महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88 व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण व तारुण्य दक्षिण आफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातील इंग्रजी पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. ते वय वर्षे 11 ते 13 या काळात आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर व कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger', त्याचा मराठी अनुवाद कर्तव्य वरून पुढील 11 आठवडे प्रसिद्ध करीत आहोत. एकूण 11 प्रकरणे आहेत, प्रत्येक प्रकरण दोन भागांत (शुक्रवारी पूर्वार्ध व शनिवारी उत्तरार्ध) प्रसिद्ध करणार आहोत. म्हणजे या लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल.
- संपादक
आम्ही आजोबांकडे निघालो होतो. ते जगासाठी महात्मा गांधी. ‘बापूजी, बापूजी’ म्हणत लोक आदरानं त्यांच्यापुढे झुकत असले, त्यांची पूजा करत असले तरी माझ्यासाठी ते माझे आजोबा होते. माझे आई-वडिल सतत त्यांच्या गोष्टी सांगायचे. आम्ही आमच्या दक्षिण आफ्रिकेतल्या घरून भारतात त्यांना भेटण्यासाठी यायचो तो प्रवास खूप लांबलचक असे. त्यावेळीही मुंबईतून रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून घामाच्या, सिगारेटच्या नि वाफेच्या इंजिनातून येणाऱ्या धुराच्या वासाने बुजबुजलेला सोळा तासांचा दमवणारा प्रवास करून आम्ही आजोबांकडं यायला निघालो होतो. सगळे खूप दमलो होतो. वर्धा स्टेशनात रेल्वे घुसली तशी कोळशाच्या भुकटीच्या गंधातून एकदम ताजी हवा नाकात भरली. बरं वाटलं.
सकाळचे फारतर नऊच वाजले होते, पण ऊन तावलं होतं. स्टेशनवर उतरलो. स्टेशन म्हणजे तरी काय, तर एक फलाट आणि स्टेशन मास्तरची छोटी खोली. पण हो, बाबांना ढगळ लाल शर्ट आणि खाली लुंगी गुंडाळलेला हमाल दिसला. त्याने आमचं सामान टांग्यापर्यंत पोहोचवलं. बाबांनी माझ्या सहा वर्षाच्या धाकट्या बहिणीला उचलून टांग्यात ठेवलं आणि मला तिच्या शेजारी बसायला सांगितलं. आई व बाबा दोघेही टांग्यामागून चालत येणार होते.
‘‘मग मी पण चालतो...’’, मी म्हणालो.
‘‘अंतर जास्त आहे. आठेक मैलांचं बहुतेक...’’, बाबांनी सांगायचा प्रयत्न केला.
‘‘त्याचं मला काही नाही. ’’, मी आग्रहानं सांगितलं. मी आता लहान नव्हतो, चांगला अकरा वर्षांचा होतो. मी मजबूत आहे हे दाखवायची ही संधी मला हवी होती.
मात्र या निर्णयाचा प्रश्चात्ताप व्हायला फार काळ जाण्याची गरज पडली नाही. सूर्य हळूहळू आणखी आणखी आग ओकू लागला. स्टेशनपासून साधारण मैलभर रस्ता फक्त पक्का होता. तेवढ्यातच मी दमलो, घामेघूम झालो, धुळीनं माखून निघालो. आता मला परत बग्गीत बसता येणार नाही हे कळून चुकलं होतं. घरी तसा नियमच होता, जर तुम्ही एखादी गोष्ट बोलून दाखवली तर कृतीतून ती प्रत्यक्षात आणायची. माझ्या पायांत असणाऱ्या ताकदीपेक्षा माझा अभिमान दांडगा होता, पण आता गय नव्हती. मला चालत राहावं लागणार होतं.
