवे’ कंपनीचा 3 फूट 33 / 8 रुंदीचा मीटरगेज मार्ग पलक्कड जिह्यातील अभयारण्यापासून त्रिसूर जिल्ह्यातील चलकुडीपर्यंत होता. 1907 ते 1963 या काळात ती सुरू होती. जंगलामधील टीक आणि रोजवूडची वाहतूक ती करीत असे आणि ते बंदरातून जगभरात विविध ठिकाणी पाठवले जात असे. यामुळे कोचीनला चांगला फायदा होत असे.

दिल्लीमध्ये ट्रॅम 1908 साली 6 मार्चला सुरू झाली. 1921 पर्यंत 15 कि.मी. मार्गांवर 14 ट्रॅम धावत होत्या. त्यांनी जामा मस्जिद, चांदणी चौक, चौरी बाजार, फतेपूर भाजीबाजार, पहाडगंज, अजमेर गेट इ. ठिकाणे जोडलेली होती. रस्त्यांवरील गर्दी वाढल्याने ट्रॅम बंद करण्यात आली. दिल्लीत आप सरकार आल्यानंतर त्यांनी ट्रॅम पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे, असा लेख ‘इंडिया टुडे’मध्ये 5 ऑगस्ट 2015 च्या अंकात आला होता. तेव्हा बरे वाटले होते. पण त्याबाबत नंतर काहीच हालचाल झालेली दिसत नाही. मेट्रोचे मार्ग मात्र वाढत आहेत. भावनगर येथेही नाशिकप्रमाणेच नॅरो गेज रुळांवरून ट्रॅम धावायची. 1926 मध्ये द. भावनगर ते तलाजा असा मार्ग तयार करण्यात आला होता आणि तो नंतर महीआपर्यंत वाढवण्यात आला. एकूण ट्रॅम मार्ग 67.5 मैलाचे होते. तेथे लहान आकाराच्या ट्रॅम वापरल्या जात.

1947 मध्ये ट्रॅममार्ग आधी सौराष्ट्र रेल्वेनं आणि नंतर प. रेल्वेने घेतला. 1960 च्या दशकात तो बंद केला गेला.

असा हा भारतातील ट्रॅमचा ओझरता इतिहास तिच्या दीडशेव्या वाढदिवसानिमित्त देताना एकच गोष्ट मनात येते की, आता तरी ट्रॅमचं वाहतूक आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व लहान-मोठ्या शहरांना नीटपणे कळावं आणि मोठमोठे रस्ते आणि मेट्रोवर मोठा खर्च न करता उपलब्ध चांगल्या रुंदीच्या रस्त्यांवरच एका बाजूला ट्रॅमचे रूळ ट्रॅममार्ग तयार करून तिथं ट्रॅम सुरू करण्याच्या योजना आखण्यात याव्या. यामुळे प्रवाशांनाही चांगली सुविधा मिळेल आणि तीही अगदी परवडण्याजोगी.

खरंच असं होईल का ?

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: calcutta trams bangal government meter-gauge horse-drawn tram golden jubilee of trams in india delhi trams Load More Tags

Comments:

Hira

लेख आवडला. ट्राम पुन्हा सुरू होईल? खरं तर सर्वार्थाने उपयुक्त व उपकारक वाहन आहे.ट्रामबरोबर जुनी नाणीही चलनात आली तर सोन्याहून पिवळे!

मंगेश नाबर

हे व असे लेख साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाले पाहिजेत. कर्तव्य साधना हे जोड माध्यम कशाकरता आहे हे कळत नाही.

Mangesh Nabar

मुंबईतली ट्राम माटुंगा ते बोरीबंदर असा प्रवास करत असे. आणि तिकिट कुठेही जा एक आणा होते. मी स्वतः ट्रामचा प्रवास केला आहे. श्री. केतकर यांनी नीट चौकशी करून हा लेख लिहायला हवा होता. ट्राम बंद करण्यात बेस्टचे अधिकारी व राजकारणी यांचा भ्रष्टाचार याशिवाय दुसरे काय कारण असणार?

Add Comment

संबंधित लेख