अखेर आम्ही बापूजींच्या आश्रमात, सेवाग्रामला पोहोचलो. इतका मोठा प्रवास करून, दूरवर वसलेल्या भारतातल्या गरीबात गरीब अशा ठिकाणी आम्ही आलो होतो. आजोबा जगभरातल्या लोकांमध्ये किती सौंदर्य नि प्रेम वाटत असतात याबद्दल मी ऐकून होतो, त्यामुळंच कदाचित इथं आश्रमात सुंदरसुंदर फुलं नि पाण्याचे धबधबे असतील अशी माझी अपेक्षा आपसूक तयार झाली होती. पण तिथं होतं काय? - तर सपाट, कोरड्या आणि अगदी साधारण दिसणाऱ्या जागेत मातीच्या काही झोपड्या आणि मध्ये मोकळी सगळ्यांना वापरता येईल अशी अंगणवजा जागा. अशा ओसाड नि अगदीच अनाकर्षक ठिकाणासाठी का मी इतक्या लांबून आलो होतो? किमान आमच्या स्वागतासाठी काही खास मेजवानी झडेल, कार्यक्रम होईल असं मला वाटत होतं, पण आमच्या येण्याकडे कुणी फार लक्ष दिलं नाही. ‘‘आहेत कुठं सगळे?’’, मी आईला न राहवून विचारलंच.
आम्ही एका साध्याशा झोपडीत पोहोचलो. तिथं मी आंघोळ केली. खसाखसा चेहरा धुतला. या आधी मी बापूजींना भेटलेलो ते मी पाच वर्षांचा असताना, ती भेट मला तितकीशी आठवत नव्हती. आता या दुसऱ्या भेटीचा मात्र मला ताण आला होता. आजोबा आपलेच असले तरी ते एक खूप महत्त्वाचा माणूस आहेत, त्यामुळं त्यांच्यादेखत नीट वागा असं आईवडिलांनी आम्हांला सांगून ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेतली माणसंही त्यांच्याबद्दल इतकं आदरानं बोलत असायची की मी मनातल्या मनात सगळं दृश्य रचून ठेवलं होतं ... आश्रमाच्या मैदानावर कुठंतरी एक मोठी हवेली असेल, तिथं बापूजी राहात असतील, त्यांच्याभोवती सेवकांची गर्दी असेल वगैरे.
- पण मला जे दिसलं त्यानं धक्काच बसला. आम्ही थांबलो होतो तिथून काही अंतरावर मातीचा ओटा नि मातीनीच बांधलेली दहा बाय चौदा फुटांच्या तोटक्या जागेची ती झोपडी. त्या खोलीच्या कोपऱ्यात एका पातळशा बसकरावर बापूजी उकीडवे बसलेले होते.
नंतर मला कळलं की आजोबांसमोर तशीच पालथी मांडी घालून बसलेली माणसं राज्यभरातून त्यांना खास भेटायला व सल्लामसलत करायला आलेली माणसं होती. त्यांच्या समोर बसलेला माणूस म्हणजे ‘गांधीजी’ त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची व्यक्ती होते. या सगळ्यात व्यस्त असूनही बापूजींनी आपलं दंतहीन बोळकं पसरत सुंदरसं स्मित केलं आणि आम्हाला पुढे येऊन बसण्याचा इशारा केला.
आईवडिलांच्या मागून चालत मी व माझी बहीण पुढे पोहोचलो नि भारतीय पद्धतीनं वाकून त्यांना नमस्कार केला. त्याचं उत्तर म्हणून त्यांनी आम्हाला जवळ ओढलं नि प्रेमभरानं कुशीत घेतलं. आम्हा दोघांच्या दोन्ही गालांवर त्यांनी पापे घेतले. इला या मायेनं आधी चकित झाली नि मग आनंदानं ती ही चेकाळली.
‘‘कसा झाला तुमचा प्रवास?’’ बापूजींनी विचारलं.
त्यांनी असं विचारण्यानं मला इतकं बरं वाटलं की मी गडबडीनं सांगितलं, ‘‘बापूजी, मी स्टेशनपासून इतक्या लांब चालत आलो.’’
ते या उत्तरावर हसले तेव्हा मला बारीकशी मिश्किल छटा दिसली होती त्यांच्या डोळ्यांत, पण ते म्हणाले, ‘‘खरंच काय! तसं असेल तर मला अभिमान वाटतो तुझा.’’ - असं म्हणत त्यांनी माझ्या गालांवर आणखी पापे दिले.
त्यांचं ते निर्मळ प्रेम मला जाणवलं, त्यांच्या अशाच आशीर्वादाची तर गरज होती मला!
भविष्यात आणखीही खूप आशीर्वाद मला लाभणार होते.
माझे आईवडिल नि इला थोडे दिवस आश्रमात राहिले आणि नंतर भारताच्या आणखी कुठल्या कुठल्या भागात राहाणाऱ्या आईच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी म्हणून निघून गेले. मलाच पुढची दोन वर्ष बापूजींबरोबर राहायचं होतं, प्रवास करायचा होता. इथे त्यांच्या सहवासात अकरा वर्षाच्या कुमारवयीन कोवळ्या मुलाचं चौदाच्या तरूण मुलात रूपांतर होणार होतं. या काळात मी त्यांच्याकडून जगण्याचे असे धडे शिकलो की माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली.
बापूजींच्या बाजूला नेहमी चरखा असायचा. त्यांना बघताना मला नेहमी जगण्याबद्दल असं वाटायचं, जणू त्यांच्या या सगळ्या गोष्टी नि त्यातून होणारे निरनिराळे बोध यांचा एक सोनसळी धागा पिढ्यांपिढ्या गुंफत आपल्या सगळ्यांच्या जगण्याचं अस्तर बळकट करतो आहे. आजच्या काळात अशी बरीच माणसं असणार, ज्यांना माझे आजोबा सिनेमाच्या माध्यमातून माहिती आहेत किंवा त्यांच्या अहिंसात्मक चळवळीमुळे, जिच्या प्रभावातून अखेरीस अमेरिकेलाही मानवी अधिकार ही संकल्पना मान्य करत ती कायदेरूपानं अस्तित्वात आणावी लागली. मला ते कळत गेले एक प्रेमळ, उबदार आजोबा या नात्यानं!
असे आजोबा जे माझ्यातलं चांगलं ते बघायचे आणि माझ्यात आणखी काय चांगलं दडलेलं असेल ते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे. आपण कल्पनाही करू शकणार नाही असं आपल्यात छपून बसलेलं चांगुलपण शक्य तितकं बाहेर यावं यासाठी ते सगळ्यांना उत्तेजन द्यायचे. राजकीय न्यायाविषयी ते खूप सतर्क असायचे, पण हा न्याय भव्य सैद्धांतिक नजरेतून जसा सांगितला गेलाय त्यादृष्टीने नव्हे, तर साध्या साध्या माणसांच्या रोजच्या जगण्यातल्या संघर्षानं ते हेलावून जायचे. राजकीय न्याय अशा जगण्यांबाबतीत त्यांना आवश्यक वाटायचा. आपल्या प्रत्येकाला शक्य तितकं उत्तम जगण्याचा अधिकार आहे असं त्यांचं म्हणणं असायचं.
बापूजींच्या शिकवणुकीची आज कधी नव्हे इतकी जास्त गरज निर्माण झाली आहे. आज बापूजी असते तर रागाच्या खोल आत ते दु:खीच असते. पण हे खरंय की ते दु:खी झाले असते, निराश नव्हे.
‘सगळी मानवजात हे एक कुटुंब आहे’, असं त्यांनी मला कितीदा तरी सांगितलं. त्यांच्या काळात त्यांना सतत धोक्याचा नि तिरस्काराचा सामना करावा लागला. त्यांचं अहिंसेचं तत्त्व अत्यंत व्यवहार्य होतं आणि त्यामुळेच भारत तर स्वतंत्र झालाच, पण जगभरात मानवी हक्कांच्या उत्कर्षासाठीही हे तत्त्व आदर्श ठरलेलं आहे.
आजच्या जगात आपण खरोखर ज्या धोक्यांचा सामना करतो आहोत त्याकडे नीट व परिणामकारकपणे पाहता यावं म्हणून आपण एकमेकांशीच लढत राहाणं थांबवायला हवं. सामुहिक हत्या नि प्राणघातक बॉम्बहल्ले अशा घटना अमेरिकेच्या नियमित जगण्याचा भाग होऊन बसल्या आहेत. पोलीस आणि शांतपणे आपलं म्हणणं मांडणारे आंदोलक यांना न बिचकता ठार मारलं जातंय. शाळेत, रस्त्यांवर लहान मुलांच्या हत्या होताहेत, समाजमाध्यमे तिरस्कार नि पूर्वग्रहांची व्यासपीठं बनली आहेत. राजकीय व्यक्तिमत्वं सर्वसमावेशकतेचा विचार पायदळी तुडवत हिंसेला चिथावणी देताहेत.
माझ्या आजोबांच्या अहिंसेची कल्पना ही माणसाला निष्क्रिय किंवा दुर्बल करणारी कधीच नव्हती. उलट अहिंसेच्या मार्गावर चालताना एक माणूस म्हणून आपण नैतिक व तात्त्विकदृष्ट्या अधिक सबळ बनतो व त्यातून समाजात सामंजस्य प्रसारित करण्याची आपली वाट सुलभ होते असं त्यांचं म्हणणं होतं.
अहिंसेची चळवळ चालू होती तेव्हा त्यांनी अनेकांना या चळवळीला काही योग्य नाव सुचवण्यासाठी विचारणा केली होती. त्यांच्या चुलतभावानं त्यांना ‘सदाग्रह’ हे संस्कृत नाव सुचवलं. एखाद्या चांगल्या कामासाठीचा आग्रह असा या शब्दाचा अर्थ होता. बापूजींना तो आवडला, पण त्यात आणखी थोडा बदल करत त्यांनी ‘सत्याग्रह’ म्हणजे सत्यासाठीचा आग्रह हा शब्द चळवळीसाठी निश्चित केला. नंतर काही जणांनी त्याचा ‘आत्मबळ’ असाही अर्थ लावला. खराच आहे हाही अर्थ! योग्य मूल्यांच्या प्रतिष्ठापनेतूनच सामाजिक परिवर्तनाला गती नि ताकद मिळत असते.
आज मला दिसतं की आपल्याला आजोबांच्या सत्याग्रहाच्या मार्गावरून जाण्याची गरज आहे, आत्मबळाची गरज आहे. त्यांच्या याच चळवळीमुळे प्रचंड राजकीय उलथापालथ घडून करोडो भारतीयांना स्वत:चं राज्य मिळालं. आजोबांचं मुळात सांगणंच हे होतं की प्रेम आणि सत्याच्या मार्गावरून चालताना आपल्यातला अविश्वास नि संशय गळून पडतो, सकारात्मकता आणि धैर्य आपल्यामध्ये संचारतं आणि अखेर आपल्याला आपलं ध्येय गाठता येतं!
आजोबांना कुठल्याच प्रकारची वर्गवारी किंवा विभागणी माणसांमध्ये असते या गोष्टीवर विश्वास नव्हता. ते गाढ आध्यात्मिक वृत्तीचे असल्यामुळे जो धर्म जोडण्याऐवजी माणसांना तोडतो किंवा विभागतो त्या धर्मावर त्यांचा आक्षेप होता. आश्रमात ते रोज पहाटे साडेचारला उठायचे, कारण पाचची वेळ ही प्रार्थनेची. बापूजींनी सगळ्या धर्मांच्या ग्रंथांचं वाचन केलेलं होतं. या सखोल वाचनातून निवडलेल्या वैश्विक प्रार्थना ते यावेळी म्हणायचे. सगळ्या धर्मांमध्ये सत्याचा अंश असतो, मात्र हाच अंश म्हणजे संपूर्ण नि एकमेव सत्य असं आपण म्हणायला लागतो तिथं झगडा सुरू होतो असं ते म्हणायचे.
जनतेच्या बाजूने अतिशय दृढनिश्चयाने बापूजींनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आवाज उठवला आणि त्यासाठी तब्बल सहा वर्ष ते भारतातल्या बऱ्याच तुरूंगात राहिले. तिथेही त्यांनी सत्य नि प्रेमाचा प्रसार केला. शांती व एकतेच्या त्यांच्या कल्पना या अनेकांना इतक्या हादरवणाऱ्या ठरल्या की त्यांच्यासह, त्यांची बायको कस्तुरबा, त्यांचे जवळचे मित्र व सहयोगी महादेव देसाई या सगळ्यांनाच तुरूंगाची हवा खावी लागली. देसाईंना 1942 मध्ये तुरूंगात असतानाच हृदयविकाराचा झटका आला नि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
आजोबांची सावली म्हणजे त्यांची बायको कस्तुरबा. 22 फेब्रुवारी 1944 रोजी त्यांच्याच मांडीवर तिनं जीव ठेवला. तिच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी एकट्याच उरलेल्या माझ्या आजोबांची तुरूंगातून सुटका झाली. त्या नंतरच्या वर्षी मी त्यांच्याकडे आलो. चांगलं आयुष्य कसं जगता येईल हे मला शिकवण्याचा चंग या काळात त्यांनी बांधला होता.
बापूजींबरोबर मला राहाता आलं ती दोन वर्ष माझ्या व त्यांच्याही आयुष्यात अतिशय महत्त्वाची होती. मी त्यांच्याजवळ होतो त्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या त्यांच्या कार्याला फळ मिळेल अशी चिन्हं दिसायला लागली होती, अर्थात त्यावेळी भडकलेला हिंसाचार नि फाळणी या गोष्टींची कल्पना त्यांनी कधी स्वप्नातही केली नव्हती.
जागतिक पटलावर त्यांनी जे बदल घडवले ते माझ्या पातळीवर मी स्वत:त घडवत होतो, स्वत:च्या क्षमता जोपासण्यासाठी सतत सोबतीला असणारा भावनातिरेक आटोक्यात आणणं आणि नव्या नजरेनं जग पाहणं मला साधू लागलं होतं. एकीकडे मी एका मोठ्या इतिहासाचा साक्षीदार बनत होतो नि दुसरीकडे व्यक्तिगत पातळीवर बापूजी मला जगण्याचे साधेसोपे व्यवहार्य धडे देत होते. तत्त्वज्ञानातला हा अतिशय सघन, सखोल भाग, ‘जगात जो बदल तुम्ही पाहू इच्छिता तो स्वत:च व्हा!’
आज आपल्याला हा बदल हवा आहे. जगभरात हिंसेची आणि तिरस्काराची पातळी सहन करण्यापलीकडे पोहोचलेली असताना हा बदल अत्यावश्यक वाटतो आहे. लोकांनाही बदल हवाच आहे, पण ते हतबल आहेत. वेगवान बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे झालेल्या असमतोलाचा अर्थ असा की अमेरिकेतल्या दिड कोटी नि जगभरातल्या कोट्यावधी बालकांना पुरेसं अन्न न मिळणं... याचा अर्थ असाही की ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांना ते वाया घालवण्याचा परवाना असणं!
उजव्या फॅसिस्टांनी, उत्तर भारतातल्या एका गावातल्या चौकात उभारलेल्या माझ्या आजोबांच्या पुतळ्याची विटंबना केली तेव्हा त्यांनी उघड संकेत दिले, ‘‘आता तुम्ही दहशतीचा खरा थरार अनुभवाल!’’ या असल्या माथेफिरूपणाला संपवायचं असेल तर आपल्याला आपलं जगणं, राहाणं यांच्या पद्धती बदलणं भाग आहे!
आपल्या इतिहासात हिंसेचं असं पान येण्याची आजोबांना नेहमी भीती वाटायची. त्यांची हत्या होण्याआधी आठवडाभर एका पत्रकारानं त्यांना विचारलं होतं, ‘‘तुम्ही मेल्यानंतर तुमच्या तत्त्वज्ञानाचं काय होईल असं तुम्हाला वाटतं?’’ त्यांनी अत्यंत जड, दु:खी अंत:करणानं या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, ‘‘लोक जगण्यात माझं अनुकरण करतील, मृत्यूनंतर माझी पूजा करतील... मात्र एक सांगू, माझं ध्येय हे कधीच त्यांच्या जगण्याचं ध्येय होणार नाही.’’
आजोबांचं ध्येय, त्यांचं कार्य आपण आपलं बनवायलाच हवं अशी ही वेळ आहे. आज आपल्याला जगताना ज्या संकटांचा सामना करावा लागतो आहे त्यातील अडचणी सोडवण्याकरता त्यांचं निखळ शहाणपण उपयोगाचं ठरेल. म्हणूनच म्हणतो, आज या क्षणी आपल्याला आजोबांची कधी नव्हे इतकी गरज आहे.
बापूजींनी दिलेल्या अविचल सत्य आणि जगण्याच्या मूलभूत व्यवहार्य युक्त्यांमुळे अक्षरश: इतिहास बदलला. हीच वेळ आहे, आपण या गोष्टी आचरण्याची.
बापूजींकडून मी जे शिकलो त्यानं माझं आयुष्य बदललं... तुम्हालाही त्यातून मदत व्हावी आणि असीम शांतता लाभावी, तुमच्या जगण्याला अर्थ यावा अशी माझी इच्छा आहे.
(अनुवाद: सोनाली नवांगुळ)
- डॉ. अरुण गांधी
Tags: नवे पुस्तक अनुवाद अरुण गांधी महात्मा गांधी Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Load More Tags
Add Comment